रंगीत तुकडा

Submitted by अभिगंधशाली on 18 February, 2018 - 20:33

ओययय ती पेन्सिल त्यात खुपसू नको बरं. बघ किती भोके पडली."

लेकाजवळचा तो रंगीत तुकडा मी घेतला तसे मन बालपणात धावले. तसे आमचे बालपण खूप छान आणि नेटके होते पण मुलाच्या पिढीइतकी सुबत्ता किंवा चोचलेपणा तेव्हा नव्हता.

आई बाबांकडे काही मागितले तर आठवडाभरानी मिळायचे, कारण त्यामुळे विशेष अडणार नाही हे ते जाणून असायचे. मागणी लगेच पुरी न झाल्याने त्या वस्तूचे अप्रूप असायचे. त्यामुळे तिची काजळी आपोआप घेतली जायची.

हातातला तो रंगीत तुकडा...हो तुकडाच कारण सुपुत्रांनी त्याची वेगवेगळ्या आयुधांनी शस्त्रक्रिया करुन त्याला घायाळ केले होते. त्याचा मूळ आकारच हरवला होता. तो मायेने कुरवळताना मला त्याचे माझ्या लहानपणीचे रुप आठवले तेव्हा तो शुभ्र पाढंऱ्या रंगाचा आयताकृती छोटासा ठोकळा असायचा. त्याचा दुसरा भाऊ लाल निळ्या रंगाचा आणि दोन्ही टोकाला उलट सुलट उतार असलेला असायचा.

वापरुन वापरुन त्यावर काळे थर जमा होऊ लागले की त्याला ड्रेसवर घासून चकाचक करण्याचे काम करताना खूप आनंद मिळायचा. हरवला तर ओळखू यावा म्हणून त्यावर नाव घालून ठेवले जायचे. चुकून हरवला तर जी मुक्ताफळ मिळायची ती आता वापरली की मुलगा त्या भाषिक समृद्धीला हसून हसून दाद देतो. त्यावेळी आम्ही जर हसलो असतो तर.. ही कल्पनाही करवत नाही. आम्ही तो अगदी छोटुकल्या मण्याएवढा होईपर्यंत वापरायचो. त्यानंतर नवीन मिळाला तरी, अनेक दिवस अडचणीला असू दे म्हणून जपून ठेवायचो.

वाढदिवस, return gifts आणि बर्थ डे पार्टी यांचे पेव न फुटलेला तो काळ त्यामुळे त्याचे गरजेपेक्षा जास्त संख्येने असणे कधीच अनुभवले नव्हते.

असा तो तुकडा म्हणजे खोडरबर आता इतक्या वेगवेगळ्या आकारात आणि रंगात मिळते की ते काही काम करते याचा विसरच पडतो. त्याचा छान संग्रह करावा, शो केस मध्ये सजवावे असा मोह होतो.

पण मुलाच्या शस्त्रक्रियांचे प्रयोग बघून त्याला हे अप्रूप वाटत नाही हे प्रकर्षाने जाणवले म्हणून त्याला विचारले तर त्याने कपाटातून अजून अशी दहाबारा खोडरबर काढून दाखवत पुष्टी जोडली, " see I have many more and it’s no use. Teachers ask to draw three lines or cross mark if anything wrongly written. Still many friends give as return gift. I like to do new experiments with all those."

त्याचे म्हणणे पटण्यासारखे असले तरी एक गोष्ट खटकलीच.

खोडरबर हे माझ्यासाठी फक्त शालेय साहित्य कधीच नव्हते. तो एक आधार होता. चुकले तरी चालते. ते पुसता येते शिवाय त्याची कोणतीही आठवण मागे राहत नाही हा विश्वास होता. त्याला रंगीत, विविध आकाराचे सौंदर्य नसले तरी ती अतिशय गरजेची वस्तू होती. आधीची पूर्ण वापरल्यावरच नवीन मिळायची. त्यामुळे त्याची आपसूक काळजी घेतली जायची. चूका झाल्याच तरी दुरुस्त करुन पुन्हा सगळे पहिल्यासारखे करायला संधी होती.

ही संधीच या नव्या शिक्षण पद्धतीने काढली आहे का?

एकतर चूक करायचीच नाही की चूका सतत डोळ्यासमोर राहाव्यात यातली नेमकी कोणती भूमिका यामागे असेल? अशा सतत खुणावणाऱ्या चूका मला हे जमत नाही याचा न्यूनगंड वाढवतील की अधिक चूकाच होतात हा स्वैराचार रुजवतील?

हेच बीज कदाचित फोफावत आहे. ज्याला त्याला सगळेच perfect आणि आता तर more than 100% हवे आहे. यात जराही उणे झाले की नैराश्य येते. सगळे नकोसे होते. आपण काहीच करु शकत नाही याचा वणवा भडकतो आणि सगळे हरवून जाते.

खर म्हणजे प्रत्येकाकडे अशी खूप सारी खोडरबर असतात फक्त ती अचूक वेळी वापरली पाहिजे. इर्षेचे खोडरबर हार पुसून आहे तिथून पुढे जाण्याची तयारी करायला, माफीचे खोडरबर लहानसहान रुसवे-फुगवे दूर करण्यात, उद्रेकात काहीच प्रतिक्रिया न देऊन शांतता सांभाळण्यात, छोट्या समारंभाचे तोच तोचपणा घालवण्यात, गमतीशीर विनोद तंग वातवरण हलके करण्यात वापरले तर सुखी कोण? या प्रश्नाला मी म्हणून आपसूक उत्तर मिळेल. कारण परवाच एका तज्ञांनी सांगितले,

“No one is perfect we all are near to perfection.”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. Happy

मॅम तुम्ही साक्षी कदम या नावाने बेधुंद लहरी अॅपवर लिहीता का...तसं नसेल तर तुमचा लेख साक्षी कदम या नावाने तिथे प्रसिद्ध केलाय...त्याची लिंक खालीलप्रमाणे:-

नवीन कथा :: रंगीत तुकडा

ओययय ती पेन्सिल त्यात खुपसू नको बरं. बघ किती भोके पडली.
लेकाजवळचा तो रंगीत तुकडा मी घेतला तसे मन बालपणात धावले. तसे आमचे बालपण खूप छान आणि नेटके होते पण मुलाच्या पिढीइतकी सुबत्ता किंवा चोचलेपणा तेव्हा नव्हता.
आई बाबांकडे काही मागितले तर आठवडाभ...

लेखक : साक्षी कदम , बेधुंद लहरी
http://www.bedhundlahari.com/story?2381

-

ही त्याची लिंक आहे...जर तुम्ही त्या नसाल तर योग्य ती कारवाई करा..कारण या मॅडमनी आधी एकदा चौर्यकर्म करून झालय..जुई म्हणजे द्वादशांगुलाची बिर्याणी कथा चोरलेली....एकदा त्यावर कारवाई करूनही त्यांनी पुन्हा ही हिम्मत केलीये...तेव्हा जर तुम्ही त्या नसाल तर त्यांना धडा शिकवा...