बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग ४)

Submitted by nimita on 21 February, 2018 - 12:52

जोधपूरला आम्ही दहा दिवस होतो. त्या दहा दिवसांत मी घरातल्या सगळ्या सामानाची आवराआवर केली. सगळं सामान बॉक्सेस मधे नीट पँक केलं. मुलीच्या शाळेत जाऊन त्यांच्या प्रिन्सिपॉल ला भेटले आणि पुढचा 'कोर्स ऑफ अँक्शन ठरवून आले. योगायोगानी त्याच कालावधीत दोघींच्या यूनिट टेस्ट्स होत्या. त्यामुळे दोघींनीही परीक्षा दिल्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे मी माझा PET CT Scan करून घेतला. देवाच्या क्रुपेनी माझे स्कँनचे रिपोर्ट्स चांगले आले होते. दोन्ही ओव्हरीज् मधले ट्यूमर्स पूर्णपणे श्रिंक झाले होते. हे ऐकून मला आभाळ ठेंगणं झालं. पण गंमत अशी की मला जेव्हा माझ्या आजाराबद्दल डॉक्टरनी सांगितलं होतं तेव्हाही ती बातमी शेअर करायला माझ्या बरोबर कुणी नव्हतं आणि आजदेखील ही आनंदाची बातमी ऐकताना मी एकटीच होते. पण लगेचच मी नितिन ला फोन करून सांगितलं. त्यानीही ऐकून सुटकेचा श्वास सोडला. कँसर विरुद्ध च्या माझ्या या लढाईत मी माझा पहिला मोठा विजय मिळवला होता.
आता जोधपूरला रामराम ठोकायची वेळ आली होती. पण दोन महत्त्वाची कामं अजूनही राहिली होती... माझ्या शाळेतल्या माझ्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांचा निरोप घेणं आणि माझ्या आजाराबद्दल अफवा पसरवणाऱ्या माझ्या so called हितचिंतकाला भेटून त्याचा गैरसमज दूर करणं. मला माझ्या मैत्रिणी कडून त्या व्यक्ती चं नाव कळलं होतं. ती माझ्याच शाळेतली एक शिक्षिका होती. आणि आम्ही दोघींनी किती तरी वेळा स्कूल कॉरीडॉर्स मधे उभं राहून शिळोप्याच्या गप्पाही मारल्या होत्या. मग माझ्या बद्दल असा विचार का बरं आला असावा तिच्या मनात? तिला भेटून स्पष्टच विचारायचं ठरवलं मी. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या शाळेत गेले. मला बघून माझ्या सहकर्मचार्यांना खूप आनंद झाला. मलाही सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. मग मी माझ्या वर्गात गेले. मला बघताच सगळ्या मुला-मुलीच्या चेहऱ्यांवर ओळखीचं हसू दिसलं. सगळ्यांनी माझ्या भोवती गराडा घातला. प्रत्येकाला माझ्याशी बोलायचं होतं.कुणी आपल्या मित्राची तक्रार करत होता तर कुणाला होमवर्कसाठी मिळालेला गोल्डन स्टार मला दाखवायचा होता.मागचे दोन-अडीच महिने जणू काही हवेत विरून गेले होते. त्या सगळ्यांच्या निरागस आणि निरपेक्ष प्रेमात मी माझा आजार काही वेळापुरता का होईना पण विसरून गेले. मी सगळ्यांना सांगितलं,"मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मी तुम्हाला भेटायला येईन,म्हणून मी आज आले आहे. पण आता आम्ही इथून दुसऱ्या गावाला जाणार आहोत त्यामुळे ही आपली शेवटची भेट."
मी माझ्या विद्यार्थ्यांना 'पुन्हा भेटण्याचं' जे वचन दिलं होतं ते मी पूर्ण करू शकले म्हणून मनोमन देवाचे आभार मानले.
माझ्या त्या 'मैत्रीणीला' (?) खूप शोधलं पण ती काही माझ्या द्रुष्टीस नाही पडली. कदाचित मला confront करायला घाबरत असावी. पण मला एक समाधान होत, तिला खोटं ठरवल्याचं !
१४ जानेवारी ला आम्ही तिघी जोधपूरहून निघालो आणि १५ जानेवारी ला संध्याकाळी पुण्यात पोचलो. त्याच दिवशी मी CA 125 साठी माझं ब्लड सँपल दिलं. दुसऱ्या दिवशी ब्लड टेस्ट चा रिपोर्ट मिळाला-आधीच्या रिपोर्ट मधे CA 125 चा काऊंट ४२९.८ होता तो आता १२.०६ वर आला होता.... म्हणजे नॉर्मल रेंज मधे.... मी अजून एक विजयपताका रोवली होती.
