तुझी मैत्री सखे..

Submitted by Harshraj on 5 February, 2018 - 02:22

मनु आणि सुलू....दोघी एकमेकींच अंतरंग बनल्या होत्या..दोघींनी ग्रॅज्युएशन फर्स्टक्लास मधे पूर्ण केल..तेव्हा ताईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही..मनुंच विश्व म्हणजे फक्त सुलु होती..शाळॆच्या पहिल्या दिवशी ..ज्यावेळी तिला मुलींनी हिणवलं होतं.... त्या दिवशी ती खूप रडली होती..

पण सुलू त्या मुलीजवळ गेली, "तीला चालता येत नसलं तरी, ती हुशार आहे... तुमच्यासारखी येडपट नाही आणि तिच्यासोबत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी तिच्यात काही उणं नाही..."

त्यानंतर मात्र त्या कुणाशी जास्त बोलल्या नाहीत..मग त्या दोघीच सर्वत्र फिरायच्या ..

मनु!....काहीशी अबोल..स्वभावाने साधी, सरळ...आणि पायातली शक्ती गेल्यापासून स्वतःमध्येच गर्क असलेली . घरातली एकुलती एक मुलगी. तिचा जन्म झाला तेव्हा बाबांनी अक्ख्या गावात जिलेबी वाटलेली ..जन्मल्यापासूनच ती खुप हुशार होती. आपल्या अवतीभवतीचे जग ती पटकन आपलेसे करून घेत असे. गुलाबी, गोंडस..तिच्या येण्याने सगळ्या घराला आनंद झालेला. .. बाबांना तर तीचं कौतुक करताना दिवस पुरत नसे. मनुच्या खोड्या ते हसत हसत झेलत असत. एके दिवशी तर मनुने त्यांचे ऑफिसचे बूट लपवून ठेवले. तिला वाटायचे बाबांनी सतत तिच्याबरोबर रहावे, तिच्याशी खूप खेळावे, खूप गोष्टी सांगाव्यात. म्हणून तिने त्यांचे बूट लपवले. मग बाबांनीही तिच्यावर न रागावता तिच्यासाठी चक्क सुट्टी घेतली त्या दिवशी!

पण... ती तिसरीत असताना एके दिवशी ती रात्री झोपली असताना अचानक तिच्या पायातून वेदना येऊ लागल्या. ती खूप जोरात ओरडली आणि त्यानंतर तिला पुन्हा कधीच चालता आले नाही. त्या दिवसापासून तिचे आयुष्यच बदलले. बाबांनी लगेच तिला दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांना देखील काहीच निदान करता आले नाही. अशातच बाबांचे बिझनेस मधले सगळॆ लक्ष उडाले. ते रात्रंदिवस मनूच्या पायावर इलाज कसा होइल याचाच विचार करू लागले. आणि याचा परिणाम मनूच्या पूर्ण कुटुंब परिस्थितीवर झाला . बिझनेस हळूहळू कमी झाला तसेच मनूवरचे आईचे प्रेमसुद्धा! लक्ष्मीने भरलेल्या हसत्या घराला कोणाची तरी नजरच लागली होती जणू! मनूच्या बाबांनी मग व्यसनाचा आधार घेतला,आणि अशातच मनूला भाऊदेखील झाला. त्यामुळॆ आईचे तिच्यावरचे लक्ष कायमचे उडाले. आता तिला एकच आधार उरला होता, तो म्हणजे ही आश्रम शाळा. जेथे गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जायचे. तिला चालता येत नसल्या मुळॆ ती फारसे काम करू शकत नव्हती, त्यामुळे आईनेही या गोष्टीला विरोध केला नाही. त्यामुळॆ सुदैवाने तिच्या शिक्षणात मात्र अडथळा आला नव्हता. आज तीने पहिल्यांदा या शाळेत प्रवेश केला होता. आणि पहिल्याच दिवशी मुलींनी तिला पायावरून चिडवले होते. तिला वाटले, रोज घरी हेच वाट्याला येते, तेच इथे पण येणार नाही ना?

पण..तिच्या बाजूने उभी राहिली एक चुणचुणीत हुशार मुलगी..सुलु..तीने त्या मुलींना चांगलेच ऐकवले..

