पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 24 January, 2018 - 09:25

खूप उदास उदास वाटण्याचे काही दिवस असतात. कधी काही कारण असतं. कधी काहीच नाही. आपल्यातच मिटून राहावंसं वाटतं, अगदी जवळचे मित्र-मैत्रिणीच काय पण कुटुंबातलं कोणीही आसपास नसावं असं वाटतं. जिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी. लिस्ट आपली प्रत्येकाची वेगळी. माझ्या लिस्टबद्दल आणखी कधीतरी. पण आज त्यातल्या एका गाण्याबद्दल आणि ते ज्या चित्रपटातलं आहे त्याबद्दल. हे गाणं आहे 'अनुपमा' मधलं - कुछ दिलने कहां, कुछभी नही, ऐसीभी बाते होती है....

गाण्याच्या सुरुवातीची पक्ष्यांची किलबिल अगदी एखाद्या दाट जंगलात घेऊन जाणारी. सकाळची प्रसन्न वेळ. उंच उंच झाडाचं जंगल. त्यातून जाणाऱ्या प्रशस्त रस्त्यावरून फिरणारी साडी नेसलेली नायिका. आपल्याच तालात, केसांशी, पदराशी चाळा करत ती चाललेय. आपल्याकडे कोणीतरी पहातंय हेही तिला जाणवत नाहीये. कसलीही गडबड नाही, कुठे जायची घाई नाही. गोयकरांच्या भाषेत सांगायचं तर अगदी सुशेगाद काम. सकाळी डोळे उघडले की घड्याळ्याच्या काट्यावर धावून कंटाळलेल्या आपल्या मनाला तिच्या शांत आयुष्याची भुरळ पडते. वाटतं हीच का ती अनुपमा? इतकं सुखी आयुष्य मिळवायला मागच्या जन्मी हिने काय पुण्य केलं असेल? आधी हे गाणं ऐकून आणि नंतर पाहून चित्रपटाच्या कथेबद्दल खूप उत्सुकता होती. मग एके दिवशी चित्रपट पाहायचा योग आला.

कथा साधीशीच. ह्या गाण्यात दिसणारी कथेची नायिका उमा. ‘दिसतं तसं नसतं' ह्या दुनियेच्या न्यायानुसार तिचं आयुष्य वाटतं तितकं आनंदी नाही. तिला जन्म देऊन तिची आई देवाघरी गेल्यामुळे वडील मोहन लहानपणापासूनच तिचा रागराग करतात. फक्त जेव्हा ते दारू पितात तेव्हाच नशेत असताना भूतकाळ विसरून तिच्याशी माणसासारखं वागतात. घरची श्रीमंती त्यामुळे उमाला रूढार्थाने काहीही कमी नाहीये. पण तिला लहानपणापासून वाढवणारी सरला (चित्रपटाचा सुरुवातीचा थोडा भाग चुकल्याने ही दाई का नोकराणी ते मला कळलं नाही) आणि मैत्रीण अनिता उर्फ अ‍ॅनी सोडली तर तिच्याशी प्रेमाने वागणारं कोणी नाही. म्हणून उमा introvert, लाजरी, बाहेरच्या जगात फारसं मिसळू न शकणारी अशी झालेय. मोहनच्या अतिमद्यपानामुळे त्यांची प्रकृती ढासळते आणि डॉक्टर एखाद्या हिलस्टेशनवर हवापालट करायला जायचा सल्ला देतात (तेव्हाच्या काळात AA नसावं. दारू सोडवायचे प्रयत्न करायचे सोडून हिलस्टेशनवर जायचा सल्ला देणं म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असला प्रकार). तिथे येतो अरुण जो मोहनच्या एका मित्राचा मुलगा असतो. त्याचं शिक्षण आता पूर्ण झालंय (तेव्हाच्या काळी लोक विलायतेत शिक्षण घेऊन रीतसर मायदेशी परत वगैरे येत असत!). मोहन त्याचं आणि उमाचं लग्न ठरवतात. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. अरुणसोबत त्याचा मित्र अशोकसुध्दा आलेला असतो. लेखक असलेला हा अशोक उमाकडे आकर्षित होतो. आता उमाला ठरवायचं असतं की वडिलांच्या इच्छेनुसार अरुणशी लग्न करायचं का आपल्या मनाचा कौल मानून अशोकला आपलं म्हणायचं......