माझा CT Scan आणि ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स घेऊन मी दुसर्याच दिवशी सर्जनला भेटायला गेले. माझे रिपोर्ट्स बघून तेही खुश झाले। त्यांनी विचारलं,"तुमची सर्जरी आपण किती तारखेला ठरवली होती?" मी म्हणाले,"२० जानेवारी". त्यावर दोन मिनिटं विचार करून ते म्हणाले,"आपण २० च्या ऐवजी २४ जानेवारीला करू तुमची सर्जरी. तसं काही खास कारण नाहिए पण मला वाटतंय की २४ तारखेला करावी." मी म्हणाले,"ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही." मनात विचार आला- कदाचित यामागेही देवाचा काहीतरी चांगला हेतू असेल. आपण सकारात्मक विचार करायचा.
२२ जानेवारीला संध्याकाळी मी हॉस्पिटलमधे अँडमिट झाले. घरातून निघताना मुलींना सांगितलं,"मी जेव्हा हॉस्पिटल मधून परत येईन ना तेव्हा माझ्या शरीरातला ट्यूमर डॉक्टर अंकलनी काढून टाकला असेल. मग परत कध्धीच मला कुठलाही त्रास होणार नाही. पण त्यासाठी मला थोडे दिवस हॉस्पिटलमधे राहावं लागेल." आई आता पूर्ण बरी होणार हे कळल्यावर त्या दोघीही खूप खुश झाल्या आणि मला' 'ऑल द बेस्ट ' म्हणत गळामिठी घातली.
२३ तारखेला सकाळी ब्रेकफास्ट नंतर मला काहीही खाण्याची परवानगी नव्हती. इतकंच काय पण चहा,कॉफी, सरबत वगैरे सुद्धा नाही. दुपारी अचानक एक नर्स आली आणि म्हणाली," ऑन्को-सर्जन नी तुम्हांला भेटायला बोलावलं आहे." मी आणि नितिन दोघंही त्यांच्या केबीन मधे गेलो. डॉक्टर म्हणाले," आज सकाळीच मी एका इंटरनँशनल कॉन्फरन्स मधे इतर डॉक्टर्स बरोबर ऑनलाइन बोलत होतो. कॉन्फरन्स होती केमोथेरपी बद्दल आणि त्यातील लेटेस्ट रीसर्च बद्दल. साधारण दहा वर्षांपूर्वीपर्यंत डॉक्टर्स 'intra peritoneal chemotherapy' पण देत होते पेशंट्सना ; पण त्याचे साईड इफेक्ट्स जास्त होते म्हणून ती प्रोसिजर बंद केली होती. पण लेटेस्ट रीसर्च मधून असं आढळून आलं आहे की नवीन अद्ययावत औषधं आणि उपकरणांमुळे आता या IP ('Intra Peritoneal) केमोथेरपी मुळे पेशंट्सना खूप फायदा होतो आणि मुख्य म्हणजे या केमो मुळे कँसर च्या रिकरन्स चे चान्सेस् ७५% नी कमी होतात. तुमचा कँसर खूप अँडव्हान्स्ड स्टेज चा असल्यामुळे तुम्ही जर नॉर्मल IV केमो बरोबर ही IP केमो पण घेतलीत तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.
पण त्याच्यासाठी एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर करावी लागेल. तुमच्या abdominal cavity मधे (रिब्ज वर) एक छोटासा केमोपोर्ट बसवावा लागेल. या केमोपोर्ट मधून तुमच्या शरीरात औषध सोडलं जाईल आणि ते औषध तुमच्या शरीरातील ऑर्गन्सवर त्यांच्या बाहेरच्या बाजूनी काम करेल.
हा केमोपोर्ट पाच वर्षांपर्यंत तुमच्या शरीरात ठेवला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर करून तो आपण काढून टाकू."
मी लगेच त्यांना यासाठी माझी संमती दिली. ते म्हणाले," गुड, आम्ही उद्या सर्जरीच्या वेळीच हा केमोपोर्ट पण फिक्स करू म्हणजे तुमच्या दोन्ही प्रकारच्या केमोज् आपल्याला सुरु करता येतील."
सर्जरीची तारीख २० जानेवारी ऐवजी २४ जानेवारी का झाली याचं उत्तर मला मिळालं होतं. देवानी पुन्हा एकदा त्याच्या 'माझ्या बरोबर असण्याची' जाणीव करवून दिली होती.
थोड्याच वेळात पुन्हा याचा प्रत्यय आला. कसा तेही सांगते... मला मनात कुठेतरी जनरल अँनेस्थेसिया बद्दल थोडी शंका होती. सर्जरी बद्दल पूर्ण खात्री होती मला पण GA चा काही साईड इफेक्ट तर नाही होणार; मी GA मधून सुखरुप बाहेर येईन ना ? अशी मनात कुठेतरी शंका होती... उगीचच!मी मनाशी ठरवतच होते की याबाबतीत आपण डॉक्टर शी बोलून शंकानिरसन करून घ्यावे, तेवढ्यात एक व्रुद्ध स्त्री केबीन मधे आली.सत्तरीच्या जवळपास असेल, कंबरेत वाकलेली, अंगकाठीही अगदीच किरकोळ-हडकुळी म्हणता येईल इतकी बारीक. थोडा वेळ डॉक्टरांशी बोलून ती निघून गेली. ती गेल्यावर डॉक्टर मला म्हणाले," मागच्या महिन्यात यांचं ऑपरेशन झालं होतं, आता उरलेल्या केमोज् चालू आहेत." त्याक्षणी मला वाटलं,'जर या आजी GA मधून सुखरूपपणे बाहेर येऊ शकतात तर मग मी का उगीचच शंका घेतीए. माझी अवस्था तर यांच्यापेक्षा खूप चांगली आहे.' आणि अचानक मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या-जणू काही त्यासाठीच देवानी त्या आजींना पाठवलं होतं.
