सायकलविषयी सर्व काही ११ (अॅक्सेसरीज)

Submitted by आशुचँप on 25 April, 2018 - 13:22

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
भाग ५
https://www.maayboli.com/node/64622
(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)
भाग ६
https://www.maayboli.com/node/64648
(सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?)
भाग ७
https://www.maayboli.com/node/64685
१० हजारच्या आतल्या सायकली
भाग ८
https://www.maayboli.com/node/64802
२० हजारच्या आतल्या सायकली
https://www.maayboli.com/node/64879
भाग ९
३० हजारच्या आतल्या सायकली
https://www.maayboli.com/node/64918
भाग १०
सायकल घेतानाची चेकलीस्ट आणि पैसे वाचवायच्या टिप्स

=============================================================================

गेल्या भागानंतर पुढचा भाग यायला बराच कालावधी उलटला.

तर यावेळचा विषय आहे अॅक्सेसरीज. सायकल घेताना अनेकांचे असे होते की सायकलची किंमत बघून त्या अनुषंगाने रक्कमेची जुळवाजुळव केली जाते पण ऐन वेळी एक्सेसरीज घेताना ते बिचकतात. आत्ता आवश्यकता आहे का, बघु पुढचे पुढे, आता ऐवढेच घेऊ, आपण काय इतकी सायकल चालवत नाही कशाला पाहिजेत एवढे सगळे असे अनेक उद्गार काढून फक्त सायकल घरी येते.

तर आजचा भाग फक्त अॅक्सेसरीजला समर्पित.....

किती आवश्यक किती नाही?

खरे तर याला असे काही एक स्पष्ट उत्तर देणे शक्य नाही. तुमची गरज, तुमचा वापर, पैसे खर्च करण्याची क्षमता आणि हौस या सगळ्याची सांगड घालून जे काय होईल ते तुमचे उत्तर इतकेच ढोबळमानाने सांगता येईल. कसे ते सांगतो.

समजा तुम्ही फोटोग्राफी सुरु केली आणि तुमचा वापर हा घरच्यांचे फोटो काढणे, कुंडीतली फुलझाडे, खिडकीतून दिसणारे दृश्य किंवा सहलीला गेल्यावरचे फोटो इतकेच आहे तर तुम्हाला महागडा कॅमेरा, डीएसआर घेण्याची गरज नाही. तुम्ही साध्या पॉइँट अँड शूट किंवा पार अगदी मोबाईलवर सुद्धा चांगले फोटो काढू शकता.

पण तुमच्या डोक्यात थोडी सिरीयस फोटोग्राफी करण्याचे असेल तर तुम्हाला एका बजेट डिएसआरमध्ये इन्वेस्ट करायला हरकत नाही. आणि मग डिएसआर आला की तो एकटा येत नाही, त्यासोबत मग तुम्हाला कशा प्रकारची फोटोग्राफी करायची आहे त्या अनुषंगाने अॅक्सेसरीज घ्याव्या लागतात. म्हणजे, बर्ड फोटोग्राफीसाठी झूम लेन्स, नेचर साठी वाईड अँगल, फॅशनसाठी प्राईम लेन्सेस, तसेच मग एक ट्रायपॉड, फ्लॅश, पोलरायझर फिल्टर इ.इ. आता यातली तुम्हाला कशाची किती आवश्यकता आहे हे तुमचा वापर किती आणि कशा प्रकारचा आहे यावर ठरणार. म्हणले तर काहीच आवश्यक नाही म्हणले तर सगळेच आवश्यक आहे.

इथून पुढचा टप्पा म्हणजे प्रोफेशनल फोटोग्राफी आणि मग त्यांच्यासाठी मग अनेक गोष्टी प्रायोरिटी असतात ज्या सर्वसाधारण हौशी फोटोग्राफरच्या दृष्टीने आवश्यक नसतात. याचा अर्थ मोबाईल फोटो काढणारे अगदीच टाकावू असे होत नाही, ते प्रोफेशनल फोटोग्राफरचे इक्विपमेंट घेऊ शकत नाहीत पण नजर घेऊ शकतात. कंपोझिशन, लाईट-शॅडो, रुल ऑफ थर्ड इ. गोष्टी शिकून ते साध्या कॅमेरावर आपल्या फोटोमध्ये सुधारणा घडवून आणू शकतात.

आता हेच सगळे नियम सायकल बाबत लावा.

तुमचा वापर अगदी मर्यादित आहे, घराजवळ २-५ किमी फिरून पुरेसे होणार आहे तर तुम्हाला अगदी मर्यादित अॅक्सेसरीज घेऊन पण चालणार आहे. किंबहुना जास्तीच्या अॅक्सेसरीज घेणे हा तुमच्या दृष्टीने अपव्ययच ठरणार आहे. तर एखाद्याला २०-२५ किमी सायकल आणि विकांताला ५०-१०० असे रायडींग करायचे असेल तर त्याला आवश्यक असणाऱ्या अॅक्सेसरीज वेगळ्या आहेत.
मल्टीडे एक्पिडीशन करणारे, बीआरएम करणारे, ऑफ रोड राईड करणारे यांच्या अॅक्सेसरीजच्या आवश्यकता अजून वेगळ्या आणि प्रोफेशनल सायकलपटूंच्या तर अजूनच खूप वेगळ्या.

