मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 25 April, 2018 - 02:10

पोरगी एके दिवशी म्हणाली, "मम्मा मला सुमीतशी लग्न करायचे आहे"..

मी उडालोच !!

कारण पोरीची अजून वय वर्षे चार पुर्ण व्हायची होती. सध्या नर्सरीमध्ये शिकते.
तसे या फ्रेंडबद्दल थोडी कल्पना होतीच. कारण गेले काही दिवस घरातल्या भिंती आणि वह्यापुस्तके या सुमीतच्या नावाने रंगत होती. आधी आम्हाला वाटले, असेल एखादा फ्रेंड. लिहायला सोपे म्हणून लिहितेय. तसेही पोरगी न शिकवता स्वत:च्या मनाने काहीतरी लिहीतेय याचेच आम्हाला फार कौतुक. पण प्रकरण ईथवर गेले असावे याची कल्पना नव्हती Happy

मम्माने समजूतदारपणे आधुनिक पालकांच्या भुमिकेत शिरून विचारले,
"का बेटा? का लग्न करायचेय त्याच्याशी?"

"अग्ग मम्मा, मला तो फार आवडतो. माझे त्याच्यावर प्रेम आहे" ..
आता आम्ही दोघेही एकत्रच उडालो.

तरी पुढच्याच क्षणी सावरून मम्माचा पुढचा प्रश्न,
"तुला तो का आवडतो?"
(प्रेम हा शब्द आम्ही मुद्दामहून टाळला)

"तो माझा फ्रेंड आहे. तो माझ्याशी टिफिन शेअर करतो" ... हे ऐकून थोडासा जीवात जीव आला. मी चक्क मोठ्याने हुश्श केले.

"तुझे बाकीचे फ्रेंड नाहीत का?"

"हो, आहेत ना.. आर्या, अपूर्वा, मनाली"

"मग ते तुझ्याशी टिफिन शेअर नाही करत का?"

"हो, करतात ना"

"मग ते तुला आवडत नाहीत का?"

"हो आवडतात ना.."

"मग तुला त्यांच्याशी लग्न नाही करायचे का?"

"अग्ग मम्मा, त्या सर्व गर्ल आहेत ना. मग गर्ल आणि गर्ल कसे लग्न करणार Happy

आम्ही पुन्हा कपाळाला हात लावला.

---------------------------------------------------------------------

आमच्या संभाषणातील शब्दन शब्द जसाच्या तसा आठवून लिहीला आहे.
फक्त मुलाचे नाव तेवढे बदलले आहे.
क्या करे, खानदान के ईज्जत का सवाल है Happy

पण स्मार्ट जनरेशन म्हणत हा किस्सा हसण्यावारी न्यावा असे वाटत नाही. दुर्लक्ष करून सोडून द्यावे अशी तर जराही ईच्छा नाही. हल्ली सभोवताली काय चालू आहे याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. चार वर्षांच्या कोवळ्या जीवांसोबतही ज्या संतापजनक घटना घडत आहेत, खरे तर लिहावेसेही वाटत नाही, पण या परिस्थितीपासून पळूनही जाता येत नाही. तर ईतर सुरक्षिततेसोबत आपल्या मुलामुलींच्या अज्ञानाचा कोणी फायदा उचलू नये याची काळजीही आहे.

तर प्रश्न असे पडलेत, या वयाच्या मुलांना काय समजवावे? कितपत ज्ञान द्यावे? कुठल्या वयात द्यावे? कसे द्यावे?
सध्या शाळेत याबाबत काहीच सांगितले जात नाहीये. बॅड टच, गुड टच हे मागे सत्यमेव जयतेमध्ये पाहिले होते. ते कोणत्या वयात समजावले जाते? शाळेत शिकवतात का आपण घरीच समजवायचे असते? त्याव्यतिरीक्त तिच्या डोक्यात बसलेले हे गर्ल-बॉय लग्न कन्सेप्ट कसे काढावेत? वा तशी गरज आहे का?

