सायकलविषयी सर्व काही ९ (सायकली २०-३० हजार दरम्यानच्या) आणि काही आंतरराष्ट्रीय ब्रँड

Submitted by आशुचँप on 3 January, 2018 - 14:46

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
भाग ५
https://www.maayboli.com/node/64622
(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)
भाग ६
https://www.maayboli.com/node/64648
(सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?)
भाग ७
https://www.maayboli.com/node/64685
१० हजारच्या आतल्या सायकली
भाग ८
https://www.maayboli.com/node/64802
२० हजारच्या आतल्या सायकली
===================================================================

गेल्या भागात २० हजारच्या आतल्या सायकली बघितल्यानंतर आता आपण वळणार आहोत पुढच्या सेगमेंटकडे, तो म्हणजे २०,००० ते ३०,००० च्या सायकली. खरे सांगायचे तर आता वेगळा सेगमेंट असा धरणे योग्य नाही कारण या रेंजमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या बिगीनर सायकलींची सुरुवात होती आणि ती पुढे वाढत वाढत पार लाखांपर्यत जाते. आणि मग त्यात किंमतीपेक्षा तुमच्या स्पेसिफिक गरजांनुसार सायकल घेण्याचा कल जास्त असतो. म्हणजे, तुमची आवड लॉँग डिस्टन्स मल्टी डे एक्पिडीशन असेल तर त्या प्रकारातल्या सायकली घेतल्या जातात तर बीआरएम, ट्राएथलॉन, ऑफ रोडींग हे त्यांच्या गरजांनुसार सायकली घेतात.

तसेच या रेंजमध्ये ब्रँडचा असा फार मोठा इशु नसतो, कारण बहुतांशी सगळे ब्रँड कमी जास्त फरकाने सारखेच असतात. कंपनीची आफ्टर सेल्स सर्विस, डिलरशी रॅपो, डिस्काउंट देण्याची तयारी आणि फिचर्स यावर जास्त भर दिलेला आढळतो. जरी काही अव्वल ब्रँड जसे की बियांची, कॅननडेल, स्कॉट, श्वीन, मेरिडा, ट्रेक, जायंट यांना जास्त पसंती मिळत असली तरी बर्गेमॉंट, कोना, स्पेशलाईज्ड, फेल्ट यांचेही मार्केट वाढत चालले आहे.
असेही जेव्हा आपण मोठ्या स्केलवर या ब्रँडकडे पाहतो तेव्हा असे लक्षात येते की अनेकदा ताटातले वाटीत प्रकार आहे, किंवा काही ब्रँड गळ्यात गळे घालून असतात.

उदा. कॅननडेल, श्वीन, मंगूस आणि जीटी हे ब्रँड हे डोलेर इंडस्ट्रीज या कॅनडीयन कंपनीकडे आहेत. त्यांच्या पॅसिफिक सायकल या उपशाखेअंतर्गत त्यानी मोठ्या प्रमाणावर मार्केट कबजा केले आहेत. त्यांची उलाढाल लक्षात घेता केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातल्या सायकल मार्केटमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. प्रामुख्यांने त्यांच्या सायकली चीन आणि तैवानमध्ये तयार केल्या जातात.

आणि गंमत म्हणजे तैवानमध्ये ज्या किनेसीस (Kinesis) कंपनीकडे या सायकलींचे उत्पादन केले जाते तीच कंपनी डोलेर व्यतिरिक्त अन्य ब्रँडच्या सायकलींचे पण उत्पादन करते. त्यात येतात फेल्ट, के२, कोना, क्रोस, राल्फ आणि सगळ्यात प्रसिद्ध ब्रँड ट्रेक सुद्धा.

तर काही वेळा मोठे ब्रँड छोट्या ब्रँडना खाऊन टाकतात पण मार्केट शेअर जास्त ठेवायला त्याच ब्रँडने सायकली उत्पादन करतात. जसे मोटोरोलावर लिनोव्होची मालकी आहे पण फोन मोटो नावाने येतात आणि लोकं ते लिनोव्होशी कंपेअर करून घेतात, तोच प्रकार. त्यात एक मोठे उदाहरण म्हणजे स्पेशलाईज्डचे ४९ टक्के शेअर्स मेरिडाकडे आहेत. तर Bontrager ही ट्रेक कंपनीने विकतच घेतली आहे.

