आज घरी एकटीने राहण्याचा पहिला दिवस. सकाळपासून नेटवर टाईमपास करुन झाला, थोडं लिहून झालं. हात पाय चालवून झाले. आता जेवायची वेळ झाली. मुलं-नवरा नसल्याने एकटीला जेवायला काय करायचं हा प्रश्न पडला होता. अर्थातच मग सर्वात सोप्पा उपाय होता तो म्हणजे 'मॅगी'. आता 'मॅगी' बद्दल हजारो लोकांनी लिहिलं असेल आजवर, खासकरून सध्याच्या त्यांच्यावरील आरोपांमुळे बातम्या तरी प्रत्येक ठिकाणी असतील. तरीही माझ्या आयुष्यात मॅगी वेगवेगळ्या काळात आली आणि त्या त्या दिवसांच्या आठवणींमध्ये तिने स्वतःचं वेगळं स्थानही बनवलं. तसं पाहिलं तर एरवी उगाच घरात 'हेल्दी' जेवण बनवण्याचा हट्ट करणारी मी, मॅगीबाबत मात्र त्या सर्व विचारांना पूर्ण कल्टी देते आणि गरम गरम खाऊन घेते.
मी शाळेत असताना कधीतरी पुण्याहून आलेल्या आत्याने आम्हाला मॅगी करुन खायला दिली होती. अर्थातच त्यावेळी त्या 'बेचव' मॅगीमध्ये आवडण्यासारखं काय आहे असं वाटून पुन्हा त्याच्या वाटेला मी कित्येक वर्ष गेले नाही. कॉलेजमध्येही कधी मॅगी खाल्ली नाही. खरी सुरुवात किंवा ओळख झाली ती पहिल्या नोकरीत असताना मैत्रिणीच्या रुमवर GRE चा अभ्यास करताना केलेली आणि खाल्लेली मॅगी. तेव्हा पहिल्यांदा मला कळलं की त्यात हवं ते घालून, मला हव्या त्या चवीची मॅगी मी बनवून खाऊ शकते. अभ्यास आणि मॅगीचं गणित तेव्हा पहिल्यांदा जमलं.
पुण्यात ते जितकं सोईस्कर होतं तितकंच अवघड गेलं केरळमध्ये गेल्यावर. केरळमधल्या जेवणाची चव तर आवडायची नाहीच. त्यात हॉटेलमध्येही खोबरेल तेलातील डोसा, इडली आणि सांबारही. मग ट्रेनिंग सेंटरच्या शेजारीच टपरी असलेल्या माणसाकडे तो बनवेल तशी मॅगी खाल्ली. तिथल्या त्या बेचव जेवणात साधी मॅगीची चविष्ट वाटायची. नवीन मित्र-मैत्रीण, केरळचं सौंदर्य, तिथे केलेली मजा आणि त्यासोबत चवीला मॅगी. हे समीकरण आजही लक्षात आहे.
केरळमधून मी आले मुंबईला, जिथे जेवण बरंच चांगलं असायचं. ऑफिसच्या जवळच राहायची रुम असल्याने शनिवार-रविवारीही तिथे ऑफिसच्या कँटीनलाच जेवायचे. नंतर बोरिवली ते अंधेरी प्रवास सुरु झाला, बसने. तोही दुपारी ३ ते रात्री १२ च्या शिफ्टचा. रात्री बारा वाजता रुमवर जायच्या आधी अनेकदा कँटीनला जाऊन मॅगी खाऊन यायचे आणि झोपायचे. जेवण असं काही नाहीच. एकदा तर माझ्या वाढदिवशीही रात्री बारा वाजता ऑफिस कँटीनमध्ये मॅगी खाल्ल्याचं आठवतंय. तिथला माणूस सुरुवातीला फक्त पाणी , मसाला आणि नूडल्स इतकंच टाकून आणून द्यायचा. मी हळूहळू ओळख वाढली तशी, त्यात टोमॅटो-हिरवी मिरची घालून द्यायला सांगायचे. तेव्हा त्या टोमॅटो-मिरचीची सवय लागली ती आजही आहे. कधी स्वतः रुमवर मॅगी करायची असेल तर आम्ही बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरुन तळमजल्याला असलेल्या दुकानात दोन करुन मॅगी मागवून घायची होम डिलिव्हरी. आजही त्या अळशीपणाचं हसू येतं. आजही मुंबईच्या दमट हवेत, कंटाळून कॅंटीनमध्ये जाऊन खाल्लेल्या मॅगीची, त्या दिवसांची एक ठराविक आठवण मनात आहे.
