लैंगिक शिक्षण : कसं व केव्हा द्यावं

Submitted by मंजूताई on 23 March, 2015 - 01:21

लैंगिक विषयावर मुलांशी कसं व केव्हा बोलावं: ह्या विषयावर सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरमतर्फे मैत्रेयीने पालकांशी संवाद साधला. त्याचा हा वृत्तांत.

मुलगी/मुलग्यात शारीरिक बदल ठळकपणे दिसू लागले की पालकांना काळजी वाटू लागते ( मुलींच्या बाबतीत जरा जास्त. ) अन हीच ती वेळ, हाच तो क्षण असं वाटून पालक अस्वस्थ होतात पण मोकळेपणाने, धिटाईने ह्या विषयावर बोलता येईल का, ही शंका तर जबरदस्त असते. मुलं वयात येताना अथवा आल्यावर जर का आपण संवाद साधत असू तर तो साधायला नक्कीच उशीर झालाय, हे काम ह्यापूर्वी करायला हवं होतं अन तेही तयारीनिशी. आपण जेवणाच्या, शिस्तीच्या, भाषेच्या ज्याप्रमाणे सवयी शिकवितो त्याचप्रमाणे त्यांच्याशी लिंग व सेक्सविषयी बोललं पाहिजे. तीन वर्षाच्या मुलाला मुलगा/मुलगी हा फरक समजतो न शिकविता. म्हणजेच आपल्याला लैंगिक शिक्षणाची सुरुवात मुल तीन वर्षाचं झालं की करायची आहे. आज त्यासाठीचा लक्ष्य गट आहे तीन ते चोवीस वर्ष वयाचा! आज समाजात घडणार्‍या घटना आपण बघतो आहोतच. मुली सुरक्षित नाहीत त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पुरुषजातीपासून, ज्यात आपले भाऊ, मित्र, काका, मामा आहेत! ही जी पुरुष जात आहे तिला स्त्रीचा आदर करायला शिकवल्याचं गेलंच नाहीये का? हे असं घडू नये म्हणून मुलांना हे शिकविण्याचं काम लहानपणापासून झालं पाहिजे. समाज सुदृढ, निकोप होण्यासाठी योग्यपध्दतीने, योग्य वयात (लहानपणापासून) लैंगिक शिक्षण दिल्या गेले पाहिजे, त्याची सुरुवात पालकांनी करायची आहे.

शिकवायचं कसं व केव्हा त्यासाठी ३-६, ६-१२, १२-१६ व १६-२४ अशी वयाची विभागणी करू व त्या वयात त्यांच्यात होणारे शारीरिक बदल, भावनिक बदल व सामाजिक वर्तन अश्या तीन स्तरांवर आपण विचार करु.

पहिल्या तीन ते सहा ह्या गटाविषयी बोलू. ह्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होत असते व ग्रहणशक्ती प्रचंड असते. नवनवीन गोष्टी, भाषा ह्या वयात मुलं शिकत असतात. ही उदाहरणं आहेत आपल्या आसपास किंबहुना आपल्या घरात घडणारी,लिंगभिन्नतेसाठीची. मुलांना विचारलं स्वयंपाक कोण करतं? आई, ऑफिसला कोण जातं ? बाबा. अशी उत्तरे मिळतात. मुलाला म्हणतो मुलींसारखं काय रडतो किंवा बाहुलीशी काय खेळतो मुलींसारखं किंवा मुलीला म्हणतो काय मुलांसारखी बॅट्बॉल खेळते... इ. एवढंच कशाला बाळ जन्माला आल्या आल्या मुलगा असेल तर निळा व मुलगी असेल तर गुलाबी कपडे आणतो. ते इतरही रंगाचे किंवा सारख्या रंगाचे का असू नये? ह्या अन अश्या गोष्टी आपण पालकच करत असतो ना? स्त्री - पुरुषांमध्ये भिन्नता आहे पण उच्चनीचता नाही. स्वयंपाक, नोकरी करणे एक काम आहे ते कोणीही करू शकतं. पोलिसमॅन असतो तशी पोलिसवुमनही असते, हे आपण शिकवले पाहिजे. वागणूक, नियम, शिस्त व कामाची (घरातली/बाहेरची)वाटणी हे लिंगभेदविरहीत असली पाहिजे ह्याची जाण पालकांना असली पाहिजे व ती मुलांपर्यंत पोचली पाहिजे योग्य तर्‍हेने व योग्य वयात.

