फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - हेमकुंड साहिब..

Submitted by साधना on 2 February, 2018 - 02:00

मागचा भाग : https://www.maayboli.com/node/65129

नेहमीप्रमाणे सकाळी 4 वाजता जाग आली, बेड टी टाळून हॉट रनिंग वॉटरवाल्याकडून पाणी मागवून आन्हिके आटपून नाश्त्याला गर्दी केली. रात्रभर पाऊस होताच, आताही भुरभुर सुरू होती. बॅगेत होते तितके कपडे अंगावर चढवले असूनही थंडी वाजत होतीच. आज घाटी बंद होती. काल स्वच्छ ऊन व आज पावसाची भुरभुर. इथल्या निसर्गाचा काही भरोसा नाही. आज आमची घाटी भेट असती तर काही खरे नव्हते. युथ हॉस्टेलची आमची शेवटची बॅच होती. त्यामुळे आज आमच्या बाजूने घाटीत जाणारे कोणी नव्हते.

नाश्ता करून खाली आलो. हेमकुंडला प्रसाद खायचा असल्याने आज सोबत डब्बा नव्हता. खाली येताच घोडेवाल्यांनी घेराव घातला. पोर्टर लाम्ब उभे राहून मजा पहात होते. घाटी बंद असल्याने आज त्यांना काहीच काम नव्हते. हेमकुंडला कुणी पोर्टर घेऊन जात नाही. घोडे नाहीतर पायी जातात. आज जवळ जवळ 3600 फूट उंच चढून जायचे होते. दोन दिवस सलग चाली चाली केल्यावर आज तिसऱ्या दिवशी आमच्यातले बहुतेक जण गारद झाले. बहुतेकानी घोडे करायचे ठरवले. शामलीच्या ग्रुपने चालत जायचे ठरवले. आमचे आधीच घोडा करायचे ठरले होते. रमेशसुरेश पण घोड्यानेच जाणार होते. त्यांनी घासाघीस करून आमच्यासाठीही घोडे ठरवले.

घोड्यावर स्वार होऊन आम्ही व सुरेशरमेश हेमकुंडसाहिबच्या दिशेने निघालो. आदल्या दिवशी माझा पिट्टूचा अनुभव घेऊन झालेलाच, आज घोड्याचा अनुभव. पिट्टूप्रमाणे हाही अनुभव थोडा त्रासदायक वाटला. घोडा दुडक्या चालीने चालतो तसे वर बसलेले आपणही हलत राहतो. हा रस्ताही खाली गोविंदघाटातून येणाऱ्या रस्त्याप्रमाणे प्रशस्त पायऱ्यांचा आहे. घोडा पायरी चढतो तेव्हा आपल्याला बरेच हिंदकळायला होते.

घोड्यावरून जायचा दुसरा तोटा म्हणजे आपल्याला आजूबाजूचे फारसे काही पाहता येत नाही, घोडा हवा तिथे थांबवता येत नाही. माझा घोडा चालता चालता बाजूला वाढलेली फुलझाडे स्वाहा करत निघालेला. सतत हलत असल्यामुळे फोटो काढणेही मुश्किल होऊन बसते.

हेमकुंड रस्त्यावर सुदैवाने पावसाची भुरभुर मिळाली नाही. रस्त्याच्या सुरवातीला एक जबरदस्त धबधबा आहे. मी काल बराच वेळ तिथे थांबून त्याला मनसोक्त पाहून घेतले होते. त्यामुळे आज फक्त घोड्यावरून दर्शन घेतले.

IMG_20170819_075535282~01.jpg

तसे उत्तराखंडात जागोजागी धबधबे भेटत होते. आणि तेही कसले जबरदस्त!! पाण्याने फुगलेले, रोंरावत प्रचंड उंचीवरून कोसळणारे!!! धबाबा तोय आदळे लिहीणारे स्वामी रामदास इथे आले असते त्यांनी किती भव्य काव्य लिहिले असते!

उत्तरखंडातल्या धबधब्याखाली चुकूनही कुणी भिजताना दिसले नाही. इथे महाराष्ट्रात धबधबे खास लोकांनी त्यात भिजावे म्हणून बनत असतात असा समज आहे. मी आत्ता जानेवारीत आंबोलीला गेले होते, तर लोक घाटातल्या धबधब्याखाली उभे होतेच... पण उत्तराखंडात कुणीही धबधब्यांच्या आजूबाजूला फिरकताना कधी दिसले नाही. कोण धाडस करेल त्या बर्फ़ाळ पाण्यात भिजायचे? फक्त हिंदी चित्रपटातल्या हिरोईनला नाईलाजाने उतरावे लागत असेल. जसे राम तेरी ... मध्ये मंदाकिनी.