पात्रांची निवड जवळपास अचूक म्हणावी अशीच. अशोक म्हणजे धर्मेंद्र दोन शब्दांत सांगायचं तर एकदम Husband Material. एखादीने त्याला आईवडिलांकडे नेलं तर ते पत्रिका वगैरे जुळवायच्या भानगडीत न पडता जवळात जवळचा मुहूर्त बघून लग्न उरकून टाकायच्या घाईला लागतील इतका सालस, नम्र, सद्गुणी वगैरे. हां, आता हिंदी चित्रपटांच्या पुरातन परंपरेला जागून घरची गरिबी आहे आणि घरात विधवा आई आणि लहान बहिण आहेत. पण आई ललिता पवार नसून दुर्गा खोटे असल्याने आपण प्रेक्षक म्हणून निर्धास्त. कारण दुर्गा खोटे म्हणजे प्रत्येक स्त्रीने अगदी सिध्दिविनायकाला नवस करून मागून घ्यावी अशी प्रेमळ सासू. एका प्रसंगात उमा सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवायला लाजते आहे हे लक्षात येताच त्या स्वत: तिच्याबरोबर दुसर्या खोलीत जाऊन जेवतात. मला तर बाई अगदी भरून आलं. जन्मोजन्मी चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करण्याऐवजी भारतीय बायकांनी जन्मोजन्मी अशी प्रेमळ सासू मिळावी म्हणून एखादं व्रत करावं असं माझं ठाम मत आहे. अनिता उर्फ अ‍ॅनीच्या भूमिकेत शशिकलेला पाहून माझ्या पोटात धडकी भरली होती. म्हटलं आता ही बया धर्मेंद्रच्या मागे हात धुवून लागणार आणि शर्मिलाचं आणि आपलं लाईफ बरबाद करणार (‘या दिलकी सुनो’ गाण्यात तिला अंधारातून धर्मेंद्रकडे टक लावून बघताना पाहून तर अनेक वर्षं माझी खात्रीच झाली होती). पण तिला देवेन वर्माच्या म्हणजे अरुणच्या प्रेमात पडलेलं पाहून माझा जीव भांड्यात पडला. बाकी देवेन वर्मा तरुणपणी छान दिसायचा. ब्रह्मा भारद्वाज (अनिताचे वडील), डेव्हिड (डॉक्टर मोझेस) आणि दुलारी (दाई सरला) हे आपापल्या रोलमध्ये फिट्ट.

पण शर्मिला टागोर मात्र उमाच्या भूमिकेत माझ्या अगदी डोक्यात गेली. उमाचा बुजरेपणा पार नाटकी वाटावा इतपत तिने ओव्हरअ‍ॅक्टिंग केलीय. कधीकधी तर तिला गदागदा हलवून 'अग बाई, बोल काहीतरी' असं ओरडावं असं मला कितीदा तरी वाटलंय. आणि तरुण बोसला हे कोणीही सांगितलेलं नाहीये की ह्या चित्रपटात त्याला व्हिलनची नाही तर थोडी निगेटिव्ह शेड असलेल्या नायिकेच्या वडिलांची भूमिका करायची आहे. अथपासून इतिपर्यंत तो अत्यंत खलनायकी एक्स्प्रेशन चेहेर्यावर घेऊन वावरलाय. ‘धीरे धीरे मचल' ह्या गाण्यात तर स्वत:च्याच बायकोकडे तो अश्या काही नजरेने पाहतो की ते गाणं प्रथम पाहिलं तेव्हा तो एखाद्या पार्टीत दुसर्याच कोणाच्या बायकोकडे बघतोय अशी माझी समजूत झाली होती. एका प्रसंगात तो धर्मेंद्रच्या घरून शर्मिलाला न्यायला येतो तेव्हा स्वत:च्या मुलीला घरी घेऊन जायला नाही तर तिला किडनॅप करून ओलीस धरून ठेवायला नेतोय असंच वाटतं.

