फर्स्ट प्रायोरिटी

Submitted by सेन्साय on 20 February, 2018 - 00:03

.

.

माणूस म्हटले की भावना व्यक्त करणे आलेच कारण मन आहे म्हणजे प्रत्येक क्षणाला ते व्यक्त होत राहणार आणि ह्या व्यक्त होण्यालाच कदाचित भावना म्हणत असावेत. अश्या प्रत्येक भावना आपण सर्वांशी शेयर करत नाही किंबहुना करु शकत नाही पण काही व्यक्ती आपल्या आयुष्यात इमोशनल लेवल वर फर्स्ट प्रायोरिटी असल्याने वरील नियमांस हक्काचा अपवाद असतात. म्हणजे कुठलीही गोष्ट घडली की आधी आपल्याला तिला सांगायची असते, नाही सांगितलं तर आपण बेचैन होतो. ती गोष्ट महत्वाची असो किंवा नसो पण आपल्याला ती सांगायची असते, ती सांगताना आपल्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो.
ती व्यक्ती आपल्यासाठी सगळं काही असते अगदी झोपेतून उठलं तरी आपल्याला काहीतरी बोलायचं असत, अगदीच निरर्थक आणि वायफळ बडबड करायची असते आणि हे नातं खूप सुंदर असतं. कधी ते निखळ मैत्रीचं असतं तर कधी एकनिष्ठ प्रेमाचे !

पण ह्या नात्यात गल्लत तेव्हा होते जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की त्या व्यक्तीसाठी आपण पण फर्स्ट प्रायोरिटी असायला हवं. ही भावना नकळत तयार होते आणि रुजत जाते. एखादी साधी वाटणारी गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची वाटायला लागते .आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि ह्यातून तयार होतात ते फक्त गैरसमज. आणि उगिचच माझ्यात आणि तिच्यात एक दरी निर्माण होते. अपेक्षांच्या ह्या दरीत मग संशयाचे धुके अलगद पसरु लागते आणि प्रत्येक सूर्योदयासहित परकेपणाचे दवबिंदु मनाच्या हळव्या कोपऱ्यात अविरत साचु लागतात... दुःखांचा डोह बनण्यासाठी !

जास्त करून हा प्रकार स्त्रीयांमध्ये पत्नी / प्रेयसी / गर्ल फ्रेंड अश्या कुठल्याही नात्याच्या बाबतीत होवू शकतो किंबहुना अनेकदा होतोच.. कारण त्यांना सगळंच सांगायचं असत ..मनात राहीलं तर घुसमट होते.. डोह बनण्याच्या क्रियेत संतत भरच पड़त राहते ! खरे तर ह्या क्षणाला गरज असते त्या साचलेल्या डोहाला प्रवाहीत्व देण्याची... मनातल्या साऱ्या भावना पुन्हा एकदा हक्काने आपल्या जीवलगाशी मनमोकळेपणाने शेयर करण्याची.

तुम्ही "त्या"ची फर्स्ट प्रायोरिटी नक्कीच आहात आणि कायम असणार हां विश्वासाचा निर्झर मनात सतत प्रवाही ठेवला की दुःखांचा डोह अस्तित्वहीन कल्पना फक्त राहील. मला तुझी गरज आहे हे जर "त्या"चे अव्यक्त मनोगत समजून घेतलं तर मुळात सुंदर असलेलं नातं कायमच सुंदर राहील.... दोघांच्या सांमजस्याने आणि प्रेमळ प्रयासाने !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय.

माझ्यासाठी आई फर्स्ट प्रायोरिटी होती, आईची जागा मुलीने कधी घेतली हे लक्षातही आले नाही. ऑफिसात कामाची आग लागलेली असतानाही वेळ काढून मुलीला अर्ध्या पाव मिनिटांचा फोन केला जातो, कॉलेजातून निघाली का, घरी पोचली का, जेवली का विचारायला. तिचा फोन आला की मिटिंग सुरू असतानाही गुपचूप घेऊन नंतर करते सांगितले जाते. तेच आईचा फोन कट केला जातो, नंतर करू म्हणून विसरला जातो. नंतर फोन केला की आईची चिडचिड... फोन करायच्या वेळेस ती चिडचिड आठवली की आता नको, नंतर शांतपणे फोन करून चिडचिड ऐकू म्हणून आईला फोन करणे अजून लांबणीवर.... आईची खूप चिडचिड होते, मला विसरलात तुम्ही सगळे म्हणून. आम्ही विसरत नाही पण फोन करायचे राहून जाते कारण टॉप प्रायोरिटी आता बदल्लीय.

