माझी पाठदुखी - २

Submitted by विद्या भुतकर on 25 January, 2018 - 16:07

डिस्क्लेमर: मी डॉक्टर नाही, त्यामुळे माझ्या वापरलेल्या शद्बात, समजण्यांत काही चूक असेल तर माफ करावं. योग्य माहिती दिली तर मी पोस्ट मध्ये नक्कीच सुधारणा करुन देईन.

पहिल्या प्रेग्नन्सीपासून पाठदुखीचा सर्जरीपर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगण्यासाठी लिहायला सुरुवात केली. पाठदुखी सुरु झाली ९ वर्षांपूर्वी. मला वाटते त्या नऊ महिन्यांच्या काळात वाढलेलं वजन, त्याच्यामुळे शरीरावर पडणारा ताण, हार्मोनल बदल या सर्वांमुळे पाठ आधीच नाजूक झालेली असते. त्यात सी-सेक्शन करावे लागले की पोटाचे स्नायू कमी वापरले जातात कारण पोटाकडे स्टिचेस आहेत. मग त्यात मुलाला उचलणे, दूध पाजताना ठीक बसता न येणे, त्यात लवकरच ऑफिसला जावे लागणार असल्यास पडणारा ताण यामुळे दुखणे अजूनच वाढते. माझ्याही बाबतीत तसेच झाले असावं. सुरुवातीच्या फिजिओथेरपीमध्ये सांगितलेले व्यायाम नियमित केले गेले नाहीत. आणि दुखणं वाढलं तरी पळणं, वगैरे व्यायाम कमीही झाले नाहीत. उलट कामाचा व्याप वाढतच गेला.

पाठ दुखण्याची अनेक करणे असू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे पाठीचा मणका ज्या स्थितीत राहणे अपेक्षित आहे त्यात न राहता चुकीच्या बसण्याने, झोपण्याने हा त्रास वाढू शकतो. वजन वाढून एकूणच पाठीवरचा ताण वाढतो. गाडी चालवताना ज्या प्रकारे बसतो, खड्डे किती येतात. वजन उचलताना किंवा कामे करताना पाठीत वाकतो की गुढग्यात, हातात पिशव्या घेऊन जाताना वजन दंडावर येतं का पाठीवर? अशा अनेक गोष्टी. यातील बऱ्याचशा मी लक्ष देऊन करतही होते. पण सर्वात महत्वाचे म्हणजे, पाठ दुखते म्हणून मी पोटाचे व्यायाम करणं टाळायचे त्यामुळे कदाचित पोटाकडील स्नायू कमजोर असल्यानेही पाठ दुखू शकते. मला अनेकांनी विचारलं की केवळ पळण्यामुळे हे झालं असेल का? तसं असतं तर माझ्यासारख्याअनेकांना ते दुखणं झालंअसतं. पळणे हे पाठीच्या मणक्यावर भर देण्यात अजून कारणीभूत ठरले असेल किंवा कदाचित नियमित व्यायाम असल्याने तो त्रास उलट इतके दिवस सहन करता आला असेल, माहित नाही.

इतक्या नऊ वर्षांनी आताच सर्जरी करण्याइतके का झाले याचे कारण असे असावे की ऑक्टोबर मध्ये माझी रेस झाली होती (२१किमी), त्यानंतर दिवाळीचा फराळ, पार्ट्या, अशी अनेक कामं, त्यात काही कामांसाठी सलग बसणं उभं राहणं वाढलं. यात पाठदुखी वाढली. ती वाढून माझ्या ४ दिवसांच्या ट्रिपमध्ये एकदम टोकाला गेली. माझा उजवा पाय दुखू लागला तोही जवळजवळ उचलताही येईना म्हटल्यावर जवळच्या अनेकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे,"तुझ्या पळण्यामुळे झालं असेल? किंवा रनिंगमुळे झालं का?". साहजिक आहे, पाठीच्या दुखण्याचा पायाशी काय संबंध? पहिल्याच डॉक्टर भेटीत 'राईट सायाटिका' वाचल्यानंतर घरी येऊन मी पाहिलं हे 'सायटिका' काय प्रकरण आहे. त्यातून पुढे मला कळत गेलेली माहिती इथे देत आहे.