चित्रपटातली सगळी गाणी मात्र भारी सुरेख आहेत. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेलं 'कुछ दिलने कहां' तर मस्त आहेच पण 'क्यो मुझे इतनी ख़ुशी दे दी' आणि 'धीरे धीरे मचल' सुध्दा श्रवणीय आहेत. ‘भीगी भीगी फझा' ऐकून तर मला दर वेळी नुकतंच पिकनिकला जाऊन आल्यासारखं फ्रेश वाटतं. ‘या दिलकी सुनो' खरं तर दर्दभरं आहे पण ते ऐकून मला कधीच दु:खी वाटलेलं नाही. उलट मन शांत नसेल तर ते ऐकून खूप शांत वाटतं हा अनुभव आहे खरा. चित्रपटात हे गाणं एका पार्टीत म्हटलं गेलंय. तेव्हा शशिकला वातावरणनिर्मितीसाठी म्हणून लाईटस मंद करते. त्यामुळे ते पहायला आणि ऐकायला फार छान वाटतं.

थोडक्यात काय तर थोडी रडकी असली तरी अनुपमाची ही कथा पाहण्याजोगी आहे. अरे हो, पण अनुपमा कोण ते मी सांगितलंच नाही की तुम्हाला. आणि सांगणारही नाही. त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. कधी पाहताय?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट खूप आवडता आहे व गाणीही आवडती. त्यामुळे तू चिरफाड करतेस की काय या काळजीने धस्स झालेलं शीर्षक वाचून. पण.. आपले विचार मॅच होताहेत. खूप सुंदर लिहिलंस.

एक निवांत शांत चित्रपट जो एक खूप महत्त्वाचा संदेश देतो. धर्मेंद्रच्या तोंडी आईला उद्देशून साधारण असे वाक्य आहे की मी तिला माझ्याकडे बोलावले तर ती लगेच येईल, पण मग माझ्यात व तिच्या बाबात काय फरक राहिला? आजवर बाबाच्या मर्यादेत राहिली, नंतर माझ्या राहील. तिला स्वतः ठरवूदे तिला काय हवे ते. खूप आवडले हे. धर्मेंद्रची व्यक्तिरेखा खूप आदर्श आहे, असे लोक अपवादाने आढळतात.

शर्मिला मात्र डोक्यात जाते. तिला भूमिका कळलीच नाही असे सतत् वाटत राहते. कुछ दिलने कहा.... एकाकी व्यक्तीचे मनोगत, जिच्या आयुष्यात इतरांना नाव ठेवायलाही प्रॉब्लेम सापडणार नाही.

दिल की तस्सली के लिये, झूठी चमक झूठ निखार
जीवन तो सूना ही रहा, सब समझे आयी बहार
कलियों से कोई पूछता, हंसती हैं या रोती हैं
ऐसी भी बातें होती हैं....

शर्मिलाच्या चेहऱ्यावर यातले काहीही दिसत नाही. ती एक सुंदर बाहुलीसारखी वावरत राहते.

रच्याकने धर्मेंद्र, शर्मिला, देवेन वर्मा व शशिकला हे कॉम्बो त्याच वर्षाच्या देवरमध्येही होते. एकाच वर्षी 4 अभिनेते 2 चित्रपटात एकत्र...