आता आईला फेसबुक सुरू करून दिलेय, भरपूर ग्रुप्स जॉईन करून दिलेत. तिला त्यातून वेळच मिळत नाही. आधी फोन केला की तिच्या तक्रारी ऐकायला मिळत. आता रेसीपी व त्यावरचे तीचे प्रयोग ऐकायला मिळतात. Happy Happy

धन्यवाद साधना Happy
केव्हा केव्हा अगदी आपल्या आयुष्यात अनेक टप्प्यावर आपल्या प्रायोरिटी मनाविरुद्ध बदलत जातात , पण तुम्ही ह्यातूनही छान सुवर्णमध्य साधत साजेसा उपाय अंमलात आणलाय हे पाहुन छान वाटले.

आईचा फोन घेणे जास्त गरजेचे आहे, ती एकटी असते,
काही मेडिकल प्रॉब्लेम आला म्हणून तिने फोन केलेला असू शकतो. तेच मुलगी स्वतःला नीट संभाळण्याइतकी मोठी आहे, तिला फोन करत राहणे तितकेसे गरजेचे नाही.

आपल्या प्रयोरिटी आपले वागणे बदलवतात, कॉन्शस माईंडला जे करणे बरोबर आहे असे वाटते, नेमके त्याच्या विरुद्ध आपल्याला वागायला भाग पाडतात.

लेख थोडा आवडला, थोडा नाही, थोडा पटला अन थोडा नाही पटला. खरेतर एकांगी वाटला, पुरुषी दृष्टिकोनातून लिहिलेला.

पहिला परिच्छेद मात्र खूप आवडला.

स्त्रियांच्या भावनिक गरजेबद्दल सुद्धा काही अंशी सहमत आहे, कारण त्या पुरुषांपेक्षा जास्त हळव्या असतात, स्त्रिया शक्यतो पुरुषांपेक्षा जास्त व्यक्त होत असतात पण म्हणून त्या इमोशनल फुल असतात असे नाही न , जर दोघांत गैरसमज वा दुरावा वाढत असेल तर त्याला फक्त ती किंवा तिची भावनिक स्थिती कारणीभूत नसते, त्या परिस्थितीला ते दोघेही जबाबदार असतात. मुळात गैरसमज तेव्हाच सुरु होतात जेव्हा दोघांतील संवाद तुटतो, किंवा दोघांतील एक दुसर्याला तुच्छ लेखू लागतो. तर असे होऊ नये म्हणून दोघे काय करतात हे महत्त्वाचे आहे.

शेवटचा परिच्छेद तर बिल्कुल नाही पटला, मुळात हि अपेक्षाच चुकीची नाही का कि त्याने न व्यक्त होता तिने समजून घ्यावे.
आपण त्याची,ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीची प्रायोरिटी असावे असे कुणालाही वाटते, पण ते कधीतरी त्याच्या कृतीतून पण दिसायला हवे न
जर असे काही आश्वस्त वर्तन त्याचे नसेल तर कसे तिने त्याचे अव्यक्त मनोगत ओळखायचे. समजा तो तिचा अंधळा विश्वास निघाला तर तिचे काय?
असो
तुमचा लेख वाचून मला जे वाटले ते मी लिहिले, कारण मला खरेच हा लेख एकांगी वाटला, यात फक्त पुरुषी दृष्टिकोन अन त्याची अवाजवी अपेक्षा दिसली मला, त्यापेक्षा जरा तिला समजून घेऊन, सर्वबाजूने विचार केला अन ते त्याच्या कृतीतून जर तिला जाणविले तर कदाचित खरेच तिला विश्वास बसेल कि ती खरेच त्याच्यासाठी काहीतरी आहे.

