सायकलविषयी सर्व काही ६ (सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?)

Submitted by आशुचँप on 2 December, 2017 - 14:21

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
भाग ५
https://www.maayboli.com/node/64622
(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)

गेल्या भागात आपण लहान मुलांच्या सायकलबद्दल पाहिले. आता मोठ्यांच्या सायकलीबद्दल बोलू.

तर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न...

' माझे वय इतके आहे, माझे वजन इतके, मला फिटनेससाठी सायकल घ्यायची आहे..कुठली घेऊ...'

आता यात माहीती व्यवस्थित असली तरी सायकल कुठली घ्यावी हे तसे सांगणे थोडे अवघडच पडते कारण जेव्हा पाच सात हजारापासून पाच सात लाखापर्यंत हजारो पर्याय असताना नेमके काय सांगावे असा प्रश्न पडतो. बजेट विचारले तर अनेकदा असे काही ठरले नसते यामुळे मी माझ्यापरीने एक उपाय काढला आहे.

जेव्हा प्रश्न येतो की सायकलासाठी किती खर्च करावेत तेव्हा एक सोपा उपाय करावा.

जितक्या किंमतीचा तुमचा सध्याचा मोबाईल असेल तेवढ्या किंमतीची सायकल .

जरी मान्य केले की मोबाईल ही काळाची गरज आहे, कामासाठी लागतो वगैरे तरी मोबाईलला इतके खर्च करण्याची तुमची क्षमता असेल तर असे गॅजेट ज्यामुळे तुमची तंदुरुस्ती वाढेल, पेट्रोलचा खर्च वाचेल, फॅट्स कमी होतील त्यासाठी तितके मोजायला काहीच हरकत नाही.

जर आर्थिक चणचण असेल तर थोडे महिने थांबा, सेव्हिंग करा आणि चांगली सायकल घ्या. सायकलमधली इन्व्हेस्टमेंट कधीही फायद्याचीच ठरेल . जर शंका असेल की आपण पुढे चालवू का नाही, मग इतकी महागडी सायकल घेऊन काय करायची, आधी साधी सायकल घेऊन बघू, तर लक्षात घ्या असे काही होत नसते. साधी सायकल घेतल्यावर ती चालवावी वाटणे हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे घेतनाचा चांगली घ्या. जर दुर्दैवाने अगदीच वाटले की नाही, उगाच घेतली, तर ओएलेक्स वर विकून टाका. पण घेताना उगाच काटकसर करू नका.

नाही गेली तर मला कळवा, मी माझ्या संपर्कात कुणी असेल तर त्यांच्याशी डील करून देण्याचा प्रयत्न करेन. पण ४० हजारचा मोबाईल आणि ७-८ हजारची सायकल घेताना काचकुच असे करू नका. हे काय सायकल विक्रेत्यांचे भले व्हावे आणि तुम्हाला खड्ड्यात घालावे यासाठी सांगत नाहीये. चांगल्या दर्जाची सायकल चालवण्याचा आनंद वेगळाच आहे. आणि तो आर्थिक परिस्थिती असेल तर जरुर घ्या.

जसे मोबाईल हा अत्यावश्यक गरज मध्ये आहे तसेच फिटनेसचा एकतरी प्रकार तुमच्या यादीत असणे अत्यावश्यक आहे.
मग त्यात सायकलच असली पाहिजे असे नाही. धावणे, पोहणे, योगा, ट्रेक काहीही असू दे पण त्यातले सर्वोत्तम प्रोडक्टसाठी खिसा मोकळा करा. लॉंग रन मध्ये तुमच्याच फायद्याचे ठरेल.

पहिला मुद्दा म्हणजे सायकलच्या किंमती कशा ठरतात. आपल्याला अनेकदा अचंबा वाटतो की सायकल असून इतकी महाग का???..शेवटी पॅडल आपल्यालाच मारायचे आहे ना. तर त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो.

सायकलचा मुख्य भाग म्हणजे फ्रेम यावर बरीचशी किंमत अवलंबून असते. सध्या उपलब्ध असणाऱ्या सायकलमध्ये स्टील, लाईटवेट स्टील, अलॉय आणि कार्बन असे प्रकार आहेत.

