चाळीतील गमती-जमती(६)

Submitted by राजेश्री on 8 May, 2018 - 06:15

चाळीतल्या गमती-जमती(६)
आमच्या चाळीच्या शेजारचे स्वतःची घरे असणारे शेजारी चाळीत नेहेमी येऊन जाऊन असायचे.त्यांच्या घरातल्या मुलांनाही चाळीतच तर धमाल करायला मिळायची.पण ते स्वतःच मोठं घर,पाणी पुष्कळ यामुळे लय भाव खायचे.आम्हाला चाळीत उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा जणू दुष्काळ.मग आमचे सारे चाळकरी आमच्या कॉमन एका नळाला नंबर लावून ठेऊन शेजाऱ्यांच्यात पाणी भरायला विखुरायचे.खूप तिष्ठत ठेवायचे ते आम्हाला एका एका घागरीसाठी.उपकार केल्यासारखे एक घागर भरून पाणी दिल की आता पुन्हा येऊ नका पाणी न्यायला आम्हाला सडा मारायचा असतो अस सांगायचे.हो पण या अश्या अनुभवामुळे तर पाण्याची किंमत मला कळली.आज एक थेंब पाणी वाया गेल तरी मला वाईट वाटत.असो,मम्मीच्या भाषेत सांगायचे तर जे होत ते चांगल्यासाठीच
आज एका शेजाऱ्यांबद्दल सांगते त्यांच आडनाव बावचकर.त्यांची आर्थिक स्थिती श्रीमंत या कॅटेगरी मध्ये मोडणारी. शेतीच उत्पन्न जास्त.घरात दूधदुपत्याची रेलचेल.त्यांच्या घरात शेंगा फोडायला पैसे देऊन शेजारच्या गरीब घरातल्या मूल मुलींना काम देत असत.मी आणि माझी मैत्रीण आमच्या घरात कळू न देता त्यांच्या घरात शेंगा फोडायला जायचो.एक मापट शेंगदाणे निवडले की एक रुपया मिळायचा.आम्हाला किती रुपये मिळाले आठवत नाही पण शेंगा फोडताना शेंगदाणे चोरून चोरून लय खायचो आम्ही.
त्यांची मुलगी आमच्या एवढीच तिचे वडील आटपाडी शाळेत शिक्षक खूप मेहेनती. इतके की ते आटपाडी वरून इस्लामपूर सायकल वरून ये जा करायचे.आता बस नि ये जा केलं तर आपल्या अंगात त्राण राहणार नाही आणी ते सायकल वरून ये जा करायचे.वर रानात जायचे.त्यांच रानही आटपाडीत मग काय ते सायकल वरून भाजीपाला आणायचे तो भाजीपाला ते स्वतःच्या किराणा मालाच्या दुकानात विकायला ठेवायचे.ते घरात असले तरी कायम कष्ट करीत असायचे.अविरत कष्टत राहायचे.धान्य निवड,चटणी कर,सायकल दुरुस्ती,घर झाडायला काढ आणि खूप असंख्य कामे ते करीत राहायचे.आमच्याशी ते कधीच बोलायचे नाहीत.त्यामुळे त्यांना कोणते नाव घेऊन बोलवायचा काही संबंध आला नाही.चाळीत सगळेजण म्हणायचे त्यांनी कोकणातून चेटूक आणलय घरात त्यामुळे त्यांना अखंड काम करायला ते चेटूक भाग पाडतय.एवढी त्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता तरी सोनी ची आई आमच्या आणि चाळीतल्या इतरांच्या घरी पीठ ,मीठ,साखर मागायला यायच्या.सगळे म्हणायचे अस त्या मागायला आल्या की त्यांच्या मागून ते कोकणातून आणलेलं चेटूक येत आणि आपल्या घरभर फिरत मग आपल्यातले सगळे साहित्य ते त्यांच्या घरात घेऊन जात.तिन्हीसांजेच काही द्यायला आमच्या मम्मीच पण मन धजावायच नाही.मम्मी म्हणायची तिन्हीसांजेची लक्ष्मी बाहेर जाते काही दिल की.पुन्हा मम्मी म्हणायची घरात काय पुरवठयाला येत नाही.सर्वाना खा खा सुटते.भाकरी,चपातीच पीठही लवकर संपते त्यांनी काही नेलं की.एकंदरीत आता ही सगळी अंधश्रद्धा होती हे पटत असलं तरी आम्ही त्यांच्या घरातल्या कोकणातून आणलेल्या काल्पनिक चेटूकाच्या भीतीच्या गडद छायेखाली होतो.
त्यांचे आडनाव बावचकर आमच्या चाळीतली टारगट पोर म्हणायची 'बा वचकर आणि आय चिमटा काढ'आणि वर हे म्हणून खो खो हासत सुटणार कधी मधी त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडण झाली की मात्र थांब तुमि काय म्हणताय सांगतो जातो म्हणून एखाद्याने फितुरीचा झेंडा वर काढला की सर्वांचे धाबे दणाणायचे.शेवटी त्यांच्या घरात ते कोकणातून आणलेलं चेटूक आहे ते त्यांनी रागाने आपल्या मागे सोडलं तर काय घ्या म्हणून सर्वांची भीतीने गाळण उडायची..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आटपाडी तालुका आहे सांगली जिल्ह्यात

चाळ इस्लामपूर मध्ये
Plz बावाचकर यांना नको सांगायला किंवा कळायला

मम्मी म्हणायची तिन्हीसांजेची लक्ष्मी बाहेर जाते काही दिल की.पुन्हा मम्मी म्हणायची घरात काय पुरवठयाला येत नाही.सर्वाना खा खा सुटते.भाकरी,चपातीच पीठही लवकर संपते त्यांनी काही नेलं की.एकंदरीत आता ही सगळी अंधश्रद्धा होती हे पटत असलं >> +१.
घरमालकांनंतर आम्हीच श्रीमंत असल्याने रोज कोणीनाकोणी काहींनाकाही मागायला यायचं. काहीजण मुद्दाम तिन्हीसांजेला यायचे. किंवा चहानाष्टयाच्या वेळी यायचे....

कधीकधी सकाळी आमच्या दाराबाहेर कुंकवाने माखलेले लिम्बु, उतरून टाकलेला भात वगैरे देखील असायचं. करणी करायचा प्रयत्न...