घोड्यावरून बरेच वर आल्यावर त्यांच्या टाईम प्लिजचा एक पॉईंट आला. सगळे घोडेवाले तिथे थांबत होते. आम्हीही उतरून घोड्याला जरा मोकळा केला. तिथे चहापाण्याची व खाण्याची व्यवस्था करणारे स्टॉल अर्थातच होते. ऐशूने लगे हाथ मॅगी खाऊन घेतली. अमृततुल्य हे शब्दही थिटे पडतील इतका सुंदर लेमन टी मला त्या खोपटात प्यायला मिळाला. इतका सुंदर की मी परत एक कप घेतला व येतानाही आस्वाद घेतला.

ह्या अशा टपऱ्या असतात जिथे खायला काही मिळू शकते.

IMG_20170819_085029949~01.jpg

मॅगी

IMG_20170819_085814519_HDR~01.jpg

आमचे घोडे की खेचरे, त्यांनाच माहीत...

IMG_20170819_090523190~01.jpg

आज ऊन अजिबात नव्हते. पाऊस अधून मधून तुषार सिंचन करून जात होता. वातावरणात प्रचंड धुके भरले होते.

खालच्या फोटोत सरदारजी दरीच्या टोकाला उभा आहे असे वाटतेय ना? तसे नाहीये. तो मागचा रस्ता चढून आलाय. इथेच घोड्यांचा थांबा आहे. आम्ही घोड्यावरून हा रस्ता चढून आलो. मी चहा पित बसले होते व हा माणूस अचानक वर आला. एकदम तीव्र चढ असल्याने मागचा रस्ता अजिबात दिसत नाहीय.

त्याने अंगात घातलंय त्याला इथे पोंचो म्हणतात. पन्नास का काय रुपयांना हा रेनकोट मिळतो, चार दिवसात फाटून जातो.

IMG_20170819_085949786~01.jpg

मधूनच वारा धुके बाजूला करे व निसर्गाचे विलोभनीय दृश्य दिसे.

IMG_20170819_084723434~01.jpg

रस्त्याच्या एका बाजूला नेहमीप्रमाणे दरी होती. पण ती घाटीच्या दरीसारखी भयानक वाटत नव्हती. कारण खाली घागरिया अधून मधून दिसत होते. घाटीत भेटलेली बरीच फुले या रस्त्यावर फुललेली होती. ब्लु पॉपीही पाहिले. हाईप केल्याचे सार्थक करत हे फुल खूप सुंदर दिसते. बरेच वर म्हणजे समुद्रसपाटीपासून साधारण 14,000 फूटांवर वर्ल्ड फेमस ब्रम्हकमळ दिसायला लागले.

ब्रम्हकमळाचे या आधी मी फोटो पाहिले होते पण फोटोवरून फुलांच्या अधिवासाची म्हणजे नैसर्गिक स्थितीत ते कसे असेल याची कल्पना येत नाही. सवारी केल्यापासून घोडेवाल्याला ब्रह्मकमळ कधी दिसेल हा प्रश्न विचारून मी हैराण केल्यामुळे त्याने ते एकदाचे दिसल्यावर 'वो देखो, आ गया आपका ब्रम्हकमल' म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. मला तरीही ते कुठे आहे ते दिसेना. शेवटी ऐशु म्हणाली की ते लांबवर जमिनीत दिवे उगवल्यासारखे वाटताहेत ती ब्रम्हकमळे. ही कमळे इतर फुलांसारखी रस्त्याला लगटून नव्हती. कदाचित रस्त्याजवळ असलेली तोडली गेली असावीत. रस्त्यापासून दूर खाली दरीत किंवा वर चढणीवर फुले दिसत होती. पावसामुळे माती ढिली झाली होती त्यामुळे तिथवर जाऊन कोण बघणार? 'उपर तालाब के पास भी बहोत है। वहा देख लेना।' म्हणत घोडेवाला घोड्याला पुढे दामटवत होता पण तरी आम्ही घोडे थांबवायला लावले.

लांबून कमळे खूप सुरेख दिसत होती. जमिनीपासून साधारण फूट दोन फूट वाढलेल्या झुडपावर ही कमळे येतात. ह्या झुडपाची पाने साधारण आपल्या भांबुरड्याच्या पानासारखी दिसतात. चारपाच झुडपांचा एकत्र गुच्छ असतो, प्रत्येक झुडपातून एक दांडा बाहेर पडतो, दांड्याच्या टोकाला कमळ. ऑफ व्हाइट हिरवट झाक असलेला उभट फुगीर दिवा कसा दिसेल तशी ही कमळे दिसतात. आकार साधारण मोठ्या सोललेल्या उभट नारळाएवढा. आजूबाजूच्या हिरवाईत ही दुधी फुले उठून दिसतात, बागेत लावलेल्या दिव्यांसारखी.

