पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – 9. बात एक रातकी (१९६२)

Submitted by स्वप्ना_राज on 10 March, 2018 - 06:20

मै गीतापर हाथ रखकर कसम खाता हूं की....
मिलॉर्ड, मेरे काबिल दोस्त.......
ताजीरात-ए-हिंद दफा ४०२........
इस बातका इस मुकदमेसे कोई ताल्लूक नही है युअर ऑनर
कानूनके हाथ बडे लंबे होते है
अदालतकी तौहीन करनेके जुर्ममे गिरफ्तार किया जायेगा.......
तमाम सबूत और गवाहोके बयानातको मद्द-ए-नजर रखते हुये ये अदालत इस नतीजेपर पहूंची है की......
ठहरिये जजसाहब......
सजा-ए-मौत सुनाती है.....टू बी हँग्ड टिल डेथ.....
ये अदालत मुलझीमको बाईज्जत बरी करती है....

मोजके का होईना पण काही हिंदी चित्रपट पाहिल्याचे पुण्य गाठी असलेला कोणीही भारतीय क्षणात ओळखेल की अश्या चित्रपटातल्या कोर्टरूम सीनमध्ये हमखास ऐकू येणारे हे संवाद आहेत. ते वाचल्यावर काळा डगलावाले वकील, कठड्यात उभे असलेले आरोपी, साक्षीदार, कोर्टात हजर आम जनता आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली ती फेमस न्यायदेवतेची मूर्ती.........आलं ना सगळं सगळं डोळ्यांपुढे? Happy अर्थात हे सांगायला नको की हे सगळं प्रकरण कोर्टात जायचं कारण म्हणजे कुठेतरी कोणीतरी काहीतरी गुन्हा केलेला असतो. मग पुढचा सारा चित्रपट आपण आणि दिग्दर्शक आट्यापाट्या खेळतो. आपला संशय दुसर्या कोणावर तरी जावा हा त्याचा प्रयत्न. तर आपण शेरलॉक होम्स आणि हर्क्युल पॉयरोचे वंशज असल्याच्या थाटात सगळ्यांकडे संशयाने पाहत खरा गुन्हेगार हुडकण्याच्या नादात. अश्या चित्रपटांना टोपीकरांच्या भाषेत 'whodunnit’ असं समर्पक नाव आहे हे तुम्हाला माहित असेलच.

ह्याच कॅटेगरीमधला एक चित्रपट म्हणजे काल Black & White चॅनेलवर पाहिलेला १९६२ सालचा 'बात एक रातकी'. आता ६०-७०च्या दशकातला 'whodunnit’ चित्रपट पाहण्यातला मुख्य लोचा म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत क्राईमवरचे अनेक देशी-विदेशी चित्रपट, सिरियल्स आणि पुस्तकं आली आहेत. करण्यासारखे असलेले बहुतेक सर्व गुन्हे, त्याचा जितक्या तर्हांनी तपास करता येईल त्या सर्व तर्हा आणि प्लॉटमध्ये येऊ शकतील तितके सगळे ट्वीस्टस 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं' म्हणता येण्याइतपत चघळले गेलेत. त्यामुळे गुन्हा झाला की लेखकाला सुचणार नाहीत अश्या सर्व शक्यता आपल्या सुपीक डोक्यात आधी येतात. मग आपण त्याला पूरक क्लूज मिळतात का ते बारकाईने पाहू लागतो. तसे मिळाले की 'आपुनको ये सब पहलेसेइच पता था' अश्या थाटात खुश होतो. आणि नाही मिळाले तर 'कैच्या कै दाखवतात' असं म्हणायला मोकळे. थोडक्यात काय तर 'The End’ ही अक्षरं झळकल्यावर 'उगाच अडीच तास फुकट घालवले' असं वाटू शकतं. त्यामुळे काल हा चित्रपट लागलाय हे जेव्हा मला कळलं (बहुतेक अर्ध्या तासाचा चित्रपट मी मिसला असणार!) तेव्हा गुन्हेगार ओळखायचा प्रयत्न करायचाच पण त्याचबरोबर ६०च्या दशकातली मर्डर मिस्ट्री म्हणून तो अधिक एन्जॉय करायचा अशी खूणगाठ बांधूनच टीव्हीसमोर बसले.

