स्वार्थ की समाजभान ?

Submitted by झगड्या on 20 January, 2018 - 01:43

शीर्षकातला प्रश्न मनात का आला हे लिहिण्यापूर्वी थोडे पाल्हाळ लावावे लागणार..

तर..
७०-८० च्या दशकात जन्मलेल्या पिढीतला मी एक. या पिढीतले माझ्यासारखे बरेच जण हे मध्यम वर्ग या श्रेणीत मोडतात. त्या काळात उच्च मध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यम वर्ग वगैरे सोयीस्कर सब- श्रेणी नव्हत्या. माझे बालपण हालाखीचे नाही , पण कष्टाचे मात्र गेले. शालेय शिक्षण संपता संपता घरच्या जबाबदार्‍या शिरावर आल्या. पालकांनी टाकल्या नसल्या तरी त्या अडनिड्या वयात ही जाणीव नक्की होती, की आता आपले व लहान भावंडाचे शिक्षण, दोघांची लग्ने, घरावरचे कर्ज ह्या सगळ्या जबाबदार्‍या आपल्यालाच पार पाडायच्या आहेत. सुदैवाने योग्य मार्गदर्शनाने आज या जबाबदार्‍यांमधून मुक्त होऊन आता बरे चालू आहे. आता मुले आणि त्यांचे पुढचे सगळे नीट मार्गी लावणे ही जबाबदारी आहेच !

मूळ मुद्द्याकडे येताना.. आता परिस्थिती बरी असली तरी भविष्यातल्या अनेक जबाबदार्‍यांकरिता आर्थिक सुबत्ता गरजेची आहे. अश्या वेळी आपल्या पेक्षा कितीतरी वाईट आर्थिक परिस्थितीत असलेल्या आजूबाजूच्या आपल्या परिचयातल्या, तसेच अपिरिचित माणसांबद्दल समजते तेव्हा वाईट वाटते . द्विधा मनःस्थिती तेव्हा होते जेव्हा ह्या सामाजिक असंतुलनाबद्दल माहित असून सुद्धा कुटुंबासह देशी , परदेशी खर्चिक पिकनीक करण्याचा विचार करतो. पिकनीक हे एक प्रातिनिधीक उदाहरण समजू. अश्या अनेक गोष्टी आल्या.. महागडे कपडे, मोबाईल फोन वगैरे वगैरे!
काहीच सामाजिक कार्य होत नाही असे नाही, शक्य तेव्हा थोडी फार आर्थिक मदत गरजू संस्थांना केली जाते. पण ही मदत vis-a-vis पिकनीक (किंवा इतर कोणत्याही प्रकारचे महागडे शौक) ह्यात निश्चितच तफावत असते.

पण मग काही चुकत आहे का आपले ? कुठे तरी कमी पडतोय का?
असले प्रश्न छळत राहतात.

हा लेखनप्रपंच कुठे तरी आपण फार स्वार्थी झालो आहे का, याबद्दल केलेले आत्मपरिक्षण म्हणू या हवे तर.
हे सर्व लिखाण आर्थिक अंगाने लिहीले आहे कारण उघड आहे की.. सगळी सोंगे आणता येतात, पैशाचे सोडून !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख आहे.

मदतीच्या बाबतीत आपण कायम हात आखडता घेतो. आपले मदतीचे निकष वेगवेगळे आहेत. देवासमोरील दानपेटीत भरपूर धन घालू, पण कुठल्या देवापुढची पेटी आहे याचा विचार करून. जोशींमठाला शंकराचार्यांच्या मंदिराच्या इथे जीर्णोद्धार व्यतिरिक्त इतर बरीच कामे करायला दान द्या म्हणून पाटी लावलेली, तिथे कोणीही फिरकत नव्हते. लालबागच्या राजाला मात्र पोत्याने देणगी गोळा होते.

कुणी मदत मागितली आणि खिशातून चुकून दहाची नोट हाती लागून बाहेर पडली तरी ती द्यायचे जीवावर येते. गरजू लोकांना विविध प्रकारे मदत देण्याचे मार्ग आपण नीटसे तयार केले नाहीत व जे मार्ग आहेत त्यात पैसे खाल्ले जाणारच याची आपल्याला पूर्ण खात्री असते. त्यामुळे आपण त्या मार्गांकडे ढुंकूनही पाहत नाही. तेच पिकनिक व फिरायला जाऊन, भरभक्कम रकमेला स्वतःला कापून घेणे आपल्याला मान्य असते.

मदतीमध्येही पैशांची मदत केली म्हणजे कर्तव्य पूर्ण झाले. त्या व्यतिरिक्त अजून काही करायचा विचार डोक्यात येत नाही.

काही समाजाच्या मदतीच्या आज योजना आहेत, पण त्या त्या जातीधर्मप्रांतापुरत्या असतात. दुसऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही. गेल्या शतकात फक्त ब्राम्हण समाजात माधुकरी, वारावर जेवण वगैरे मदत दिली जात असे. आता कितपत सुरू आहे कल्पना नाही.

