सायकलविषयी सर्व काही ७ (१० हजारच्या आतल्या सायकली)

Submitted by आशुचँप on 8 December, 2017 - 05:13

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
भाग ५
https://www.maayboli.com/node/64622
(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)
भाग ६
https://www.maayboli.com/node/64648
(सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?)
===================================================================

गेल्या भागात आपण सायकलच्या किंमती कशावर अवलंबून असतात हे पाहिले. अर्थात त्यात बरीच तांत्रिक माहीती ठासून भरल्याने अनेकांना तो कंटाळवाणा वाटला असल्याची शक्यता आहे. आणि असेही हा विषय इतका मोठा आहे आणि मी इतकाही त्यातला तज्ज्ञ नसल्याने किती लिहावे यावर मर्यादा आहेच.

लिहून झाल्यावरही अनेकदा वाटत राहते की हा मुद्दा राहून गेला, तो मुद्दा अजून स्पष्ट करायला हवा होता. बरेच वेळा प्रश्नोत्तरातून काही मुद्दे लक्षात येतात, त्यामुळे ही लेखमालिका नुसती माहीतीपर न राहता इंटरअॅक्टीव्ह झाली तर जास्त आवडेल. तुमचे प्रश्न कितीही बेसिक वाटले तरी विनासंकोच विचारा, मी माझ्यापरीने शक्य तितके उत्तर देण्याचे प्रयत्न करेन.

गेल्या भागात दिल्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या सायकलचे बजेट ठरवले असेल तर त्यानुसार सायकली कशा निवडायच्या यावर या भागात माहीती देतो.

रु. १०,००० च्या आतल्या सायकली

भारतात सगळ्यात मोठ्या प्रमाणात विक्री होणारा सेगमेंट. याचे कारण अजून आपली मानसिकता सायकलींवर खर्च करण्याची झालेली नाही. अनेकांना १० हजार पण खूप जास्त वाटतात. असो.
तर या सेगमेंटमध्ये फार क्वचितच परदेशी बनावटीची सायकल येत असेल. ज्या आहेत त्या सगळ्या भारतीय बनावटीच्या, स्टीलच्या सायकली. मी मागच्या भागात म्हणल्याप्रमाणे ऑफ रोड सायकलींग करण्याचा विचार नसेल आणि वापर मुख्यत्वे शहरी रस्त्यांवरच होणार असेल तर माऊंटन बाईक्स टाळलेल्या उत्तम.
पण तुम्ही नुसतेच दुकानात चक्कर मारायला गेलात तर तुम्हाला माऊंटन बाईक्सची रेलचेल दिसेल. भारतीय बनावटीच्या अनेक सायकलीपण त्याच गटात मोडतात. आणि दहा हजारच्या खालच्या अनेक सायकली ना धड पूर्णपणे एमटीबी ना धड सिटी, पण जडच्या जड, त्यात फ्रंट सस्पेशन, बॅक सस्पेन्शन, जाड-जुड टायर्स अशा दिसतात. आणि दुकानदारही त्या कशा मजबूत आणि टिकावू आहेत असे सांगत आपल्या गळ्यात लोढणे घालतात. उत्साहात घरी आणून काही दिवस चालवले की मग त्या चालवायचा कंटाळा येतो आणि मग त्या पडून राहतात.

आणि दुर्दैवाने हेच लोक बाकी लोकांना निरुत्साही करण्याचे काम करतात. अरे नको घेऊ सायकल, वापर होत नाही, मी घेतली होती चांगले ८-१० हजार घालवून, महिन्याभरात पडून राहीलीये, गंजत पडलीये आता.

तर हे आता आपले होऊ नये यासाठी काय करावे?

तर सगळ्यात बेस्ट म्हणजे, सिंगल गियरची सायकल. (काहीजण विदाऊट गियर म्हणतात, पण असे नसते, सायकलला एक गियर असतोच, म्हणूनच ती पुढे जाते).
जर बजेट अगदीच तोकडे असेल आणि दहा हजारपेक्षा जास्त घालण्याची इच्छा नसेल जर वापर पाच - दहा किमी पेक्षा जास्त नसेल, ज्या भागात राहता तिथे फार चढ-उतार, फ्लायओव्हर नसतील, लांब राईडपेक्षा केवळ फिटनेस आणि रोजच्या रोज व्यायाम म्हणून चालवायची असेल तर सिंगल गियर इतके सुखाचे काही नाही. मल्टी-गियर सायकलला शिफ्टर, डिल्युलर असे फार सांभाळावे लागते. आणि वजनी मल्टी गियरपेक्षा साधी, सोपी, सुटसुटीत सिंगल गियर कधीपण मस्त.

