अर्थान्वयन- कबीर भजन - रमैय्या की दुलहिन

Submitted by चैतन्य दीक्षित on 4 January, 2018 - 22:58

पु.ल.देशपांडेंच्या असा मी असा मी मधल्या, 'गुरुदेव काय म्हणाले'मध्ये एक वाक्य आहे. 'कित्येक वर्षे तप केल्यावर मेनका, उर्वशी वगैरे अप्सरांची तपोभंग करण्याच्या कामावर अपॉइंटमेंट होत असे'.
हे तपोभंग काय प्रकरण आहे? याचा माझ्यापुरता झालेला अर्थबोध हा, की ध्यान-धारणादि योगमार्गाने जाणाऱ्या साधकाची एका विशिष्ट अवस्थेपर्यंत प्रगती झालेली असताना, त्या मानसिक उच्च अवस्थेत तहान, भूक, निद्रा, भय इत्यादी शारीर पातळीवरील भावना/इच्छा कमी कमी होत जातात. अशा वेळी काही पूर्वसंस्कारांमुळे ती मानसिक अवस्था बिघडून अगदी सामान्य पातळीवरील शारीरसुखाचा विचार-> इच्छा -> तीव्र इच्छा होऊन साधकाची आधीची उच्च अवस्था पूर्ण लोप पावते.हाच तपोभंग. त्या अवस्थेतून पुन्हा पूर्वीच्या उच्च अवस्थेपर्यंत जायला पुनश्च हरि: ओम्! समर्थही 'घडि घडि बिघडे हा निश्चयो अंतरीचा' म्हणतात, तो बिघडणारा निश्चय तपोभंगाला कारण होती. हे जरी खरं असलं, तरी तपोभंग करण्याची जबाबदारी स्त्रियांवरच का? (किंवा एखाद्याचा तपोभंग झाल्याचं खापर स्त्रीवरच का फोडलं जात असावं?) याचा विचार करता, अध्यात्म हा आधीपासूनच तसा पुरुषप्रधान प्रांत आहे ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागते. दुसरी गोष्ट अशी की 'स्त्रीणामष्टगुण: काम:' म्हणजे एकूणच स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक कामना असतात, हौस असते, गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. ('काम:' असा पुल्लिंगी उल्लेख असला तरी तो केवळ शरीरसुखाच्या बाबतीत असावा असे मला वाटत नाही.) पुरुषांपेक्षा संसार राखण्याची, नीटनेटका ठेवण्याची असोशी स्त्रीकडे जास्त असते. आपल्या समाजरचनेमुळे स्त्रीलाच घराची जबाबदारी सांभाळणे भाग असल्याने ती असोशी स्वाभाविकपणे स्त्रीकडे अधिक असते. त्यामुळे, पुरुषानेही तसेच, तितक्याच असोशीने संसारात असावे, लक्ष घालावे ही तिची अपेक्षा साहजिकच असते. त्यामुळे बायका बहुतेक वेळा नवऱ्याला संसारातल्या एखाद्या किंवा अनेक गोष्टीत लक्ष घालायला भाग पाडतात. या काहीशा मूळ स्वभाव होऊन गेलेल्या वृत्तीमुळे,
(पुरुषाची स्त्रीसुखाकडे असलेली आसक्ती, तिचे सूक्ष्म स्तरावर होणारे संस्कार हे तपोभंगाचं मूळ कारण असूनही) तपोभंगाला स्त्री जबाबदार धरली जात असावी.
म्हणजेच, जे जसं नाही, तसंच ते आहे असं दाखवलं
जातं.म्हणूनच 'माया' (मा- नकारार्थी अव्यय, या- जी. जी नाही, पण तरीही आहे असे वाटते ती माया) हा स्त्रीलिंगी शब्द असावा काय?

या भजनात कबीर मायेला 'दुलहिन' म्हणतायत. शिव पुरुष आणि त्याची शक्ती प्रकृती. पुरुष या स्थिरचरात रमला आहे, म्हणून तो 'रमैय्या'! त्याची दुलहिन, माया ! बायकांना असलेली बाजार खरेदीची हौस अधोरेखित करताना कबीर म्हणतायत 'रमैय्या की दुलहिन लूट बाजार जी' तिने अक्षरशः बाजार लुटला, काही काही ठेवलं नाही!
पण ही दुलहिन साधीसुधी नाहीये, त्यामुळे तिने जे बाजार लुटलेत तेही साधेसुधे नाहीतच. पुढच्या प्रत्येक कडव्यात मायेचा प्रभाव दाखवीत लौकिकार्थाने स्त्रीमुळे तपोभंग झालेल्या काही प्रसिद्ध साधकांची उदाहरणे कबीर देतात. जिचं स्वरूपच मुळात 'जे जसं आहे तसं ते नाही हे दाखवणारं, किंवा, जे जसं नाही ते तसं आहे असं दाखवणारं. त्यामुळे, तिच्या मोहात गुंतणं हेच तिचं बाजार लुटणं आहे.