याचे एक कारण आपल्या समाजरचनेत असावे असे मला वाटते. ख्रिस्ती समाजात लोक त्यांच्या चर्चला बांधलेले असतात, चर्चने ठरवलेल्या पैसे किंवा वेळ यापैकी जमेल त्या मदत कार्यात भाग घ्यावा लागतो, लहानपानापासून हे केल्यामुळे स्वतःहून गरजूना मदत करणे हा स्वभाव बनून जातो. हे खूप मोठे जनरलाईजेशन आहे माहीत आहे, पण कुठेतरी याचा परिणाम होतोच. कम्युनिटी सर्व्हिसला जेवढे महत्व काही देशात दिसते तसे आपल्याकडे अजिबात दिसत नाही. काही गुन्ह्यातही शिक्षेचा भाग म्हणून अमुक इतके तास कम्युनिटी सर्व्हिस करावी लागते. मुस्लिम धर्मात झकात हा धर्मपालनाचा एक भाग आहे, प्रत्येकाला ती द्यावी लागते. आपल्याकडे मदत करा असा धर्माचा रेटा नसल्याने मदतीचा विचार डोक्यात फारसा येत नाही. दानपेटीत पैसे पडतात ते सामाजिक कारणासाठी नाही तर आपल्याला फायदा व्हावा म्हणून पडतात.

प्रत्येक माणूस आपला स्वार्थ पाहात असतो,
कुटुंबाबरोबर सुट्टी वर जाणे हा स्वार्थ, किंवा कोणाला तरी मदत केल्याने मला चार- चौघात प्रतिष्ठा मिळते हा सुद्धा स्वार्थ, आणि मदत केल्याने मला चांगले वाटते/मला किक येते/ माझ्याच नजरेत माझी प्रतिमा चांगली होते हा सुद्धा (भावनिक) स्वार्थ.
यातला कोणता स्वार्थ चांगला आणि कोणता वाईट यात आत्ता नको पडू या.

एक कथा वाचली होती,
सैन्याच्या तुकडीवर हल्ला होतो, जाही सैनिक आणि त्यांचा कॅप्टन जखमी होतो. वैद्यकीय पथकातील लोक त्यांची सुश्रूषा करू लागतात,
आपल्या सैनिकांच्या जखमा बांधून होई पर्यंत कॅप्टन आपल्या जखमा बांधून घेत नाही, आणि अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होतो.
यावर मानसोपचारतज्ञांची टिप्पणी अशी की,
त्या कॅप्टनचा इतरांना मदत करण्याचा / माझ्या ड्युटी चा प्रत्येक भाग मी मनोमन निभावीन हा भावनिक स्वार्थ इतका पराकोटीचा होता की तो पूर्ण करताना त्याला मृत्यू आला तोही त्याला कबुल होता.

हीच गोष्ट थोड्या बदलाने इकडेही लागू करता येईल.

समाजाच्या गरजा अंतहीन असणार आहेत,

आपल्या या भावनिक स्वार्थाची किंमत आपली आपण ठरवायची. ही किंमत प्रत्येक कॉज प्रमाणे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळी असू शकेल. तुम्हाला जेव्हा खूप समाधान देणारे काम समोर दिसेल तेव्हा कदाचित तुमच्यासमोर हा डिलेमा येणार नाही.

दुसरी गोष्ट,
प्रत्येक खर्चाबरोबर स्वतः ला दुःखी करण्यात अर्थ नाही, "दुसरोनकी मदत करनेसे पूर्व आप अपना मास्क सही तरह से पेहेने "हे लक्षात ठेवा. स्वतः चे मन मारून, दुःखी राहून ते पैसे चॅरिटी ला देणे म्हणजे तुम्ही स्वतःचा त्रास वाढवून घेत आहात,
फाजील खर्च कमी करून चॅरिटी जरूर करा,
पण घरच्यांबरोबर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये किती लोकांचे भले झाले असते याचा विचार करू नका.

गरजू लोकांना विविध प्रकारे मदत देण्याचे मार्ग आपण नीटसे तयार केले नाहीत व जे मार्ग आहेत त्यात पैसे खाल्ले जाणारच याची आपल्याला पूर्ण खात्री असते>> हे मात्र अगदी बरोबर आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना, टाळायचे ठरवले तरीही टाळता न येणारा घटक म्हणजे भिकारी. त्यातही लहान मुलांचे प्रमाणा लक्षात येण्यासारखे असते. आता परोपकारी भावनेने त्यांना बरेच जण आपापल्या परीने मदत करतात सुद्धा. परंतु त्या बाबतीत देखील माझ्या मनात संभ्रम आहे. हि मुले, मुलांना भिक जास्त प्रमाणात मिळते या कारणास्तव या धंद्यात ढकलली जातात. त्याना लहान वयातच पळवून आणून, अपंग बनवून भीक मागायच्या धंद्यात ढकलले जाते. हे सर्व भयंकर आहे. या मुळे, जर कोणाला मदत करायची असेल तर, त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित संस्थे मार्फतच करावी असे माझे मत आहे.