बाहेरून इतकी सुरेख दिसणारी फुले अंतर्यामी मात्र चक्क कुरूप आहेत. आपल्याला जे दुधी हिरवट दिसते ते पानांचेच एक्सटेन्शन असते, खरी फुले आत असतात. बाकीच्या हिरव्या पानांच्या गर्दीत 3 -4 जांभळ्या रेषा असलेली पाने दुधी होतात व एकमेकांना झाकून गोल करतात. त्या गोलाच्या आत पाच सहा अष्टरसारखी दिसणारी, चॉकलेटी-काळसर-निळसर अरुप फुले असतात. ती खरी फुले. बरे काही सुवास वगैरे असावा तर तसेही काही नाही. दुरून डोंगर साजरे तशी ही दुरूनच साजरी दिसतात. जायच्या आधी फुलांबद्दल इतके काही वाचल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष फुल बघितले तेव्हा वाटले उगीच ओव्हर हाईप केलेय यांना!!

यांना कमळे का म्हणतात देव जाणे. कुठल्याही बाजूने ही कमळे वाटत नाही, ना कमळाच्या कुळाशी कसला संबंध आहे. ही चक्क ऍस्टरसी (asteraceae) कुळातली फुले आहेत.

ब्रम्हकमळ कायम अर्धोन्मीलीत राहते, ती वरची स्पेशल पाने आतल्या फुलांना झाकून ठेवतात ज्यामुळे थंडीपासून फुलांचे रक्षण होते. मला जरी ब्रम्हकमळ स्पेशल वाटले नाही तरी तिबेटी लोकांमध्ये त्याचे खूप महत्व आहे. तिबेटी औषधांमध्ये याचा वापर होतो. खरेतर जरा जास्तच वापर होतो ज्यामुळे फुलांची संख्या रोडावतेय.

हा फोटो नेटवरून साभार (इंटरनेटवर व आपल्याइथे जी फुले ब्रम्हकमळे म्हणून प्रसिध्द आहेत ती प्रत्यक्षात निवडुंगाची फुले आहेत. Epiphyllum oxypetalum असे सर्च करा)

Screenshot_20180202-194817~01~01_0.png

आम्ही घोडे थांबवले खरे पण जिथे थांबवले तो घोड्यांचा स्टॉप नसल्यामुळे घोड्यावर चढउतार करण्यासाठी तिथे काहीही सोय नव्हती. (तिकडे खूप ठिकाणी 3 फुटी छोटे बाकडेसदृश्य प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत ज्यावर चढून आपण घोड्याच्या पाठीवर बसू शकतो) त्यामुळे मी खाली उतरणे अशक्य. मी उतरलेही असते पण मग परत चढणार कसे? जमिनीवरून रिकीबीत पाय टाकून वर चढण्यासाठी आवश्यक ते लवचिक शरीर माझ्याकडे नसल्याने मी उतरलेच नाही. अर्थात घोडेवाला तुम्हाला कुठूनही घोड्यावर चढवू शकतो. त्याला फक्त सवारीत इंटरेस्ट असतो, त्यामुळे तो निरिच्छ मनाने तुमच्या सीटला वर ढकलून तुम्हाला घोड्यावर चढवू शकतो.

आम्ही कुणी घोड्यावरून पायउतार होत नाही हे पाहून आम्हा सर्वांतर्फे सुरेश उतरला. थोड्या चढावावर फुले दिसत होती. तिथे जाऊन त्याने फोटो काढले. बादमे सबको फोटो देता हु असे जरी तो म्हणाला तरी नंतर आम्ही विसरून गेलो. फोटो काढून झाल्यावर परत वरात पुढे निघाली.

बरेच वर आल्यावर एका ठिकाणी थेट वरपर्यंत घेऊन जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. चांगल्या रुंद, अर्धा फूट उंची असलेल्या मजबूत सिमेंटी पायऱ्या थेट वरपर्यंत नेतात, वळणावळणाच्या रस्त्यामुळे आपण जास्त चालतो, ते वाचते. या पायऱ्यांचा अजिबात वापर करू नका, कारण सुरवातीला जरी फक्त अर्धा फूटाची पायरी असली तरी पुढे दोन ते अडीज फुटाची एकेक पायरी बनवल्यामुळे चढून जायला खूप त्रास होतो असा धोक्याचा इशारा आम्हाला ऋषिकेशलाच देण्यात आला होता. आमचे घोडे अर्थात त्यांच्या रस्त्यानेच जाणार होते.

