चाळीतील गमती-जमती (५)

Submitted by राजेश्री on 7 May, 2018 - 21:12

चाळीतल्या गमती-जमती(५)

ताईचे बाबा दारू पिऊन आले की चाळीतील माणसांसाठी जेवढे गमतीशीर होते तेवढे त्रासदायक त्यांच्या घरातल्यांसाठी होते.मनाला येईल तस वागायचे.एकदा त्यांनी दिवाळीचा भरलेल साहित्य रस्त्यावर फेकून दिला. आणि तेलाचा मोठा डबा टोपण काढून नहाणि घरात ओतला होता.बिचाऱ्या ताईच्या आईनी बाहेरून तेल वाहतेल बघून बादली लावली तर त्यांनी तिथे येऊन बादलीच फेकून दिली होती.
अजूनही चाळीतील काही दारुनेग्रस्त लोक होते.ते कायम आमच्याशी छान वागणार,माणूस म्हणूनही चांगलेच.पण मग दारू पिऊन आले की हे तिसऱ्या जगातच जायचे किंवा मग चंद्रावर तरी.मला कधी दारु पिणाऱ्या लोकांबद्दल मनापासून राग आला नाही किंवा येत नाही तो त्याच मुळे. दारू वाईट असतेच पण वाईट परिस्थिती प्रथम असते.या मध्ये दुसरी एक व्यक्ती म्हणजे आमच्या घरमालकाच्या टॅक्टर वर काम करणारे ड्रायव्हर.बबन त्यांचे नाव.मी त्यांचा मुलगा इक्या बद्दल लिहिलं होतं.तर इक्याचे पप्पा आम्ही त्यांना ड्रायव्हर मामा म्हणायचो.ते घरमालकाकडे पडेल ते काम करणारे.बासरी ते खूप छान वाजवायचे.मोठी मोठी कष्टाची कामे करायचे.पण दारू पिली की मात्र आपण कुठेतरी ड्रायव्हर म्हणून काम करतो ते पण विसरायचे.हे नाट्य कधी कधी सलग चार पाच दिवस चालायचं.टॅक्टर बंद, काम बंद,बासरी देखील रागाने दगडाने फोडून टाकणार. बायकोला माझी चादर मला दे..झोपू दे हे एकच पालपूद मागत बसणार.बोलण्यात तोतरेपणा. शिवाय काय बोलायचे म्हंटल तर त्यांच्या तोंडातून एक एक शब्द बाहेर येताना त्यांच्या जिभेला मणामणाचा भार पेलायला लावत असल्यासारखा जीभ नुसती वळवळणार आणि मोठ्या कष्टाने एक शब्द बाहेर पडणार.इक्या तर कुठं धड बोलायचा. तो पण तसाच.पण तो अ अ करीत का होईना बोलायचा. ड्रायव्हर मामा चांगले असले की मराठी,हिंदी गाणी बासरीवर हुबेहूब वाजवायचे.की हा माणूस दारू पितो हे कुणाला पटणार नाही.कधी रागाने बासरी फोडली की,भाऊच म्हणजे आमचे घरमालक त्यांना नवीन बासरी विकत घेऊन देणार.म्हणणार घ्या बासरी वाजवा आमच्या धंद्याचे बारा तेवढं वाजवू नका. घ्या टॅक्टर ताब्यात.भाऊ तर देवमाणूस तेच ड्रायव्हर मामांच्या बायका पोराचा विचार करून त्यांचा तर्हेवाईक पणा सहन करायचे.ते त्यांच्या खोलीचं भाडं घेत नव्हतेच शिवाय त्यांना अडीनडीला किराणा साहित्य पण भरून देणार घरात.
आणखी एक व्यक्ती ,म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मामा ते दारू पिऊन आले की म्हणायचे सत्यम..शिवम..सुंदरम..ते ही आपण सूंदर म्हणताना हात उंचावतो ना तस करीत म्हणायचे.मला वाटत दारू पिणाऱ्या या मंडळींना तेवढ्या कालावधी पुरता तरी सगळ्या शापित जगाचा विसर पडून सार जग सत्यम..शिवम..सुंदरम ..वाटत असल पाहिजे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.
भाऊ तर देवमाणूस तेच ड्रायव्हर मामांच्या बायका पोराचा विचार करून त्यांचा तर्हेवाईक पणा सहन करायचे.>>> खरंच याला मोठे मन लागतं.