फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बेस कॅम्प परत एकदा

Submitted by साधना on 18 February, 2018 - 12:21

अतिशय थकल्या भागल्या अवस्थेत मी गेटच्या आत पाऊल टाकले. आत मॅनेजरसाहेब पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे येरझाऱ्या घालत होते. त्यांचा अवतार पाहून मी महेशलाच रूमची काय व्यवस्था म्हणून विचारले. त्याने पहिल्या मजल्यावर तीन नंबरच्या रूममध्ये सामान ठेवा, मग बघू असे मोघम सांगितले. आम्ही तीन नंबरमध्ये गेलो तर तिथे आधीच सात आठ सॅकस पडलेल्या होत्या. म्हणजे इतके लोक ह्या खोलीत राहणार होते की काय? गेल्या वेळेस आम्हा तिघीना मिळून एक रूम होती.

काय करायचे वगैरे विचार करायला संधी मिळायच्या आधीच जेवायला चला म्हणून बोलावणे आले. साडे अकरा वाजता काय जेवणार? पण नाही जेवलो तर मॅनेजर साहेब उगीच भडकतील या भीतीने मुलींना जेवायला घेऊन गेले. जेवून होत होते तोवर 'डिपॉझिट केलेल्या बॅगा ताब्यात घ्या' म्हणून फर्मान निघाले. दुसऱ्या विंगेतल्या पहिल्या मजल्यावर बॅगा होत्या. मुलींना ताटे धुवून वर घेऊन जायच्या कामाला लावून मनातल्या मनात चरफडत मी बॅगा घ्यायला गेले. तिथे पाहते तर आपल्याला बॅग ठेवताना दिलेला स्टिकर तिथल्या बॅगेवर लावलेल्या स्टिकरशी मॅच करून मगच बॅग मिळत होती. हे जेव्हा ऐकले तेव्हा जाताना स्टिकर्स का दिले होते ते मला कळले. (तशी एरवी मी हुशार आहे हो!) बॅगा डिपॉझिट करायचे काम मी मुलींना दिले होते. त्यांनी स्टिकर्स आणून दिल्यावर मला वाटले ते सोबत नेत असलेल्या सॅक्सना लावण्यासाठी दिले. म्हणून मी ते तेव्हाच सॅक्सना लावून टाकले. यथावकाश आमच्या पदयात्रेत ते पडूनही गेले होते. आता काय करायचे? पहिल्या मजल्यावर बॅगांचा महापूर आलेला. माझी एक मोठी सॅक त्यात चटकन दिसली. मॅडम मॅडम म्हणून ओरडणाऱ्या तिथल्या पोराला अजिबात न जुमानता मी सॅक उचलली. खूप शोधूनही दुसरी बॅग सापडलीच नाही. माझी बॅग तुम्ही लोकांनी हरवलीत म्हणून मी तिथल्या पोरावर खूप ओरडले पण बॅग सापडली नाही.

शेवटी मिळालेली सॅक आधी खोलीत ठेवूया म्हणत माझ्या खोलीमध्ये जाण्यासाठी खाली आले तर मॅनेजर व सुरेशची खडाजंगी चालू होती. झोपायला जागाच नाही म्हणून सुरेश तापला होता. मॅनेजरानी असले छप्पन सुरेश याआधी बघितले असल्यामुळे ते सुरेशपेक्षा जास्त तापले होते. या प्रश्नाचा सामना मलाही करावा लागणार असा विचार करत मी सॅक ठेवायला रूम नंबर तीनमध्ये गेले.

रूम नंबर तीनमध्ये कधीही युद्ध सुरू होईल इतके स्फोटक वातावरण तयार झाले होते. त्या लहानश्या खोलीत एकच बेड होता ज्यावर तीन माणसे जेमतेम झोपू शकली असती. बेड नवा दिसत होता पण त्यावर चादर बिदर काही घातलेली नव्हती, ना उशीचा पत्ता होता. खाली जमिनीवर जाड सतरंजी अंथरली होती. त्यावर फारतर चार मुली झोपू शकल्या असत्या. अर्थात ते झोपणे अजिबात सुखाचे झाले नसते ही बात वेगळी. पूर्ण गुजराती ग्रुप आमच्या सोबत कोंबला होता. सोबत आम्ही तिघी. ऐशूने बेडचा ताबा घेऊन ती घोरत पडली होती, तिच्या बाजूला शामली पडून मोबाईल बघत होती. उरलेल्या बेडवर मुलींनी सॅकमधले सामान अर्धवट उपसून ठेवले होते. त्या दोघी सोडून बाकी सगळा कोलाहल माजला होता. झोपायला जागाच नाही हे बघून सगळ्यांचे पित्त उसळले होते. माझी एक बॅग अजून आणायची असल्याने मिळालेली सॅक तिथे सोडून मी परत खाली गेले.