मी चित्रपट पाहायला सुरुवात केली तेव्हा हिरो राजेश 'अकेला हूं मै' गात चालला होता. वेळ रात्रीची. अचानक त्याला एक तरुणी पाण्यात उडी टाकताना दिसते. तो तिला पाण्याबाहेर काढतो. तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतो तेव्हढ्यात तिथे पोलीस येतात. ते राजेशला सांगतात की ह्या तरुणीवर खुनाचा आरोप आहे. दुसर्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनवर येऊन जबानी नोंदवण्याचं मान्य करून राजेश तिला पोलिसांच्या हवाली करतो (पोलिसांचं आयकार्डही न बघता! अर्थात ते पोलीस नसतील आणि त्यांच्यापासून वाचायला त्या तरुणीने पाण्यात उडी घेतली असेल हा ट्वीस्ट असे असंख्य प्लॉट पाहिलेले असल्याने आपल्याला सुचतो).

दुसर्या दिवशी राजेश पोलीस स्टेशनवर पोचतो तेव्हा एक वृद्ध स्त्री आपल्या मुलीला भेटायला मिळावं म्हणून पोलिसांची मनधरणी करत असल्याचं त्याला दिसतं. तो आपला रिपोर्ट नोंदवून परत जातानासुध्दा ती स्त्री तिथेच असते. ती राजेशला मदत करायची विनंती करते. तो तिला सांगतो की तो काही करू शकत नाही पण ती स्त्री काही ऐकत नाही. पोलीस तिच्या मुलीला घेऊन जात असताना ती स्त्री तिच्याशी बोलायचा प्रयत्न करते. ही तीच तरुणी असते जिला राजेशने आदल्या रात्री वाचवलेलं असतं. ती आईला ओळखदेखील दाखवत नाही. ह्या धक्क्याने ती वृध्द स्त्री बेशुध्द पडते. राजेश तिला तिच्या घरी सोडायला टॅक्सी बोलावतो तेव्हा ती टॅक्सीत त्याला सांगते की ती गावाहून इथे आलेली आहे आणि तिला मुलीला सोडवायला एका वकिलाची गरज आहे. राजेश स्वत: वकील असल्याने तिला काय घडलंय ते विचारतो तेव्हा त्या तरुणीची, नीलाची, कहाणी त्याला समजते.

नीला आणि तिची आई रस्त्यावर डोंबार्‍याचे, गाण्याचे खेळ करून पोट भरत असतात. एके दिवशी बेनीप्रसाद नावाचा एक माणूस हा खेळ बघून नीलाच्या नृत्यकौशल्यावर खुश होतो. तो नीलाच्या आईकडे तिला आपल्या कंपनीत काम करायला द्यायची परवानगी मागतो. त्यांची चौकशी करून नीलाला त्याच्याकडे सोडून तिची आई गावी परत निघून जाते. तो माणूस नीलाला नृत्याचं प्रशिक्षण देववतो. यथावकाश एक नृत्यनिपुण कलाकार म्हणून नीलाचं नाव होतं. पैसा, प्रसिद्धी, ऐशोआराम सगळं काही तिला मिळतं. आणि मग अचानक नीलाच्या हातून तिचा सहकलाकार रंजन ह्याचा तिच्या घरी खून झाल्याची बातमी तिच्या आईला मिळते. नीलाने जरी हा खून आपण केल्याची कबुली पोलिसांकडे दिलेली असली तरी तिच्या आईचा त्यावर विश्वास नसतो. राजेश तिला मदत करायचं मान्य करतो.

