पर्यटनाचा आनंद अवर्णनीय

Submitted by Pradipbhau on 16 February, 2018 - 07:05
ठिकाण/पत्ता: 
विटा

आम्ही तीन दिवस कर्नाटकातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी ट्रिप आयोजित केली होती. पहिल्या दिवशी बनाळी, विजापूर, कुडाळ संगम, अलमट्टी धरण, होस्पेट या ठिकाणांना भेटी दिल्या. दुसऱ्या दिवशी बदामी, ऐहोळे, हंपी, ही ठिकाणे पहिली. तिसऱ्या दिवशी हुबळी,बेळगाव पाहिले. एक तर रस्ते चांगले, हायवे प्रवास त्यामुळे एकही क्षण कंटाळवाणा झाला नाही. खासगी वाहनाने आम्ही हा प्रवास केला. जेवणाचे थोडेफार हाल झाले मात्र प्रेक्षणीय स्थळे पाहताना त्याची जाणीव देखील झाली नाही.
------------------ ------------------------- ----- --------- --- ----- --------
25 जानेवारीला आम्ही ट्रिपसाठी घर सोडले. सकाळी आठ वाजता प्रवासास सुरवात केली. जत पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बनाळी येथे आलो. येथे बनशंकरीचे पुरातन मंदिर आहे. ज्यांना बदामी येथे जाणे शक्य होत नाही ते भाविक बनाळी येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. आम्ही मंदिराचा संपूर्ण परिसर फिरून पाहिला. शांत रमणीय परिसर वनराईने नटलेला आहे.
बनाळी हून आम्ही विजापूरला जाण्यास निघालो. उन्हाची तीव्रता जाणवत होती. सुरवातीला विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक गोलघुमट पाहण्यासाठी गेलो. महंमद आदिलशहाचा हा मकबरा आहे. प्रतिध्वनीची किमया येथे पहावयास मिळते. एका आवाजाचे सात प्रतिध्वनी ऐकावयास मिळतात. त्यानंतर आम्ही इब्राहिम रोजा, बारा कमान, मलिक ए मैदान, उपली बुरुज, जोड घुमट, पुरातन वस्तू संग्रहालय, असर महाल, मेहतर महाल, गगन महाल ही ऐतिहासिक स्थळे पहिली. विजापूर येथे जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासास निघालो.
विजापुरातून आम्ही कुडाळ संगमला जाण्यास निघालो. घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा नदीच्या काठावरील हे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. या तीन नद्यांचा संगम येथे झाला आहे. हुनगुंड तालुक्यातील हे ठिकाण आहे. येथे चालुक्य शैलीतील संगमेश्वर मंदिर आहे. प्रत्येकी वीस रुपये देऊन नदीच्या पात्रात नौकाविहार देखील करता येतो. जगातील आकाराने मोठे असलेले घुमटाच्या आकाराचे सभाभवन येथे आहे. देवालयाचा समुदायच येथे पहावयास मिळतो. पाण्यातील पिंड पाहण्यासाठी काही पायऱ्या चढून काही पायऱ्या उत्तराव्या लागतात.
या ठिकाणी पेरू विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वादिष्ट पेरु खाण्याची मजा काही औरच आहे.
कुडाळ संगम पाहून 85 किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही बदामीच्या दिशेने निघालो. बदामी गावापासून चार किलोमीटर अंतरावर बनशंकरीचे स्थान आहे. जेवण करून आम्ही बदामी देवस्थानच्या दिशेने निघालो. देवीची यात्रा असल्याने प्रचंड गर्दी होती. मंदिराच्या आवारात जाऊन देवस्थानच्या खोल्यांची चौकशी केली. सगळीकडे रूम्स फुल चे बोर्ड पहावयास मिळाले. रुम मिळाली नाही तर काय करायचे. रात्रीचे अकरा वाजलेले. हृदयात धडकीच भरलेली. मात्र नशिबाची साथ व देवीचा आशीर्वाद असल्याने एका ठिकाणी रूम उपलब्ध झाल्या. रात्रीची झोप व विश्रांती झाली. पहिला दिवस पार पडला.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून देवीचे दर्शन घेतले. बदामीचा परिसर पाहण्यासाठी बाहेर पडलो. बागलकोट जिल्ह्यातील हे तालुक्याचे ठिकाण. डोंगराच्या कुशीतील सरोवराचे दर्शन घडले. सुंदर नौकाविहार केंद्र असून विद्युत नावेची नौकाविहार साठी सोय आहे. रंगीबेरंगी दगड परिसराची शोभा वाढवतात. गुहेतील विविध मंदिरे अपूर्व तंत्रज्ञानाचा उल्लेखनीय नमुनाच आहे. शैव गुहा गभगृह, सभामंडप, मुखमंडप या तीन विभागात आहे. प्रकाश योजना नीट नसल्याने शिल्पमूर्ती स्पष्ट दिसत नाहीत. आठरा हाताची नटराजाची मूर्ती, महिषासुरमर्दिनी, अर्धनारीश्वर, हरिहर, गजवृषभ, ही शिल्पे पाहून आम्ही वैष्णव गुहा, बौद्ध गुहा पाहण्यासाठी गेलो.
