बदलू या होळीचा ‘रंग’!

Submitted by अँड. हरिदास on 28 February, 2018 - 01:03

holi1.jpg
बदलू या होळीचा ‘रंग’!
भारतीय 'सन' निसर्गाशी नात सांगणारे.. त्याच्याशी ऋणानुबंध जपणारे आहेत. कुठल्याही सणाची पार्श्वभूमी बघितली तर त्याला निसर्गातील बदलाचाच संदर्भ दिसून येतो. होळी-रंगपंचमीच्या आगमनाची सूचनाही निसर्गच आपल्याला देतो. ऋतुराज वसंताचं आगमन निसर्गात आगळाच गोडवा निर्माण करत..चैत्र सुरु होण्यापूर्वी फाल्गुनात पळस आणि काटेसावर फुलायला लागले कि कुठे बहाव्याच्या पिवळ्याधमक फुलांचा शृंगार तर कुठे पळसाच्या लालजर्द फुलांची लाली पसरते. निसर्गाचे हे फुलणे बघून माणसाच्याही चित्तवृत्ती उल्हसित होतात. त्यालाही रंग उधळावेसे वाटतात.. आणि वेध लागतात ते चैतन्य फुलवणार्या ' रंगपंचमी ' चे. मात्र बदलत्या काळानुसार आपले सन निसर्गापासून दूर जावू लागले आहेत. त्याचा मूळ उद्देश मागे पडला असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. मातीचा टिळा एकमेकांच्या कपाळी लावण्यापासून सुरू झालेला रंगपंचमीचा सण नंतर पळसाच्या फुलांचा रंग करून एकमेकांवर उधळण्याइतका बदलत गेला. आज त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. निसर्गाची सर्वात अमूल्य भेट असलेल्या पाण्याचा रंगपंचमीसाठी अपव्यय करण्याची तर होळीसाठी वृक्षतोड करण्याची चुकीची रीत समाजात रूढ होवू लागली आहे. त्यामुळे सन साजरे करताना आपल्याला सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीचे भान राखणे गरजेचे बनले आहे. होळी आणि त्यानंतर येणारी रंगपंचमी हे चैतन्य फुलवणारे सण आहेत. होळीच्या वेळी वृक्षतोडीला लगाम घालतानाच रंगपंचमीच्या वेळी अतिउत्साहामुळे बेरंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. एकमेकांवर रंगाची उधळण करण्यासोबतच मनातील रंगांचीही उधळण व्हायला हवी.

काळ बदलतो तशा रुढी, परंपराही बदलल्या पाहिजेत. पूर्वी वृक्षांची दाटीवाटी असणारी जंगलं अस्तित्त्वात होती. पण, बदलत्या काळानुरुप जंगलसंपत्ती कमी होत गेली, झाडं कापली जाऊ लागल्याने संख्या रोडावली. अशा वेळी वृक्षांच्या फांद्या तोडून निसर्गसंपदेचा र्हास करण्यापेक्षा परिसरातील कचरा व वाळलेली लाकडे पाला-पाचोळा जाळून होळी साजरी करता येवू शकेल. गल्लीबोळात वेगळी होळी साजरी करण्यापेक्षा `एक गाव एक होळी’ साजरी केली तरी निसर्गाचा होणारा र्हास कमी व्हायला मदत होईल. तसेही 'वाईटाचा नाश आणि चांगल्या गोष्टींचं जतन' हा होळी सणाचा मुख्य उद्देश आहे. द्वेष, मत्सर, तिरस्कार, कपट, कोतेपणा यांसह सर्व दुर्गुणांची होळी करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं होळी साजरी करणं होय. मग त्यासाठी पर्यावरणाला का वेठीस धरायचं? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जलव्यवस्थापन करणे ही आता महत्त्वाची गरज बनली असताना आपण पाण्याचा अपव्यय करणे कितपत योग्य ठरेल? याचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण विचार केला पाहिजे.

