भडभुंजा

Submitted by स्टोरीटेलर on 1 February, 2018 - 19:47

आई बाबांनी आम्हा तिन्ही मुलांना इंग्रजी मीडीयम शाळेत घातलं म्हणून एका नातलगाने, " जात भडभुंजाची आणि मिजास बादशाहची!" असं काहीसं उपरोधात्मक त्यांना ऐकवलं होतं. इंग्रजी शाळांच्या फिया जास्त, आई –वडीलांच्या तोटक्या पगारात तीनही मुलांची शिक्षणं कशी होणार? अशा अर्थाचे असावे ते कदाचित. मी शेंडेफळ; त्यामुळे माझ्या समोर हे घडलं नसलं तरी त्याची वाच्चता आम्हा तीनही मुलांसमोर अनेकदा घडे. मला ही म्हण त्या न कळत्या वयातही अजिबात आवडत नसे. कारण मला भडभुंजाचे दुकान, तिथे स्वच्छ पांढऱ्या पोशाखात वेगवेगळे चविष्ठ जिन्नस विकत बसलेले काका, कढईतला घमघमणारा खमंग वास, मला खूप आवडत. त्यांच्या दुकानात मांडून ठेवलेला खाऊचा खजिना पाहून मला नेहमीच, "आई खूप काटकसर करते, आमुक-तमुक-आमुक घेतच नाही!" असं वाटत असे. आम्ही घेतलेल्या पाकिटात नाही असे काहीतरी नक्की समोर धगीवर परतत, फुटत, असे. वेगवेगळ्या प्रकारची धान्य, धगीवर फोडून, त्यातून तयार झालेले चुरमुरे, कुरमुरे, मुरमुरे, लाह्या! अहा! डोळ्यासमोर आत्ताही ते दुकान आहे, लहानपणच्या खूप साऱ्या खाऊ विषयक आठवणी त्या दुकानातल्या, गोणपाटाच्या पोत्यांमधल्या जीन्नसात अडकल्या आहेत!