सुरेश गेटवर तणतणत कसलासा फॉर्म भरत होता. भरताना अधूनमधून 'मै इधर एक पलभी नही रुक सकता' हे वाक्य तो कुणाला स्पेसिफिक असे नसून इन जनरल हवेत सोडत होता. मॅनेजर साहेब तोवर पहिल्या मजल्यावर आले होते व वरून खालचा तमाशा बघत होते. मला बॅगेची काळजी असल्याने मी बॅगेकडे आधी लक्ष द्यायचे ठरवले. आज बॅग मिळाली नाही व उद्या मॅनेजरसाहेबांकडे प्रकरण गेले तर माझे काही खरे नव्हते. माझ्याकडे स्टिकर्स नाहीत हे कळताच त्यांची प्रतिक्रिया काय होणार हे वेगळे सांगायची गरज नव्हतीच. आताच त्यांची तळपायाची आग मस्तकी पोचून तिथून ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या.

परत दोन जिने चढून वर पहिल्या मजल्यावर गेले. माझ्या मागचे चढणे काही सुटत नव्हते. मी पोचले तोपर्यंत बाहेरच्या महापुरातल्या बऱ्याचशा बॅगा मालकवर्ग घेऊन गेला होता. बॅगवाला पोरगा तिथे नव्हता व बॅगांनी भरलेली एक खोली जी आधी उघडी होती तिला कुलूप घातले गेले होते. बाहेर उरल्या सुरल्या बॅगांमध्ये माझी बॅग शोधली पण नाही सापडली. रात्रीचे साडेबारा वाजत आले होते पण आता झोप वगैरे सगळी उडाली होती. परत खाली येऊन त्या पोराला शोधून काढले, दादापुता करून वर घेऊन जाऊन खोली उघडून घेतली व आत बॅगांच्या ढिगाऱ्यात बॅग शोधायला लागले. मागे उभा राहून पोरगा मॅनेजर साहेबांना कळले तर काय होईल हे सांगत होता पण मला ते आधीच माहीत असल्याने मी तिकडे दुर्लक्ष केले. साधारण वीस पंचवीस मिनिटांच्या तपश्चर्येनंतर, भरपूर बॅगा उलटसुलट करून पाहिल्यावर माझी बॅग एकदाची सापडली.

बॅग घेऊन खाली आले तर उन्नती व अजून एकजण गेटकडे फॉर्म भरत होत्या. कसले फॉर्म्स भरत होत्या देव जाणे.... पहिल्या मजल्यावर महेश दिसला. त्याला विचारले. ट्रेक संपायच्या आधीच कॅम्प सोडून जायचे असेल तर तसा फॉर्म भरून द्यावा लागतो म्हणे. म्हणजे सुरेशरमेश पाठोपाठ उन्नती व तिची मैत्रीणसुद्धा कॅम्प सोडून गेले म्हणायचे. मी रूममध्ये पोचले तेव्हा सहा सात गुजरातणी आपले सगळे सामान काढून ते परत भरत बसलेल्या. रूममध्ये अजिबात जागा नव्हती.