त्यामुळे आधी आपण कुठल्या ब्रॅकेट मध्ये बसतोय हे तपासा आणि त्यानुसारच अॅक्सेसरीज घेण्याचे ठरवा. आवश्यकता नसताना घेणे आणि आवश्यकता असताना कंजूसपणा करणे हे दोन्ही चुकीचेच. आणि प्रोफेशनल सायकलपटू इतकी महागातली सायकल आणि इतर अॅक्सेसरीज घेऊ शकत नसला तरी ते कसे राईड करतात, पोश्चर कसे ठेवतात, कॅडन्स आणि इतर गोष्टी कशा अंमलात आणतात हे पाहून त्याप्रमाणे साध्या सायकलवर करून पाहिल्यास तुमच्या नकळतच तुमच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा झालेली जाणवेल.
पण सायकल साधी असो वा प्रोफेशनल तीन गोष्टी या अत्यंत आवश्यक आहेत. हेल्मेट, हवा भरायचा पंप आणि पंक्चर किट.
यापैकी हेल्मेटबाबत तर प्रचंड प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्याकडे लोकांना हेल्मेटचा इतका तिटकारा का वाटतो हे मला समजण्यापलिकडचे आहे. सायकल किंवा बाईक चालवताना हेल्मेट आणि कार चालवताना सीट बेल्ट हे असलेच पाहिजेत या ठाम मताचा मी आहे आणि ही गोष्ट सक्ती करून नव्हे तर आपली आपल्यालाच समजली पाहिजे. लोकांचा असा गैरसमज असतो की आपण हळू चालवणार, रस्त्याच्या कडेने तर कशाला पाहिजे ते फॅड. पण पडल्यावर तुम्ही हळू पडलात का जोरात यापेक्षा शरीराच्या कुठल्या भागाला इजा झाली यावर त्या अपघाताचे गांभिर्य ठरते.

तर सर्वात प्रायोरिटीची अॅक्सेसरी म्हणजे हेल्मेट.

सायकलचे हेल्मेट हे आपल्या बाईक हेल्मेटसारखे वजनदार नसते. उलट हार्ड फोम मटेरियलने बनवले असल्याने इतके हलके असते की हे खरेच आपल्या डोक्याची सुरक्षा करेल का याची शंकाच मनात येते. सायकल ही घाम काढणारी अॅक्टिव्हिटी असल्याने त्याचे हेल्मेट हे अर्थातच दुचाकीच्या हेल्मेटसारखे बंद, काचवाले असत नाही, उलट जास्तीत जास्त हवा खेळती रहावी यासाठी त्याची विशेष योजना केलेली असते.

हेल्मेट घेताना - हेल्मेटमध्ये सायकलप्रमाणे साईजचा फार इश्यु नसतो. लहानांचे एक दोन चार साईज आणि मोठ्यांचे दोन चार साईज अशा प्रकारात उपलब्ध असते. त्यापैकी आपल्या डोक्याला सर्वसाधारण कुठले बसते हे तपासून घ्यावे. हेल्मेट इतकेही लहान नसावे की ते डोक्यावर तरंगत राहील आणि इतकेही मोठे असू नये की ते कपाळावर सरकून येईल. आपल्या मापाचे आहे का नाही हे चेक करण्यासाठी सोपी युक्ती आहे की हेल्मेट घातल्यावर त्याची कड आणि भुवई यात दोन बोटांचे अंतर राहीले पाहिजे. यापेक्षा जास्त असेल तर लहान आणि कमी असेल तर मोठा आहे.

आणि अगदी टेलरमेड माप मिळाले नाही तरी हरकत नाही, प्रत्येक हेल्मेटला मागच्या बाजूने एक आवळपट्टी असते, त्याचा स्क्रु फिरवला की हेल्मेट आवळून किंवा लूज करून आपल्या मापाप्रमाणे फिट करता येते.
हेल्मेटचा स्ट्रॅप लावण्याचेही नियम आहेत. त्याचा बेल्ट फार आवळूनही लावू नये फार सैलही असू नये. साधारण बेल्ट लावल्यावर एक बोट जाऊ शकेल इतके अंतर असले पाहिजे म्हणजे हनुवटीची, जबड्याची हालचाल व्यवस्थित होउ शकेल अन्यथा फार विचित्र प्रकार होईल. सैल असेल तर त्या हेल्मेटचा उपयोग नाही, ऐन इम्पॅक्ट घेतेवेळी जर ते सरकले तर उपयोग कमी उपद्रव जास्त असा प्रकार.

काही टिप्स

१. हेल्मेट हे नेहमी चांगल्या मान्यताप्राप्त दुकानातून, डिलरकडून घ्यावे. लहान मुलांची हेल्मेट ५००-६०० पासून तर मोठ्यांची हेल्मेट ८०० पासून सुरु होतात.

२. नाही त्या ठिकाणी कंजूसपणा करू नये. दागिन्यांवर, फॅशनवर, बुटांवर हजारो उधळणारे लोक जेव्हा आपल्या मेंदुचे रक्षण करणाऱ्या वस्तुच्या बाबतीत कशाला इतके महागाचे घ्यायचे, साधे नाहीये का असे विचारतात तेव्हा त्यांच्या मेंदूची मला कीव येते. आज एकदा हॉटेलींग करायचे झाले तर पाच-सातशे रुपये खटकन उडतात. तर तेवढेही तुम्हाला हेल्मेटसाठी खर्च करावे वाटत नसतील तर नाईलाज आहे

३. अनेकदा फ्री साईज असल्याने घरात दोघेजण असतील तर एकमेकांचे हेल्मट किंवा दोघात एक असे वापरले जाते. पण हेल्मेट घामेजून जात असल्याने ते फारसे हायजिनीक नाही, अगदीच जमत नसेल तर डोक्यावर रुमाल किंवा बंडाना बांधून मग त्यावर हेल्मेट घालावे.