याचा परिणाम असा झाला की आता मी दुसऱ्या दिवसाच्या माझ्या सर्जरीची वाट बघायला लागले. आधी मनात जी एक हुरहुर होती तिची जागा आता आतुरतेनी घेतली होती. डॉक्टरांशी बोलून मी परत माझ्या रुममधे आले. नितिन घरी गेला कारण दोन्ही मुली त्याची वाट बघत होत्या. आता तो एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होता- माझ्या सर्जरीच्या वेळी.
रूममधे परत आल्यावर एक खूप महत्त्वाचं काम करायला घेतलं. नितिन ला 'पत्र' लिहिलं. माझी दुसऱ्या दिवशीची सर्जरी निर्विघ्नपणे पार पडणार याची मला पूर्ण खात्री होती. पण 'Hope for the best but be prepared for the worst' या विचाराला अनुसरुन मी माझ्या मनातले विचार कागदावर उतरवायला सुरुवात केली.
जर सर्जरी मधून मी सुखरूपपणे बाहेर नाही पडले तर नितिन नी काय आणि कसं करावं याबद्दलचे माझे विचार त्याच्यापर्यंत पोचणं आवश्यक होतं. मी ठरवलं होतं की त्याला कुठल्याही प्रकारे इमोशनली ब्लँकमेल करायचं नाही. माझ्या नंतर त्यानी दुसरं लग्न करावं की नाही, आणि जर केलंच तर कुणाशी करावं - हे सगळं मी त्याच्यावर सोडलं होतं. फक्त तो जे काही ठरवेल त्यात त्यानी स्वतः इतकाच आमच्या मुलींचा पण विचार करावा. त्यानी अशी परिस्थिती निर्माण करावी की ज्यामुळे मुलींना जेव्हाही माझी आठवण येईल ती नेहमी सुखात असताना यावी.कधीही दुःखामुळे त्यांना माझी आठवण किंवा उणीव भासू नये.
खरं म्हणजे हे सगळं नितिन ला सांगायची गरजच नव्हती. मला खात्री होती की तो मुलींची खूप काळजी घेईल, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. पण तरीही मनातलं सगळं कागदावर उतरवलं. गेल्या तेरा वर्षांच्या आमच्या सहप्रवासात अशा कितीतरी गोष्टी त्याला सांगायच्या राहून गेल्या होत्या. आमचं दोघांचं नातं, मला त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम, आदर आणि विश्वास... हे आणि असं बरंच काही. मनातले विचार झरझर कागदावर उतरत होते. एकीकडे कागद भरत होते आणि दुसरीकडे मन मोकळं होत होतं. लिहिताना मधेच कागद ओला झाल्याचं जाणवलं. तेव्हा लक्षात आलं की मनात जे विचारांचं वादळ चालू होतं ते डोळ्यां वाटेही बरसतंय. हॉस्पिटल च्या त्या एकाकी खोलीत मी एकटीच बसले होते- विचारांच्या गर्दीत कुठेतरी हरवून गेल्यासारखी...हातात कागद आणि पेन होते पण लिहायला आता शब्दच सुचत नव्हते. त्या क्षणी जाणवलं की अशा कितीतरी भाव-भावना असतात ज्या आपण फक्त अनुभवू शकतो. तिथे शब्द नसतात, वाचा नसते- असते फक्त अनुभूती. विचारांच्या या गदारोळातच मी माझं ते स्वलिखित पुन्हा एकदा वाचायला सुरुवात केली; आणि अचानक माझ्या डोळ्यांतलं पाणी थांबलं. मनातले विचार बाजूला झाले आणि मी एखाद्या त्रयस्थाप्रमाणे अगदी निर्विकारपणे सगळं पत्र पुन्हा नीट वाचलं. माझं मनोगत अगदी योग्य शब्दांत पूर्णपणे नितिन पर्यंत पोचेल याची खात्री झाली.मग मी बाहेर जाऊन नर्सकडून एक लिफाफा घेऊन आले. त्यामधे पत्र घालून तो लिफाफा बंद केला. त्यावर नितिन चं नाव घातलं आणि माझ्या सामानात ठेवला.
या सगळ्या विचारमंथनातून एक जाणीव झाली- ती म्हणजे नितिन मुळे माझा हा जीवनप्रवास अविस्मरणीय झाला आहे. We compliment each other. आणि आमच्या दोन्ही मुलींनी तर मला सुखाच्या, पूर्णत्वाच्या शिखरावर नेऊन बसवलं आहे. हे तिघंही माझी strength आहेत. मी खरंच खूप नशिबवान आहे. माझ्या या सुखी, समाधानी आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले. अचानक मन एकदम शांत आणि त्रुप्त झालं.
