सायकलविषयी सर्व काही १० (सायकल घेतानाची चेकलीस्ट आणि पैसे वाचवायच्या टिप्स)

Submitted by आशुचँप on 7 January, 2018 - 11:29

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
भाग ५
https://www.maayboli.com/node/64622
(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)
भाग ६
https://www.maayboli.com/node/64648
(सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?)
भाग ७
https://www.maayboli.com/node/64685
१० हजारच्या आतल्या सायकली
भाग ८
https://www.maayboli.com/node/64802
२० हजारच्या आतल्या सायकली
https://www.maayboli.com/node/64879
भाग ९
३० हजारच्या आतल्या सायकली
=====================================================================

यातली बहुतांश माहीती मी आधीच्या पार्ट मध्ये दिली आहे पण ती इकडे तिकडे विखुरली गेली आहे. काही सदस्यांनी मागणी केल्यामुळे ती एक कॅप्सुल फॉरमॅटमध्ये एकत्र देत आहे.

या लिस्टचा लाभ होईल अशी आशा करतो.

चेकलीस्ट

सायकल विकत घेण्याचे ठरले आहे पण कुठली ते अद्याप नाही

१. पहिले प्रथम तुमचा वापर काय असणारे? (व्यायाम, ऑफीस जाणे-येणे, विकांताला रपेट, endurance rides like BRMs इ.इ.)
२. एकटेच वापरणार का घरातील अन्य सदस्य देखील?
३. तुमचा वयोगट काय आहे? वजन किती आहे?
४. जिथे राहता तिथल्या रस्त्यांची अवस्था, चढ-उतार किती आहेत?
५. रोज साधारणपणे किती किमी चालवणे होईल ?
६. रोज नसेल होणार तर आठवड्यात अंदाजे किती होईल?
७. पुढे मागे मोठ्या राईड्स करणे डोक्यात आहे का?
८. ब्रँड कॉन्शस आहात का?
९. जिथे सायकल ठेवणार तिथली सिक्युरिटी कितपत आहे?
१०. सायकलीची नियमित देखभाल करण्याची शक्यता किती आहे?

या प्रश्नांची उत्तरे लिहून काढा आणि त्यानुसार तुमचे बजेट निश्चित करा, त्याची अप्पर कॅप निश्चित करा, म्हणजे १० हजार बजेट असेल आणि १२ पर्यंत चांगली मिळत असेल तर घेईन, पण १२ च्या पुढे नाही म्हणजे नाही अशा प्रकारे.
वरच्या चाळणीतून तुमचा सर्च बराच मर्यादित झाला अशी आशा आहे. तसेच एमटीबी घ्यायची का हायब्रीड का रोड बाईक हे देखील स्पष्ट झाले असेल. बजेट ठरले असेल, सायकलचा प्रकार ठरला असेल तर तुमचे बरेच ऑप्शन बाद होतात त्यामुळे ही घेऊ का ती घेऊ हा गोंधळ बराच कमी होतो.

आता सायकल घेण्यापूर्वी काय कराल?

