मेहमूद: Berkeley मधला काबुलीवाला

Submitted by स्टोरीटेलर on 10 January, 2018 - 05:00

60604 (1).jpg

बहुदा चार वर्षापूर्वी, एका संध्याकाळी भाजी घेऊन परत घरी येत असताना, अचानक आवाज आला," Hello There! You Indian?" बर्कली मध्ये रस्त्यावर येता जाता, लोक भेटून बोलतात पण असले प्रश्न विचारत नाहीत. मी आजूबाजूला बघितलं. रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची व्हॅन, फुटपाथ /sidewalk वर उंच, दोन अडीच फुटी मोठ्या काळ्या प्लास्टिकच्या फुलदाण्यांमध्ये फुलं, पण मला प्रश्न विचारणारा माणूस काही दिसत नव्हता. फुलं विकणारा फूलवाला सुद्धा दिसत नव्हता. चारही दिशांकडे बघत, मी स्वतःभोवती एकदा गोल फिरले. पुन्हा पुढे मागे बघितलं आणि चालायला लागले. "Scared you, didn't I ?" असं म्हणत दोन गाड्या सोडून एक खूप जुनाट, हिरवट-तपकिरी, म्हणजे पत्रा गंजून तपकिरी होतो तसा काहीसा तपकिरी हिरवट रंगाच्या सीडॅन मधून, फूलवालाच बाहेर पडला.
भाजी आणायला जाताना मी त्याला बरेचदा बघितलं होतं, एखाद दुसऱ्या वेळेला आम्ही एकमेकांकडे बघून हसलो पण होतो, पण बोललो नव्हतो. मी कधी त्याच्याकडून फुलं विकत घेतली नव्हती.

माझ्याकडे चालत येऊन तो माझ्यासमोर उभा राहिला, हात पुढे करून म्हणाला, "Hi ! I am Mehmood." त्याचा हात मी हातात घेतला, तो खूप भेगाळलेला आणि खरखरीत होता. मी पण पटकन माझं नाव सांगितलं आणि हात सोडवून घेतला. ह्या मेहमूदला, त्याच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांना मिठी मारून, हसत खेळत बोलत असताना मी पाहिलं होतं म्हणून त्याची भीती बीती वाटली नाही. मी त्याच्याकडे बघत होते तसं त्याचं ही निरीक्षण चालू होतंच. "What ? Not going to scold me for scaring you?" त्यानेच पुन्हा विषय काढला. मी मान हलवली, तर आश्चर्याने म्हणाला, "What ? even with this face?" त्याच्या चेहऱ्यात भीती वाटण्यासारखं काहीच नव्हतं. खूप वर्ष उन्हात रापून चेहरा सुरकुततो तसा काहीसा पण तरीही चैतन्याची एक वेगळीच झाक मेहमूदच्या चेहऱ्यावर होती. त्याच्या गालावर एक मोठी चामखीळ होती, संध्याकाळ झाली होती तरी डोक्यावर टोपी आणि जाड विणीचा स्वेटर, बेल्ट लाऊन घातलेली सैलसर जीन्स त्याची किडकिडीत शरीरयष्टी काही लपवू शकत नव्हती.
मी हसले आणि म्हणाले, "No, not scared. You have a charming way of meeting people.."