जायंटची तर अजून मज्जा. ही मूळची तैवानीज कंपनी १९७२ ला स्थापन झाली आणि १९८० पर्यंत ते श्वीन ब्रँडच्या सायकली तयार करत होते. आणि मग श्विनने त्यांचा करार संपवून चीनला आपला पसारा नेला. यावर जायंटने युरोपतल्या काही कंपन्यांशी संधान साधून जायंट युरोप या नावाने आपला ब्रँड बाजारात आणला. मुळचे उत्पादनातलेच असल्याने त्यांना कुणावर अवलंबून रहण्याची गरज नव्हती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी हलक्या, बळकट सायकली बाजारात आणल्या आणि बघता बघता मार्केट काबीज केले. आज ५० हून अधिक देशात त्यांचे १२ हजारपेक्षा जास्त रिटेलर्स आहेत.

भारतापुरता विचार करायचा झाला तर ट्रॅक अँट ट्रेल ही रिटेलर चेन अनेक शहरांमध्ये पसरलेली आहे. आणि त्यांच्याकडे भारतीय ब्रँडसोबत बियांची, जीटी, श्विन, कॅननडेल, मंगुस आणि रिडले असे ब्रँड उपलब्ध आहेत. मेरिडा, स्पेशलाईज्ड, जायंटची तर स्वताचीच रिटेल आउटलेट आहेत. पण मेरिडा सह स्कॉट, बर्गेमॉंट एकाच डिलरकडे गुण्यागोविंद्याने नांदत असतात. मोबाईल स्टोअरला जसा सॅमसंग, नोकिया मोटो ते ओप्पो मिळतो आणि नोकियाचे वेगळे रिटेल आउटलेट असते, पण नोकिया, सॅमसंगची एक्स्लुजीव आउटलेट देखिल असतात. तोच प्रकार.

मोठे ब्रँड सहजी उपलब्ध होतात आणि जरी तो दुकानात पहायला मिळाला नाही तरी हे सगळे ब्रँड त्यांच्या एकूण एक सायकलविषयी अत्यंत तपशीलवार तांत्रिक माहीती आंतरजालावर टाकत असतात. त्यात सायकलचे रंग, त्यांचे फ्रेम साईज, फ्रेमचे मटेरियल, फोर्क, फ्रंट आणि रिअर डिल्युलरस, ब्रेक, चेन, टायर, पॅडल, सॅडल पासून पार अगदी सिटपोस्ट, रिमबद्दलदेखील साद्यंत माहीहीती असते. त्यामुळे त्यांच्या फिचर्सची तुलना करून आपल्या शहरात ते स्पेसिफिक मॉडेल मिळते अथवा नाही याची माहीती काढणे आणि प्रत्यक्ष जाऊन आपल्याला सुटेबल वाटते का नाही याची खातरजमा करणे इतकेच काम उरते. बाकी ८० टक्के शंका गुगलच दुर करतो.

अर्थात ते थोडे गुंतागुंतीचे असते हे मान्य आहे कारण फ्रिव्हील चांगले का कॅसेट, ११-२८ चांगले का ११-३२, प्रायोरिटी फ्रेमला द्यावी का गियरींगला हे ठरवणे थोडे अवघड आहे. मी देखील काही यातला तज्ज्ञ नाही. केवळ मला थोडी आवड आहे आणि फावल्या वेळात काहीबाही वाचत राहतो, त्यात तांत्रिक माहीती असते, सायकलिस्टचे ब्लॉग असतात, सायकलचे रिव्ह्यू असतात, नव्या तंत्रज्ञानाबद्दलची बातमी असते. यातून मला जे काही थोडेफार समजले ते मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करतो.