४. दोघात एक नसले तर डोक्यावर बंडाना किंवा रुमाल बांधणे चांगलेच कारण मग डोक्याच्या घामाचा, तेलाचा वास हेल्मेटला लागत नाही. आणि दुसरे म्हणजे रुमाल, बंडाणा घाम शोषून घेतल्याने तो ओघळून डोळ्यांवर येणे, डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरणे असे होत नाही.

५. साईजची पूर्ण खात्री असेल तरच ऑनलाईन हेल्मेट मागववे, अन्यथा दुकानात जाऊन ट्राय करून घेतेलेले चांगले.
हेल्मेट एकदा घेतल्यावर पुढची अनेक वर्षे आरामात जाते. त्यामुळे घेतानाच चांगल्या दर्जाचे घ्या. हेल्मेटचे लाईफ संपत आल्याचेही काही इंडिकेटर आहेत. त्यातला एक म्हणजे, नखाने त्याचे फोम दाबून बघणे. जर नख रुतले चांगले तर फोमची धक्का शोषून घेण्याची क्षमता अद्याप टिकून आहे, पण ते जर हार्ड झाले असेल तर धक्का शोषला जात नाही आणि इजा होण्याची शक्यता आहे. तुमच्या जुन्या हेल्मेटबाबत असे झाले असल्यास ते तातडीने बदलावे.
आता तर इनबिल्ट गॉगल असलेली हेल्मेट देखील बाजारात आली आहेत. त्याला दिवसा आणि रात्रीचे असे दोन्ही प्रकार येतात. हा एक मस्त पर्याय आता उपलब्ध झाला आहे. विशेषता ज्यांना चष्मा आहे अशांसाठी.

हेल्मेट नंतर येते ती महत्वाची अॅक्सेसरीज म्हणजे हवा भरायचा पंप.

आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही, पूर्वी कोपऱ्या कोपऱ्यावर सायकलची दुकाने असत, आता म्हणजे शोधून काढावे लागते. आणि प्रेस्टा व्हॉल्व असेल तर अजून अवघड. त्यांच्याकडे प्रेस्टा व्हॉल्वमध्ये हवा भरायसाठी काहीच नसते. त्यावर अॅडाप्टर जवळ बाळगणे हा उपाय असला तरी घरातून निघताना योग्य मापाची हवा (किती ते मागच्या भागांमध्ये नमूद केले आहे) भरून निघणे कधीही श्रेयस्कर. आणि जर सायकल वापरात नसेल तर हवा जाऊन टायर फ्लॅट, आणि मत त्याला कात्रे पडणे, किंवा लहर आल्यावर टायर फ्लॅट मग ढकलत जाऊन हवा भरणे हे व्यापाचेच.

आता हवेचा पंप कशा प्रकारचा असावा. एक अत्यंत साधा पंप १००-२०० रुपयांपर्यंत कुठल्याही सायकलच्या दुकानात मिळतो. पण त्याचे लाईफ कमी असते आणि त्यात प्रेस्टा आणि श्रेडर या दोन्ही वॉल्वमध्ये हवा भरण्याची सोय असेलच असे नाही. दोन्ही वॉल्वची सोय अशासाठी की लहान मुलांची सायकल, मोठ्यांची सायकल असे असल्यास दोन्हीची सोय एकातच होते.

हा पंप स्वस्त असतो, कुठेही मिळतो हे झाले याचे फायदे पण यात तोटा असा की नक्की किती हवा भरली ते कळत नाही. प्रत्येक टायरवर त्याची कॅपसिटी किती आहे हे नमूद केलेले असते. माऊंटन बाईक्सची रेंज साधारणपणे ५० ते ७० पीएसआय असते तर हायब्रीडची रुंदीनुसार ७० ते ९० असते तर रोडबाईकची १०० च्या पुढे. जितके टायर बारीक तितका त्याचा पीएसआय जास्त असे हे साधे गणीत आहे.

पण अनेकदा इतका विचार केला जात नाही, अंदाजपंचे दाहोदरसे हवा भरली जाते, हाताने दाबून टायर टणटणीत झाले आहे का इतके बघून चालवयाला सुरुवात केली जाते. पण त्यात तोटा असा की जास्त हवा झाली तर रस्त्यावरचे खड्डे जाणवतात, आणि कधी कधी उष्णतेने हवा प्रसरण पावून ट्यूब फुटते. उलट कमी हवा भरल्यास जास्त श्रम लागतात आणि पंक्चर होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे योग्य मापाची हवा भरणे कधीही श्रेयस्कर. आता अनेक पंपात मीटर गेज असतो, आणि असे पंप ५००-६०० पासून पुढे मिळतात. चांगल्या ब्रँडचे तर १००० पासून. आता पंपासाठी इतके खर्च करावेत का प्रश्न आहे.

