अक्षयपात्र

Submitted by विद्या भुतकर on 22 January, 2018 - 00:35

मी कॉलेजमध्ये असताना मावशीचं घरंही जवळच होतं. महिना-पंधरा दिवसांतून मावशीकडे जायचे. एकतर एरवी मेसमधलं जेवण असायचं आणि मावशीचं जेवण असंही खासच. त्यामुळे तिथे गेलं की मेजवानीच व्हायची. खरं सांगायचं तर अनेकवेळा असंही व्हायचं की मी दुपार मावशीकडे पोचले आहे. तोवर त्यांचं सर्व जेवण उरकून, भांडी आवरून झालीत आणि आता वामकुक्षीची वेळ झालीय. मी पोचले की मावशी दुपारच्या जेवणातलं छोट्या छोट्या वाट्यात काढून ठेवलेलं वाढून द्यायची. नेहमी वाटायचं, इतकंसं कसं पुरेल मला, पोट भरेल का? पण असं कधीच झालं नाही की मी गेलेय आणि अर्धवट पोट भरलंय. उलट चार घास जास्तच जायचे. काही नसलं तरी पटकन एक भाकरी, पिठलं का होईना करुन द्यायचीच. भाकरी करुन झाल्यावर त्याच तव्यात तिने परतलेल्या, मीठ लावलेल्या हिरव्या मिरच्याही भारी लागायच्या. चहा, साबुदाण्याची खिचडी तर खासच.

नंतर कधी त्या दिवसांचा विचार केला की वाटतं मावशीकडे 'अक्षयपात्रच' असावं, येणाऱ्या माणसाचं मनसोक्त पोट भरवणारं. आणि असंच काही लोकांकडे गेल्यावरही वाटलं आहे. सहज म्हणून जावं आणि भरभरुन गप्पा आणि साधी खिचडी का होईना त्यांनी करुन खाऊ घालावी आणि पॉट, मन दोन्ही भरुन जावं. अक्षयपात्रच ते, नाही का? महाभारतातली ती अक्षयपात्राची गोष्ट काही कारणामुळे मनात राहिली नेहमीच. घरी आई नेहमी म्हणायची रिकामं भांडं ठेवू नकोस, चपातीच्या डब्यात एक कणभर का होईना भाकरीचा, चपातीचा तुकडा अजूनही ठेवतेच. भाताचा डबा तसाच ठेवत नाही, चमचाभर का होईना खाऊन ठेवते, का तर अख्खा डबा तसाच ठेवायचा नाही. मला ते जमत नाही. मुळात पोळ्यांचा डब्याच नाही आणि शिल्लक राहतील इतक्या पोळ्या करतही नाही. भात केला तरी कमी. तरीही त्या वेळच्या रीती डोक्यात इतक्या बसलेल्या असतात की आपण पाळल्या नाहीत तरी मनात येतातच.

अमेरिकेतल्या थंडीमुळे किंवा राहणीमानामुळे हळूहळू हेही शिकले की सर्व सामान एकत्रच आणलं जातं, दररोज कुणी 'खाली जाऊन हे घेऊन ये रे' असं करु शकत नाही. किंवा शेजारी जाऊन मीठ-साखर घेऊन येऊ शकतो असा शेजारी नेहमीच मिळतो असंही नाही. अशा वेळी महत्वाच्या वस्तू जरा जास्तच ठेवायच्या घरात. उदा: कांदे, लसूण, बटाटे, डाळ, कणिक इ. घरात कुठलीही भाजी नसली तरी निदान बटाट्याची भाजी किंवा, उसळ किंवा वरण तरी करताच येतं. जिरे-मोहरीही संपत आलं तरी मोठया डब्यात चार दाणे ठेवूनच मग उरलेलं संपवायचं. कारण ऐनवेळी ते मागे राहिलेले चार दाणेच कामात येतात. अशा छोट्या छोट्या वस्तू, त्या पुन्हा भरल्या जाईपर्यंत पुरवून वापरण्याची वृत्ती हे सर्व शिकले, हळूहळू. हे सर्व करणं म्हणजे माझ्यापरीने ते 'अक्षयपात्रात' कणभर शिल्लक ठेवणंच असतं, असं मला वाटतं.

मुलं झाल्यावर मात्र अजून एक गोष्ट शिकले. कणिक मळली तरी दोन गोळे जास्तच मळायची, भात थोडा राहिला तर संपवून न टाकता फ्रिजमध्ये ठेवायचा, तीच गोस्ट वरणाचीही. का हा बदल, तर अनेकदा असं व्हायचं की बाहेरुन आलेय आणि मुलांना प्रचंड भूक लागली आहे. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत त्यांना धीर धरवत नाही आणि तोवर त्यांनी काहीतरी चरावं असं मला आवडत नाही. म्हणून मग हे असे छोटे छोटे डबे फ्रिजमध्ये असतात. पटकन एक पोळी लाटून दिली, वरण-भात दिला तर ती वेळ निभावून जाते. शिल्लक असेल तर कधी कुणी आलं तरी पटकन वाढता येतं. अनेकदा सासूबाई म्हणायच्या,"भांडं रिकामं करुन टाका, उगाच ठेवू नका". आणि मी मात्र,"असू दे, लागेल" म्हणून मुद्दाम ठेवून घ्यायचे. अगदी पोळ्या करायला येणाऱ्या मावशींनाही एखादी जास्तच करायला सांगायचे, म्हणजे पटकन पोळी-जॅम सारखं काहीतरी देता येतं.

याच नाण्याची दुसरी बाजू अशी की उगाच दोन घास ठेवले की वाया जातात, त्यापेक्षा संपवून टाकायचं, उगाच ठेवायचं नाही. कुणी आलं तर पटकन करता येईल. उगाच जास्त आणायचं नाही, लागेल तसं आणता येईल. करतानाही जेव्हढं लागेल तितकं, मोजकंच करायचं, म्हणजे पुढच्या जेवणात ताजं बनवता येतं, शिळं खायची गरज नाही. ती बाजू चूक आहे असं मी म्हणत नाही पण मला जमत नाही. भारतात आजकाल घरी कामाला मावशी येतात, मोजकंच करुन घेतलं जातं. इथे तर स्वतःच करावं लागतं. कुणी आल्यावर किंवा येणार असतील तर ते आधीच माहित असावं लागतं. तेव्हा वाटलं, खरंच या अक्षयपात्राची गरज आहे. पाहुणा आल्यावर पटकन 'चहा का होईना घ्याच' असा आग्रह करण्याची, 'जेवूनच जा' म्हणून आग्रह करण्याची, कुणी जेवायला आलंच असेल तर पोटभर जेवण जेवल्याचं समाधान त्या पाहुण्याच्या चेहऱ्यावर असण्याची गरज वाटू लागली आहे. ते समाधान, तेच आपलं अक्षयपात्र नाही का?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच नाण्याची दुसरी बाजू अशी की उगाच दोन घास ठेवले की वाया जातात, त्यापेक्षा संपवून टाकायचं, उगाच ठेवायचं नाही.
>>> याच प्रमुख कारणामुळे भारतीयांमध्ये फॅट वाढत आहे.

खूप शीळे खाण्याने वात वाढतो म्हणतात...आता अमेरीकेत काय तर भारतामध्ये पन आधी फोन केल्य शीवाय कोणीही घरी येत नाही आणि शीळे तर वाढले जात च नाही...