१. इंटरनेटवर या बजेट रेंजमध्ये कोण कोणत्या सायकली उपलब्ध आहेत याची माहीती घ्या.
२. त्यांचे स्पेसिफिकेशन, किंमती, फिचर्स, मुख्यत सायकलचे वजन तपासून त्यांची एक लिस्ट बनवा.
३. प्रत्येक सायकलमध्ये तुम्हाला पाहिजे ते फिचर असेलच याची शक्यता नाही, त्यामुळे त्यातल्या त्यात हव्या असलेल्या गोष्टी कशात आहेत आणि नको असलेल्या जास्त गोष्टी कशात आहेत त्याप्रमाणे त्यांचा क्रमांक ठरवा.
४. सायकलिंच्या काही मॉडल्स मधे गिअर आणि ब्रेक्स साठी असणारे केबल्स इंटरनल किंवा बाहेरुन असतात, याची माहिती घ्या. इंटर्नल केबलचे लाईफ चांगले असते पण त्या महागही असतात.
५. जास्त गियर्सची सायकल नेहमीच चांगली असा भ्रम करून घेऊन तुम्हाला गरज नसेल तर उगाचच जास्त गियर्ससाठी महागडी सायकल घेण्याच्या फंदात पडू नका. त्यापेक्षा कमी गियर्सची पण हलकी आणि सुटसुटीत सायकल घ्या.
६. आता त्या लिस्टप्रमाणे त्या सायकली आपल्या शहरात, भागात उपलब्ध आहेत का याची चाचपणी करा,
७. डिलर कुठे आहे, कोण आहे, आफ्टर सेल्स देण्याबाबत रिप्युटेशन कसे आहे याची माहीती देखील अनेकदा आंतरजालावर मिळून जाते. थोडा गुगल सर्च करावा लागेल.
८. आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सायकल याची देही तपासून पहा. काही डिलर्स माफक दरात एक दोन दिवस सायकल चालवायला देतात आणि तीच सायकल घेतली तर तो चार्ज माफ सुद्धा करतात. हा एक चांगला पर्याय आहे. नसेल तर मित्रांची सायकल चालवून पहा.
९. एखादे विशिष्ट मॉडेल जे तुम्हाला आंतरजालावर आवडले असेल आणि त्या डिलरकडे उपलब्ध नसेल तर कधी बघायला मिळेल याची विचारणा करा, आणि नसेलच होणार तर दुसरा डिलर शोधा. उगाच आलोच आहोत तर कशाला उगाच एवढी खटपट, जी आहेत त्यातली एखादी बघू असे करू नका.
१०. असेल तिथे उपलब्ध तर त्यावर एक छोटी राईड घ्या. आणि राईड घेण्यापूर्वी डिलरला त्याची सीट, हँडल आपल्या उंचीनुसार अॅडजस्ट करायला लावा. चांगला डिलर असेल तर तो हे न सांगताच करतो, पण नसेल तर आवर्जून करून घ्या. अनेकदा चांगली सायकल देखील योग्य प्रकारे अॅडजस्ट केली नसेल तर कंफर्टेबल न वाटून घेतली जात नाही.
११. डिलर त्यांचा सेल वाढवण्यासाठी त्यांच्याकडून काही डिस्काऊंट देऊ करतो, त्याची चाचपणी करा, ग्रुप डिस्काऊंट मिळाला तर किती मिळेल, फ्री अॅक्सेसरीज काय येतील हे पहा.
१२. पहिलीच सायकल घेणार असाल तर शक्यतो एकदम मोठ्या ब्रँडेड सायकल शोरुम मध्ये जाण्याची घाई करू नका. तिथल्या लाखांच्या सायकली बघून दडपून जायला होते आणि आपल्या प्राथमिक शंका विचारताना आपण काचकूच करतो. खेरीज तिथले सेल्समन देखील शिष्टपणा करतात ते वेगळे.

आता सायकल जवळपास ठरलीच आहे तर प्रत्यक्ष घेण्यापूर्वी आणि धनादेश त्यांच्या हाती सोपावण्यापूर्वीे