प्रतिक्रियांबद्दल आभार समाधी आणि मधुसूदन Happy
व्यक्ती सापेक्ष प्रत्येकाचे रसग्रहण आणि अनुमान निश्चित वेगळे असते आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करत तुम्हा दोघांच्याही अभिप्रायकडे पाहिले तरी एकांगी लेख आणि पुरुष प्रधान विशेषण काही पटत नाही कारण ―
"ति"ला उल्लेख ती व्यक्ती आणि "त्या"ला म्हणजे सुद्धा त्या व्यक्तीला इतके ग्रामर लक्षात ठेवत जर वाचला तर लक्षात येईल की इथे जेंडर बायस अजिबात काही लिहिले नाहीये.
धन्यवाद Happy

मलाही हा लेख एकांगी वाटला

ति"ला उल्लेख ती व्यक्ती आणि "त्या"ला म्हणजे सुद्धा त्या व्यक्तीला इतके ग्रामर लक्षात ठेवत जर वाचला तर लक्षात येईल की इथे जेंडर बायस अजिबात काही लिहिले नाहीये.>>>> तुम्ही इथे दिलेले चित्र, २रा आणि ३रा पॅराग्रफ वाचून असे नाही वाटत आहे
तसेही जरी हे एकवेळ मान्य केले की हे जेंडरबायस आहे तरी, एखाद्या व्यक्तीने काहीही gesture न देता, आपण त्याची किंवा तिची प्रायोरिटी आहोत असे मानणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक नाही का

अर्थात हेमावैम

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात इमोशनल लेवल वर फर्स्ट प्रायोरिटी असल्याने वरील नियमांस हक्काचा अपवाद असतात
बहूतेक ही स्पष्ट मांडलेली भूमिका दुर्लक्षून तुम्ही सोयीचे अर्थ काढून स्वतःची फसवणूक तर करून घेत नाहीं ना असेच vb ह्यांच्या करीता मला म्हणावे लागतेय म्हणून क्षमस्व !

{{आपण त्याची किंवा तिची प्रायोरिटी आहोत असे मानणे }} हे फक्त तुमचे विधान आणि मत आहे Happy ज्यात कर्ता बदलला गेलाय आणि आपसूक अर्थ बदलवला गेलाय .

अहो अंबज्ञ, तुमचा लेख वाचून जे वाटले ते लिहिले, आणि लेख वाचून काय कोण आपली फसवणूक करणार म्हणा
असो,
{{आपण त्याची किंवा तिची प्रायोरिटी आहोत असे मानणे }} हे फक्त तुमचे विधान आणि मत आहे Happy ज्यात कर्ता बदलला गेलाय आणि आपसूक अर्थ बदलवला गेलाय . >>> हे माझे नाही तुमचे मत आहे जे नंतर तुम्ही जेंडर बायस आहे असे म्हटलेय
<<<<मला तुझी गरज आहे हे जर "त्या"चे अव्यक्त मनोगत समजून घेतलं तर>>>> हे ते वाक्य
ज्यासाठी मी लिहिले होते की अव्यक्त मनोगत समजून घेण्यात बरेचदा स्वतःची फसवणूक होऊ शकते म्हणून व्यक्त होणे गरजेचे असते

मला वाटते की नकारात्मक प्रतिसाद वाचून ते sportingly घेण्यापेक्षा तुम्ही ते वैयक्तिक घेत आहात.

यावर मी तरी अजून काही लिहीणार नाही, तुम्हाला नाही पटला माझा प्रतिसाद तर सरळ ईग्नोर करा Happy

<<तुम्हाला नाही पटला माझा प्रतिसाद तर सरळ ईग्नोर करा >>
चुकीच्या गोष्टी इग्नोर करणेच श्रेयस्कर Happy

चुकीच्या गोष्टी इग्नोर करणेच श्रेयस्कर ">>>> Rofl Rofl Rofl

तुम्हाला नाही पटला तर दुर्लक्ष करा म्हटले तर मी चुकीची कशी झाली???

प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, आणि त्या व्यक्तिसापेक्ष बदलतात, हे जर मान्य करायला शिकला माणूस ना तर खुप साऱ्या नकारात्मक गोष्टीतही सकारात्मकता दिसू शकते

अन तुमच्या ह्या लेखविषयी म्हणाल तर भले हि एका जोडप्यासाठी लिहिले असेल किंवा तुम्ही म्हणताय तसे खरेच जेंडर बायस असेल पण माझ्या दृष्टीने आहे एकांगी. आता तुम्हाला नाही आवडले किंवा टीका वाटत असेल तर .... Happy

हा खरच माझा शेवटचा प्रतिसाद आहे इथे, कारण जिथे लेखक स्वतः प्रत्येक तर्हेच्या प्रतिसादासाठी तयार नाही, फक्त भांडण किंवा डिफेन्सीव मोड ऑन मध्ये आहे तिथे मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये Happy