कोण कोण गुंतलं तिच्या मोहात?
सुरपूर लूटा, नागपूर लूटा
तीन लोक मचे हाहाकार ।
या मायेने देवादिकांनाही सोडले नाही. देवांच्या मोहाच्या अनेक कथा आपल्याला ऐका-वाचायला मिळतात. त्यामुळे सुरपूर हा स्वर्गलोकाचं, पक्षी इंद्रादी देवांच्या मोहकथांतून त्यांच्या दिसून येणाऱ्या अधःपतनाचा प्रातिनिधिक शब्द आहे. पुढचा नागपूर हा पाताळलोकाशी संबंधित. आपली पुराणे धुंडाळून पाहिली तर नवनागांशी संबंधितही त्यांच्या व्यामोहाची एखादी कथा निश्चित सापडेल. मनुष्यलोकातील मायेच्या प्रभावाबद्दल न बोललेलंच बरं असं वाटून कदाचित कबीरांनी मृत्युलोकाचा प्रत्यक्ष उल्लेख टाळून, मायेमुळे तीनही लोकांत हाहाकार माजलाय असं म्हटलंय.

ब्रह्मा लूटे, महादेव लूटे
नारद मुनि के पड़ी पिछार ।।
ब्रह्मा चतुर्मुख कसा झाला याची कथा अशी सांगतात की त्याच्याच मुखातून उत्पन्न झालेल्या (त्या अर्थी त्याचीच कन्या असलेल्या) सरस्वतीवर तो आकृष्ट झाला. ती ज्या दिशेला जाईल त्या दिशेला त्याला एक एक तोंड फुटले. त्याच्या याच मोहाचा तिरस्कार करीत सरस्वतीने "तुझी कुठेच मूर्तिपूजा होणार नाही" असा शाप दिला असे म्हणतात.
देवांचे देव महादेव विष्णूच्या मोहिनी रूपावर एवढे भाळले, की गतभान असे मोहिनीच्या मागे धावू लागले. (खंडोबाचरित्रात ही कथा येतेच, की पुढच्या अवतारात उमेचं हेच 'मोहिनीरूप' असावं अशी शिवाला इच्छा झाली).
स्वतःच्या इच्छांवर विजय मिळवला या अहंकारात असलेल्या नारदांनाही एका राजकन्येशी विवाह करावा असे वाटले आणि सर्व स्त्रिया ज्याला वरतात त्या हरीचे रूप मला हवे अशी इच्छा त्यांनी श्रीविष्णूंपुढे व्यक्त केली. त्यांच्या गर्वहरणासाठी हरी म्हणजे मर्कटाचे रूप त्यांना मिळाले. नारदमुनींसारखा मनोनिग्रही देवर्षीदेखील या मायेच्या तावडीतून सुटला नाही. माया अक्षरशः त्याच्या मागे लागली.

शृंगी की भृंगी करि डारी
पारासर के उदर विदार ।।
ऋष्यशृंगाला कबीर शृंगी म्हणतात. लहानपणापासून स्त्रीला कधीच न पाहिलेला ऋष्यशृंग जेव्हा अंग देशाच्या सुंदर युवती त्याला मोहवून अंगदेशी न्यायला आल्या, तेव्हा अक्षरशः भुंग्यासारखा त्यांच्या मागे मागे गेला. पराशर ऋषींना मत्स्यगंधा नावेतून त्यांच्या इष्ट स्थळी पोहोचवीत असताना त्यांना तिच्या रूपाचा मोह झाला, तिला नदीकिनारा दिसू नये म्हणून त्यांनी योगशक्तीने धुके निर्माण केले, एक बेट तयार केले आणि त्या दोघांच्या एकत्र येण्याने कृष्ण-द्वैपायनाचा जन्म झाला. तिला येणारा माशांचा वासही पराशर ऋषींनी घालवला आणि तिला योजनगंधा केले. इथे पाराशर के उदर विदार असं लिहिलेलं असलं, तरी 'हृदय विदार' असं अधिक सयुक्तिक वाटेल.