सुलू!...एक हुशार, चंचल, अवखळ आणि सा-यांना मदत करणारी मुलगी होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती या आश्रमशाळॆच्या मालकीणबाई,म्हणजेच ताईंची मुलगी होती. ताईंसारखीच गोरीपान, हसमुख,आणि लोकधार्जिण . कोणी काही मागीतले, काम सांगीतले तर त्याला नाही म्हणणार नाही. ताईंची आश्रमशाळा म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच होती. ताईंची आर्थिक परिस्थिती काही वाईट नव्हती. त्या आपल्या मुलीला शहरातल्या मोठ्या शाळॆमधे सुद्धा घालू शकल्या असत्या. पण त्यांना आपल्या मुलीला समाजसेवेचे बाळकडु द्यायचेहोते. ती इतंरांपैकी कोणी वेगळी आहे जाणीव तीला होऊ द्यायची नव्हती. पैशापेक्षा माणूसकी किती मी असते हा तीला शिकवायचे होते. आणि त्या अजाण मुलीनेसुद्धा बरोब्बर आपल्या आईचे गुण उचलले होते. शाळॆत कधी तिने कोणावर रोब दाखवला नाही. मालकिणीची मुलगी म्हणून गर्व केला नाही. ताईंचे शिक्षण माहेरी झालेच न्हवते. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळॆ त्यांना शिक्षणाला मुकावे लागले. पण सुलुच्या बाबांनी त्यांना शिकवले, दहावीची परीक्षा द्यायला लावली, पण दुदैवाने एका अपघातात त्यांचे निधन झाले. मग मुलीला घेऊन झगडत त्यांनी "शिक्षण साधना"ही आश्रमशाळा उघडली, आणि त्यांच्या चांगल्या कर्तृत्त्वाने ती नावारुपाला आली. या आश्रमशाळॆत सर्व जातींची, सर्व धर्मांची शिक्षणाची आवड असलेली सर्व मुले आनंदाने मोफत शिक्षण घेत होती. त्यांना फी तर भरावी लागत नव्हतीच परंतु वह्या, पुस्तके, शालेय साहित्य सारे काही विनामूल्य वापरायला मिळत होते. खूप छान आश्रमशाळा होती ही. मुलांना हवा तेवढा वेळ, हवा तितका अभ्यास करायला मिळायचा,छंद जोपासायला मिळायचे .अट फक्त एकच होती कि शाळॆतले साहित्य, वह्या पुस्तके शाळॆबाहेर न्यायचे नाही. याचे कारण म्हणजे मुलांनी शाळॆत लक्ष देऊन शिकावे, त्या वह्या पुस्तके घरी नेऊन खराब करू नयेत व पुढील वर्गाला त्यांचा उपयोग व्हावा. अगदीच अडचण असल्यास तशी परवानगी काढावी लागायची.
सुलूला तर ही शाळा खूप आवडायची. ताई तिचं सर्वस्व होत्या. त्यांच्या बोटाला धरून ती ह्या शाळॆत चिमुकल्या पावलांनी सगळीकडे फिरायची. शाळेत जायला लागल्यापासून तर इथे तिच्या असंख्य मैत्रीणी झाल्या होत्या. तीने कधीच कोणाला दुखावले नाही, कधी कोणाच्या उणॆपणाला हसले नाही. आणि म्हणूनच आजही इतर मुलींच्या बोलण्याचा तिला खूप राग आला. मनूला चालता येत नाही हे पाहून, वर्गातल्या मुलींनी तिची खोडी काढली होती. तिचं दप्तर बाकावरून उचलून खाली, बाकापासून लांब टाकले होते. आणि त्या तिला चिडवत होत्या. हे सुलूला अजिबात आवडले नाही, तिने लगेच मुलींना फटकारले. आईने मनुविषयी तिला आधीच सांगितले होते. पहिल्या शाळॆत ती हुशार आणि गोड मुलगी होती हेही सांगितले होते.

ती मनूला म्हणाली," तु काळजी करू नकोस.आजपासून आपण मैत्रिणी आहोत. मी बसते तुझ्याजवळ."

मनूला त्यादिवशी सुलू देवासारखीच वाटली. त्यानंतर ताईंनी वर्गात येऊन तीची ओळख करून दिली, वर्गातल्या मुलींना तिच्या परिस्थीची जाणीव करून दिली, सर्वांना सॉरी म्हणायला लावलं .आणि त्या दिवसापासून ताई तिचं दैवत आणि सुलु तिची जीवश्च कंठश्च मैत्रीण बनली. मनूने खूप अभ्यास करायचं ठरवलं. पण तिच्या आईला मात्र तिचं शाळेत जास्त वेळ बसणं आवडत नव्हतं. ती मनूला वाटायचं शाळेत बसून शक्य तेवढा अभ्यास करावा, पण ... तिला घरी परतावं लागायचं कारण बाब दिवसभर दारूच्या नशेत असायचे . आई भावाला घेऊन कामावर जायची. संध्याकाळी घरी आल्यावर ती बहुदा वैतागलेलीच असायची. मग भावाला तिच्या मांडीत सोडून, तणतण करत, तिच्या नावाने शंख करत कामाला लागायची. आईची फक्त सातवी झाली असल्यामुळॆ तिला कुठं नोकरी मिळणे अशक्य होते. मग तिने गावातल्याच साखरकारखान्यात नोकरी धरली होती. काय करणार, पोटासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. शाळॆत गेल्यावर मात्र मनू सगळे जग विसरायची. सुलूच्या गप्पांनी तिचे मन भरून जायचे,ताईंच्या वात्सल्याने आईच्या मायेची कमतरता भरून निघायची. मनूचा शाळॆत कायम पहिला नंबर होता.
सुलूही हुशार होती पण तीची आवड म्हणजे डान्स. डान्स करताना ती हरपून जायची. तिच्याकडे पाहून मनूला नेहमी असे वाटायचे कि जणू आपलेच पाय नाचत आहेत.आणि मग नकळत आपल्याला चालता येत नाही ही खंत तिच्या मनात जाणवायची.

