माझी पाठदुखी ३

Submitted by विद्या भुतकर on 28 January, 2018 - 18:19

मागच्या भागात ( https://www.maayboli.com/node/65119 ) मी पाठदुखीबद्दल थोडी माहिती दिली होती. पुढे जाऊन मला गेल्या तीन महिन्यांत जाणवलेल्या काही गोष्टी, काही अनुभव लिहायचे होते. ते असे.

१. जाऊ दे ना: जसे मी पाठदुखी हे आपल्याला कायमचं लागलेलं दुखणं आहे असं स्विकारुन पुढे जात राहिले तसेच अजूनही बरेच लोक असतील. पण हे लक्षात येत नाही की आपलं शरीर दुखतंय म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय आणि ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. जे काही चुकत असेल ते दुरुस्त केलेच पाहिजे. ते दुरुस्त होत नसेल तर ते कमी होण्याचे प्रयत्न तरी केले पाहिजेत. माझ्यासारखेच अनेकांना सुरुवातीला जे फिजिओथेरपीसाठी सांगितलेलं असतं त्यांनी अनेकदा ती केलेली नसते आणि त्याबद्दल ते विसरुन जातात. वजन वाढत आहे, ते कमी करा म्हणून सांगतात कुणाला तेही सोडून दिलं जातं. ते करणं टाळलं पाहिजे. मी चूक केली ज्याबद्दल आता मला जाणीव होत आहे.

२. एव्हढं हातातलं काम: अनेकदा असं होतं की आपल्या समोर एखादं काम असतं, पाठ दुखत असते. पण वाटतं एव्हढ्या चार पोळ्या करते आणि बसते. आजचा कार्यक्रम तेव्हढा होऊन जाऊ दे मग डॉक्टरकडे जाऊ. दिवाळी संपू दे, मग थोडा व्यायाम करु. पाठदुखीच्या बाबतीत मला असं सांगितलं की आपण ज्या अवस्थेत चुकीच्या प्रकारे किंवा खूप वेळ बसलेले आहोत त्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे उदा: एखादं प्रोजेक्टचं काम चालू आहे, सलग दोन तास बसलोय, माहित आहे की जरा उठलं पाहिजे पण नाही होत. मला या आजारपणात कळलं की मी सलग दोन तास बसले एकाच अवस्थेत तर किती त्रास होत होता. नाईलाजाने मला उठावंच लागत होतं. कारण तसं नाही केलं तर खूप दुखत होतं. तर ते दुखणं वाढायची का वाट बघायची? चालत असू, उभे असू तर मधेच ते सोडून थोडं बसायचं. बसलेले असू तर उठून चालून यायचं. कुणीही सलग चार तास एकाच ठिकाणी आपण बसावं अशी अपेक्षा करत नाही.

३. जर-तर: आता शेवटी आजारपण वाढलंच तर मग पहिली फेज असते ती म्हणजे, 'जर-तर' ची. म्हणजे काय ?तर माझी पाठ, पाय अतिशय दुखायला लागल्यावर मला पाच मिनिटेही उभे राहणं शकय होत नव्हतं. रोजची साधी साधी कामंही जमत नव्हती. तेव्हा रडू यायचं आणि विचार करायचे की खरंच मी आधी का नाही लक्ष दिलं? कदाचित सतत बसले नसते, पळाले नसते तर कदाचित इतकं झालं नसतं. किंवा अगदी साधी गोष्ट म्हणजे, ज्या ट्रीपमध्ये माझं दुखणं वाढलं तिथे गेलेही नसते तर आज मी वेगळी असते, नॉर्मल असते. असे अनेक विचार यायचे. पण नवरा समजावत राहिला, जे झालंय ते झालंय. आता काही करु शकत नाहीये. उगाच, काय करायला हवं होतं, काय झालं असतं असे विचार करुन काहीच उपयोग नसतो. जे समोर आहे त्याला तोंड देणं आणि पुढे काय करायचं हे ठरवणं इतकंच करु शकतो.