कनफूका चिरकाशी लूटे
लूटे जोगेसर करत बिचार ।।
खरं सांगायचं तर अर्थाच्या बाबतीत मी या चरणाशी अडलो आहे.
कनफूका म्हणजे कानात मंत्र फुंकणारे.
एका पुस्तकात या चरणाचा अर्थ 'पंड्यांना मंत्रोपदेश करण्याचा अधिकार देऊन मायेने काशी लुटली' असा त्रोटक दिलाय. परंतु कबिरांच्या इतर रचना, नाथपंथाशी त्यांचा असलेला जवळचा संबंध लक्षात घेता, इथे कनफुंका चा अर्थ कानफाट्या घेणं योग्य असं मला वाटतं. नाथपंथात कान अक्षरशः फाडून मंत्रदीक्षा दिली जाते. म्हणूनच त्यांना कानफाटे जोगी म्हणतात. कान फाडण्याचा संबंध कामवासना-शमनाशी आहे. ठराविक ठिकाणी कान फाडल्याने त्या व्यक्तीची कामवासना मर्यादित राहते असे म्हणतात.
पुढे 'चिरकाशी लूटी' हा उल्लेख आहे.
मला इथे चिर ऐवजी चित असा काही पाठभेद असावा असं वाटतं. कानफाट्या जोग्याचं चित्त मायेनं लुटलं (नाथपंथी साधकांच्या काही कथांमध्ये, हठयोग साधण्यासाठी, स्त्रीच्या योनीत सोडलेले वीर्य पुन्हा लिंगानेच वर खेचण्याच्या क्रियेचा उल्लेख आहे. आशा साधकाला उर्ध्वरेता म्हटले जाते. कदाचित तो संदर्भ इथे माया=स्त्री या आधीच्या चरणांच्या समीकरणावरून चपखल ठरावा).
लूटे जोगेसर करत बिचार-
ध्यान करताना लागणारी समाधी किंवा योगनिद्रा ही स्त्रीलिंगीच Happy योगेश्वर (कृष्ण किंवा शिव) ध्यानमग्न असतात म्हणजे योगनिद्रारूपी मायेचा प्रभाव त्यांच्यावर असतो असे काही पौराणिक संदर्भ सांगतात.
इथे योगेसर करत बिचार याचा मला उमगलेला अर्थ योगेश्वर विचार करतो असा नसून, योगेश्वर ध्यान करतो असा आहे. म्हणजे तो ध्यान करतो आहे पण वस्तुतः योगनिद्रारुपी माया त्याला लुटते आहे!

हम तो बचिगये साहेब दया से
शब्दडोर गई उतर पार ।।
कहत कबीरा सुनो भाई साधो
इस ठगनी से रहो होशियार ।।
मी मात्र गुरुकृपेने वाचलो. शब्द म्हणजे ज्ञानरूपी दोरीला धरून मी मायेच्या प्रभावापलीकडे पोहोचलो.
साहेब असा गुरूंचा केलेला उल्लेख थेट शीख पंथाशी जोडणारा वाटतो. पण इथे कबिरांना असं सांगायचं आहे की गुरुकृपा जर झाली तरच या मायेच्या प्रभावातून सुटका शक्य आहे, अन्यथा नाही.
मग ती गुरुकृपा कधी/कशी होईल?
तर 'इस ठगनी से रहो होशियार'! गुरूंची कृपा होण्यालाही शिष्याच्या अंगी काही पात्रता हवीच. समर्थही दासबोधात 'ऐक शिष्या सावधान' म्हणतात. इथे सावधान असणं ही त्या शिष्याची पात्रताच म्हणावी लागेल. असं मायेबाबतचं सावधपण शिष्याकडे आधीपासूनच थोडं असेल, तर गुरुकृपाही लवकर होईल. मायेला ठगनी म्हटलंय, तेही वरच्या चरणांत आलेल्या उदाहरणांच्या अनुषंगानेच. अगदी कशानेही साधक फसू शकतो. म्हणून कबीर होशियार राहायला सांगतात.

