मैत्री भाग - 1

Submitted by ..सिद्धी.. on 10 April, 2018 - 09:08

संध्याकाळचे सहा वाजले होते. बसच्या उघड्या खिडकीतून थंडगार वारा वाहत होता. समिधा खिडकीतून बाहेर बघत होती. मागच्या चार वर्षात गावात झालेले बदल ठळकपणे तिला जाणवत होते.बरीच प्रगती झाली होती. पण हिरवीगार शेतं मात्र अजूनही तशीच होती. मोक्याच्या ठिकाणी दुकानांची संख्या वाढली होती.बाकी रस्ते मात्र मोकळेच होते. बर्याच वर्षांनी ती गावच्या शुद्ध हवेत मोकळा श्वास घेत होती. हळूहळू अंधार पडायला सुरूवात झाली. दहा पंधरा मिनीटांनी तिचा स्टाॅप आला आणि ती उतरली. दहा तासांच्या कंटाळवाण्या प्रवासानंतर उतरल्यावर जरा पाय मोकळे झाले.एक आळस देऊन तिने रिक्षा शोधायला सुरूवात केली. पण बराच वेळ होऊनही एकही रिक्षा दिसत नव्हती. तिथे एका दुकानात विचारल्यावर त्या दिवशी रिक्षावाल्यांचा संप होता असं तिला कळलं. आता घरी कसं जायचं याचं तिला टेन्शन आलं. घरच्यांना सरप्राईज द्याचं म्हणून तिने तिच्या येण्याबद्दल घरीसुद्धा सांगितलं नव्हतं.शेवटी तिने चालतच घरी जायचं ठरवलं. नाहीतरी दोनच किमी जायचं होतं. लगेच निघालो तर लवकर पोहोचू असं म्हणत तीने चालायला सुरूवात केली. पहिल्यांदा सुरूवातीचं काही अंतर रस्त्याच्या आजूबाजूला दुकानं होती त्यामुळे जाताना तीला तशी भीती वाटत नव्हती.पण अर्धा रस्ता संपल्यावर मात्र आजूबाजूला झाडं आणि रस्ता सोडून दुसरं काहीच नव्हतं. आता तिला आपण उगाचच एकटं चालत निघालो असं वाटायला लागलं.एकतर रात्रीची वेळ आणि त्यात परत आपण रस्त्यावर एकटेच आहोत; कोणी काही केलं तर या विचारानेच ती शहारली. तरीही मनातल्या भीतीवर मात करत तीने भराभर पावलं टाकत वेग वाढवला .एक दोन मिनीटंच झाली असतील तितक्यात कोणीतरी तीला मागून हाक मारली. ती जागेवर थांबली. एकदोन क्षण तिला काही सुचत नव्हतं. मागे बघू की नको या विवंचनेत ती अडकलेली होती. कारण रात्रीच्या वेळी एकटे असताना कोणी आवाज दिला तर मागे वळून बघायचं नाही असं तीची आज्जी नेहेमी तीला सांगायची. विचार संपेपर्यंत हाक मारणारी व्यक्तीच तिच्या बाजूला येऊन उभी राहीली. विचारात गढलेल्या समिधाच्या चेहेर्यापुढे त्याने टिचक्या वाजवल्यावर ती भानावर आली. हाक मारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचाच शाळेतला मित्र रोहन होता. आता मात्र त्याला बघून तिला खूप आनंद झाला.रोहन समिधाचा चांगला मित्र होता. शाळा संपल्यावर दोघे इतक्या वर्षांनी भेटत होते. एकमेकांची विचारपूस केली. समिधा बारावीनंतर आयआयटीत गेली होती इंजिनीयरींग करायला. रोहनही हुशार होता. त्याने शेतीशास्त्राचा अभ्यास करून घरची शेती सांभाळत होता. नवनवीन प्रयोग करायला त्याला आवडायचं.अशाच गप्पा मारता मारता समिधाचं घर जवळ आलं. रोहन थांबला आणि आता मी जातो असं सांगून निघाला. समिधाने त्याला गप्पा मारायला घरी बोलवलं.तर नंतर येतो असं सांगून तो घाईघाईत गेला. समिधाला जरा विचीत्र वाटलं . पण काम असेल म्हणून गेला असा विचार करून ती चालायला लागली. पाच मिनीटात ती घरी पोचली. तिला असं अचानक आलेलं बघून सगळ्यांना आनंद झाला. आई तर खूपच खूष होती.सगळे तिच्याशी गप्पा मारत होते. तितक्यात बाबांनी तिला स्टाॅपवरून कशी आलीस असं विचारलं.बाबा मी चालत आले ; रोहनसुद्धा बरोबर होता; मस्त गप्पा मारत आलो आम्ही असं ती म्हणाली .समिधाचं हे उत्तर ऐकून सगळ्याचे चेहेरे भीतीने पांढरेफटक झाले. आजीने पटकन जाऊन कॅलेंडर पाहिलं तर त्या दिवशी अमावस्या होती. बाबा भानावर आले आणि त्यांनी तिला सांगितलं की तीन महिन्यांपूर्वी रोहनचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे तुला काहीतरी भास झाला असेल. पण ती हे मानायलाच तयार नव्हती. सारख एकच सांगत होती की मी रोहनबरोबरच आले आहे. शेवटी बाबांनी तो विषय तिथेच थांबवला . समिधाला काही अपाय होऊ नये म्हणून आजीने तिची दृष्ट काढली. थोड्यावेळाने जेऊन सगळे झोपायला गेले.समिधाही आपल्या रूममध्ये झोपायला गेली. कितीतरी वेळ तीला विचारामुळे झोप येत नव्हती. जर रोहन जिवंतच नाहीये तर आपण कोणाशी बोललो हेच कोडं तिला सुटत नव्हतं .शेवटी प्रवासाने दमल्यामुळे तिला झोप लागली. बर्याच वेळाने तिला जाग आली. खोलीत छान गारवा पसरला होता. चादर अंगावर ओढून घेताना अचानक तिचं लक्ष खिडकीजवळच्या खुर्चीत गेलं .आता मात्र तीची भीतीने गाळण उडाली. समोर खुर्चीत रोहन निश्चलपणे बसला होता. कसला तरी विचार करत. ओरडण्यासाठी तिच्या घशातून आवाजच फुटत नव्हता. शेवटी रोहनचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो म्हणाला....
समिधा घाबरू नकोस .. मी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. निश्चिंत होऊन मी सांगतो ते ऐकून घे आणि मला मदत करायची की नाही ते ठरव...मगाशी रस्त्यावरून येताना मी जिवंत नाही हे मी तुझ्यापासून लपवलं... तु एकटी होतीस आणि घाबरली असतीस...पण माझा मृत्यू हा फक्त अपघात नव्हता... मला मुद्दाम मारलय गं...कारण...