पुढचा टप्पा आहे तो सहा ते बारा वर्षाचा. तुम्ही निरीक्षण केलं असेल तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. वर्गात मुला मुलींचे बेंचेस वेगवेगळे असतात. एकमेकांबद्दल तिरस्कार असतो. मुली काय अश्याच किंवा मुलं काय असेच असा शिक्का बसलेला असतो, भांडणं होत असतात. घरात मुलगा व मुलगी दोघही असतील तर मुलगा वर्चस्व दाखवायला लागतो... मी मुलगा आहे... मी ताकदवान आहे ... मला हे करण्याची मुभा आहे इ. हा काळ आहे संस्काराचा किंवा एकमेकांबद्दल आदर प्रस्थापित करण्याचा , निकोप स्त्री - पुरुष संबंधाचा पाया मजबूत करण्याचा. आठ ते दहावर्षामध्ये (मुलांमध्ये थोडं उशिरा)आंतरिक शारीरिक बदल लिंग सापेक्ष दिसायला सुरुवात होते अन त्याबाबत त्याला प्रश्न पडायला लागतात. त्याला जिज्ञासा, कुतुहल आहे शरीरात घडणार्‍या घडामोडींची. अयोग्य, चुकीच्या पद्धतीने मुले माहिती घेत असतात त्याला कारण घरी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलल्या जात नाही.माध्यमं व मित्रमंडळाचा प्रभाव ह्या वयात खूप असतो. व्दिअर्थी , सेक्स संबंधित विनोद ह्या वयात मुलं करताना आढळतील.

बाराव्या व चौदाव्या वर्षी मानसिक पातळीवर होणारा बदल वेगळा आहे. लक्षात येण्यासाठी एक उदाहरण पाहू. टीव्हीवर आयटेम साँग लागलंय... चौदा वर्षाचा मुलगा ते गाणं एन्जॉय करेल न बोलता, प्रतिसाद न देता कारण त्याला माहिती आहे असं केल्याने पूर्ण गाणं ऐकता येणार आहे. पण बारा वर्षाचा मुलाला नक्कीच काही प्रश्न पडतात ते त्याला न संकोचता विचारता येण्यासाठी घरात मोकळं वातावरण असायला हवं. आपल्या समाजात आई मुलीला चार गोष्टी सांगत असते पण वडील मुलाशी ह्या विषयावर बोलताना आढळत नाही, ही दुर्दैवाची,चिंतेची बाब आहे.

दहा बारा वर्षाच्या मुलांपाशी शिव्यांचा भरपूर साठा असतो खास करून आईबहिणीच्या. खरंतर त्यांना त्याचा अर्थही कळत नसतो. पण त्यांना ते भूषणावह, मर्दानगीचं लक्षण वाटत असतं. पालकांनी विशेषतः वडिलांनी अश्या शिव्या देणं चुकीच आहे हे त्यांना समजावयाला हवे कारण ते ह्या परिस्थितीतून गेलेले असतात. मुलगी उठते-बसते, बोलते कशी ह्यावर आईचा पहारा असतो. चूकीची वागली की लगेच तिला उपदेशामृत पाजले जाते पण मुलांच्या बाबतीत असं घडत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत अतिशय खेदजनक बाब आहे की वडील आपल्या मुलाशी त्याच्यात होणार्‍या शारीरिक बदलांविषयी बोलत नाही.