आता पाठदुखी वाढली म्हणजे होतं काय? पाठीच्या दोन मणक्यामध्ये असलेल्या चकत्या (डिस्क) शरीराच्या वेगवेगळ्या कामांमध्ये सस्पेन्शनचं काम करतात. म्हणजे, पळताना वगैरे त्यांच्यावर भार येतो. आपण ज्याप्रकारे बसतो, उभे राहतो त्यामुळेही भर पडतो. त्यामुळं ही डिस्क दाबली जाऊ लागते. डिस्कच्या बाहेरच्या आवरण (annulus fibrosus) च्या आत एक जो द्रव पदार्थ असतो तो डिस्कवर प्रेशर आल्याने बाहेरच्या आवरणाला आतून दाबू लागतो. ही झाली पहिली पायरी.
Disc_Protrusion.jpg

डिस्क बल्जचे दोन प्रकार पडतात- प्रोट्रूजन आणि एक्सट्रूजन. म्हणजे Protrusion मध्ये आतील द्रव फक्त बाहेरच्या आवरणावर दाब देऊ लागलेले असते. Extrusion म्हणजे बाहेरचे आवरण तोडून हा द्रव बाहेर येतो. त्यामुळे त्या बाहेरच्या आवरणाचे तुकडेही(fragmentation) MRI मध्ये दिसू शकतात. पहिली पायरी आहे तोवर जर बाकी दुसरा त्रास होत नसेल तर फिजिओथेरपीने ती डिस्क हळूहळू मूळपदावर येण्याचा प्रयत्न करता येतो. दुसरे म्हणजे, आपले core muscles स्ट्रॉंग झाल्यानेही पाठीवरचा भार थोडा कमी करता येऊ शकतो. आपण बसतो कसे, झोपतो कसे, ड्राइव्ह करताना खड्डे किती येतात वगैरे. एकूण ही फेज म्हणजे ज्यात आपल्या रोजच्या वागण्यात बदल करुन आणि फिजिओथेरपिने थोडा फरक पडू शकतो. यात योगासनानेही फरकपडू शकतो. कारण सूर्यनमस्कार पाहिले तर त्यात सर्वांगाचा व्यायाम होतो आणि पाठीवर खूप जोर पडत नाही.

दुसरा प्रकार: Extrusion, कधी कधी वरचं आवरण तुटून द्रव बाहेर येऊन मग ती डिस्कचे आवरण आपोआप बंद होऊनही जाते. आता हे Extrusion म्हणजे बाहेरचे आवरण तुटण्याचे काहीही कारण असू शकते. म्हणजे, उदा: एखादा पाठीवर जोरात घसरुन पडला, गाडी चालवताना मोठ्या खड्ड्यात गाडी गेली, किंवा अचानक खूप जास्त वजन उचलले. माझ्याबाबतीत झाली तशी डिस्क हळूहळू नाजूक होऊन एखाद्या छोट्याशा धक्क्यानेही किंवा शिंकेनेही ते आवरण तुटू शकते. (माझ्या ट्रीपमध्येच कुठेतरी एखाद्या डिस्नी राईडमध्येही हे झाले असू शकते. ) द्रव बाहेर येऊन ती डिस्क बंद झाली की कदाचित दुखण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पण बाहेर आलेला द्रव जेव्हा तुमच्या पाठीतून पायाकडे जाणाऱ्या नसेवर येतो तेव्हा त्या नसेवर दाब पडून पायातील संवेदना जाऊ शकते, शक्ती कमी होणे वगैरे जी माझी लक्षणे आहेत ती होऊ शकतात.

खाली ही लिंक देत आहे काही माहितीची आणि चित्रेही.
http://backpaininfo.com/backDiscHerniations.html