स्टील -

बऱ्याच भारतीय सायकली पूर्ण स्टीलच्या असतात. सगळ्यात स्वस्त, एकदम टिकावू, पिढ्यानपिढ्या टिकतील अशा मजबूत. पण त्या शेवटी गंजत जातात आणि प्रचंड जड असतात. मी मागच्या भागात दिलेल्या अनेकय सायकली स्टीलच्यच आहेत म्हणनच त्या दहा हजारच्या आत परवडतात.

लाईटवेट स्टील हे स्टीलचेच अाधुनिक स्वरुप आहे. आघाडीचे भारतीय ब्रँड हर्क्युलस, बीएसए, हिरो इ. लाईटवेट स्टील वापरतात. याही तशा बऱ्याच जड असतात पण पूर्ण स्टीलपेक्षा हलक्या. किंमत ८ ते १० हजारपासून पुढे.

अलॉय - सगळ्यात जास्त सायकली सध्या अल्युमिनियम अलॉय धातू प्रकारात बनवलेल्या आहेत. स्टीलपेक्षा हलक्या, पाहिजे त्या आकारात आणि प्रचंड व्हरायटी. बहुतांश परदेशी बनावटीच्या सायकली अलॉयच्याच असतात. अर्थात, अलॉय या स्टीलपेक्षा हलक्या असल्या तरी जोराचा धक्का बसला तर निकालात निघतात. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या टिकणाऱ्या या सायकली नव्हेत. अलॉयच्या हलकेपणा आणि मजबूतीमुळे त्याची किंमतही जास्त असते आणि २०-२५ हजारांपासून या सायकली सुरु होतात ते पार अगदी लाखापर्यंत.

कार्बन - पूर्वी या सायकली प्रोफेशनल सायकलपटूच वापरू शकत होते, पण आता फुजी सारख्या कंपन्यांच्या आक्रमक मुसंडीमुळे सर्वसामान्य सायकलपटूलाही कार्बन सायकल घेणे शक्य आहे. अर्थात, तेवढी किंमत मोजून. कार्बन सायकल सर्वात हलक्या आणि सर्वात मजबूत, त्यामुळे किंमतही ७०-८० हजारांपासून सुरु होऊन दहा लाखापर्यंत. पण कार्बन सायकलचा तोटा म्हणजे, धातू हलका असल्याने जोराच्या दणक्याने, धक्क्याने त्याला प्ले येतो. खाबडखुबड रस्त्यांवर, आदळाआपट करत चालवायच्या या सायकली नव्हेत. त्यात काही पर्याय आहेत, पार्ट कार्बन, पार्ट अलॉय अशा सायकली थोड्या स्वस्त आहेत. त्या भारतीय रस्त्यांवर चांगल्या चालतात. अनेक वेळा फक्त फोर्क अल्युमिनियम किंवा कार्बनचा पण वापरुन त्यातल्या त्यात कॉस्ट सेव्हींग केलेली आढळते.
याखेरीज टायटॅनियमच्याही सायकली असतात आणि त्या अतीमहाग असतात. पण सध्या बांबू सायकली हा एक नविन प्रकार आला आहे.

आणि अभिमान बाळगावा असेच आहे. कॅ शशीशेखर पाठक या भारतीयाने 'बांबूची' हा ब्रँड तयार केला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थात बांबूची सायकल सहसा दुकानात बघायला मिळणार नाहीत, त्यासाठी अॉर्डर नोंदवावी लागते. आणि त्या तशा थोड्या महागही आहेत. पण एक वेगळा प्रयत्न म्हणून त्यांचे कौतुक करावे तितके थोडे.

https://bamboochicycle.com/

इथे त्याबद्दल माहीती वाचता येईल.

सायकलचा किंमत ठरवणारा दुसरा एलिमेंट आहे तो म्हणजे गियर्स.
सायकलींग इज ऑल अबाऊट गियर्स.

