तुका म्हणे जाय नरकलोका!

Submitted by अँड. हरिदास on 26 April, 2018 - 01:07

dfggf_1524700540.jpg
तुका म्हणे जाय नरकलोका!
‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू..’ज्याची वृत्ती स्थिर आणि प्रसन्न असते.. ज्याच्या मनी विषयोपभोगाची आसक्ती नसते' जो जनकल्याणासाठी आपली 'साधना' खर्च करतो तो साधू..' ही तुकाराम महारांजानी सांगितलेली साधु-संतांची व्याख्या. साधीच. पण असे साधू दिवा लावूनही दिसणे कठीण झाले आहे. धर्माच्या नावाखाली धार्मिक कर्मकांडांची अवडंबरे माजवून आजचे तथाकथित बाबा, महाराज स्वत:च्या तुंबड्या भरताना दिसतात. संताचा बुरखा पांघरलेल्या यापैकी काहींची कृत्य बघितली तर संतत्वाची सोडा माणूसपणाचीही लक्षणे त्यांच्यात आढळत नाहीत. अशाच एक भोंदूबाबाला जोधपूर न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूने आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. सन २०१३ पासून हे प्रकरण देशात चांगलेच चर्चेत होते. बळ, सत्ता, पैसा, दडपण इत्यादींचा पुरेपूर वापर या प्रकरणात करण्यात आला. काही साक्षीदारांना आपल्या जीवालाही मुकावे लागले. पण पीडितेने आणि तिच्या कुटुंबाने हार मानली नाही. अखेर आसारामच्या तथाकथित संतत्वाचा बुरखा फाटला आणि न्यायालयाने त्याला जन्माची अद्दल घडविली. याप्रकरणात न्यायालयाने शरद व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अध्यात्माची झूल पांघरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ढोंगीला झालेल्या या शिक्षेमुळे कोणत्याही देशभरातील स्वयंघोषित भोंदू गुरू, महाराज, बाबा, बापू यांना चाप लागायला हरकत नसावी. शिवाय कोणताही सुसंस्कृत माणूस या न्यायनिर्णयाचे स्वागतच करेल. मात्र काल आसारामला शिक्षा होऊ नये म्हणून अनेकांनी जपजाप्य करत देव पाण्यात ठेवले होते. आसाराम बापूच्या शिक्षेनंतर कोणतीही हिंसा भडकू नये यासाठी राजस्थानसह तीन राज्यांत अ‍ॅलर्ट जारी करावा लागला होता. वास्तविक एकाद्या माणसाच्या विरोधात बलात्कारासारख्या गुन्हयाचे सबळ पुरावे असतील तर त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी समोर यायला हवी. परंतु त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्या जात असतील तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे अशा भोंदूबाबांच्या नादी लागणाऱ्यांनी आसाराम बापूंच्या शिक्षेपासून बोध घेण्याची गरज आहे.

‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे विचार कार्ल मार्क्‍स यांनी मांडले होते. मात्र, भारतीय समाजात तर धर्म हे चलनी नाने बनले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सर्व क्षेत्रात जाती- धर्माचाच बोलबाला दिसून येतो. त्यामुळे काही संधी 'साधू' भोंदूनी समाजाची नाडी ओळखून त्याना धर्माच्या नावाखाली मानसिक गुलाम केले आहे. समाजातील बरेच लोक कोणत्या ना कोणत्या काळजीत असतात. त्यांच्या मनात अनेक चिंतांनी घर केलेले असते.
"माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली ।
अदृष्य दहशतीने तंगलेली, आधार नाही ।
प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा, ।
जो काढील साऱया उवा, मनातल्या चिंतेच्या..!
या मंगेश पाडगावकरांच्या ओळी प्रमाणे आशा लोकांना आपल्या चिंता मुक्तिसाठी एका बाबा ची आवश्यकता असते. दीर्घकालीन संकटाना अगतिक होऊन लोक या भोंदू बाबाना शरण जातात. कारण या भोंदू बाबानी आपल्याजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे असल्याचा भास् निर्माण केलेला असतो. चमत्काराचा दावा करणारे हे भोंदू स्वताला इश्वराचा अवतार म्हणवितात, आणि विवेकहीन लोक त्यावर विश्वास ठेवतात. आशा भोंदू बाबांच्या मठात, आश्रमात लोक आपल्या लेकी- बाळीना स्वखुशीने ठेवायला तयार होतात, याला काय म्हणावे? दर महिन्या दोन महिन्याला एखाद्या तरी बाबांमुळे वाद निर्माण होत असतो..चार सहा महिन्याला कोणत्या ना कोणत्या आश्रमात चालणाऱ्या अनैतिक कृत्यांचा भंडाफोड़ होत असतो. मात्र तरीही लोक यातून धड़ा घेत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. लोकांचा हा अंधविश्वासच आशा बुवा-बाबा ना 'बळ' प्रदान करतो. त्यांना राजाश्रय मिळवून देतो. या बाबांचा आपल्या अनुयायावर इतका जबरदस्त पगडा असतो की 'बाबा' म्हनेल त्याच व्यक्ती किंव्हा पक्षाला हे लोक मतदान करतात. राजकारण्यानी मताच्या राजकारणासाठी आशा बाबांना 'अभय' दिल्याचे अनेक उदाहरणे देता येतील. राजश्रय आणि लोकांची अंधभक्ती यामुळेच अशा बुवा बाबांचे फावते, हे लक्षात घ्यायला हवे.