पुढचा प्रवास झाला तो मुंबई ते अमेरीका आणि अमेरीका ते कॅनडा. कँटीनचं जेवण्याचे दिवस संपले होते. जिथे स्वतः करुन खायची सवय लागली. पण झालं काय की इथे मी रुमवर एकटीच राहायचे, तेही एका घराच्या बेसमेंट मध्ये. कॅनडाच्या थंडीत तळघरात एका हीटरवर दिवस काढायचे. शुक्रवार आला की मग रात्री मॅगी करायची, गरम-तिखट, लॅपटॉप वर एखादा पिक्चर लावायचा, अंगावर पांघरून घेऊन उबीत, मॅगी खात पिक्चर बघायचे, एकटीच. थंडीतील ती गरम मॅगी आणि तेव्हा पाहिलेले चित्रपट अजूनही डोक्यात येतात कधी कधी. तिथल्या थंडीत निभाव लागला तो मॅगीमुळेच. एकटीच असल्याने पिक्चर संपला की तसेच वाटी बाजूला ठेवून, लॅपटॉप बंद करुन, गुरफटून तशीच झोपी जायचे.
लवकरच एकटे राहण्याचे दिवस संपले. लग्नानंतर एक महत्वाचा शोध लागला तो म्हणजे मला माझ्यापेक्षा नवऱ्याच्या हातची मॅगी जास्त आवडते. अर्थात ती आवड होती की आळस माहित नाही, पण शुक्रवारी घरी आलं की आयती हातात गरम -तिखट मॅगी आणि पुन्हा एखादा पिक्चर, हे नवीन सुरु झालं. एकदम विकेंडचा फील यायचा. आजही कधी बरं नसलं, विशेष करुन सर्दी वगैरे झाली असेल तर हमखास तिखट-गरम मॅगी खायची इच्छा होतेच. एकदा तर त्याच्या हातची मॅगी सासू-सासऱ्यानाही खाऊ घातली. (किती कौतुक झालं लेकाचं तेव्हा !! असो. )
मध्ये जेव्हा मॅगीच्या मसाल्याबाबत बातम्या येऊ लागल्या आणि घरात ते आणणं बंदच झालं, जवळ-जवळ दोनेक वर्ष. असेही मुलांना ते द्यायला नको म्हणून करायचं बंदच केलं होतं. पण त्यांनी भारतात असताना कधीतरी खाल्ली आणि त्यांनाही ती आवडली. तेव्हापासून महिन्यातून एखादे वेळी त्यांचीही होऊन जाते एखादी मॅगी. कधी वाटतं, योग्य करतो की नाही. पण तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत शंका येते मला, अगदी ढीगभर औषध फवारलेल्या गहू-तांदळाचीही. शेवटी एक उपाय सुरु केला. नूडल्स पूर्वी एकदम पाण्यात टाकायचो, आता उकळून त्यातील पहिलं पाणी काढून टाकून मग शिजवतो. निदान वरचं वॅक्स की काय ते तरी जाईल निघून म्हणून. बाकी अजूनही बातम्या येतच राहतात, योग्य अयोग्य कळत नाही, पण जोवर त्याचं प्रमाण मर्यादित आहे तोवर योग्य असावं असं मला तरी वाटतं.
प्रत्येकाची मॅगी खाण्याची, बनवण्याची पद्धत निराळी आणि एकाची दुसरयाला अजिबात न आवडणारी. हे फक्त मॅगीबद्दलच होऊ शकतं. कुणाची खरंच दोन मिनिटांत बनणारी तर कुणाची साग्रसंगीत. कुणाला त्यात पाणी असलेलं आवडतं, कुणाला एकदम कोरडी, कुणाला भाजी घातलेली तर कुणाला काहीच नसलेली. जितक्या करू तितक्या तऱ्हा. शिवाय, काहीही स्वयंपाक येत नसला तरी 'मॅगी बनवता येते' असं क्वालिफिकेशन अनेकांचं असतंच. माझा एकटी-दुकटी ते चौकटी असा प्रवास निरनिराळया देशातून झाला. त्यात कुठे ना कुठे मॅगी होतीच त्या त्या ठिकाणी. आणि त्याच्याशी निगडित आठवणी. त्यामुळे आज घरी एकटीसाठी बरेच दिवसांनी करताना त्या सर्वांची पुन्हा आठवण झाली आणि म्हटलं लिहावंच. कारण मला ठाऊक आहे, प्रत्येकाच्या त्याच्याशी वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असणार. होय ना?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मी पहीला.