रच्याकने धर्मेंद्र, शर्मिला, देवेन वर्मा व शशिकला हे कॉम्बो त्याच वर्षाच्या देवरमध्येही होते. एकाच वर्षी 4 अभिनेते 2 चित्रपटात एकत्र...>>
त्यात तरुण बोसही होता. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एकाच वेळी चालू होते.
देवर मला खूप आवडला होता. अनुपमातील भूमिकेच्या बरोबर वेगळ्या भूमिका चौघांच्या देवरमधे होत्या. विशेषतः शशिकला आणि देवेन वर्मा छाप सोडून गेले. आणि वेगळी गोष्ट म्हणजे देवर मधे धर्मेंद्र-शशिकला, देवेन वर्मा-शर्मिला अशा जोड्या होत्या!
अनुपमा आवडला पण शर्मिला (आणि तिच्या डोक्यावरचे टोपले) भयानक डोक्यात गेले! शशिकलानेही उगाचच overacting केल्यासारखी वाटली. तिची overacting आणि शर्मिलाची underacting याच्यात चुरस होती.
म्हणूनच देवरशी तुलना करता दोघींचीही कामे देवरमधे खूपच सरस होती.

एक खुप आवडता पिक्चर !! मी सुद्धा आता आताच पाहिला पिक्चर. धर्मेंद्र खरंच खुप मस्त दिसलेला आहे आणि त्याची अ‍ॅक्टिंग त्याचा रोल सगळेच भारी आहे. अनुपमाचं म्युझीक म्हणजे मेलडीचं घरच. मस्त गाणी केलीत हेमंत कुमारांनी.

या लेखात न लिहीलेला एक माझा आवडता पॉइंट म्हणजे अनुपमाची ब्लॅक अँड व्हाईट सिनेमॅटोग्रफी. जयंत पाठारेंना या चित्रपटाकरता फिल्मफेअर मिळालेले. त्यांनी सगळ्या फ्रेम्स अगदी सुंदर केल्यात. आणि एक सावल्यांचा खेळ खुप सुंदर जमलाय.

या करता माझी एक रिक्षा - http://songstuk.blogspot.com/2014/12/kuch-dil-ne-kaha.html

जिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी
>>> अगदी अगदी. अशा वेळेला लावल्या जाणार्‍या प्लेलिस्टमध्ये 'धीरे धीरे मचल' टॉपला. माझे अत्यंत आवडते गाणे. लता दिदींचा ६० मधला कोवळा आणि सुरेल स्वर .. अहाहा .. अप्रतिम एकदम .

हाही चित्रपट आवडता. या लेखाचा अपेक्षित वाचकवर्ग हे जुने चित्रपट न पाहिलेली मंडळी असावीत असं वाटतंय. त्या दृष्टीने लेख चांगला वाटला.
मला या चित्रपटातला एक सीन लक्षात आहे. बहुतेक शशिकला शर्मिलाशी फोनवर बोलत असते आणि शर्मिला तिच्या प्रश्नांची उत्तरं तोंडाने न देता मानेने देत असते आणि शशिकला तसं म्हणते.

मला शेवट नक्की आठवत नाहीए. पण डीडीएल्जे सारखा आहे का? रेल्वे स्टेशनवर?
(रेल्वे स्टेशनवर शेवट असलेले सिनेमे कोणते असा एक ट्रिव्हिया. एक बार फिरपण असाच आहे का? इजाजत तर अख्खा सिनेमाच रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये घडतोय. आणि गुलजार आहे त्यामुळे अर्थातच फ्लॅश बॅक)

ललिता पवार, दुर्गा खोटे, शशिकला यांना टाइपकास्ट केलंय तो भाग सुटा विनोद म्हणून बरा वाटला असता. पण या सिनेमावरच्या लेखात नाही रुचला. शशिकलाने सुजाता, बावर्चीत न-निगेटिव्ह भूमिका केल्यात. अनुपमातली तिची भूमिका सुजातातल्या भूमिकेचं एक्स्टेन्शन वाटतेय.

शर्मिलाचा नाटकी अभिनय मला खटकत नाही. मला आवडते ती. का ते माहीत नाही.