तुम्ही कष्ट करुन मिळवलेल्या पैशातून आधी तुमच्या कुटुंबाच्या 'उद्या' ची तरतूद करावी, तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवाव्या. त्यानंतर तुमच्या कुटुंबाची चैन आणि धर्मादाय याचा मेळ घालावा. कुटुंबीयांना आणि तुम्हाला स्वतःला रोज लढायला बळ हवे तर बक्षिस म्हणून, आराम /बदल म्हणून, नाते घट्ट करण्यासाठी म्हणून चैन देखील हवी. कुटुंबाच्या आणि स्वतःच्या हौसेमौजेचा बळी देवून धर्मादाय करायला जावू नये. स्वतःचे मन मारुन , कुटुंबाला दुखावून , अपराधी वाटते म्हणून दान करु नये. दान करताना उगाच भावनिक होवू नये. ते सत्पात्री आहे ना हे पारखून घ्यावे. मग ते व्यक्तीला केलेली मदत असो वा संस्थेला. संस्थेचा कारभार नीट पारखून घ्यावा. तुम्ही जेव्हा तुमच्या गरजा आणि चैन यावर पैसे खर्च करता तेव्हा कुणालातरी रोजगार मिळत असतो हे देखील लक्षात घ्या.
दरवेळी मदत करताना पैसेच खर्च केले पाहीजेत असेही नाही. आपल्या कडील एखाद्या कौशल्याचा आणि रिकामा वेळेचा वापर देखील मदतीसाठी करता येतो. उदा. बागकाम करुन त्यातील भाजीपाला, फळे गरजूंना देणे, शिवणकाम्/विणकाम करुन त्या वस्तू दान करणे/ त्या वस्तू विकून ते पैसे दान करणे. अंध मुलांना परीक्षेसाठी लेखनिक म्हणून, गरीब मुलांना अभ्यासात मदत करणे/ करीयर बाबत मार्गदर्शन करणे, एखादे कौशल्य शिकवणे ज्यातून ती व्यक्ती अर्थाजन करु शकेल, अशा मदतीच्या उपक्रमात तुमचे कुटुंबीय देखील सहभागी होवू शकतील. तुमच्या पुरता तुम्ही मदतीचा एक प्राधान्यक्रम ठरवा आणि एक बजेट ठरवा - वेळ आणि पैसे. तुमच्या परीने खारीचा वाटा सातत्याने उचला.
स्वतःच्या चैनीवर पैसे खर्च केले की स्वार्थ आणि धर्मादाय संस्थेला मदत केली म्हणजे समाजभान हा सरधोपट चुकीचा विचार झाला. चैन काय किंवा दान काय शेवटी आपण आपल्याला मनाला बरे वाटते म्हणून करतो. रोजचे काम निष्ठेने करणे , एक नागरीक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे, अधिकाराविषयी जागरुक असणे, भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष चालना न देणे, समाजातील चुकीच्या प्रथांना विरोध करणे, त्याबाबत जागरुकता निर्माण करणे हे देखील समाजभानच. सामाजिक असंतुलनाचे मुख्य कारण हे अयोग्य पद्धतीने चालणारा कारभार, भ्रष्टाचार हे आहे. एक जागरुक नागरीक म्हणून याबाबत तुम्ही काम करु शकता ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ खर्‍या गरजू लोकांना मिळेल. त्या जोडीला लोकं बरेचदा चुकीचे पर्याय निवडून स्वतःचे आयुष्य खडतर करत असतात. या बाबतीत समान ध्येय असलेल्या लोकांना एकत्र आणून मार्गदर्शनाचा प्रयत्न करता येइल.

वर साधना ने लिहिल्याप्रमाणे इथे चर्च आणि इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातुन मदत कार्य चालते. परंतू त्यातही बरेच चुकीचे प्रकार होतात. मदतीच्या रकमेपैकी ७०% रक्कम संस्थेच्या कामकाजाचा खर्च आणि ३०% रक्कम गरजूंना , एका कारणासाठी मदत गोळा करुन वापर दुसर्‍या कारणासाठी असेही होते. इथे काही कंपन्या या धर्मादाय संस्थांसाठी व्यवस्थित चार्ज लावून फंडरेझिंगचे काम करतात. त्यामुळे संस्था सतत पारखून मगच मदत करायचे धोरण ठेवावे लागते.

द्विधा मनःस्थिती तेव्हा होते जेव्हा ह्या सामाजिक असंतुलनाबद्दल माहित असून सुद्धा कुटुंबासह देशी , परदेशी खर्चिक पिकनीक करण्याचा विचार करतो.
--> ये सब फाल्तूकागिल्ट रखोगे भाइ तो जी नही पाओगे. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, पोटभर वेळेवर मिळणारे अन्न ही सुद्धा करोडो लोकांसाठी सुप्रीम लगजरी आहे. जोपन पैसा खर्च होतो तो कोण्यातरी कामकाज धंदा नोकरी करणार्‍यालाच मिळतो. तो नोकरी करणारा मिळालेला पैसा वापरतो म्हन्जे मारकेटमध्ये पैसा फिरतो. मारकेटमध्ये पैसा फिरला तरच गरीबी कमी होते. गरिब कमी होतात.

टपरीवर दहा रुपयाचा वडापाव एकाच माणसाला रोजगार देतो. पण ताजमधली एक हजार रुपयाची डिश किमान वीस लोकांना रोजगार देत असते. आता दहाचा वडा खावा की हजाराचा हा ज्याच्यात्याच्या खिशाचा प्रश्न. जगात उधळपट्टी वगैरे काही नसते. सगळे मध्यमवर्गीय भंपक विचार आहेत.