मल्टी गियर सायकलीमध्ये शिफ्टर, फ्रंट डिल्युलर, चेन, रिअर डिल्युलर, स्प्रॉकेट, कॅसेटट किंवा फ्रिव्हिल आणि या सगळ्याचा एक ग्रुपसेट असतो त्यावर किंमत बरीच अवलंबून असते.

अगदी बेसिक टर्नी या ग्रुपसेटपासून ते अत्यंत महागड्या ड्युरा-एस पर्यंत जो ग्रुपसेट असेल त्याप्रमाणे सायकलची किंमत कमी-जास्त होते. असेही हायब्रीड हा कन्सेप्ट तसा नविन असल्याने हायब्रीडची अशी वेगळी क्रमवारी नाही, त्यामुळे एमटीबी आणि रोड बाईक्सचेच ग्रुपसेट हायब्रीडला बसवले जातात.

शिमोनो हे एक अग्रेसर कंपनी आणि बहुतांश सायकलीचे ग्रुपसेट शिमोनोचेच असतात.

त्यांचे एमटीबीची क्रमवारी टर्नी शिमानो टर्नी, अल्टूस, एसेरा आणि अलिवियो

अलिव्हियो बसवलेल्या सायकली या किमान ३०-३५ हजारांच्या पुढे असतात. त्याही पुढे आता मेरीडाने रोडबाईक्सचा क्लारिस पण हायब्रीडमध्ये उतरवला आहे. पण त्यापुढचे ग्रुपसेट फक्त रोडबाईक्समध्ये आहेत. ज्यात क्लारिस - सोरा - टिएग्रा - १०५ - अल्टेग्रा - अल्टेग्रा डी२, ड्युरा एस अशी चढती भाजणी आहे.
आणि याच्या किंमती पाहिल्यात डोळे फिरतील. टर्नीचा फक्त डिल्युरल हा १,१००-१२०० ला मिळतो तोच ड्युरा एस डी२ चा ५८,००० हजारला, म्हणजे तुम्हाला एकंदरीत याची रेंज लक्षात येईल.

अर्थात, कॉस्ट सेव्हिंग मध्ये यातही कंपन्या आपल्याला विविध पर्याय उपलब्ध करून देतात. उदा. पूर्ण ग्रुपसेट एकाच प्रकारच देण्यापेक्षा रिअर डिल्युलर असेरा आणि फ्रंट टर्नी वगैरे अशी सायकल पूर्ण असेरा ग्रुपसेटपेक्षा बरीच स्वस्त पडते. आणि हीच थीम अनेक सायकल्सला आहे.

तर आता इथे प्रश्न पडतो, इतक्या खोलात जायचे आपल्याला कारण काय आहे, तर उत्तर असे हे व्यक्तीसापेक्ष आहे. वरती मी मोबाईलचे उदाहरण दिले त्याचप्रमाणे काही मोबाईल ग्राहक फक्त चांगला हँडसेट आणि बेसिक फिचर्सवर खुष असतात, काहींना उत्तम दर्जाचा कॅमेरा हवा असतो, काहींना दणदणीत रॅम किंवा दणदणीत बॅटरी बॅकअप हवा असतो. हे झाले प्राथमिक.

मग जास्त तपशीलवार जाणारे कुठले अँड्राईड व्हर्जन आहे, स्नॅपड्रॅगन कुठला आहे, कॅमेराची लेन्स कुठली आहे हे बघून त्यानुसार मोबाईल ठरवतात.

ग्रुपसेटची तुलना ही अँड्रॉईड व्हर्जनशी करा म्हणजे तुमचा गोंधळ कमी होईल. अजूनही जेलीबीन किंवा किटकॅटवर चालणारे फोन बाजारात आहेत, आणि पर्क बाजारात येत आहे. तुमच्या खिशाला कुठला अँड्रॉईड परवडतो यावर सगळा खेळ आहे.