पण आज मात्र अत्यंत आनंदाचा दिवस होता. आज दोघींचंही ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं होतं. दोघीही बी एस सी पास झाल्या होत्या. मनूला आता चांगली नोकरी करणॆ आवश्यक होते .धाकटया भावाने चांगले शिक्षण घ्यावे असे तिला वाटत होत. ती राज्यात पहिली आली होती. सुलूला मात्र डान्सचे वेध लागले होते. भरतनाट्यम मध्ये सुलु आता प्रवीण झाली होती. पण आता तिलाही स्वतःची ओळख त्या क्षेत्रात निर्माण करायची होती.
दोघी आनंदात होत्या. आपल्याच स्वप्नात गुंग होत्या. आश्रमात कधी पोहचल्या त्यांनाही कळलं नाही.
शाळॆच्या बागेत, त्या कट्ट्यावर बसल्या.

सुलू म्हणाली, "मनू, आपण किती मोठ्या झालो गं! कालपर्यंत च जग आता किती बदललं आहे."
"हो गं! खरं आहे. तुझ्या मैत्रीने आणि ताईंच्या मायेने मला किती मोठं बनवलं आहे." मनू.
सुलू एकदम म्हणाली,"पुरे कर गं तुझं हे उपकार पुराण! किती छान आठवणी आहेत आपल्या. तुला आठवतयं
का, आपण त्या चित्रकला स्पर्धेला काय गंमत केली होती? मज्जा!"
"हो, तेव्हा बाईंनी आपल्या दोघीत एकच रंगाची पेटी दिली होती ना? आणण आपल्या दोघींचा एकच आवडता
रंग होता. फेंट निळा " मनू.
सुलू," मग काय, मी चित्र काढलं ते नुसतं ढगच ढग आणि तू नुसतं पाणीच पाणी!

मनूला ते आठवून खूप हसू आलं ,त्या चित्रात तिने पेन्सिलने फक्त लाटाच लाटा काढल्या होत्या.मनू म्हणाली , "हो
ना, आणि निळा रंग देता देता सगळा रंग संपला, मग काय, चित्र बाजूला ठेवून आपण दोघी भांडत बसलो."
सुलू," बाईंनी आपली ती चित्रं मज्जा म्हणून नोटीस बोर्ड वर लावली होती. सगळे येता जाता हसायचे."
"होय सगळंच किती निरागस होतं ना तेव्हा! तू काय करायचं ठरवलंय सुलू? मी आता चांगली नोकरी करायचा विचार करतेय. आता आईलाही एवढं काम होत नाही. माझ्या पार्टटाईमच्या जॉबमधेही काहीच भागत नाही, धिराजच्या शिक्षणासाठी पण पैसे हवेतच."
सुलू , "बरोबर आहे, पण या गावात नोकरी कशी मिळणार? त्यासाठी शहरातच जावं लागणार. तिथे तू एकटी कशी
राहणार?"
मनू, "कुणास ठाउक? अर्ज तर भरते, मग पाहूया काय होतय? धीरज आता बारावीला आहे, त्याला इंजिनियरिंग करायचा आहे. काहीतरी करायलाच हवं"
सुलू म्हणाली, "तू एकटी जाणार नाहीस, मी पण येईन तुझ्याबरोबर."
"नाही सुलू, तु एवढा छान डान्स करतेस, तुझं मोठ्या शो चं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. ही आश्रमशाळादेखील तुला सांभाळायची आहे. मला आता स्वतंत्र , स्वावलंबी व्हायला हवं. इथे ताईंची काळजी कोण घेणार? "
डोळ्यातलं पाणी लपवत मनु सुलूला समजावू लागली.
"ते काही मला माहित नाही. मी तुझ्याबरोबर येणार! " सुलू. मनुची साथ तिला सोडायची नव्हती.
"अगं पण..."......तेवढ्यात शाळॆच्या शिपायाचा आवाज आला. "सुलू...मनू....चला लवकर घरी. ताईंनी दोघींना बोलावल आहे."