१. सायकल बारकाईने तपासून पाहणे, कुठे काही क्रॅक, तुटका फुटका पार्ट नाही ना.
२. सायकली चढव उतरव प्रकारात कधी कधी त्याला बारके स्क्रॅच येऊ शकतो, तो अगदीच दुर्लक्ष करता येण्यासारखा असेल तर त्यावर अडून बसू नये. तो तुम्ही सायकल घेतल्या घेतल्या पण येऊ शकतो. त्यात मोठा बाऊ करण्यासारखे काही नाही.
३. सायकलची चेन नवीकोरी आहे का नाही हे त्यावरील चकाकीने लगेच कळते, ते तपासणे.
४. टायर्स सगळ्यात मेन. एकदा बारकाईने नजर टाकून त्याची तपासणी करणे, कुठे घासलेले वगैरे असतील तर ते पाहणे. बऱ्याच वेळेस सायकल विक्रेता त्याच्या फ़ायद्यासाठी कंपनीकडून आलेला टायर बदलून साधा टायर टाकण्याची शक्यता असते, तर अंतरजालावर कंपनी कडून मिळणाऱ्या सर्व वस्तुची तपासणी करुन घ्या
५. डिलरकडून सायकल पूर्ण फिट करून घेणे, ते देतातच करून पण ते देतील या भरोशावर न राहता आपल्या देखरेखीखाली करून घेणे.
६. फिट झाल्यावर आपल्या उंचीच्या बेतात सीट आणि हँडल अॅडजस्ट करून घेणे आणि त्यानंतर एक किमान अर्धा किमी राईड मारणे.
७. या राईड दरम्यान ब्रेक्स व्यवस्थीत लागतात ना, हँडल नीट वळतयं ना, आपले गुढगे कुठे आपटत नाहीत ना हे तपासणे.
८. याखेरीज पाय ताणून पॅडल मारावे लागते का, हँडलपर्यंत पोचायला हात ताणावे लागतात का, बॉडी पोश्चर व्यवस्थीत राहते का हे सगळे बघावे आणि त्यानुसार डिलरला सायकल अॅडजस्ट करायला लावणे.
९. सायकल घेताना सायकल नुसार बॉडी एडजस्ट करणे नाही तर बॉडी नुसार सायकल अॅडस्ट व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवा. सध्या बाजारात फिक्स आणि adjustable हँडल असतात, याची महिती घ्या
१०. फ्री सर्व्हिसींग किती आणि कधी देणार हे दोनदा विचारून खात्री करून घ्या, तसे त्या बिलावर नोंदवून ठेवा. फ्री सर्विसमध्ये काय काय समाविष्ट असते हे देखील विचारून घ्या.
11. सायकलच्या वॉरंटी मधे कोणकोणत्या गोष्टी येतात याची डीलरकडून चौकशी करा. मुख्य म्हणजे क्रँक, हब, व्हिल हब, अॅक्सेल या गोष्टी तर फॉल्टी असतील तर तुम्हाला बदलून मिळाल्या पाहिजेत, कारण या गोष्टींचे लाईफ चांगले असते आणि काही महिन्यात त्याला अॅक्सिडेंट किंवा आदळाआपट न करता प्रॉब्लेम आला असेल तर फॉल्टी पीस आलाय हे निश्चित.
12. आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या सायकलिचे सर्विसिंग बाजारात 400 ते 2500 पर्यन्त असते. तुम्ही घेत असलेल्या मॉडल सर्विसिंगबद्दल विक्रेत्याशी विचारना करुन ठेवा. नाहीतर माझ्या दुचाकीला यापेक्षा कमी खर्च येतो असे म्हणत भांडावे लागेल.
13. तुमच्या सायकल बजेटमधे इतरही काही अॅक्सेसरीजची तरतूद करून ठेवा. काही गोष्टी ऐच्छिक असतात पण काही मस्ट गोष्टी जशा की हेल्मेट, पंक्चर किट, पंप, चांगल्या लाइट्स (पुढे आणि मागे ब्लिंकर्स), रिफ्लेक्टिव जॅकेट अथवा स्ट्रिप्स, एक्स्ट्रा ट्यूब, जेल सीट कव्हर, पावसाळ्यात मडगार्डस इ. इ. (या बद्दल मी पुढच्या भागात सविस्तर लिहीणार आहे)

पैसे कसे वाचवाल

(हा पार्ट खरे तर मागच्या भागात टाकला होता, पण तो इथे जास्त सयुक्तिक ठरेल असे वाटल्याने इथे हलवत आहे. मागच्या भागात ज्यांनी वाचला असेल त्यांच्यासाठी)

प्रत्येकालाच कुठलीही वस्तु घेताना पैसे वाचले तर हवेच असतात आणि सायकल घेताना आधीच त्यांच्या जीवावर आले असते इतके खर्च करायला, त्यामुळे थोड्या उपयोगी पडतील अशा टिप्स. दोन चार प्रकारे आपण सायकलची किंमत कमी करून घेऊ शकतो.

१. डिस्काऊंट - डिलर्सना घाऊक रेटने सायकली मिळालेल्या असतात त्यामुळे आपणही विनासंकोच त्यांनी सांगितलेल्या किंमतीवर घासाघिस करायची. अर्थात डिलर आणि तुम्ही यांच्यापैकी जास्त कोण खमक्या आहे त्यावर शेवटी तोडपाणी होणार पण आपण कसे विचारू, चांगले वाटेल का, पॉश दुकान, चकचकीत सायकली बघून दडपणात यायचे नाही. फारतर काय नाही म्हणेल, पण विचारायला घाबरायचे नाही.