जोपन पैसा खर्च होतो तो कोण्यातरी कामकाज धंदा नोकरी करणार्‍यालाच मिळतो. तो नोकरी करणारा मिळालेला पैसा वापरतो म्हन्जे मारकेटमध्ये पैसा फिरतो. मारकेटमध्ये पैसा फिरला तरच गरीबी कमी होते. गरिब कमी होतात.
>>>>>>>
खरं आहे
पैसा खर्च करा.
उधळपट्टी म्हणजे अन्नधान्याची, नैसर्गिक स्तोत्रांची नासाडी करणे. ती करू नका..
फिरा, खा, प्या मजा करा... पैसे कुजवत ठेवू नका. जे मंदीर असे करते तिथल्या दानपेटीत काही टाकू नका

कोणाला तरी मदत केल्याने मला चार- चौघात प्रतिष्ठा मिळते हा सुद्धा स्वार्थ, आणि मदत केल्याने मला चांगले वाटते/मला किक येते/ माझ्याच नजरेत माझी प्रतिमा चांगली होते हा सुद्धा (भावनिक) स्वार्थ.
>>>>>>>

हे फार काही पटले नाही. सगळ्यांनाच सरसकट एकाच तागडीत तोलल्यासारखे झाले. काही केसेसमध्ये असे असू शकते. काही केसेसमध्ये नाही. मदत करणे हा काही जणांचा स्वभावाचा भाग असतो आणि हे ईतके सहज घडते. ठरवून नाही..

समाजभान राखण्याइतके तुम्ही संवेदनाशील आहात, स्तुत्य आहे पण भावनेच्या भरात वाहून जाण्यातही अर्थ नाही.
स्वार्थ की समाजभान ? .... तर, दोन्हीचा तोल राखण्याचे तारतम्य.
जगाच्या गरजांना / व्यथांना अंत नाही आणि आपले उत्पन्न ठराविकच असते. आपल्या जबाबदार्‍या पहिल्या, कारण त्या आपण समजून उमजून वाढवलेल्या आहेत, तेव्हा त्यांना प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य. मग नित्य/नैमित्तीक गरजांव्यतिरिक्त त्यांची हौसमौज पुरवणे, हेही त्यात आले. मग हळूहळू तुमचे विचार तुम्ही त्यांना सांगू शकता, त्यांना पटले तर तेही मनापासून साथ देतील.

एकाच परिस्थितीत / संस्कारात वाढलेला प्रत्येकजण सारखाच विचार करेल असे नाही. तुमचे समाजभान, तुमच्या कुटुंबियांना लष्करच्या भाकरी वाटू शकतात. सारेच समविचारी असाल तर पदरमोड करून दुसर्‍यांना मदत या गोष्टी आनंदाने होतात, अन्यथा वादाचा मुद्दा ठरू शकतात.

जरी तुमची मदत निरपेक्ष असली तरी, उद्या आपल्या निकडीच्या वेळेला कोणी उभे राहीलच याचीही शाश्वती नसते. तेव्हा आपल्या गरजा, भविष्याची तरतूद, माहीत असलेले खर्च ( मुलांचे उच्चशिक्षण, जागा, लग्न इ.) आणि आज लक्षात न आलेले पण प्रत्यक्षात येऊ शकतील असे आकस्मिक खर्च, याची सोय केल्यानंतर जे उरेल ते जगासाठी.

मग आपल्या उत्पन्नाचा १-२% भाग बाजूला काढून त्यातून आपण समाजाचे ॠण फेडू शकतो. आज उत्पन्न १०००० असेल तर १००ची मदत, उद्या १० लाख झाले तर १० हजाराची मदत असे. श्रावणातल्या खुलभर दुधाच्या कहाणीसारखे... मुलेबाळे, लेकीसुना, गुरेवासरे सगळे तृप्त केल्यावर उरलेले दूध देवाला, हंडा नव्हे.

सहल, चैनीच्या गोष्टी खरेदी करणे हे नेहमीच वायफळ नव्हे. ती प्रसंगाची, वेळेची गरज असू शकते. मात्र त्याच वेळेला दुसर्‍या एखाद्याला नितांत गरज आहे, मदत न मिळाल्यास त्याचे आयुष्याचे नुकसान होऊ शकेल ( फी भरणे, वैद्यकीय मदत असे), तिथे आपण पुढे ढकलू शकतो / टाळू शकतो असे सारे खर्च थांबवून जमेल ती मदत करावी या मताची मी आहे. किंवा आपल्या बजेटमध्ये बसवून, स्वत:सोबत कामवालीच्या मुलांना दिवाळीचे कपडे, खाऊ, शाळेचे साहित्य देणे हेही करता येईल. स्वार्थ-परमार्थ एकसाथ.

प्रत्येक वेळेला सहल / अन्य चैन आणि समाजभान तुम्ही एकत्र आणाल, तर मुले म्हणतील या सुट्टीत जयपूर-उदेपूरला जाऊ आणि उत्तर येईल, 'बघू, बाबांची काही समाजसेवा नाही निघाली तर जाऊ, स्द्ध्या अभ्यासाला बसा'.... यात मजा नाही.