माझा मुळीच दावा नाही की मी जे सांगतो ते ब्रम्हवाक्य आहे, उलट मला कुणी त्यात चूक दाखवल्यास मला आनंदच होईल. मी पुन्हा पुन्हा लिहीतो की ही मालिका इंटरअॅक्टिव व्हायला पाहिजे. नॉलेज शेअर झाले पाहिजे, उगाच त्याला सायकलच्या वर्गाचे स्वरुप यायला नको. असो.

पुरुष आणि महिला यांच्या सायकलीत काय फरक असतो

हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल, माझ्याही आला होता. अगदी ऑबव्हियस म्हणजे लेडीज सायकलला पुढचा दांडा नसतो. आणि याचे कारण म्हणजे पूर्वी साडी, स्कर्ट, युरोपातही झगे वगैरे घालून चालवल्या जात असत त्यामुळे तशी सोय करणे भागच होते. पण आजकाल पंजाबी ड्रेस, ट्रॅकपँट वापरत असल्याने अडचण नसते, आणि सिरियस सायकलपटू महिला तर सायकलींग शॉर्ट्सवर असतात. त्यामुळे आता पूर्वीइतके पुरुष आणि महिला सायकली फार वेगवेगळ्या नसल्या तरी काही किरकोळ फरत असतात.
महिलांचे पुरुषांच्या तुलनेत हात लांब नसतात, खांदे रुंद नसतात यामुळे महिला सायकलीचे हँडलबार थोडे आखूड असतात आणि थोडे आतल्या बाजूला असतात. महिलांच्या सिटबोनची रचनाही पुरुषांपेक्षा वेगळी असते त्यामुळे सायकलचे सिटदेखील त्यांना कँफर्टेबल होईल असा पद्धतीने बनवलेले असते.
जरी आता फ्रेममध्ये पुढचा दांडा असला तरी तो बराच खालच्या बाजूला असतो आणि या सायकली जितक्या शक्य तितक्या हलक्या, सुटसुटीत करण्याकडे ब्रँडचा कल असतो.

डिस्क ब्रेक का व्ही-ब्रेक्स
हा एक या सेगमेंटमधला कळीचा मुद्दा आहे. यापूर्वीच्या सेगमेंटमध्ये मी निक्षून विरोध केलेला डिस्क ब्रेक या सेगमेंटमध्ये नक्कीच प्रमोट करेन याचे कारण क्वालिटी. आंतरराष्ट्रीय ब्रँड त्यांची प्रतिमा जपायला क्वालिटीमध्ये फारशी तडजोड करत नाहीत त्यामुळे स्वस्तातल्या डिस्कब्रेकपेक्षा महागातले डिस्कब्रेक नक्कीच चांगले. अर्थात या सेगमेटमध्ये अजूनही दोन प्रकार आहेत.
पहिला आपला नेहमीचा व्ही-ब्रेक
याचे फायदे म्हणजे - सगळ्यात स्वस्त आणि बदलायला सोपा
तोटे म्हणजे - पावसात ब्रेक नीट लागत नाहीत, कुईकुई आवाज करतात आणि लाईफ कमी असते, ब्रेकशू बदलावे लागतात, रिमला काळे डाग पडतात. इ.इ
दुसरे म्हणजे कॅलिपर ब्रेक
जे सहसा रोड बाईक्समध्ये बघायला मिळतात. रोड बाईक्स जास्त वेगात जात असूनही त्यांना डिस्कब्रेक नसतात याचे कारण वजन. वजन टाळायला ते डिस्कपेक्षा कॅलिपर लावतात.
याचे फायदे - डिस्कपेक्षा स्वस्त आणि व्हि ब्रेकपेक्षा जास्त चांगले, इफेक्टिव्ह
तोटे - डिस्कपेक्षा कमी इफेक्टिव्ह
तिसरे डिस्क ब्रेक - सर्वात महाग पण एकदम रिलायबल, पावसात देखील. मेंटेनन्स कमी आणि लाईफ चांगले.
यामुळे यातले तुमच्या बजेट आणि प्रेफरन्स मध्ये काय बसते त्यानुसार विचार करा