जर एकट्याला जाऊन डिस्काऊंट मिळतच नसेल किंवा घसघशीत नसेल वाटत तर अजून एक युक्ती म्हणजे आपल्यासारखे दोन-चार जण जमवायचे. फेसबुकवर अनेक सायकल ग्रुप असतात, त्याला जॉईन व्हायचे आणि तिथे विचारणा करायची, कुणी ना कुणी आपल्यासारखे असतात आणि अशा सगळ्यांनी मिळून ग्रुप डिस्काऊंट घ्यायचा.

सायकल मार्केट भारतात पसरत चालले असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला क्रमांक खूपच खालचा आहे, त्यामुळे ग्रुपने सायकली घेतल्या जात असतील तर डिस्काऊंट चांगला देण्याकडे ब्रँडचा कल असतो.

अजून एक डिस्काऊंट मिळण्याचा प्रकार म्हणजे नवीच पण जुन्या एडीशनची सायकल घेणे. म्हणजे आत्ता २०१८ सुरु आहे तर या कंपन्या दर वर्षी काहीतरी किरकोळ अपग्रेड करून नव्या स्वरुपात सायकली मार्केटमध्ये आणतात. आपण मग डिलरला विचारून त्याच्याकडे २०१६ किंवा २०१५ एडिशनच्या सायकलीबद्दल विचारणा करणे. अनेकदा कंपनीने ते मॉडेल बंद केले असते, पण त्याने फरक पडत नाही कारण मोटरसायकल सारखा हा पार्ट मिळत नाही वगैरे सहसा होत नाही. आणि या जुन्या सायकली चांगल्या डिस्काऊंट मिळवून देऊन जातात.

२. ऑनलाईन - याबद्दल मी मागच्या भागात लिहीले आहे, अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर या सायकली बऱ्याच डिस्कांउटमध्ये मिळतात पण त्या आल्यानंतर त्याची जोडणी किंमत आणि इथे जोडणी केलेली सायकल याची तुलना करा आणि जी स्वस्तात असेल ती घ्या.

३. सेकंड हँड - हा एक सगळ्यात बेस्ट प्रकार आहे स्वस्त आणि मस्त सायकली मिळवण्याचा. आपल्याकडे अनेक हौशी कलाकार असतात जे महागातल्या सायकली घेतात, स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरवतात आणि वर्षा दोन वर्षात विकून टाकतात. अशा लोकांना शोधण्याचे दोन मार्ग. एक वरती म्हणले तसे सायकल ग्रुप्स. पण त्यावर अनेकदा हाय-एंड सायकली असतात ज्यांच्या सेकंड हँड किंमतीसुद्धा आपल्या बजेटच्या तिप्पटैौ-चौपट असतात. पण तिथे एक नजर टाकत राहणे आणि दुसरे ओएलएक्स तत्सम. ओळखीचा डिलर, सायकलवाला मित्र असेल तर त्याच्याकडेही विचारणा करणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय अभ्यासपूर्ण व उत्तम माहिती देणारी लेखमाला सुरू आहे!

मी गेले काही दिवस एक मोंट्रा ब्ल्युज १.१ वापरून बघतोय. टारगेट फायरफॉक्सच्या तुलनेत मस्तच वाटते. चांगल्या रोडवर तरंगल्यासारखी जाते. व स्पीडही २५ पर्यंत मिळतो.