मी आणलेल्या बॅगमधून कपडे काढून, माझे हात पाय धुवून, कपडे बदलून आता झोपायचे काय करायचे याच्या विचारात बसले. शामली म्हणाली मॅनेजरला सांग आम्हाला जागा नाही म्हणून. उत्तर काय मिळणार हे माहीत असूनही मी जाऊन त्यांना सांगितले. ते म्हणाले, अब रहो वहीपे, बादमे देखते है। आता रात्रीचा एक वाजत आलेला. अजून बादमे म्हणजे नक्की कधी? मी परत येत होते तर महेश परत भेटला. मी त्याला म्हटले की हा काय आचरटपणा चाललाय, जागेची व्यवस्था का नाही केली जात आहे? तर म्हणे दोन ग्रुप एकदम आल्याने प्रश्न निर्माण झाला. आमचे येणे प्लॅनप्रमाणे होते पण तो दुसरा ग्रुप काल येऊन आज सकाळी जाणार होता. तोही आमच्या बरोबर आल्यामुळे जागेची टंचाई निर्माण झाली. त्यात आपण घाईघाईत बस करून यायची चूक केली म्हणून मॅनेजर भडकलेत. मी म्हटले यात आपली काय चूक? यांनी का नाही बस पाठवतो म्हणून फोन करून आपल्याला सांगितले? तर तो काहीच बोलला नाही. काहीतरी झाले होते नक्कीच. मॅनेजरसाहेबांची खोली बाजूला होती व तिच्यातून बोलण्याचे आवाज येत होते. नक्की काय भानगड झालेली ती फक्त त्या लोकांनाच माहीत होती.

मी गुपचूप रूमवर परतले. तोवर अजून चार गुजरातणी सामान घेऊन निघत होत्या. यांना इतक्या रात्रीची हॉटेले कुठे सापडली हा प्रश्न मला पडला. शामली म्हणाली की त्यांनी सुरेशला फोन करून हॉटेल शोधले. शामली गुजरात्यांच्याच कॉलेजात असल्याने तिला खबरा काढायचे काम चांगले जमते. इथे कुठे टेकायलाही जागा दिसत नसल्याने आपणही हॉटेल गाठूया असा विचार करून मी उरलेल्या तिघा मुलींना सुरेशचा फोन नंबर विचारला पण त्यांच्याकडे त्याचा नंबर नव्हता. आता काय करावे हा विचार करत होते पण शामली खरी हुशार. ती म्हणाली आपल्याला आता कशाला हवे हॉटेल? आपण फक्त सहा जणीच उरलो. आपण तिघी वर झोपू, या तिघी खाली झोपतील. तिचे बरोबर होते. इतस्ततः पडलेले सामान आवरले गेले असते तर नक्कीच झोपायला जागा झाली असती.

मग मी शांतपणे मुलींनी उपसून ठेवलेले सामान आवरले. त्याच्यात अर्धा पाऊण तास गेला. रात्रीचे दीड दोन वाजत आले होते. त्या तिघी मुली सामान आवरून झोपल्यावर मी गॅलरीचे न लागणारे दार लावायचा अयशस्वी प्रयत्न करून शेवटी फक्त मेन दरवाजा लावून बेडवर पडले. खोलीतला लाईट जरी बंद केला तरी खाली रस्त्यावर लाईट होते, आम्ही पहिल्या मजल्यावर असल्याने रस्त्यावरून प्रकाश खोलीत येत होता व लाईट बंद केल्यासारखे वाटत नव्हते. बेड फारसा सुखद नव्हता, उशीही नव्हती. वर फॅन नव्हता, न पांघरायला चादर. पण युथ हॉस्टेलच्या दृष्टिकोनातून हा फाईव्ह स्टार ट्रेक होता. मी गोव्याच्या ट्रेकला गेले होते तेव्हा तंबूत झोपल्यावर तंबूतल्या बिछायतीखालचे दगड अंगाला टोचायचे. सहसा दगड धोंडे काढून जागा साफ करूनच तंबू गाडले जातात. पण शेवटी जंगलच ते! झाडांची वर आलेली मुळे, जमिनीत खोलवर गाडल्या गेलेल्या मोठ्या दगडांचे जमिनीवर आलेले भाग वगैरे गोष्टी काढता येत नाहीत. झोपायची जागा जिथे पटकावली तिथेच मोठा दगड किंवा मूळ निघाले तर तसेच ऍडजस्ट करून झोपावे लागायचे. त्या मानाने खोली व गादी हा स्वर्गच म्हणायचा.