अॅडव्हान्स्ड अँड्राईड हा मोबाईलचा वापर जास्त सुलभ करतो, जास्त इफेक्टिव्ह करतो तसेच चांगला ग्रुपसेट हा जास्त चालतो, सायकलिंगचा आनंद जास्त मिळवून देतो, पण म्हणून आधीचे ग्रुपसेट खराब नसतात. तुमचा वापर, तुमची गरज, आणि तुमचे बजेट या सर्वाचा सारासार विचार करून मगच ठरवा.

गियर्सची संख्या

सायकलला किती गियर्स असावेत यावरही अनेक गैरसमज आहेत. लोकांना असे वाटते की जास्त गियर्स म्हणजे जास्त जोरात जाणार, तर हे अर्धसत्य आहे. सायकलचा वेग गियर्स किती यापेक्षा तुमच्या पायात जोर किती यावर जास्त ठरतो.

मग हे २१ गियर्स, २४ गियर्स आणि अजून काय काय याला का महत्व दिले जाते. तर यात एक फॅक्टर कुणीच आपल्याला सांगत नाही आणि परदेशात त्यावर अती रिसर्च करण्यात आला आहे तो म्हणजे केडन्स. एका मिनिटात तुम्ही कितीवेळा पॅडल मारता, फार दम न लागू देता, पायाच्या स्नायूंवर जास्त ताण न येऊ देता किती वेग गाठू शकता यावर सगळे गणित असते.

आपली साधी जुनी सायकल आठवा, चढावर जाताना पॅडलवर अक्षरश उभे राहील्यावर कशीतरी पुढे जायची. पण मल्टिगियर सायकलचा फायदा हाच की सपाट रस्त्यावर मिनिटाला ५० पॅडल मारत असाल तर चढ आल्यावर गियर खाली उतरवून ५० पॅडल मारणे शक्य होते.

पूर्ण सायकलींगमध्ये एका रेंजमध्ये केडन्स ठेवणे याला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि स्मूथ शिफ्टर्स, २१, २४ गियर्स आपल्याला हा केडन्स ठेवायला मदत करतात. केडन्स हा रेससाठी तर अत्यावश्यकच आहे, पण सर्वसामान्य सायकलपटूलाही तो जास्त चांगल्या पद्धतीने सायकल चालवण्यासाठी आवश्यक आहे.

गियर्स आणि कॅडेन्सचा योग्य ताळमेळ साधला तर व्यवस्थित सायकल पळते, अन्यथा गरागरा पॅडल मारतोय आणि सायकल मंदगतीने चाललीये असा प्रकार किंवा जीव खाऊन, ताकदीने दात ओठ चावत पॅडल मारावे लागतायत असाही प्रकार टाळता येतो.

जितके जास्त गियर्स तितके ग्रॅडीएन्टचे चढउतार तुम्हाला ताळमेळ साधायला मदत होते. पण म्हणून २१ गियर्सची खराब आणि २४ गियर्सची भारी असे काही नाही. तुम्हाला २१ गियर्सवर शेवटचा ३x७ वर सायकल पळवता येत नसेल तर २४ गियर्सची घेऊन ३x८ वर जाताच न येणे म्हणजे पैशाचा अपव्ययच.

त्यापेक्षा गियर्सच्या दातेरी चक्राला किती दात आहेत यावर तुम्हाला चढ चढणे किती सोपे जाणार हे ठरते. हे बरेच तांत्रिक आहे, पण थोडक्यात सांगतो. मल्टीगियरमध्ये दातेरी च्रकांची संख्या आणि त्याचे दात हे ठरलेले असतात. अनेकदा ११-२८ असे सायकलच्या स्पेसिफिकेशन मध्ये लिहिले असते. तर याचा अर्थ सर्वात लहान चकतीला ११ दात आहेत तर सर्वात मोठ्या चकतीला २८. तर यापेक्षा ज्या सायकलला ११-३२ असेल ती चढावर जास्त सुलभपणे चढवयाला मदत होणार..

फ्रंटलाही तोच प्रकार ४८x३६x२६ असे अनेकदा असते (तीनच चक्रे असल्याने) आणि रोडबाईकला तर दोनच असतात त्यामुळे ५०x२४ असा रेशो असतो.
याखेरीज चेनची क्वालिटी, चेनचा स्पीड, ब्रेक रिम ब्रेक्स का डिस्क ब्रेक्स, ब्रेक लिव्हर्स, पॅडल क्लिपलेस का साधे, हँडलबार, स्टेम, सीटपोस्ट असे हजार प्रकार सायकलची किंमत ठरवतात.