पुढचा टप्पा आहे सोळावर्ष व पुढील - ह्या टप्प्यात त्याच्यात झालेल्या बदलांविषयीची त्याला/तिला थोडीफार जाण आलेली आहे. ह्या टप्प्याला स्वीट सिक्सटीन म्हटलं आहे त्याचबरोबर सोळावं वरीस धोक्याचंही ! लव्ह लेटर पाठवणं, गर्ल/बॉय फ़्रेंड असणं, रेड रोज डे, व्हॅलेंटाइन डे अश्या गोष्टींचं आकर्षण वाटणं वा हवंहवंस वाटण्याचं हे वय. ह्याही वयात मित्रांचा प्रभाव खूप असतो. पण लिंग निरपेक्ष मैत्री, मित्राचं आपल्या आयुष्यातील स्थान, चांगला/वाईट मित्र ह्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधल्या जात नाही. ह्या वयात त्यांच्यात होणार्‍या बदलामुळे बॉय/गर्ल फ़्रेंड असणं त्यांना स्टेटस सिम्बॉल वाटत असतं. पालकांनीही हे ध्यानात घ्यायला हवं की त्यात गैर काही नाही. एकमेकांना बद्दल आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे, हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे. मुलींना पाळी येणं हे अगदी नैसर्गिक आहे आणि हे आई समजूनही घेत असते. मुलांच्या बाबतीत असं घडत नाही. वर्गात लिंग उद्दपीत झालं तर काय करायचं हे मुलं विचारू शकत नाही किंवा पालकांनीही त्याला ह्याबद्दल काही सांगितलेलं नसतं. ते त्यांच्या मित्रांशी बोलतात. चुकीची माहिती, ज्ञान अयोग्य पद्धतीने त्यांना मित्रांकडून मिळतं किंवा माध्यमातून. माध्यमांबद्दल तर बोलायलाच नको कश्यातऱ्हेने माध्यमातून ज्ञानगंगा वाहत असते ते! पालकांपेक्षा मुलांना ही माध्यमे जास्त परिचयाची आहेत. ह्या विषयावर बोलण्याची मुख्यतः ही वडिलांची जबाबदारी आहे आणि ह्या विषयावर मोकळा संवाद साधला गेला तर तो स्वतः स्वतःचा आदर करेल व त्याचबरोबर मुलींचाही करेल. तो मुलींच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही, अपशब्द बोलणार नाही. मुलांनी कुठलाही लैंगिक विषयाबद्दल प्रश्न विचारला की, अभ्यासाकडे लक्ष देत नाही व भलते सलते प्रश्न विचारतो, असं म्हणत त्याला गप्प केलं जातं. पण जोपर्यंत त्याचं कुतूहल शमल्या जातं नाही, तोपर्यंत त्याचं अभ्यासात लक्ष लागत नाही. एक निरीक्षण आहे सातवीपर्यंत हुशार असणारी मुलं नंतर घसरणीला लागतात, त्याच कारण काय? पालकांनी विचार करायला हवा. हे वय त्याचं स्वप्रतिमा तयार करण्याचं असतं आणि ते करण्यासाठी पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. सोळा वर्षाच्या मुला-मुलीत मुलं जन्माला घालण्याची शारिरीक क्षमता असते पण जबाबदारी पेलण्याची नसते. वीस ते चोवीस हा स्वओळख तयार करण्याचा, चूक -बरोबर पारखून निर्णय क्षमता विकसित करण्याचा काळ!

दहावीच्या शालेय पुस्तकात लैंगिक शिक्षणाविषयी शास्त्रीय माहिती दिलेली आहे ती आपल्याला द्यायची गरज नाही. पण मुलं चोवीस वर्षाची होईपर्यंत पालकांनी भावनिक व सामाजिक स्तरावर असणार्‍या समस्यांविषयी मोकळेपणाने बोलायला पाहिजे. आज मुलींना एकविसाव्या शतकात जगण्यासाठी स्वतंत्र, सक्षम केलंय पण मुलांना मात्र विचाराने एकोणिसाव्या शतकातून बाहेर पडूच दिलं नाहीये. मुलींनी उच्चशिक्षण घ्यायचं पण नोकरी करायची नाही किंवा घर सांभाळून नोकरी करायची पुरुषांच्या सहभागाशिवाय. घर संसाराची जबाबदारी ही दोघांचीही असते, ह्याची जाण पुरुषांमध्ये अत्यल्प दिसून येते. समाज सुदृढ होण्यासाठी हा विरोधाभास मिटवणं पालकांची व शिक्षकांची जबाबदारी आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसती माहिती देउन उपयोग नाही. तर धोके समजावुन दिले पाहिजेत. १४ - १६ वयोगटः

१) कमी वयात व सारख्या प्रेग्नंसी आणि डिलिवरी चे शरीरावर होणारे दुष्परिणाम, मूल झाले तरी त्याला सांभाळायला आवश्यक मॅज्युरीटी आर्थिक स्टॅबिलिटी नसणे, सामाजिक( सासवेचे/ जावांचे) प्रेशर कसे हँडल करावे, ही माहिती मुलींना देणे आवश्यक आहे. तसेच संसर्गाने होणारे रोग त्याची औषधे उपलब्ध असतात हे ही सांगावे. नाहीतर मुले घाबरतात व जिवाचे बरेवाइट करून घेउ शकतात. मुले गोड बोलून,
अटेन्शन देउन भुलवतात व मुलींचे नुकसान करू शकतात ह्याबद्दल समुपदेशनाची गरज आहे. प्रेमात पडून घरून पळून शकयतो जाउ नये यासाठी थोडे समुपदेशन द्यावे. का तर हे हार्मोनल बदल आहेत व आपण दोघे विरुद्ध जालिम दुनिया हे चुकीचे फीलिन्ग ह्याच आडनिड्या वयात येते.