४. गृहीत धरणं: या आजारपणात माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या शरीराला किती गृहीत धरतो. मला अगदी साध्या गोष्टी करता येत नव्हत्या. उदा: फ्रिज किंवा मायक्रोवेव्हचा दरवाजा उघडणेही जमत नव्हते. पोळ्या करायला उभी राहिले तर दोन पोळ्या करुन बसावं लागत होतं. भाजी किंवा वरण असलेलं भांडंही माझ्यासाठी जड होत होतं. तेव्हा लक्षात आलं की या छोट्या गोष्टी एरवी आपण किती सहज करु शकतो पण त्याच्यासाठी शरीराचे निरनिराळे भाग किती कार्यरत असतात. ते बंद पडले तर किती त्रास होतो. माझा उजवा पाय अशक्त झाल्याने, डाव्या पायावर जास्त जोर येत होता आणि शरीराचा तोल मध्यावर न राहिल्याने खुब्यात दुखायला सुरुवात झाली होती. म्हणजे आपण दोन पायांवर स्वतः उठून चालू शकतो हे किती मोठं भाग्याचं लक्षण आहे आणि तरीही आपण आपल्या शरीराला इतकं गृहीत धरतो.

५. मानसिक अवस्था: मला पहिल्यांदा डॉक्टरकडे जावं लागलं तेव्हा वाटलं की इंजेक्शन दिलं आहे, गोळ्या घेऊन आठवड्यात बरं होईल कदाचित. फारतर दोन आठवडे. पण हळूहळू करत दिवस जाऊ लागले तसा माझा संयम सुटला. आपल्याला जे काही झालं आहे ते दुरुस्त व्हायला महिने किंवा वर्षं लागू शकतात या विचाराने अस्वस्थ वाटू लागतं. एखाद्या दिवशी बाहेर जेवायला जायचं होतं तर तासाच्या आत मला घरी परत यावं लागलं कारण त्याहून जास्त वेळ मी बाहेर राहू शकत नव्हते. अशा वेळी वाटायचं इतक्या बंधनात राहून आपण कसं जगणार? अगदी साधं म्हणजे ठराविक दोन-चारच ड्रेस घालता येत होते, त्याचाही त्रास होत होता. (आता म्हणू नका, कुणाचं काय तर कुणाचं काय? Happy )त्यामुळे मन अजून खच्चून जायचं.

कधी वाटायचं, एखाद्या ट्रीटमेंटने बरे झाले तर किती बरे होईल? मग ती नाही पचनी पडली की पुन्हा नाराज होणं. अशा परिस्थितीत सतत नॉर्मल राहणं अशक्य होत होतं. मी जमेल तेव्हा टीव्ही बघून, काहीतरी लिहून, चित्र काढून वगैरे मन गुंतवण्याचा प्रयत्न करायचे. अशावेळी तसं काहीतरी करणं हाच उत्तम उपाय आहे असं मला वाटतं.

६. व्यक्त होणं: अनेकदा लवकरच दुरुस्त होईल या विचारांनी आपण जास्त काही कुणाला सांगत बसत नाही. त्यात परगावच्या, परदेशात असताना घरच्यांना उगाच काळजी नको म्हणून तर अजून सांगत नाही. पण मग या गोष्टी स्वतःकडेच ठेवून अजून जास्त त्रास होतो. त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे कुणालातरी सांगणं जास्त गरजेचं आहे. मी नवऱ्याला तर सतत बारीक सारीक काहीही बदल वाटला तर सांगत राहात होते. तोही ऐकून घेत होता. रडायचं तर काही विचारु नका.

जवळच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना अनेकदा व्हॉट्सऍपवर अपडेट करत होते. माझा काही मेसेज आला नाही तर त्याही स्वतःहून विचारत काय झालंय, बोल वगैरे म्हणून. माझ्यासारख्या नियमित बोलणाऱ्या व्यक्तीलाही अजिबात कुठे, कुणाशी काहीही बोलायची इच्छा व्हायची नाही. पण केवळ कुणीतरी विचारत आहे म्हणून का होईना मी बोलायला सुरुवात केली आणि त्याने फरक वाटला. अगदी एक मित्र आणि त्याची बायको ज्यांच्याशी माझं नेहमी बोलणं होत नाही, पण त्यालाही माझ्यासारखा थोडा त्रास असल्याने जरा जास्त जवळून बोलणं झालं या गेल्या काही दिवसात आणि केवळ बोलण्याने खूप फरक वाटला.