कुमारांवरच्या 'हंस अकेला' या डॉक्युमेंटरीमध्ये ते हे भजन वसुंधराताई आणि कलापिनीताईंना शिकवताना दिसतात. बरेच दिवस हे कुमारांच्या आवाजातलं भजन शोधत होतो, ते एका मित्राने पाठवलं. नंतर youtube वर त्याची लिंकही मिळाली. Youtubeवरच्या प्रतीत थोडी खरखर जाणवते, पण श्रवणीय आहेच ते. हे बाकीचे शब्दार्थाचे गूढ बंधन झुगारून देऊन केवळ श्रवणानुभव घ्यावा असंच कुमारांचं गायन आहे (नेहमीच असतं).

हंस अकेला- https://youtu.be/Fv4ynjy8m04
रमैय्या की दुलहिन- https://youtu.be/TVxQVmpxikQ

~चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Use group defaults

भजन सुरेख उलगडलंयस. फारच खोल अर्थ आहे. किती संदर्भ लागलेत तुला_/\_

मारे लूपमध्ये वगैरे टाकून ऐकत होते, पण ते आत कुठे शिरत नव्हतं, याची हे अर्थान्वयन वाचल्यावर अचानक जाणीव झाली Sad अर्थात त्यासाठी मुळात एक शोधक वृत्ती, खोदकाम करायची असोशीही लागते. तू आयतं ताट वाढून समोर ठेवलंस, त्याबद्दल द्यावेत तितके धन्यवाद कमीच.

रश्मी..., एस, सई
खूप खूप आभार!
@सई,
शब्दार्थाचे गूढ बंधन झुगारून देऊन निव्वळ श्रवणानुभव घ्यायचा, तोही पुरेसाच Happy

<<शब्दार्थाचे गूढ बंधन झुगारून देऊन निव्वळ श्रवणानुभव घ्यायचा, तोही पुरेसाच>> नाही नाही. सुरांचा आनंद म्हणून आहेच. पण हे लेपन कोणत्या मूर्तीला आहे ते कळलं तर 'सुख झाले हो साजणी' होतय.
सई म्हणतेय तसं खोदकाम, संशोधन करण्याची वृत्ती हवी. तू खरच खूप सुरेख उलगडला आहेस हा अभंग.

अतिशय पांडित्य पूर्ण व प्रकांड संशोधनाद्वारे अर्थ उकलला तुम्ही.
अप्रतिम !!
हेच पंडिता वीणा सहस्त्रबुध्देजींनी गायलेले आहे. ते ऐका.
https://www.youtube.com/watch?v=3-a8ZipG9l4
अप्रतिम !!!

स्वाती, दाद, रेव्यु, धन्यवाद.
@रेव्यु, प्रकांड संशोधन नाही हो. शब्दार्थांचा मागोवा घेतलाय फक्त

कनफूका चिरकाशी लूटे
लूटे जोगेसर.....

चिरकाशी.... चिदाकाशी शब्दाचा अपभ्रंश.
कानात मंत्र फूंकून चिदाकाशात मनाचा लय करणारे काही संप्रदाय. अशा योगात थोडेफार प्रवीण असणार्‍यांना जिने फसवले आहे...
जोपर्यंत त्या मूलतत्वाचि ओळख होत नाही, म्हणजेच साहेब भेटत नाही तोपर्यंत सर्व खटाटोप हा मायाजनित किवा भूल पाडणाराच आहे...
........हे माझे एक मत.....

बाकी तुझा लेख केवळ अप्रतिम, अभ्यासपूर्ण... Happy

____/\___

चिरकाशी.... चिदाकाशी शब्दाचा अपभ्रंश.
कानात मंत्र फूंकून चिदाकाशात मनाचा लय करणारे काही संप्रदाय. अशा योगात थोडेफार प्रवीण असणार्‍यांना जिने फसवले आहे...>>>

@ पुरंदरे काका, मलाही चिदाकाशचा अपभ्रंश वाटला होता आधी, पण हे पुढचे (चिदाकाशात मनाचा लय) समजले नव्हते.
मनापासून धन्यवाद Happy
@ साधना, महेश- मनापासून धन्यवाद Happy

पुरुषांपेक्षा संसार राखण्याची, नीटनेटका ठेवण्याची असोशी स्त्रीकडे जास्त असते. >>>
हे व तपोभंगावरचे तुझे विवेचन केवळ सुंदर, अतिशय पटणारे... Happy

खूप सुरेख अर्थ उलगडून सांगीतलाय. आणखी कबीर दोह्यांचा अर्थ उलगडणारी लेख मालिका ही लिहावी आपण ही विनंती. धन्यवाद.