रात्रीचे दोन अडीज वाजत आले होते. मला झोप येत नव्हती. ऐशुची एक झोप होऊन ती आता फ्रेश झाली होती. इतक्या रात्री ऋषिकेशला हॉटेले बरी उघडी असतात हा मला टोचणारा प्रश्न तिच्या अंगावर उडवल्यावर ती म्हणाली, कुठे कोण हॉटेल शोधत लांब गेलेय? तो बघ सुरेश समोरच दिसतोय. आपल्या रस्त्याच्या त्या बाजूला त्याचे हॉटेल आहे. मी पडल्या पडल्याच समोर पाहिले तर खरोखर सुरेश समोरच्या बिल्डिंगीत, गॅलरीत उभा राहून कुणाशीतरी फोनवर बोलत होता. हे गुजराती रात्री अडीज वाजतासुद्धा फोन सोडत नाहीत अशी सुरवात करून थोडे थोडे कुजबुज गॉसिप करत असताना कधितरी डोळा लागला.

इतक्या उशिरा झोपुनही सकाळी सवयीने जाग आली. उठून सगळे आवरून घेतले. मुलींना उठवून आवरायला लावेपर्यंत ब्रेकफास्ट तयार असल्याचा निरोप मिळाला. मी सामान आवरते तोवर तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या म्हणून मुलींना पिटाळून मी बॅग भरायला घेतली. माझी सॅक खूप मोठी असल्यामुळे मी युथ होस्टेलची एक सॅक ट्रेकसाठी घेतलेली. तुम्ही स्वतःची सॅक आणली नाही तर बेस कॅम्पवर सॅक मिळते. ट्रेकला न लागणारे सामान आपल्या बॅगेत ठेऊन ती बॅग बेस कॅम्पवर ठेऊन द्यायची व त्यांच्या सॅकमध्ये ट्रेकचे सामान भरून ट्रेकला जायचे. आल्यावर सॅक परत करायची. याचा चार्ज भरावा लागत नाही.

मी घेतलेली सॅक रिकामी करून माझी बॅग भरत होते तोवर मुली नाश्ता करून परत आल्या. खाली बोलावलंय लौकर... चल, चल करून त्या मला खाली घेऊन गेल्या. खाली सुरेश लोकांच्या घोळक्यात गोरामोरा चेहरा करून उभा होता. तो तर रात्रीच कॅम्प सोडून गेला होता, मग आता परत कसा इथे? शामलीकडे अर्थातच सगळ्या बातम्या होत्या. तो सकाळी परत आला व भांडण करून त्याने नाश्ता मिळवला. नियमानुसार युथ हॉस्टेलने आज सकाळचा नाश्ता देऊन मग आमची पाठवणी करणे अपेक्षित होते. तुम्ही झोपायला जागा दिली नाहीत म्हणून आम्हाला बाहेर जावे लागले, नाहीतर आम्ही गेलो नसतो. त्यामुळे नाश्त्यावरचा आमचा हक्क जात नाही असा फुलफ्रुफ गुज्जू युक्तिवाद करून त्याने मॅनेजर साहेबांना गप्प केले व नाश्ता मिळवला. मग चेहरा का पडलाय?

त्यावर शामलीने सांगितलेली कथा सुरेशच्या दृष्टीने दुःखद असली तरी बाकी ग्रुपच्या दृष्टीने प्रचंड विनोदी होती.