आता काही सायकली

श्विन (Schwinn) - एक नावाजलेला ब्रँड आणि आमच्या सायकलींग ग्रुपात काहींनी वापरून अत्यंत चांगला फिडबॅक दिला आहे. श्विनवरून मामांनी नर्मदा परिक्रमा केली आहे तर ओबीने पुणे कन्याकुमारी आणि नंतर जम्मु पुणे देखील.
या रेंजमध्ये श्विनच्या दोन उत्तम सायकली येतात.
Super Sport 3 [2016] ही २५,००० च्या दरम्यान आणि Searcher 4 [2016] ही ३०,००० च्या दरम्यान. थोडे बजेट वाढवले तर ३३ ला Super Sport 2 Disc [2016] आणि ३५ ला Searcher 3.
या चारही सायकलीचे बेसिक कंपोनंट अगदी तंतोतंत सारखे आहेत, म्हणजे फ्रेम मटेरियल, फोर्क, रिम वगैरे. फरक आहे तो फक्त रिम ब्रेक आणि डिस्क ब्रेक, आणि डिल्युरल्समध्ये. सर्चर सिरिज मध्ये बाय डिफॉल्ट फ्रंट सस्पेशन येतेच आणि तुमच्या भागात खड्डे खळगे जास्त असतील तर घ्यायला हरकत नाही. अन्यथा विदाऊट सस्पेशनवाली सुपर स्पोर्ट सिरिजचा विचार करा.
या चारही सायकलींची तुलना
https://www.trackandtrail.in/compare/

महिलांसाठी म्हणून त्यांचे सुपर स्पोर्टचे एक मॉडेल आहे जे २६-२७ हजार च्या दरम्यान येईल.
https://www.trackandtrail.in/cycles/schwinn/super-sport-3-womens/

बियांची (Bianchi)
या इटालियन ब्रँडची Spillo Rubino ही एक सायकल या रेंजमध्ये उपलब्ध आहे. पण ही सायकल लॉंग राईडपेक्षा रोजच्या कम्युटिंगला जास्त चांगली आहे. त्याची हँडलबारचा शेप, बेसिक टर्नी डिल्युलर, ना सस्पेशन, ना डिस्क ब्रेक. एक मस्त साधी सुटसुटीत आंतरराष्ट्रीय ब्रँडची सायकल. २७,००० ला
https://www.trackandtrail.in/cycles/bianchi/spillo-rubino/
त्याची ड्एल म्हणून एक सिरिज आहे, त्यातल्या काही २२-२५ हजारच्या दरम्यान आहेत पण त्या पूर्ण एमटीबी आहेत आणि ऑफ रोडींगचा विचार नसेल तर त्या वाट्याला जाऊ नका.

मेरिडा (Merida ) - ही एक तैवानीज कंपनी आहे आणि ७७ देशांत त्यांच्या सायकली मोठ्या प्रमाणावर खपतात. २० ते ३० हजारच्या रेंजमध्ये मेरिडाच्या दोन सिरिजच्या बिगिनर मॉडेल्स येतात. पहिली सिरीज आहे क्रॉसवे (CROSSWAY). या ५व्ही, १५ व्ही आणि १५ एमडी असे मॉडेल्स आहेत. अर्थात बाय डिफॉल्ट या सिरिजला फ्रंट सस्पेन्शन येते. फरक पडतो तो डिल्युलर आणि ब्रेकींग सिस्टीममध्ये. एमडीला डिस्क ब्रेक येतो आणि अल्टस डिल्युरल येतो, तर बाकीला रेग्युलर ब्रेक आणि टर्नी डिल्युरल.

मेरिडाच्या या रेंजमध्ये अजून दोन सिरीज आहेत. एक मॅटस (Matts) आणि दुसरे बिग नाईन (Big Nine) अशा. दोन्हीच्या काही मॉडेल्स ३० हजारच्या आत आहे, पण दोन्ही सिरीज पूर्णपणे एमटीबी आहेत, त्यामुळे जर आवश्यकता असेल तरच त्या वाट्याला गेलेले बरे.