७. दुर्लक्ष करणे: या दरम्यान, अनेकदा घरात आणि कामात लक्ष लागत नसायचं. काही वेळा डॉक्टर अपॉइंटमेंट असणं, सुट्ट्या घ्याव्या लागणं किंवा काहींना प्रमोशन जाऊ द्यावं लागतं तर काहींना परफॉर्मन्स रिव्ह्यू वाईट दिला जातो. आपण अशा परिस्थितीतून जात असताना कामाचा, नोकरीचा ताणही वाढणं हे अतिशय दुर्दैवी आहे. पण तसं झालंच तर महत्वाचं काय हे बघता आलं पाहिजे. मला ते जमलं नाही. आता मागे वळून पाहिल्यावर वाटतं, मी का नाही सुट्टी टाकली सरळ आणि घरी बसले? चालताही येत नसताना केवळ प्रोजेक्टचं काम आहे म्हणून ऑफिसला जाऊन बसणे किती महत्वाचं होतं? येता-जाताना घसरुन पडले आणि काही झालं असतं तर? तर अशावेळी त्या प्रोजेक्टची टाइमलाईन मला महत्वाची वाटायला नको होती. पण तरीही ती वाटली. कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर थोडा कमी त्रास झाला असता.

घरातल्या कामातही दुर्लक्ष करणं जमत नाही. एखाद्याला नोकरी नाहीये पण घरात पसारा पडलाय, जेवण बनवता येत नाही, मुलांना वेळेत डबा देता येत नाहीये किंवा त्यांच्या एखाद्या क्लासला जात येत नाहीये याचं प्रचंड वाईट वाटत राहतं. मला तर रात्री मुलांना झोपवताना त्यांच्या शेजारी ५-१० मिनिटे झोपायची सवय आहे. तेही करता येत नव्हतं. तर कधी त्यांनी नीट कपडे घातले नाहीयेत, केस विंचरले नाहीयेत म्हणून त्यांच्यावर चिडचिड व्हायची. भांडी घासायची पडलीत पण आपण करु शकत नाहीये, नवऱ्यालाच अनेक कामे करावी लागत आहे अशा एक ना अनेक गोष्टींचं वाईट वाटायचं. पण त्या करताना मला त्रास होत असेल तर मी ते टाळलंच पाहिजे किंवा त्यातील जमेल तितक्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे.

८. मुलं: घरातील अशा वातावरणाचा मुलांवर परिणाम तर होतोच. आम्ही त्यांना समोर बसून सांगितलं नाही तरी त्यांना आमच्या फोनवरील बोलण्यातून कळायचं की काय चालू आहे. मीही त्यांना ऐकू द्यायचे. कधी ते विचारायचे, सायटिका म्हणजे काय? त्याचं उत्तर द्यायचे त्यांना समजेल असं. सर्जरी ठरल्यावरही त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला शेजारच्या आजी तयार करतील, ऑंटीसोबत जायचे आहे, कोण तुम्हाला पिकअप करणार आहे. त्यांनीही ते ऐकून घेतलं आणि पहिले दोन दिवस खरंच आम्हांला त्यांचं जास्त काही करावं लागलं नाही. त्यांची ने-आण, जेवण सर्व सुरळीत झालं. सर्जरी नंतरही मला वाकणे, पाठीतून वळणे वजन उचलणे ही कामे करता येत नाहीयेत. तर त्यांना तसं सांगितलं. त्यामुळे चुकून एखादी वस्तू उचलताना मला पाहिलं की ते म्हणतातही,"आई तू वाकू नकोस, मला सांग मी देते/देतो उचलून". मला वाटतं त्यांना पूर्णपणे 'सेफ झोन' मध्ये ठेवण्यापेक्षा न घाबरवता परिस्थितीची जाणीव करुन दिली पाहिजे.