खरे तर ईथे प्रश्नही काय विचारावेत हा देखील माझ्यासाठी प्रश्नच आहे. त्यामुळे स्वत:तर्फे काही काळजीचे मुद्दे मांडलेत तरी आवडेल.
ईथे जर जुनी काही चर्चा झाली असेल, काही उपयुक्त माहितीचे धागे असतील, तर त्या धाग्यांच्या लिंक मिळाल्या तरी आवडेल.

- आभारी आहे,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol अहो... नवरा बायको हे रिलेशन मुल बघतं म्हणजे त्यानी दुसरं रिलेशन अजून बघितले नाही/ अनुभवलं नाही..
जर तुम्ही मुलासमोर अ‍ॅडल्ट गोष्टी करत/ बघत नसाल तर याच्यात काही वावग नाही... विसरून जाईल..
मुल जे बघतं ते बोलतो..जास्त खोलात विचार करत नाही..

गुड टच/ बॅड टच आवश्यक सांगितले पाहिजे..ही शारिरीक बाब आहे..लैंगिक नाही..

बॅड टच, गुड टच हे मागे सत्यमेव जयतेमध्ये पाहिले होते. ते कोणत्या वयात समजावले जाते? शाळेत शिकवतात का आपण घरीच समजवायचे असते? >>>> हल्लि शाळेत समजावतात. माझ्या मुलिला 1st std. ला समजावले. शाळेत सन्थेचे कार्यकर्ते आले होते त्यानि २ दिवस याबद्द्ल मुलाना महिती दिलि आणि parents कडुण एक फोर्म भरुन घेतला. बरे youtube वर एक video आहे ति ये है मोहबत्ते नावाचि serial आहे/होति, त्यामधिल इशि मा ने एक bad touch / good touch वर तिच्या बहिणीच्या मुलिला छान समजावले आहे ( ति मुलगी ४/५ वर्शाचि दाखवलि आहे).

माझ्याकडे पण एक एक भन्नाट किस्से आहेत,
पण माझ्या खानदानाच्या इज्जतीचा विचार करून गप्प बसतो :p

एकच सांगेन, कोणताही प्रश्न तुला काय करायचंय, मोठा झाल्यावर कळेल असे न सांगून झटकून न टाकता, शक्य तितके सिम्प्लिफाईड उत्तर द्या.
शेवटी हा मोठे होण्यातला एक भाग आहे, पालकांनी उत्तरे दिली नाहीत तर मुले ती बाहेर शोधतील आणि गरजेपेक्षा जास्त डिटेल्स त्यांना कळतील.

पण तेव्हाच तो प्रश्न मुलाला का पडला याची ही हलकेच चौकशी करा, डे केअर, शाळा, स्कूल व्हॅन यात मुला बरोबर काही चुकीचे वागले जात नाहीये ना ते कळेल.

शेवटी हा मोठे होण्यातला एक भाग आहे, पालकांनी उत्तरे दिली नाहीत तर मुले ती बाहेर शोधतील आणि गरजेपेक्षा जास्त डिटेल्स त्यांना कळतील. >>>> बरोबर.

शेवटी हा मोठे होण्यातला एक भाग आहे, पालकांनी उत्तरे दिली नाहीत तर मुले ती बाहेर शोधतील आणि गरजेपेक्षा जास्त डिटेल्स त्यांना कळतील. >>>> अगदी बरोबर, शिवाय बाहेरून मित्रांकडून योग्य ती माहितीच मिळेल याची खात्री नाही.

अवो पालकांनी उत्तरं दिली तरी मुले ती बाहेर शोधणारच आहेत आणि गरजेपेक्षा जास्त डिटेल्स त्यांना कळणारच आहेत.
शिवाय तुला माहितीये का करुन फ्रेंड्सचं ही ज्ञानवर्धन करणारे ते. Happy
मला वाटतं की मुलांना bad touch बद्दल लहान असताना पासुनच सांगावं.

अवो पालकांनी उत्तरं दिली तरी मुले ती बाहेर शोधणारच आहेत आणि गरजेपेक्षा जास्त डिटेल्स त्यांना कळणारच आहेत.
शिवाय तुला माहितीये का करुन फ्रेंड्सचं ही ज्ञानवर्धन करणारे ते.>>>>>

अहो, पण मग यावर उपाय काय? मागेच मी 'आदिसिद्धी' हिच्या 'माझ्या कल्पनेतील शाळा' या धाग्यावर लहान मुलांचे प्रौढ माणसांप्रमाणे शिव्या देणे, एकमेकांच्या लैंगिक अवयावाबाबत शेरेबाजी, टिप्पणी करणे हा विषय मांडला होता.

