री-युनियन - भाग १

Submitted by विद्या भुतकर on 1 February, 2018 - 00:28

अजय दुपारी धावतच गाडीकडे गेला. ऑफिसमधून निघायला बराच वेळ झाला होता. पुण्याला पोहोचायला अजून तीनेक तास तरी लागणार होते. अजून घरी जाऊन एका दिवसाची बॅग तरी भरायची होती. त्याने गालाला हात लावून पाहिलं. "काय त्रास आहे?", काल केलेली दाढी परत वाढली होती. आता तेही करावं लागेल म्हणजे.

घाईघाईत घरी पोचला तर घर तसंच पडलेलं. मुलं आज थेट काकाच्या घरी जाणार होती. ते सगळं ठरेपर्यंत गोंधळ चालू होता. दुपारी निघता येईल की नाही, ट्रॅफिक कसं असेल, सुट्टी मिळेल की नाही, मुलं दादाकडे राहतील की नाही असे अनेक प्रश्न समोर होते. एका पाठोपाठ एक अडथळ्यांची शर्यत पार करत तो घरी पोचला होता. त्याने कपाटातून खालच्या ढिगातून दोन इस्त्रीचे शर्ट बाहेर काढले, धुवायला लावलेले दोन टी-शर्ट, एक जीन्स टाकली, बाकी सामान झटक्यात बॅगमध्ये टाकून तो बाथरुममध्ये पळाला. पटकन दाढी केली, तोंड धुतलं आणि घरातून बाहेर निघाला. जाता जाता पोटावर घट्ट बसणाऱ्या त्याच्या शर्टची जाणीव झालीच. 'तरी डोक्यावर केस आहेत' याचंच समाधान मानून तो निघाला. गाडी पुण्याच्या मार्गाला लागल्यावर त्याला हुश्श झालं होतं.

गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचे मित्र मागे लागलेले 'रियुनियला येच' ,म्हणून. बरं वीस वर्षांनी सर्व भेटणार होते. गेले एक वर्षभर लोक प्लॅन करत होते. अनेकांना परदेशातून यायचं होतं. त्यामुळे ते आता नाही भेटले तर परत कधी? 'अजून वीस वर्षानंतरही अजून एक असंच प्लॅन करु' , जोशात अजय बोलला होता. आणि आजपर्यंत स्वतःच जाणार की नाही हे नक्की होत नव्हतं. जमतंय असं वाटल्यावर त्याने गाडीतूनच अभय, दिपकला फोन केला होता. तो येतोय म्हणल्यावर दोघेही खूष झाले होते एकदम. अभ्या फ्लाईटमध्ये चढत होता तर दिपक, 'आपल्याच गावात आहे गेट-टू' म्हणून खूष होता. अजयच्या मनात फक्त एकच प्रश्न सलत होता,"गार्गी येणार आहे की नाही?". आपण जातोच आहे की मग तिला काय प्रॉब्लेम असेल? आली तर? नाही आली तर? काय बोलायचं हे त्याचं नक्की होत नव्हतं. संध्याकाळी रिसॉर्टवर पोहोचून त्यानं रुम घेऊन टाकली आणि जिथे सर्व भेटणार होते त्या लॉनवर आला.

लॉनवर काही मंडळी जमली होती. आता एकाच वर्गाचं रियुनियन, त्यात नवरा, बायका-मुलं नको. का? तर पूर्वी होस्टेलवर रूममेट म्हणून राहायचो तसं राहायचं, दोन दिवस मजेत घालवायचे आणि आपापल्या मार्गाला लागायचं. यांत दोन हेतू होते, एकतर नवरा किंवा बायको आली की मोकळेपणाने बोलता आलं नसतं. आणि ओळख नसलेल्या लोकांशी बोलण्यात यांच्या नवरा किंवा बायकोला तरी काय इंटरेस्ट असणार? मुलं आली की मग तेच घर, संसार आणि त्यातच अडकून जातात सर्व. मस्त बॅचलर लाईफ जगता आलं पाहिजे असं काहींना वाटत होतं. पन्नास जण एकत्र येणार म्हणजे मारामाऱ्या होणार होत्याच. कसेतरी सर्वाना समजावून एकेकटे यायचं हे नक्की झालं होतं. जसा एक कॉमन व्हाट्स ऍप्प ग्रुप झाला होता, तसाच मुलींचा एक झाला, एक मुलांचाही. त्यातूनही, जवळच्या मित्र-मैत्रिणींचे असतील ते वेगळेच. प्रत्येक ग्रुपवर वेगवेगळ्या गप्पा, इथून तिथे काय बोलायचं, काय टाळायचं हे सर्व जपूनच करावं लागत होतं. या सर्वांत गार्गी कुठेच दिसत नव्हती. मधेच तिचा विषय कुणी काढला तरी त्याला कुणी काही विचारलं नव्हतं.