मॉन्ट्रा (Montra) - भारतीय बनावटींमध्ये मॉन्ट्राची एमटीबी, हायब्रीड आणि अगदी रोडबाईक सुद्धा या रेंजमध्ये येते.
https://montra.in/hybrid-bikes/blues-rigid/#specs
मॉन्ट्रा रिजीड ही २१ हजारच्या रेंजमध्ये एक उत्तम सायकल आहे. अलॉय ६०६१ म्हणजे लाईटवेट फ्रेम आणि अल्टूस डिल्युलर असलेली आणि चांगला फिडबॅक असलेली ही एक सायकल आहे.
त्याच्यातच पुढचे व्हर्जन मॉन्ट्रा टिंबा ही एक आहे. या दोन्ही सायकलींना फ्रंट सस्पेन्शन नाही आणि अलॉय फ्रेममुळे याआधीच्या सेगमेंटमधल्या डाऊनटाऊन, ट्रान्स प्रो या सायकलींपेक्षा हलक्या आहेत. अर्थात इथे त्यांची तुलना थेट परदेशी ब्रँडशी होत असल्याने त्यांना उत्तम दर्जाच्या सायकली देणे भाग आहेच.
https://montra.in/hybrid-bikes/timba-1-1/

आणि फ्रंट सस्पेन्शन असलेली मॉन्ट्रा ब्लू १.१ आणि डिस्कब्रेक वाली १.२ देखील बरीच पॉप्युलर आहे. पण पण त्या दोन्हीला फ्रंट सस्पेन्शन आहे. त्यामुळे वजन आणि किंमत दोन्ही वाढते.

रोडबाईक

मॉन्ट्रा अनप्लग्ड ही या सेगमेंटमध्ये येणारी या कंपनीची एकमेव रोडबाईक आहे. अर्थात रोडबाईकचा क्लास आणि अपग्रेडेड कॉम्पोनंट्स या किंमतीत मिळणे अशक्यच, यामुळे ड्रॉप बार आणि ब्रेकींग वगळता ही हायब्रीडच आहे फक्त तिला रोडबाईकचा लुक दिलाय. ज्यांना अगदीच क्रेझ असेल रोडीची त्यांनी या मॉडेलचा विचार करायला हरकत नाही.

https://montra.in/road-bikes/unplugged/

बिट्विनची ट्रायबन ही अजून एक रोडबाईक या रेंजमध्ये येते. पण त्याचाही तोच इशू आहे की कॉम्पोनंटन्स अगदी बेसिक आहेत. टर्नी आणि एन्ट्री लेव्हल शिफ्टर्स.

https://www.decathlon.in/p/8379186_triban-100-road-bike-cn.html?gclid=Cj...

स्कॉट (SCOTT )
ही एक स्वीस कंपनी आहे आणि ज्याचे उत्पादन चीन, तैवानमध्ये न होता, दक्षिण अफ्रिका आणि भारतात होते. या कंपनीच्या दोन एमटीबी सायकली या रेंजमध्ये येतात. Aspect 680 ही सस्पेन्शन असलेली असली तरी वजन हे १३.५ किलो आहे. यावरून तुम्हाला अल्युमिनियम फ्रेमच्या हलकेपणाचा अंदाज येईल. Aspect 680 ला रिम ब्रेक्स आहेत, ती २६,००० ला आहे आणि डिस्कब्रेक हवे असतील तर त्यासाठी Aspect 670 मिळते जी २८,००० ला आहे.

बर्गेमॉंट (BERGAMONT) हा एक जर्मन ब्रँड. त्यांची या रेंजमध्ये हेलिक्स १.५ आणि २.५ अशा दोन सायकली आहेत आणि हेलिक्स ही एक मस्त सायकल सिरीजच आहे हायब्रीडमधली
https://store.bumsonthesaddle.com/collections/bergamont-bikes/products/b...
https://store.bumsonthesaddle.com/collections/hybrid-bikes/products/berg...

बाकी आता नॉन सिरिजमध्ये काही उल्लेखनीय म्हणजे

जायंटची एस्केप ३ (escape-3)
https://www.giant-bicycles.com/us/escape-3
अलुक्स अल्युमिनियम फ्रेमची बांधणी, लॉंग डिस्टन एक्पिडीशनसाठी फ्रंट रॅक माऊंट, २१ गियर्स आणि टर्नी ग्रुपसेट (नुसत्या रियर किंवा फ्रंटपेक्षा ग्रुपसेट जास्त चांगला असतो, याबद्दल मी मागच्या भागात लिहीले आहे) यासह ही सायकल २९ हजारला उपलब्ध आहे.