काल कॅम्प सोडणारा सुरेश पहिला होता. शिवाय जाताना तो खूप गाजावाजा करून गेला होता. त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन थोड्या गुजरातणी पण गेल्या. त्यांनी अर्थातच जायच्या आधी त्याला फोन करून हॉटेलची चौकशी केली. सुरेशने त्याचे दोन तीन फोन नंबर इथे लोकांना दिले होते. त्यातला एक नंबर त्याने गुजरातेत बायकोच्या नंबरवर फॉरवर्ड केला होता. आता हा नंबर का द्यावा इथे? तरी त्याने तो दिला. तो कॅम्प सोडून गेल्यावर आमच्या खोलीतल्या ज्या इतर मुली गेल्या त्यांनी आधी सुरेशला फोन लावून चौकशी केली. ते फोन त्यांनी न चुकता आधी त्या फॉरवरडेड फोनवर केले व नंतर सुरेशच्या ऋषीकेशच्या फोनवर. रात्री साडेबारा एकला फोनवर 'हॉटेल कहा है? रूम कैसी है ?' ही बाईच्या आवाजात चौकशी व्हायला लागल्यावर त्याच्या बायकोचे डोके फिरले. त्यात एक्स्ट्रा इंधन म्हणजे याचे लग्नाआधी अफेअर होते. लग्नानंतरही तो घरी खोटे सांगून तिच्याबरोबर बाहेरगावी जायचा. आता ते सगळे संपले होते पण अचानक रात्री बायांचे फोन आलेले बघून बायकोला तोच जुना संशय आला. त्याची सगळी रात्र बायकोला समजवण्यात गेली होती. म्हणजे काल रात्री अडीज वाजता तो फोनवर बायकोची समजूत घालत होता तर... अर्थात ही भानगड सगळ्यांना हिलारियस वाटत होती पण सुरेश खूप नर्व्हस होता. बनारसी साडी घेऊन जा, खड्यांचे दागिने घेऊन जा वगैरे सल्ले देऊन लोकांनी त्याचा मूड नंतर ठीक केला. सुरेशने त्याची खासगी गोष्ट इतक्या लोकांसमोर का जाहीर केली हा प्रश्न मला आधी पडलेला, पण मी असे पाहिलंय की काही लोकांच्या खासगी बाबी ते स्वतःच खासगी ठेऊ इच्छित नाहीत, त्यांना खासगी व सार्वजनिक असा फरक मान्य नसतो.

आमच्या बेस कॅम्पसमोरच एक लॉज होते, जिथे रात्री आमच्या लोकांनी आश्रय घेतला होता. मी सुरेशला प्रत्यक्ष विचारले , त्याच्या मते राहण्यासाठी जागा ठीकठाक होती. आम्हाला तरी कुठे फाईव्ह स्टार जागा हवी होती! दिवसभर फिरून आल्यावर रात्री सुखात झोपण्यापूरती सोय झाली म्हणजे झाले. एका दिवसाचे भाडे पाचशे रुपये होते, कितिही लोक रहा. मुलींना जागा बघायला पिटाळून मी सामान आवरायला खोलीत वर गेले. सगळे आवरून होईपर्यंत एशूने समोरच्या गॅलरीतून फोन करून रूम ठीकठाक असल्याचे सांगितले. मुली परत आल्यावर आमचे सामान घेऊन आम्ही बेस कॅम्पला टाटा बाय बाय करून बाहेर पडलो.

लॉज ज्याचे होते त्याचा लॉज हा साईड बिझिनेस होता, मेन बिझिनेस तेलाचा घाऊक व्यापार. मेन बिझिनेससाठी भले मोठे गोदाम बांधल्यावर जागा उरली असावी. त्याचे काय करावे म्हणून खोल्या बांधून भाड्याने द्यायला सुरुवात केली असावी. तळमजल्यावर छोटेसे ऑफिस व तेलाचे मोठे दुकान होते. पहिला मजला तेलाच्या डब्यांचे गोदाम म्हणून वापरला जात होता. दुसरा मजला लॉज म्हणून वापरला जात होता. साधारण एक मजला 10 ते 12 फूट उंच असतो. पण याने गोदामाचा विचार करून इमारत बांधल्यामुळे एकेक मजला 20 फुटी होता. साधारण जिन्याला आठदहा पायऱ्या असतात, त्यानंतर लँडिंग व पुढे परत आठ दहा पायऱ्या असतात. या लॉजच्या जिन्याला सरळ 40 पायऱ्या होत्या, मध्ये काहीही लँडिंग नाही. तेलाचे गोदाम असल्याने त्या संगमरवरी पायऱ्या तेलाने माखून पूर्ण काळ्या झाल्या होत्या. रस्त्यावर उभे राहून मी त्या वर जाणाऱ्या 40 पायऱ्या पहिल्यांदा पाहिल्या तेव्हा दुसरे हॉटेल पाहावेच हा विचार डोक्यात आला. पण एकच दिवस तर राहायचेय म्हणून विचार झटकून पायऱ्या चढायला घेतल्या. युथ हॉस्टेलच्या ट्रेकचे सूप वाजले तरी माझा ट्रेक काही संपत नव्हता. अगदी आरामात हळूहळू वर चढून पहिला मजला गाठला. तिथून दुसऱ्या मजल्यासाठीही पायऱ्या चाळीसच होत्या पण इथे संगमरवराचा पांढरा रंग दिसत होता.