पण तुमची सायकल ३०-४० हजाराची असेल तर त्याचे टायरही तितक्याच चांगल्या क्वालिटीचे असतात. आणि त्या टायरची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. त्यामुळे चांगल्या हेल्मेट सोबत एक उत्तम पंप घरी असणे आवश्यक आहे. सायकल साधी असल्यास कदाचित आवश्यक नाही पण माझे वैयक्तिक मत घरात एक पंप असल्यास काहीच तोट्याचे नाही. मी तर माझ्या सायकलच्या पंपने कारच्या चाकात पण हवा भरलीये. (खुप दमलो मारून मारून, पण भरली गेली हे महत्वाचे). सो बेसिकली एक १००० रु चांगल्या पंपासाठी राखीव ठेवा.

तुमचे ध्येय जर बीआरएम किंवा लांब पल्ल्याचे सायकलींग असेल तर मग या मोठ्या पंपाच्या सोबत एक लाईटवेट छोटा पंप असणेही आवश्यक आहे. कारण हा मोठा पंप तुम्ही सगळीकडे कॅरी करू शकत नाही आणि घरी छोटा पंप वापरत बसणे फार कंटाळवाणे काम आहे.
बीटीवीन कंपनीचे चांगले ट्रॅव्हल पंप ३५०-४०० पासून मिळतात. ते आणि पंक्चर किट सोबत असणे हे राईडसाठी गरजेचे आहेच. अन्यथा पंक्चर झाले तर राईड बोंबलतेच शिवाय तिथून परत घरी येणे हे फार जिकीरीचे काम आहे.
त्यातही पंप हा शॉर्ट असला तरी चालेल पण त्याला केबल असावी. नुसता एक पाईपसारखा पंप येतो तो फार तोकडा पडतो आणि त्याच्याशी दंगामस्ती केली तर ट्युबचा वॉल्व खराब होते आणि अख्खी ट्युब फेकून द्यावी लागते. त्यामुळे स्वस्तात मिळतो म्हणून कुठलाही पंप जवळ बाळगू नका.
पंक्चर कीट तर कुठेही मिळू शकते आणि १००-१२५ रुपयांत मिळते आणि ते कुठेही मावू शकते. त्यात दोन लिव्हर, काही पॅचेस, ट्युब लोशन इतके असते. आपल्याकडे अद्याप ट्युबलेस टायर्स सायकलमध्ये इतके प्रचलित नाहीयेत आणि जे आहेत ते बरेच महागडे आहेत. त्यामुळे सध्या तरी पंक्चर कीट आणि पंप सोबत ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही.

पंक्चर काढणे हे सुरुवातीला कटकटीचे वाटेल (नंतरही अर्थात) पण एकदा त्याची नीट माहीती झाली तर झटदिशी होऊ शकते. मी नतरच्या एका भागात पंक्चर कसे काढायचे याची साद्यंत माहीती देणारा व्हिडीयोच टाकणार आहे. तोपर्यंत यूट्यूबचा सहारा.

अजून एक महत्वाची अॅक्सेसरी म्हणजे अॅलन की. या एका सेटमध्ये अनेक प्रकारचे स्क्रूड्रायव्हर असतात. सीटची उंची खाली वर करणे, हँडल, पॅडल, कॅरीयर टाईट करणे इ.इ अनेक प्रकार या एका सेटमुळे सहजी होतात. एरवीही घरात कुठेही आवश्यकता लागली तर कामाला येणारा प्रकार आहे. बिटवीनचे अॅलन की २०० रु. पर्यंत येतात. त्यात मग पुढे आवश्यकतेनुसार अनेक गोष्टी वाढत जातात आणि किंमतही. पण सुरुवातीला हा एक पुरेसा आहे.

आता पुढच्या अॅक्सेसरीज - आवश्यक पण अत्यावश्यक नव्हे

म्हणजेच या नसल्या तरी फारसे बिघडत नाही पण असल्या तर चांगल्या. त्यात येतात
ग्लोव्हज, जर्सी आणि शॉर्ट्स. ५-१० किमी अंतर जाणाऱ्यांनी या नाही घेतल्या तर चालतील पण आवड आणि बजेट असेल तर घ्याव्यात. याचा एक फायदा म्हणजे शहरातल्या ट्रॅफिकमधून आपण हेल्मेट, ग्लोव्ज, जर्सी वगैरे घालून चालवायला लागलो की आपोआपच आपले वेगळेपण ठसते आणि लोक जरा आदब वगैरे देतात. आपण मजबूरी म्हणून नव्हे तर आवड म्हणून सायकल चालवतोय हे त्यांच्या मनावर ठसते आणि त्यांचा दृष्टीकोन बदलतो.

हा वैयक्तिक अनुभव आहे आणि आपल्याकडे अद्यापही हिच मानसिकता आहे. जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर सायकलींगला चालना मिळत नाही तोपर्यंत तरी हीच राहील.

आणि जर तुमचा वापर १०० किमी पेक्षा जास्त असणार असेल तर माझे म्हणणे घ्याच. ग्लोवमुळे हाताला बसणारे हादरे कमी जाणवतात, जर्सी मुळे सुटसुटीत वाटते आणि पॅडेड शॉर्ट्समुळे सीटला होणारे घर्षण कमी होते आणि पार्श्वभाग दुखायचे प्रमाण कमी होते. पॅडेड शॉर्ट्स असण्याचा फायदा आम्हाला जम्मू मोहीमेत जाणवला. कन्याकुमारीला जाताना आमच्याकडे साध्या शॉर्ट्स होत्या आणि सॅडल सोरमुळे ब्रम्हांड आठवत होते, पण त्या अनुभवातून शहाणे होत आम्ही जम्मू राईडवेळी चांगली शॉर्ट्स वापरली आणि तो अतिशय सुखद अनुभव होता.
याला पर्याय म्हणून काहीजण जेल सीट वापरतात. म्हणजे सायकलची सीटच गुबगुबीत करायची. पण खरे सांगायचे झाले तर इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी हे खात्रीने म्हणू शकतो की मऊ सीटपेक्षा हार्ड पण व्यवस्थित शेप असलेली सीट जास्त आरामदायक असते.
आपल्या पार्श्वभागाला एकदा त्याची व्यवस्थित सवय झाली की मग मऊ सीट विचित्र वाटायला लागते आणि मग कुशनमुळे शॉफिंग होण्याचे प्रमाणदेखील जास्त होते.