२) एस टीडी, व वेश्यागमनातील धोके हे मुलग्यांना समजावले पाहिजेत. एक चुकीचे पाउल जन्माचे नुकसान करू शकते.

मला सगळा लेखच पटला
लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शारिरिक शिक्षण नाही.

पण मुलं चोवीस वर्षाची होईपर्यंत पालकांनी भावनिक व सामाजिक स्तरावर असणार्‍या समस्यांविषयी मोकळेपणाने बोलायला पाहिजे.>>हे तर खरेच आहे

माझा मुलगा आज १७ वर्षांचा आहे. जाणीवपुर्वक त्याच्या बाबाने (आणि मी कधीकधी, मी एवढी मोकळी नाही होऊ शकले याबाबतीत) स्त्रीयांचा आदर राखायचा, बोलताना मान ठेवायचा, शारिरिक जवळीक कमी साधायची, हे तर प्रसंगानुरूप सांगितले.

दहावीच्या शालेय पुस्तकात लैंगिक शिक्षणाविषयी शास्त्रीय माहिती दिलेली आहे ती आपल्याला द्यायची गरज नाही >>

मंजूताई, आज महाराष्ट्रात जिथे ३०% महिलांचे विवाह १६-१९ या वयात होवून जातात तिथे दहावीत (= १६-१७वे वर्ष) शास्त्रीय माहिती देण्याची गरज नाही हे विधान मला धाडसी वाटले. जरा सविस्तर लिहाल तर तुमचा मुद्दा समजेल.

मला वाटते लेखात शाळेत दहावीपर्यंत शिकणारी मुले मुली हा ग्रुप अध्यारूत आहे. अन्‌ जे दहावीत आधीच शिकवत आहेत ते शिकवायची गरज नाही असे त्या म्हणत आहेत. पण जे शाळेत दहावी पर्यंत पोचतच नाहीत त्यांच्याबाबतीतील प्रश्न फारच खोल आहेत.

लेख आवडला. लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ शारीरिक संबंधांचे शिक्षण इतकेच अध्याहृत न धरता केलला साधकबाधक विचार आवडला.

मुले गोड बोलून,
अटेन्शन देउन भुलवतात व मुलींचे नुकसान करू शकतात ह्याबद्दल समुपदेशनाची गरज आहे>>>+१११११
मुलींना पालकांनी हे अवश्य सांगितला पाहिजे कि मुलं तुझं माझ्यावर प्रेम नाही , तुला दुसराच कोणी आवडतो , तुझा माझ्यावर विश्वास नाही
म्हणून तू मला जवळ येवू देत नाही असं सांगून मज मारतात आणि नंतर पसार होतात .

मुलांची चुकीची पावले पडण्याला , त्यांच्यावर अत्याचार होण्याला पालक मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात . लहान मुलांना कोणी चोकलेट देतो किवा तुझी आई वडील आजारी आहेत , त्यांनी तुला बोलावलय असं काहीही सांगू दे. अजिबात कोणासोबत हि जायचं नाही . ओरडायचं . इथे तिथे हाथ लावला कि जोरात ओरडायचं आणि आम्हाला सांगयचं bla bla bla . आई वडील हे सगळं मुलांना का नाही शिकवत ?

दुसरी चीड आणणारी गोष्ट म्हणजे मुलींचा , स्त्रियांचा मुलखाचा भित्रेपणा आणि संकोची वृत्ती .आई वडील मुलींना लहानपणापासून धीट , धाडसी ,
प्रतिकार कसा करायचा हे का नाही शिकवत ? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सतत मुलांना रागावणं , मारणं , घरामध्ये भांडण करण ह्या गोष्टींमुळे मुले बुजरी होतात आणि आई वडिला शीच बोलायला घाबरतात . मग बाहेर का नाही घाबरणार .

तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट . मुलांवारचे संस्कार आणि संगत . विशेषत: मुलग्या वरचे लहानपणापासून चांगले संस्कार असणारी (सामाजिक आणि अध्यात्मिक ) आणि चांगल्या संगतीत असणारी मुले वाईट गोष्ट करायला पटकन धजावत नाहीत . पण हल्ली आई बापालाच संस्कार कशाशी खातात माहित नसतं ते मुलांना काय शिकवणार ?

लेख आवडला.
मुलाशी बाबाने आणि मुलीशी आईने बोलणे अशी वाटणी नसावी. आई-बाबा दोघांनीही संवाद ठेवावा. ' मोठं' होत असताना, जगात वावरताना आपल्याला आलेले अनुभव जेव्हा आई मुलाबरोबर शेअर करते तेव्हा भोवतालच्या मुलींबद्दल एक प्रकारची एम्पथी मुलांमधे निर्माण होते. बाबा जेव्हा मुलीबरोबर बोलतात तेव्हा मुलांचे म्हणून जे एक वेगळे असे जग असते, एक वेगळे परस्पेक्टिव असते त्याची जाणीव करुन देवू शकतात. हेल्दी रिलेशनशिप, नकार पचवणे या बाबत आई-बाबा दोघांनी बसून बोलणे फार महत्वाचे.
लैगिक शिक्षणाबाबत बोलताना इंटरनेटवर वरील सेक्शुअल प्रिडेटर्स बद्दल समजावून सांगणे हे खूप महत्वाचे. त्याच बरोबर उद्या तुझ्या हातून काही चूक झाली तरी तुला सावरण्यासाठी आम्ही तुझ्या बरोबर असू. घाबरुन, शिक्षेच्या भीतीने वगैरे आमच्यापासून लपवून ठेवलेस तर तुलाच योग्य ती मदत मिळू शकणार नाही हे वारंवार सांगावे. बरेचदा तुझ्या घरी कळले तर असे सांगुन मुलांना ब्लॅकमेल केले जाते. घाबरलेल्या मुलांचा गैरफायदा घेणे आणि बॅकमेल करणे असे न संपणारे दुष्टचक्र सुरु होते.

लैगिक शिक्षणाबाबत बोलताना इंटरनेटवर वरील सेक्शुअल प्रिडेटर्स बद्दल समजावून सांगणे हे खूप महत्वाचे>> अगदी अगदी. परवाच एक सत्यघटना वाचली. एका क्ष धर्माच्या मुलाने फेक प्रोफाइल बनवली. मुलीशी फेसबुक वर मैत्री वगैरे केली. तिला कॉलेजा समोर भेटला. तिने जेव्हा त्याचे फेक पण जाणले तेव्हा ती बावरली पण त्याने जीव द्यायची धमकी दिली व तिला किडनॅप केले. तिला ओरिसातून त्याच्या तावडीतून सोडवून आणले गेले आहे. हे लोक असा कांगावा करतात व अननुभवी मुली बावरून / दडपणाखाली येतात. तसे करू नये. ह्या वयातील मुलींना अटेन्सन हवे से वाटते हे प्रिडेटर लोकांना माहीत असते.

ह्या घटनेचा अजून एक परिणाम म्हणजे कॉलेजासमोर मुली किडनॅप होत आहेत अशी रूमर व्हॉ अ‍ॅ. व इतर माध्यमातून पसरली ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांच्यात. व सर्व काही दिवस संभ्रमित होते. अश्यावेळी पालकांचा सपोर्ट व खंबीर राहायला प्रोपर माहिती मुलांपाशी पाहिजेच.

सत्यमेव जयते मधे सांगितलेला आणि मला महत्त्वाचा वाटलेला मुद्दा.

आपल्याकडे वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला नमस्कार करा, उलट बोलू नका. मान द्या.अशा संस्कारातून .....
नकळत पणे वयाने मोठा म्हणजे भरवशाचा, योग्य वागणारा, संशयातीत,........अशी शिकवण दिली जाते.

मग कळत्या- नकळत्या वयातील मुली त्यांच्याशी होणारा असभ्य व्यवहार पाल़कांपर्यंत पोहोचवत नाहीत.

संस्कार ही संकल्पनाच नव्याने तपासण्याची वेळ आलीय !

