पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 24 January, 2018 - 09:25

खूप उदास उदास वाटण्याचे काही दिवस असतात. कधी काही कारण असतं. कधी काहीच नाही. आपल्यातच मिटून राहावंसं वाटतं, अगदी जवळचे मित्र-मैत्रिणीच काय पण कुटुंबातलं कोणीही आसपास नसावं असं वाटतं. जिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी. लिस्ट आपली प्रत्येकाची वेगळी. माझ्या लिस्टबद्दल आणखी कधीतरी. पण आज त्यातल्या एका गाण्याबद्दल आणि ते ज्या चित्रपटातलं आहे त्याबद्दल. हे गाणं आहे 'अनुपमा' मधलं - कुछ दिलने कहां, कुछभी नही, ऐसीभी बाते होती है....

गाण्याच्या सुरुवातीची पक्ष्यांची किलबिल अगदी एखाद्या दाट जंगलात घेऊन जाणारी. सकाळची प्रसन्न वेळ. उंच उंच झाडाचं जंगल. त्यातून जाणाऱ्या प्रशस्त रस्त्यावरून फिरणारी साडी नेसलेली नायिका. आपल्याच तालात, केसांशी, पदराशी चाळा करत ती चाललेय. आपल्याकडे कोणीतरी पहातंय हेही तिला जाणवत नाहीये. कसलीही गडबड नाही, कुठे जायची घाई नाही. गोयकरांच्या भाषेत सांगायचं तर अगदी सुशेगाद काम. सकाळी डोळे उघडले की घड्याळ्याच्या काट्यावर धावून कंटाळलेल्या आपल्या मनाला तिच्या शांत आयुष्याची भुरळ पडते. वाटतं हीच का ती अनुपमा? इतकं सुखी आयुष्य मिळवायला मागच्या जन्मी हिने काय पुण्य केलं असेल? आधी हे गाणं ऐकून आणि नंतर पाहून चित्रपटाच्या कथेबद्दल खूप उत्सुकता होती. मग एके दिवशी चित्रपट पाहायचा योग आला.

कथा साधीशीच. ह्या गाण्यात दिसणारी कथेची नायिका उमा. ‘दिसतं तसं नसतं' ह्या दुनियेच्या न्यायानुसार तिचं आयुष्य वाटतं तितकं आनंदी नाही. तिला जन्म देऊन तिची आई देवाघरी गेल्यामुळे वडील मोहन लहानपणापासूनच तिचा रागराग करतात. फक्त जेव्हा ते दारू पितात तेव्हाच नशेत असताना भूतकाळ विसरून तिच्याशी माणसासारखं वागतात. घरची श्रीमंती त्यामुळे उमाला रूढार्थाने काहीही कमी नाहीये. पण तिला लहानपणापासून वाढवणारी सरला (चित्रपटाचा सुरुवातीचा थोडा भाग चुकल्याने ही दाई का नोकराणी ते मला कळलं नाही) आणि मैत्रीण अनिता उर्फ अ‍ॅनी सोडली तर तिच्याशी प्रेमाने वागणारं कोणी नाही. म्हणून उमा introvert, लाजरी, बाहेरच्या जगात फारसं मिसळू न शकणारी अशी झालेय. मोहनच्या अतिमद्यपानामुळे त्यांची प्रकृती ढासळते आणि डॉक्टर एखाद्या हिलस्टेशनवर हवापालट करायला जायचा सल्ला देतात (तेव्हाच्या काळात AA नसावं. दारू सोडवायचे प्रयत्न करायचे सोडून हिलस्टेशनवर जायचा सल्ला देणं म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असला प्रकार). तिथे येतो अरुण जो मोहनच्या एका मित्राचा मुलगा असतो. त्याचं शिक्षण आता पूर्ण झालंय (तेव्हाच्या काळी लोक विलायतेत शिक्षण घेऊन रीतसर मायदेशी परत वगैरे येत असत!). मोहन त्याचं आणि उमाचं लग्न ठरवतात. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. अरुणसोबत त्याचा मित्र अशोकसुध्दा आलेला असतो. लेखक असलेला हा अशोक उमाकडे आकर्षित होतो. आता उमाला ठरवायचं असतं की वडिलांच्या इच्छेनुसार अरुणशी लग्न करायचं का आपल्या मनाचा कौल मानून अशोकला आपलं म्हणायचं......