भरत तो सिन बहुतेक धर्मेंद्रच्या बहिणीत व शर्मीलात घडतो. ते कुटुंब काही कारणाने गावी जाते व जायच्या आधी बहीण शर्मिलाला आमंत्रण देते घरी यायचे असे काहीतरी आहे. मी यु ट्युबवर पाहिलेला काही वर्षांपूर्वी, परत पाहीन आता. शेवटचा सिन रेल्वे स्टेशनवर आहे. डीडीएलजे टाइप. कॉन्फिडन्ट शर्मिला धर्मेंद्रच्या गावी जायला रेल्वेत चढते व बाप चोरून बघतोय तिला, डोळ्यात पाणी भरून असे आहे बहुतेक.

कुछ दिलने कहा हे गाणे चित्रपट सुरू होऊन तासभर झाल्यावर आहे, तोवर शर्मिलाला एकही संवाद नाही. मी प्रथम पाहिलेला तेव्हा ती मुकी आहे असे वाटले होते. Happy

अनुपमा आवडला पण शर्मिला (आणि तिच्या डोक्यावरचे टोपले) भयानक डोक्यात गेले! >> प्रथम या बद्दल सिनेमाच्या दिग्दर्शकाने आणि वेशभूषाकाराने तिला सांगितले होते की ही भुमिका निराळी असल्याने त्या 'टोपल्याची' गरज नाही. पण शर्मिलाने न ऐकता हट्टाने ती केशभूषा ठेवली सिनेमात आणि नंतर सिनेमा पाहिल्यावर तिला म्हणे पश्चाताप झाला होता.

बाकी सिनेमा पाहून अनेक वर्ष झाली. खूप आवडला, किंवा आवडलं नाही असं काही झालं नाही. गाणी भावली. शर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो.
धर्मेंद्र अगदी म्हणजे अगदी अती आदर्श माणूस. त्याची आई पण तशीच सतत दुधावरची साय आणि साखर खाल्ल्याचं फिलिंग.
शशिकलाला पहिल्यांदाच मी सोबर रोल करताना पाहिले, नाहितर सतत कपट, कारस्थान करणारी पाहिली असल्याने या सिनेमात तिचा रोल म्हणजे सुखद धक्का होता.
फक्त तिच्या वाढदिवसाला, क्यूं मुझे इतनी खुशी दे दी झाल्या झाल्या, धर्मेंद्र येऊन या दिल की सुनो गातो.. Uhoh इतका अपोझिट मोड. आपल्याला स्विच करताना खूप अवघड जाते.

थोडेसे अवांतर, आता विषय निघालाच आहे तर, सिनेमातल्या पार्टित अख्ख्या जगासमोर हिरो किंवा हिरॉईन गाणं म्हण म्हटलं की आपले पर्सनल गोष्टी डिस्कस करतात गाण्यातून.
हमराज मध्ये आर्मीच्या पार्टित सुनिल दत्त म्हणतो, किसि पत्थर की मुरत से...
जब जब फुल खिले मध्ये शशी म्हणतो यहा मै अजनबी हू..
पार्टित जरा रिलिव्हन्ट गाणी म्हणायला हवीत ना? Uhoh

स्वप्ना, छान लिहिलंयस.
मी हा चित्रपट लहान असताना पाहिलेला. आता पहिला न पहिल्यासारख्या आठवणी आहेत.
गाणी सगळी आवडती.

चित्रपट पाहिला नाही. पण

शर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो. >> याला +७८६ Lol

मस्त लिहिलंय. पण शर्मिला कायमच नाटकी ऍक्टिंग करते . खूप नाटकी आणि लाड लाड बोलते Happy

<<शर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो.>>
अगदी अगदी Lol

थोडा बघायचा प्रयत्न केला. गाणी चांगली आहेत पण शर्मिलाची मठ्ठ अ‍ॅक्टींग आणि शशिकलाचा वयाला न शोभणारा बालिशपणा अगदीच सहन होईना.