९. मदत: या सर्व प्रकरणांत घरुन म्हणजे भारतातून कुणाला येणं शक्य होणार नव्हतं. आई-वडिलांनी इतक्या लांबचा प्रवास करावा असं आम्हाला अजिबात वाटत नव्हतं. त्यात प्रचंड स्नो आणि थंडी. त्यांना त्याचा त्रास झाला असता. त्यामुळे आम्ही चौघेच होतो इथे. तरीही आजूबाजूच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना परिस्थतीची कल्पना होती आणि सर्जरी ठरल्यावर त्यांनी सांगितलंही की काही मदत लागली तर सांग म्हणून. पूर्वी मी नुसतं 'हो' म्हणायचे. पण मी एकदा वाचलं होतं,"तुम्ही विचारलं तर लोक खरंच मदत करायला येतातही, फक्त तुम्ही विचारायची किंवा सांगायची गरज असते". यावेळी मला त्याचा पूर्ण अनुभव आला. एका मैत्रिणीने दोन दिवस आधीच तीन भाज्या, वरण, कढी असे बनवून डबे पाठवून दिले होते, ते मी फ्रिजर मध्ये ठेवून दिले लगेच नंतर लागतील तसे बाहेर काढायला. कुणी मुलांना शाळेत सोडलं, कुणी शाळेतून घेतलं, कुणी पहिले दोनचार दिवस जेवण बनवून आणलं तर कुणी 'तू सांग नक्की' असं म्हणून सांगून ठेवलं. आणि मी सांगितल्यावर तशी मदत केलीही. या सगळ्यामुळे पहिल्या आठवड्यात आम्हाला खूप कमी त्रास झाला आणि मुलांचंही सर्व वेळेत झालं. तर एकूण काय, कुणी मदत करत असेल तर नक्की घ्या.

१०. प्लॅनिंग: सर्जरीसाठी जावे लागेल ठरल्यावर शेवटच्या आठवड्यात बरीच कामे केली. उदा: विकेंडला जाऊन भाज्या, दूध, ब्रेड अंडी असे सर्व सामान आणले. फ्रिजरमध्ये ठेवता येतील असे पराठे, सामोसे, चिकन असेही आणून ठेवले. मुख्य म्हणजे, त्याच विकेंडला पार्लरलाही जाऊन आले. (कुणाला हसू येईल, पण मला बघायला आले लोक तर तोंड जरा ठीक नको का? Wink आणि शिवाय पुढचा महिनाभर मला बाहेर पडता येणार नव्हतं. Wink ). पण खरं सांगायचं तर आपण कसे दिसत यानेही आपल्याला कसं वाटतं यात फरक पडतो. त्यामुळे कितीही हसू आलं तरी ती महत्वाची गोष्ट होती.

ज्या लोकांनी मदत करायची होती त्या सर्वांशी बोलून कन्फर्म केलं होतं कि कोण काय करणार आहे. ऐनवेळी पळापळ किंवा कंफ्यूजन नको. डॉक्टरांनी पुढे लागणाऱ्या गोळ्या औषधे आधीच लिहून दिली होती आणि ती आणून ठेवायला सांगितली होती. तेही करुन ठेवलं. सर्जरीच्या दिवशी काय विचारायचं वगैरे लक्षात ठेवलं होतं.

ऑफिसमध्येही KT डॉक्युमेंट बनवणे, जायच्या आधीची कामे पूर्ण करणे, टाईमशीट भरणे, महिन्याभराच्या सुट्टीसाठी लागणारी सर्व प्रोसेस सुरु करुन व्यवस्थित झालेय ना सर्व अप्रूव्ह हे बघणे अशा अनेक गोष्टी केल्या. त्यात खूप धावपळ झाली पण आज या पोस्ट लिहीत बसलेय निवांतपणे ते त्याचमुळे. Happy

११. सोशल मीडिया: मी नियमित लिहिते, फेसबुकवर पोस्ट असतात, फोटो असतात किंवा व्हाट्सएप्प वर ऍक्टिव्ह असते त्यामुळे अनेकांना सर्जरीबद्दल कळलं तर खूप आश्चर्य वाटलं. अरे असं कसं झालं? त्यात त्यांचा काही दोष नव्हता कारण त्यांना माहित नव्हतं, फक्त जवळ असणाऱ्या काही लोकांनाच माहित होतं. कितीही झालं तरी माणूस प्रत्येक गोष्ट प्रत्येकवेळी जगासमोर मांडेल असंच नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की जे दिसतं तेच खरं आहे असं समजू नका. आपला एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल, त्यांच्या केवळ सोशल मीडियावरुन ठरवू नका त्याचं कसं चालू आहे. समोरुन कसंही दिसत असलं तरी जवळच्या मित्र-मैत्रिणीला एखाद्या दिवशी मुद्दाम मेसेज करुन विचारा कसा आहेस, कशी आहेस. एखादा अचानक मेसेज पाठवायचा बंद झाला तर विचारा, बरंय ना सगळं म्हणून. कारण हे सोशल मीडियाचं विश्व खरंच अनेकदा आभासीच असतं. आपल्या जवळच्या लोकांच्या बाबत तरी त्याच्यावर विसंबून राहू नका. त्यांच्याशी संपर्क साधा आणि बोला. कदाचित तुमच्या फोनचीच त्याला किंवा तिला तेव्हा गरज असेल.