मी पहीला.
मॅगी माझाही जीव की प्राण
लग्नानंतर एक महत्वाचा शोध
लग्नानंतर एक महत्वाचा शोध लागला तो म्हणजे मला माझ्यापेक्षा नवऱ्याच्या हातची मॅगी जास्त आवडते. अर्थात ती आवड होती की आळस माहित नाही, >>>>सेम पिंच
बाकी लेख मस्तच नेहमीप्रमाणे
आता उकळून त्यातील पहिलं पाणी
आता उकळून त्यातील पहिलं पाणी काढून टाकून मग शिजवतो.
>>>>
हे असेच करायचे असते. तसेच त्याचा मसाला देखील आधीच न जाळता अगदी शेवटी गॅस बंद करायची वेळ येते तेव्हाच घालायला असतो. हे एवढे पाळले की काही नाही होत. दिवसातून दोन वेळा मॅगी खाऊनही तुम्ही शंभर वर्षाचे आयुष्य सुखाने जगू शकाल. स्वानुभव आहे. लहानपणापासून म्यागी खातोय. पिण्ट्यालाही खाऊ घालतोय. ती देखील ईतके प्रयोग करून की गिणती नाही. जणू किचन म्हणजे मॅगीची प्रयोगशाळाच. पण ना कधी सर्दी ना कसले पडसे..
माझी मॅगी खायची सुरुवात अगदी
माझी मॅगी खायची सुरुवात अगदी अलिकडची आहे. कॉलेजमध्ये असताना आवडायचं नाही. आताच्या मॅगी मसाल्यात फार दम नाही म्हणून पाणी उकळताना त्यात किंचीत मीठ, चाट मसाला, हिरवी मिरची, थोडे मटार दाणे आणि कोथिंबीर घालून छान लागतं.
>>निदान वरचं वॅक्स की काय ते तरी जाईल निघून म्हणून. >> सॅच्युरेटेड फॅट असतं ते
आता उकळून त्यातील पहिलं पाणी
आता उकळून त्यातील पहिलं पाणी काढून टाकून मग शिजवतो.>>>होय मी पण हे ऋन्मेषच्या कोणत्यातरी पिंटया-मैगी च्याच् रेसीपीत वाचले होते
मला आठवलं ते रोहतांग पास ला
मला आठवलं ते रोहतांग पास ला कडाक्याच्या थंडीत बर्फात खाल्लेली मँगी hmmm tempting
विद्या, मी पण विकेंडला
विद्या, मी पण विकेंडला संध्याकाळी मॅगीच करते. मस्त गाजर, मटार, कोबी, कांदा घालून गरम गरम चापते. स्वर्ग आहाहा
तुझ्या फोटोतली मॅगी अगदी
तुझ्या फोटोतली मॅगी अगदी मॅगीच्या पाकिटावर मॅगीचा जो फोटो असतो तशीच दिसतेय डिट्टो
मेरीभी मॅगी.
मेरीभी मॅगी.
मलापण आवडते खुप. मुलांनाही. पण नो भाज्या. ओन्ली मसाला मॅगी.
सिओईपी ला असतांना रुम मधे
सिओईपी ला असतांना रुम मधे रात्री उशीरा जागल्यावर आणि बर्याचदा संध्याकाळी भुक लागली आणि जेवायला उशिर असला की अगणीत वेळा मसाला मॅगी उकडलेल्या अंड्यांबरोबर खाल्ल्ली आहे. त्यावर आम्ही मॅगीचा एक अंबट गोड सॉस टाकायचो. अजुनही आठवल की तोंडाला पाणी सुटतं कॉलेज नंतर जवळ जवळ बंदच झालं..
खूपच चवदार लेख... चीझ मसाला
खूपच चवदार लेख... चीझ मसाला मॅगी try करून पहा एकदा . ह्यात मॅगी मसाला थोडा जास्त घालायचा, लाल तिखट (मी हे जास्त घालते, चवीनुसार कमी जास्त करू शकतो ), आणि खूप चीझ किसून... एकदम चवदार मॅगी तयार होते .. पुण्यात मिळतो हा प्रकार
मी मॅगी प्रेमी नाही पण
मी मॅगी प्रेमी नाही पण एखाद्या वेळेस अचानक हुक्की येते अन मग बनवते.. पियू ला मम..