मुलांना गुडटच, बॅडटच बद्दल जितके लवकर सांगाल तितके चांगले. अडीच वर्षाच्या मुलाला डायपर एरीआला फक्त आई-बाबा असल्यास आजोबा-आजी, पाळणाघरातल्या मावशी आणि डॉक्टर या शिवाय कुणाला हात लावू द्यायचा नाही. हात लावला तर 'नो ' म्हणून ओरडायचे, आईला सांगायचे असे बोलून सुरुवात करावी. महत्वाचे म्हणजे मुलाच्या इच्छेला, पर्सनल स्पेसला सुरवातीपासून मान द्यावा. मुलाला जवळ घेणे, गालाला हात लावणे, पापा घेणे आवडत नसेल तर पाहुणे आल्यावर आग्रह करु नये. . मुलाला 'नाही' म्हणायची, स्वतःची स्पेस राखायची सवय हवी. एकीकडे गुडटच-बॅडटच सांगणे आणि एकीकडे आवडत नाही, नको म्हटले तरी मावशी गालगुच्चा घेते, काका उचलून कडेवर घेतात हे लहान मुलांसाठी गोंधळात पाडणारे असते. आपली परवानगी, इच्छा महत्वाची आहे याची मुलाला खात्री हवी.
लहान मुलांसाठी लग्न म्हणजे दोन भिन्नलिंगी व्यक्ती सतत एकत्र रहातात. आई लग्न करुन बाबांसोबत रहायला आली तसेच लग्न केले की आपण आणि आपला मित्र्/मैत्रीण सतत एकाच घरात राहू, खेळायची वेळ संपली आता आपापल्या घरी जा वगैरे भानगड नाही हे लॉजिक. काही दिवसांनी मला खेळताना ढकलले, झोपाळ्यावर बसू दिले नाही तेव्हा लग्न करण्याचा विचार नाही असेही होते. समान लिंगी फ्रेंड्सबाबत असेच आम्ही भाऊ /बहिणी आहोत, आपल्या घरी विकेंडला तरी रहायला आण वगैरे हट्ट चालतात.

एखाद्या टिव्ही सिरिअल अथवा सिनेमातले डायलॉग ऐकून मुले तेव्हढेच लक्षात ठेवतात आणि ते वापरायची संधी शोधून असे डायलॉग देतात ठोकून. हे तसेही असू शकते. रूढार्थाने लग्न, लैंगिकता वगैरे मनातून थोडावेळ बाजूला ठेवून वरचे संवाद वाचल्यास मुलांच्या पातळीवर ती एक इतर गोष्टींसारखीच गोष्ट (कथन करून सांगतो ती गोष्ट) वाटेल. तेंव्हा तुम्ही फार टेंशन घेऊ नये, असे मला वाटते.

तरीही तुमच्या शीर्षकातला प्रश्न बाकी उरतोच. माझ्या मते जेंव्हा असे प्रश्न विचारले जातात तेंव्हा मुलांना "शक्य तितक्या सहजतेने" त्यांना कळेल (पचेल) अशी पण खरी माहिती थोडक्यात सांगावी. त्याविषयी त्यांच्याकडे आधीच काही उलट सुलट किंवा अर्धवट माहिती आहे का हे बघून योग्य ती माहिती द्यावी. त्यातली सकारात्मक बाजू त्यांच्यापुढे ठेवावी. त्यांना काय उत्तर द्यायचे आणि त्यावर त्यांचे पुढचे प्रश्न काय येऊ शकतात याचा आधीच विचार करा. ( त्यासाठी आणखी वेळ हवा असेल तर त्यांच्याकडून वेळ मागून घ्या. Happy )

फालतू क्लीकबेट धागा... गुड टच बॅड टच चा काय संबंध आहे जर सुमित आणि आपली कन्या 4 वर्षाचे आहेत.
इंनोसेंटली लग्न करायचे म्हणतेय, तुम्ही लग्न म्हणजे लैंगिक संबंध कडे विचार वळवले.
बाहुला बाहुली चे लग्न, किंवा असा समवयस्क बरोबर लग्न या वयात नॉर्मल आहे हो. उगाच लैगिकते कडे कशाला जाताय?