माझ्या पुढच्या सुखी समाधानी आयुष्याची स्वप्नं रंगवताना कधी झोप लागली कळलंच नाही.
पहाटे अगदी हळूवारपणे कुणीतरी उठवावं तशी जाग आली.लहानपणी परीक्षेच्या दिवशी सकाळी आई जशी हळूच येऊन प्रेमानी उठवायची ना... तशीच. आई म्हणायची,"प्रिया, ऊठ बाळा. आज परीक्षा आहे ना!" तिचा प्रेमळ हात डोक्यावरुन फिरला की आपोआप कॉन्फिडन्स यायचा की आजचा पेपर सोप्पा जाणार. आणि जर कधी टेन्शन आलं तर आई म्हणायची,"काळजी करू नको. तू जो अभ्यास केला आहेस ना त्यातलंच विचारतील परीक्षेत." आणि खरंच तसंच व्हायचं. मला नेहमी प्रश्न पडायचा- आईला कसं कळतं की परीक्षेत काय विचारणार? शेवटी न राहावून मी तिला एकदा विचारलंच. तेव्हा हसून ती म्हणाली होती,"वेडाबाई, मला प्रश्नपत्रिका माहीत नसते पण तू केलेला अभ्यास, तुझी तयारी माहीत असते. आणि म्हणूनच मला खात्री असते की परीक्षेत कुठलाही प्रश्न आला तरी तुझ्याकडे त्याचं उत्तर तयार असेल."
आईचं तेव्हाचं बोलणं आठवलं. तिला सांगावंसं वाटलं-" आई, आज पण माझी परीक्षा आहे; पण आज मला अजिबात टेन्शन आलं नाहीये. कारण या वेळी मला खात्री आहे की मी या परीक्षेत नक्की पास होणार आणि ते ही first class with distinction मिळवून."
सकाळी सहा वाजता नितिन, माझे मोठे काका,माझे सासू-सासरे( हैदराबाद हून मुद्दाम माझ्या सर्जरी साठी आले होते दोघं)-सगळे जण आले. त्यांच्या मागोमाग नर्सही आली मला ऑपरेशन थिएटर मधे घेऊन जायला. आम्ही सगळे O.T. च्या दाराशी पोचलो. तिथून पुढे मला एकटीलाच जायचं होतं.मी मागे वळून पाहिलं, सगळ्यांच्या चेहऱ्यांवर काळजी स्पष्ट दिसत होती. मी काकांना, माझ्या सासू-सासर्यांना नमस्कार केला. डोळे मिटून माझ्या आई-बाबांना पण मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाले,"काळजी करू नका. सगळं ठीक होईल. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी." नितिन कडे बघून त्यालाही एक छानशी reassuring स्माईल दिली आणि मी ऑपरेशन थिएटर मधे प्रवेश केला.
आतमधे मुख्य O.T. च्या बाहेर एका खोलीत एक स्त्री तिच्या ६ महिन्यांच्या बाळाला घेऊन बसली होती. बाळ सारखं कण्हत होतं आणि ती माऊली त्याला जोजवून शांत करायचा प्रयत्न करत होती. मी तिच्याशी काही बोलणार इतक्यात माझे सर्जन त्या खोलीत आले आणि मला म्हणाले," मँम, जर तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या आधी या बाळाची एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर करून घेऊ का? फक्त अर्ध्या तासाचं काम आहे?" माझी काय हरकत असणार? मी लगेच होकार दिला. कुठल्याही प्रकारे त्या छोट्या जीवाला लवकरात लवकर आराम मिळणं महत्त्वाचं होतं त्या क्षणी.
जेव्हा डॉक्टर्स त्या बाळाची सर्जरी करत होते तेव्हा बाहेर मी त्याच्या आईला धीर द्यायचा प्रयत्न करत होते. ती म्हणाली," बघा ना मँडम, डॉक्टर म्हणाले की कँसर आहे आणि त्याची नीट ट्रीटमेंट केली तर माझं बळ पूर्णपणे ठीक होईल. पण गेल्या दोन महिन्यात तीन ऑपरेशन्स झाली. कधी ठीक होईल हो माझं बाळ?" तिला धीर देत मी तिचा हात हातात घेतला आणि आम्ही दोघी मिळून देवाची प्रार्थना करत बसलो.
थोड्याच वेळात त्या बाळाची सर्जरी संपली आणि डॉक्टरनी मला OT मधे बोलावलं. मी देवाचं नाव घेऊन आत गेले.आतमधे सगळे डॉक्टर्स तयारच होते. माझ्या onco-surgeon नी माझी त्यांच्या टीम मधल्या इतर डॉक्टर्स बरोबर ओळख करून दिली.मी त्यांना सगळ्यांना म्हणाले,"माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलण्याच्या अवस्थेत नसेन. म्हणून मी आत्ताच तुमचे सगळ्यांचे आभार मानते.Thank you so much."