धन्यवाद मार्गी,

होय मॉन्ट्रा ब्लू मस्त सायकल आहे. अनेकांकडून त्याचा चांगला रिव्ह्यू ऐकलाय

१. सायकल बारकाईने तपासून पाहणे, कुठे काही क्रॅक, तुटका फुटका पार्ट नाही ना.>>
हो हे फार महत्वाच आहे, मी सायकल ताब्यात आल्यावर राइड घेउन तपासली, आणि एक कळालं की चढावर पेडलवर थोडा जोर लावला की चेन समोरच्या क्रँकवरुन स्लिप होते आहे, हे त्या कारागिराला सांगितले तर तो प्रथम ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याला म्हटलं तु चालउन बघ, नंतर त्याने चालवल्यावर त्याला तो अनुभव आला नाही, तो म्ह्टला की तु गियर निट टाकत नहियेस, त्याला सांगितलं की गियर चा आणी ह्याचा काहिच संबंध नाहिये मी गियर न बदलताही चेन स्लिप होते आहे, मग मालकाला (सरदार सायकल, फड्के हौद) दाखवल्यावर तो म्हणाला क्रँक खराब असेल बदलुन द्या. क्रँक बदलुन घेतल्यावर प्रोब्लेम सॉल्व्ह झाला. आधिच्या क्रँक चे गियर व्यवस्थित कट केलेले नव्हते (गियरचे दातांमधलं स्पेसिंग चुकलं होतं, ऑफसेंटर होतं ते) . बहुतेक इंडीयन मेड सायकली घेताना काळजी घ्यावी, आपले क्वालिटी कंट्रोल यथा तथाच असते.
सो सगळे गियर टाकुन बघा, ब्रेक्स व्यवस्थित लागताहेत का, चाक आउट नहिये ना इ. इ. हे सगळं बघुन घ्यावं, एकदा तुमचे पैसे विक्रेत्याच्या खिशात गेले की तो व्यवस्थित वागेलच/लक्ष देइलच हे सांगता येत नाही.(अनुभव)

उत्तम लेखमाला! पुढेमागे माझ्या मुलीसाठी घेईन तेव्हा पुन्हा वाचून मगच सायकल घेणार!

वजन किती आहे?
वजन किती आहे यामुळे काय फरक पडतो

फार नाही पण पडतो आपले वजन किती आहे त्याने फरक. प्रत्येक सायकलची आणि टायरची किती वजन सहन करण्याची क्षमता आहे हे त्यावर नमूद केलेले असते. अगदीच ओव्हरवेट माणसाने नाजूक सायकल (नाजूक म्हणजे सडपातळ नव्हे, आणि भक्कम म्हणजे जाड नव्हे) चालवली तर स्पोक्सची वाट लागेल पहिल्यांदा.

लेखमाला वाचून खूप फायदा झाला, मुलाला MTB प्रकारची सायकल हवी होती, यातले वाचून समजावल्यावर त्याने स्वतः मॉंट्रा डाउनटाउन पसंत केली. ह्यात तीचा रिव्हयू आहे म्हणून हो म्हटले. परीक्षा संपल्यावर आणायचा विचार आहे. चालवून पाहिल्यावर जमेल तसा प्रतिसाद देतो. डीलर काही डिस्काउंट द्यायला तयार नाही, त्याला सर्व्हिसिंग आणि इतर काही गोष्टी सांगितल्या सायकलच्या किमतीत द्यायला, बघू तयार होतो का.

मुलगा किती वर्षाचा आहे

डाऊनटाऊन तशी जड आहे, बजेट थोडे वाढवणे शक्य असेल तर मी रेकमेंड करेन की मॉन्ट्राचीच ट्रान्स प्रो ही सायकल घ्या. डाऊनटाऊन पेक्षा हलकी आहे, जास्त चांगले कंपोनन्ट आहेत.

पहिली सर्विसिंग फुकट आणि ३ अॅक्सेसरीज असेही देतातच डिलर. त्यामुळे त्याच तो देत असेल तर त्याला दुसरीकडून घेऊ असे सांगा.

तुम्हाला सायकलच्या किंमतीत पहिली फ्री सर्विसिंग, एक बॉटल होल्डर (ते देतात ते अगदी कचकड्याचे असते, पण पर्याय नाही), एक घंटी, एक स्टॅँड हे यायलाच पाहिजे. त्याव्यतिरिक्त काही खेचता आले तर पहा प्रयत्न करून.

इथे ठाण्यामध्ये एकच डीलर सापडला, तो वर लिहिलेल्या गोष्टीच देत आहे आणि लॉक. मुलाला डाउनटाउन पसंत आहे, त्याने एक साईटवर वाचले की ट्रान्स प्रो वजनदार आहे.

