डांगर भाकर दे नायतर विंचू चावल तुला..

Submitted by राजेश्री on 5 May, 2018 - 23:58

Screenshot_2018-05-08-06-34-34-318_com.android.browser.png! डांगर भाकर दे नायतर विंचू चावंल तुला !
सर्वप्रथम हे शीर्षक/गाणं/Slogan जिला जिला /ज्याला ज्याला माहित आहे त्यांनी comment Box मध्ये होय/नाही लिहावे.भविष्यात या विषयावर PhD करण्याचा योग आला तर आपला आयताच सर्वेक्षण अहवाल हाताशी असावा म्हणून ही तजवीज. खरंच हि अतिशयोक्ती नाही कारण जे जे नामशेष होई. त्याच्या पाटी लागावे...माहिती करुनी द्यावी..सकळजन! अशा उक्ती प्रमाणे माणूस हजारो वर्षांपूर्वीच्या डायनासोर च्या मागे लागला(काय आहे मेल्यावर काय कुणीही डायनासोरच्या मागे लागेल आधी इथे गल्लीतल्या श्वानाच्या(म्हणजे कुत्रापाठी लागून दाखवा मग मानलं तुम्हाला. असो ...खरंच असो कारण जिवंत नसला तरी मीही घाबरतेच डायनासोर ला.असो फायनल असो कारण खूपच विषयांतर होतंय.
आपण डांगर बद्दल बोलू आज सकाळी जेवताना मम्मी ने माझ्या ताटात हा अमृततुल्य पदार्थ वाढला आणि मग मी लगेच त्याचा फोटो काढावा म्हणून ताटावरून उठून तडक फोनजवळ गेले. फोनवर या दुर्मिळ पदार्थाची छबी टिपून घेतली आणि ,"पोटात दुखेल फोटो Whats App वर टाकू नको"या मम्मीच्या संभाव्य वाक्यबाणाला नामोहरम करण्यासाठी उत्तरले आता नाही टाकणार ग फोटो जेवून टाकते.म्हणत जेवण उरकले .आणि ज्या ज्या ग्रुप मध्ये राजश्री या नावानिशी जिथे मला ओळखलं जातं तिथे हा युनिक फोटो सत्वर धाडला.मग नेहेमीप्रमाणे खूप जणांच्या तोंडाला पाणी सुटले,खूप जणांना हा पदार्थ आवडला , पदार्थ ओळख परेड हि झाली आणि आज वेगळं असं लक्षवेधी काही सांगितल्याच अपार असं समाधानही मला लाभलं. याच कृतकृत्य भावनेत मला माझं डांगरमय असं बालपण आठवू लागले.
उन्हाळ्याची सुट्टी लागली कि 'ऊन मी म्हणते' सारखी वाक्य आम्हाला समजायचीही नाहीत.ग्लोबल वॉर्मिंग ला हि चार्मिंग नसलेले ते दिवस.सकाळपासून रात्री पर्यंत पांढरा(पावडरच्या थप्पी मुळे जास्तच शुभ्र पांढरा,गुलाबी,सावळा,काळा अश्या फेअर अँड लवली च्या पट्ट्यांवर असणारे विविध रंग आमची त्वचा धारण करायची. गारीगार $ $ $ $असा दुसऱ्या गल्लीतून जरी आवाज आला तरी गारीगार वाला आपल्या गल्लीत न येता परस्पर पसार होईल काय या भीतीपोटी हातात चार आणे घेऊन चुंगतच (त्याच वेळी हातात जर बंदा रुपया असेल तर यातले बारा आणे परत आणून द्यायचेत या जबाबदारीच ओझही डोक्यावर असायचं) गारीगारवाला जिथे असेल तिथे त्याला गाटायचा असा आमचा एक कलमी कार्यक्रम असायचा.गारीगार ही त्यावेळी काय रोज मिळायची गोष्ट न्हवती ती कधीतरी केलेल्या कामाची बक्षिसी म्हणून मिळायचे(हे बक्षिस खडूस शेजाऱ्यांच्या खडूस पोरांसमोर त्यांना चिडवत खाण्यातही ही एक वेगळीच मौज होती)मम्मी ने उन्हाळ्याचे करायला घेतले की(पपांच्या भाषेत तडज मांडला कि) माझ्या चिमुकल्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडायची हि कामे म्हणजे,दळणवळणमंत्री(शेजाऱ्यांचे पाट,साचे(म्हातारं आईच्या भाषेत सोगा), वाळवायचा कागद ,शेवायचा पाट आणून देणे काम झाले की परत नेऊन देणे, कामगारमंत्री(सांगेल ती कामे ऐकणे, कागद उडून जाऊ नये म्हणून मापाचे व स्वच्छ दगड शोधून आणणे,वाळवणाची राखण करणे इ. कामे)स्वच्छता व आरोग्य मंत्री(अंगण झाडून घेणे,धुराळा उडू नये म्हणून त्यावर पाणी शिंपडने, नुकत्याच घातलेल्या वाळवणावर बसायचा प्रयत्न जर माश्या करीत असतील तर त्यांना दुसरीकडे जाऊन बसण्याची नम्र विनंती करणेअशी व इतर"बिनपगारी फुल अधिकारी" या हुद्द्यासारखेच "एक गारीगार आणि कामे कर चिक्कार" अशी मायंदाळ(म्हणजे खूपच) कामे मला करावी लागायची. उन्हाळ्याच्या शेवया करणे हा प्रचंड जिकिरीचा असाच एक उद्योग असायचा. गहू ते ताटात पडणाऱ्या गरम गरम शेवया या दोहोंच्या मध्ये शेवयासाठीचे वेगळ्या वैशिष्टाचे गहू विकत आणणे, गहू वलविणे (वाळवणे न्हवे तर भिजवणे),सावलीत वाळवणे, दळून आणणे,त्याची सोजी काढणे, सोजी काढल्यानंतर झाडने,पाखडने,येवचने या क्रियानंतर त्याचे पीठ एकीकडे व गरा एकीकडे होतो. मग राहिलेल्या कोंड्यात गुळ, बडीशेप, सूंट घालून शिजवले कि त्याचे गोड गोड मुटके मिटक्या मारत खाणे. शेवया करायला शेवयाचे पीठ भिजवणे, शेवयाचे शेजाऱ्यांकडून गोळा करून आणलेले पाट डब्यांच्या आधारे बसवून त्याची बैठक तयार करून घेणे , मग त्या शेवया पाटावरून सोडणे, खाली बसून एकाने ती शेवयाची धार नजाकतीने ताटामध्ये नक्षी उठवतात तशी चाळून घेणे,ती ताटे उन्हात वाळवणे,वाळून झाल्यावर हलक्या हाताने त्या शेवया ताटातून अलग करणे,डब्यात भरून ठेवणे अश्या असंख्य कामांचा पूल असायचा. पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत एवढ्याच उत्साहाने सगळे शेजारी एकमेकांना मदत करीत हा शेवयोत्सव साजरा करायचे.