क्रमशः
====================================
तळटीप:- भुतांबद्दलचं माझं ज्ञान कमी आहे.आतापर्यंत वाचलेल्या अनेक कथांमधलं भुतांच वर्णन हे रोहनच्या भुताचं उगमस्थान आहे... काही चुका असतील तर सांगा... मी दुरूस्त करेन....
--- आदिसिद्धी
भाग 2
https://www.maayboli.com/node/65793

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोघी मैत्रिणींनी माबोकराना घाबरवाचे ठरवलंय की काय ☺️

थोडी प्रेडिक्टेबल आहे पण छान चालली आहे कथा.
लवकर पुढचा भाग येऊ द्या.

आदिसिद्धी मस्त जमलीय ही भयकथा. खूप आवडली. आणि हो, आता जर प्रेडिक्टेबल वाटत असली, तरी तू या कथेला अचानक कलाटणीही देऊ शकतेस. या कथेत आता पुढे काय होईल असं वाटतंय. पुलेशु. Happy

छान सिद्धी ! पुलेशु !
प्रेडिक्टेबल असली तरी साधीसुधी सरळ जाणारी स्टोरी लिहीण्यातही एक वेगळी मजा असतेच ! एंजॉय...

>>दोघी मैत्रिणींनी माबोकराना घाबरवाचे ठरवलंय की काय>>> +७८६
यांचं बघून मला पण वाटायला लागलंय, भुताखेतांवर स्टोरी लिहावी Lol

साधीसुधी सरळ जाणारी स्टोरी लिहीण्यातही एक वेगळी मजा असतेच >>>>>+111
अशीच लिहीलेली कथा आहे ही.. हा एक भाग तीन दिवस लागले लिहायला....दहा मिनीटं दर दिवशी... बराच वेळ अभ्यास करून झाल्यावर ब्रेक घेतला की लिहीते....जरा बरं वाटतं काहीतरी लिहील्यावर... मग पुन्हा रिव्हीजनला फ्रेश माईंडने बसता येतं...बाकी टीव्ही बघायला मला आजिबात आवडत नाही..म्हणून काहीतरी लिहायचं नाहीतर वाचायचं...

अरे वा, छान लिहिलेय की कथा. एकंदर माबोवर भयकथांचा सिझन चालू झालाय वाटतं Lol
कथेचा चांगला फ्लो साधलाय. लिहित रहा. पुलेशु Happy

सापडला एकदाचा....
मैत्री नावा खाली सर्च मधे बराच कचरा हाताला लागला.
अर्ध्याहून अधिक कथानक वाचलं, रोहनही येईना आणि समिधाही पण मात्र कंटाळा आला
आणि मग लक्षात आल की ही तुझी शैली नाही.

उत्तम

आदिसिद्धी
अजिबात नाही. नीट वाच. उलट कौतुकच केलं आहे.

मैत्री नावाने एक कथानक हाती लागलं जे खुप बोअर झालं.
किती वेळ झाला तरी भाग दोन मधली पात्र येइनात.
मग लक्षात आलं की ही आदिसिद्धी नसावी . तेव्हा बघितलं तर भलत्याच लेखकाच भलतच कथानक वाचत होतो.

तुझी शैली चांगली आहे.

अच्छा. साॅरी माझं इंटरप्रीटेशन चुकलं. आणि धन्यवाद. तिसरा भाग संध्याकाळी टाकेन.