मजल दरमजल करत शेवटी पर्वताच्या टोकाला येऊन हेमकुंडला पोचलो. उतरायला घोड्यांचा वेगळा प्लॅटफॉर्म नव्हता तर एक उंच दगड प्लॅटफॉर्म म्हणून वापरला होता. कसेबसे मी माझा जीव व घोडा त्याचा तोल सांभाळत आम्ही दगडाला चिकटलो व मी एकदाची पायउतार झाले. हुश्श बिश्य करून झाल्यावर हेमकुंडसाहिबच्या दिशेने निघालो. त्या परिसरात प्रवेश केला की समोर मोठे गुरुद्वारा आहे पण त्याचे प्रवेशद्वार मात्र मागे आहे. आपल्याला समोर दिसते ती लंगरची जागा. तिथे एक भलीमोठी कढई ठेवलेली, आत अख्खा माणूस बसेल एवढी. त्यात साबणयुक्त गरम पाणी होते. कढईखाली मोठे चुल्हाण होते त्यामुळे तो भाग उबदार झालेला होता. आमच्यासारखी काकडलेली जनता त्या चुल्हाणाची ऊब मिळवत उभी होती. हे सगळे इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच मांडलेले. दरवाज्याच्या आतल्या बाजूला एकजण गरमागरम चहा देत होता. तिथेच स्टीलच्या पेल्यांची व 6 इंची परातींची रास होती. त्या राशीतून पेला उचलून घ्यायचा, चहावाल्यासमोर जाऊन सत श्री अकालचा नारा लावायचा की ग्लास भरून चहा आपल्या ताब्यात. बाहेर येऊन चुल्हाणाच्या आजूबाजूला उभे राहून स्वतःला शेकत चहा प्यायचा. पिउन झाला की कढईशेजारी ठेवायचा. कारसेवा करणारे भाविक कढईतले गरम पाणी वापरून ग्लास व पराती धुत होते. कुणी भाविक तिथे नसेल तर गुरुद्वाराचे लोक स्वतःच येऊन ग्लास धुत होते. अर्थात सत श्री अकालचा नारा लावायची काही गरज नव्हती. गुरुद्वारात येणाऱ्या प्रत्येकाला चहा खिचडी मिळत होती.

चहा पिउन झाल्यावर गोल वळसा मारून बिल्डिंगच्या मागच्या बाजूला गेलो. समोर निळ्याशार पाण्याचे विस्तीर्ण हेमकुंड होते. समोर उभा डोंगर होता, त्याच्यावर जाडजुड पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या रेषा ओढलेल्या दिसत होत्या ज्या हेमकुंडात विसर्जित होत होत्या. हे दृश्य 2-3 मिनिटेच दिसू शकले. फोटो काढायचा विचार करेपर्यंत एक खूप मोठा धुक्याचा ढग तलावावर येऊन विसावला, त्याने डोंगरासकट तलाव झाकून टाकला. त्याने तिथून हलायचे मनावर घेतलेच नाही. मी नंतर चार पाच वेळा तरी परत तिथे येऊन पाहिले पण डोंगर दिसला नाही.

IMG_20170819_102942501~01.jpg

हेमकुंडाचे पाणी बर्फाचेच होते पण तरीही त्यात लोक बुचकळत होते. काठाला जाड लोखंडी साखळ्या अडकवलेल्या, एक साखळी हातात धरायची व जो बोले सो निहाल आरोळी देत डुबकी मारायची. श्रद्धा असली की सगळे साध्य होते. तळे बघत असताना 'बीबीयोंके लिये अंदर इस्नान का प्रबंध किया है' म्हणत एका सरदाराने मला आत जायला सांगितल्यावर मी तिथून काढता पाय घेतला. तिथेच आवारात एक लक्ष्मणाचे मंदिरही आहे. उत्तराखंडात रामापेक्षा लक्ष्मण जास्त प्रसिद्ध आहे बहुतेक. लक्ष्मण झुला, लक्ष्मण सेतू, लक्ष्मण मंदिर वगैरे.

टोकाला दिसतेय ते लक्ष्मण मंदिर..

IMG_20170819_103013623~01.jpg

तिथेच बाजूला शंकराचे मंदिरही होते. आमच्या ग्रुपमधली उन्नती तिथे भेटली. तिने कुठूनतरी ब्राम्हकमल तोडून आणले होते. 'आज अमुक तमुक तिथी आहे, आज शिवजीला ब्रम्हकमळ वाहिले तर अमुक इतका पुण्यलाभ होतो' हे तिने ऐकवल्यावर तिच्या कानाखाली दोन ब्रम्हकमळे काढावीत अशी तीव्र इच्छा मला झाली. पुण्य मिळवण्याची सुवर्णसंधी हाती असूनही तिचा लाभ आम्ही घेत नाही आहोत म्हणून आमच्या बद्दल उपहास व तिरस्कार तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आत शंकर महाराज पिंडीच्या रुपात तिच्यासारख्या पंडित लोकांनी वाहिलेली ब्रम्हकमळे अंगावर धारण करून बसले होते. जेव्हा तुमची तांडव करायची इच्छा होईल तेव्हा ह्या पंडितांना आधी बघा ही विनंती करून मी बाहेर पडले.