उन्हाळ्याच्या इतर पदार्थांमधे तांदळाच्या, शाबुच्या,नाचणीच्या पिठाच्या भातवड्या , शाळूच्या, गऱ्याच्या आणि तांदळाच्या कुरवड्या,उडदाचे पापड, तांदळाचे वाफेवरचे सोलपापड,बटाट्याचे वेफर्स असेही पदार्थ केले जायचे. कुरवड्या करताना शेवटचे साच्या दोन साचे पीठ साच्यातून पडताना दमवू लागले की त्याचे सांडगे तोडावे लागायचे .मला तर वाळवण राखताना सांडगे खूप असणारे वाळवणच राखायला खुप मज्जा यायची. तळे राखी ..तो पाणी चाखी.. या उक्तीप्रमाणे ' "वाळवण राखी तो सांडगे चाखी"ही क्रियाशील उक्ती आम्हाला लागू पडायची.शाबुच्या भातवड्याचे सांडगे असायचा काही प्रश्नच नाही मग हे वाळवण राखताना वाळत आलेली भातवडी दुसऱ्या बाजूला उलटताना पूर्ण भातवडीचाच मम्मी च्या नकळत पान खाल्ल्यासारखा तोबरा भरायचा याची कबुली मी इथे देत आहे.
या सर्व उन्हाळी पदार्थांच्या शेवटी करावयाचा पदार्थ म्हणजे सांडगे . सांडगे करणे हे काम साधहीं सोपही आणि त्याचबरोबर इतर उन्हाळी पदार्थांसारखे ते करायला खूप व्यापही नाहीतच.अंगमेहनत हि फार नाहीच , सर्वप्रथम सगळ्या डाळी दळून आणायच्या,इतर डाळींपेक्षा मात्र उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्तच घ्यायचे मग तूर,मूग,हरभरा,मटकी या डाळी थोड्या थोड्या घेऊन त्या एकत्र जाडसर दळून आणल्या कि सांडगे करायच्या आदल्या दिवशी कोथिंबीर,मीठ,लसूण,लाल तिखट घालून सांडग्यांचे पीठ मळून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळची कामे आटपून घरातील बसायचे पाट स्वच्छ धुवून पुसून त्याला तेलाचा हलकासा हात लावून सांडग्यांचे पीठाचा हातात मावेल एवढा गोळा पकडून अंगठा आणि पहिल्या बोटाच्या पहिल्या पेऱ्याचा शेवटी चिमट करून सांडगे तोडायचे . अशी नाजूकश्या चिमटीने नाजूक नाजूक सांडगे पाटावर एकसारखे नक्षी काढल्यासारखे तोडायची मजाच काही और असायची. इतर उन्हाळी पदार्थ उन्हाचे चटके सहन करूनच करावे लागतात मात्र सांडगे सावलीत ऐसपैस मांडी घालून निवांत मन लावून करायची अशी गोष्ट.सांडगे तोडताना हे पीठ मात्र चटणी ,मिठाच्या प्रमाणासाठी चाखून बघेल इतकंच खाल्लं जायचं सांडगे तोडून होताना मुठी दोन मुठी पीठ डांगर साठी राखून ठेवल जायचं.
आणि मग भरपूर म्हणजे पुष्कळसा कांदा चिरून तेलात तो जिरे ,मोहरी , हळद टाकून खरपूस असा भाजून काढायचा आणि मग त्यावर सांडग्यांचे पीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे कि झाले खमंग खुसखुशीत डांगर तयार. हे डांगर भाकरी झाल्या झाल्याच गरम तव्यात परतून घेतले जायचे,डांगर,भाकर, तोंडी लावायला कांदा, ताजे ताजे दही अशी साग्रसंगीत जेवणाची पर्वणी आमच्या साठी सांडगे तोडण्याच्या दिवशी ठरलेली असायची.इकडे मम्मी तव्यात डांगर परतत असताना हाताची बोटे एकावर एक चढवून त्याचा विंचवासारखा आकार करून "डांगर भाकर दे नायतर विंचू चावल तुला " असं म्हणत आम्ही एकमेकांना चिमूटे काढत सुटायचो. दुसऱ्याच्या विंचवाचा दंश चुकवून आपल्या विंचवाने नांगी मारायची असा अपार कौशल्याचा खेळ आम्ही खेळायचो. आणि मग दमून भागून भुक्यावल्या पोटाने डांगर भाकरीवर ताव मारायचो.
संध्याकाळी पाटावरील सांडगे चांगले कडकडीत वाळलेले असायचे पाटावरून ते सळकन निसटून यायचे .पूर्ण वाळलेले सांडगे डब्यात भरून ठेवले कि अधे मध्ये रोजच्या भाजीतून बदल म्हणून किंवा घरी भाजीला ऐंनवेळी काही नसलं कि करता येणारी अशी सांडग्याची सर्वांची आवडती अशी आमटी . याची सुक्की भाजी हि करता येते. पण सांडग्याच्या आमटीची चव मात्र मानव जन्माला येऊन एकदा चाखून बघावी अशीच.
आजच्या मंचुरियन आणि फ्राईड राईस च्या जमान्यात सांडग्याच्या आमटीची अवीट चव ज्यांनी चाखली असेल त्यालाच कळून येईल. बाकीचे मात्र "डांगर भाकर दे नायतर विंचू चावेल तुला" असं ऐकल कि व्हाट्स अप असच विचारतील हे नक्की होत म्हणूनच हे सगळं लेखनाचे वाळवण....(बसा राखत)म्हणजे बसा वाचत
राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान लिहिलंय.
शेवया चाळताना ताट घेऊन मागे मागे सरकत लांबच्या लांब शेवई कोणाची तगतेय याची ईर्षा लागे. चाळून चाळून मान मोडली की शेवया वळणार्‍या आयांच्या मागे बसून त्यांच्या पाठीवर शेवया वळल्याची नक्कल करायची.