नीला शॉकमध्ये असल्याने तिच्याकडून काही माहिती मिळणं अशक्य होऊन बसलेलं असतं. राजेश अधिक चौकशी करायला तिच्या कंपनीत जातो तेव्हा बेनीप्रसादचा एका अपघातात मृत्यू झाल्याचं त्याचा पार्टनर सांगतो. त्याउप्पर आणखी काही मदत करायला तो नकार देतो तेव्हा राजेशला ह्या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका येते. डॉक्टर पोलिसांना असा सल्ला देतात की खरं जाणून घ्यायचं असेल तर नीलाला चुचकारून, तिच्या मनावरचा ताण दूर करून तिची चौकशी करायला हवी. राजेशने तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर प्रेम करत असल्याचं नाटक करून तिचा विश्वास संपादन करावा आणि ही माहिती काढावी असं ते सुचवतात. पोलिसांची संमती मिळते आणि राजेश तिला घेऊन घरी येतो. तो आपल्या प्रयत्नात यशस्वी होतो तेव्हा नीलाकडून त्याला अधिक माहिती मिळते ती अशी - सगळी सुखं हात जोडून समोर उभी असतानाही नीलाला आपल्या मनासारखं वागायची परवानगी नसल्याने ती त्या आयुष्याला कंटाळलेली असते. अश्यात तिच्यावर प्रेम करणारा रंजन तिला ह्या सगळ्यापासून दूर घेऊन जायचं आश्वासन देतो. पण आपण गरिब आणि नीला श्रीमंत असताना हे नातं कसं निभणार ही चिंता तो बोलून दाखवतो तेव्हा आपली सगळी संपत्ती त्याच्या नावावर करून द्यायला नीला तयार होते. ती कागदपत्रावर सही करणार तेव्हढ्यात पश्चात्तापदग्ध झालेला रंजन तिला सांगून टाकतो की त्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून तिची संपत्ती लाटायला तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं म्हणून तिने ही सही करू नये. त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या नीलाला हे सहन होत नाही. ती त्याच्यावर पिस्तुल रोखून त्याला ज्याने हे करायला लावलं त्याचं नाव विचारते तेव्हढ्यात लाईट्स जातात. अंधारात गोळी झाडल्याचा आवाज येतो आणि लाईटस येतात तेव्हा रंजन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. आणि म्हणूनच नीला आपण खून केल्याची कबुली पोलिसांना देते.

हे सगळं ऐकून राजेशला धक्का बसतो. आता त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात – नीलाला घेऊन दूर कुठेतरी निघून जाणं किंवा तिला पोलिसांच्या हवाली करून ती निर्दोष असल्याचं सिद्ध करायचा प्रयत्न करणं. कुठला पर्याय स्वीकारतो तो? नीला खरोखर खुनी असते का?

अरे हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच नाही. अर्थात तुमच्यातल्या चाणाक्ष लोकांनी ती ओळखली असेल म्हणा. ती अशी की हा चित्रपट रात्री १२ पर्यंत जागून पाहायचं एक (महत्त्वाचं!) कारण म्हणजे वकील राजेश अर्थात देव आनंद. एक वकील एव्हढा क्युट दिसणं कायद्याने गुन्हा असायला हवा! पण त्यामुळे झालंय काय की देव जवळपास पूर्ण चित्रपटभर फक्त एक हिरो दिसलाय.....वकील नाही. फक्त अगदी शेवटच्या भागात जेव्हा तो कोर्टात नीलाला वाचवण्यासाठी युक्तिवाद करतो तेव्हा त्याच्या अभिनयात वकील डोकावून जातो. वहिदा रहमानने मात्र नीलाच्या आयुष्यातली रस्त्यावर खेळ करणारी पण आपल्या गरिबीत आनंदाने राहणारी तरुणी, श्रीमंती आभासी जगात कैद झालेली प्रसिद्ध नर्तकी ते आपल्या हातून खून झाल्याचं कळल्यावर अंतर्बाह्य हादरलेली स्त्री ही सगळी स्थित्यंतरं सुरेख दाखवली आहेत. ती ह्या चित्रपटात चक्क मराठी दाखवलेय, बरं का! रंजनची भूमिका चंद्रशेखर ह्या नटाने केली आहे. माझी पिढी ह्याला रामानंद सागर ह्यांच्या 'रामायण' मधला 'सुमंत' म्हणून ओळखते. त्याला एव्हढं तरुण पाहून बारीकसा धक्का बसला Happy जॉनी वॉकर (राजेशचा असिस्टन्ट) आणि असित सेन (नीलाच्या घरातला नोकर रामू) हे कलाकार बाकी मुख्य भूमिकांत आहेत.

चित्रपटात नेहमीपेक्षा जास्त, म्हणजे तब्बल ८ गाणी आहेत. पैकी "ना तुम हमे जानो" (हेमंतकुमार आणि सुमन कल्याणपूर दोघांच्या आवाजातील) अत्यंत आवडीचं. विशेषत: ‘नजर बन गयी ही दिलकी जबां' हे शब्द अक्षरश: काळजाचा ठाव घेतात. मोहम्मद रफीचं 'अकेला हू मै' आणि मन्नाडेंनी गायलेलं ‘किसने चिल्मन से मारा' हीसुध्दा सुरेख. बाकीची पाच निदान मला तरी फारशी आवडली नाहीत.