विषय अर्ध्यावर टाकून दोघी तशाच उठल्या. आणि घराकडे वळल्या. घरी गेल्यावर दोघींनी प्रथम ताईंना नमस्कार केला. ताईंनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला.
"यशवंत व्हा! सारं काही तुमच्या मनासारखेघडो! " तिघींच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानंतर जेवणाची तयारी करत असताना सुलूने,त्यांचं झालेलं बोलणं सांगितलं .ताईंनी थोडा विचार केला. शहरात शैक्षणिक कामामुळॆ त्यांच्या ब-याच ओळखी होत्या. मग शहरात दोन तीन फोन लावले. आणि मग त्यांच समाधान झालं. मग हळूच त्यांनी जेवताना विषय काढला, "बरं का मनू, मला एका कंपनीतून फोन आला होता सकाळी. त्यांच्या कंपनीत त्यांना एक बी एस सी झालेली मुलगी हवी आहे.
"खरंच ताई? मग तुम्ही माझं नाव सांगीतलंत का? मी अर्ज भरू का त्या कंपनीचा?

"हो गं! मी तुझच नाव सांगीतलय आधी. पण तु राहशील ना तिकडे ? पगारही चांगला देणार आहेत. सुलुही जाणारच आहे डान्सचे पुढचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. तुम्ही दोघी एकत्र राहिलात तर माझीही काळजी मिटेल." ताई म्हणाल्या.
"पण ताई तुम्ही इथे एकट्या राहणार?" मनु.
ताई म्हणाल्या "अगं! एकटी कुठे आहे मी? ही माझी सोबतीण, माझी शाळा आहे ना ! तीच्यात जीव गुंतला आहे ना माझा. आईला विचार. बघ काय ते ठरवा."
"आईला काय ताई? पैसे मिळत आहेत म्हटल्यावर ती काय बोलणार? बाकीची चिंता कशाला करेल ती?" मनु खिन्नपणे बोलली.
"ठीक आहे मग. या १ तारखेलाच त्यांनी तुला रुजू व्हाव लागेल, मग तुम्ही ३ -४ दिवस आधीच जा. म्हणजे तुम्ही जरासे तिथे सेटल व्हाल. "

काय बोलावं मनूला कळॆना. ज्या ताईंमुळॆ आज ती ग्रॅज्यूएट झाली होती त्यांनीच तिच्या नोकरीचीही व्यवस्था केली होती. क्षणभर तिच्या मनात आले, एवढे ऋण आपल्याला कसे पेलणार? मग काही न बोलता ती जेवत राहिली. सुलू मात्र आनंदात होती.तिला हवं तसं झालं होतं, अगदी तिच्या मनासारखं. आता दोघींची साथ सुटणार नव्हती.
ठरल्याप्रमाणॆ २५ तारखेला त्या शहरात आल्या. त्यांची रहायची सोय एका मुलींच्या वसतीगृहात होती.दोन दिवस त्या दोघी खूप फिरल्या, रस्ते माहित करून घेतले. सुलुने आपले डान्स स्कुल देखील पाहून घेतले. पण क्लासेस चालू व्हायला अजून १५ दिवस होते.

मनूचा उद्या पहिला दिवस होता नोकरीचा. तिच्या मनात थोडीशी भीतीच होती. ती सुलूला म्हणाली,
"सुलू, कसं होइल गं? काम करता येईल का मला? आणि सगळॆ इंग्रजीत बोलणारे असतील ना? आपल्याला तर जेमतेम बोलायला जमते. "
सुलू म्हणाली,"अगं..न जमायला काय झालंय? उद्या काय लगेच तुला कामाला जुंपणार आहेत का? तु पण उगाच घाबरत असतेस? असं मस्त तयार व्हायचं, गोड हसायचं, मग बघ. मला खात्री आहे पहिल्याच दिवशी जादू करशील तू. "
"ए..बास हं ! चल आता जेवून झोपूया. " दोघी मेस मधे जाऊन जेवल्या नी मग झोपल्या. मनूला झोप मात्र आली नाही. कसेतरी तीने बळॆ बळॆ डोळॆ झाकले. झोप लागत नाही तोपर्यंत अलार्म वाजला. ती उठून झटकन तयार झाली. तशी सुलू पण उठली.
"चल सुलू, मी निघू का? कंपनीची बस येईलच इतक्यात." पर्स सावरत,कुबड्या हातात घेत मनू म्हणाली.
"ऑल द बेस्ट मनू , मला खूप बोअर होईल पण आज. तू नाहीस ना!" सुलू म्हणाली.
"थँक्स! आणि टाइम पास करू नकोस, डान्सची प्रॅक्टिस कर. तुझ्यासाठी ड्रॉव्हरमधे गंमत ठेवली आहे. मी गेल्यावर उघडून पहा. बाकी आल्यावर बोलू. ओके? बा.....य!"