पात्रांची निवड जवळपास अचूक म्हणावी अशीच. अशोक म्हणजे धर्मेंद्र दोन शब्दांत सांगायचं तर एकदम Husband Material. एखादीने त्याला आईवडिलांकडे नेलं तर ते पत्रिका वगैरे जुळवायच्या भानगडीत न पडता जवळात जवळचा मुहूर्त बघून लग्न उरकून टाकायच्या घाईला लागतील इतका सालस, नम्र, सद्गुणी वगैरे. हां, आता हिंदी चित्रपटांच्या पुरातन परंपरेला जागून घरची गरिबी आहे आणि घरात विधवा आई आणि लहान बहिण आहेत. पण आई ललिता पवार नसून दुर्गा खोटे असल्याने आपण प्रेक्षक म्हणून निर्धास्त. कारण दुर्गा खोटे म्हणजे प्रत्येक स्त्रीने अगदी सिध्दिविनायकाला नवस करून मागून घ्यावी अशी प्रेमळ सासू. एका प्रसंगात उमा सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवायला लाजते आहे हे लक्षात येताच त्या स्वत: तिच्याबरोबर दुसर्या खोलीत जाऊन जेवतात. मला तर बाई अगदी भरून आलं. जन्मोजन्मी चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करण्याऐवजी भारतीय बायकांनी जन्मोजन्मी अशी प्रेमळ सासू मिळावी म्हणून एखादं व्रत करावं असं माझं ठाम मत आहे. अनिता उर्फ अ‍ॅनीच्या भूमिकेत शशिकलेला पाहून माझ्या पोटात धडकी भरली होती. म्हटलं आता ही बया धर्मेंद्रच्या मागे हात धुवून लागणार आणि शर्मिलाचं आणि आपलं लाईफ बरबाद करणार (‘या दिलकी सुनो’ गाण्यात तिला अंधारातून धर्मेंद्रकडे टक लावून बघताना पाहून तर अनेक वर्षं माझी खात्रीच झाली होती). पण तिला देवेन वर्माच्या म्हणजे अरुणच्या प्रेमात पडलेलं पाहून माझा जीव भांड्यात पडला. बाकी देवेन वर्मा तरुणपणी छान दिसायचा. ब्रह्मा भारद्वाज (अनिताचे वडील), डेव्हिड (डॉक्टर मोझेस) आणि दुलारी (दाई सरला) हे आपापल्या रोलमध्ये फिट्ट.

पण शर्मिला टागोर मात्र उमाच्या भूमिकेत माझ्या अगदी डोक्यात गेली. उमाचा बुजरेपणा पार नाटकी वाटावा इतपत तिने ओव्हरअ‍ॅक्टिंग केलीय. कधीकधी तर तिला गदागदा हलवून 'अग बाई, बोल काहीतरी' असं ओरडावं असं मला कितीदा तरी वाटलंय. आणि तरुण बोसला हे कोणीही सांगितलेलं नाहीये की ह्या चित्रपटात त्याला व्हिलनची नाही तर थोडी निगेटिव्ह शेड असलेल्या नायिकेच्या वडिलांची भूमिका करायची आहे. अथपासून इतिपर्यंत तो अत्यंत खलनायकी एक्स्प्रेशन चेहेर्यावर घेऊन वावरलाय. ‘धीरे धीरे मचल' ह्या गाण्यात तर स्वत:च्याच बायकोकडे तो अश्या काही नजरेने पाहतो की ते गाणं प्रथम पाहिलं तेव्हा तो एखाद्या पार्टीत दुसर्याच कोणाच्या बायकोकडे बघतोय अशी माझी समजूत झाली होती. एका प्रसंगात तो धर्मेंद्रच्या घरून शर्मिलाला न्यायला येतो तेव्हा स्वत:च्या मुलीला घरी घेऊन जायला नाही तर तिला किडनॅप करून ओलीस धरून ठेवायला नेतोय असंच वाटतं.

चित्रपटातली सगळी गाणी मात्र भारी सुरेख आहेत. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेलं 'कुछ दिलने कहां' तर मस्त आहेच पण 'क्यो मुझे इतनी ख़ुशी दे दी' आणि 'धीरे धीरे मचल' सुध्दा श्रवणीय आहेत. ‘भीगी भीगी फझा' ऐकून तर मला दर वेळी नुकतंच पिकनिकला जाऊन आल्यासारखं फ्रेश वाटतं. ‘या दिलकी सुनो' खरं तर दर्दभरं आहे पण ते ऐकून मला कधीच दु:खी वाटलेलं नाही. उलट मन शांत नसेल तर ते ऐकून खूप शांत वाटतं हा अनुभव आहे खरा. चित्रपटात हे गाणं एका पार्टीत म्हटलं गेलंय. तेव्हा शशिकला वातावरणनिर्मितीसाठी म्हणून लाईटस मंद करते. त्यामुळे ते पहायला आणि ऐकायला फार छान वाटतं.

थोडक्यात काय तर थोडी रडकी असली तरी अनुपमाची ही कथा पाहण्याजोगी आहे. अरे हो, पण अनुपमा कोण ते मी सांगितलंच नाही की तुम्हाला. आणि सांगणारही नाही. त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. कधी पाहताय?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेखमाला चाललीए स्वप्ना.. मी नाही बघीतला हा चित्रपट पण गाणी मात्र ऐकलीए.. आता वेळ काढून पाहावा लागेल..

देवर चित्रपट म्हणजे आताचा परदेस का.. श्टोरी किंचीत मिळती जुळती आहे म्हणुन म्हटल..