backDiskHerniations.gif

आता डिस्कच्या पुढे जाऊन मी सायाटिका बद्दल बोलते. सायाटिक नर्व्ह (नस) ही शरीरातील सर्वात मोठी नस आहे जी पाठीच्या खालील मणक्यातून दोन्ही बाजूने बाहेर येऊन खाली पायांकडे जाते. आता डिस्कचा आकार बदलला (बल्ज मुळे) किंवा आतील द्रव बाहेर येऊन तो त्या नसेवर प्रेशर देऊन लागला तर पाठीला उजव्या किंवा डाव्या बाजूने प्रचंड दुखू लागते. हे दुखणं पूर्ण पायातून जातं खाली बोटांपर्यंत. नसवरील दाब कमी होण्यासाठी फिजिओथेरपी करु शकतातही. मी केलीही पण काही फरक पडला नाही. कारण माझ्याबाबतीत त्यातील पुढचा प्रकार झालेला होता, तो म्हणजे म्हणजे, पायातील पूर्ण संवेदना निघून जातात जिथे जिथे ती नर्व्ह जाते. माझ्या एका मैत्रिणीने पेपरमधील एक कात्रण पाठवले होते ते अगदी योग्य माहिती देत आहे. संवेदना नसणं, मुंग्या येणं, पाय उचलता ने येणं(ड्रॉप फूट) हे सर्व प्रकार मला लागू होत होते.

WhatsApp Image 2018-01-20 at 8.35.46 AM.jpeg

मला एका नर्सने दिलेल्या प्रिंटचे चित्र इथे देत आहे. त्यात L5-S1 जिथे जिथे लिहिले आहे तिथे पायाला फरक पडला होता . तुम्ही चित्रात पाहिले तर गुडग्याच्या उजव्या बाजूने बाहेरून जाऊन पायाच्या बोटांकडे ती नस जात आहे. आणि माझ्याबाबतीत तेच झालं होतं.

IMG_3671_0.jpg

अनेकांना पाठीच्या वरच्या मणक्यातील डिस्कवर जर भार येत असेल तर हातांकडे जाणाऱ्या शिरेवर दाब पडून हातातही तशीच लक्षणं दिसू शकतात जी माझ्या बाबतीत पायात होती. एका मित्राच्या बाबतीत कळले की त्याच्या वरच्या डिस्कमध्ये बल्ज असल्याने तो ड्राइव्ह करताना त्यावर प्रेशर येऊन त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे असे वाटत होते. अस्थमाच्या टेस्ट करुनही काही कळले नाही तेंव्हा पुढच्या टेस्ट मध्ये पाठीतील दुखण्याचे निदान झाले.

तर सायटिका साठी स्ट्रेचिंग किंवा फिजिओथेरपी हे सुरुवातीच्या अवस्थेत मदत करु शकतात. त्यानंतर मला सांगितले होते तसे स्टिरॉइड इंजेक्शनही मदत करु शकतात. ज्यांना ही सुरुवातीची लक्षणं त्यांना इंजेक्शनमुळे फार पटकन फरक पडू शकतो. मला काहीही फरक पडत नव्हता म्हणून सर्जरी करावी लागली. माझी सर्जरी जी झाली त्यात माझ्या डिस्कवर जो काही साठलेला द्रव पदार्थ होता तो काढून घेण्यात येणार होता आणि त्यामुळे नसेवरील दबाव कमी होऊन चालणं पूर्ववत होणार होतं. आता यात घाई करण्याचं कारण म्हणजे, आधीच दोन महिने ती नस दाबून राहिलेली होती. सतत ती त्याच अवस्थेत राहिल्याने ती पुन्हा पूर्ववत झाली नाही तर? अशी शक्यताही होती. म्हणून दोन-अडीच महिन्यांनी ही सर्जरी झाली, मायक्रोडिस्केक्टोमी.

सर्जरीबद्दल सांगायचं तर:
भारतात किती वेळ लागतो माहित नाही इथे, मी सकाळी ७ वाजता गेले होते. दीड- दोन तासात सर्जरी झाली. पूर्ण भूल दिली होती. भूल उतरुन मला बाथरुमला जाता आलं की त्यांनी लगेच मला डिस्चार्ज दिला. भारतात इतक्यात मला घरी सोडलं नसतं असं मला सांगितलंही काही ओळखीच्यांनी. एकूण ७ तासात मी घरी आले होते. काल त्याला दोन आठवडे झाले. पायात बऱ्यापैकी सुधारणा आहे. चालताना पायाचे मागचे स्नायू अजूनही दुखतात कारण गेले दोन तीन महिने ते नीट वापरले गेले नाहीयेत आणि आखडून आलेत. नस जिथे दाबली गेली होती तिथे अजूनही दुखते, पायातही जिथे संवेदना नव्हती तिथे परत आली असे वाटत आहे. पण सकाळी उठले की पाय सुजल्यासारखे वाटते आणि थोड्या मुंग्या आल्यासारखे वाटते. ते हळूहळू कमी होईल असं मला नर्सने सांगितलं.