"अगं काय आहे..थांब की..." सुलू.
पण मनू थांबली नाही. तिला बस पकडायची होती.
सुलूने दार लावून घेतले अन ड्रॉव्हर उघडला. त्यात सर्व फेमस शास्त्रीय नृत्य करणा-या व्यक्तींची नृत्ये असलेली एक सीडी होती. तिला एकदम आश्चर्य वाटले. सुलू ती सीडी किती तरी दिवस शोधात होती."अरे! कशी मिळाली असेल मनूला ही सीडी?" ती विचार करत होती तेवढ्यात दार वाजले, आणि शेजारच्या खोलीतल्या मुलीने सांगीतले की, मनूचा ऍक्सीडेन्ट झाला आहे.
"काहीतरीच काय अगं? आत्तातर ती गेलीय. अजून बसमधे पण बसली नसेल ती. " सुलू म्हणाली. तेव्हा ती मुलगी म्हणाली," रास्ता क्रॉस करत असताना एका कारने तिला धडक दिली . फार लागलं नाही तिला थोडंस हाताला लागलय इतकंच. पण तो कार चालवणारा माणूस चांगला होता. इथे तुला निरोप द्यायला सांगितला आणि तिला दवाखान्यात घेऊन गेलाय. तुलापण तिथेच बोलावलंय"
सुलूला काहीच कळॆना. कशीबशी ती तयार झाली. मनातले विचार चालूच होते. 'काय झालं असेल? फार लागलं नसेल ना? आपलंच चुकलं आपण जायला पाहिजे होतं बाहेर पर्यंत ...’ वगैरे विचार करत रूमला कुलूप लावून ती बाहेर पडली.
ती दवाखान्यात पोचली. तेव्हा मनू त्या व्यक्तीशी बोलत होती.
मनूला पाहून सुलू एकदम रडायलाच लागली. "सॉरी मनु, मी तुला सोडायला यायला पाहिजे होतं."
तीची काळजी पाहून मनूलाही भरून आलं, पण सावरत ती म्हणाली, "अगं काही नाही झालंय. थोडसं हाताला लागलंय इतकंच." मग त्या व्यक्तीची ओळख करून देत मनू म्हणाली, "हे डॉ.सर्वे आणि ही माझी मैत्रीण सुलू. आम्ही एकत्रच राहतो इथे. "
तसे डॉ. सुलूकडे पाहून म्हणाले, "आय एम व्हेरी सॉरी. त्यांची काही चूक नव्हती माझेच लक्ष न्हवते. रिव्हर्स घेताना मला कळालेच नाही. "
मग थोडे इकडचे तिकडचे बोलणॆ झाले. डॉ. सर्वे त्या शहरातले सर्वात प्रसिद्ध ऑर्थोपिडिक सर्जन होते. थोडेसे वृद्ध आणण चेह-यावर कमालीचे हसरे भाव होते त्यांच्या! बोलता बोलता त्यांनी मनूला पायाबद्दद्दल विचारलं . तेव्हा मनूने लहानपणी काय झालं ते सगळं त्यांना सांगीतलं. त्यांनी मनूचा पाय वरवर चेक केला. आणि तिला म्हणाले, "तुमची तयारी असेल तर आपण तुमच्या पायवर ट्रीटमेंट केली तर?"
सुलू एकदम बोलुन गेली, "खरंच बरे होतील का मनूचे पाय?"
डॉ. म्हणाले, "मी आत्ताच काही सांगु शकत नाही. योगायोग जुळून आलाच आहे तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? पण त्यासाठी एक्स रे वगैरे काढावे लागतील."
"पण डॉक्टर बाबांनी लहानपणी सगळॆ प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही."
"आता त्याला बरीच वषे झाली आहेत. त्यानंतर कितीतरी नवनवे उपाय निघाले आहेत.तुझी तयारी असेल तर पाहुया आपण. "