नाही मी दोन्ही सायकली प्रत्यक्ष चालवून पहिल्या आहेत.नुसती ट्रान्स आहे तीला फ्रंट संपशेंन आहे त्यामुळे ती जड आहे.
मुलाला दोन्ही सायकली चालवून मग निर्णय घ्यायला सांगा

माझ्या मित्राला आलेला अनुभव त्याच्याच शब्दात

*सायकल प्रेमी एक विनंती*
काल मित्राला *Montra Downtown* सायकल घ्यायला गेलो होतो
भले भले brand ही आजकल quality maintain करत नाहियेत है निदर्शनास आले
माझ्या समोरच पहिला Box उघडला पण त्यामधे पुढील रिंग चे 2 spoke निघाले होते आणि
मागील Tyre ही puncture होते
त्यामुळे मग नविन दूसरा box उघडायला लावला तर यामधे सायकल च्या disk break ची disk वाकडी झाली होती जि सतत घासत होती आणि handle फिट करताना लक्षात आले की handle बार चे thread खराब आहेत
Montra सारख्या परदेशी brand ने एवढी खराब quality द्यावी
शेवटी आम्ही सायकल न घेताच परत आलो

सांगायचा उद्देश एवढाच की सायकल प्रेमीची संख्या वाढलेली बघून
नवाजलेले Brand देखील मागणी तेवढा पुरवठा म्हणत quality कडें साफ दुर्लक्ष करत आहेत

आपण खुप पैसे देऊन सायकल घेतो तर चांगला Brand आहे म्हणून डोळे झाकुन सायकल घेऊ नका

जर box piece खोलताना तो फिट करताना आम्ही समोर नसलो असतो तर आमची चांगलीच फसवणूक झाली असती
Store वाला दोन्ही सायकल चे part exchange करून कशी बशी assemble करून देत होता

नविन सायकल घेताना box piece च घ्या
आणि आपल्या समोर feeting करून घ्या प्रॉपर चेक करा

माबोकरांपैकी कोणी भारतात इलेक्ट्रिक सायकल घेतली आहे का? कोणती घेतली आहे आणि अनुभव कसा आहे हे वाचायला आवडेल.

माझ्या वडिलांनी घेतली आहे. हिरो कंपनीची. त्यांचा अनुभव अजून तरी उत्तम आहे. ३-४ महिने झाले आहेत घेउन. त्यापुर्वी ते होन्डा अ‍ॅक्टिवा चालवत. दृष्टी अधू होत असल्याने त्यांना आता अ‍ॅक्टिवा वा इतर स्कूटर चालवणे कठिण जाते. इ-सायकलने कमी वेगात प्रवास करता येतो तसेच हवे तेव्हा सायकल चालवण्याचे फायदेही मिळतात.

https://store.blive.co.in/ ही माझ्या वर्गमित्राची कंपनी आहे. तुम्ही यावरच्या सायकली बघू शकता.

मी अलीकडेच डॉ निरुपमा भावे यांचा विडिओ बघून एक साधी बेसिक सायकल घेतली आहे आणि चालवण्याचा सराव करते आहे. आपल्याकडे असते तशी लेडीज सायकल आहे. सहा गियर आहेत. एकदम हलकी आहे. मला मजा येते चालवायला. जवळपास 30 वर्षांनी सायकल हातात घेतली आहे त्यामुळे सरावाची खूप गरज आहे. किंमत साधारणपणे 7500 रुपये.

मी अलीकडेच डॉ निरुपमा भावे यांचा विडिओ बघून एक साधी बेसिक सायकल घेतली आहे आणि चालवण्याचा सराव करते आहे. आपल्याकडे असते तशी लेडीज सायकल आहे. सहा गियर आहेत. एकदम हलकी आहे. मला मजा येते चालवायला. जवळपास 30 वर्षांनी सायकल हातात घेतली आहे त्यामुळे सरावाची खूप गरज आहे. किंमत साधारणपणे 7500 रुपये.

अभिनंदन वत्सला. सायकलिंग हा छान व्यायाम आहे. सराव करत रहा, सुरुवातीला काही दिवस तरी सायकलिंग करून झाल्यावर स्ट्रेचिंग नक्की करा