याच किंमतीत कोना ड्यु (kona-dew)
https://www.choosemybicycle.com/en/bicycles/kona-dew-2018

वरती बऱ्याच सायकली आहेत त्या जवळपास सारख्याच किंमतीच्या आणि स्पेसिफिकेशनच्या आहेत. आणि या पुढची जी रेंज आहे त्यातल्याही काही सायकली तुम्ही विचार करू शकता. दोन-चार हजार घालून जर अजून अपग्रेडेड सायकल मिळत असेल तर नक्कीच त्याचा विचार करावा असा माझा आग्रह आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख माला व माहिती. वय व वजन जास्त, फिजिकल स्टॅ मिना कमी अश्या बिगिनरस नी कोणती घ्यावी सायकल.? मी बी एस ए एस एल आर शाइन बघितली आहे. मुलींची सायकल. मला तश्या टाइपचीच हवी आहे टांग टाकून बसता येणार नाही. गावातल्या गावात भटकायला हवी आहे.

छान माहिती मिळाली या लेखात सुद्धा.
मी तीन दिवसापासून लेकाची https://www.amazon.in/Kross-Spider-Multi-Speed-Bicycle/dp/B01EYSHQQE?tag...२१ हि सायकल सीट उंच करून चालवते.(दुसऱ्याकडे मागायला भिडस्त पणा आडवा येतोय) पहिल्या दिवशी पायात गोळा येईल असं वाटत होत, मन भरण्या आधी पायाच भरून आले. चालणं आणि सायकल चालवणं याच्यामधला फरक चटकन जाणवला वाटत तितकं सोप्प नाही हे. आत्ता लेकानंतर मी नवर्याच्या मागे लागले सायकल पाहिजे म्हणून : )

मस्तच

काही नवीन मॉडेल्स आणि कंपन्यांची नावे कळली. सायकल घेताना बरेच confusion होते. तर त्यासाठी एखादी चेक लिस्ट देता येईल का

https://www.trackandtrail.in/cycles/ridley/cordis-2/

रिडले हा बेल्जियमचा ब्रँड आहे. माझ्या ओळखीत अद्याप तरी कुणी घेतलेली नाहीये, त्यामुळे आंतरजालावरूनच माहीती घेतली आहे. फिचर्स बघितले असता २८००० किंमतीच्या मानाने व्यवस्थित आहेत. ६०६१ अलॉय फ्रेम, फ्रंटला अल्टूस मागे असेरा आणि २४ गियर असे दणदणीत कॉम्बो आहे. नक्कीच विचार करायला हरकत नाही.

फिजिकल स्टॅ मिना कमी अश्या बिगिनरस नी कोणती घ्यावी सायकल.?

मी त्या बदद्ल या भागात लिहीले आहे.
https://www.maayboli.com/node/64685

https://bsaladybird.in/evita/ या सायकलचा विचार करायला हरकत नाही.

मन भरण्या आधी पायाच भरून आले.

हो क्रॉस जडच आहे चांगली. पण उत्साहाने चालवताय याचे कौतुक. टेंपो असतानाच नवीन घ्या, आणि शक्यतो हलकी फुलकीच बघा,

https://www.choosemybicycle.com/en/bicycles/urban-trail-q1-6-speed-2015

ही फ्रंट सस्पेन्शनवाली आहे, पण अलॉय फ्रेम असल्याने हलकी आहे क्रॉस पेक्षा नक्कीच. एकदा जवळच्याच दुकानात जाऊन ट्रायल घेऊन पहा म्हणजे अंदाज येईल.

विराग - चेकलीस्ट म्हणजे काय हवेय ते नीट समजले नाही.

लेख भारीच आशु! ती लेडीबर्ड नाजुक सायकल आहे. रोज पाच किमी जरी चालवणं असेल तरी २ महिन्यांत खुळखुळा!! त्यामुळे थोडी वरच्या रेंजचीच घेतलेली बरी..