मेहमूद खळखळून हसला - पण कदाचित माझ्या विनोदाला नाही, त्या वाक्यात दडलेल्या सूक्ष्म निरीक्षणाला त्याने दिलेली दाद असावी ती. त्याने न सांगता त्याचा नाती शोधण्याचा, एकटेपणा घालवायचा प्रयत्न, त्याच्या "What ? not going to scold me for scaring you? even with this face?" ह्या प्रश्नांमधून माझ्यावर आदळला आणि मी दिलेली उत्तरं त्याला भावली. जणू ह्या तीन चार वाक्यात त्याने मला मैत्र करार देऊन टाकला.
"Where is your black bead and gold necklace?" ह्याला बरं मंगळसूत्र वगैरे माहित. मी परत मान हलवली.
"I see, I am going to have to do most of the talking. Tell me yes or no , you are married, yes ?"
बापरे ! मनात आलं की ह्याच्या बद्दलचं reading चुकलंय - हा काय flirt करतोय की काय?
" Yes, married for 5 years now." मी ठसक्यात उत्तर दिलं.
" That's great Honey! So you must cook, look at all these veggies- of course you cook ! "
मी त्याच्याकडे बघत राहिले, पुढे आता हा स्वतःच घरी जेवायला येण्याचं आमंत्रण लावून घेणार असं वाटलं..
पण मेहमूद त्याच्याच तंद्रीत होता, "I miss that spinach and cheese thing you make. What do you call it?"
"Palak Paneer."
" I owned a restaurant once..the chef he had learnt it.."
" Oh, I can share some recipes and there are good Indian restaurants in Berkeley.."
" I know honey, I know..but the taste of home, it's different no? Anyway, I don't want to take too much of your time. Otherwise, I will have your husband come running with a stick..I don't want that, now do I ?" असं म्हणून तो माझ्याकडे पाठ फिरवून त्याच्या फुलदाण्या हलवायला लागला. कुणी फुलं घ्यायला आलं नव्हतं. अजून एखादा तास तरी तो फुलं विकत तिथे उभा राहणार होता.
"Hi I am Mehmood" पासून मला 'honey' म्हणून, कुठल्यातरी दूरदेशाचा उल्लेख करून, एकदम घुमा झालेला मेहमूद; एखाद्या अनोळखी व्यक्तीबाबत पहिल्या भेटीत एवढे चढ-उतार फार क्वचितच घडतात. त्याला अजून फार बोलायचं नव्हतं, पण माझा पाय तिथून निघेना.
" Where are you from Mehmood?"
"Khayyam, Hafez, Siraj, look them up on the map. That's where this ugly duck comes from.." मेहमूद काही माझ्याकडे वळला नाही. पण तो त्या फुलांच्या फुलदाण्या, रस्त्याच्या शेजारच्या पांढऱ्या van मध्ये भरायला लागला.

ह्या आमच्या पहिल्या भेटीनंतर मी पण काही लगेच पालक पनीर वगैरे करून त्याच्यासाठी घेऊन गेले नाही. त्याच्याकडून फुलं विकत घ्यायला लागले नाही. पण आता मेहमूद मला येता जाता, " Hi Honey, Have a nice day!" वगैरे म्हणायला लागला..दोन तीन महिन्यांनी मी पालक पनीर केल्यावर त्याला डब्यात जीरा राईस, फुलके आणि पालक पनीर नेऊन दिलं. डबा देताना माझ्याबरोबर निकीत होता, त्यांची ओळख झाली. निकीतला भेटून मेहमूद मला म्हणाला, "You are a lucky woman!"
निकीत त्याच्याबरोबर हसून म्हणाला, "Wrong thing to say man, I mean , if you want to eat more of her food!" दोघंही एकमेकांकडे बघून हसली.