प्राचीन वस्तू संग्रहालय पाहून आम्ही 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐहोळे या ऐतिहासिक स्थानाला भेट देण्यासाठी निघालो. रस्ता अतिशय खराब असल्याने खूपच हाल झाले. खड्डे चुकवत आम्ही एकदाचे त्या ठिकाणी पोहचलो. चालुक्य शासन कालातील हे वास्तू शिल्प केंद्र. त्यावेळच्या इमारती, देवालये आजही पहावयास मिळतात. भारतीय नागरिकांना प्रत्येकी पाच रुपये तर परदेशी व्यक्तींना 100 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. येथे 22 विभागात 123 मंदिरे आहेत.
दुर्ग देवालय इ.सन. 742 मधील आहे. हे सर्वात सुंदर देवालय मानले जाते. एक गर्भगृह व चारी बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे. सुंदर मूर्तिकला आहे. कुटीर, नायिदर, लाडखान, सूर्यनारायण, गौडर, बडीगेर, चक्र, अंबिगा, चिक्की, हुच्च मल्ली ही देवालये प्रेक्षणीय आहेत. रावनफडी गुफा, ज्योतिर्लीग देवालय, विरुपक्ष देवालय, मल्लिकार्जुन देवालय, बौद्ध चैत्यालय, मोगिती देवालय, कौंती देवालय, तुंबकेश्वर देवालय, चरंती, हुछपाययन मठ, जैन देवालय, रामलिंगेश्वर पाहून मन थक्क होते.
येथे पुरातत्व वस्तू संग्रहालय देखील आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शुक्रवार वगळता अन्य सर्व दिवशी पाच रुपये प्रवेश फी आकारून येथे प्रवेश दिला जातो.
येथून 13 किमी अंतरावर असलेल्या पट्टदकल येथे आम्ही आलो. भारतीय नागरिकांना दहा रुपये व परदेशी यात्रींना 250 रुपये शुल्क आकारले जाते. हा देखील पुरातन देवालयाचा परिसर आहे. येथील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. काडसिद्धेश्वर, जम्बलिंग, गळगनाथ, संगमेश्वर, विरुपाक्ष, मल्लिकार्जुन, काशीविश्वेश्वर, पापनाथ आदी मंदिरे त्या काळाची साक्षीदार आहेत.
जेवणं करून आम्ही हंपीच्या दिशेने निघालो. आपल्या गाडीने तेथे जाता येत नसल्याने गाडीचे पार्किंग करून आम्ही त्यांच्या वाहनाने गेलो. त्यासाठी प्रत्येकी वीस रुपये व प्रवेशासाठी प्रत्येकी तीस रुपये द्यावे लागले. येथे मात्र नियोजनाचा अभाव जाणवला. पर्यटकांची संख्या व वाहनांची सुविधा याचा कोणताही ताळमेळ नसल्याने खूप हाल झाले. पुरातन विठ्ठल मंदिर, अन्य शिल्पे, भुसख्खलनात गाडले गेलेले अवशेष, मोठमोठ्या दगडातील कोरीव काम सारे काही पाहण्यासारखे होते.
विजयनगरची राजधानी हंपी. तुंगभद्रा नदीच्या काठाला वसलेले ठिकाण. विरुपाक्ष मंदिर हे येथील मुख्य आकर्षण. आम्ही सात वाजण्याच्या सुमारास तेथे पोहचलो. येथे शिवमंदिर विरुपाक्ष मंदिर म्हणून ज्ञात आहे. मंदिरातील कलाकुसर पाहण्यासारखी आहे. विक्रेत्यांची रेलचेल आहे. येथे परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
आम्ही हंपी परिसरात मुक्काम करण्याचे ठरविले होते. मात्र सलग सुट्ट्या असल्याने पर्यटकांची वर्दळ होती. एकूणच हंपी, होस्पेट, कुडाळ संगम येथे रूमला तीन ते चार हजार रुपये सांगितले जात होते. आम्ही हुबळी, बेळगावला जाणारच होतो. त्यामुळे हुबळीतच मुक्काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
रात्री अकरा वाजता आम्ही हुबळीत पोहचलो. सुदैवाने बस स्थानक परिसरात आमची निवासाची व्यवस्था एका लॉजवर झाली. सकाळी इडली सांबार चा नाष्टा करून आम्ही जुन्या हुबळीत जाण्यास निघालो. साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सिध्दारुढ स्वामी मठात आम्ही पोहचलो. शांत व स्वच्छ असा हा प्रशस्त परिसर. येथे राहण्याची सोय देखील होते. त्यानंतर आम्ही बेळगाव जवळील अनगोळ येथे परमार्थ निकेतन मद्ये आलो. कलावती आईंचे दर्शन घेतले. हा देखील शांत परिसर नामस्मरण करण्यासाठी भक्तांना आकर्षित करणारा.
बेळगावला खवा व मांडे चांगले मिळतात. त्याची चव घेऊन आम्ही आमच्या ट्रीपची सांगता केली. या तीन दिवसात आम्ही 1140 किमी प्रवास केला.

