डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन

Submitted by अभिकल्प on 28 January, 2018 - 11:23

गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत. लवकरच रचित बुद्धिमत्ता (artificial intelligence), आभासी वास्तव (virtual reality), यंत्रमानव (robots) या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल होणार आहेत. एकीकडे हे आधुनिक आणि अवाढव्य तंत्रज्ञान आणि दुसरीकडे कमी-जास्त शिकण्याची क्षमता असलेले सामान्य लोक या दोन ध्रुवांना जोडण्याचं काम युजर एक्सपीरिअन्स डिजाईन करतं.

युजर एक्सपीरिअन्स डिजाईन प्रक्रिया सोप्या भाषेत सांगायची झाल्यास असं म्हणता येईल की, लोकांना (किंवा संभाव्य वापरकर्त्यांना) उत्पादनाकडून किंवा सेवेकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या सध्याच्या अडचणी काय आहेत? त्यांच्या गरजा काय आहेत? अशा गोष्टींचा अभ्यास लोकांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचं निरीक्षण करून केला जातो. ह्या माहितीच्या आधारे उत्पादनाची संकल्पना तयार केली जाते. ही संकल्पना पुन्हा लोकांना दाखवली जाते. आणि त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन उत्पादनाची अंतिम रचना तयार केली जाते. प्रत्येक उत्पादन आणि सेवा लोकांना सुलभ आणि आनंददायी व्हाव्या या साठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन उपयोगाला येतं. व्यापक आणि धोरणात्मक पातळीवर जेव्हा ही प्रक्रिया वापरली जाते तेव्हा तिला 'डिजाईन थिंकिंग' असं म्हणतात.

नव्वदच्या दशकात अमेरिकेत युजर एक्सपीरिअन्स डिजाईन ही कल्पना एका परिषदेत मांडली गेली. डिज़ाइनर्सनी त्यांच्या स्टुडिओच्या बाहेर पडून वापरकर्त्याचा (user) अभ्यास केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने उत्पादनाची किंवा सेवेची उपयुक्त रचना केली पाहिजे असा विचार ठामपणे मांडल्या गेला. भारतात कला आणि डिजाईनच्या शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा आहे. कालांतरानी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन विषयक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ऐंशी-नव्वदच्या दशकात संगणक क्रांतीमुळे आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे भारतात अनेक माहिती तंत्रज्ञान-सॉफ्टवेअर कंपन्या उदयाला आल्या ज्या प्रामुख्यानी पाश्च्यात्य ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर तयार करू लागल्या. हे सॉफ्टवेअर वापरायला सुलभ आणि आनंददायी असावे यासाठी युजर एक्सपीरिअन्स डिज़ाइनर्सची गरज भासू लागली आणि त्यातून नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या. हे युजर एक्सपीरिअन्स डिजाईनर्स (कंपनीच्या नफ्यासाठी आणि पर्यायानी उत्तम पगारासाठी) जरी पाश्चात्य ग्राहकांसाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन करत असले तरी भारतीय लोकांना उत्पादन-सेवा सुलभ पद्धतीनी, स्वतःच्या भाषेत कशा प्रकारे वापरता येतील यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुद्धा सुरु झाले.

काही वर्षांपूर्वी संशोधकांची एक टीम म्हणून आम्ही भारतातल्या अर्धशिक्षित-अशिक्षित लोकांना मोबाईल फोनच्या फोनबुक मध्ये नंबर साठवतांना काय अडचणी येतात याचा अभ्यास केला. त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातल्या अनेक लोकांना जाऊन भेटलो, ते फोनबुक कसं वापरतात याचं निरीक्षण केलं. यातून आम्हाला असं लक्षात आलं की अर्धशिक्षित-अशिक्षित लोकांना फोन नंबरची सांगड अक्षरांसोबत घालण्यापेक्षा चित्र-रंग-चिन्ह यांच्याशी घालणं जास्त सोपं वाटत होतं. ते मित्र-नातेवाईकांचे नंबर दैनंदिन जीवनातले फोटो, चिन्ह यांच्याशी जोडण्यास उत्सुक होते. यातूनच पुढे आम्ही ९ चिन्ह आणि ९ रंग वापरून एकही अक्षर न लिहिता ८१ फोन नंबर साठवणाऱ्या दृश्य फोनबुकचे डिजाईन करू शकलो. अशिक्षित लोकांसाठी कोणतेही अक्षर न वाचता आवाज आणि दृश्य स्वरूपाचा मोबाईल फोन तयार करता येईल का असाही प्रयोग करण्यात आला.