मला ऑपरेशन ची सगळी प्रोसिजर नीट समजावून सांगितली गेली आणि मग मला भूल देण्यात आली.त्यानंतर सलग अडीच-तीन तास माझी शस्त्रक्रिया चालू होती. अर्थात मी बेशुद्ध असल्यामुळे मला नाही कळलं पण नंतर डॉक्टर नी सांगितलं.
ऑपरेशन नंतर जेव्हा मी हळूहळू शुद्धीवर यायला लागले तेव्हा मला माझ्या खोलीत हलवण्यात आलं. "ऑपरेशन यशस्वी झालं" हे शब्द कानावर पडले आणि मी देवाचे आभार मानले. पुढे तो पूर्ण दिवस मी गुंगीतच होते. अधूनमधून जाग येत होती. मधे एकदा बघितलं तर समोर नितिन ची मावशी आणि काका उभे दिसले. दोघं मुंबई हून आले होते मला भेटायला. त्यांच्याशी धड दोन शब्द बोलायची देखील शक्ती नव्हती. त्यांना नमस्कार करावा म्हणून हात उचलायला गेले तेव्हा लक्षात आलं... एका हाताला तर सलाइन लागलं होतं. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करता करता पुन्हा डोळे बंद झाले. कधी डोळे उघडून आजूबाजूला बघत होते. समोर नितिन बसलेला दिसायचा आणि मग मी निर्धास्तपणे पुन्हा झोपेच्या आधीन व्हायची. अशा अवस्थेतच २५ तारखेची सकाळ उजाडली.सकाळी मला जाग आली तेव्हा औषधांचा प्रभाव संपल्यामुळे मी पूर्णपणे शुद्धीत होते. पण पोटावर जिथे टाके घातले होते तिथे throbbing pain जाणवत होतं. सलाइन ड्रिप ही चालूच होतं. साधारण आठ वाजता सगळे डॉक्टर्स त्यांच्या सकाळच्या रुटीन राऊंड करता आले. माझे सर्जन, मेडिकल स्पेशालिस्ट, ऑन्कॉलॉजी डिपार्टमेटचे मुख्य(H.O.D.), ट्रेनी डॉक्टर्स असा एक भला मोठा ताफा माझ्या खोलीत आला. मुख्य डॉक्टर्स नी माझी चौकशी केली. अचानक माझ्या लक्षात आलं की 'काल सर्जरी च्या वेळी केमोपोर्ट पण बसवला आहे.' आणि त्याच्या बद्दल अधिक उत्सुकता आहे सगळ्यांना. माझ्या सर्जननी इतर डॉक्टर्स ना माझ्या रिब्ज वर जो पोर्ट फिक्स केला होता त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगितली. त्यांच्या ज्युनिअर डॉक्टर्स ना पूर्ण प्रोसिजर नीट समजावून सांगितली आणि मग त्यांनी माझ्या दिशेनी मोर्चा वळवला. मला म्हणाले,"मँडम, चला आपण दोघं जरा बाहेर फिरून येऊ." त्या अवस्थेत ही मला एकदम हसू आलं. पण पुढच्याच क्षणी वेदनेमुळे जीव कळवळला. कारण माझ्या त्या हसण्यामुळे पोटातले असंख्य स्नायु ओढले गेले होते. दुःख थोडं कमी झाल्यावर मी त्यांना विचारलं,"तुम्हाला वाटतंय का की मी चालू शकेन?" यावर ते म्हणाले,"प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी आहे ना तुमच्याबरोबर." मी विचार केला की ज्या अर्थी हे इतकं इन्सिस्ट करतायत, त्या अर्थी ते आवश्यक आहे. म्हणून मग मी हळूहळू कॉटवरून खाली उतरले. नुस्ता श्वास घेताना सुद्धा पोटावरचे टाके दुखत होते. तेवढ्या वेळासाठी नर्सनी सलाइन बंद करून माझा हात मोकळा करून दिला. पण अजूनही कँथेटर, अँबडॉमिनल ड्रेन ची ट्युब असे काही दागिने होतेच अंगावर. तो सगळा लवाजमा सांभाळत डॉक्टर चा आधार घेत मी हळूहळू एक एक पाऊल टाकत खोलीचं दार गाठलं. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावरचं समाधान आणि आनंद बघून खूप बरं वाटलं. त्यांच्या पुढच्या प्रश्णानी तर मला एकदम 'सुपरवुमन' असल्याची फीलिंग आली. त्यांनी मिस्किलपणे मला विचारलं," Mam, were you operated upon just yesterday? तुमची ही प्रगती बघून तसं वाटत नाहीए म्हणून विचारलं. पण मँम, आता रोज असं थोडं थोडं चालायचं म्हणजे रिकव्हरी लवकर होईल." त्यांना तसं प्रॉमिस करून पुन्हा हळूहळू चालत मी कॉटवर येऊन बसले.
सगळे डॉक्टर्स गेल्यानंतर मी आधी कपाळावरचा घाम टिपला आणि अचानक माझ्या लक्षात आलं की माझं ऑपरेशन होऊन अजून चोवीस तासही नव्हते झाले आणि मी माझा मॉर्निंग वॉक पण करून आले. स्वतः च स्वतः ची पाठ थोपटून शाबासकी दिली. त्यानंतर एक महत्त्वाचं काम केलं.. नितिन साठी लिहून ठेवलेलं पत्र फाडून टाकलं. आता त्याची गरज नव्हती.