१२. To Google or Not to Google?: आजकाल काहीही झालं की सर्वात पहिली धाव आपली गूगल कडे असते. त्या व्यक्ती, वस्तू, आजाराची माहिती जाणून घ्यायची असते. पण हव्या असलेल्या माहितीसोबत बाकी माहितीही दिसत राहते. कधी ती भीतीदायक असते तर कधी अजूनच गोंधळ निर्माण करते. माझा अनुभव या बाबतीत असा आहे की तिथे मिळालेल्या माहितीमुळे मला फायदा झाला. मला याबाबतची काहीच माहिती नव्हती. ती मिळाली. पुढच्या अवस्था काय असतात, काय ट्रीटमेंट असते इ. बरेच कळले. अर्थात त्या वेळी आपल्याला सर्जरीला जावे लागले तर काय अशी भीती मनात होती आणि ती वाढलीही. पण त्याबरोबर फायदाही असा झाला की जेव्हा खरंच जावं लागलं तेव्हा तो निर्णय घेणं खूप सोपं झालं. काहीच माहित नसताना जर तो निर्णय घ्यावा लागला असता तर खूप कठीण गेलं असतं. मी त्याचे काही व्हिडिओही पाहिले, त्यातून बरे व्हायला किती वेळ लागतो, काय परिणाम, फायदे आहेत इ. मला तरी ते फायदेशीर वाटलं माझ्या मनाची तयारी करायला. पण हा पूर्णपणे आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. कारण काही जणांना त्याने अधिक भीती, काळजी वाटू शकते. तर अशा वेळी ते करणं टाळावं. मला जेव्हा लक्षात आलं की माझे सर्च रिझल्ट त्याच त्याच लिंक परत देत आहे मी माझं सर्चिंग थांबवलं आणि निर्णय घेतला.

तर हे असं आहे. दीर्घकाळ आजारपण घरात असेल तर पूर्ण घरावर त्याचा परिणाम होतो हे मला जाणवलं. तसेच आपण कसे वागतो यावरुन नात्यांवरही परिणाम होतो. माझ्यापेक्षा कितीतरी त्रासातून लोक जात असतील. त्यांना काय अनुभव येत असतील काय माहित. माझ्याकडून जेव्हढं जमलं ते लिहिलं आहे. माझ्याबाबत तरी अजूनही रिकव्हरीला वेळ लागेल आणि तो द्यावाच लागणार हे मला कळलं आहे. अजून थोड्या दिवसांनी एखादी पोस्ट लिहीन हा पुढचा प्रवास कसा होईल यावर. तोवर माझ्या अनुभवातून तुम्हांला काही फायदा झाला तर उत्तमच. सर्वांच्या शुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान डिटेल लिहीलेस. यातून बरेचजण नक्कीच काहीतरी लक्षात घेतील. व पुढची धावपळ टळेल असेच म्हणते. Happy
लवकर बरी हो!

सध्या मी पण सुट्टी घेऊन घरी आहे एका छोट्या सर्जरी मुळे त्यामुळे रिलेट करता येतय. ते पालर्यर बाबतीत सेम पिंच. लवकर बऱ्या व्हा.

ह्या अवस्थेमध्ये सर्जरी करणे हा योग्य निर्णय होता. आता लवकर पूर्ववत होण्यासाठी, आणि परत अश्या प्रकारचे दुखणे उद्भवू नये ह्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आयुर्वेदीक आहार विहाराने प्रचंड फरक पडू शकेल.

आयुर्वेदामध्ये सायटीका हा एक वातविकार मानला गेला आहे. गृध्रसी ह्या नावाने तो ओळखला जातो.
वात रूक्ष आणि शीत गुणाने वाढतो त्यामुळे उष्ण आणि स्निग्ध उपचारांचा जसे स्नेहन, स्वेदन, बस्ति इ. चा खूप उपयोग होतो.
औषधांमध्ये गुग्गुळ कल्प, दशमूळे, एरंडेल तेल अप्रतिम गुण देतात.

नेमके कुठले औषध आणि पंचकर्मोपचार करायचा ते वैद्याच्या सल्ल्याने ठरवावे.