आई आणि तिच्या दोन्ही बहिणी पुण्यातल्या कन्याशाळेत जायच्या. शाळेच्या अलीकडच्या चौकात हे भडभुंजाचे दुकान आहे. तेव्हापासून, म्हणजे त्यांच्या लहानपणापासून चुरमुरे, खारे दाणे, लाह्या, कोरडी भेळ , फुटाणे हे इथूनच घेतले जायचे. आई आणि तिच्या भावंडांची एक Mad अवड आहे - त्या चौघांना ताजे चुरमुरे आणि कोवळा मुळा खायला खूप आवडतो. म्हणजे लहानपणी आम्हाला कधी बागेत घेऊन गेल्यावर "भेळ खायची आहे का?" असं विचारल्यावर, “हो” म्हणायच्या आधी नक्की कुठल्या प्रकारची भेळ? ह्याची खात्री करून घ्यायला लाग्याची. म्हणजे आम्हा मुलांच्या डोक्यात भेळेच्या गाडीवरची चिंच-गुळाची चटणी घातलेली ओली भेळ असे पणआई मावशीच्या मनात वेगळीच भेळ बनत असे. ताजे चुरमुरे, नावापुरतं फरसाण( नसलेलं पण चालायचं ) कच्चे किंवा खारे दाणे, आणि कोवळा मुळा - झालीच त्यांची भेळ. खरं सांगते, आईला पण हे अगदी प्रकर्षाने सांगितलं आहे; हे मुळा -चुरमुरे समीकरण मला अजिबात आवडत नसे. आत्ता विचार करते तेव्हा जाणवतं की आई फक्त ताज्या किंवा भडभुंजाकडून आणलेल्या चुरमुर्याशीच मुळा खायची. जसं हे पाकिटातले चुरमुरे, हलवाईकडचे फरसाण आणणं सुरु झालं तसं आईची, तिच्या style ची भेळ खाणं बंदच झालं. त्या खाऊ मध्ये तिच्या लहानपणीच्या आठवणी दडलेल्या असणार. वर-वरचे चणे-फुटाणे, आवळा-चिंचा-बोरं-कैऱ्या-पेरू, पाच -दहा आण्यात जे येयील ते ती चौघं भावंडं वाटून घेत, आणि त्या थोडक्यात केलेल्या मजेत खूप आनंद लुटत. त्यांचे लाड पुरवण्यासाठी कुणीच साग्रसंगीत थाट मांडत नसे.त्याला वाढदिवस-सणाचे अपवाद असतील कदाचित पण 'थोडक्यात मजा' असाच कानमंत्र असे. पण हे सगळं मला खूप नंतर उमगलं...आपण लहान असताना आपल्याला काही आईच्या बालपणाविषयी, तिच्या बालपणातल्या आवडी निवडीशी घेणं देणं नसतं! तेव्हा, ती फक्त आपल्या आवडीनिवडी सांभाळणारी एक बाई असते !
लग्नानंतरही आई रास्तापेठत राहिल्या गेल्यावर, ह्याच दुकानातून ह्या गोष्टी घेत असे. अपोलो थेटर जवळची ‘interval’ दुकानातल्या भेळेची चटक लागली असली तरी कोरडी भेळ आवडायचीच! आजोळच्या वाड्यात गेल्यावर, तिथून परत घरी जाताना ह्या दुकानातून निदान कोरड्या भेळेचा एक 'पुडा' घेणे हे आईला अपरिहार्य असे. ती कधी मोकळ्या हाताने आली तर मी नाराज होत असे. आम्ही मुलं बरोबर असलो कि भडभुंजाकडून कधी गरम कढईतले खारे दाणे, कधी मुठभर फुटाणे आमच्या हातावर पडत. ह्या खाऊचे खूपच अप्रुप वाटायचं, खूप खूप special वाटायचं! आईची आणि त्यांची तोंडओळख होतीच, तिच्याकडे पाहून ते हसले की, किंवा कधी "आज खूप दिवसांनी/ महिन्यांनी?" असं म्हणाले की मला एक वेगळाच आनंद होत असे. त्या काकांनी कधी मला माझं नाव विचारलं नाही, कधी मी त्यांना किंवा आईला त्यांचं नाव विचारलं नाही...पण माझी आणि त्यांची तोंड ओळख राहिली नाही..(लेख वाचून, त्याच दुकानात वर्षानुवर्ष जाणाऱ्या एकांनी त्या काकांचे नाव कळवंलं - रामदिन बुद्धीलाल परदेशी. नाव कळलं पण म्हणून ओळख अजून वाढली असं वाटलं नाही..)
आज त्यांच्यासमोर उभी राहिले, दुकानात खरेदीला गेले तर माझ्या मुलीच्या हातवार ते थोडीच चार दाणे ठेवणार आहेत? कदाचित तिची चिव चिव ऐकून ठेवतील सुद्धा, पण त्यांच्याकडे येणाऱ्या इतर गिऱ्हाइकांसारखीच मी पण एक असेन. एक पिढीजात नातं बांधता आलं असतं का? का आता ते राहूनच गेलं?
मी इथे अमेरिकेत मैलोन मैल लांब राहून त्या दुकानाबद्दल लिहिते आहे आणि आजही ते दुकान तिथेच आहे, त्याच्या आसपास असणारे पूर्वीचे वाडे पाडून, आता तिथे ईमारती झाल्या असल्या तरी दुकान तसच उभं आहे! तसच नातं आमचं ही आहेच..

आम्ही कोथरूड, डहाणूकर कॉलोनी मध्ये राहिला गेलो तरी आई 'गावात' जाणार असेल तर हमखास भेळ, साळीच्या, ज्वारीच्या, मक्याच्या लाह्या, खारे दाणे, फुटाणे घेऊन यायची. नंतर शिंग फुटल्यावर त्यांच्याकडे, "चना जोर आहे का ? तिखट दाणे आहेत का ? भडंगाचा मसाला आहे का?" असले आईला सुझाव देणं सुरु झालं. तोपर्यंत, बागेबाहेर किंवा ठराविक चौकात भेळेच्या गाड्या होत्या तशी जागोजागी भेळेची दुकानं जसे की गणेश भेळ, मनिषा भेळ, साईबा इत्यादी दुकानांचे आम्ही चाहते झालोच होतो. स्वीट काँर्न भेळ, मटकी भेळ आणि काय कायची चटक लागायला लागली होती.पण तरीही ' खडा माल' आम्ही ह्याच दुकानातून आणीत होतो.