सुलू म्हणाली, "तुम्ही करा डॉक्टर . तीला मी तयार करेन!" आणि मग पुढची अपॉइंटमेंट घेऊन दोघी बाहेर पडल्या. मनूचा आधीच मूड ऑफ झाला होता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी हे असं...! तीने कंपनीत फोन करून कळवलं.दोघी रुमवर आल्या. सुलू मनूला म्हणाली, "किती चांगले होते ना ते डॉक्टर ? ओळख नसतानाही त्यांनी आपल्याला मदत करायची तयारी दर्शवली. नाहीतर आपण या दृष्टीने विचार करायचंच सोडून दिलं होतं." मनू काहीच बोलली नाही. तीला काही कळत नव्हतं, चालण्याची अशा तर तिने तेव्हाच सोडून दिलेली
त्यानंतर दोन दिवसांनी मानून ऑफिस जॉइन केलं. दोघी मिळून पुन्हा दवाखान्यात जाऊन आल्या. डॉ नि सांगितलेल्या सगळ्या टेस्टस केल्या .आज त्याचे रिपोर्टस येणार होते. मनूच्या मनात चलबिचल होत होती. ती वहीवर उगाच रेघोट्या काढत, सुलूची वा् बघत बसली होती बसली होती. नकळत वहीवर अक्षरे उमटली ..
' मन माझे वेडे वेडे..
भिते उगा आयुष्याला...
आशा गेली निघुनिया ..
दोष देत नशीबाला...
नशीब निघाले तिथून ..
जेव्हा सुख शोधायाला...
त्याला भेटलीस तूच,
माझे दु:ख वाटायला ..
एक तुझी मैत्री सखे..
बळ माझ्या जगण्याचे..
कोणी असो वा नसो मग...
वेड मला फक्त तुझ्या सोबतीचे..’

"वा वा! काय छान कविता लिहिलियस गं !" ..सुलू केव्हा आली मनूला कळलंच नाही.
"ए, तु केव्हा आलीस? आणि ..आणि रिपोर्ट्स आणलेस? काय म्हणाले डॉ.? "
"नाही सांगणार...! आधी तु मला ती कविता तुझ्या आवजात वाचून दाखव!.." सुलू
"सांग ना प्लिज ! मग वाचून दाखवेन!" मनू उतावळॆपणॆ म्हणाली.
"डॉ. म्हणाले, मनू बरी होऊ शकते. खरंच मनू तू तुझ्या पायावर उभी राहू शकतेस. स्वतंत्र! मला कित्ती आनंद झालाय कसं सांगू?"
"खरंच का गं? चेष्टा नाहीस ना करत? " मनू न राहावून बोलली.
"खरंच मनू. पण..पण त्यासाठी एक छोटंसं ऑपरेशन करावं लागणार आहे."

"ऑपरेशन? बापरे? म्हणजे खर्च पण खूप असेल ना? किती खर्च सांगितलाय डॉक्टरने ? सांग ना?" मनू.
सुलू, "अगं तसा फार काही खर्च नाही सांगीतालाय. आपण करू एडजस्ट असं डॉक्टर म्हणाले." खरंतर सुलू खोटं बोलत होती. पण खरं सांगीतलं असतं तर मनू ऑपरेशनला तयार झाली नसती. ऑपरेशनसाठी अडीच लाख रुपये लागणार होते. आणि तेही महिनाभरात गोळा करायचे होते. कारण परदेशातले एक डॉक्टर तिच्या पायाचे उपचार करणार होते.तिलाही माहिती नव्हतं, एवढे पैसे ती कसे गोळा करणार होती? मनूची परिस्थिती तर तिला माहितीच होती.
तरीही सुलू म्हणाली, "काळजी करू नकोस गं! डॉक्टर म्हट्ले, पैसे काय तुझ्या पगाराच्या हप्त्यातून पण घेता येतील."
हे ऐकून मनूला जरा हायसे वाटले. मनोमन तीला बरे वाटले. सुलू म्हणाली," जरा बाहेर जाऊन येते. तुझी औषधे आणायची आहेत. आलेच!"
सुलू बाहेर आली णतने ताईंना फोन केला. ताईंना सगळॆ काही सांगीतले. पण ताई तरी एवढी रक्कम कुठून उभी करणार होत्या? तरीही त्यांनी १ लाख रू देण्याचे ठरवले. तसे त्यांनी सुलूला सांगीतले. तरीही प्रश्न अजून दीड लाखांचा होता.
काय करावे? सुलूला काही सुचेना. विचार करता करता एक आठवडा गेला. तिचा डान्स क्लासही चालू झाला होता. आणि अचानक तिला एक शो करायची संधी मिळाली. त्या शोच्या निमित्तानं तिच्या मनात एक कल्पना आली. आपणही मनूसाठी असे काही शोज केले तर? आपले र्सवप्नही पूर्ण होईल आणि मनूचे पायही बरे होतील. मग तिने तो ध्यासच घेतला. तिच्या डांस स्कुलमधील सर्वात मोठ्या व्यक्तीपासून सर्वात छोट्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाकडुन त्याने माहिती जमा केली.kकिती शोज करावे लागतील वगैरे सगळा आराखडा तयार केला. ताईंनाही आपला प्लॅन सांगितला. सुलूची मनूबद्दद्दल असलेली ही आत्मीयता पाहून ताईंनीही तीला मदत करण्याचं वचन दिलं.
खरंच, निरागस मैत्री केवळ अशीच असू शकते, ना कोणती अपेक्षा, ना कोणती मागणी...हवी असते ती मैत्रीची साथ! मैत्रीचं हे नातं एकदा घट्ट झालं की मग या साथीसाठी काहीही ओवाळून टाकायची तयारी असते. असंच नातं होतं ना सुलूचं आणि मनूचं!
सुलूच्या पहिल्या शोची तयारी जोरात सुरू होती. प्रतिसाद तसा कमीच होता. शोची तिकीटविक्रीही तशी मनासारखी झाली नव्हती. त्यामुळॆ सुलू फार अस्वस्थ होती. मनूला मात्र यातलं काहीच माहित नव्हतं. तिला एवढंच माणहत होतं की सुलूचा शो आहे आणि आज ती अस्वस्थ वाटत होती. तिला उत्तेजन द्यायला हवं होतं. तिच्या पुढच्या करियरसाठी ते महत्त्वाचं होतं
ती सुलूला म्हणाली, "मला माणहत आहे की तु एकदम बेस्ट डान्सर आहेस. आणण तुला कधीपासून टेन्शन यायला लागलं गं?"
"नाही गं , आज पहिलाच शो आहे आणि मला जराशी भीती वाटतेय एवढंच." सुलू म्हणाली.

