शिकवणी

Submitted by ..सिद्धी.. on 26 March, 2018 - 10:27

मार्च महिन्यातली दुपार. आदित्य पुस्तक वाचत सोफ्यावर आरामात लोळत पडला होता. पुस्तक हा आदित्यचा वीक पाॅईंट. जेव्हा तो वाचायला शिकला तेव्हापासून पुस्तकांवर त्याच प्रेम जडलं. वाचताना तो फक्त पुस्तकाचा असायचा. आजूबाजूच्या जगाच त्याला भानच रहात नसे. आता तर काय त्याची बारावीची परीक्षाही संपली होती . त्यामुळे पुढचे तीन महिने पुस्तकंच त्याची दुनिया होती. आताही तो त्याच विश्वात मशगूल होता. घरात एकीकडे आई जेवण बनवत होती. सुट्टीमुळे सगळंच निवांत सुरू होतं.
तितक्यात शांतामावशी घरचं काम करायला आल्या. बर्याच दिवसांनी आज त्यांचा मुलगा मिहीर सुद्धा त्यांच्याबरोबर आला होता. पण आज त्याच काहीतरी बिनसलं होतं. त्याचा चेहेरा पडला होता. शांतामावशीही चिडलेल्या दिसत होत्या पण चेहेर्यावर दाखवत नव्हत्या. नेहमी घरभर फिरणारा मिहीरही आज शांत एका कोपर्यात उभा होता. आदित्यच्या नजरेतून हे सुटलं नाही.आईलाही ते जाणवलं . झटपट काम संपवून शांतामावशी निघत होत्या. तितक्यात आदित्यच्या आईने त्यांना थांबवल.त्यांना चहा दिला आणि बसवून काय झालं ते विचारलं. त्या म्हणाल्या; आज मिहीरचा चाचणी परीक्षेचा रिझल्ट लागला होता. कधी नव्हे तो मिहीर चक्क दोन विषयात नापास झाला होता. त्यामुळे शांतामावशींना टेन्शन आल होत. म्हणून त्या मिहीरलाही ओरडल्या  होत्या. बरं क्लास लावायचं म्हटलं तरी त्याची फी भरणं त्यांना परवडणारं नव्हत. कारण अख्खं घर त्यांच्याच तुटपुंज्या पगारावर चालायचं. मिहीरचे वडील तो लहान असताना कारखान्यात एका अपघातात वारले होते. त्यामुळे घरातल्या तीनही माणसांची जबाबदारी मावशींवरच होती. त्यात आता म्हातारपणामुळे मिहीरची आजी बर्याचदा आजारी पडत असे. खर तर मिहीरलाही याची जाणीव होती. त्यामुळे इतकी वर्ष घरी अभ्यास करूनही तो चांगले मार्क मिळवायचा. पण आता अभ्यास अवघड असल्याने त्याची ताकद कमी पडत होती.
एवढ सगळ सांगून त्या पुढच्या कामांसाठी निघून गेल्या.
इथे हे सगळं ऐकून आदित्य विचारात पडला.अगदी लहान असल्यापासून त्यांनी आदित्यला सांभाळल होतं.अंगाखांद्यावर खेळवल होतं .त्यामुळे नेहमी त्याला त्या सख्ख्या मावशीसारख्या वाटायच्या.घरची वाईट परिस्थिती असतानाही त्या नेहमी हसर्या चेहेर्याने वावरायच्या.हसर्या चेहेर्यामागे अनेक दुःख लपलेली असतात.हे तो मावशींना बघून अनुभवत होता.त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी कराव असं त्याला नेहमीच वाटायचं.पण मावशींना पैसे देवून त्याला त्यांचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता.शेवटी खूप वेळ विचार करून त्याने एक निर्णय घेतला.
   रात्री बाबा घरी आल्यावर सगळे एकत्र जेवायला बसले.अचानक आदित्यने सकाळचा मावशींचा विषय काढला.आई विचारात पडली.त्याने अचानक बाबांना विचारलं; बाबा मी मिहीरचा रोज आपल्या घरी अभ्यास घेतला तर चालेल का?.आता आश्चर्यचकीत व्हायची वेळ बाबांची होती.पण आपला लेक असा विचार करतोय हे पाहून त्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी परवानगी देवून टाकली.आज आदित्य खूप आनंदात होता कारण मावशींसाठी त्याला त्याच्या आवडत्या कामामधून मदत करता येणार होती.त्या रात्री एक्साईटमेंटमुळे आदित्यला झोपच लागत नव्हती.कधी उद्याची सकाळ उजाडते असं झाल होतं.
शेवटी एकदाची सकाळ झली.नेहमी आईच्या दहा हाकांनंतर उठणारा आदित्य आज लवकर उठला.आंघोळ करून मावशींचीवाट बघत बसला.तासाभराने मावशी आल्या.आज त्या शांत वाटत होत्या.झटपट हात चालवून त्यानी भराभर कामं उरकली.शेवटी निघताना आदित्यने त्यांना थांबवल आणि मिहीरच्या शिकवणीसाठी विचारल.त्यांनी पटकन प्रश्न विचारला ;फी किती घेणार बाळा?पण जेव्हा त्याने सांगितल की मी मिहीरला विनामूल्य शिकवणार आहे तेव्हा क्षणभर त्यांना कानांवर विश्वास बसत नव्हता.त्या निःशब्द झाल्या होत्या. आदित्यच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून त्यांनी होकार दिला.जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