आपल्याकडे दानही सत्पात्री करावे असा संकेत आहे. एकदा तुम्ही देणारे म्हणून माहीत झालात की कोणीही आळशी, निरूद्योगीही येऊन हात पसरेल, खोटे रडगाणे गाईल. आर्थिक मदतीपेक्षा, त्याची कमाई सुरू करण्यासाठी मदत, मार्गदर्शन करता येईल. आयता मासा देण्यापेक्षा, मासे पकडायला शिकवावे, या म्हणीप्रमाणे. एखाद्या विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च, हे लोन आहे, मदत नाही असे सांगून करावे. तो परत करायला आला की अशीच मदत तू दुसर्‍या गरजूला कर तेच माझे मुद्दल नि व्याज. असाही दिव्याने दिवा तेवता ठेवता येईल.

एक आजी आहेत. त्या तळमजल्यावर रहातात. दोघेही निवृत्त, बेताची कमाई. समोर नवीन इमारतीचे बांधकाम चालू झाले. मजुरांची मुले दिवसभर मातीत खेळून मळतात त्यांची संध्याकाळी आंघोळ होते. एक मूल पाणी थंड, आंघोळ नको, म्हणून रडताना त्यांनी ऐकले. त्या लाकूडफाटा / गॅसचे पैसे नाही देऊ शकत, पण गीझरचे १ बालदी गरम पाणी रोज देतात त्या मुलासाठी. बिलात काही फार फरक नाही पडणार, पण मदतीचे मोल, अमूल्य. शेवटी दुसर्‍याच्या दु:खाची, अडचणीची जाण असणे महत्त्वाचे. कितीची मदत केली हे गौण आहे.

हा विषय चांगला आहे, लेख चांगला आहे आणि अनेकानी प्रतिक्रिया पण चांगाल्या दिल्या आहेत. या मध्ये काही मुद्दे अजून मान्डावेसे वाटतात,

१) स्वार्थ का समाजभान असा प्रश्न वैयक्तिक वेळ, पैसा आणि शक्ती या बागतीत विचारायचा झाला तर सारासार विचार करुनच निर्णय घ्यायला हवा. पण हे सुद्धा खर आहे कि समाजा मध्ये अशी लोकं होती ज्यानी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून समाजा साठी काम केले ज्याचा फायदा सर्वांना मिळाला. आपण त्यामधालेच आहोत असा अपसमज करुन घेउ नये पण वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून काही करावेसे वाटत असेल, तर आपल्या मनाच्या altruistic बाजूला न्याय द्यायला हवा. वर अनेकानी खूप योग्य लिहीले आहे कि मदत अपात्री होउ नये याची काळजी घ्यावी लागते.

२) अनेक वेळी काही लेखनामध्ये किंवा काही व्यक्तीं कडून अस सान्गीतले जाते कि आत्मविकास हाच एक मोठा समाज विकास आहे. बाबा साहेब आंबेडकर सुध्दा दलित समाजाला असाच सल्ला द्यायचे. हे सल्ले अयोग्य आहेत असे नाही परन्तु त्या समाजासाठी आहेत जे पात्र आणि अपात्र, योग्य किंवा अयोग्य फारसे जाणत नाहीत, किंवा, जाणत असले तरीही त्यान्ची योग्य त्या ठीकाणी मदत करायची पात्रता नाही आहे. जसे ज्या काळात आंबेडकर आत्मविकासाचे महत्व सान्गायचे त्या काळात त्या समाजा मध्ये सारा सार विचार आणि समाज कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री या दोन्ही गोष्टी फार कमी प्रमाणात होत्या.

३) अर्थिक मदत हीच फक्त महत्वाची आहे अस नाही हे खर असले तरीही, आज भारतात अशी परिस्थीती आहे कि गरीबी आणि बेरोजगारी यामुळे काम करायला अनेक लोक उत्सुक आहेत. त्यान्चे नीट नियोजन आणि त्यासाठी पैसा किंवा साधन सामुग्री पुरवणे ही खरी समस्या आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, मी स्वतः रस्ते साफ करणे किंवा प्लस्टीक चा कचरा गोळा करणे यापेक्षा दोन बेरोजगाराना हे काम पैसे देउन करून घेतले तर जास्त चांगली समाज सेवा होते. अर्थात प्रत्येकाची परिस्थीती आणि कार्यकुशलता वेगळ्या प्रकारची असु शकते. जस बाबा आमटेंनी वस्तूतः अर्थिक परिस्थीती खूप चांगली असतानाही नियोजन कौशल्य वापरले. तर प्रकाश आमटे अर्थिक द्रूष्ट्या विशेष सक्षम नव्हते परन्तू त्यानीही त्यान्चे नियोजन कौशल्य खूप योग्य प्रकारे वापरले.

४) या सर्व प्रश्नांना काही वेळा अर्थशास्त्रीय सिध्दांत लावले जातात. जसे, मी चैनीच्या वस्तू घेतो तेव्हा रोजगार निर्माण होतो त्यामुळे आपण सधन असावे आणि सुखमय जीवन जगावे. हे पूर्ण अयोग्य आहे अस मी मानत नाही पण दान सत्पात्री आहे का नाही असा विचार करतो तसाच माझ्या वैयक्तिक सुखभोगातून नक्की कोणाला आणि कशा प्रकारचा फायदा होतो हे दुर्लक्षीत करून पण चालणार नाही.