महत्वाचे म्हणजे बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा आरोप झालेला आणि कारागृहात धाडला जाणारा आसाराम हा काही एकमेव बाबा नाही. यापूर्वीही दोन साध्वीवर अत्याचार केल्याप्रकरणी रामरहीमला शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला कारागृहात डांबण्यात आले आहे. डेरा सच्चा सौदा या आश्रमाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविल्यानंतर त्याच्या समर्थकांनी रनकंदन करत हिंसाचार घडविला होता. रामपाल नावाच्या बाबाने तर थेट आपल्या भक्तांची आर्मी बनवून पोलिसांवर हल्ला केला होता. अशी एक ना अनेक उदाहरणे या भोंदू बाबांची देता येतील. 'झाड़ तिथे छाया, बुवा तिथे बाया..!' या उक्ति नुसार बाबा किंवा बुवा असेल तेथे स्त्रिया येतातच, अन् त्या या बाबांच्या लैंगिक शोषणाला बळीही पडत असतात. हे सर्वाना समजते पण 'उमजुन' घ्यायला कुणीही तयार नाही, ही खरी समश्या आहे. *एकादा 'बाबा' कसा आहे. हे माहीत नव्हते तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवला तर एकवेळ समजून घेता येईल, पण यांचे काळे धंदे, शोषण उघड झाले तरी काही लोक या भोंदूंचे समर्थन करीत राहतात हे उद्वेगजनक आहे.

लोकांची मानसिक गुलामगिरी हीच या तथाकथित बाबांची खरी शक्ति असते. त्यामुळे श्रद्धा ठेवतना विवेक जागृत ठेवणे गरजेचे बनले आहे. *सामान्य माणसाने बुवा-बाबांची मानसिक गुलामी झुगारुन दिली तर देशातील भोंदूंचे किल्ले ढासळायला वेळ लागणार नाही. समाज विवेकवादी असेल तर अशा बुवा बाबांची निर्मिती होणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसते, हे आसाराम, रामपाल किंव्हा रामरहिम यांच्या प्रकरणात सिद्ध झालेच आहे. परंतु,एका दोघांवर कारवाई झाल्याने हा प्रश्न सुटनारा नाही. त्यासाठी सबंध भारतीय नागरिकांना विवेकाच्या अस्त्राने भोंदूगिरीच्या मूळावर घाव घालावे लागतील."कान फाडूनियां मुद्रा तें घालिती। नाथ म्हणविती जगामाजीं।। घालोनिया फेरा मागती द्रव्यासी। परि शंकरासी नोळखती।। पोट भरावया शिकती उपाय। तुका म्हणे जाय नरकलोका। देवत्वाचा आव आणून भक्तीच्या नावाखाली कर्मकांडांची अवडंबरे माजवून स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या तथाकथित बुवा बाबांचा कठोर समाचार तुकाराम महारांजानी या अभंगातून घेतला आहे. स्वतःला साधू, गुरु म्हणविणारे आसाराम बापू असो, रामरहीम असो, कि रामपाल. त्यांची कृत्य कोणत्याच संतत्त्वाच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे या अपप्रवृत्तीचे स्थान तुकोबा म्हणतात तसे नरकातच आहे. न्यायालयाच्या निर्णयाने आसारामांसारख्याचा हा प्रवास सुरूदेखील झाला आहे. त्यामुळे भोंदूबाबाच्या नादी लागणाऱ्यांनी आता भानावर आले पाहिजे. अंधविश्वासाच्या मृगजळाकडे धावून आपण नको तिकडे भरकटत चाललो होतो हे लक्षात घेतले पाहिजे. तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती। या संत वचनावर विश्वास ठेवून भोंदुगिरी करणाऱ्यांना “मोजूनी पैजारा’ मारण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे भोंदूबाबाच्या नादी लागणाऱ्यांनी आता भानावर आले पाहिजे. अंधविश्वासाच्या मृगजळाकडे धावून आपण नको तिकडे भरकटत चाललो होतो हे लक्षात घेतले पाहिजे. तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती। या संत वचनावर विश्वास ठेवून भोंदुगिरी करणाऱ्यांना “मोजूनी पैजारा’ मारण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे..!
<<

अगदी सहमत !
असल्या ढोंगी बाबा, बुवाना ताबडतोप पकडुन तुरुंगात कोंबले पाहीजे, नाहीतर फासावर चढवले पाहीजे. हा ढोंगी आसाराम आता जिवंत काही कारागृहातून बाहेर येणार नाही.