खूप सुरेख अर्थ उलगडून सांगीतलाय. आणखी कबीर दोह्यांचा अर्थ उलगडणारी लेख मालिका ही लिहावी आपण ही विनंती. धन्यवाद. +१

कबिरांची स्त्रीविषयक मते त्यांचा स्त्रीविषयी कलुषित दृष्टीकोण सुचवतात (misogynistic)असा एक मतप्रवाह आहे. पण असेही म्हणतात की त्यांच्यावर सूफी पंथाचाही प्रभाव असल्याने स्वतः: ला ईश्वरसखी मानून त्यांनी काही दोहे रचले आहेत. आणि स्वतः: तल्या कल्पित दोषांचे कठोर ताडन केले आहे.
मुळात स्त्रीपेक्षा पुरुषाची कामवासना प्रबळ असते. सहा रिपूंमधला काम हा पुरुषाचे चित्त विचलित करणारा पहिला शत्रू आहे. ह्या रिपूवर विजय मिळवणे अर्थात त्याला काबूत ठेवणे ही बुद्धी स्थिर राखण्याची एक पायरी आहे. प्रज्ञा स्थित आणि चित्तबुद्धी स्थिर झाली की त्या आदितत्वाचा अनुभव घेण्यासाठी साधक पात्र होतो. क्रोध लोभ मोह मद मत्सर हे एकवेळ सहजी ताब्यात येतील पण काम कधीही साधकाचा घात करू शकतो. म्हणून ह्या आकर्षणापासून कटाक्षाने दूर राहावे. पुरुषाच्या ह्या स्त्रीलोभापायी इतिहासात अनेक उलथापालथी झाल्या. अनेक साम्राज्ये ढासळली. म्हणून संतांनी अत्यंत कठोर शब्द वापरून ह्या शत्रूची निंदा केली आहे.
स्त्रियांमध्ये जी असोशी किंवा हौस असते तो काम विकाराचा आविष्कार नव्हे. किंवा साधी कामना किंवा इच्छाही नव्हे. संसार सजवणे, तो नेटका करणे हा तिचा एक गुण आहे. त्यामुळेही स्त्री पुरु षाकडून आकर्षणाला पात्र किंवा कारणीभूत ठरते. पुरुषाच्या मागणीनुसार त्याला शरीरसुख देण्यास तयार/ सज्ज असणे हा तर तिचा प्रमुख गुण मानला आहे. पुरुषाच्या दृष्टीने स्त्रीच्या वांच्छनीय लक्षणांमध्ये तिचे एक पद्मिनी हे विशेषण सुद्धा आहे. तर पुरुषाच्या ह्या आकर्षणाचे नियमन करायचे आहे म्हणून ज्याप्रती हा भाव मनात उत्पन्न होतो ती वस्तू पुरुषाने दूर ठेवली पाहिजे. एखादे लहान मूल जत्रेत गेल्यावर खेळण्यांसाठी हट्ट करते, आकांडतांडव करते तेव्हा आपण त्याला खेळण्यांपासून दूर नेतो. ती खेळणी त्याच्या दृष्टीआड करतो. ती कशी ' छी छी ' आहेत, त्यांच्यापासून कसा भू किंवा हाय होतो वगैरे पटवून ते खेळणे घेण्यापासून त्या अबोध मुलाला परावृत्त करतो, तसे हे आहे. ही सगळी दूषणे लटकी आहेत, त्यांपासून मूल दूर व्हावे म्हणून त्या खेळण्यावर बळेच लादलेली आहेत. तसेच क बीरांनी केले आहे. अतिशयोक्ती वापरून आत्यंतिक घृणा निर्माण केली आहे.
पवित्र रामचरित मानस मध्येही " ढोल गंवार सुद्र पशू नारी सकल ताडन के अधिकारी ' असे म्हटले आहे. संत कबीर आणि तुलसीदास हे जवळजवळ समकालीन होते. त्यावेळच्या समाजव्यवस्थेला स्त्री ही ताडन की अधिकारी मानणे मान्य होते. सररास प्रचलित होते.
संत कबीर यांचे पुष्कळ दोहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत. गुरु नानक आणि संत कबीर हे दोघेही समकालीन समन्वयवादी होते. एका कालनिर्णय मतानुसार कबीरांचा काळ गुरु नानकांच्या थोडा आधीचा. ग्रंथ साहिब मधला गुरु शब्द आणि गुरुबानी (वाणी) ही अत्यंत पवित्र मानली जाते.