"तुला आपण वाचलेली ती कविता आठवतेय का सुलू... "आकाशझेप" ?

उंच उंच आभाळाला
हात माझे नाही भिडत जरी..
पाखरांच्या संगतीने,
उडता येत नाही जरी...
याच धरेवरती राहुनी मी
घेईन एक आकाशझेप..
गगन भरारी घेईन इथुनही...
पंख नसतानाही...
बळ माझ्या मनातले..
नेईल पक्षांहूनही उंच मला..
यशस्वितेच्या शिखरावरुनी
भिडतील हात माझे गगनाला...

आठवतेय ना?"
मनूच्या शब्दांनी सुलूला थोडा धीर ददला. शो साठी दोघी तयार होऊन निघाल्या .
त्यानंतरच्या पुढच्या काही तासात सुलू जणू अस्तित्त्वातच नव्हती. ती बेभान होऊन नाचत होती. शो सुरू झाल्याच्या क्षणापासून तो संपेपर्यंतच्या क्षणापर्यंत ती वेगळीच सुलू होती. तिचा शो अप्रतिम झाला होता. तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत होता. ताईंना तर अगदी भरून आलं होतं आपली मुलगी एवढं सुंदर नाचते यांचा त्यांना अभिमान तर वाटतच होता. पण आज तिच्यावर गर्वही वाटत होता कारण ती एका चांगल्या कामासाठी आपल्या कलेचा उपयोग करत आहे.आणण मनूला तर काय आकाशच ठेंगणॆ झाले होते. स्टेजवरून खाली उतरल्यावर ती सुलूच्या अगदी गळ्यातच पडली. आपल्या मैत्रीणीचं कौतुक करायला तिच्याजवळ शब्द नव्हते. सुलूला समाधान तर वाटत होते. पण पुढच्या दोन शोजची तिला चिंता होती . पैसे जमा झाले नाहीत तर? मनूचे ऑपरेशन कसे होणार?

पण जिथे फक्त कामाचा ध्यास आणि मेहनतीचे हात असतात तिथे काय कमी? सुलूच्या पुढच्या दोन्ही शोजला प्रचंड प्रतिसाद मिळाला . तिच्या डान्सचे कौतुक आता त्या शहरापुरते मर्यादित राहिलेच नाही. सगळीकडे तिच्या शोजला मागणी येऊ लागली. हेच तर स्वप्न होतं ना सुलूचं? पण आता सध्या सुलूचं एकच स्वप्न होतं मनूचं तिच्या पायावर उभं राहणं. आता ऑपरेशनला दोनच दिवस राहिले होते. मनूच्या परत सगळ्या टेस्ट केल्या. ताईही आल्या होत्या आणि कधी नव्हे ते मनूची आईसुद्धा. सगळॆ रिपोर्टस नॉर्मल होते. पण सगळ्यांना टेन्शन आलं होतं. मनूला ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेतलं. हॉस्पिटलचे सगळॆ पैसे भरून सुलू रुमवर आली. ती खूपच थकली होती. इतक्या दिवसांचा ताण आज तीला असह्य झाला होता. अगांत अजीबात ताकत नाही असं तिला वाटू लागलं होतं. तीला एकाएकी सणकून ताप आला. होस्टेलमधली मुलगी जेव्हा तीला ताईंचा फोन आल्याचा कळवायला आली तेव्हा तीला कळाले की सुलूला खूप ताप आला आहे. तीने लगेच फोनवरून ताईंना कळवलं. ताई धावतच रूमवर आल्या. डॉक्टरांना पण बोलावल. पण दोन दिवस झाले तरी तीला बरं वाटेना .तिकडे मनू सुलूची वाट पाहत बसली होती. आज तीचं ऑपरेशन होतं. पण त्याआधी तिला आपल्या मैत्रीणीला भेटायचं होतं.