सर्वप्रथम हे शीर्षक/गाणं/Slogan जिला जिला /ज्याला ज्याला माहित आहे त्यांनी comment Box मध्ये होय/नाही <<< "होय!"

आणि हो, हे चित्र असू द्या संग्रही. म्हणजे PhD च्या अहवालास वजन येईल. चित्राखाली सौजन्यः अमुकढमुक असे नमूद करायला इसरू नगासा.
dangaar.jpg

छान लिहिलंय.
डांगर माहित आहे पण गाणं माहित नाही.

सर्वप्रथम हे शीर्षक/गाणं/Slogan जिला जिला /ज्याला ज्याला माहित आहे त्यांनी comment Box मध्ये होय/नाही <<< "होय!"
पण त्यात थोड व्हेरिएशन आहे Lol आमच्याकडे "पिठलं भाकर दे नायतर विंचू चावेल " असं म्हणतात

लेख मस्स्तच ! आणि फोटो बघून अगदी तोंपासु !!

आम्ही फक्त उडदाचे डांगर करतो म्हणजे उडीद डाळ ज्यास्र त्यात लाल सुक्या मिरच्या, मेथी, धणे , जीरे, हिंग,बडीशेप वगैरे. खमंग भाजतो. दळतो. मग कधी नुसतेच फोडणी देवोइन तर नुसते कधी कच्चा कांदा,दही व भरपूर कोथिंबीर. कधी दह्याची फोडणी घालून आणि ज्वारीची भाकरी.
आई गं मेले मी इथे लिहितानाच तोंडाला पाणी सुटून.
—बाकी, उन्हाळ्यात आईच्या हाताखाली( धाकाखाली खर तर) केलीत वाळवणं.