लॉनवर दिपक भेटल्यावर दोघांनी कडकडून मिठी मारली होती. मग दिपकने त्याला एक गुद्दा मारला पाठीत. "व्हीपी झालास म्हणून इतका माज का रे? दोन तासांवर राहतोस, तरी चार वर्षात भेटला नाहीस. लाज आहे का नाही?", दिपकने त्याला झापलं.

"कामं खूप आहेत रे डोक्यावर. कितीही म्हटलं तरी जमतंच नाहीये यायला इकडं. ", अजय बोलला.

"तर तर मला सांगू नकोस पुण्याला येत नाहीस म्हणून.", यावर मात्र, "नाही येत" असं थेट उत्तर अजयनं दिलं आणि विषय मिटवला.

प्रज्ञा, अर्चना, स्वप्नाली, एकेक करत मुली, मुलं सगळे येत होते. नुसता दंगा चालू होता. एखादा कुणी ओळखूही येऊ नये इतका बदलेलला तर अगदीच एखादीला 'तू अजिबातच बदलली नाहीस हां' असा कॉम्प्लिमेंट मिळत होता. ड्रिंक्स ठेवले गेले. ड्रिंक्स ठेवायचे की नाही यावरुनही वाद-विवाद झाले होते. मुलींच्या आणि मुलांच्या ग्रुपवर त्यावरुन वेगवेगळे डिस्कशनही झालं होतं. 'कोण मुलगी अजूनही तितकीच बोअरिंग आहे' असं मुलांचं आणि 'कोण किती पितो किंवा पीत असेल' यावरुन मुलींचं. कुणा मुलीला किंवा मुलाला फेसबुकवर एखाद्या पार्टीत दारुचा पेला हातात धरुन टॅग केल्यावरुनही चर्चा झाली होती. कुणाचं पोट २०१२ च्या फोटोमध्ये कमी होतं आणि बियरमुळे कसं वाढलंय हेही. एखाद्या मुलीचे डोळे पिऊन लाल झालेत का तिचे सर्वच फोटोमध्ये 'रेड आय' असते यावरुनही. एकूण काय, लोकांनी भरपूर चर्चा केल्या होत्या.

आता सर्वजण कुठला ना कुठला रंगीत प्याला हातात घेऊन मिरवत होते. मुलींनी पार्लरला जाणे, नवीन साडी किंवा ड्रेस विकत घेणे हे सर्व केलं होतं. पुढचे दोन दिवस काय कपडे घालायचे, एखादा ड्रेस कोड ठेवायचा का?, एकाच रंगाचे कपडे घालायचे का? अशाही चर्चा गर्ल्स-ओन्ली ग्रुपवर झालेल्या. जरा जास्त जवळच्या मैत्रिणींना आपल्या खरेदीला गेल्यावर फोटो पाठवून 'घेऊ का नको?' असे व्हाट्सअँप शॉपिंगही झाले होते. मुलं निदान नीट इस्त्रीचे कपडे घालून, दाढी करुन तरी आले होते. एखादाच विरेन सारखा होता, फिटनेस फ्रीक, जो अजूनही फिट दिसत होता. त्याच्यावर मरणाऱ्या दोन-चार पोरींनी एक-दोनदा त्याच्याशी बोलून झालेलं होतं. 'त्याची बायको किती हॉट आहे' यावर बोलणंही झालेलं त्यांचं. एखादाच न आवरता आला असेल. 'त्याचं ब्रेक-अप झालं की डिव्होर्स?' असे प्रश्न चोरुन विचारण्यात येत होते. नक्की माहित नसल्यानं समोर आल्यावर त्याच्याशी काय बोलावं कुणाला कळत नव्हतं. खरंच हा वॉर्मअप सेशन होता.