स्वाती२, साधना, कारवी, तुमचा प्रतिसाद उपयोगी वाटला.

माझ्या देशातील लोकांना अर्धपोटी रहाव लागत म्हणून मी उपास करीन किंवा माझ्या देशातील लोकांना पांघरायला पूर्ण वस्त्र नाही म्हणून मी फक्त पंचा नेसीन हे एका व्यक्तिसाठी किंवा छोट्या समूहासाठी ठिक आहे पण सर्वांनीच करायचे ठरवले तर देशाची अर्थ व्यवस्था कोसळेल. हीच गोष्ट प्रवास, जेवणावळी, उत्सव, समारंभ यांनापण लागू आहे. शेवटी पैसा हा खेळता राहिला पाहिजे. तुम्ही केलेला कोणताही खर्च समाजकारणच आहे अशी माझी धारणा आहे.
अर्थात संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन हा ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीचा भाग आहे. पण त्याच्यात सुद्धा मला तरी काही वावगे दिसत नाही. एखाद्या श्रीमंताच्या लग्नात एक लाख पंगत बसली, अहो बसली तर बसली, किती लोकांना रोजगार मिळाला आणि किती लोकांची दिवसाची बेगमी झाली याचा तरी विचार करा. अगदी कमीत कमी १०० रुपये ताटाप्रमाने १ कोटी रुपये आले की नाही बाहेर. नाहीतर बसले असते कुठल्यातरी लॉकर मधे किंवा देवाच्या बंद तळघरातल्या पेटीत.

ठिक आहे, तारतम्य पाहिजेच. दुष्काळात पाण्याचा अपव्यय करणे, वीजटंचाईच्या काळात रोषणाई करणे अशा व इतर अनेक गोष्टी नक्कीच समाजभानाचा अभाव दाखवतील.

स्वतःच्या आईवडिलांना, सासूसासर्‍यांना रस्त्यावर टाकून कुठल्यातरी सामाजिक संस्थेत फालतू कार्यकर्ते म्हणून वावरून समाजभान दाखवणारे दांभिक मला जास्त खटकतात.

तुम्हाला येत ते काम सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा,तुमच्या गुणवत्तेचा पूर्ण उपयोग करा, खूप पैसे मिळवा व खर्च करा, नातेवाईकांना, मित्रांना पडेल ती मदत अपेक्षा न करता करत रहा, आपल्या संपर्कात येणार्‍या संस्थांना वा इतर कुणालाही मदत लागली तर करायची मानसिकता ठेवा. माझ्या दृष्टीने हेच खरे समाजभान.

जास्त खर्च करण्याचं एक समर्थन यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली हे ठीक आहे. पण आपल्याकडे असा खर्च करायला पैसा असेल तर थोडं प्रोअ‍ॅक्टिव्ह समाजभानही हवं असं मला वाटतं. वर कोणीतरी म्हटलंय तसं आपल्या उत्पन्नाचा काहीएक भाग डायरेक्ट चॅरिटीसाठी खर्च केला पाहिजे. आता कोणी हे मोजूनमापून (म्हणजे अर्षातून एकदा अमक्या अमक्या संस्थांना मदत केली की झालं) तर कोणी वेळ येईल तसं, हिशोब न ठेवता करत असेल. ज्याला जे रुचेल ते.

आणि हे समाजभान फक्त पैशाच्याच रूपात नव्हे. तर वागण्यातूनही हवं. रोजच्या जगण्यातही हवं.

हे समाजभान फक्त पैशाच्याच रूपात नव्हे. तर वागण्यातूनही हवं. रोजच्या जगण्यातही हवं.>> अगदी बरोबर भरत.

आमच्या कंपनीत प्रत्येकाने वर्षातील कमीत कमी आठ तास सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून समाजकार्यास देण अपेक्षित आहे. यासाठी आम्ही सामुहिक उपक्रम आयोजित करून सर्वांना भाग घेण्याची संधी देतो.

माझे देशबांधव गरीबी मध्ये आहेत म्हणून मी पंचा नेसतो ही गोष्ट समाजाच्या अर्थ कारणासाठी फारशी योग्य नाही ( कारण सधन व्यक्ती समजून उमजून खर्च करेल तर रोजगार निर्मीती होइल) तरीही हे आचरण त्या व्यक्ती साठी योग्यच आहे ज्याला त्या गरीब समाजाचे नेत्रुत्व करायचे आहे आणि त्या सधन सुखासीन समाजा समोर ज्याना भारतामधल्या गरीबीची कल्पना सुध्दा नाही आहे.

विक्रमसिन्ह तुम्ही लिहीलेले सगळेच तुमचे मुद्दे मला पटतात.

लेखाशी सहमत.
दोन्ही विचारांचा सुवर्णमध्य काढणे ही कसरत असते खरी

<<<त्या कॅप्टनचा इतरांना मदत करण्याचा / माझ्या ड्युटी चा प्रत्येक भाग मी मनोमन निभावीन हा भावनिक स्वार्थ >>>
महाभारतातील भीष्म, कर्ण यांची उदाहरणे लगेच आठवतात. त्यांचे समर्थनहि केल्या जाते, पण प्रश्न उरतोच की भीष्माने लग्न केले नाही तरी राजा व्हायला हरकत नव्हती - वचन मोडले असते पण राज्य वाचले असते?!
असो, हे जुने पुराण झाले. आपला प्रश्न आजचा आहे.