माझ्या बाळंतपणाला अमेरिकेत येताना आई तिकडूनच साळीच्या आणि ज्वारीच्या लाह्या घेऊन आली होती.फरसाण मात्र काका हलवाईचे एक किलो.म्हटलं," भेळेचा एखादा पुडा आणायचा भड्बुंजा कडून!" तर म्हणाली, "तुलाच आवडतं न शेलकं सगळं, म्हणून हे आणलं. निदान ३-४ दा तरी भेळ करून खाशील! एका पुड्यात काय भागणार तुमचं?" तिचं म्हणणं पटलं, पण त्या खास पुड्याची जास्त आस वाटायला लागली. त्या एकाच पुड्यात तर माझ्या लहानपणी आम्ही पाच जण तृप्त होऊन जात असू...
आज मी कॅलिफोर्निया मध्ये राहत असल्यामुळे मला ज्वारीच्या, साळीच्या लाह्या, कोल्हापुरी मुरमुरे सुद्धा भारतीय दुकानात मिळतात. बर्कली मधल्या काही दुकानात organic puffed rice, Puffed millet असलं काय काय मिळतं. म्हणूनच प्रकर्षाने मला लहानपणचं हे सगळं इतकं ठळक आठवायला लागतं...
आज सगळीकडे diet conscious जगात ,चुरमुरे, कुरमुरे, मुरमुरे, लाह्या ह्या आरोग्याला चांगल्या मानल्या जातात. पण त्या आपण mass production मधून तयार होऊन, पाकिटात एकावेळेला लागेल त्या पेक्षा जास्त ऐवज भरून बंद केलेल्या, दुकानात अनेक दिवस, महिने राहून मग आपण ती पाकिटं घरी आणतो. ताजं, कढईत फोडलेलं धान्य आणि पाकिटातलं तेच फोडलेलं धान्य, ह्यांच्या चवीत फरक पडतो तो फक्त त्यांच्या production process मुळे नाही त्यांच्या ताजेपणामुळे सुद्धा. पूर्वी हलवाई,bakeries, वडापाव-भजीच्या गाड्या कमी होत्या, आजकाल प्रत्येक कोपर्यावर असतात. पण आता पूर्वी सारखी भड्बुंजाची दुकानं नाहीत. Maggi, ‘no one can eat just one’ Lays, आमच्या आयुष्यात यायच्या आधी, खाऊ हा घरी बनवलेले तेल-पोहे, दडपे पोहे, सांजा, उकड नाहीतर भडभुंजा करून खडा माल आणून त्यावर काहीतर पाककला मंत्रून तयार केलेला खाऊ, एवढाच असायचा. कधीतरी बादशाही हॉटेल मधला 'potato toast' किंवा हिंदुस्तान bakery मधला पॅटीस. आमच्या पुढे पर्याय कमी असतील पण त्याचा ठेवा पोटोबा आणि आरोग्य दोन्हीला पोषक होता. खाद्य संस्कृतीच्या कक्षा रुंदावल्या तशाच काही जुन्या, साध्या, सात्विक गोष्टींचा विसर पडला किंवा त्या क्वचित करण्याच्या, उपभोगण्याच्या यादीत जाऊन पडल्या! माझ्या nostalgia मुळे मला मिळालेला बालपणातला हा भडभुंजाच्या दुकानातला ठेवा खूप समृद्ध वाटतो. मी त्यांची ऋणी आहे, अर्धवट राहिलेला परिचयाचा सोहळा पण पूर्ण करायचाय, त्यामुळे पुढच्या खेपेत माझ्या मुलीला घेऊन त्यांची दुकानभेट निश्चित!

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित:
http://amrutahardikar.blogspot.com/2018/01/grain-popper-man.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घराजवळही कमी जास्त अंतरावर असे दोन भडभुंजे होते. काळाच्या ओघात तिथे आता दुसरीच चकाचक दुकानं झालीयत. त्यांच्या कडे भाजलेली दगडं मिळायची, तो प्रकार काय होता ते अजूनही कळलेलं नाही.
छान लेख... आणि माझ्याही बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद..

अस दुकान नाही पण लहाण्पण चा चणे, फुटाणे, चुरमुर्यांचा खाउची आठवण झाली. अशी कोरडी भेळ ( भत्ता की काहीतरी म्हणतात त्याला) आणि गोड गाठीची शेव, रेवड्या असा गावा वरुन कोणी आलं की खाउ असायचा. वर्तमान पत्रात पांढर्या धाग्याने बांधलेल पुडकं असायच Happy

छान लेख... आवडला.

मी थोडावेळ भूतकाळात गेलो. आमच्याकडे चुरमुरे+ (असले तर थोडेसे) फरसाण सोबत कान्दापण असायचा.