तिथून निघून वर गुरुद्वारात गेलो. मोठ्या प्रशस्त हॉल मध्ये धीरगंभीर सुरात ग्रंथसाहिब पठण सुरू होते. मध्ये साखळी लावून हॉलचे दोन भाग केलेले. जवळ जवळ सगळी जनता एका भागात बसलेली, दुसरा भाग रिकामा होता. मी आधी ग्रंथसाहिबसमोर जाऊनडोके टेकले व रिकाम्या भागात बसले. थोड्या वेळात पठणावरून लक्ष उडाले व लोकांचे निरीक्षण करायचे आवडते काम मी हाती घेतले. हॉलच्या दोन्ही बाजूला जमिनीलगत कपाटे होती, आत कांबळ्या ठेवल्या होत्या. आपल्याला एक कांबळी काढून घ्यायची, लपेटून आरामात कीर्तन ऐकत हवा तितका वेळ बसायचे व जाताना घडी घालून कांबळी परत कपाटात ठेऊन द्यायची. इथले कीर्तन कॅनडात लाईव्ह दाखवले जाते ह्याचे जागोजागी बोर्ड लावले होते. आता इथे आलोच आहोत तर कडाह प्रशाद खायला मिळावा असा एक विचार डोक्यात येऊन घट्ट झाला. थोड्या वेळाने एकजण प्रशाद आणून वाटायला लागलाही. पण हाय रे दैवा! तो माझ्या बाजूला आलाच नाही. मी चुकीच्या ठिकाणी बसले होते की काय देव जाणे. मी अजून थोडा वेळ वाट पाहून शेवटी परत खाली आले.

खाली आल्यावर आजूबाजूचा प्रदेश फिरून पाहिला. अतिशय सुंदर जागा!! उंच पर्वताच्या टोकावर एवढे मोठे मंदिर बांधणे व वर्षाचे पाच महिने तिथे येणाऱ्या लोकांची व्यवस्था करणे खूप कठीण आहे. प्रत्येक गोष्ट खालून 13 किमी दूर असलेल्या गोविंदघाटातून आणावी लागते. शहरात 13 किमी म्हणजे काहीच नाही पण इथे 13 किमी चढण करावी लागते. एकेक मीटरचा हिशोब करावा लागतो.

एका जागी ब्रम्हकमळे फुललीत ही बातमी सुरेशने दिल्यावर मी ब्रम्हकमळ पाहायला पळत गेले. त्यांची दयनीय अवस्था व जिथे फुलली होती ती जागा पाहता टूरिस्ट लोकांची सोय व्हावी म्हणून कोणीतरी दुसरीकडून उपटून त्यांना तिथे लावले हे उघड होते. मी हात न लावता शक्य तितके निरीक्षण केले. हात लावला तर हाताच्या उष्णतेने अजून सुकतील अशी भीती वाटली.

ब्रम्हकमळे केवळ दुरून पाहावीत, जवळ आली तर त्यांचे सौंदर्य नष्ट होते हे माझे मत झाले. ब्रम्हकमळे दुरून अतिशय विलोभनीय दिसतात. आणि दूर असलेलीच बरी. मानवी संपर्कात निसर्गाचा नाशच झालेला आहे. स्वतःच्या फुटपट्ट्या लावून माणूस निसर्ग मोजतो व हवा तसा वापरतो. मीही माझी सौंदर्यपट्टी लावून ब्रम्हकमळाचे मोजमाप केलेच ना. हजारो वर्षे हे फुल तिथल्या जनमानसात महत्वाचे स्थान मिळवून आहे ते सौंदर्यामुळे नाही तर त्याच्या उपयोगितेमुळे. आधीच लिहिल्याप्रमाणे ह्या झाडाची पाने, फुले, मूळे सगळेच तिथल्या स्थानिक व तिबेटी जडिबुटीत वापरतात. मॉडर्न मेडिसीनमध्ये मात्र यावर अजून संशोधन झालेले नाही. ब्रम्हकमळाचे उल्लेख आपल्या पुराणातही आहेत. महाभारतात द्रौपदीला भीमाने ब्रम्हकमळे आणून दिलेली असा उल्लेख आहे.

आमचे बरेच ग्रुपमेंबर्स आता पोचत होते पण शामली अजून पोचली नव्हती. त्यामुळे मला थोडी काळजी वाटायला लागली. थोड्या वेळाने नुपुरा आली. तिला विचारले तर म्हणाली की चालणे अशक्य झाल्यामुळे तिने अर्ध्या वाटेतुन घोडा केला, शामली मात्र चालत येतेय. थोड्या वेळाने ग्रुपलीडर महेशपण पोचला. तो म्हणाला काळजी करू नका, ती बेबी स्टेप टाकत टाकत येतेय. बरोबर पोचेल. बऱ्याच वेळाने खाली पिवळा ठिपका दिसायला लागला. तीच शामली हे मी लगेच ओळखले. आज पाऊस असल्याने आम्ही वीणावर्ल्डचे पिवळेधम्मक पोंचो अंगावर चढवले होते, तो रंग दुरून उठून दिसत होता.