आणि अजून एक सिंगल गियरवर लांबच्या राईड मारता येत नाहीत असे काही नाही. म्हणजे खरे सांगायचे तर मलाही तसे वाटत होते पण नुकतेच नाशिकच्या महेंद्र महाजननी काळा घोडा उर्फ दुधवाला सायकलवर २०० किमीची बीआरएम वेळेत पूर्ण केली. सायकलींग म्हणजे महागडा छंद नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी हे आव्हान पेलून दाखवले.

आणि याही पेक्षा भारी म्हणजे, पुण्याचा संतोष होली हा एक अजब युवक. याने मल्टीगियर घ्यायला पैसे नव्हते म्हणून बायकोने गिफ्ट केलेल्या सिंगल गियरवर संपूर्ण भारतभ्रमण केले.

त्याची सायकल तिचे नाव त्याने मरिच ठेवले आहे, त्यावर त्याने २३ दिवसात ३७०० किमी चालवले आणि त्याचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आले. त्या नंतर त्याने १११ दिवसात १५,२२२ किमी सायकल चालवत गिनिज बुक मध्ये पण नाव नोंदवले. त्याच सिंगल गियर सायकलवर.

https://www.facebook.com/santosh.holi

हॅट्स ऑफ त्या माणसाला.

तर सस्पेशन, २१ गियर्स, डिस्क ब्रेक असल्या फिचर्सचा मोह टाळा आणि हलकी-फुलकी सिंगल गियर घरी आणा. आणि सध्या याचाही वर्ग वाढत चालल्याने भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

BROOKS MYTH SS 26 - (2017) ₹7,999

MACH CITY IBIKE SINGLE SPEED (2015) ₹6,799

ATLAS PRONTO DX 26 (2014) ₹4,481

RALEIGH MY RIDE S/S (2017) ₹7,525

Firefox Axxis 26 8,750

MACH CITY IBIKE Women MULTI SPEED (2016) ₹8,649

BSA LADYBIRD EVITA (2016) ₹5,450

या नमुन्यादाखल काही सायकली.

याच दरम्यान, सिंगल गियर शोधताना या ब्रँडवर नजर पडली. bikeARK नावाचा हा ब्रँड चेन्नईमध्ये आयआयटी मद्रासच्या पदवीधर मुलांनी सुरु केला आहे. तीनच महिने त्यांना झाले असून त्यांच्या या आकर्षक बनावटीच्या सायकली बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. हाय टेन्साईल स्टीलचा वापर करून फ्रेम बनवल्याने त्या हलक्या आहेत आणि युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी अलॉय व्हिल, डिझायनर हँडलबार्स आणि किंमत ८ ते ११ हजारच्या दरम्यान. या सायकली अॅमेझॉनवर देखील उपलब्ध आहेत.

https://www.amazon.in/s/ref=w_bl_hsx_s_sp_web_0?ie=UTF8&search-alias=aps...

(अजून एक गोंधळ होऊ नये म्हणून - सिंगल गियर सारखीच फिक्सी हाही एक प्रकार आहे. वरून दिसताना दोन्ही सेम दिसतात पण त्यात फरक असा आहे की सिंगल गियर म्हणजे आपल्या नेहमीच्या साध्या सायकली, तर फिक्सीला हब फिक्स असतो म्हणजे त्याला ब्रेक्स नसतात, पॅडल मारणे थांबवले तर सायकल थांबणार, आणि पॅडल उलटे फिरवले तर उलटी जाणार. फिक्सी अजून आपल्याकडे फारश्या उपलब्ध नाहीत पण ऑनलाईन कुणी मागवायचे ठरवले तर गडबड होऊ नये म्हणून ही पोस्ट) आणि मी वरती उल्लेख केलेल्या बाईकआर्कच्या सायकली दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत.