याखेरीज एक सॅडल किंवा फ्रेम बॅग. हँडलबार बॅगदेखील एक उपयुक्त वस्तू आहे.
अनेकदा मी पाठीवर सॅक घेऊन जाणारे सायकलपटू पाहिले आहेत. पण त्याने एकतर खांद्यावर लोड येतो आणि पाठ घामेजून जात असल्याने वैताग होतो. त्यामुळे एक सॅडल बॅगमध्ये पंक्चर कीट आणि एक अॅलन की बसली की आपला मोठा लोड कमी होता. शक्य असल्यास एक स्पेअर ट्युब देखील त्यात कोंबून ठेवावी. म्हणजे उन्हात रस्त्याच्या कडेला बसून पंक्चर काढत बसण्यापेक्षा पटदिशी स्पेअर ट्यूब बसवली की झाली. मग घरी आल्यावर निवांत पंक्चर काढून ती स्पेअरला ठेऊन द्यायची.
(हेही अनुभवातून आलेले शहाणपण)

घंटा आणि आरसा - मी व्यक्तीश कधीच या दोन्ही गोष्टी वापरल्या नाहीत पण अनेक मित्रांकडून त्याचा चांगला उपयोग झाल्याचे ऐकले आहे. ज्यांना ट्रॅफिकमध्ये चालवताना थोडी भिती वाटते किंवा वळताना मागे वळून गाड्या येत आहेत का नाहीत हे पाहणे रिस्की वाटते त्यांनी एक छोटासा आरसा बसवून घेणे चांगलेच.
घंटीने फार फरक पडतो असे मला वाटत नाही पण तेही पूर्णपणे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे.

सायक्लोकॉम्पुटर - हा देखील एक ऐच्छिक घटक आहे. आणि अगदी सुरुवात असेल तर न घेतलेलाच उत्तम. जेव्हा तुम्ही रेग्युलर सायकल चालवायला लागाल, थोड्या मोठ्या राईड करायला लागाल तेव्हा आपला परफॉर्मन्स ट्रॅक करण्यासाठी म्हणून घ्यायला हरकत नाही.
आता इथे प्रश्न येतो स्ट्राव्हा, मॅपमायराईड, एडमोंडो सारखे अॅप्स फुकटात उपलब्ध असताना आणि कॅलरीपासून सगळ्याची नोंद ठेवत असताना वेगळ्या सायक्लोकॉम्पुटरची गरज काय.

तर दोन गोष्टी. एकतर म्हणजे अॅप्स भरपूर बॅटरी खातात आणि मोठाली राईड असेल तर फोन जीव टाकतो. दुसरे म्हणजे, किती किमी झाले, काय स्पीडने चाललो आहोत, अॅव्हरेज स्पीड काय पडतोय हे चेक करायला सतत मोबाईल काढून पाहणे धोकादायक. आपल्या डोळ्यासमोर किमी चे आकडे दिसत असताना आपला आपल्यालाच अंदाज येतो. संपूर्ण राईड झाल्यावर मग त्याचे आकडे तपासत बसण्यापेक्षा ट्रेनिंग दरम्यानच आपण किती आणि कशा स्पीडने चाललो आहोत, गेल्या वेळेपेक्षा सुधारणा आहे अथवा नाही इ.इ तपासायला सायक्लोकॉम्पुटर उपयोगी पडतो.
पण मी वर म्हणल्याप्रमाणे हाही पूर्णपणे ऐच्छिक घटक आहे. बीटि्वीनचे ७०० रु पासून येतात तर सिग्मा, कॅट आय या परदेशी कंपन्यांचे फिचर्सनुसार ५-६ हजार किंवा त्याहूनही पुढे इतके असतात. गार्मिन हा त्यातला सर्वोत्तम मानला जातो.
गार्मिन ५०० घेणे हे अनेक सायकलपटूंचे स्वप्न असते. आताच्या रेटनुसार तो २३ हजारला येतो.

पण आता एक नवा प्रकार उपलब्ध झाला आहे आणि कमी किंमतीत सर्वत्र उपलब्ध झाला आहे तो म्हणजे फिटनेस वॉच. अगदीच बेसिक मॉडेल सोडली तर काही दर्जेदार वॉचेस सायकल, रनिंग व्यवस्थित ट्रॅक करतात आणि ते स्ट्राव्हासोबत अॅटॅच होते.

लाईट - यावर थोडे लिहावे लागेल. सहसा सिटी राईड करणारे मिट्ट काळोखात सायकल चालवण्याच्या फंदात पडत नाहीत. पण काही भल्या पहाटे उठणारे हौशी, आणि सायकल घेऊन ऑफीसला जाणारे आणि संध्याकाळनंतर घरी येणारे यांना एक चांगल्या क्वालिटीचा दिवा घेणे आवश्यक आहे.