खोली छान हवेशीर व स्वच्छ होती. तिघी आरामात झोपतील इतका मोठा बेड होता. गरम पाण्यासाठी बाथरूममध्ये स्टोरेज गिझर होता व खोलीत कूलर होता. ऋषिकेशला एसीपेक्षा कूलर जास्त वापरले जातात असे माझे निरीक्षण आहे. खूप ठिकाणी कूलर दिसले. खोलीतला कूलर चक्क वॉशिंग मशीनएवढा मोठा होता. तो वापरला तर त्याचे शंभर रुपये जास्तीचे द्यायचे. पण कूलर वापरण्याइतपत गरम हवा आम्ही तिथे असताना सुदैवाने नव्हती. आदल्या दिवशीच्या दगदगीने व रात्रीच्या नौटंकीने शारीरिक व मानसिक थकवा इतका आला होता की खोली जाताच आम्ही तिघीही बेडवर पडलो व गाढ झोपी गेलो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..
मलाच थकवा जाणवतोय वाचुन हाहाहा..
बिच्चारा सुरेश..

आज निवांत सगळे भाग वाचुन काढले.
साधना, तुझी लेखनशैली ज ब र द स्त आहे, सगळ चित्र डोळ्यासमोर उभे राहात आहे आणि त्यामुळे फोटोंची उणीव जाणवत नाही.
मायबोली अ‍ॅडमिनना सांगुन एकाच धाग्यात सगळी लेखमाला करून घे. Happy

या भागाला मस्त झालाय कसे म्हणायचे? तर युथ होस्टेलचा अनुभव फुकट वाटल्याबद्दल! पुन्हा एकदा { आम्हाला वाचायला} मजा आली लिहितो. पुढच्या ट्रेकच्या आणि लेखाच्या प्रतिक्षेत.

पण असं काही होऊ नये या शुभेच्छा.

मस्त झालाय हा ही भाग साधना.

तुझी लिखाणाची शैली इतकी सहज आहे की अगदी बाजूला बसून तू सगळं सांगते आहेस असं वाटत वाचताना.

हा ही भाग छान! ही मालिका संपली की तुमच्या आधीच्या सहलींचे वृत्तांत लिहा! त्यांच्या उल्लेखावरून त्या देखील एकदम happening झाल्या असणार असं वाटतं!

अवांतर/
यावेळी भायखळा फुले भाजीपाला प्रदर्शनाला (९-१०-११ फेब्रु) कोणी गेलेलं का? खूप छान होतं.

धन्यवाद मित्रांनो, तुम्ही सगळे प्रेमाने वाचता म्हणून लिहावेसे वाटते.

त्यांच्या उल्लेखावरून त्या देखील एकदम happening झाल्या असणार असं वाटतं!>>>>>

हो, आम्ही जिथे जातो तिथे हप्पेनिंग गोष्टीच घडतात! जोक्स अपार्ट, बघणाऱ्याच्या नजरियावरसुध्दा बरेच काही अवलंबून असते. माझ्याबरोबर जवळपास 30-35 जण होते. त्यातल्या काहीजणांना मी जे लिहीलेय ते वाचून हे सगळे कधी घडले असे फिलिंग यायची शक्यता आहे. काही जणांच्या बाबतीत याहूनही बरेच काही घडले असायची शक्यता आहे.

अवांतर/
यावेळी भायखळा फुले भाजीपाला प्रदर्शनाला (९-१०-११ फेब्रु) कोणी गेलेलं का? खूप छान होतं>>>>

मी चुकवले यावर्षी. कंटाळा आला एवढ्या लाम्ब जायचा ह्या एकमेव कारणामुळे चुकवले. गेल्या वेळचे एवढे खास नव्हते व ते सगळे स्टॉल्स इथे नेरुळलाही येतात म्हणूनही कंटाळा केला. फुलांची सजावट खूप छान होती असे फोटोंवरून वाटले.

बाप रे! तेलाच्या डब्यांच्या गोदामाच्या वर रहायच्या खोल्या? वाचूनच धडकी भरली. हे एव्हढं सहन करून तुझी विनोदबुध्दी टिकली हेच आश्चर्य. माझं तर बीपी प्रचंड हाय झालं असतं.