हेमंत कुमारचे संगीत अविस्मरणीय आहे. शर्मिला टागोर मलाही या सिनेमात आवडली नाही. कुछ दिल ने कहा हे गाणे काहीसे गूढ अर्थाचे वाटते. पण संगीत आणि आवाज प्रचंड आवडतो.
पुन्हा बघितला पाहिजे.

दक्षे, Happy Happy मलाही कायम हाच प्रश्न पडतो. रेलवन्सचे तर सोडच, पण चार लोकांना बोलवून त्यांच्यासमोर का तमाशा?

शशी कपूर एका पार्टीत डोळ्यात पाणी भरून 'वक्त करता जो वफा आप हमारे होते' गातो तरी हिरोईन ढिम्मच... ती ते पार्टी सॉंग म्हणून ऐकते. Happy Happy

नेहमीप्रमाणेच मस्त, लगे रहो!!!

शर्मिला चांगली अभिनेत्री आहे पण तो लडीवाळपणा...
अमरप्रेम मध्ये तिच्यामागे कोणीतरी शिमटी धरून बसलं असाव नाहीतर फुल्ल स्कोप होता बाईंना .
चुपकेचुपके मध्ये मला ही तिची लाडीक अ‍ॅक्टींग आवडली होती खरतर तो चित्रपट प्रत्येक अ‍ॅक्टरने full enjoy केला होता.

आपले पर्सनल गोष्टी डिस्कस करतात गाण्यातून.>> १००% सहमत आणि एखादी शम्मी, बिंदू किंवा शशिकला सारखी चाभरीच ते ओळखते . बाकी कुणाला काहीही कळत नाही.

शर्मिलाचं लग्न देवेन वर्माबरोबर ठरलेलं असतं - हिलस्टेशनला जायच्या आधीपासूनच. पण तिथे गेल्यावर तो आणि शशीकला एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर शर्मिला धर्मेंद्रकडे आकर्षित होते. पूर्वीचा काळ पहाता चित्रपट बराच लॉजिकल आहे. "या दिल की सुनो" गाण्यात शशिकलाची एक्स्प्रेशन्स लाजबाब. बाकी काही शॉटसमधे शर्मिला पेक्षा शशिकलाचा पाचकळ बालिशपणा डोक्यात जातो, तरीही तिचा वैताग येत नाही. गाणी सगळीच छान आहेत. आवडता चित्रपट.

हे गाणं मी नुसतं एकलं तरी हरवून जाते. वेगळीच उदासी. रुखरुख आहे. अगदी विरक्तपणा वाटतो. तरीही मला आवडते एकटीच असताना.
पिक्चरची कथा खूपच उदास आहे. आणि दुर्मुखलेल्या मुलीची अशी आहे. मला तर शर्मिला टगोरच्या कॅरॅक्टरची दयाच आलेली.
बाकी शर्मिला टागोर म्हणजे नुसती पापण्यांची मिचमिच आणि खळ्या. जशी कथा आहे त्याप्रमाणॅ ते पात्र खुलतच नाही.
बहुधा ह्या बाईंना त्या काळी हिंदी फारसे समजत न्हवते त्यामुळे ह्या गाण्याचे शब्द काय, आशय काय आणि भाव असे काहीच न समजता फक्त लाजायचे शॉट्स आहेत..
मध्ये एक ओळ आहे, झुठी चमक झुठा .. ओळीपासून पहा ते हसती है या रोती है ह्या समेवर तर टागोर बाईसाहेब मान डोलावत लाजतात..

>>>>शर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो.>><<<

अगदी अगदी.

आम्ही त्याला बद्धकोष्ठता असलेला अ‍ॅक्टर म्हणायचो.