शामली आल्यावर परत एकदा चहापान केले व तलावभेट घेतली. त्यानंतर गुरुद्वारात जाऊन पाया पडून खाली आलो तर ऐशूने आपल्या ग्रुपमधले सगळे आत जाऊन खिचडी खाताहेत हे शुभवर्तमान सांगितले. आम्हीही परातीच्या डोंगरातून पराती घेतल्या, खिचडीवाल्याकडे जाऊन खिचडी वाढून घेतली व आत जाऊन बसलो. आत बाकडे व त्यासमोर लाम्बलचक अरुंद टेबले होती जिथे निवांत बसून खाता येत होते. आज पाऊस असला तरी बऱ्यापैकी गर्दी होती. 2013ला झालेल्या प्रलयात इथल्या गुरुद्वाराचे व रस्त्याचे खूप नुकसान झाले होते. पण त्याच्या काहीही खुणा आता शिल्लक नव्हत्या. आत सुरेश रमेश खिचडी खात बसले होते. रमेशची तब्येत बऱ्यापैकी बिघडल्यामुळे तो एकाच जागी पडून होता. आमच्या ग्रुपचे बहुतेक लोक आता पोचले होते व खिचडी खात थट्टामस्करीला उधाण आले होते.

तुमचे फिरून झाले की परत निघू म्हणून घोडेवाल्याने सांगून ठेवले होते. परत निघायचे का म्हणून सुरेशला विचारल्यावर तो म्हणाला की गुरुद्वारात प्रशाद मिळणार आहे, तो खाऊन निघुया. हे शब्द कानी पडताच माझ्या मनीची वठलेली आशा फटाककन अंकुरित झाली आणि भराभरा पाने फुटून ती डोलायलाही लागली. आधी झालेली निराशा मी त्याला सांगितली. पण त्या पक्क्या गुज्जुने पूर्ण चौकशी केलेली व दीड वाजता प्रशाद मिळणार ही बातमी पक्की होती. प्रशाद घेतल्याशिवाय जायचे नाही ह्या त्याच्या निर्धाराला मी लगेच पाठिंबा जाहीर केला.

दीड वाजायला फक्त पाच दहा मिनिटेच शिल्लक असल्याने आम्ही दोघे गुरुद्वारात निघालो. मी मुलींना विचारले तर 'घरी शिरा खायला मिळत नाही का तुला' हा लूक मिळाला. मीही त्यांना 'गेलात उडत, गाढवांना गुळाची चव काय' हा लूक देऊन गुरुद्वारात गेले.

गुरुद्वारात आता खूप गर्दी होती. मी आधी गेले तेव्हा अर्धा हॉल रिकामा होता, आता त्या बाजूला बीबीयोंकी गर्दी होती. मीही त्यात सामील झाले. मध्येच सुरेशने येऊन बरोब्बर पावणे दोन वाजता प्रशाद मिळणार हे सांगितले. आजूबाजूच्या गर्दीत देवभक्त किती व प्रशादभक्त किती असावेत हा विचार करत मी बसून राहिले. दीड वाजता कीर्तन संपले. दुसऱ्या एका बाबाने सगळ्यांचे आभार मानले व भक्त लोकांनी आजूबाजूला स्वच्छता कशी राखावी वगैरे गोष्टींवर लेक्चर सुरू केले. लहान बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या भारतीयांना ही स्वच्छतेची गोष्ट वारंवार सांगावी लागते व इतक्या वेळा सांगूनही ती त्यांच्या कानाच्या आत जाऊन मेंदूपर्यंत अजिबात पोचत नाही याचा खेद वाटणे मी आता बंद केलेय. ते लेक्चर काही पंधरा मिनिटात संपणार नाही अशी भीती वाटत असताना बरोब्बर पावणेदोनच्या काट्याला ते संपले व गरम कडाह प्रशाद घेऊन सरदार अवतरले. हा प्रशाद नेहमी दोन्ही हातांची ओंजळ करून घ्यायचा हे मी या आधीच्या माझ्या एकमेव प्रशादग्रहण अनुभवातून शिकले होते. आणि तो प्रशाद ओंजळीभरूनच मिळतो. उगीच आपले हातावर चार फुटाणे पडले न पडले केल्यासारखे घाईघाईत वाटत नाहीत. ओंजळभरून प्रशाद घेऊन देत्या सरदाराला, गुरुद्वाराला दुवा व वरच्या देवाचे आभार मानून मी मन लावून थोडा थोडा प्रशाद जिभेवर रेंगाळवत चवीने खाल्ला, परत एकदा ग्रंथ साहिबसमोर जाऊन डोके टेकवले आणि आम्ही परतीची वाट धरली.