सुलू ताईंना म्हणाली, "आई तू मनूजवळ जा. तिला जास्त गरज आहे आहे. ती माझी वाट पाहत असेल. "
"पण तुला एवढा ताप आहे, मी कशी जाऊ बाळा? मनूची आई आहे तिथे."ताई रडत रडत म्हणाल्या.
"नको आई, तू जा. त्यांना इथलं जास्त काही माहित नाही. आणि मनूने माझ्याबद्दद्दल विचारलं तर काही नको सांगूस , नाहीतर ती ऑपरेशनला नकार देईल. प्लिज , जा ना."
पाय निघत नव्हता ताईंचा पण त्या निघाल्या. होस्टेलच्या मुलीला सुलूजवळ बसवून त्या हॉस्पिटलमध्ये आल्या. मनू वाटच बघत होती. आल्या आल्या तीने विचारलंच,
"ताई, सुलू नाही का आली. दोन दिवसात एकदाही आली नाही? "
ताई काहीच नाही झाले असे दाखवत बोलल्या, "अगं काही नाही, तीला अचानक एका गावात शो करायला जावं लागलं. म्हणून तीला येता आलं नाही."
मनूचं मन थोडं खट्टू झालं. तीला वाटलं सुलूने यायला पाहिजे होतं. पण काही हरकत नाही.ऑपरेशन झाल्यावर ती नक्की पळत पळत येईल.
मनूचं ऑपरेशन यशस्वी झालं. तीला चालायला अजून १ महीनाभर तरी लागणार होता. पण ऑपरेशन होऊन दोन दिवस झाले तरी सुलू तीला भेटायला आली नव्हती. ताई भेटायला आल्या तेव्हा तीने पुन्हा विचारलं,
"ताई सुलू अजून नाही आली ? "
डॊळ्यातलं पाणी कसंबसं लपवत त्या म्हणाल्या, "नाही." पण आज त्या उत्तराने मनूचं समाधान झालं नाही. तीने ताईंना पुन्हा खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी मनूला सारं काही सांगीतलं. ते सगळॆ शोज तीने तीच्यासाठी केले हेही सांगितलं. हे ऐकून तर मनूला धक्काच बसला. आपल्यासाठी सुलूने इतकं काही केलं आणि ती आज आजारी आहे तर आपल्याला जाताही येत नाही.
तीने डॉक्टरांकडे घरी जाण्याचा हट्टच धरला. तीचा हट्ट पाहून शेवटी डॉक्टरांनी सुद्धा हार पत्करली. जगावेगळ्या या मैत्रीचं त्यांनासुद्धा खूप कौतुक वाटत होतं.

मनू रूमवर आली तेव्हा सुलू पलंगावर झोपलेली होती, तीच चेहराही खूप निस्तेज झाला होता. ती खूप अशक्त झाली होती. मनूला रहावलंच नाही, मनूने एकदम तीचे पाय धरले, त्यामुळॆ सुलूला जाग आली.
"मनू, तू? अगं तू काय करते आहेस?"
"मी काहीच करत नाहीय. तूच केलं आहेस. माझ्यासाठी..खूप काही. मी काय बोलू? तुझे,ताईंचे उपकार कसे फेडू? आजारी असतानाही सांगीतलं नाहीस."
"अगं काही केलं नाही मी. तू माझी मैत्रीण आहेस. मग त्यात ही भाषा येतच नाही. तु तुझ्या पायावर उभी राहणार आहेस, ही किती मोठी गोष्ट आहे मनू. खरंच मी जे काही केलं त्याचं आज चीज झालंय. आणि मी फक्त थोडीशी अशक्त झालेय इतकंच . लवकरच बरी होणार आहे गं!"

दोघींनी एकमेकींना अगदी घट्ट घट्ट मिठी मारली. आणि मनातल्या मानात ह्या मैत्रीची गाठ अजूनच घट्ट केली. कधीच न सु्ण्यासाठी........

हर्षा स्वामी

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users