त्यानंतरचे पाच-सहा दिवस मला हॉस्पिटलमधेच निरीक्षणाखाली ठेवलं होतं. मिलिटरी हॉस्पिटलमधे पेशंट बरोबर अटेंडंट म्हणून राहायची कुणालाच परवानगी नसते (अर्थातच, लहान बाळं आणि मुलं या नियमाला अपवाद आहेत). पेशंट ला भेटायचं असल्यास visiting hours मधेच भेटता येतं. त्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ मी एकटीच असायची. पण मी मुळातच 'day dreamer' असल्यामुळे मला कधीच एकटेपणा जाणवत नाही. माझे विचार नेहमी मला कंपनी देतात, त्यामुळे मी फारशी कधी बोअर होत नाही. हॉस्पिटलमधे असताना सुद्धा माझे असेच वेगवेगळ्या विषयांवर विचार चालू असायचे. कधी माझ्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडीं विषयी, तर कधी माझ्या पुढील आयुष्याविषयी! कधी मी माझ्या छोट्याशा ट्रान्झिस्टरवर विविधभारती चे कार्यक्रम ऐकत बसायचे, तर कधी पुस्तक वाचन! एका शांत दुपारी मी बेडवर पडल्या पडल्या माझ्या रूम चं निरीक्षण करत होते तेव्हा एकदम मनात विचार आला की 'मला जर या खोलीला re-design करायचा चान्स मिळाला तर मी काय आणि कसं कसं करीन?' Actually, हा माझा छंदच आहे म्हणा ना! मला एकाच जागेसाठी वेगवेगळ्या प्रकारे कसं इंटिरियर डिजाईन करता येईल हे प्लॅन करायला खूप आवडतं. I think by doing so,my creative instinct is satisfied. मग काय, मी लगेच माझी डायरी आणि पेन काढलं आणि पटापट वेगवेगळे प्लॅन्स आणि एलिेव्हेशन्स काढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात माझ्याकडे त्या रूम साठी वेगवेगळे डिजाईन प्लॅन्स तयार होते.. मास्टर बेड/ चिल्ड्रन बेड/ गेस्ट रूम/ स्टडी रूम...... इतकं मस्त वाटत होतं मला तेव्हा.. तेवढ्या वेळापुरता मी माझा आजार, हॉस्पिटल सगळं काही विसरून गेले होते. एकदा अशीच संध्याकाळी रेडिओ वर जयमाला कार्यक्रम ऐकत होते तेव्हा अचानक वॉर्ड मधल्या स्टाफची धावपळ सुरू झाली. इमर्जन्सी केस होती बहुतेक. रूम च्या बाहेर जाऊन माहित करायचा प्रयत्न केला पण सगळेच लगबगीत दिसले, त्यामुळे मग मी परत रूममधे गेले. रात्री अचानक एका स्त्री च्या ओरडण्याचा आवाज आला. ओरडणं म्हणण्यापेक्षा 'विव्हळण्याचा' म्हणणं जास्त योग्य ठरेल. ती संध्याकाळी अँडमिट झालेली मुलगी वेदनांमुळे तळमळत होती बिचारी! सकाळी नर्स ला विचारलं तेव्हा तिनी सांगितलं... "रोड अँक्सिडेंट ची केस आहे. नुकतंच सहा महिन्यांपूर्वी लग्न झालंय तिचं. Brain hemorrhage झालंय. केेस सिरियस आहे." त्या मुलीची -सीमा ची-त्यानंतर चार पाच ऑपरेशन्स झाली. तिची ट्रीटमेंट बरीच lengthy होती. मी जेव्हा जेव्हा माझ्या केमोज् साठी हॉस्पिटलमधे जायची तेव्हा प्रत्येक वेळी मी सीमाला भेटत होते, तिच्या तब्बेतीमधे होणारी सुधारणा बघून मला खूप बरं वाटायचं.
तिचा नवरा रोज संध्याकाळी visiting hours मधे यायचा. तिला आधार देत बाहेर बागेत घेऊन जायचा आणि तिथे बसून दोघं खूप गप्पा मारायचे. त्यांना तसं एकत्र बघून मला खूप समाधान वाटायचं. तिची एक मैत्रीण ही यायची रोज. ती मैत्रीण रोज हिला छान तयार करायची.. ब्रेन सर्जरी मुळे सीमांचे सगळे केस shave off करायला लागले होते, पण तरी तिची ती मैत्रीण सीमाची 'माँग' सिंदूर नी भरायची. तिच्या कपड्यांना मँचिंग बांगड्या, नेलपेंट, टिकली, लिपस्टीक... असा सगळा श्रुंगार करून द्यायची. आणि हे सगळं तिचा नवरा यायच्या आधी व्हायचं. मला सीमाच्या मैत्रिणीचं खूप कौतुक वाटायचं. तिच्या या दिसायला अगदी साध्या आणि सहज क्रुतीमागे मला मात्र खूप मोठा अर्थ दिसत होता. या रुटीन मुळे आता सीमा रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळ ची वाट बघायची. कारण संध्याकाळी ती तिच्या नवऱ्यासाठी तयार व्हायची आणि रोज तो तिची तारीफ करायचा. माझ्या मते त्यामुळे तिचा आत्मविश्वास खूप वाढला आणि त्यमुळे तिची रिकव्हरी पण फास्ट होत होती. Now every day, she had something to look forward to. And this gave her the motivation to get alright again. हा अनुभव मला हे सगळं शिकवून गेला.