लोकांची अंधभक्ति दूर करणे कठीण, पण राजकारण्यांना तर हाकलून देता येईल ना? कायदे आहेत, वकील आहेत, न्यायाधीश आहेत.
आता याच लोकांमधे अंधभक्ती चा वास असेल ( माझी सत्यासत्यतेची नीतिमत्तेची व्यख्या अशी की जे बोलून, करून मला स्वतःला पैसे मिळतील ते सत्य नि नीतिमान अशी ज्यांची अंधभक्ति त्यांना कसे सुधारणार?) तर कठीणच आहे, नि आहेच आजकालच्या जगात.

छान लेख आहे...

<< समाज विवेकवादी असेल तर अशा बुवा बाबांची निर्मिती होणार नाही. >>
---------- सहमत. विचारी, विवेकी समाज त्यान्च्या नादी लागणार नाही.

<< कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसते, हे आसाराम, रामपाल किंव्हा रामरहिम यांच्या प्रकरणात सिद्ध झालेच आहे. >>
--------- असे कधी कधी वाटते. आसाराम तुरुन्गात असताना त्याच्या केसच्या सन्दर्भातले साक्षिदार पटा-पट कसे मारले जात होते ? यातल्या पिडितान्ना न्याय मिळेल का ?

या घटने/ केस मधल्या साक्षिदारान्ना सुरक्षा पुरवणे सर्वात महत्वाचे होते. वेगवेगळ्या जागेवर, काही काळाच्या फरकाने अनेक महत्वाच्या साक्षिदारान्च्या हत्या झाल्या आहेत. त्यान्च्या जिवाला धोका आहे हे माहित होते आणि सरकार पुरेशी सुरक्षा पुरवण्यास अपयशी ठरले.

न्यायालयाला पुरावे हवे असतात. महत्वाचे पुरावे नष्ट होत असतील, साक्षिदारच गायब होत असतील, त्यान्ना धमकावले जात असेल, मारले जात असेल तर न्यायालयात निर्भयपणे साक्ष देणार कोण ? साक्ष दिली नाही तर अपराध्याला शासन कसे होणार?

अतिशय उत्तम झालं. आता त्याचं आयुष्य जेलमध्येच संपू देत.

>>वास्तविक एकाद्या माणसाच्या विरोधात बलात्कारासारख्या गुन्हयाचे सबळ पुरावे असतील तर त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी समोर यायला हवी. परंतु त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्या जात असतील तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल>> लोकं बिनडोक असतात हे सतत दिसत असतं. संजय दत्त काय, सलमान खान काय, असल्या गुन्हेगार लोकांना सपोर्ट करणार्‍या लोकांना आपण काय करतोय हे ही कळत नसतं, कळलं तरी वळत नसतं.

<< संजय दत्त काय, सलमान खान काय, असल्या गुन्हेगार लोकांना सपोर्ट करणार्‍या लोकांना आपण काय करतोय हे ही कळत नसतं, कळलं तरी वळत नसतं. >>
---- सहमत... सलमान केस मधे पण त्या सुरक्षा रक्षकाला मोठी किम्मत चुकवावी लागली. अनेक वर्षे अनेक साक्षिदाराना फितवले. आपले पडद्यावरचे हिरो रियल आयुष्यात झिरो आहेत. गाडीचा अपघात होणे समजतो, पण स्वत: केलेल्या अपघातात जखमीला रस्त्यावर सोडुन पळुन जाणे याला हिरो नाही म्हणणार.

प्रतिसादाबद्दल सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार...आपल्या प्रतिक्रिया प्रेरक आहेत.

सुंदर लेख आवडला, साधू संत आणि आतचे भोंदू बाबा यात मोठा फरक आहे. लोक त्यांच्याकडे जातात म्हणून यांना बळ मिळते. आसाराम बापूंचा नारकाकडे प्रवास सुरु हे भारीच

लोकं बिनडोक असतात हे सतत दिसत असतं. संजय दत्त काय, सलमान खान काय, असल्या गुन्हेगार लोकांना सपोर्ट करणार्‍या लोकांना आपण काय करतोय हे ही कळत नसतं, कळलं तरी वळत नसतं.<<
>> कोणतीही सद्सद विवेक बुद्धी न वापरता अशा घंटनाना पाठिंबा देण्याचं प्रमाण सध्या वाढू लागलं आहे. दुर्दैव म्हणजे आपण याठिकाणी भोंदूं बाबाना अधीन झालेल्या अंधश्र्ध्दाळु लोकांबरोबर बालोतो आहोत, मात्र स्वतःला शिक्षित आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या लोकांनाही कळत पण वळत नाही अशी स्थिती आहे.

साधू संत आणि आतचे भोंदू बाबा यात मोठा फरक आहे. लोक त्यांच्याकडे जातात म्हणून यांना बळ मिळते. <<
>> हेच वास्तव समजून घेण्याची गरज आहे, धन्यवाद

हे इथेही प्रकाशित केले आहे. फक्त आसाराम बापूंऐवजी नाव लक्ष्मण प्रजापती वापरले आहे. बाकी आश्रमाची जमीन, अल्पवयीन पीडिता सार्‍या बाबी सारख्याच आहेत.

https://www.youtube.com/watch?v=AsYYS3Ik7-k