डिस्क ब्रेक आणि सस्पेन्शन हवेच असणाऱ्यांसाठी
Hero Icon 26T Single Speed With Disc Brake - Sea Green & Black 9,794.00

मल्टी गियर सायकली

आता ज्यांना सिंगल गियर सायकल नकोच आहे, किंवा ज्यांना पुढे मागे मोठ्या राईड्स डोक्यात आहेत, किंवा ज्यांना सुलभपणे सायकल चालवता यायला पाहिजे अशांसाठी मल्टीगियर पण उपलब्ध आहेत. पण त्या चांगल्याच वजनी असणार आहेत हा तोटा लक्षात ठेवलाच पहिजे.

त्यातली मी रेकमेंड अनेकांना करतो ती म्हणजे रॉक रायडर.

https://www.decathlon.in/p/8284495_rockrider-300-mtb-black.html?gclid=Cj...

ही माऊंटन बाईक असली तरी नॉर्मल एमटीबी पेक्षा हलकी आहे आणि पळवायलाही छान आहे. माझ्या अनेक मित्रांनी घेतली आहे. तुमच्या जवळपास डेकथलॉन स्टोअर असेल तर जाऊन एक राईड मारून या.

Hercules Roadeo Hardliner 18 Speed Cycle - 9,999.00

ही अल्युमिनियम अलॉय असल्याचा दावा आहे तरी तिचे वजन १८ किलो आहे. सस्पेन्शनमध्ये दोन-अडीच किलो धरले तरी बाकीचे वजन कशाने एवढे वाढले कोडेच आहे.

याखेरीज फायरफॉक्स आणि श्नेल यांच्याही काही सायकली १० हजारच्या आत मिळतात. त्यात फायरफॉक्स नक्कीच चांगला आहे श्नेलपेक्षा एवढे नक्की.

या व्यतिरिक्त अजून कोणाच्या पाहण्यात, वापरण्यात अशा काही सायकली असतील त्यांच्या बद्दल लिहा, कळवा, फिडबॅक द्या आणि नव्याने खरेदी करणाऱ्यांना उपयोग होईल...

पुढच्या भागात १० हजार ते २० हजार दरम्यानच्या सायकलींबद्दल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MACH CITY IBIKE SINGLE SPEED << ही सायकल पण छान आहे.
१०-१५ किमी पर्यंत सिंगल गियर च्या सायकल वापरायला काहिच अडचण नाही येत.

चांगली माहिती. पण सायकल घेणार असाल तर थोडे बजेट वाढवुन घेतलेली चांगली. पुण्यात सिंग सायकल वाला अ‍ॅडव्हान्स मधे दर महिना पैसे जमा करुन घेतो बजेट एवढे पैसे जमा झाले की सायकल घ्यायची. तसेच बजाज चा फायनान्स चा पर्यायही त्याच्या कडे उपल्ब्द आहे.

मी माझ्या मुलीसाठी ही ७ गियर्स ची सायकल घेतलीय. मड गार्ड, सीट कव्हर, स्टँड, घंटी वगैरे बसवून १० हजारापर्यंत गेली.

https://m.decathlon.in/p/8358731_7-series-women-s-mtb-white.html

ती १ किलोमीटरवर असलेल्या शाळेत घेऊन जाते.

पुण्यात सिंग सायकल वाला अ‍ॅडव्हान्स मधे दर महिना पैसे जमा करुन घेतो बजेट एवढे पैसे जमा झाले की सायकल घ्यायची.

अच्छा, सरदारजी हे पण करतो का, हे नव्हते माहीती. माझी पहिली रायडर अॅक्ट त्याच्याकडेच घेतलेली. मी छोटी राईड मारून आलो तर म्हणे इतक्याने काय होणारे जरा लांब चालवा. बाकी डिलर्स म्हणजे शोरूम बाहेर सुद्धा सायकल काढू देत नाहीत. बेस्ट माणूस आहे तो.

बाइकआर्क च्या सायकल्स मस्त दिसतायेत..

हो, मस्त आहेत. पुण्यातही मिळतात म्हणतोय तो.