<<<स्वार्थ की समाजभान ? .... तर, दोन्हीचा तोल राखण्याचे तारतम्य.>>>
हेहि महाभारतात श्रीकृष्णाच्या उदाहरणाने दाखवले आहे.
पण
<<< स्वार्थ का समाजभान असा प्रश्न वैयक्तिक वेळ, पैसा आणि शक्ती या बागतीत विचारायचा झाला तर सारासार विचार करुनच निर्णय घ्यायला हवा.>>>
हे खरे.

<<<कोणाला तरी मदत केल्याने मला चार- चौघात प्रतिष्ठा मिळते हा सुद्धा स्वार्थ, आणि मदत केल्याने मला चांगले वाटते/मला किक येते/ माझ्याच नजरेत माझी प्रतिमा चांगली होते हा सुद्धा (भावनिक) स्वार्थ.>>>
नको तितका विचार करून अति किचकटपणा करायचा म्हणजे असले काहीतरी लिहिल्या जाते. समजा असेल भावनिक स्वार्थ, पण समाजाला, किंवा दुसर्‍या कुणाला मदत होत असेल तर काय बिघडले?
समजा माझ्या मित्राला १०,००० रु. हवे आहेत नि मी ते दिले - अडीअडचणीला मदत केली हो असे त्याने म्हंटले म्हणजे समाधान होते (भावनिक स्वार्थ). पण हा स्वार्थाचा आरोप येऊ नये म्हणून मी मदतच करायचे नाकारावे? ३५ कोटी रुपये देऊन डी लक्ष्मीनारायणाने नागपूरला १९३५ साली केमीकल टेक्नॉलॉजी चे कॉलेज काढले - आज लक्षावधी लोकांना, समाजाला, देशाला सर्वांना त्याचा उपयोग झाला. बदल्यात कॉलेजला त्या लक्ष्मीनारायणाचे नाव दिले, म्हणजे स्वतःची प्रसिद्धी हा त्यात त्याचा स्वार्थ होता असे म्हणाल - पण बिघडले कुठे? फायदा किती झाला?
स्वार्थ हि बघावा नि समाजाला उपयोगीहि पडावे - एक किंवा दुसरे असले किचकट विचार करू नयेत. उगाच लोकांचा गोंधळ!

चला. वेळही आहे अन कीबोर्डही सापडलाय म्हणुन टंकून घेतो.
१.
>याचे एक कारण आपल्या समाजरचनेत असावे असे मला वाटते. ख्रिस्ती समाजात लोक त्यांच्या चर्चला बांधलेले असतात, चर्चने ठरवलेल्या पैसे किंवा वेळ यापैकी जमेल त्या मदत कार्यात भाग घ्यावा लागतो, लहानपानापासून हे केल्यामुळे स्वतःहून गरजूना मदत करणे हा स्वभाव बनून जातो. हे खूप मोठे जनरलाईजेशन आहे माहीत आहे, पण कुठेतरी याचा परिणाम होतोच. कम्युनिटी सर्व्हिसला जेवढे महत्व काही देशात दिसते तसे आपल्याकडे अजिबात दिसत नाही. काही गुन्ह्यातही शिक्षेचा भाग म्हणून अमुक इतके तास कम्युनिटी सर्व्हिस करावी लागते. मुस्लिम धर्मात झकात हा धर्मपालनाचा एक भाग आहे, प्रत्येकाला ती द्यावी लागते. आपल्याकडे मदत करा असा धर्माचा रेटा नसल्याने मदतीचा विचार डोक्यात फारसा येत नाही. दानपेटीत पैसे पडतात ते सामाजिक कारणासाठी नाही तर आपल्याला फायदा व्हावा म्हणून पडतात.
<<
बोल्ड केलेय, ते धादांत खोटे वाक्य आहे.

पैशाच्या धर्मसंदर्भातील व्यवहारांचे आपले ख्रिश्चन व मुस्लिम समुदायाबद्दलचे आकलन कमी पडते आहे असेही नोंदवितो. अन्यथा मुस्लिम बँकिंग वगैरे बद्दल अन व्याजाने पैसे देणार्‍या अन जमीनी हडपून शेतकरी आत्महत्यांस जबाबदार सावकार मारवाड्यांबद्दलचे आपले मत चर्चेस घेऊ कुठेतरी.

"मदत करा" यात 'आपला समाज' म्हणजे भारतीय हिंदू धर्मीय असाच संकुचित अर्थ का येतो डोक्यात?

जकात अन चर्च डोनेशन्स आठवतात तेव्हा आरतीचे ताट आठवत नाही?? औक्षण केल्यावर आपोआप खिशात हात घालून टाकलेली ओवाळणी आठवत नाही??

कमालेय!!

अन "आपला समाज"च म्हणायचा, तर मुंबै बाँबस्फोटांनंतर जाती/धर्म्/लिंग विसरून जे लोक मदत करतात, त्यांचं काय? तोंडाला फडकी न बांधता मोरवीच्या मुडद्यांना सद्गती देणार्‍या "स्वयंसेवकांचे" काय? हे सगळे वाईट की काय? की आपल्या समाजाची चूक आहे? संस्कार कमी पडताहेत की चुकताहेत?