सगळे सिनेमे वेष्टण बदलून पुन्हा पुन्हा येत राहतात.
कथा तिच, चेहरे, गाणी आणि ग्लॅमर नवे.
चितचोर = मै प्रेम की दिवानी हूं
जब जब फुल खिले = राजा हिंदुस्थानी

देवर चित्रपट म्हणजे आताचा परदेस का.. श्टोरी किंचीत मिळती जुळती आहे म्हणुन म्हटल>>

नाही देवरची कथा एकदमच वेगळी आहे. आणि त्यातली पात्रे ग्रे शेड्स असलेली आहेत (देवेन वर्मा, शशिकला आणि काही प्रमाणात शर्मिला आणि धर्मेंद्रसुद्धा). अनपढ धर्मेंद्रचं शिकलेल्या मॉडर्न शशिकलाबरोबर लग्न होतं, मध्यस्थ तिचा गैरसमज करून देतो. पण खरी परिस्थिती कळल्यावर ती संतापाच्या भरात त्याची तुलना त्याच्या शिकलेल्या मॉडर्न भावाबरोबर, देवेन वर्माबरोबर करते आणि त्याच्या जवळ यायला नकार देते तेव्हा धर्मेंद्र तिला मारहाण करतो. ती माहेरी निघून जाते तर तिची इच्छा नसतानाही तिची भाभी शर्मिला तिला धर्मेंद्रकडे परत यायची सक्ती करते कारण तिच्या मते लग्न झाल्यावर पत्नीने पतीबरोबरच राहिलं पाहिजे आणि जे आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. संपूर्ण चित्रपटात मला शशिकलाविषयीच सहानुभूती वाटत राहिली. शेवटी काही अनपेक्षित वळणेही आहेत कथेला.

संपूर्ण चित्रपटात मला शशिकलाविषयीच सहानुभूती वाटत राहिली. >>>>
मलाही... तिचा काहीएक दोष नसताना ती फसवली जाते. पण धर्मेंद्रचाही तिच्याशी फसवून लग्न करण्याचा इरादा नसतो. तो मारहाण करतो ते दारूच्या नशेत. त्याबद्दल तो सासरी जाऊन सासर्याचे पाय धरून माफी मागतो. चित्रपट पाहताना सतत नियतिच्या विचित्र खेळाचे आश्चर्य व खेद वाटत राहतो. आधी ठरवल्याप्रमाणे देवेन-शशिकला व धर्मेंद्र-शर्मिला जोडी जुळली असती तर सगळेच सुखात राहिले असते. पण नियती कुठून असे घडायला देणार? शशिकला शेवटी धर्मेंद्रला स्वीकारते तरीही तिच्यासारख्या साहित्याची आवड असलेल्या स्त्रीला साहित्याचा स सुद्धा माहीत नसलेल्याबरोबर मांडलेला संसार गोड मानून घ्यावा लागतो तर शर्मिलाच्या नशिबी वैधव्य येते. तरुण बोस शर्मिलाला देवेनबाबतचे सत्य सांगतो असे वाटते, ज्यामुळे ती कोर्टात जबानी बदलते. यु ट्यूबवर तो प्रसंग कापलाय.

ती माहेरी निघून जाते तर तिची इच्छा नसतानाही तिची भाभी शर्मिला तिला धर्मेंद्रकडे परत यायची सक्ती करते कारण तिच्या मते लग्न झाल्यावर पत्नीने पतीबरोबरच राहिलं पाहिजे आणि जे आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे.>>>>>
त्यावेळच्या समाजाचेच ते मत होते, खुद्द शशिकलाच्या आईचेही तेच मत असते. तिचे बाबा सोडता बाकी कुणालाही ती बरोबर आहे असे कुठे वाटते? आणि ह्या मतात आजही कुठे फारसा फरक पडलाय?

कुछ दिलने कहा अजून माझ्या मनात पिंगा घालते .... आमचे तारुण्य अशा लाजवाब गाण्यांनी घडवले..... सुंदर लिहिले आहे स्वप्ना जी!!!

सर्वांचे पुन्हा एकदा आभार! ह्या निमित्ताने ह्या जुन्या पिक्चर्सबाबत चर्चा होतेय हे फार छान आहे. देवर पहावा का अश्या विचारात होते पण एकूणात वरची चर्चा वाचून प्लान कॅन्सल Happy

स्वप्ना, उलट मी म्हणेन तू बघ. अनुपमात एकदम फ्लॅट फिलिंगस आहेत, रामायणासारख्या. कोण कसे आहे हे आधीच डिफाईन केलेय व पात्रे त्यापासून दूर जात नाहीत. देवरमध्ये प्रत्येकात ग्रे शेड्स आहेत, महाभारतासारख्या. कोणीच आदर्शवत वागत नाही, सामान्य माणूस जसे वागेल तसेच प्रत्येक पात्र वागते.

देवर शक्य झालं तर जरूर बघा. वरती साधना यांनी म्हटल्याप्रमाणे अनुपमातील पात्रे goody goody आहेत. देवरची जास्त खरीखुरी वाटतात.

साधना, चीकू.....फार ड्रामा असलेले चित्रपट नाही पहावत माझ्याच्याने Sad दक्षिणा गो फॉर इट....:-)

Pages