आमच्या लहानपणी होती अशी दुकाने आमच्या घराजवळ, त्याची आठवण झाली,
तसेच "भडभुंजा" हा शब्द शालेय पुस्तकात असलेल्या एका वर्णनामुळे लक्षात राहिला आहे.
की जैसे भडभुंजे लाह्या भाजतात, की विद्युल्लतापात व्हावा तैसा एक धडाका जाहला
पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे हे.
आप मेला जग बुडाले आबरू जाते वाचतो कोण असे एक वाक्य होते त्यात.

अतिशय सुंदर लेख. खूपच रिलेट केला. इंग्रजी माध्यमात शिकूनही भडभूंजा हा शब्द आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे शिवाय तुमचं त्याच्याशी नातं आहे हे पण फार विशेष आहे. कारण भडभुंजे आता जवळ जवळ नामशेष झाले आहेत. फारतर चुरमुर्‍यांची भट्टी म्हणण्या इतपत मजल जावी सध्याच्या काळात. आम्ही लहान असताना घरातल्याच कुणी तरी ही व्याख्या सांगितली होती, पण खूप सर्रास कधी वापरली नाही.
त्या काळात आमच्या घरापासून किंचित लांब एक भट्टी होती तिथे चुरमुरे, बॉबी (पिवळ्या) आणि शेंगदाणे इतकेच मिळे बहुधा. माझे वडिल भाजलेले शेंगदाणे तिथूनच आणत. कारण ते अत्यंत खरपूस. घरी 'तुम्हाला शेंगदाणे भाजता येत नाहीत' हे कारण पुढे असे. त्यामुळे त्यातले अर्धे अधिक खाऊन संपत हे वेगळ्याने सांगायला नको.
एका सुंदर आणि लुप्त होऊ घातलेल्या आठवणीशी पुन्हा एकदा ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

खूपच सुंदर लिहिलेय. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

भडभूंजा हा शब्द बऱ्याच उशिरा कळला. मी चनेवाल्याचे दुकान हा शब्दप्रयोग कायम ऐकलाय. माझ्या लहानपणी आमच्या सांताक्रुझ वाकोल्यात निदान 2 तरी दुकाने होती. सिग्नलजवळ एक मळकट दुकान होते, मालकही मळकट, दुकानाच्या दारातच ते मोठे चुल्हाण होते. कितीही मळकट असले तरी तो दैवी सुवास दुकानात खेचून न्यायचा. माझे बाबा कधीच दहाच्या आधी घरी आले नाहीत, पण येताना कायम चणेशेंगदान्याची पुडी सोबत आणायचेच. ते आले की आधी बॅग ताब्यात घेऊन आतली पुडी काढली जायची. आमची जेवणे वगैरे आटपलेली असायची पण पुडीची वाट बघत जागे राहायचो. हे दुकान बहुतेक गेले.

दुसरे जरा चकचकीत होते, आत शेल्फवर मोठमोठया कढया भरून काय काय वस्तू भाजून ठेवलेल्या असायच्या देवाला ठाऊक. चिंचेच्या बियासुद्धा मिळायच्या आणि भाजकी माती पण. Happy हे बहुतेक अजूनही आहे.

त्यांच्या कडे भाजलेली दगडं मिळायची, तो प्रकार काय होता ते अजूनही कळलेलं नाही. >> ती भाजलेली माती असते. गर्भारपणी खावीशी वाटते त्यांच्यासाठी. असे मला त्यांच्याकडूनच कळले.
नाशिकला असे भडभुंजे रविवार कारंजावर होते. आता आहेत की नाही माहित नाही. त्यांचे ते वाळूत झारी घालून वाळू वरखाली करत भाजणे खूप वेळ बघत बसायचो. त्याला एक वेगळाच नाद असायचा.

हे कन्याशाळेजवळचे भडभुंजाचे दुकान माझ्याही ओळखीचे आहे! तो चौक (तिठा/T intersection खरंतर) भडभुंजाचा चौक म्हणूनच ओळखला जायचा.

छान लिहिल आहे.
भडभुंजाची किंवा त्या दुकानाची आठवण अशी नाही पण बालपणी मी चिरमुरे, डाळे आणि खारे शेंगदाणे जवळपास दररोज खायचे. फरसाण नसायचे तेव्हा आमच्याकडे. दिवाळीत घरी शेव बनवली की ती + चिवडा + कांदा + टोमॅटो + काकडी अशी भेळ Lol
आतादेखील चिरमुरे फरसाण असतेच घरात नेहमी. े