च्रप्स यांच्या एका मुद्द्याशी सहमत. या किश्याचा आणि गूड टच बॅड टच चा तसा वरकरणी संबंध वाटत नाही. अर्थात आपण एक पालक म्हणून काळजीपोटी आपल्या विचारांची साखळी तिथवर जाणे शक्य आहे. सध्याच्या कानावर पडणारया बातम्या पाहता तर नक्कीच. फक्त लेखातील किस्सा हसण्यावारीच न्यावा असे वाटते. मला तरी तो गंमतीशीर वाटला. त्यावरून लगेच अरे बापरे पोरं या वयात असा विचार करतात, आता काय करू, आता कसे त्यांना शिकवू, असं एकदम टेंशन घ्यायची गरज नाही. माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही आठ दहा वर्षाचे असतानाही भातुकलीचे खेळ करायचो. त्यात बिल्डींगमधील एखादी मुलगी माझी बायको असायची. त्यामुळे काळजी नक्की घ्या. पण मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका.

गूड टच बॅड टच बाबत चार वर्षांच्या मुलांना ते शिकवायला हरकत नसावी. मला सुद्धा हे सत्यमेव जयते मधूनच पहिल्यांदा समजलेले. यूट्यूबवर याचे विडिओही असावेत. शाळेत शिकवायची वाट बघण्यापेक्षा घरातही शिकवू शकतोच. नव्हे शिकवाच. कारण नातेवाईकांपासूनही हल्ली धोका असतो. किंबहुना विश्वासातली लोकं ज्यांना आपण मुलांना हात लावायचा हक्क देतो त्यांच्याकडूनच धोका असू शकतो. एखाद्या चार पाच वर्षाच्या मुलापासून नाही.

असे धागे निघत राहायला हवे. याबाबत माहीती आणि अवेअरनेस कायम राहिला हवा. प्रत्येकाला याची कल्पना हवी. कारण उद्या आपल्या नातेवाईकांनाही आपण म्हटले की मुलांपासून जरा लांबच तर त्यांनीही ते समजून घेतले पाहिजे.

बातमीत नुसते ओरखडे नसून प्रायव्हेट पार्ट मध्ये वस्तू घुसवल्या गेल्याचे पुरावे होते.
नुसत्या बाह्य ओरखड्यांवर या अश्या गुन्ह्याच्या तपासण्या होत नाहीत.

प्रायवेट पार्टवर ओरखडे असल्यास पालकांनी जागरुक होवून तक्रार केली हे योग्यच आहे. ४-५ वर्षाचे मूल म्हणजे समज आलेले, एखादा चुकून आलेला ओरखडा आणि मुद्दामहून काही करणे एवढा फरक मुलाला कळतोच. आपल्यासोबत काहीतरी विपरीत घडत आहे हे लहान मुलाला कळते असते फक्त त्याबाबत पुढे काय करायचे, हे कसे थांबवायचे ते कळत नसते, गुडटच-बॅडटच शिकवल्याने मूल पालकांना निर्भयपणे सांगू शकते.
>>आपल्या स्वत:च्या लेकराबद्दल जी काळजी या बाबतीत आपण घेतो ती "नोकरी" म्हणून हे काम करणारी बाई घेईलच हे सांगता येणार नाही.>. असे कसे म्हणता? योग्य प्रकारे काळजी घेणे हे अपेक्षितच आहे ना? खरेतर नखे व्यवस्थित कापलेली असणे हे स्वच्छतेच्या दृष्टीने आणि मुलांना इजा होवू नये म्हणूनही अपेक्षित आहे.