इथेही हेल्मेटचा नियम लावावा. लाईटची किंमत ही तुमच्या जीवापेक्षा किंवा दवाखान्याच्या बिलापेक्षा नक्कीच खूप खूप कमी आहे. चांगला झगझगीत प्रकाश देणारा दिवा महाग असतो पण उगाच पैसे खर्च कशाला असे म्हणून इटूकला पिटुकला दिवा घ्यायचा आणि रस्त्यातला खड्डा दिसला नाही म्हणून हातपाय मोडून घ्यायचे असले दिव्य प्रकार टाळा. अर्थात लाईट घेताना बराच चोखंदळपणा दाखवावा लागेल कारण ऑनलाईन शेकड्याने कंपन्या आणि नानाविध प्रकार आहेत. त्यातला कुठला चांगला हे ठरवणे तसे अवघड आहे.
तर त्यातल्या त्यात काही बेसिक टिप्स...

ल्युमन्स - अर्थात दिव्याची प्रखरता. जितका ल्युमन्स जास्त तितका दिवा जास्त प्रखर, तितका तुम्हाला लांबचा रस्ता, त्यावरचा खड्डा, माती, पाणी दिसणार. आणि म्हणजेच उघड आहे, जितका ल्युमन्स जास्त तितका तो लाईट चांगला. पण त्यापटीत त्याची किंमत वाढत जाणार. मग कुठे थांबायचे.
तर दुसरी गोष्ट बघायची ती म्हणजे ल्युक्स - म्हणजे दिवा नुसताच जास्त प्रखर असून उपयोगाचे नाही तर त्याचा प्रकाश लांबवर कुठे फोकस होतो, त्याची तीव्रता किती आहे यावर. नाहीतर सायकलपाशीच सगळा उजेड आणि आपल्याच डोळ्यांना त्रास असे नको व्हायला.
याखेरीज त्याची बीम किती अँगलमध्ये आहे हे देखील. म्हणजे काही दिवे पसरट असतात आणि आपल्या बल्ब सारखा त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो. तर काही दिवे टॉर्चप्रमाणे फक्त लांबवर फोकस टाकतात. यापैकी साधारण सुवर्णमध्य काढेल असा दिवा.
आता त्याची बॅटरी. दिवा चांगला प्रखर आहे, फोकसही व्यवस्थित होतोय पण तासाभरात जीव टाकतोय तर काही उपयोग नाही. चांगली बॅटरी असेल तर ३-४ तासापर्यंत लाईट चांगला राहतो. मोठ्या राईडसाठी आम्ही वापरायचो ते तर ७-८ तासापर्यंत चालत.

फ्रंट लाईट सोबत टेल लाईट हा देखील आवश्यक आहे. सायकल घेताना बाय डिफॉल्ट त्याला रिफ्लेक्टर जोडलेला असतो पण काळोख्या रात्री तो पुरेसा ठरत नाही. आणि आपल्याकडचे बेशिस्त ट्रॅफिक लक्षात घेता आपण जितकी खबरदारी घेऊ तितकी कमीच. त्यामुळे एक खणखणीत ब्लिंकर सायकलला लावणे अत्यावश्यक आहे.
ब्लिंकर दुकानातून घेण्यापेक्षा ऑनलाईन मागवावे, स्वस्त पडतात आणि बरीच व्हरायटी असते. साधारण १५० रुपयांपासून मिळतात. v त्यातही बॅटरीपेक्षा यूएसबी चार्जिंग वाले जास्त चांगले. दर वेळी बॅटरी बदली करण्यापेक्षा तोच लाईट चार्ज करत वापरता येतो आणि प्रखरही असतो.

रात्री चालवताना अजून दोन गोष्टी जवळ बाळगाव्यात.

एक म्हणजे रिफ्लेक्टीव्ह जॅकेट. हे अतिशय पातळ कापडाचे आणि त्याला रेडियम पट्ट्या बसवलेल्या असतात. रात्री ते चांगलेच चमकते. याखेरीज सायकलला देखील रेडियमच्या पट्ट्या बसवल्यास अधिक परिणामकारक होते.

लक्षात ठेवा, रात्री तुम्हाला रस्ता दिसण्याईतकेच बाकी लोकांना तुम्ही दिसणे हे अत्यावश्यक आहे.