अब वाचकोंके लिये एक विशेष सूचना - अगर आपने ये पिक्चर नही देखी और देखना चाहते है तो कृपया इसके आगे न पढे Happy

मी चित्रपटाचं अनएडीटेड व्हर्जन पाहिलं असेल तर कथानकात बर्याच न पटणार्या गोष्टी आहेत. नीलाची आई मुलीला एका अनोळखी माणसाकडे सोडून दोन वेळा (आधी बेनीप्रसाद आणि मग राजेश) गावी कशी निघून जाऊ शकते? दोन्ही वेळेस ती एकदम कोर्टात हजर झालेली दाखवली आहे. गावंढळ असलेली नीला थोड्याच कालावधीत एव्हढी आमुलाग्र बदलते ते न पटण्याजोगं आहे. श्रीमंत झाल्यावर ती आई आणि बहिणीला आपल्याकडे का बोलावून घेत नाही हे कोडं शेवटपर्यंत उलगडत नाही. तसंच नीला एक नर्तकी असते मग तिच्याकडे पिस्तुल कुठून येतं? तिच्या पिस्तुलातून उडालेली गोळी राजेश कोर्टात सादर करतो पण ती गोळी जप्त करतेवेळी पोलीस हजर नसतात (कारण ती गोळी न्यायालयासमोर राजेश सादर करतो, पोलीस नाहीत) मग तो पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकणार नाही हे एक वकील असून त्याच्या लक्षात कसं येत नाही? नीलाला घरी आणल्यावर राजेशकडे तिच्याभोवती रुंजी घालायचं एकच काम दिसतं, त्याला दुसरी कुठलीही केस नसते का? मुळात तिला त्याच्या घरी नेऊन ठेवायचा विचित्र सल्ला डॉक्टर देतात तेच पटत नाही. केवळ कथानकाची सोय म्हणून हे केलेलं चांगलंच खटकतं. खर्या गुन्हेगाराचं गुन्हा करण्यामागचं कारणही एक प्रेक्षक म्हणून आपल्या पचनी पडत नाही.

तसंच नीलाने रंजनवर गोळी झाडलेली असते आणि नंतर पुढे राजेशवर सुध्दा ती खोटी का होईना पण गोळी झाडतेच. अश्या चिडली की डायरेक्ट गोळी झाडणाऱ्या बाईसोबत राजेश सगळं आयुष्य बुलेटप्रुफ जॅकेट घालून काढणार का असाही प्रश्न मनात येतोच. ‘मेंटल हॉस्पिटल' आणि 'पोलीस स्टेशन' असले बोर्ड्स पाहून हसायला येतं. अरे, निदान जागेचं नाव तरी दाखवा त्याखाली. 'सीआयडी' मध्ये (सोनी वरील अजरामर सिरीयल! पिक्चर नव्हे!) सुध्दा 'सिटी हॉस्पिटल' अशी पाटी असते. Happy नीलाच्या खटल्याबद्दल वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या दाखवताना एके ठिकाणी 'Loosing Case’ असे शब्द पाहिले. ‘Lose’ आणि ‘Loose’ मधला हा भारतीय गोंधळ पुरातन दिसतोय. Happy

अर्थात एव्हढी पिसं काढल्यावर हेही आवर्जून सांगायला हवं की राजेशने कोर्टात केलेले युक्तिवाद नेहमी हिन्दी चित्रपटात दाखवले जातात तसे अजिबात बिनडोक वाटले नाहीत. निदान मला तरी साक्षीदारांची तपासणी आणि उलटतपासणी आवडली. कोर्टात चक्क ९ ज्युरीसुध्दा दिसतात. ज्युरी सदस्यांची संख्या विषम असायचं कारण माहीत नाही. कदाचित दोन्ही बाजूंनी समान मतं पडू नयेत म्हणून ही व्यवस्था असावी. इंडियन ज्युरी सिस्टीम के.एम.नानावटी व्हर्सेस प्रेम आहुजा खटल्यानंतर रद्द करण्यात आली असं वाचनात आलं होतं (८ विरुध्द १ मतांनी नानावटीला ज्युरींनी निर्दोष ठरवलं होतं. ह्या केसवर आधारित ‘अचानक’ पाहिलाय. जुना ‘ये रास्ते है प्यारके' पाहायचा आहे). आणखी एक......आजवर प्रत्येक सिनेमात 'मै गीतापर हाथ रखकर' ह्या शपथेचा पुढला भाग 'और सचके सिवाय कुछ नही कहुंगा' असा ऐकलाय. इथे तो 'और सिर्फ सच कहुंगा' असा येतो.