मी भारतात मॉंट्राची हायब्रीड बाईक घेतली होती. मस्त होती एकदम. हलकी होती आणि छान पळायची.

बेस्ट माणूस आहे तो. >>>> त्या सिंग सायकलवाल्याबद्दल खूप ऐकलं होतं. पण तो माणून आमच्याशी फारच नॉट सो फ्रेंडली वागला होता. म्हणजे सगळ्यात दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्याची गोष्ट म्हणजे गिर्‍हाईक हे अगदी पुरेपुर दाखवलं होतं! त्या दुकानातला दुसरा मॅन चांगला होता म्हणून सायकल घेतली त्यांच्याकडूनच पण आम्ही सरदारजींचं काय घोडं मारलं होतं देव जाणे.

पराग - अरे बायकोशी भांडून आला असेल त्या दिवशी Happy
सिंग सायकल - कर्वे रोड, सोनल हॉल समोर
रांका ज्वेलर्स च्या जवळ
अगदी मेन रोडवर च आहे

सिंग सायकल्सवाला सरदार बेश्ट आहे. मी २०११ मध्ये त्याच्याकडून सायकल घेतली. घराच्या जवळपास कुठे जायचं असेल तर वापरू म्हणून. कॉलेजमध्ये काळा घोडा होता, त्यानंतर प्रथमच वापरणार होते. त्याने मला L A Sovereign ची रोड बाईक घ्यायला लावली सहा - सात हजाराची. मी बराच हट्ट केला तरी गियर लावून दिले नाहीत - दोन महिने वापरा, मग वाटलं तर लावू म्हणून. दोन महिन्यांनी मी गेल्यावर फक्त मागचे सहा गियर लावून दिले. (त्याचं म्हणणं खरंच होतं - गियर न लावता ही सायकल तेवढीच छान पळत होती.) अजून छान चाललीय ही सायकल. बरेच वेळा लेकीला (५ वर्षं वय) डबलसीट नेते जवळपास २ -४ किमी अंतरासाठी.

नमस्कार, आम्ही आमच्या मुलीसाठी सायकल बघत आहोत. तिचे वय १०. पण आम्ही पूर्ण उंचीची सायकल पाहत आहोत. कर्वे रस्त्यावरील सुरेंदर ह्या दुकानात गेलो. परंतु आमची retirement basic सायकल आहे. कारण मुलगी जास्तीत जास्त सोसायटी मध्ये चालवणार. आणि आम्ही चालवली तरी ३, ४ किमी चालवणार. त्यामुळे साधी सायकल बघत होतो तर फक्त mach city ची २ models आणि lady bird एवढेच options hote. So should we check somewhere else as well?

मनस्विता - तुमचे बजेट जास्तीत जास्त कितीपर्यंत नेऊ शकता ते कळवलेत तर काही सजेस्ट करू शकेन. हिरोची MISTIQUE आणि फायरफॉक्सची ब्रीझ अशा दोन सायकली येतील. ११ हजारच्या आसपास.

दहा हजारच्या आतच हवी असेल तर तुम्ही पाहिलेल्या सायकलीखेरीज अद्याप फारशा दिसल्या नाहीत. आणि या सगळ्या सायकली स्टीलच्या असल्याने भरपूर जड आहेत.

अॅल्युमिनियम फ्रेममध्ये या किंमतीत सायकल मिळणे अवघड आहे. जरी वापर कमी असला तरी तुम्ही देखील वापरणार म्हणताय तर माझा वैयक्तिक सल्ला असा की थोडे बजेट वाढवून हर्क्युलिस किंवा मॉँट्रा ब्रँडचा विचार करावा. साधारणपणे १५ हजारच्या आसपास.

@आशुचँप: प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
बजेट जास्तीत जास्त १० हजार
आधी सांगितले त्याप्रमाणे मुख्यत्वे मुलगी सायकल चालवणार. त्यामुळे जर महागडी सायकल घेतली तर maintenance जास्त असेल असे वाटते. कारण सायकल पडणे त्यामुळे gear box ला हानी होऊन खर्च वाढेल असे वाटते.

असे काही नसते, सायकलचा मेंटेनन्स हा तुमच्या वापरावर अवलंबून आहे.