लॉक - सायकल घेताना दुकानदार एक मामुली लॉक गळ्यात मारतात. पण ते अगदीच तोकडे असते आणि खेचाखेची करून सायकल कशाला तरी बांधणे फारसे योग्य नाही. एक चांगले लांबलचक लॉक ऑनलाईन मागवलेले उत्तम. नंबर लॉकवर माझा फारसा विश्वास नाही पण अनेकजण वापरतात सध्या.
बॉटल होल्डर आणि बॉटल - अनेकदा सायकल घेतानाकॅच डिलर आपल्याला बॉटल होल्डर बसवून देतो. आणि मग त्याला साधी बिस्लेरी बाटली बसवली जाते. हरकत नाही, त्याचेही काही फायदे आहेत ते म्हणजे स्वस्त असते, हरवली, पडली, फुटली तरी फार वाईट वाटत नाही.
तोटे - लगेच गरम होते, उन्हाने पाण्याला वास यायला लागतो. आणि मुख्य म्हणजे सायकल चालवताना घोट घोट पिता येत नाही. बाटलीचे झाकण काढून, पाणी पिऊन, परत होल्डरमध्ये बाटली ठेवणे हे तसे ट्रिकी आहे आणि सवय नसल्यास असले काही स्टंट करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण.
त्यात पुढचा प्रकार म्हणजे सीपर सारख्या बॉटल येतात. त्याला झाकण उघडा बंद करा भानगड नसते. सायकल चालवता चालवता बाटली घ्या, दाबली की पाण्याची धार, दाब सोडला की पाणी बंद. परत ठेऊन द्या.
या बाटल्यातही पाणी गरम होते आणि त्यालाही वास येतो आणि बिस्लेरी बाटल्यांपेक्षा महाग असल्याने हरवल्या की त्रास होतो. आता तर त्यात थर्माससारखे गार राहणारी टेक्नॉलॉजी आली आहे, पण ते बरेच महाग आहे. त्यापेक्षा वाटेत गारेगार पाणी भरून घेणे, मग संपले की परत कुठेतरी हे उत्तम.
अजून एक पर्याय म्हणजे कॅमल बॅग - पाठीवरच्या या पिशवीत दोन लीटरपर्यंत पाणी मावते आणि बाटलीपेक्षा जास्त वेळ गार राहते. खाली वाकून बाटली घ्या, पाणी पिउन होईपर्यंत एका हाताने हँडल धरा आणि मग परत वाकून ठेवा, ही सगळी सव्य टाळायची असतील कर कॅमल बॅगला पर्याय नाही. त्याची नळी खांद्यापाशी येते ती घ्यायची, मस्त दोन घोट घ्यायचे की झाले. अगदी उन्हाचे घाट चढताना देखील घसा कोरडा पडताक्षणी पाणी पिता येते हा याचा सर्वात मोठा फायदा.
या कॅमल बॅग एरवीही म्हणजे ट्रेक, ट्रेल, भटकंती दरम्यानही उपयोगी पडतात. साधारण चांगल्या क्वालीटीच्या कॅमल बॅग १४०० पासून येतात. (ज्यात पाणपिशवी आणि त्याची सॅक असे दोन्ही असते, नुसती पाणपिशवी ५०० पासून मिळते, ती नुसत्या साध्या सॅकमध्ये ठेऊनही काम भागते)

या खेरीज एक सर्वात महत्वाची गोष्ट जवळ बाळगावी ती म्हणजे रायडर कार्ड.

दुर्दैवाने कधी अपघात झालाच तर तातडीने मदत मिळण्यासाठी या रायडर कार्डचा खूप उपयोग होतो. त्यासाठी पैसे मोजलेच पाहिजेत असे नाही. पण तुमचे नाव, पत्ता, ब्लड ग्रुप, अॅलर्जी, इमर्जन्सी नंबर आणि फॅमिली डॉक्टर यांचा नंबर इतक्या गोष्टी असतील तर त्याचा खूप उपयोग होतो.

अनेकदा ग्रुपने सायकलपटू जाताना दिसतात पण अनेकांना एकेकटेच आपल्या गतीने जायला आवडते. त्यांनी तर एक नियम म्हणून हे कार्ड जवळ बाळगावेच.

अजून कुणाला काही सुचले, प्रश्न पडले तर विचारा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशु, खूपच चांगली माहिती दिली आहेस, जमल्यास हेल्मेट बद्दल च्या काही व्हिडिओ ची लिंक इथे दे, जेणे करून त्याच्या उपयुक्तते बद्दल आणखी जाणीव होईल, रायडर कार्ड आणि सेफ्टी जॅकेट च्या प्रचि दिल्यास समजण्यास अजून मदत होईल.

फ्रंट/ रियर लाईट्स बद्दल मांडलेले सर्व मुद्दे पण मस्त आहेत. ह्या सर्व गोष्टींवर सविस्तर लिहिल्या बद्दल धन्स. ज्या प्रमाणे रियर लाईट्स मागून येणाऱ्यांना सावध करते त्याच प्रमाणे फ्रंट लाईट ही लेन कटिंग करणाऱ्यांना/ लेन बदलणाऱ्यना/ वळताना इतरांना तुमच्या उपस्थिती ची जाणीव करून (विशेषतः ब्लिकिंग मोड) देते जी खूप महत्त्वाची आहे

ह्या लेखमालेबद्दल पुनश्च धन्यवाद. खूप महत्त्वाचे पॉईंटस आहेत हे. कळवण्यास आनंद वाटतो की, आशुचँप ह्यांचंच मार्गदर्शन घेऊन मी नवीन मेरीडा स्पीडर सायकल घेतली. तेव्हा त्यांना खूप मुद्दे विचारले होते, अजूनही विचारतोय व ते सांगत आहेत! अगदी मी विचारलेल्या पॉईंटसमधून FAQs यादी होऊ शकेल, इतकं मार्गदर्शन त्यांनी केलंय. सो धन्यवाद.

आणि फोटोज मलाही दिसत नाही आहेत.

धन्यवाद इतक्या उत्तम महितीपर लेखा बद्दल. फोटो दिसत नाहि आहेत.
एकदा decathlon ला भेट द्यावी. हे सगळे तिथे उपलब्ध आहे तसेच कमी किमत अणि उत्तम दर्जा हि

धन्यवाद सर्वांना...

फोटोची परत काहीतरी गडबड झालेली दिसते आहे. मी आज वेळ मिळताच पुन्हा एकदा टाकून पाहतो.