गेल्या काही वर्षांपासून हिंदी तसेच मराठी चित्रपट मालिकांमधील कलाकार एकत्र येऊन होळीचे सेलिब्रेशन करू लागले आणि होळीला एक ग्लॅमरस स्वरूप मिळाले. फिल्मस्टार्स करतात म्हणून त्यांच्यासारखीच ‘होली’ खेळून हजारो लिटर पाणी वाया घातले जावू लागले. होळीच्या निमित्ताने कित्येक ठिकाणी ‘रेन डान्स’सारखे चैनीचे प्रकार सुरू असतात. होळी-रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर तर रिसॉर्टला जाऊन ‘होली सेलिब्रेट’ करण्याची नवीन पद्धत सुद्धारूढ होत आहे. आमच्याकडे आहे ना मुबलक पाणी, मग आम्ही ते वाट्टेल तसं वापरणार. अशी बेपर्वा वृत्ती वाढू लागली आहे. अर्थात, जी गोष्ट आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते ती आपण मुबलक प्रमाणातच खर्च करतो. ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. परंतु विद्यमान स्थितीत या प्रवृत्तीत बदल करावा लागेल. पाण्याची बचत केली, पाणी सांभाळून खर्च केले तर धरणात पाणी साठा शिल्लक राहील. धरणात पाणी शिल्लक राहिले तर जवळपासच्या जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होणार नाही. दुसर्यावर्षी पाऊस आला तर धरण लवकर भरेल. धरण लवकर भरले तर धरणाखालील जमिनीला मुबलक पाणी मिळेल. त्याने तेथील जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. असे दर वर्षी होत राहिले तर दुष्काळाचा प्रभाव कमी होत जाईल. रंगपंचमी खेळायची म्हणजे पाण्यात रंग मिसळून दुसर्याच्या अंगावर फेकले पाहिजेच असं नाही, तर दुसर्यांवर कोरडे रंग टाकून सुद्धा रंगपंचमी साजरी करता येऊ शकते. पर्यावरणपूरक होळी साजरी झाली तर पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आणि होळीचा आनंदही लुटता येईल.

परस्पर स्नेहभाव जोपासणं, तो वृद्धिंगत करणं हे प्रत्येक सणाच्या साजरीकरणामागचं उद्दिष्ट असल पाहिजे. म्हणूनच रंगपंचमी साजरी करत असताना आपल्या अतिउत्साहामुळे रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दुसर्याला रंग लावत असताना त्याच्या आवडी निवडीचाही विचार करायला हवा..होळीच्या नावाखाली एकमेकांना शिवीगाळ करणे, बोंब मारने हे प्रकार थांबविले गले तर फारच उत्तम. यंदाचा रंगसोहळा दोन दिवसावर येवून ठेपला आहे त्यामुळे सर्वांनी आत्तापासूनच योजना बनवायला सुरुवात केली असेलच. आपल्याकडे ‘रेन डान्स’ संस्कुती अजून एव्ह्डी फोफावलेली नसली तरी पाण्याचा पाइप लावून रंगांची उधळण केली जाते..ती जर टाळता आली तर आपणही पाणी बचतीत आपला अमुल्य सहभाग नोंदवू शकतो. आपल्या येणाऱ्या सोनेरी उद्यासाठी पाण्याची बचत करण्याचा संकल्प करून ही होळी साजरी करुया.. सर्व मायबोली करानां रंगसोहळ्याच्या अग्रीम शुभेच्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता संस्कृती रक्षकांची फौज येऊन गेल्या वर्षी किती पाऊस पडला, धरण पातळी की आहे, इतर धर्मीय सणांमध्ये होणारी निसर्गाची हानी इत्यादी गोष्टींवर गोंधळ घालेल,

त्या होळीच्या बोंबा आहेत समजून दुर्लक्ष करावे.

कायपण करा फक्त ते पाण्याचे फुगे उंच बिल्डिंगमधून लपून खालून येणार्‍या जाणार्‍या लोकांवर फेकू नका. कामानिमित्त्त जाणार्‍या लोकांवर, कॉलेजांत, क्लासला, नोकरीला जाणार्‍या निष्पाप मुलीबाळींवर असे भेकड फुगाहल्ले झालेले पाहून खूप वाईट वाटतं.

असे फुगाहल्ले होत असतील तर त्वरित त्या सोसायटीच्या चेअरमनला गाठून तंबी द्या. पोलिस कंप्लेंट करता येते हे लक्षात ठेवा. अशी पोलिस कंप्लेंट झाली तर पोलिस चेअरमन व कमिटीमेंबरची गचांडी धरतील याची माहिती सर्व सोसायट्यांच्या व्हॉट्सपग्रुपवर फिरवा...