४/५ वर्षाची मुलगी तिच्याच वर्गातल्या मुलाशी लग्न करायचे असे म्हणत असेल तर फार लैंगिक शिक्षण देण्याच्या फंदात पडू नये. फक्त लग्नानंतर आई-बाबांचे घर सोडून स्वतंत्र रहायला लागत वगैरे बाबी सांगाव्या. मुलांचा लग्न करायचा विचार २ मिनीटात बारगळतो. माझ्या मुलीच्या बाबतीत ही मात्रा चाण्गली लागू पडली.
गुड टच/ बॅड टच इत्यादी गोष्टी ४/५ वर्षाच्या मुलांना जरूर सांगाव्या.
माझी मुलगी ८ वर्षाची आहे आणि सध्या बर्‍याच वेळा विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे लग्न झाल्यावरच बाळ होतं का? (लक्षात घ्या की बाळ कसं होतं हा प्रश्न अजून तिला पडलेला नाही.).
तर तिच्या 'लग्न झाल्यावरच बाळ होतं का?' ह्या प्रश्नावर मी आणि नवरा उत्तर देतो की लग्न न करता पण बाळ होऊ शकतं, पण एकट्याने बाळाची काळजी घेण फार कठिण जात. (ह्या सोबत आम्ही तिला बाळाची काळजी घेताना कराव्या लागणार्‍या कामांची मोठ्ठी यादी सांगतो.) त्यामुळे लग्न झाल्यावरच बाळ होण चांगल कारण बाळाची काळजी घ्यायला नवर्‍याची मदत मिळते. तुला बाळ होईल तेव्हा त्याची काळजी घ्यायला आम्ही असू पण आम्ही पण तेव्हा म्हातरे झालो असू त्यामुळे आमची खूप मदत होणार नाही.
तर मुद्दा असा की लैंगिकता मध्ये न आणता मुलांच्या अश्या प्रश्नांना सामाजिक संदर्भा लावून उत्तरे द्यावीत. लैंगिक शिक्षण मुलांना आज ना उद्या मिळणारच आहे. पण लग्न, मुल जन्माला घालणे ह्या घटनांना अनेक सामाजिक संदर्भ ही असतात. आपण कोणत्या समाजात राहतोय त्याप्रमाणे ते बदलतात आणि पालक म्हणून ते मुलांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवणे आपल काम आहे.

Sex chat with pappu and papa हे सुद्धा एकदा यूट्यूब सर्च मारून बघून घ्या Happy

सिम्बा, हो. आम्हीही कुठल्याही प्रश्नाचे निदान तिचे समाधान होईल असे उत्तर तरी नक्कीच देतो. आपले आईवडिल उत्तर देणे टाळत आहेत, वा उगाच काहीतरी सांगून आपल्याला फसवत आहेत असे मुलांना वाटू नये याची काळजी घेतो. याच नाही तर सर्वच बाबतीत. खरे तर मुलांचे शंकानिरसन करणे हा एक धमाल अनुभव असतो, ते एंजॉय करावे Happy

स्वाती, सहमत. मुलांना कोणालाही हात लाऊ देऊ नये. मुलांच्या हितासाठी थोडा वाईटपणा आला तरी चालवून घ्यावा. पण नम्रपणे नकार द्यावा.

च्रप्स, खरे आहे. लेखातील किस्सा आणि गूड टच बॅड टच याचा तसा आपसात संबंध नाहीये. पण ऋन्मेऽऽष म्हणतात तसे पालक म्हणून काळजीपोटी त्यावरून मनात आलेले विचार आहेत.

मंजूताई, छान धाग्याची लिंक दिलीत. वाचून घेतो. धन्यवाद Happy

सोहा, छान आयडीया आहे. घरोघरी तेच अनुभव, अशी कोणाची कामी आलेली मात्रा यानिमित्ताने समजते.

Sex chat with pappu and papa हे पाहिले आहे ऋन्मेऽऽष. मस्त आहे ही वेबसिरीज. आवडलेली.

मुळात काहींना समजत असेल तरीही आशा प्रकारची तक्रार कुणाकडे करावी हा मुलांच्या मनात निर्माण झालेला मोठा प्रश्न असतो. कारण अस कृत्य करणारा बऱ्याचदा जवळचच व्यक्ती असतो. त्यामुळे एकतर तकररीची दखल घेतली जात नाही किंव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

Soha+786