आणि अशा पडण्या झडण्याने गियर बॉक्स (सायकलच्या बाबतीत डिल्युलर, शिफ्टर) असे काही तुटत फुटत नाहीत. कारण सायकलचे पडणे गृहीत धरूनच त्याची योजना केली असते.

टू व्हिलर, मोपेड चालवताना पडली तर स्क्रॅच येईल, रंग उडेल, आरसा तुटेल या भितीने आपण साध्यातली साधी घेतो का

आपला वापर आणि आपला कंफर्ट याचा विचार करूनच बाकी गोष्टी घेतल्या जातात. मग किंमतीचा मुद्दा फक्त सायकलबाबतच का

महागडी सायकल ही हलकी असते, चालवायला आरामदायक असते, आणि त्याचा मेंटेनन्स असा काही फार प्रचंड वाढत नाही. मुळात १०-२० हजारांच्या घरातल्या सायकलींचा मेंटेनन्स खर्च जवळपास सारखाच असतो.

२५ हजारापासून प्रिमियम ब्रँड सुरु होतात आणि त्यांना चांगल्या सायकल मेकॅनिककडून सर्व्हिसिंग करून घेणे चांगले. बाकी सायकलींना तसे नाहीये.

त्यामुळे असेल बजेट तर शक्यतो अॅल्युमिनियम फ्रेम बघा. नाही तर मग लेडी बर्डशिवाय पर्याय नाही.

आशुचँप: धन्यवाद, एवढ्या सविस्तर प्रतिसादाबद्दल. शेवटी कुठली सायकल घेतली ते कळवेनच.

अतिशय महितीपूर्वक लेखन...केवढ डिटेलिंग आहे... जवळपास सगळ्या च शंकांची निरसन होत गेले प्रत्येक पार्ट वाचताना..
लहानपणी शाळेत जाताना सायकल चालवली होती..त्या नंतर नाही म्हणजे नाही..पण आता तुमचे सगळे लेख वाचून सायकल घायची ठरवलं आहे.. वजनही कमी करायचं आहे मग जिम लावण्यापेक्षा सायकलच घेतलेली बरी... 10 हजारच्या आत, सिंगल गिअरवाली, जवळच्या जवळ सिटी मध्ये चालवायला ...उद्या सिंग च्या दुकानात जाउन येईन आणि काही शंका असल्यास विचारीन..

नमस्कार आशुचँप. मला एक शंका आहे. फ्रेम साईझ तुम्ही जो तक्ता दिलाय त्यामध्ये ५ft५inch उंची असणाऱ्यासाठी 52cm आहे. तेच जर choosemybicycle मध्ये पाहिलं तर १७ईंचं म्हणजेच 43 cm होतात. यामुळे गोंधळ निर्माण झालाय. कृपया यावर अजून प्रकाश टाकता का?माझी उंची १६७ सेमी आहे. तुमच्या तक्त्यात पाहिलं तर ५२ सेमी फ्रेम हाईट मला लागते. जर ५४ सेमी फ्रेम वापरली तर फरक पडेल का?

बेसिकली हे तक्ते हे साधारण अंदाज येण्यासाठी असतात त्यामुळे त्याचे काटेकोर पालन व्हायलाच पाहिजे असे नाही. कारण आपली उंची आणि ठेवण सायकलच्या फ्रेम्सरखी मापात बनत नाही. प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगवेगळी असते आणि त्यामुळे माझा सल्ला असा की ५२ आणि ५४ दोन्ही सायकली चालवून पहा आणि त्यातली जी जास्त कम्फर्टेबल वाटेल ती घ्या.
आणि फ्रेमबाबत गोंधळ होणे अगदी स्वाभाविक आहे.

आणि त्यात पुन्हा सायकलचा ब्रँड, प्रकार यानुसार पण साईज बदलत असतात.मला हायब्रीदला ५२ लागत असेल पण रोडबाईक घेताना मला एक साईज लहान घ्यावी लागेल कारण त्यांचे ड्रॉपबर पुढे असतात.

धन्यवाद चॅम्प सर. strava अँपला इंटरनेट जरुरी आहे का? की ऑफलाईन पण चालतं? इंटरनेट gps दोन्ही सुरु ठेवल्यावर बॅटरी खूप खात असेल ना?

Pages