माझी एक रूममेट रवा भाजून आणि
माझी एक रूममेट रवा भाजून आणि मॅगी नूडल्स असं एकत्र करून नूडल्स उपमा करायची. मस्त लागायचं. आणि मुख्य म्हणजे ती hotel management and catering ला होती. त्यामुळे की काय कोण जाणे, पण दोघींनाही भूक लागली असली तरी नेहमी तीच स्वतःहून उठून बनवायची
हे सगळ्यात भारी. गेले ते ( PL चे) दिवस!
अर्थातच त्यावेळी त्या 'बेचव'
अर्थातच त्यावेळी त्या 'बेचव' मॅगीमध्ये आवडण्यासारखं काय आहे असं वाटून पुन्हा त्याच्या वाटेला मी कित्येक वर्ष गेले नाही.>>> अगदी अगदी!!
छान जमलाय लेख!!
मॅगी रेसिपी:
मॅगी रेसिपी:
१. आधी पाणी पूर्ण उकळू दिलं आणि त्यात नूडल्स घातले. दीड पाकीट नूडल्स आणि दोन पाकीट मसाला वापरला आहे.
२. एक टोमॅटो, ४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे तयार ठेवले होते.
३. नूडल्स २-३ मिनिटांत पाण्यातून काढून चाळणीत घेतले त्यावर थंड पाणी टाकलं. ते पाणी चाळणीतून निघून गेलं.
४. भांड्यात बटर घालून त्यात मिरच्यांचे तुकडे, टोमॅटो दोन मिनिट परतले. इथे हवे असेल तर अजून थोडे तिखट घालू शकता. टोमॅटोचं पाणी थोडं उडून गेल्यावर मॅगी मसाला घातला. पटकन मिक्स केले. इथे गॅस बंद केला.
५. भांड्यात नूडल्स घालून मिक्स केले. मी चमचा आणि एक फोर्क असे घेऊन नूडल्स मिक्स करते.
६. गॅस पुन्हा चालू करुन त्यात थोडं पाणी घातलं(जितकं पाणीदार हवं आहे त्यानुसार), मीठ चवीनुसार आणि उकळून मिक्स होऊ दिलं.
७. पाणी, मसाला नूडल्स सर्व एकजीव झाले कि बाऊल मध्ये काढून घेतले.
८. मुलांना देताना वरून पाणी घालत नाही, टोमॅटोचं पाणी असतं तेव्हाच नूडल्स मिक्स करते. त्यांना कोरडे आवडतात. बटरने चव छान येते. हिरव्या मिरच्यांचे तिखट मला जास्त आवडते, मिरची पावडर पेक्षा.
सर्वांच्या कमेंट आणि आठवणी शेअर केल्यात छान वाटले. धन्यवाद.
विद्या.
मॅगीपेक्षा मला चँग चे नूडल्स
छान लेख
मॅगीपेक्षा मला चँग चे नूडल्स आवडतात विशेषतः हॉट गार्लिक. मॅगीत / चँग मध्ये कार्ब जास्त व प्रोटीन नाही त्यामुळे पोट भरले तरी लवकर भूक लागते व पोषण मूल्य कमीच. तुरीचे वरण जास्त पाण्यात शिजवून मग त्याच पाण्यात मॅगी करणे किंवा मॅगीत सरळ वरून वरण घालणे. वरणफळाच्या जवळपास जाणारा हा पदार्थ लहान मुले आवडिने खातात. किंवा मग थोडेसे सोया चंक्स घालतो. चिकन वगैरे प्रकार फारच रिस्की होतील.
तरीच म्हटलं एवढ्या उचक्या का
तरीच म्हटलं एवढ्या उचक्या का लागतायत
चविष्ट Soupy लेख ! काल
चविष्ट Soupy लेख ! काल दुपारीच एकटी असताना , सर्दी झाली आहे ह्या निमित्ताने मॅगी खाल्ली होती त्यामुळे आज परत नाही तुमच्या रेसिपीच मी follow करते पण तिखटा ऐवजी काळी मिरी पावडर घालते , खूप सर्दी असेल तर आलं , लसूण आणि वरून लिंबू पिळते !
" लग्नानंतर एक महत्वाचा शोध लागला तो म्हणजे मला माझ्यापेक्षा नवऱ्याच्या हातची मॅगी जास्त आवडते", "एकदा तर त्याच्या हातची मॅगी सासू-सासऱ्यानाही खाऊ घातली. (किती कौतुक झालं लेकाचं तेव्हा !! असो;):)