सायकल घेताना बरेच confusion होते. <<< चालवुन पहा ना विकत घेण्या आधी
चांगल्या ब्रँड च्या सायकल्स पुण्यात भाड्याने मिळतात ३०० ते ७५० पर्यंत भाडे असते.

ती लेडीबर्ड नाजुक सायकल आहे. रोज पाच किमी जरी चालवणं असेल तरी २ महिन्यांत खुळखुळा!!

वाईट आहे असे होत असेल तर, बिएसए चांगला ब्रँड आहे खरेतर. इतक्या लवकर वाट नाही लागायला पाहिजे.

चांगल्या ब्रँड च्या सायकल्स पुण्यात भाड्याने मिळतात ३०० ते ७५० पर्यंत भाडे असते.

हा एक चांगला पर्याय आहे. आणि त्याहीपेक्षा ओळखीत कुणाच्या असतील त्या एकदा चालवून पाहणे अजून चांगले.

ती लेडीबर्ड नाजुक सायकल आहे. रोज पाच किमी जरी चालवणं असेल तरी २ महिन्यांत खुळखुळा!! > अगदीच असं नसावं हो. मी चार वर्ष दररोज वापरली. अधूनमधून छोटी दुरुस्ती करून घ्यावी लागली एव्हढंच. फक्त त्याची रचना जरा विचित्र असल्यामुळे मोठ्या चढावर त्रास व्हायचा.

धन्यवाद सखा,

लीलावती - विचित्र रचना म्हणजे???

मी ही सायकल घेनेचा विचार करतोय, संध्या सायकल बद्दल माहिती गोळा करतोय, मला या लेखमालेचा खुप उपयोग होतोय, ही लेखमाला खुपच छान आहे

आशुचॅम्प मार्गदर्शन करा. रोड सायकल घ्यायची आहे. बजेट ६०k च्या आसपास. giant scr२ आणि merida scultra १०० येतात या रेंजमध्ये असं नेटवर समजलं.

हायब्रीड चालवून कंटाळा आला. आता नवीन टाईप ट्राय करायचा आहे. शाळेत असताना जो जिता वही सिकंदर पिक्चर बघून रोड सायकल घ्यावीशी वाटत होती. पाठ दुखत नाही ना जास्त वेळ चालवली का? ती सायकल वाकून चालवायला लागते म्हणून विचारलं.

हो पाहिले आता.
रोड मधे इतर दोन पेक्षा ही खूपच महाग आहे. भूतबाधा होत नाही का?

मुळात फक्त क्रेझ असेल तर रोडी घेऊ नका असे माझं स्पष्ट मत
या वरच्या सगळ्या सायकली तुम्हाला काही स्पेसिफिक टार्गेट जस की बीरेम किंवा अन्य काही स्पर्धात भाग घ्यायचा असेल तर (जिंकणे हरणे नाही इथं अपेक्षित, फक्त भाग घेणे, अर्थात त्यासाठीही रोडी च पाहिजे असंही काही नाही)

रोडी अर्थात ड्रॉप बार चा फायदा म्हणजे वाकून चालवत असल्याने हवेचा अवरोध कमी होतो, वेगात जात येते
पण त्यासाठी पायात पण तेवढी ताकद पाहिजे, तितकी अंतर चालवण्यासाठी काही उद्देश पाहिजे
रोडी चे टायर स्लिम असल्याने खड्डे, रफ रोड असलेल्या भागात चालवायला अवघड जाते.

त्यामुळे पूर्ण विचारांती निर्णय घ्या

वरच्या सगळ्याच सायकली उत्तम आहेत, ज्याचे सर्व्हिस सेंटर जवळ असेल ती घ्या डोळे झाकून.

पुन्हा सांगतो फक्त क्रेझ म्हणून घेऊ नका, त्यापेक्षा मग कितीतरी स्वस्त अन्य सायकल मिळतील. कधी नंतर अगदीच वाटलं तर हायब्रीड ला ड्रॉप बार बसवून मिळतात