चाळीतील गमती-जमती(११)

Submitted by राजेश्री on 11 May, 2018 - 21:26

चाळीतल्या गमती-जमती(११)

एकदा चाळीत काही बांधकाम काढलं आणि आम्हाला चाळीतली खोली खाली करावी अशी सूचना मिळाली.आणि नेमकं आम्ही जैनाच्या म्हातारीच्या पलीकडे असलेल्या तिच्या बहिणीच्या मुलाच्या रिकाम्या खोलीत राहायला गेलो.खरतर ती दुकान काढावं या हिशोबाने बांधलेली खोली होती.त्याला फोल्ड होणाऱ्या फळ्या होत्या.खूप दिवस बंद अवस्थेत होत ते घर आम्ही तिकडे शिफ्ट झालो.जैनाची म्हातारी मग आता आमच्या पाचवीला पूजल्यासारखीच झाली.तिच्या एक एक जाचक अटी बघता महायुद्ध अटळ आहे याची सर्व गल्लीला कुणकुण लागली.आमच्या घरात आम्ही हसायचं नाही तिला त्रास होतो,दोघात मधोमध एकच नळ पहिला पाणी ती भरून घेणार आणि उरल तर आम्ही भरायचं असा तिचा प्रघात.तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही.पाण्याची घागर वाहून जात राहिली तरी ती काढायची नाही आणि नळ देखील बंद करायचा नाही.कारण ती सोवळं पाळायची.चुकून स्पर्श झाला तर शिव शिव करत लगेच अंघोळ करायची.बाहेरच्या कुणाकडून काही विकत घ्यायचा प्रसंग आला की ती बाहेर ताट ठेऊन त्यात ठेवायला लावायची.मग त्यावर पाणी शिंपडून ते घेणार.पैसे पण खाली ठेवल्यावर उचलून घ्यावे लागायचे.असे व्यवहार करताना दूर हो तिकडं...हो दूर तिकडं अस ती व्यक्ती जाईपर्यंत म्हणत राहायची.
सकाळी उठल्या उठल्या तिच्या नजरेसमोर यायच नाही.हे तिने स्पष्ट सांगितलं नसलं तरी राजीचच पयल त्वांड बघितलं सकाळी सकाळी आता काय दिवस चांगला जाणार नाहीच अस ती रागाला येऊन म्हणायची. मला हे कळल्यापासून तिचा दिवस चांगला जाऊ नये याची पद्धतशीर काळजी मी घ्यायचे.तिचे सकाळी दार उघडणार असा अंदाज आला,कडी काढायचा आवाज आला की मी पळत पळत जाऊन दरवाज्यात उभी राहणार.तिला सूर्याचे दर्शन घ्यायचे असायचे आणि मी तिच्या आणि सूर्याच्या मध्ये यायचे मग लगोलग(खग्रास सूर्यग्रहण )फर्मास शिव्याग्रहण व्हायच्या.मला इतक्या सलग शिव्या देताही यायच्या नाहीत आणि वर मम्मीचा धाक होताच.मग मी तिने शिव्या दिल्या की फक्त मम अस म्हणायचे कधी खूप वेगळ्याच शिव्या असायच्या उदा.बनेल कुठली,आगाव कुठली,नग आहेस,द्वाड आहेस,भटक भवानी आहेस वैगेरे वैगेरे मग मी तूच ती तूच ती अस म्हणायचे.तिची फार चरफड व्हायची. नुसती रागाने धुमसत राहायची.एकच गोष्ट दहा दहा वेळा करायची तिची सवय.म्हणजे सूर्याला ओवाळायच तर सलग दहा वेळा आरतीच ताट गोल गोल फिरवणार,कळशी दहा वेळा तरी खंगळुन ओतणार,शिव्यांची लाखोली वाहताना एक शिवी दहा वेळा आणि दोन शिव्यांमधील गॅप ती अ अ अ अश्या धुमसणार्या आवाजाने भरून काढणार.आयुष्यात उघड उघड युद्ध स्वीकारलेली ती माझ्या आयुष्यातील पाहिली शत्रू होती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users