यामुळे तुम्हाला चांगली हलकी, मजबूत आणि टिकावू सायकल हवी असेल, गियर्स स्मूथ हवेत तर तितके पैसे मोजावे लागणार आणि आजकाल लोक मोजतातही.
खरेतर याच भागात दहा हजाराच्या आतल्या, १० ते १५ हजारापर्यंतच्या सायकली, १५ ते २० आणि २०-२५ अशा प्रकारच्या सायकलींची नावे देऊन त्यांची माहीती देणार होतो. पण तांत्रिक माहीती देता देता खूपच मोठा झाला भाग. त्यामुळे आता सायकलबदद्ल पुढच्या भागात माहीती देतो.

भेटू लवकरच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे ट्रेक ची ४३००डी होती. वट्टं ३५००० मोजलेते... पण वर्थ द मनी... नंतर ३ वर्षांनी २७हजार ला सेकंडहॅण्ड विकून टाकली. इम्पोर्टेड सायकलींना रिसेल वॅल्यू सुद्धा दमदार असते. त्यामुळे नाही जमलं तर ५-७ हजार कमी घेऊन सायकल विकता येते. सायकलवेडे खूप आहेत. रिसेलला अजिबात त्रास होत नाही.

छान माहीती
मला वाटत फायरफॉक्स अॅलॉय सायकली पंधरा हजारापर्यंत उपलब्ध आहेत. माझ्या मते किती सायकलींग करायची आहे आणि करु शकतो यावर कुठली सायकल घ्यावी हे अवलंबून आहे. २० किमीच्या आत बिना गियरची चालेल, २० ते ५० बऱ्यापैकी हायब्रीड, यापेक्षा पुढे मात्र गियर्स, फ्रेम, ब्रेक (हल्ली डिस्क ब्रेक) या साऱ्या तांत्रिक बाबी महत्वाच्या आहेत. त्यासाठी लेखातील माहीती खूपच उपयोगाची आहे.

खूप उपयुक्त माहिती..
जितक्या किंमतीचा तुमचा सध्याचा मोबाईल असेल तेवढ्या किंमतीची सायकल . >> हे फार आवडलं !

मोबाईल आणि सायकल यांची तुलना आणि जितक्या किंमतीचा तुमचा सध्याचा मोबाईल असेल निदान तेवढ्या किंमतीची सायकल . हे आवडलंच Happy
सायकलचा लाईफ स्पॅन आणि त्याच कालावधीमधे घेतलेल्या मोबाईलची संख्या देखिल विचारात घ्यायला हवी असेही सुचवतो.

धन्यवाद सर्वांना....

इम्पोर्टेड सायकलींना रिसेल वॅल्यू सुद्धा दमदार असते. त्यामुळे नाही जमलं तर ५-७ हजार कमी घेऊन सायकल विकता येते. सायकलवेडे खूप आहेत. रिसेलला अजिबात त्रास होत नाही.

होय, नाना हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे तर मी कित्येकांना सल्ला दिलाय, की डायरेक्ट नविन घेण्यापेक्षा आधी सेकंडमध्ये चांगली मिळतीये का बघा. कधी कधी मस्त सायकल कमी किंमतीत मिळून जाते.

माझ्या मते किती सायकलींग करायची आहे आणि करु शकतो यावर कुठली सायकल घ्यावी हे अवलंबून आहे.

खरे तर हा देखील अगदी नियम नाही, मी पुढच्या भागात लिहीणार आहे याबद्दल.

धन्यवाद, हर्पेन, मित....

हो, मोबाईलच्या निम्म्याने जरी लोकांनी खर्च सायकलवर केला तरी भरपूर होणार आहे.

धन्यवाद रे,
जर अजून कोणाला शंका नसतील तर पुढचा भाग टाकतो