ऑपरेशन नंतर हळूहळू माझी शारीरिक शक्ती परत येत होती. मीही ठरवलं होतं की लवकरात लवकर पुन्हा पहिल्यासारखी तब्येत व्हायला हवी आणि त्यासाठी डॉक्टर्स जे जे सांगत होते ते सगळं मी करत होते. रोज कमीत कमी दहा मिनिटे स्ट्रेचिंग एक्सरसाईज, दहा ते पंधरा मिनिटांचा वॉक, प्राणायाम. या सगळ्याबरोबर खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या रिस्ट्रीक्शन्स पण अगदी काटेकोरपणे पाळत होते. मला कुठलाही पदार्थ कच्चा खाण्याची परवानगी नव्हती. फक्त शिजलेलं अन्न आणि उकळलेलं पाणी. अगदी फळं सुद्धा कच्ची नाही- त्यांनाही शिजवून मगच खायचं.एवढंच काय पण भाजी, आमटी मधे कोथिंबीर ही चालणार नव्हती कारण ती पूर्ण शिजलेली नसते. कोणत्याही मार्गे शरीरात जीवाणू/विषाणु शिरू नयेत आणि कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही सगळी खबरदारी घेणं अत्यावश्यक होतं. कारण केमोथेरपी मुळे माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती खूपच कमी झाली होती आणि अशा परिस्थितीत जर एखादं इन्फेक्शन झालं तर मग त्याला कंट्रोल करणं अवघड होतं.
पण त्यामुळे माझी अवस्था अगदी 'आधीच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास' अशी झाली होती. औषधांच्या साईड इफेक्ट्स मुळे माझी अन्नावरची वासनाच उडाली होती. केवळ 'उदरभरण' या एकाच हेतूनी मी अन्न पोटात ढकलत होते. खाण्याबरोबरच चहा,कॉफी किंवा सरबत वगैरे पण नको वाटायचं. पाणी सुद्धा अगदी घोट घोट करून प्यावं लागायचं. कारण एका वेळी एकदम जास्त पाणी प्यायले तर पोटातलं सगळं उलटून पडायची भीती!
पण अशा परिस्थितीतही मला एक खात्री होती आणि ती म्हणजे- 'This is just a passing phase.' लवकरच मी या सगळ्यातून बाहेर पडेन आणि माझी तब्येत पुन्हा पहिल्यासारखी होईल.
माझ्या सर्जरी नंतरची माझी चौथी केमो १३ फेब्रुवारी ला होणार होती. पण यावेळी आणि नंतर ही प्रत्येक IV केमो बरोबरच IP(Inttra Peritoneal) केमो सुद्धा होणार होती. याचाच अर्थ, ऑपरेशन मुळे आलेला वीकनेस भरून काढण्यासाठी माझ्याकडे १३ फेब्रुवारी पर्यंतच वेळ होता. मी स्वतः साठी एक लक्ष्य समोर ठेवलं आणि ते म्हणजे '१३ फेब्रुवारी ला जेव्हा मी केमोसाठी हॉस्पिटलमधे जाईन तेव्हा कुणाचाही आधार न घेता आणि मधे कुठेही न थांबता घरातून गाडीपर्यंत एकटी चालत जाईन.' आत्ता वाचताना(आणि लिहिताना सुद्धा) हे लक्ष्य अगदीच हास्यास्पद वाटतंय पण त्यावेळची माझी शारीरिक स्थिती लक्षात घेता ते माझ्यासाठी एक 'दिव्य'च होतं. माझ्या पोटावर '६०' टाके घातले होते. आणि अगदी साध्या साध्या हालचालीतही त्यातल्या प्रत्येक टाक्याची जाणीव होत होती. पोटभर खाणं जसं मी विसरले होते ना तसंच पोटभर श्वास घेणं, हसणं हेही अवघड झालं होतं. पण मनात एक विश्वास होता-' हेही दिवस जातील.'
शेवटी १३ फेब्रुवारी चा दिवस उजाडला. मी ठरवल्याप्रमाणे हळूहळू का होईना पण एकटी, न थांबता घरातून चालत जाऊन गाडीत बसले. त्या वेळी माझ्यासाठी ती एक खूप मोठी अचीव्हमेंट होती. माझ्या मनाच्या शक्तीची मला पुन्हा एकदा प्रचिती आली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hats off!
Highly inspirational and exemplary.
Regards and Best wishes already.
Even though this is your personal experience, can't help but admire your immediate family for their journey with you..all along.
Truly exceptional.
Awaiting next...