केनी कुर्डूची भाजी करून डोईच्या जखमे वर तेल घालण्याच्या कहाण्या अन व्रतं वैकल्यं करणार्‍या हिंदूंना देव कोणत्या रूपात येईल, अन मागेल, ते समजत नाही, म्हणुन सगळ्याच गरीबांना मदत करा, हे सांगितलं जातं, हे कसे विसरलात तुम्ही?

नाही तिथे हिंदू, मुसलमान अन ख्रिश्चन आणून काय मिळते हो तुम्हाला? नुस्तं जनरलायझेशन आहे हे माहितेय म्हणायचं अन मग नंतर कम्युनल विखार टंकायचा...

श्या!

२.
माझे देशबांधव गरीबी मध्ये आहेत म्हणून मी पंचा नेसतो ही गोष्ट समाजाच्या अर्थ कारणासाठी फारशी योग्य नाही
<<
वरच्या आळीतल्या थोट्या गांधीने हे करणे, अन स्वतः महात्म्याने करणे यात सिंबॉलिझमचा फरक असतो.
हे जर उजाडत नसेल, तर कठीणेय.

असो. त्याबद्दल पुन्हा डिट्टेलवार. सध्या बिआर्बी.

एक गांधी पंचा लावून फिरला म्हणून नेहरू पटेलांपासून सगळी भारताची मंत्रीमंडळी किंवा देशभरातले सगळेच स्वातंत्र्यसैनिक/काँग्रेस कार्यकर्ते कासोटीस पंचा लावून उघड्या अंगाने फिरत नव्हते हे अन इतकेच आठवले तरी पुरे.

नको तितका विचार करून अति किचकटपणा करायचा म्हणजे असले काहीतरी लिहिल्या जाते. समजा असेल भावनिक स्वार्थ, पण समाजाला, किंवा दुसर्‍या कुणाला मदत होत असेल तर काय बिघडले?>>>>>>

नांदूशेठ चुकीच्या ट्रॅक वर गाडी जातेय तुमची,

समजा एक संस्थेला मी महिना 5 k ची मदत करतो आहे, ती संस्था माझे fb वर जाहीर आभार मानते. माझ्या frnd लिस्ट मधले येऊन ते like करतात,
मला छान वाटते ,हा झाला इमोशनल स्वार्थ

इकडे असे गृहीत धरलय की माझ्या कडे 5k च extra आहेत, ते मी either कुटुंबियांबरोबर डिनर ला जाऊन खर्च करेन किंवा त्या संस्थेला देऊन लोकांकडून वाहवाह मिळवेन.
कुटुंबियाबरोबर डिनर ला जाणे हा डायरेक्त स्वार्थ, (यातही रोजगार निर्मिती होते वगैरे खरे आहे, पण ती तुम्हाला इमोशनल हाय देत नाही)

यातला तुम्हाला कोणता महत्वाचा वाटतो त्या प्रमाणे तुम्ही खर्च करता, दोन्ही स्वार्थ महत्वाचे आहेतच, कोणता वाईट कोणता चांगला हे बाजूला ठेऊ, हे मूळ प्रतिसादात म्हटलेच आहे,

<<प्रत्येक माणूस आपला स्वार्थ पाहात असतो,
कुटुंबाबरोबर सुट्टी वर जाणे हा स्वार्थ, किंवा कोणाला तरी मदत केल्याने मला चार- चौघात प्रतिष्ठा मिळते हा सुद्धा स्वार्थ, आणि मदत केल्याने मला चांगले वाटते/मला किक येते/ माझ्याच नजरेत माझी प्रतिमा चांगली होते हा सुद्धा (भावनिक) स्वार्थ.
यातला कोणता स्वार्थ चांगला आणि कोणता वाईट यात आत्ता नको पडू या.>>
----- सहमत.

मनातली घालमेल मांडली होती. त्यावर खूप सारे प्रतिसाद आले, चांगली चर्चा घडली आणि मनावरचं दडपण थोडं दूर झालं.
त्याबद्दल सर्वांचे आभार _/\_
साधना, सिम्बा, स्वाती२, कारवी , अननस, विक्रमसिंह आपले प्रतिसाद विशेष आवडले ! पुनःश्च धन्यवाद.

लेख पुरेसा स्पष्ट झाला नाही

1 काहीतरी करावेसे वाटते पण करता येत नाही तरीही काहीतरी करतो असे म्हणायचे आहे का? मग चांगले आहे की?

2 स्वार्थ आणि समाजभान दोन्ही सांभाळताय की?

करावेसे वाटते, करता येत नाही, तरीही करतो, तरीही अपराधी वाटते - ही सगळे नॉर्मल असण्याची लक्षणे वाटतात मला

आऊट ऑफ द वे जाऊन काहीतरी करावेसे वाटते का?

नॉर्मल ते वाटणेही आहेच, पण ते प्रत्यक्षात आणणे हटके आहे

तसे बघायला गेले तर स्वार्थी आणि समाजभान असणारे लाखो लोक असतात

को त बो धागा आहे का?