अजयने ती नाही आली तरी आपल्याला काय फरक पडतोय म्हणून विचार करायचा नाही असं ठरवलं होतं. तरीही लॉनच्या गेटकडे नकळत त्याची नजर जात होती. स्टार्टर सुरु झाल्यावर मधेच कधीतरी तो थोडा शिथिल झाला. जास्त काही न खाता घेतलेल्या ड्रिंकचा प्रभाव असावा. एका ठिकाणी टेबलाजवळ बसून घेतलं त्यानं. दिपक स्टार्टरच्या दोन प्लेट घेऊन आला. त्याच्याशी बोलताना थोडं मन रमल्यासारखं वाटलं त्याला. मधेच फोन काढून ऑफिसच्या काही मेल आल्यात का तेही तपासून घेतलं त्यानं. अचानक हसण्याचा आवाज आला आणि त्याला कळलं ती आलीय, गार्गी आली होती!

गार्गी आली या विचाराने त्याला चढलेली उतरली. तो एकदम जागा झाला. मागच्या टेबलावर प्रज्ञाशी बोलत हसत होती ती. मघाशी प्रज्ञाला 'हाय' केलं होतं त्याने पण पुढे होऊन तिच्याशी बोलायची हिम्मत झाली नव्हती. तिची रुममेट आणि जवळची मैत्रीण होती. म्हणजे माहितच असणार गार्गी येणार की नाही ते. शिवाय पुढे जाऊन तो बोलला आणि तिने नको ते प्रश्न विचारले तर? नकोच ते म्हणत तो नुसतं 'हाय' करुन गेला होता. तिने जीन्स आणि टॉप घातला होता. बारीकही झाल्यासारखी वाटली त्याला ती. तो तिच्याकडे थेट बघायचं टाळत होता, कारण त्याला माहित होतं या वर्गातल्या सगळ्या नजरा त्याच्यावर असणार, ती आल्यापासूनच. तरीही तिचं हसू ऐकल्यावर एकदम बोचल्यासारखं झालं काहीतरी.
प्रज्ञा आणि नितासोबत बोलत तिने जेवण केलं. बरेचजण जे परदेशातून आले होते, कुणी थे एअरपोर्टवरुन इकडे आले होते ते सर्वजण पांगले. कुणाला चढली होती, तर कुणी जुन्या घट्ट मैत्रीच्या घोळक्यात बसून जोरजोरात हसत होता. मुलींनी थोडा वेळ वेगळा घोळका केला होता, पण त्यावर टोमणा मारला आणि मग सगळ्या विखुरल्या. कुणी प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणाऱ्या मित्राशी बोलू लागली तर कुणी एकेकाळच्या आपल्या जवळच्या मित्राशी. रात्री ११ वाजले. लॉन रिकामं करणं गरजेचं होतं. उरलेले लोकही आपापल्या रुमवर निघून गेले. गार्गी प्रज्ञासोबत आपल्या हातात छोटीशी बॅग घेऊन तिच्या रुमवर गेली. दोघींच्या गप्पा आताशी सुरु झाल्यात असं वाटत होतं.

क्रमशः
विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !! मस्त सुरुवात विद्याताई...
आमच्या जुन्या खपल्या निघणार बहुदा हे असे काही वाचताना Wink

मस्तच!!

आमच्या १०वी च्या बॅचचं गेट टुगेदर ठरतयं या ११ ला. आणि तुमची ही कथा Happy

छान. वेगवेगळे ग्रूप वगैरे सहमत पण शाळा सोडून ईतकी वर्ष झाल्यानंतर कोणी कोणाच्या आयुष्यात ईतका रस घेईल असे वाटत नाही. मुळात असे विभक्त झालेले जोडपे एकमेकांना शक्य तितके टाळतात. मुलं आहेत असा उल्लेख आहे म्हणजे लग्न झालेले असणार, ब्रेकपचा अर्थ कळला नाही. पुभाप्र.

छान कथा आहे आमची तर सध्या काँलेज लाईफ सुरु आहे मित्रांसोबत धमाल येते
आणि संडे ला घरी राहील्यावर तुमच्यासारख्यांच लेखन मज्जाच