घोडा वर जाताना जितका त्रास होत होता त्याच्या दुप्पट त्रास उतरताना होत होता. शारीरिक त्रास होत होता हे वेगळे, घोडा त्याच्या तंद्रीत उंचावरून खाली उतरत असताना समोर सतत दरी पाहून होणारा मानसिक त्रास वेगळा. आजूबाजूला पाहायचे लक्षात येतच नव्हते. सगळे लक्ष घोड्यावर व रस्त्यावर लागले होते. वाटेत घोड्यांचा टाईम प्लिज आल्यावर थोडे हुश्श केले. असेच तुडुक तुडुक करत जात असताना सुरेश चालत असलेला दिसला. म्हणाला, कंटाळलो घोड्यावर बसून, खूप त्रास होतो. मी तरी अजून थोडे गेले कशीबशी. मांड्या, गुढगे, पोटऱ्या, घोटे सगळे व्यवस्थित चेचून मिळत होते. आणि हे ज्याच्या कृपेने ते घोडेमहाराज निर्विकार मनाने व चेहऱ्याने धबाधब उड्या मारत पायऱ्या उतरत होते. शेवटी असह्य होऊन मीही खाली उतरले. उतरण्यासाठी नीट जागा नव्हतीच, उंच दगडांचा आधार घेऊन उतरले. घोडेवाला ऐशूला घेऊन पुढे गेला व मी दुखणारे अंग घेऊन बेबी स्टेप्स टाकत हळूहळू उतरले. कालच्या स्पॉटच्या बऱ्याच पुढे ऐशु थांबलेली. ती मस्त टाईमपास करत बसलेली. गोविंदघाटातून वर चढून येताना तिची बऱ्यापैकी वाट लागलेली पण हळूहळू इथल्या हवेची सवय होऊन आता ती पूर्ण फिट झालेली. पण माझी हळूहळू वाट लागायला लागलेली. आज चेहरा थोडा सुजलेला. असो. दुखरे पाय घेऊन मी शामलीची वाट पाहत बसले. बऱ्याच वेळाने ती आल्यावर परत भलीमोठी लांबलचक पदयात्रा करून आम्ही हॉटेलात पोचलो.

गरम पाणी मागवून फ्रेश झाल्यावर मी आवराआवर करत बॅग भरायला घेतली. मुलींनी नेहमीच्या सवयीनुसार जिथे शक्य आहे तिथे सामान फेकले होते. ते सगळे शोधून काढून बॅगेत भरले. उद्या घालायचे कपडे बाहेर काढून ठेऊन बाकी सगळे पॅक करून मी निवांत झोपले. आज जेवायचीही इच्छा नव्हती. उद्या सकाळी परत गोविंदघाटापर्यंत 9 किमी तंगडतोड व तिथून पंचवीस किलोमीटरवर असलेल्या बद्रीनाथपर्यंत बसने प्रवास हे काम होते.

घंगरिया ते हेमकुंड साहिब रस्ता. मध्येच डावीकडे जाणारी रेघ घाटीला जाते.

IMG_20170819_160309515~01.jpg

हे एक वचन हॉटेलात लावले होते.

IMG_20170819_160320910~01.jpg

हे लिहिलेले शंभर टक्के खरे आहे. हिमालयात जाऊन आकाशाला टेकलेले पर्वत व झाडे पाहिली की आपण अतिशय क्षुद्र आहोत याची जाणीव होते. मोहमाया नष्ट होतात, त्यामुळे नवी पापे हातून घडत नाहीत.

IMG_20170819_160354036~01.jpgपुढचा भाग: https://www.maayboli.com/node/65219

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख ओघवते वर्णन आणी साधना तुला तुझ्या मुलीला व भाचीला दंडवत. फोटो पाहुन भारावले पण तुझ्या लेखणीने दूधात साखर टाकली.

सुरेख जमलाय हा भाग! Happy
त्या तिकडे जाऊन लंगरमध्ये कडाह प्रशाद खायची मजाच काही वेग्ळी अस्ते नै!

वाह वाह.. हा भाग ही अतिशय सुंदर झालाय.. फूलों की घाटी च्या निमित्ताने तुझ्यातील उत्तम लेखिकेचे दर्शन घडत आहे.
So proud of you.

मस्त झालाय हाही भाग.
घोडेवाल्याचा निरीच्छपणा वाचून हसू आले Happy
कानाखाली ब्रह्मकमळे Lol तुझं वर्णन वाचून वाटले की ही कुठली वेगळीच फुलं आहेत की काय ? लहानपणी आमच्या घरी होतं ब्रह्मकमळाचं झाड. त्याचं फूल खरंच कमळासारखं दिसतं . वर्षातून काही दिवस त्याला बहर यायचा. कुंडीतल्या झाडाला पण १५-२० कमळे एका वेळी आल्याची आठवण आहे. सुंदर दिसतात ही फुलं आणि सुवासिक पण , घरभर घमघमाट. ही अशी दिसतात ती.
bramhakamal.png
तुम्ही पाहिलेली ही नव्हेत का ?

मैत्रेयी, यांना आपण ब्रम्हकमळे म्हणतो पण ही निवडुंगाची फुले आहेत. यांचे आयुष्य एका रात्रीचे आहे. रात्री उशिरा फुलून सकाळी सुकून जातात. epiphyllum oxypetalum म्हणून सर्च कर.

हिमालयातील ब्रम्हकमले वेगळी आहेत. माझ्याकडे तिथल्या ब्रम्हकमळाचे फोटो नाहीत. ही बरेच दिवस झाडावर टिकतात. Saussurea obvallata म्हणून सर्च कर.