If you feel appropriate, please do think about publishing a book... patients of ovarian cancer will benefit from your story.

Thx

खरंच तुमच्या इच्छाशक्तीला प्रणाम आहे >> +१
किती सहजपणे लिहिल्या आहेत आठवणी. त्या काळात खूप वेळा निराशा, वेदना, दु:ख अशा भावना तुमच्या मनात आल्या असतील कदाचित पण लेखात अजिबात फोकस केला नाहिये त्यावर कुठेही. पॉझिटिव प्रसंग मात्र छोटे असले तरी लक्शात ठेऊन लिहिले आहेत तुम्ही. कमाल !!

अप्रतिम लिहिताय. तुमची पॉझिटिव्हीटी थक्क करुन टाकणारी आहे. >>> + १०००. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचायला हवं तुमचं लेखन. फक्त कँसरग्रस्तच नाही, कुठल्याही व्याधीला, संकटाला तोंड देण्यासाठी बळ पुरवेल असं अफाट लिहित आहात.
हॅट्स ऑफ ____/\___ ! >>>>> +99999

nimita
Really हॅट्स ऑफ!!!!
खूप प्रेरणादायी !!!

कमालीची शूरवीर आहेस...... तुझ्या निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!

Louise L Hay यांच्या You Can Heal Your Life पुस्तकाप्रमाणे तुमची survival story ने मलाinspire केले,आयुष्यात आपण कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतो,फक्त प्रबळ इच्छाशक्ती हवी.

<<< आयुष्यात आपण कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतो,फक्त प्रबळ इच्छाशक्ती हवी. >>>
कॅन्सर होणे हा नशीबाचा भाग आणि तो बरा होणे हा पण नशीबाचाच भाग. पॅनक्रिएटिक कॅन्सर झाला तर प्रबळ इच्छाशक्तीमुळे अंतिम सत्य बदलत नाही.

तुमचे लेख खरोखर मनोधैर्य वाढवणारे आहेत. इथे शेअर केलेत त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्याकरता मनापासून शुभेच्छा.

खुप सुंदर लिहीलं आहे तुम्हि.. जबरदस्त पॉजिटिव्हिटी आणि आत्मविश्वास ..वाचताना खुपदा डोळ्यात पाणी आले...कौतुक आहे तुमचे!

एकाच बैठकीत सगळे भाग वाचले, एखाद्या सिनेमासारखी दृश्ये तरळून गेली. सगळ्या कठीण प्रसंगांना किती धैर्याने, जिद्दीने व सकारात्मकतेने सामोरे गेलात, त्याचेच हे फलित आहे.

तुम्ही एक वरद हस्त लेखिका ही आहात. तुमच्या कुटुंबाबद्दल व त्यातील नात्याबद्दल इतके सुंदर लिहिले आहे की जणू प्रत्येकाला ही हवीहवीशी वाटणारी स्वतःचीच फॅमिली वाटावी. घरातील प्रत्येकाबद्दल चा तुमचा कृतज्ञ भाव खूप काही सांगून जातो.

असे म्हणतात की लढाई सुरू होण्याआधीच त्याचा विजय/पराजय योध्याच्या मनावर ठरलेला असतो. अनेक पेशंट्स मूळ रोगा पेक्षा निराशेमुळे दगावतात. याचे कारण खोल मानस शास्त्रात दडले आहे.एकदा मनाने पराजय मान्य केला की शरीर देखील biologically प्रयत्न करणे सोडून देते, याउलट, जर मनाने एखादी गोष्ट खरी आहे असे मानले तर शरीर अद्भुत चमत्कार घडवून आणते

तुमच्याबाबत अफवा पसरावणारीलासुद्धा तुम्ही माफ केले असेलच. कदाचित तुमच्या आजाराचे स्वरूप ऐकल्यावर निराशे पोटी अशी भावना तयार झाली असू शकते, हरलेल्या मानसिकतेचे हे एक उदाहरण म्हणता येईल, असा benefit of doubt द्यायला हरकत नसावी

मात्र शक्य झाल्यास तिच्याशी जरूर बोला व तुमची विजय गाथा ऐकवा, तिच्या जीवनातही सकारात्मकता उजळून निघेल.

पाचव्या भागाची वाट पहात आहे. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुदृढ निकोप आयुष्यासाठी शुभेच्छा

Pages