नस पूर्ववत होण्यासाठी २-३ महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यावर वाट पाहणे इतकेच करु शकतो असंही मला नर्सने सांगितलं. जिथे आधी संवेदना नव्हती पायाला तिथे आता दुखत आहे, जे हळूहळू कमी होईल किंवा व्हायला हवे. सर्जरीची सुरुवातीची रिकव्हरी साधारण ४-६ आठवड्याची असते. मी पाचेक आठवड्यात परत ऑफिसला जाऊ शकते म्हणून सांगितलं आहे. सर्जरीनंतर पहिला आठवडा प्रचंड औषधं होती त्यामुळे डोळ्यांवर सतत झापड होती आणि दुखतही होती. आता जिथे इन्सिजन केले तिथे जास्त दुखत नाहीये पण मूळ पाठदुखी अजूनही आहेच. त्यावर फिजिओथेरपि हाच उपाय आहे असं सांगितलं आहे. ती मला सर्जरीपासून ६ आठवडयांनी सुरु करता येणार आहे. पायात शक्ती येण्यासाठीही PT घेणार आहे.

एकूण सर्जरीनंतर PT ने पूर्ण बरे होण्यासाठी कदाचित ६ महिने तरी लागतील असं वाटत आहे. कमी की जास्त माहित नाही. मी मनाने तरी वर्ष २०१८ त्यासाठी खास ठेवले आहे. यातून शक्य होईल तितके पूर्ण बरे होऊनच बाहेर यायचं असं मनोमन ठरवलं आहे आता तरी. ज्यांना पाठदुखीचा त्रास सतत असेल आणि फरक पडत नसेल तर नक्की काय केले पाहिजे याच्या मुळाशी जा. कारण माझ्याबाबतीत MRI करेपर्यंत कळलं नव्हतं की त्याची तीव्रता किती आहे. जर सुरुवात असेल त्रासाची तर डॉक्टरशी बोलून काय केले पाहिजे पहा. सतत एकाच चुकीच्या अवस्थेत बसणं अतिशय वाईट आहे पाठीसाठी. दर थोड्या वेळाने हालचाल केलीच पाहिजे. बसत असाल तर पाठीला पूर्ण सपोर्ट आहे ना हे पाहिले पाहिजे. झोपताना एका अंगावर झोपत असाल तर गुढग्यांच्या मध्ये उशी घेऊन झोपावं किंवा पाठीवर झोपत असाल तर गुढग्यांच्या खाली उशी ठेवून झोपावं. अशा अनेक गोष्टी थेरपिस्टने मला सांगितल्या आहेत. त्या पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.

आज इतकेच. पुढच्या भागात माझे बाकीचे अनुभव. सतत एका जागी बसणे शक्य आणि योग्य नाहीये, थोड्या थोड्या वेळाने चालणे, बसणे, आडवे होणे असे बदल करत राहावे लागत आहेत. आणि हो, हे सर्व मी माझ्या शब्दात लिहिले, त्यात काही चूक वाटत असेल तर जाणकारांनी दुरुस्ती सांगावी, कृपया. काही चित्रंही देत आहे समजण्यासाठी आणि लिंक त्या जरुर पाहाव्यात.

क्रमशः
विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप चांगली माहिती दिली आहेस विद्या. लवकर बरी होशील. खूप खूप शुभेच्छा तुला.
बरेचदा तुझे रनिंग सायकलिंग च्या पोस्ट पाहिल्या तेव्हा असे वाटलेच नाही कि पाठीची शस्त्रक्रिया झाली असेल .
वेळात वेळ काढून तुझे विचार शेअर केल्याबद्दल धन्यवाद ! _/\_

स्वराली ही सर्जरी आताच झाली आहे, १५ दिवसांपूर्वी. गेले तीन महीने त्रास झाला खूप म्हणून करावी लगली. म्हणून्च लगेच
सर्वांना जमेल तशी माहिती देत आहे.
धन्यवाद.

बापरे ! वाचून कसंसंच झालं . काळजी घ्या, फास्ट रिकव्हरी होवूदेत .. .आणि लवकर ठणठणीत बरी झाल्याची पोस्ट हि वाचायला मिळूदेत. शुभेच्छा.