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 16, 2018 - 06:54
Group content visibility: 
Use group defaults

बापरे, एका दिवसात हंपी झाले पण? सोबत बदामी व ऐहोळ पण? हम्मम्म..

छान. वर्णन अजून थोडे विस्तृत व सोबत फोटो दिले असते तर बरे झाले असते.

छान माहिती करुन दिली.. ३ दिवसात इतकं पाहिलत.. फोटो अजुन असतील तर इथे टाका म्हणजे आंम्ही देखिल कधी जायचं तर ठरवु शकतो... कर्नाटक ट्रिप. Happy

कुडलसंगमा हे ठिकाण वगळता सर्व भाग पाहिले आहेत. शिवाय लखुंडीसुद्धा.
१) साधारणपणे हंपी उत्सव आणि बनशंकरी जत्रे जानेवारीत( पौष अष्टमी ते पोर्णिमा रथयात्रा, आता एकादशीपासून पौर्णिमा. ) असतात त्यावेळी अतिशय गर्दी होते त्या तारखा धेटवरून सर्च करून टाळाव्यात.

२) बिजापूर (१दिवस) -बदामी (२दिवस) -
बदामी - पट्टदकल(१३किमि)- ऐहोळे(+१३किमि) -हुनगुंड(+१३किमि) हायवेने -इल्कल -होस्पेट(२ दिवस,+८०)असा मार्ग आहे.
३) होस्पेट शहर -हंपि ११ किमि.
४)बेल्लारी - होस्पेट -हुबळी मार्गावर
होस्पेट - लखुंडी (४०किमि) -हुबळी -(६०किमि)

मस्त माहिती आणि फोटो ही सुरेखच.

तिथे जायची खूप इच्छा आहे , फोटो बघून तर जास्तच बळावलीय.

फोटो सुंदर आहेत
मला सौंदतीला जायचय, दोन दिवसात परत काय पहाता येईल आही आठ जण आहोत