पन्हाळा ते विशाळगड

Submitted by सिम्बुक on 4 January, 2018 - 23:29

पन्हाळा ते विशाळगड

कोणत्या तरी ट्रेकिंग क्लबचे मेंबर होऊन चाकोरीतला निसर्ग पाहण्यापेक्षा थोडंसं वेगळ पाऊल टाकण्याची इच्छा होती. दत्ता इथापे आणि प्रसाद तेली हे जिवाभावाचे सवंगडी सोबतीला आले आणि पन्हाळगड जवळ केला. कोणतीही पूर्वतयारी न करता मिळेल ते साहित्य जमवून मित्रांकडून मागून आणलेले शूज, सॅक आणि मेसमधून घेतलेला दोन वेळचा डबा इतक्या अल्पशा सामग्रीवर आमच्या मोहिमेला सुरवात झाली होती, हे आठवून या झापटलेपणाची गंमत वाटली.
मिळेल ते वाहन घेऊन पन्हाळ्यावर पोहोचलो तेव्हा मात्र हिरमोड झाला; कारण इतिहासाच्या पानातून मनात ठसलेला पन्हाळा प्रत्यक्षात मात्र माणसांच्या गर्दीने जणू दाबून गेला होता. चणेफुटाने, शेंगा-कणसं आणि गडावरचे विविध पॉइंट दाखविण्यासाठी हुज्जत घालणारे रिक्षावाले. असे वातावरण पाहून उबग आला. एक इतिहासस्थळ दुर्गप्रेमी आणि इतिहासाप्रेमींपासून शेकडो कोस दूर गेलाय अस वाटून गेलं. पन्हाळ्याच ते ‘मिनी महाबळेश्वर’ पण डोळसपणे स्वीकारून आम्ही गडावर फिरलो. वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन पुढची वाटचाल सुरु झाली. पुढे चौकात दोन्ही हातात तलवारी घेतलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा पाहून नकळत त्यांचे बोल स्मरून गेले. “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” असे म्हणत घोडखिंड ज्यांनी खऱ्या अर्थाने पावन केली त्या नरवीराला मनापासून वंदन केले आणि सज्जकोठीवर पोहचलो. मकसूद आका नावाच्या इसमाने बांधलेली हि वास्तू. इथे शिवछत्रपती राहिले, छत्रपती संभाजी महाराज राहिले, इब्राहीम आदिलशहाने इथ्नुच कारभार पहिला. पन्हाळ्याचा बालेकिल्ला मानला जाणारा विशाल अंबरखाना, दारुगोळा, शिवतीर्थ तलाव, तबक उद्यान, राजवाडा, अंधारबाव आणि दुतोंडी बुरुज अस सार अनुभवलं. या वास्तू म्हणजे इतिहासाचे श्वास आहेत.
आमच्या सोबत कोणी गाईड नव्हता; ज्ञात असणाऱ्या इतिहासाच्या शिदोरीवर आमच भटकणं सुरु होत. ही भटकंती एक विमुक्त भटक्याप्रमाणे होती. तीला कोणतीच बंधन नव्हती, कोणते नियम नव्हते. ती स्वतंत्र आणि रानटी होती एखाद्या रानगव्यासारखी. रात्री पन्हाळ्याचा मुक्कामही चिरस्मरणीय ठरला. मुक्कामी एसटीत झोपण्यास परवानगी न मिळाल्याने आम्ही अंबाबाईच्या मंदिराच्या ओसरीवर पहुडलो. जोराच्या पावसाचा मारा आणि गोठणाऱ्या थंडीत झोप उडालीच. जागे झालो तेव्हा एका रम्य पहाटेने आमच स्वागत केल. धुक्यातच पुसाटी बुरुज गाठला. उजव्या बाजूने उतरून विशाळगडाच्या दिशेने प्रवास सुरु केला. आता खऱ्या ट्रेकला सुरवात झाली होती. आमच्याकडे नकाशा नव्हता. वाटेत भेटेल त्याला विचारात तुरकवाडी, म्हाळुंगे गावातून मसाईच्या पठारावर येवून पोहचलो. ते विस्तृत पठार आभाळागत पसरल होत.लाल मातीच्या कुशीतून हिरव्या लुसलुशीत गवताची शाल पसरली होती.पावसाळी वातावरणात सूर्याची सोनेरी किरणं नव्हती; मात्र वातावरणात लख्ख प्रकाश असल्यान त्यावरील दवबिंदू चकाकत होते. त्या पठारावर राजहळद, कोंबडा अशा फुलांची उधळण झाली होती. मसाईमातेच दर्शन घेऊन पठार उतरून कुंभारवाडीत उतरलो. चाफेवाडी, केळेवाडी अशी पायपीट सुरु झाली. एकीकडे ऊनपावसाचा खेळ सुरु होता. वाटेतले ओहोळ पाय भिजवीत होते. इरली घालून कामात व्यस्त असणारे गावकरी, त्या आडवाटेवर असणारी त्यांची घरे, हातात भाताची वाडगी आम्हाला कुतुहलाने न्याहाळणारी पोरं......सारं त्या निसर्गाशी एकरूप झालेलं. आम्हा शहरी ध्यानांचाच अपवाद होता.
अंधार पडू लागला आणि पाटेवाडीत मुक्काम करण्यचा सल्ला मिळाला. मात्र आम्हा तरुणाईला ते मानवणारं नव्हत. पांढरपाणी गाठण्याची ओढ होती. त्यामुळे धनगरवाड्याच जंगल आम्ही श्वास रोखून हातात काठी आणि टॉर्च घेऊन पार केल. अनेकदा दिशाभूल झाली, पुन्हा वाटेला मिळालो, असा रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवास चालू होता. अखेर पांढरपाणी गाठलेच. तिथे ना आमच्या मोबाइल ला रेंज ना एस ती डी. शेवटी एका घरात जाऊन, त्यांना विनंती करून , त्यांच्या मोबाइल वरून आमच्या घरी फोन केले व आम्ही सुखरुप आहोत याची बातमी पोहचवली. आता घराचे टेन्शन गेले. आता तशी जाम भूक लागली होती , सोबतचे डबे पण संपले होते. नशिबाने एक टपरी उघडी दिसली , मग काय, चहा - बिस्कीट वरच भूक शांत केली आणि जवळच असलेल्या मराठी शाळेच्या व्हरांड्यात पाऊस आणि डासांशी हितगुज करत रात्र घालवली. कालसारखीच आजची पहाट सुद्धा धुक्याने माखली होती, कुडकुडणाऱ्या थंडीतच पावन खिंड गाठली, नतमस्तक झालो. बाजीप्रभूंची हि पावन खिंड; शेकडो मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली. त्या चिट्ट थंडीत सुद्धा अंगावर काटे उभे राहिले.दिवस पावसाळ्याचे, पावनखिंड दुथडी भरून वाहत होती. त्या पवित्र जलात अंघोळ केली आणि गजापूर मार्गे विशाळगड गाठला.

