साहवेना दुरी

Submitted by पुरंदरे शशांक on 21 January, 2018 - 21:39

साहवेना दुरी

लपवावे तुज । ह्रदयामाझारी । साहवेना दुरी । काही केल्या ।।

एकांतीचे सुख । भोगावे केवळ । एकचि गोपाळ । दुजे नको ।।

सुखदुःख वार्ता । सर्व तुजपाशी । येर सारे नाशी । लौकिक हे ।।

नयनी ह्रदयी । वसता मुरारे । खंती चि ना उरे । कोणतीच ।।

भरूनी वाहेल । आनंदी आनंद । स्वये ब्रह्मानंद । प्रगटेल ।।

हीच एक आस । जागवी सतत । तेणे माझे चित्त । सुखावेल ।।

येर नको काही । मोक्ष सुख थोर । जरी तू उदार । व्यापी चित्ता ।।

दुरी = दुरावा, द्वैत
आस = इच्छा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या रचनांमधुन खरंच एक संतभाव प्रतीत होतो..
ही रचनाही त्या दृष्टीने अतिशय सुंदर...
अशा रचना रचणार्या/सुचणार्या/स्फुरणार्या मनःस्थितीचे, व्यासंगाचे, आध्यात्मिक उन्नयनाचे जास्त अप्रूप वाटते...
॥ हरिॐ ॥

येर नको काही । मोक्ष सुख थोर । जरी तू उदार । व्यापी चित्ता ।।>>>>> काय बोलणार! सलग चार वेळा वेगवेगळे प्रतिसाद लिहीले आणि पुसले. अभंगवाणीच ही! साष्टांग नमस्कार!!!!

मस्त.
निरु, अगदी बरोबर. मला पण हेच वाटत.

निरू यांचे काही शब्द घेऊन -

प्रभावी रचना | जणू संतसंग | अध्यात्म-व्यासंग | काय वर्णू ||
ओवीत प्रतित | संतभाव होतो | वाचकही होतो | मंत्रमुग्ध ||