आजच एक अत्यंत किळसवाणी बातमी वाचण्यात आली.
हा होळीचा सण मनोरंजनात्मक राहिला नाही तर विकृतीने भरलेल्या किळसवाण्या प्रकारांनी घेरलेला झाला आहे. आधी होळी साजरी करण्यात आनंद येत होता आता होळी सण जस जसा जवळ येतोय तस तसे वृत्तपत्रातील रकाने अत्याधिक विकृत किळसवाण्या बातम्यांनी भरून जात आहे.

काही वर्षांपूर्वी एक प्रयोग वाचला होता. शास्त्रज्ञानी पाच माकडं एका पिंजऱ्यात सोडली आणि त्या पिंजर्याच्या मध्यभागी उंचावर केळी लटकवली होती आणि बाजूला एक शिडी पण होती. जेव्हा जेव्हा ती माकडं केळी काढायला शिडीवर चढायची तेव्हा शास्त्रज्ञ त्या पिंजऱ्यात विद्युत करंट सोडायचे. काही दिवसांनी माकडांनी केळ्याचा करंटमूळे नाद सोडून दिला. आता त्या पाचपैकी एक माकड बाहेर काढला आणि नवीन माकड पिंजऱ्यात सोडला. त्या नवीन माकडाला करंटबद्दल काही माहिती न्हवती तो बिचारा जसा शिडी चढायला गेला तास बाकीच्या चार जणांनी त्याला चोप चोप चोपला. असा प्रकार अजून काही दिवस सुरु राहिला. नंतर त्या नवीन माकडानेसुद्धा केळ्याचा नाद सोडून दिला.आता जे जुने चार होते त्यातल्या एकाला बाहेर काढला आणि नवीन माकड आत टाकला. तो जसा शिडीजवळ गेला तसा बाकीच्या सगळ्यांनी त्याला चोपायला सुरु केलं. जो माकड नवीन होता ज्याला करंट बद्दल काहीच माहिती न्हवती तो पण चोपायला सगळ्यात पुढे होता. असं करत शेवटी शास्त्रज्ञांनी सगळी माकडं बदलली, कुठल्याच माकडाला माहित न्हवतं आपण शिडी चढायला गेलेल्या माकडाला का मारतोय तरीपण ते मारायचे. आपली अवस्था त्या माकडांसारखी झाले. ४-५ वर्षांपूर्वी कमी पाऊस पडला होता तेव्हा हे पाणी वाचवायचा आव्हान केलं होतं. तेव्हा धरणात पाणीसाठा खूपच कमी होता. पण नंतर हे फ्याडंच बनून गेलं. प्रत्येक होळीला पाणी वाचवायचे मेसेज फिरत असतात. आणि ते टाकणारे पण आपण मोठी काहीतरी समाजसेवा करतोय अशा अविर्भावात असतात.

तुमची ती माकडांची अ‍ॅनालॉजी होळीच्या सण शष्प माहिती नसतांना बिनडोकांसारखा साजरा करणारांनाच फिट बसते, त्याबद्दल जागृती करणारांना बोलू नका.

बाय द वे त्या प्रयोगात माकडांच्या अंगावर पाणी पडायचं. तुम्ही ह्या कथेतून पाणी गायब केलं, तसेच होळीत घुसलेलं पाणीही निघून जावो ही अपेक्षा.

नवीन Submitted by कल्पतरू on 28 February, 2018 - 16:36
>>फालतू याला म्हणतात उंटावरून शेळया हाकणे