दुसर्या दिवशीपासून मिहीर रोज आदित्यकडे येऊ लागला.आदित्यही त्याला देहभान हरपून शिकवत असे.मिहीरची आकलनशक्ती चांगली आहे हे आठच दिवसात त्याच्या लक्षात आलं.मिहीरलाही आदित्य मोठ्या भावासारखा वाटू लागला.
एके दिवशी मिहीर वहीत काहीतरी लिहीत होता.तो इतका मग्न झाला होता की आदित्य केव्हा त्याच्या मागे येऊन थांबला हे त्याला कळलच नाही.आदित्यने पूर्ण पान वाचलं.मिहीर उत्तम कविता लिहू शकतो हे त्याच्या तेव्हा लक्षात आलं. नंतर त्याला अभ्यासाला बसवून त्याने पटकन त्या वहीतल्या काही निवडक कविता उतरवून घेतल्याआणि पुन्हा वही जागेवर आणून ठेवली. हळूहळू आठवडा संपला .त्या दिवशी रविवार होता.
आज मिहीरचा वाढदिवस असल्यामुळे तो जरा लवकर आला.शिकवणी संपत आली तसा आदित्य उठला आणि पटकन टेबलवरचा पेपर घेऊन आला.आणि त्यातलं एक विशिष्ट पान त्याला वाचायला लावलं.वाचून झाल्यावर मिहीरचा आनंद गगनात मावत नव्हता. बाल लेखकांच्या सदरात चक्क त्याच्या तीन कविता छापून आल्या होत्या;आणि वाचकांनाही त्या खूप आवडल्या होत्या.हि किमया दुसर्या तिसर्या कोणाची नसून आदित्यची आहे हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही.धावतच तो आदित्यजवळ गेला आणि त्याला घट्ट मिठी मारली. आज पहिल्यांदा कोणीतरी त्याला असं सरप्राईज दिलं होतं.यातूनच त्याचं आणि आदित्यचं नातं आधिक घट्ट झालं.
मिहीरला शिकवून आदित्यलाही आनंद मिळाला.नेहमी रटाळ वाटणारी सुट्टी पहिल्यांदा सुखद वाटत होती.
पंधरा दिवसांनी मिहीरची परीक्षा संपली.पेपर सोपे गेल्याने तोही आनंदात होता.शिकवणी संपल्यामुळे आदित्यही पुन्हा त्याच्या पुस्तकांच्य दुनियेत रममाण झाला होता.
महिन्याभराने एके दिवशी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा वाजला.इतक्या सकाळी कोण आलं असेल असा विचार करत आदित्यच्या आईने दरवाजा उघडला.समोर शांतामावशी आनंदाने हातात पेढ्याचा बाॅक्स घेऊन उभ्या होत्या.आज त्यांच्या चेहेर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.मिहीरचा वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता आणि तो नववीच्या त्याच्या वर्गात तिसरा आला होता.केवळ वीस दिवसात ही कमाल झाली होती.शाळेतून सगळ्यात आधी त्या आदित्यच्या घरी आल्या.त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा भरवला.त्याच्या पाठीवरून हात फिरवला.त्यांचा तो स्पर्शच सारं काही बोलून गेला.
आपली मेहनत सफल झाली आणि सुट्टी सत्कारणी लागली म्हणून आदित्यही खूश होता.
------------------------------------------------------------
साधारण वर्षभराने मिहीर आदित्यच्या घरी आला.नेहमी खरं ते भेटायचे .पण आज तो शांताकाकूंबरोबर आला होता.त्याची दहावीची परीक्षा आठ दिवसापूर्वीच संपली होती.त्यामुळे आता तो निवांत होता.म्हणून त्याने एक निर्णय घेतला होता.त्याने त्याच्या वस्तीतल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवायच ठरवल होतं.हा आदित्यसाठी सुखद धक्का होता.आदित्यने लावलेल्या एका ज्योतीमुळे आज अनेक घरे प्रकाशाने न्हाऊन निघणार होती.
====================================
तळटीप:-या कथेतला बराचसा भाग खरा आहे.काही काल्पनीक गोष्टी सोडल्या तर हा माझा आणि माझ्या बेस्ट फ्रेंडचा खरा अनुभव मी इथे शब्दबद्ध केलाय.ही गोष्ट मागच्या वर्षीची आहे.याचा मी सुद्धा एक भाग होते.खूप कमी वेळेत मायलबोली मला आपलीशी वाटू लागली म्हणून कथेच्या स्वरूपात इथे मांडला.लेखनात काही चुका असतील तर सांगा दुरूस्त करेन मी.

