पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

Submitted by निमिष_सोनार on 1 February, 2018 - 08:26

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"
लेखिका: इंद्रायणी सावकार
रिया पब्लिकेशन
अजब डीस्ट्रीब्युटर्स

सूचना:

अलेक्झांडर = सिकंदर
पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा
चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त

परीक्षण:

नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले.
लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली!

कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे. हे त्यांचे मी वाचलेले पहिले पुस्तक आणि त्यानंतर मी त्यांचा फॅन झालो आहे. माझ्या आवडीच्या ऐतिहासिक पौराणिक लेखकांमध्ये त्यांचे नाव आता वर राहील.

फिलीप, ऑलिम्पिया आणि अलेक्झांडर या पात्रांबद्दल माहिती आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्या हळूहळू आणि कथेच्या गरजेनुसार आणि प्रवाहानुसार उलगडत जातात.

ज्या अलेक्झांडरबद्दल अख्खी लायब्ररी भरेल एवढी पुस्तके लिहिली गेली आहेत आणि ज्याच्या जग जिंकण्याच्या इच्छेने बेफाम झालेल्या इच्छाशक्तीच्या रथाला आपल्या भारतभूमीत खीळ बसली त्या भारत भूमीचा त्यावेळचा इतिहास सुध्दा त्या थोडक्यात सांगतात. जसे चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य आणि पुरू (पोरस) याबद्दल अगदी छान माहिती मिळते. चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यबद्दल मी या आधी वाचलेल्या गोष्टींना आणि गृहितकांना त्यामुळे जबरदस्त हादरा बसतो. पर्वतक, कल्याणी वगैरे व्यक्तिरेखा यात नाहीत तसेच चाणक्यच्या वडीलांबद्दल तसेच शकदाल वगैरे बद्दल यात उल्लेख नाही. (भा. द. खेर यांच्या "चाणक्य" मध्ये त्या आहेत)

अरिस्टॉटल या अलेक्झांडरच्या गुरुने विविध देशांतील व्यापाऱ्यांच्या कथनावर आधारित जो जगाचा नकाशा बनवला असतो (जग चौकोनी आहे असे समजून) तो खूप अपूर्ण असतो आणि हे सत्य अलेक्झांडरला भारतात समजतं. ही खूपच नावीन्यपूर्ण आणि वेगळीच माहिती या निमित्ताने मला मिळाली.

साहित्यप्रेमी आणि असामान्य ताकदीचा योद्धा अशी दोन व्यक्तिमत्वे एकाच व्यक्तीत (सिकंदर) एकत्र नांदू शकतात हेही या निमित्ताने कळले.

पर्शियन राजा डरायस आणि अलेक्झांडर यांच्यातील खेळ हा टॉम अँड जेरी सारखा रंगतदार वाटला.

पुरू जेव्हा राजा होता त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य हा त्याच्या मुलाच्या (सैंधव) वयाचा होता हे समजले आणि त्यामुळे ऐतिहासिक चित्र आणि कालखंड आणि क्रम स्पष्ट होत गेला.

या पुस्तकानुसार पोरस आणि अलेक्झांडर यापैकी कुणीही युद्ध जिकले किंवा हरले नाही. अलेक्झांडरने पोरसला गाफील ठेऊन पावसात युध्दाला सुरुवात केली आणि एवढे मोठे युद्ध होऊन सैंधव मेल्यानंतर सुध्दा हाफेश्टियन आणि चंद्रगुप्त बोलणी करून त्यांची (ग्रीक आणि भारतीय) मैत्री होते आणि सेल्युकस निकेटोरच्या मुलीशी चंद्रगुप्तचा विवाह होतो. तसेच या पुस्तकात आपल्याला बिंदुसारच्या (सम्राट अशोकचे वडील) जन्मामागची आणि त्याच्या नावामागची अद्भुत कथा सुध्दा कळते.

सगळेच अद्भुत आणि अविश्वसनीय पण सत्य!

चाणक्यने बऱ्याच गोष्टी ग्रीक लोकांकडून शिकल्या हे या पुस्तकात प्रथमच कळले.

काही गोष्टी मात्र अनुत्तरित राहिल्या जसे -

मात्र पोरस राजा तक्षाशिलेच्या अंभि राजाला सहजासहजी माफ कसा काय करतो? अंभीचा पाहुणा असलेला अलेक्झांडर पौरव देशावर (आणि तेही अंभीला टाळून) आक्रमण करतो याबद्दल पुरूला संशय येऊन त्याने अंभिला जाब विचारायला हवे होते असे वाटते.
अलेक्झांडर मेल्यानंतर मगध मध्ये काय होते ते कळले पण पुरू राजाचे नंतर काय होते? हे या पुस्तकात समजत नाही.
नंतर पौरव आणि तक्षशिला राज्य पण मगध च्या अंकित होते का?

असो.

एकूणच हे पुस्तक नक्की वाचलेच पाहिजे असे आहे.

- निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे किती पानी पुस्तक आहे? सहसा कुठेही उपलब्ध होईल का? आपल्या परिक्षणाने या पुस्तकवाचनात रस निर्माण झाला हे खरे.

पुस्तक जास्त मोठे नाही. २०० च्या आसपास पाने आहेत. ही एक कादंबरी आहे. मी अजब प्रकाशनाच्या सेल मधून घेतले होते. amazon वर पण उपलब्ध आहे.