तुम्हाला मर्डर मिस्ट्रीज आवडत नसतील तर हा चित्रपट पहाच असं मी म्हणणार नाही. पण कधी कुठल्या चॅनेलवर लागलेला असला आणि दुसरीकडे कुठे पाहण्यासारखं काही नसलं तर जरूर पाहू शकता. आणि ज्यांना मर्डर मिस्ट्रीज आवडतात ते मी काही म्हटलं तरी "एका रात्रीची ही गोष्ट" पाहणारच. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{{ ‘मेंटल हॉस्पिटल' आणि 'पोलीस स्टेशन' असले बोर्ड्स पाहून हसायला येतं. अरे, निदान जागेचं नाव तरी दाखवा त्याखाली. }}}

चित्रपट बनला तो काळ लक्षात घेतला तर यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीही नाहीये. प्रेक्षक अशी जागा प्रत्यक्षात कुठे आहे हे शोधायला जात. अगदी शेरलॉक होम्सचं बेकर स्ट्रीटवरील निवासस्थान शोधणार्‍या ब्रिटीश चाहत्यांची संख्यादेखील कमी नव्हे. अगदी आजच्या काळातही गाडीच्या नंबरप्लेटवरून प्रत्यक्षात ती गाडी कुणाच्या मालकीची आहे ह्याचा इंटरनेटवरुन चुटकीसरशी शोध घेता येत असल्याने क्राईम पॅट्रोल सारख्या कार्यक्रमात गाडीवर फेक नंबर्स लावलेले दिसतात आणि इतर काही मालिका व सिनेमांत गाडीची नंबरप्लेट धूसर केलेली दिसते.

{{{ आणखी एक......आजवर प्रत्येक सिनेमात 'मै गीतापर हाथ रखकर' ह्या शपथेचा पुढला भाग 'और सचके सिवाय कुछ नही कहुंगा' असा ऐकलाय. इथे तो 'और सिर्फ सच कहुंगा' असा येतो. }}}

खर्‍या कोर्टात सिर्फ सच कहूंगा (देवाशप्पथ खरं सांगेन) इतकंच असतं.

इंटरनेट आणि यूट्यूब पूर्वी बात एक रातकी आणि सोलहवां साल या दोन्हींत माझा गोंधळ उडायचा. दोन्हीत मुख्य कलाकार तेच आणि खरं पाहता सोलहवां साल मध्येच एका रात्रीत घडणारी कथा दाखविली आहे. त्यातही श्रीमंत वहिदाला फसविणारा प्रियकर ही अजून एक कॉमन बाब. देव, वहिदा आणि गाणी वगळता दोन्ही सिनेमे यथातथाच पण तरीही त्यातल्या त्यात सोलहवा साल उजवा म्हणावा लागेल.

स्वप्ना अगं कुठं दडून बसलेलीस? सगळा लेख वाचला.
फार सुरेख लिहितेस तु, त्यामुळे तु ज्या ज्या सिनेमावर लिहिले आहेस ते पहावेसे वाटतात Happy
हा पण बघणार आता मी लवकरच Happy

नेहमीप्रमाणेच उत्तम.
तू लिहीलास म्हणून पहावा लागेल.
असही "न तुम हमे जानों" आवडतच

न तुम हमे जा ss नो......... ना हम तुम्हे जा ss ने..... नी कॉलेज जीवनातील कितीतरी रात्री बहारीच्या केल्या होत्या....!!

सगळ्यांचे मनापासून आभार! Happy दक्षिणा....मध्यंतरी काही पिक्चर्स नाही पाहिले आणि इथे यायलाही जमलं नाही.