ते डबे परत करत असताना, मेहमूदने त्यामध्ये सुकामेवा भरून दिला होता. मी आणि निकीत त्याला सांगत होतो की तू आम्हाला फुलं दे पण तो म्हणाला,नाही, मी ठरवलंय की तुम्हाला सुकामेवा द्यायचा, त्यामुळे तुम्ही तो घेतलाच पाहिजे. तीन डबे त्याने काठोकाठ भरले नव्हते, पण तरीही खूपच भरले होते. त्याच्या उदारपणाचं ओझं वाटलं असतं पण आम्हाला ते तीन डबे देत असताना त्याच्या चेहऱ्यावर जो अभिमान झळकत होता तो पाहून- मी त्याला डबा द्यायच्या आधी दोन महिने वाया घालवले त्याची खंत वाटली.
मग घरी बनणाऱ्या अनेक गोष्टी डब्यातून त्याच्याकडे जायला लागल्या. उसळी, आमटी, भडंग, बेसनाचा लाडू, दाण्याची चटणी, भारतातून आलेली ताजी बाकरवडी, आंबा बर्फी, गुडदाणी. बदल्यात नेहमी वेगवेगळ्या रंगाची, वासाची बाग आमच्या दिवाणखान्यात सजायची.
कधीतरी निकीतने वेगळ्या दुकानातून फुलं विकत घेतल्याचं मेहमूदने पाहिलं तर तो चिडलाच! निकीतला म्हणाला, "Don't you dare buy that cheap stuff again!" मग निकीतने त्याला 'official florist' ही पदवी बहाल केली. त्याला आवडलं नाही, म्हणाला, "You buy after every three full moons- official florist,my foot!" पण तरीही त्यांची गट्टी जमली.

कधी आम्ही दोघं एकत्र जाताना दिसलो तरी मेहमूद हाका मारून बोलवी. निकीत आणि तो काहीतरी माझी टिंगल करत आणि मगच भेटीचं समाधान मेहमूदला मिळे. पुण्यात कसं भाजीवाला, वाणी, इस्त्रीवाला आपल्या घरातलेच असतात. आपल्या घरात कुठली पालेभाजी आवडते, एखादी खास भाजी आपल्यासाठीच मागवली जाते, सामानात काय येतं, साड्या इस्त्रीला आल्या नाहीत तर घरी येऊन विचारपूस होते..त्याच्यामध्ये ओळख आहे, एक त्या communityचा भाग असल्याचा भाबडा समज आहे. तो इथे अमेरिकेत नाहीये. म्हणजे मी तो बर्कलीमध्ये राहायच्या आधी अनुभवला नव्हता. पण मेहमूदमुळे माझ्यासाठी अचानक हे शहर आपलंसं झालं. पण त्याने सोडलेलं, त्याचं ते आपलंसं शहर,देश, त्याबद्दल तो कधीच बोलला नाही.

इराच्या जन्मानंतर काही महिने हे मेहमूद बरोबरचं हसणं-बोलणं बंदच पडलं. २-३ महिन्याची असताना मेहमूदने तिला एकदाच उचलून घेतलं होतं, पण तिला ते आवडलं नाही, ती खूप रडली. तिच्या रडण्याला न जुमानता, मेहमूद म्हणाला, " Sweety, you will have to learn to like me. I am not going anywhere."
माझ्या पहिल्या mothers day ला भला मोठा गुच्छ देऊन, दोन दिवस आधीच मेहमूद ने मला शुभेच्छा दिल्या, "Its the toughest thing you will ever do. But I haven't received a box in well over a year now!" Pregnancy आणि इराच्या जन्मानंतर जवळ जवळ वर्षभर खरच मी त्याला विसरूनच गेले होते. आणि इराला त्याच्या दुकानाजवळ घेऊन गेलं की ती त्याचा आवाज ऐकला, त्याला पाहिलं की जोरात रडायला लागायची. मग इरा साधारण दीड वर्षाची झाली आणि त्यांचं गणित बदललं. मेहमूद तिला त्याच्याकडच्या मनुका, भुईमुगाच्या शेंगा, खारे दाणे द्यायला लागला. तिला वेगवेगळ्या पक्षांची साद कशी असते ते आवाज काढून दाखवायचा. आता त्याचं लक्ष फक्त इरा असे, मला जुजबी , काय? कशी आहेस? एवढंच विचारे. पण इरा बोलते का, चालायला लागली का? अशी विचारपूस सुरु झाली. मेव्याचं रुपांतर फुलं देण्यात कधी झालं कळलंच नाही.