दक्षे.. Happy अगदी अगदी...!! तो पियानो, उघड उघडच नायिकेला उद्देशून गाणं म्हणत असलेला हिरो, त्याचा आर्त स्वर, डोळ्यांतलं पाणी...काही म्हणता काही बाकीच्या जनतेला जाणवत नाही. नायिका अगदी मजबूरीने प्राण (अथवा तत्सम..!! कधी कधी हिरो हून राजबिंड्या दिसणार्‍या!) खलनायकासोबत नाचत असते. फक्त गुगु म्हणतात तसं... एखादी शम्मी, बिंदू किंवा शशिकला सारखी चाभरीच ते ओळखते . आणी मग तिचे एक्स्प्रेशन्स.. ' हं.....कसं पकड्लं....!! पाणी मुरतंय कुठेतरी! बघतेच आता!!' जुने सिनेमे म्हणजे मजा असायची.....

हो आणि चांगल्या वाढदिवस, लग्न, मंगनी सारख्या हसी खुशी भरा महोल मधे हे लोक पार्टी सॉन्ग म्हणून चक्क रडकी गाणी गातात. तरीही जनतेला काही कळत नाही.

छान लिहीले आहे. 'धीरे धीरे मचल' ला तोड नाही. ऑटाफे. प्रत्येक कडव्याच्या सुरूवातीच्या ओळीनंतर येणारे पियानोचे पीसेस फार सुंदर आहेत.

शशिकलाने सुजाता, बावर्चीत न-निगेटिव्ह भूमिका केल्यात. >>> रेखाच्या खूबसूरत मधे सुद्धा बहुतेक.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार Happy

भरत, हे चित्रपट न पाहिलेल्या व्यक्ती हा लेखाचा अपेक्षित वाचकवर्ग आहेच. पण ज्यांनी तो पूर्वी पाहिलाय त्यांनीसुध्दा ह्या लेखाच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात, त्यावर चर्चा व्हावी आणि हे चित्रपट पुन्हा पाहिले जावेत अशीही अपेक्षा आहे. अर्थात 'हर हर!! गेले ते जुने दिवस' असा भाव हे लेख लिहिताना नसल्यामुळे थोडा विनोद अस्थानी ठरणार नाही असं मला वाटतं.

देवर बद्दल आईकडून ऐकलंय. धर्मेन्द्र आणि देवेन वर्मा मित्र असतात. धर्मेन्द्रसाठी नियोजित वधू बघायला देवेन वर्मा जातो आणि स्वतःच तिला पसंत करून तिच्याशी लग्न करतो अशी काहीशी कथा आहे बहुतेक.

देवर बद्दल आईकडून ऐकलंय. धर्मेन्द्र आणि देवेन वर्मा मित्र असतात. धर्मेन्द्रसाठी नियोजित वधू बघायला देवेन वर्मा जातो आणि स्वतःच तिला पसंत करून तिच्याशी लग्न करतो अशी काहीशी कथा आहे बहुतेक.>>>>>

देवर परवा परत पाहिला. शर्मिलाला मध्ये मध्ये अभिनय करायची संधी आहे आणि त्यात ती बरीच यशस्वी झालीय. अनुपमातले सगळे लोक , तरुण बोस माईनस तो विग, आहे.
शेवट थोडा दुःखी आहे. देवेन वर्मा बराच नेगटीव्ह आहे. शर्मिलाशी लग्न व्हावे म्हणून तो धर्मेंद्रला व्यसनी तर ठरवतोच पण त्या कृतीमुळे व मध्यस्थाच्या लालचीमूळे कमी शिकलेल्या धर्मेंद्रचे लग्न उच्चशिक्षित शशिकलेशी होते. ही बाब उघडकीस आल्यावर ह्या दोघांचे वैवाहिक जीवन बरबाद होते. मूळ बंगाली कथेवर आधारित असलेला हा चित्रपट एकदा पाहण्याजोगा नक्कीच आहे.

चितचोरमध्ये मुलाकडून फसवणूक होत नाही. मुलीचे आईबाबा ओव्हरसियरला इंजिनेर समजून स्वतःच स्वतःची फसवणूक करून घेतात. मुलगा कसलीही फसवणूक करत नाही. उलट शेवटी त्या बिचाऱ्याची दयनीय अवस्था होते.

Pages