मार्गी - चांगली कल्पना, पुढचा भाग हा FAQs म्हणूनच टाकावा

माझ्याकडे लॅपटॉपवर क्रोम ब्राऊजर मध्ये दिसत आहेत पण फोनवर फायरफॉक्स आहे तिथे नाही. हा नक्कीच ब्राऊजर कंपॅटिबिलीटीचा इशू आहे.

माझ्याकडे लॅपटॉपवर क्रोम ब्राऊजर मध्ये दिसत आहेत पण फोनवर फायरफॉक्स आहे तिथे नाही. हा नक्कीच ब्राऊजर कंपॅटिबिलीटीचा इशू आहे.>>
माझ्याकडे फाफॉ, क्रोम, माईए मध्ये पण नाही दिसतं, बहुतेक तुम्हि एचडी पिक्स टाकलेत थोडी साइझ कमी करुन टाकलेत तर दिसतिल बहुतेक.

माझ्याकडे लॅपटॉपवर क्रोम ब्राऊजर मध्ये दिसत आहेत पण फोनवर फायरफॉक्स आहे तिथे नाही. हा नक्कीच ब्राऊजर कंपॅटिबिलीटीचा इशू आहे>>>>

मला नाही वाटत. कारण मी पण क्रोम वापरतो तरीही मला दिसत नाहीयेत. आपण ते फोटो बहुतेक 'Google Photo' वरून टाकले आहेत, त्यामुळे हा privacy settings चा issue वाटतो आहे. तुमच्या क्रोममध्ये तुमचे Google login असल्याने तुम्हाला क्रोममध्ये फोटो दिसत आहेत पण Firefox मध्ये Google चे login नसल्याने तिथे फोटो दिसत नाहीत. आपल्याला ज्या लॅपटॉपवर क्रोममध्ये फोटो दिसत आहेत तेथे Ctrl+Shift+N दाबा म्हणजे Incognito mode सुरु होईल. त्यात हा धागा उघडून फोटो दिसतात का ते पहा.

@ आशुचँँप, ते सगळे फोटो आधी 'Google Photo' वरून डाउनलोड करून लॅपटॉपवर सेव्ह करा. आणि मग धागा संपादित करताना 'मजकुरात image किंवा link द्या' या पर्यायावर क्लिक करून ते फोटो अपलोड करा, म्हणजे ते मायबोलीच्या सर्वरवर सेव्ह होतील आणि सर्वांना दिसू शकतील.

(हे सर्व करण्याआधी आणखी एक करून पाहू शकता. Google Photo मध्ये जाऊन फोटोला काही privacy settings आहेत का? ते पहा. आणि असल्यास तेथे 'Public' select करा. अर्थात मी कधीही Google photo वापरले नाही, त्यामुळे मला माहित नाही. Google Drive वरील files आणि folders ला अशी settings असते जी 'Public' केल्यावर कोणीही पाहू शकतात.)

आम्ही अमेरिकेतून भारतात परत जाणार आहोत. बरचसं सामान शिप करायच आहे. मुलीची सध्या अमेरिकेत वापरात असलेली सायकल तिला लहान पडते. नविन सायकल (२०इंची) इथेच घ्यावी आणि शिप करावी की भारतात जाऊनच विकत घ्यावी?
जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

@ आशुचँँप,
(हे सर्व करण्याआधी आणखी एक करून पाहू शकता. Google Photo मध्ये जाऊन फोटोला काही privacy settings आहेत का? ते पहा. आणि असल्यास तेथे 'Public' select करा. अर्थात मी कधीही Google photo वापरले नाही, त्यामुळे मला माहित नाही. Google Drive वरील files आणि folders ला अशी settings असते जी 'Public' केल्यावर कोणीही पाहू शकतात.)
हे कर्ने गरजेचे आहे कारण तुमच्या बाकी पोस्त मधले फोटो हि गायब झाले आहेत.

एकदम भारी भाग! हेल्मेटबद्दल थोडं अॅडीशन..
सायकलच्या हेल्मेटला आळस करणाऱ्यांसाठी एक गोष्ट सांगतो. रस्त्याने जातांना बाजूने जाणाऱ्या कार/ ट्रक च्या चाकाखालून बरेचदा दगड उडतात, पैकी एखादा छोटा दगडदेखील वेगाने डोक्यावर येऊन आपटला तरी ते जीवावर बेतू शकतं. हेल्मेट बऱ्याच मोठ्या प्रमाणात संरक्षण करतं.
सेफ्टी फर्स्ट. आॅलवेज!

मस्त जमलाय भाग चँप!

आता फोटो दिसत असावेत अशी आशा आहे. ते प्रायव्हसी सेटींग काय सापडले नाही म्हणून हे फोटो आधी ज्या अल्बमचे फोटो शेअर केले होते त्यात टाकले.

विमु - तुमची सूचना पाहिली मी पण त्या प्रकारात मला फक्त ७०एमबीचेच मॅक्स फोटो टाकता येत आहेत.

आशु,
छान लेखमाला.
हेड lamp, साठी तुमची रेकमेंडेशन काय असेल?
कंपनी नाव आणि किंमत.

आता mi चा एअर कॉम्प्रेसर आलाय. एखाद्या लॉक एव्हडी लहान साईझ आहे त्याची. एकदा चार्ज केला की सहा टायरमध्ये हवा भरतो. मोठ्या राईडला पोर्टेबल पंपचं ओझं सोबत नेण्याचा त्रास वाचलाय.
IMG_20200927_141211.jpg