आज भारतात संगणक, इंटरनेट आणि मोबाईल फोन्स यामुळे औद्योगिक आणि सामाजिक स्तरावर क्रांतिकारी बदल होत आहेत आणि उद्या कदाचित रचित बुद्धिमत्ता आणि रोबोट्सचा सुद्धा वापर होईल. लोकांच्या समस्या तंत्रज्ञानाचा वापर करून कशा सोडवता येतील यासाठी अनेक प्रयोग चालू आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक मोबाईल ऍप्स, वेबसाईट्स, मदत क्रमांक तयार करण्यात आले आहेत. शहरात लोकल रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी अनेक मोबाईल ऍप्स, वेबसाईट्स तयार करण्यात आल्या आहेत. किराणा सामान घरपोच देणारे मोबाईल ऍप्स निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात जिल्ह्याच्या आठवडी बाजारात भाजीचा दर काय आहे हे कोणत्याही दलाला शिवाय छोट्या गावातल्या शेतकऱ्याला मोबाईल ऍप द्वारे कळवता येईल का असा प्रयोग चालू आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी सार्वजनिक सुविधांसाठी अनेक मोबाईल ऍप्स आणि वेबसाईट्स तयार केल्या आहेत. डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा, राज्य आणि केंद्र सरकार हे ब्रॉडबँड इंटरनेटद्वारे जोडून प्रभावी आणि गतिमान कामकाज करण्यासाठी प्रयोग चालू आहेत. शाळेतले शिक्षक आणि पालकांना नियमित संवाद साधण्यासाठी मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडिया वेबसाईट्सचा वापर होत आहे. पोलीस खात्याद्वारे मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडियाचा परिणामकारक वापर होत आहे. शाळा, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, बँका, लघुद्योग अशा संस्थांमध्ये संगणक, मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या ३० वर्षात भारतातील खूप मोठी लोकसंख्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन आणि सेवा वापरायला लागणार आहे. हे सगळं तंत्रज्ञान लोकांना सुलभ, स्वभाषेत आणि आनंददायी होण्यासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन अतिशय महत्वाचं ठरणार आहे. त्या अनुषंगाने भारतीय युवकांसाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन क्षेत्रात नोकरी, व्यवसाय आणि संशोधनाच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. थोडक्यात भारताच्या तंत्रज्ञान विषयक सबलीकरणासाठी आणि डिजिटल भारताच्या यशासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन हा महत्वाचा मूलमंत्र ठरणार आहे.

निखिल वेलणकर
युजर एक्सपीरिअन्स स्ट्रॅटेजिस्ट
@nikhilwelankar

Group content visibility: 
Use group defaults

यातूनच पुढे आम्ही ९ चिन्ह आणि ९ रंग वापरून एकही अक्षर न लिहिता ८१ फोन नंबर साठवणाऱ्या दृश्य फोनबुकचे डिजाईन करू शकलो >. याबद्दल अजून थोडी माहिती द्याल का ? स्क्रीन शॉट्स, सेव्ह केलेल्या फोन नंबरची उदाहरणे वगैरे ?

कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज नावाची एक कंपनी आहे . त्यांच्या वेबसाईट वरुन ( असामान्य चिकाटी आणि स्ट्रॉंग ग्रहयोग असल्यासच) परदेशस्थ भारतीयांना व इतर नागरिकांना प्रवासासाठी लागणारे डॉक्युमेन्ट्स बनवता येतात . युझर एक्स्पिरियंस कसा नसावा याचं क्लासिक उदाहरण तुम्हाला त्या साइटवर मिळेल