काही वर्षांपूर्वी एक प्रयोग वाचला होता. शास्त्रज्ञानी पाच माकडं एका पिंजऱ्यात सोडली आणि त्या पिंजर्याच्या मध्यभागी उंचावर केळी लटकवली होती आणि बाजूला एक शिडी पण होती. जेव्हा जेव्हा ती माकडं केळी काढायला शिडीवर चढायची तेव्हा शास्त्रज्ञ त्या पिंजऱ्यात विद्युत करंट सोडायचे. काही दिवसांनी माकडांनी केळ्याचा करंटमूळे नाद सोडून दिला. आता त्या पाचपैकी एक माकड बाहेर काढला आणि नवीन माकड पिंजऱ्यात सोडला. त्या नवीन माकडाला करंटबद्दल काही माहिती न्हवती तो बिचारा जसा शिडी चढायला गेला तास बाकीच्या चार जणांनी त्याला चोप चोप चोपला. असा प्रकार अजून काही दिवस सुरु राहिला. नंतर त्या नवीन माकडानेसुद्धा केळ्याचा नाद सोडून दिला.आता जे जुने चार होते त्यातल्या एकाला बाहेर काढला आणि नवीन माकड आत टाकला. तो जसा शिडीजवळ गेला तसा बाकीच्या सगळ्यांनी त्याला चोपायला सुरु केलं. जो माकड नवीन होता ज्याला करंट बद्दल काहीच माहिती न्हवती तो पण चोपायला सगळ्यात पुढे होता. असं करत शेवटी शास्त्रज्ञांनी सगळी माकडं बदलली, कुठल्याच माकडाला माहित न्हवतं आपण शिडी चढायला गेलेल्या माकडाला का मारतोय तरीपण ते मारायचे. आपली अवस्था त्या माकडांसारखी झाले. ४-५ वर्षांपूर्वी कमी पाऊस पडला होता तेव्हा हे पाणी वाचवायचा आव्हान केलं होतं. तेव्हा धरणात पाणीसाठा खूपच कमी होता. पण नंतर हे फ्याडंच बनून गेलं. प्रत्येक होळीला पाणी वाचवायचे मेसेज फिरत असतात. आणि ते टाकणारे पण आपण मोठी काहीतरी समाजसेवा करतोय अशा अविर्भावात असतात.

Submitted by कल्पतरू on 28 February, 2018 - 17:06<<
>>एक गोष्ट मीही..
एकदा एके ठिकाणी आग लागली होती. आणि तिथे एक चिमणी सारखी चोचीतून थोडं थोडं पाणी आणून ती आग विझवायचा प्रयत्न करत होती. तिच्या बऱ्याच खेपा पाहून कावळा हसायला लागला. तुझ्या चोचीने पाणी आणून थोडीच ती आग विझणार आहे, असं कावळ्याने तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, आग विझेल की नाही मला माहिती नाही, पण उद्या जेंव्हा या घटनेची चर्चा होईल त्या वेळी माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल..!
फक्त चार वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात दुष्काळ पडला नव्हता.. याअगोदरही अत्यंत भीषण दुष्काळ राज्यात पडले आहेत.. यापुढेही अशी परिस्थिती येऊ शकते.. ती येऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे.. यंदा काही भागात मान्सून चांगला राहिला, पण काही ठिकाणी आजही पाण्याचे दुर्भिक्ष आहे.. माझ्या जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरवातीला जवळपास ३० गावांमध्ये टँकर सूर करण्यात आले आहे.. अर्थात, सोसणाऱ्याला वेदना कळतात.. बगणाऱ्याला त्याच महत्व कळत नाही... याप्रमाणे ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे.. ते या आव्हानाला हसत असतील..त्यांनी जरूर हसावं..आम्ही चिमणीच्या प्रवृत्तीचे आहोत.. आपलं काम करत राहणार..

त्या होळीच्या बोंबा आहेत समजून दुर्लक्ष करावे.

Submitted by सिम्बा on 28 February, 2018 - 12:०२
>>> अगदी बरोबर सिम्बा होळीच्या शुभेच्छा

कॉलेजांत, क्लासला, नोकरीला जाणार्‍या निष्पाप मुलीबाळींवर असे भेकड फुगाहल्ले झालेले पाहून खूप वाईट वाटतं.<<
>> उत्सव विवेकाने साजरे करणे आवश्यक आहे..विकृत होण्यासाठी नाही.. अशांवर जरब बसलाच पाहिजे

कायपण करा फक्त ते पाण्याचे फुगे उंच बिल्डिंगमधून ................ सोसायट्यांच्या व्हॉट्सपग्रुपवर फिरवा...
Submitted by वंदन on 28 February, 2018 - 12:17>>>>
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
(कदाचित आपली ही पहिलीच प्रतिक्रिया, ज्याच्याशी मी सहमत आहे! Proud )