हे हिमालयन ब्रह्मकमळ. फोटो जरी नेटवरून घेतला असला तरी मी प्रत्यक्ष पाहिलीत ही फुले.

Screenshot_20180202-194817~01~01.png

रश्मी, वर्षू, धन्यवाद Happy

योकू, खरेच!! कडाह प्रशाद हा आयटेम खूपच सुरेख. तो लाँगरमध्येच खावा.

मस्तच जमलाय हा भाग साधना..
कानाखाली ब्रम्हकमळ.. देवीदेवतांना खुश करायच्या नावावर काहीही करतात लोक्स..
गुरुद्वारामधला प्रसादाचा शिरा चुकवणं म्हण्जे पाप आहे पाप.. आता मलापन खावासा वाटतोय..
मी लेखाच्या सेवटपर्यंत ब्रम्हकमळाच्या फोटोची वाट बघत होती.
आपण लोक्स ज्या निवडूंगाच्या फुलाला म्हणतो ते आणि हे यात कुणीतरी गल्लत करेल अस वाटलच होतं Wink .. मैत्रेयीचं कन्फ्युजन दुर झाल ते छानच झालं..
मस्त झाला म्हणायचा प्रवास एकंदर..

जिज्ञासा धन्यवाद Happy

यातले लेख पब्लिक आहेत.

Group content visibility:
Public - accessible to all site users असे आहे प्रत्येक लेखाखाली

साधना खुसखुषीत झाला आहे हा भाग. खुप छान प्रामाणीक लेखन.

तो खर्‍या ब्रह्मकमळाचा फोटो लेखनात टाक.

हायला, कसली धबाधब हसलेय ग हा लेख वाचून.....घोडेवाल्याचं सीटला ढकलून वर चढवणं, कानाखाली ब्रह्मकमळं, मुलींनी दिलेला लुक, शंकराचं तांडव Proud मस्त लेख अगदी.

उगाच छानछान वर्णन करून स्वर्गात गेलो हे सांगणाय्रांचे लेख वाचायला नको वाटतात॥ हा खरा प्रवास. आता या साधनाबाई हुएनशंग बनून सगळीकडे फिरून आल्या तर बरं होईल.
यथार्थ वर्णन आणि विनोदीही. मजा आली वाचताना.
शंका १) वर्षभर तिकडे कुणीच राहात नाही का?
२) टॅाइलेट - इतक्या थंडीत मानवी ** कुजणार नाही मग त्याचा परिणाम काय होत असेल? ते खाली नदीत वाहात असेल ना?
३) एकट्याने जाण्यात काय अडचणी येऊ शकतील? राहाणे वगैरे?

उगाच छानछान वर्णन करून स्वर्गात गेलो हे सांगणाय्रांचे लेख वाचायला नको वाटतात॥ हा खरा प्रवास. आता या साधनाबाई हुएनशंग बनून सगळीकडे फिरून आल्या तर बरं होईल.
यथार्थ वर्णन आणि विनोदीही. मजा आली वाचताना.
शंका १) वर्षभर तिकडे कुणीच राहात नाही का?
२) टॅाइलेट - इतक्या थंडीत मानवी ** कुजणार नाही मग त्याचा परिणाम काय होत असेल? ते खाली नदीत वाहात असेल ना?
३) एकट्याने जाण्यात काय अडचणी येऊ शकतील? राहाणे वगैरे?

आता या साधनाबाई हुएनशंग बनून सगळीकडे फिरून आल्या तर बरं होईल.>>>>
इच्छा तीच आहे हो, आशीर्वाद द्या फक्त.

1… गोविंदधाम म्हणजे घंगरिया व त्यावरचे सगळे जून ते ऑक्टोबर सोडता बाकी बंद असते. तिथून खाली 6 किमीपासून गावे आहेत, पन्नास, शंभर, दीडशे अशी लोकवस्ती असलेली.
2. या सगळ्या गावात ग्रामपंचायत आहे. सांडपाण्याची नीट व्यवस्था असावी. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड वगैरे भाग या बाबतीत प्रगत आहेत. पुढच्या भागात एका डोंगराच्या ट्रेकचे वर्णन आहे. तिथे गावात भरपूर सार्वजनिक संडास होते. माझ्या आंबोलीत अजून एकही सार्वजनिक संडास नाहीय. त्या मानाने हे भाग प्रगत म्हणायचे.

3. एकट्याने आरामात करता येते. मुंबईत बसून सगळे बुकिंग होते. तुमची तब्येत उत्तम असेल तर बिनधास्त जा. घाटीसारख्या जागी सत्तरीतल्या बायका पालखी करून एकट्या आलेल्या. यात देशी व परदेशी दोन्ही पर्यटक होते. युथ हॉस्टेलचे वयाचे लिमिट सत्तर आहे बहुतेक. तुम्हाला त्यांचे ट्रेकही करता येतील. अर्थात मनासारखे फिरणे न मिळायचे बंधन येते अशा ट्रेक्सवर.