आभाळ भेदणारे विशाळगडाचे सुळके पहिले आणि छातीत धस्स झालं. लगबगीने गडावर चढलो, बाजीप्रभू -फुलाजीप्रभू यांच्या समाध्या पहिल्या, तिथला दर्गा पहिला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेल्या छोट्या विक्रेत्यांच्या दुकानांमुळे विशाळगडाला जत्रेचे स्वरूप आले होते. ते पाहून उबग आला.मन खिन्न झालं.
असो , आता परतीचा प्रवास सुरु झाला. सगळी पायपीट संपली होती आणि घराची ओढ लागली होती. मागच्या दोन दिवसात पायात भिंगरी बांधून आम्ही अंदाजे ७०- ते ८० किलोमीटरचे अंतर पार केले होते.

विशाळगड उताराला, नशिबाने महाराष्ट्र शासनाची एस टी उभी दिसली, कराडच्या दिशेने प्रवास सुरु झाला. कपडे चिखलाने माखले होते, पायांची बोटे किरवजली होती, एकच समाधान होते कि आता घरी जाऊन शांत झोप मिळणार, मात्र पंढरपाण्यात घालवलेल्या त्या रात्रीची सर तिला येणार नव्हती. काटेवाडीत मागून घेतलेल्या चटणी आणि कांद्याची चव कायमच जिभेवर रेंगाळणार होती. लाल मातीने बरबटलेले कपडे धुतले जाणार होते;मात्र त्या ऐतिहासिक मातीचा गंध मनात तसाच दरवळत राहणार होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !

भटकंती एकदम स्वच्छंदी आणि लेखन ही एकदम आटोपशीर ! आवडले.
पण सर्व म्हणत आहेत त्याचप्रमाणे फोटो पाहिजे होते.

छान लेख. मस्त अनुभव.
सुधागड चा रात्रीचा ट्रेक करतानाच्या गमती आणि हरवलेली वाट सगळं आठवलं.
धन्यवाद. Happy