आता इराच्या शाळेच्या मार्गावर मेहमूदचं फुलांचे दुकान आहे. शाळेतून परत येताना तो भेटला नाही, त्याच्याकडून हक्काने फुल मागून घेतलं नाही तर इरा अस्वस्थ होते..." मेहमूद कुठे असेल?" ,
" तो कुठे राहतो ?" ,
" त्याने दुकान का नाही उघडलं ?" ,
" त्याची पाठ का दुखते ?",
" त्याचे डॉक्टर कुठे आहेत ?",
" त्याची आई कुठे आहे ?",
" त्याच्याकडे घरी अप्पू, बनी, हत्ती , ball pit आहे का ?"
तिच्या प्रश्नांनी मला ही अस्वस्थ करून टाकते.

आमच्या चार वर्षाच्या मैत्रीत, मेहमूद बद्दल असले खूप प्रशन अनुत्तरीतच आहेत. मेहमूद अजून आमच्या घरी कधीही आलेला नाही, त्याचा पत्ता आम्हाला माहित नाही. गेल्या वर्षभरात त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे तो कधी दुकान उघडतो, कधी आठवडा- आठवडा गायब असतो. फुलांसारख्या नाशवंत वस्तूंचा व्यापार करून, तो काय असा नफा कमवत असणार आहे? आणि त्या उपर त्याचा उदार स्वभाव ! काही काही वेळा वाटतं , मेहमूद फक्त त्याची माणसांची गरज भागावण्यासाठी फुलं विकतो. लोकांच्या सुख दुखात त्याला काय काय आठवत असावं; नवीन टवटवीत फुलं आणून त्याला हाजारो मैल लांब जगण्याची उमेद मिळत असावी, जुनी फुलं त्याला जे गेलं, नासून गेलं त्याची आठवण देत असेल,पण ते फक्त त्याच्या बद्दल घडत नाही , दिवस रात्र सृष्टीत फुलणं आणि कोमेजणं घडतच असतं, ह्याची सतत आठवण देत असेल.
मेहमूदचा चैतन्याचा झरा कुठून उगम पावतो? त्याची फुलं , त्याची जगण्याची उमेद, का त्याचं स्वतःला , इतर कुणाला पूर्वायुष्यात दिलेलं एखादं वचन...? माहित नाही. But he really has a charming way of meeting people! मला त्याचं भेटणं हे पूर्वीचे काही ऋणानुबंध आहेत असंच वाटतं. त्याच्या सारखी लोकं ज्यांना भेटतात, त्यांच्या मनावर ठसठशीत पाउलखुणा सोडून जातात...

रबिन्द्रनाथ टागोरांच्या "काबुलीवाला" कथेला प्रकाशित होऊन, २०१७ मध्ये १२५ वर्ष पूर्ण झाली. त्या कथेत अब्दुर रेहमान खुनाची शिक्षा म्हणून तुरुंगात जातो. मिनी मध्ये त्याला त्याची मुलगी दिसत असते..
मेहमूद तर त्याला भेटणाऱ्या प्रत्येकातच काहीतरी मागचं आणि काहीतरी आठवणीतलं शोधत असतो.. अमेरिकेने नुकत्याच केलेल्या ठरावामुळे, मेहमूदला आता त्याच्या देशात गेला तर अमेरिकेत परतता येईल ह्याची शाश्वती नाहीये...म्हणजे आधी त्याला खूप आस होती पण तो जात नव्हता, पण आता तर, हा देश का तो देश? अशी स्थिती निर्माण झाली आहे. मायदेशी गेला तर इथे वसवलेलं सगळं विसरावं लागणार आणि नाही गेला तर तिथे वसलेलं मनात तरळत राहणार.... इथली नाती घट्ट करायची तर मनाची दारं उघडी करावी लागणार, खोलात शिरावं लागणार आणि ते करायची त्याची तयारी होईल का ? मेहमूदला एक तरी पैलतीर भेटावा... किती आहे त्याच्याकडे जे नदीत वाहता वाहता वाहून जाईल...त्याच्यानंतर ते कुणाकडे जाईल?