---आदिसिद्धी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
आदिसिद्धी, ते प्रतिसादातलं 'सर' काढून टाका. Happy

छान, वाचताना एका टिपिकल आदर्शवादी कथेसारखे वाटत होते. पण जर तुझ्याशी संबंधित सत्यघटना असेल तर ते तपशील जाणून घ्यायला आवडतील Happy

कथेतली नावं सगळी खरी आहेत.मागच्या वर्षी मी अकरावीत असतानाची ही घटना आहे.माझा बेस्ट फ्रेंड आदित्य माझ्यापेक्षा एक वर्ष मोठा आहे.त्याची बारावी मागच्यावर्षी संपली.तेव्हा सेम असंच झाल होत.मिहीरला शिकवायची कल्पना आमच्या दोघांची होती.पण माझा बारावीचा क्लास सुरू झाल्याने मला तितका वेळ देता यायचा नाही.मग संध्याकाळी तासभर त्याला मी शिकवायचे.मलाही माझ आवडत काम करायला मिळायच आणि अभ्यासातनं ब्रेक म्हणून.मिहीर आता दहावीत आहे.उगाच माझी मोठेपणा नको म्हणून मी माझा पार्ट यातून वगळला.बाकी वाढदिवसाचा किस्सा फक्त कथा जरा वाढवायला होता.उरलेली संपूर्ण स्टोरी खरी आहे.

छान आहे अनुभव .. खरा असल्यामुळे भारी वाटलं .. अर्थातच तू उत्तम लिहिलंस हे वेगळं सांगायला नकोच !!

छान आहे अनुभव .. खरा असल्यामुळे भारी वाटलं .. अर्थातच तू उत्तम लिहिलंस हे वेगळं सांगायला नकोच !! >>>>> + 9999 Happy

______/\______

मिहिरने वस्तीतल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवायच ठरवल हे सुद्ध जर खरे असेल तर आदित्यने आणी तुम्ही खूप चांगले काम केले आहे. अनुभव फार चांगल्या रीतीने मांडला आहे.

हो तो सुद्धा सात आठ मुलांना शिकवतोय.आमच्याच सोसायटीच्या टेरेसवर किंवा गार्डनमध्ये बसून शिकवतो.

मिहीरला शिकवायची कल्पना आमच्या दोघांची होती.पण माझा बारावीचा क्लास सुरू झाल्याने मला तितका वेळ देता यायचा नाही.मग संध्याकाळी तासभर त्याला मी शिकवायचे.मलाही माझ आवडत काम करायला मिळायच आणि अभ्यासातनं ब्रेक म्हणून.>>>>>>>>> आदिसिद्धी, तुस्सी ग्रेट हो!! खरंच एक उत्कृष्ट काम केलं आहेस तू. आदर्श बनलीयेस तू माझी...

hats off to you!

उगाच माझी मोठेपणा नको म्हणून मी माझा पार्ट यातून वगळला>>>>>>>> अगं यात मोठेपणा कसला.! उलट तुझा पार्ट घातला असतास तरीही आवडलंच असतं आम्हाला! तुझंही या स्तुत्य उपक्रमातलं योगदान मोलाचं आहे ना !

तुमच्या या कार्यातून एक गोष्ट जाणवलीय पण, सामाजिक कार्य हे पूर्णपणे आतून येत असतं. त्याला कोणाच्या सांगण्याची, सुचवण्याची गरज नसते. ज्यांना खरोखर समाजकार्याबाबत लळा असतो, त्यांना उत्स्फूर्तपणे हे कार्य सुचत जातं. जसं तुला आणि तुझ्या फ्रेन्डला सुचलं. आणि त्यासाठी मुळात धरून-पकडून वेळ काढावा लागत नाही, तो आपसूकच निघतो ; जसा तुझ्या फ्रेन्डने काढला नि तू तर बारावीच्या अभ्यासातून काढलास.... आणि ज्यांना खरोखर हे कार्य मनापासून करायचे असते, त्यांना मुळी हे विरंगुळ्याप्रमाणेच वाटते, जसं तुला वाटलं.

खरोखर मी तुझी फॅन झालीय..... Happy

भारीच काम केलंत पण तुम्ही. पुढच्यावेळी असे किस्से टाकताना जर तुझा सहभाग असेल तर आवर्जून सांगत जा... Happy

छानच!
पण मार्च महिन्यात तिमाही परीक्षेचा निकाल? तपशीलात काही तरी गडबड झाली आहे.
तुझं खूप खूप कौतुक!

परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाली होती शाळेच्या काही कार्यक्रमांमुळे.सो मार्च च्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट लागला.

आमच्या शाळेचही रौप्यमोहोत्सवी वर्ष असताना असच झालं होतं.तिमाही मार्चच्या पहिल्या आठवड्यात आणि फायनल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात .

Pages