४-५ वर्षांपूर्वी कमी पाऊस पडला होता तेव्हा हे पाणी वाचवायचा आव्हान केलं होतं. तेव्हा धरणात पाणीसाठा खूपच कमी होता. पण नंतर हे फ्याडंच बनून गेलं. प्रत्येक होळीला पाणी वाचवायचे मेसेज फिरत असतात. आणि ते टाकणारे पण आपण मोठी काहीतरी समाजसेवा करतोय अशा अविर्भावात असतात.
Submitted by कल्पतरू on 28 February, 2018 - 17:06>>>>>
आपल्या या मताशी असहमत! पाण्यासारखी नैसर्गिक साधनसंपत्ती, मग ती थोड्या प्रमाणात उपलब्ध असो की मुबलक प्रमाणात, काटकसरीने वापरणेच योग्य!!! साधा विचार करा, ४-५ वर्षांच्या तुलनेत आता लोकसंख्या (आणि त्यातून मुंबईसारख्या शहराची) काही प्रमाणात तरी वाढली असेल ना? मग जरी या वर्षी खूप पाऊस पडला असला तरी तो अपुराच पडणार ना???

BTW, >>>>ता तेव्हा हे पाणी वाचवायचा आव्हान केलं होतं. तेव्हा >>>
ते पाणी वाचवायचं "आवाहन" केलं होतं , आव्हान नव्हे Happy
बाकी चालू दे

हे ग्लोबल वॉर्मिंगचे युग आहे.
पाणी टंचाई आयुष्यभराची आहे.
गेल्यावर्षी, यावर्षी, पुढच्यावर्षी करण्यात अर्थ नाही.
लोकप्रिय सेलिब्रेटींनीच आता सुक्या होळीचे फॅड आणायची गरज आहे. मग लोकं ते फॉलो करतील ..

हा खूप चांगला विचार आहे. होळी किंवा रंगपंचमी मध्ये होणारी रंगांची उधळण आणि पाण्याचा वापर (विशेष म्हणजे पाण्याचा वापर) हा वादाचा मुद्दा होत आहे. कारण यामध्ये पाण्याची नासाडी आहे पण खर सांगायचे तर मी माझ्या लहानपणी भरपूर भिजून रंग खेळायचो. माझा मुलगा पण भरपूर भिजून रंग खेळणे खूप एन्जॉय करतो. त्याला तस करू नको सांगणे जीवावर येते. मग विचार असा येतो कि होळी किंवा रंगपंचमी कोणत्या वेगळ्या दिवशी ठेवता येईल का? जसे नेहमी रंगपंचमी मार्च महिन्यामध्ये असते जेव्हा येणार्या उन्हाळ्या साठी पाणी साठवणे आवश्यक असते. त्या ऐवजी पहिल्या पावसात रंग खेळले तर ? जे काही प्रमाणात रेन डान्स पार्टी वाले लोक करत आहेत.

रंगपंचमी मध्ये अनेकदा खूप हुल्लड बाजी चालते. त्यावर बरेच लिहिले गेलेले आहेच. तस हे सुद्धा खर आहे कि कित्येक शतका पासून रंग पंचमीला एक श्रुंगारिकतेची जोड आहे. मग चित्रपटात दाखवली जाणारी "रंग बरसे" किंवा "बलम पिचकारी" सारखी गाणी असोत किंवा बेगम अख्तर च्या ठुमर्या असो किंवा काही क्रुष्ण - गोपींची भजने असोत. बर्याच प्रमाणात त्यामुळे हा सण जास्त प्रसिध्द आणि त्याच बरोबर चर्चेत येतो. या मध्ये हुल्लड बाजी होऊ नये हे खरच पण भारतीय संस्क्रुती मध्ये ज्या खूप कमी सणांमध्ये श्रुंगार रसाला स्थान आहे त्या मधला हा एक सण आहे. शक्ती, धन आणि वेळ याचा सकारात्मक उपयोग करायचा असेल तर विशेष करून तरूणांनी प्रमाणाबाहेर श्रुंगारीकते मध्ये अडकून राहू नये हे जरी खर असले तरीही श्रुंगार रसाला स्थान असणार्या या अगदी थोड्या सणांचे स्थान टिकवून त्याला सकारात्मकतेची जोड कशी देता येईल? का श्रुंगार रसाला एका मर्यादे पलीकडे सकारात्मकतेची जोड देता येत नाही, तशी या सणाला पण सकारात्मकतेची जोड फार देण्याचा प्रयत्न करू नये?

यावर इतरांचे काय मत आहे? स्त्री वर्गाचे काय मत आहे?