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित:
http://amrutahardikar.blogspot.com/2018/01/berkley.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. जेवढे जास्त जग आणी माणसे पाहु तेवढा विचारांचा संकुचितपणा कमी होत जातो. फार छान लिहिले आहे

एक कथा म्हणून चांगला थॉट आहे. लिहायची शैलीही चांगली आहे. पण स्पष्ट सांगायचे तर रिलेट नाही झालं फारसं. म्हणजे असे होणारच नाही असे नाही म्हणायचंय पण अमेरिकेत जी टिपिकल देसी इमिग्रन्ट जनता पहाते ते लोक असे रस्त्यावरच्या फूलवाल्याशी इतके सलगी करणे फार अवघड आहे, किंवा असा एखादा दुकानदार असे मंगळसूत्र कुठेय वगैरे खाजगी प्रश्न विचारण्याची शक्यताही कमीच. विचारले तर इथल्या कल्चर च्या मानाने फारच खटकेल कोणालाही. पनीर-फुलक्यांचे चे डबे देणे वगैरे तर दूरच.
" your husband will come running with a stick" असे डायलॉग्ज पण मराठीचे शब्दशः भाषांतर केलेले वाटले .
असो. पु.ले.शु.

सगळ्यांनी लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
@ maitreyee -मेहमूद आणि त्याच्याबद्दलचे अनुभव, आमचे ऋणानुबंध Typical देसी नाहीत , म्हणूनच त्याबद्दल लिहावसं वाटलं! तुम्ही म्हणताय तसं शब्दशः मराठीचे अनुवादित संवाद वाटतात हे खरंय. मेहमूदची मातृभाषा फारसी आहे , तोडकं मोडकं इंग्रजी बोलतो .मी त्याचे संवाद तो non native English speaker आहे म्हणून कसं बोलतो तसे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सगळे प्रसंग खरे आहेत -पण रेकॉर्ड फक्त आठवणीत असल्यामुळे संवाद निर्मिती करावी लागली !

आवडली तुमची गोष्ट. मला स्वतःला परक्या लोकांशी बोलणं अजिबात जमत नाही. कपाळावरची आठी पार करून कुणीच आलंच बोलायला तर तुटक उत्तरानी माणूस गप पडतो. त्यामुळे असे ऋणानुबंध मला एकाच वेळी फॅसिनेटिन्ग आणि कल्पित अशा दोन्ही प्रकारातले वाटतात. असो, या ललितलेखाच्या निमित्तानं तुमचा ब्लॉग पण चाळला. 'वाडा' आणि भातुकलीच्या खेळाच्या शेवटी जो विचार मांडला आहे तो आवडला.

थोडा युजर फ्रेन्डली कराल का ब्लॉग? आधीच्या नोंदी शोधायला अवघड आहेत. आणि पोस्टींसोबत तुम्ही डकवलेली चित्र सुरेख साजेशी असली तरी पान लोड व्हायला , स्क्रोल करताना वेळ घेत आहेत. हा थीमचा प्रॉब्लेम असेल तर कल्पना नाही.

छान लिहिलं आहे. स्टोरी टेलिंग मस्त आहे म्हणणार होतो पण ते तर तुमच्या आयडीत गिव्हनच आहे Proud
तुम्ही वर्णन मस्त केलंच आहे पण काबुलीवाला चा रेफरंस आल्याने नेटफ्लिक्स वरच्या टागोर सिरियल मधला काबुलीवाला डोळ्यासमोर आला माझ्या.

सगळ्यांनी लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ! @ सिंडरेला - ब्लॉग युजर फ्रेंडली करायच्या मागे आहे , करतेच ! वाडा आणि भातुकली वाचल्याबद्दल Thank you ! @ अमितव netflix वरची टागोर ही सिरीज बघितलेली नाही - नक्की बघेन !

छान लिहिलंय.
लिहिण्याची सहज-सोपी शैलीही आवडली.

Pages