सगळ्यांना धन्यवाद! @ सीमंतिनी - श्रोतृवर्ग शहरी व सुशिक्षीत होता. हे शिक्षण देण्याची गरज शहर, निमशहर, खेडी देण्याची गरज आहे. @ अमा - सहमत. @ स्वाती छान पोस्ट. खरंतर मुलांशी दोघांनी बोलायला हवे हे खरंय पण बाबाने सांगितलं की अरे ह्यावयात मलाही असं असं व्हायचं ... मुले लवकर कनेक्ट होऊ शकतात.

छान मांडलय, अजून वाचायला आवडेल.
>> एवढंच कशाला बाळ जन्माला आल्या आल्या मुलगा असेल तर निळा व मुलगी असेल तर गुलाबी कपडे आणतो. ते इतरही रंगाचे किंवा सारख्या रंगाचे का असू नये? ह्या अन अश्या गोष्टी आपण पालकच करत असतो ना? स्त्री - पुरुषांमध्ये भिन्नता आहे पण उच्चनीचता नाही.>> हे थोडं विरोधाभासी वाटलं, निळा - गुलाबी हे उच्च-नीच म्हणून नाही बघितले जात ना? आणि मुलगा-मुलगी सगळ्यांना एका रंगात घालायची गरजपण नाही. मुद्दाम ३-६ वर्षाच्या मुलाला गुलाबी रंगाचे कपडे घालून शाळेत पाठवलं तर इतर मुलं चिडवतील कदाचित (हे बघितलं आहे) आणि त्यावयात ते कसं handle करायचं हे शिकवण्यात कदाचित श्रम वाया जातील. पुढे गेल्यावर त्याला जे आवडेल ते मात्र करू द्या आणि पाठबळ द्या.
बाकी आई/ बाबा आणि त्यांच्या उपस्थितीत डॉ. सोडून कोणीही मुलाच्या प्रायव्हेट पार्टस ना हात लावायचा नाही, किस करायचं नाही हे ३ वर्षांपासून सांगावे.

लेख आवडला. सुंदर आहे.

उद्या परत येईन वाचायला कारण प्रतिसाद पण खूप चांगले आहेत त्यामुळे अजून काही angle लक्षात येतात.

आवडला लेख, आणि पटलाही.

मुलींना बरेचदा आईकडून पुरेसे सामान्यज्ञान मिळते पण मुलांना मात्र बहुतेकदा मित्रांकडूनच चुकीच्या पद्धतीने मिळते.

इथे या धाग्यावरही एक सहज निरीक्षण, प्रतिसादात स्त्री आयडींची संख्या लक्षणीय.

प्रतिसादात स्त्री आयडींची संख्या लक्षणीय. >> असं काही नाही. वाचनमात्र असल्याने लिहीलं नाही.

मुलांशी या विषयावर संवाद साधायला बाबांना जरा जडच जातं, त्या दृष्टीने या धाग्याकडे पाहतोय. स्वाती २ यांचे आणि अमा यांचे प्रतिसाद आवडले.

. मुद्दाम ३-६ वर्षाच्या मुलाला गुलाबी रंगाचे कपडे घालून शाळेत पाठवलं तर इतर मुलं चिडवतील कदाचित (हे बघितलं आहे) आणि त्यावयात ते कसं handle करायचं हे शिकवण्यात कदाचित श्रम वाया जातील.>>> मुलं का चिडवतील ? त्यांना कोणी सांगितलं कोणत्या रंगाचे कपडे कोण घालतं ते? मुलाला गुलाबी शर्ट आवडत असेल तर त्यानी नाही घालायचा का? श्रम वाया जातील... हे अजिबातच कळलं नाही.... लोकं काय म्हणतील? ह्याचा विचार क्रुन आपण आपलं आयुष्य आखायचं का ?

अ प्र तिम लेख.... तु मुळात छान च लिहितस ....
वि ष य अgदी डो ळ्यात अंजन घालण्या जोगा मांडला आहेस .....
तु झ्या मु ळे सेतु सारख्या संस्थेशी मी प ण जोड ल्या गे ली....
धns...

लेख आवडला. अनेक प्रतिसादही .चिंतित व्हावं असं वातावरण.. मुलं हुशार असतात, त्यांना धोके दाखवून दिले , संवाद वाहता ठेवला तर बरीच अपघाती वळणं टळू शकतात.