सायकलविषयी सर्व काही ८ (सायकली १० ते २० हजार दरम्यानच्या)

Submitted by आशुचँप on 25 December, 2017 - 03:56

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
भाग ५
https://www.maayboli.com/node/64622
(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)
भाग ६
https://www.maayboli.com/node/64648
(सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?)
भाग ७
https://www.maayboli.com/node/64685
१० हजारच्या आतल्या सायकली
===================================================================

गेल्या भागात आपण १० हजारच्या आतल्या सायकलींबद्दल पाहिले. आता त्याच्या पुढचा सेगमेंट म्हणजेच १० ते २० हजार दरम्यानच्या सायकली.

खऱ्या अर्थाने अजूनही हा क्लास सिरीयस सायकलींगचा मानला जात नाही, याचे कारण रेप्युटेड आंतराराष्ट्रीय ब्रँड जसे की स्कॉट, श्विन, मेरीडा, कॅननडेल, ट्रेक इ.इ. या सेगमेंटमध्ये येत नाहीत. त्यांचे अगदी बेसीक मॉडेल देखील नाही. बहुतांश सायकली या हिरो, फायरफॉक्स आणि अन्य भारतीय आणि चायनीज बनावटीच्या या गटात मोडतात.
पण ज्यांना पुढे मागे मोठ्या राईड डोक्यात आहेत, ज्यांच्याकडे वडील-मुलगा, आई-मुलगा अथवा मुलगी एकच सायकल वापरणार असतील आणि थोडे पैसे खर्च करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहेत. थोडक्यात या सेगमेंटमधल्या सायकली या स्टेपिंग स्टोन म्हणून बघितल्या जातात. बहुतांश वेळा याचे ग्राहक वर्षा-दोन वर्षात सायकलिंगची आवड निर्माण झाल्यामुळे अधिक चांगल्या सायकलकडे वळल्याची अनेक उदाहरणे आहेत. मी देखील याच सेगमेंटमधला होतो. पहिली सायकल ११ हजारला घेतली तेव्हा पोटात बाकबुक होत होते की इतकी महाग सायकल चालवली जाईल का, पण लवकरच त्याची गोडी लागली आणि दीड वर्षात ती काढून स्कॉट घेतली. असो.

तुम्ही १० हजारपेक्षा जास्त खर्चण्याची तयारी दाखवली हे अभिनंदनास्पद आहे.

गेल्या सेगमेंटचेच अनेक थंब रूल इथेही पालन केलेले चांगले ते म्हणजे डिस्क ब्रेक आणि सस्पेन्शन ला ठाम नकार. कारण तेच, की या किंमतीत डिस्क ब्रेक आणि सस्पेन्शन बसवलेला असणे म्हणजे दर्जाशी तडजोड. थोडक्यात चायनीज मोबाईलमध्ये १२ मेगापिक्सेल कॅमेरा असून त्याची क्वालिटी ६ मेगपिक्सेल इतकीच असल्यासारखे. नुसते फिचर्स कागदावर भारी, प्रत्यक्ष वापरात त्याची क्वालीटी अगदीच बेताची.

हे थोडे जनरलाईज्ड स्टेटमेंट वाटू शकेल पण अनेक मित्रांच्या अनुभवातून आणि इंटरनेटवर त्या त्या सायकलच्या ग्राहकांनी दिलेल्या फीडबॅकमधून हे मत निर्माण झाले आहे, त्यामुळे एखाद्याला स्वस्तात पण चांगला दर्जा मिळाला असेल तर त्यांना खोटे पाडण्याची इच्छा नाही पण बहुतांश वेळा हे असेच असते इतकेच म्हणायचे आहे.

तर या सेगमेंटमधल्या सायकली पाहताना काय दक्षता घ्यायची.

१. दुकानातील सेल्समनच्या बोलण्याला न भुलणे - अनेकदा असे अनुभवाला आले आहे की एकाच दुकानात वेगवेगळ्या ब्रँडच्या सायकली असतील तर ते ज्यातून जास्त प्रॉफीट अॉफ मार्जिन मिळते त्याच सायकलचे भरघोस कौतुक करून गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतात, जे अगदीच स्वाभाविक आहे. पण माझा सल्ला असा की अगदीच ब्लँक होऊन दुकानात जाण्यापेक्षा थोडा आधी इंटरनेट वर रिसर्च करून आपल्या बजेटमधे बसतील अशा काही सायकली शॉर्ट लिस्ट कराव्यात, त्यांची यादी करावी, आपल्या गरजा, आपल्याला काय नसून चालेल आणि काय पाहिजेच हे लक्षात घेऊन त्यानुसार २-५ सायकली ठरवाव्यात. आणि मगच दुकानाला भेट देऊन त्यापैकीच सायकली दाखवण्याचे दुकानदाराला फर्मावे. या सेगमेंटमधील बऱ्याच सायकलींची माहीती आतंरजालावर उपलब्ध आहे. तिथे त्यांचे स्पेसिफिकेशन दिलेले असते.

आपल्याला थोडीफार माहीती आहे म्हणल्यावर ते देखील मग काचकुच करत नाहीत.
आणि अजून एक म्हणजे मालक किंवा एखादा तज्ज्ञ नसेल तर त्याला फक्त मॉडेलचे नाव, किती गियर्स म्हणजे २१ का २४ या पलिकडे जास्त माहीती नसते. त्यांना डिल्युरल कुठला आहे, ग्रुपसेट कुठला आहे, टायर्सची रुंदी किती आहे असे बारीक प्रश्न विचारले की दांडी उडते.

२. जाड टायर्स, दणकट सायकली - अनेकदा असेही दिसून येते की जाडजूड टायर्स आणि भक्कम बॉडी असलेल्या सायकलींना लोक भुलतात. चांगली दणकट सायकल दिसतीये ही जास्त चालेल असा एक भाबडा विचार त्यामागे असतो. आणि खरे सांगायचे तर तसे काही नसते. अगदी नाजूक साजूक दिसणाऱ्या आणि पातळ टायर असलेल्या क्वालिटी सायकल या रणगाड्यांपेक्षा जास्त दणकट आणि टिकावू असतात.

३. गियर्स आणि शिफ्टर्स - याबद्दल मी मागच्या भागात लिहीले आहे, अजूनही पुढे सविस्तर लिहीण्याचा विचार आहेच. पण आता या विषयाच्या अनुषांगाने.
आपल्याकडे शिमानो कंपनीचेच गियर्स मिळतात आणि त्यांचा अगदी बेसिक आहे टर्नी (Tourney TZ, Tourney TX). या रेंजमधील अनेक सायकलला हाच रिअर डिल्युलर बसवलेला दिसेल. रिअर डिल्युलर म्हणजे मागच्या चाकाजवळ बसवलेला यांत्रिक पार्ट जो गियर बदलण्यासाठी अत्यावश्यक असतो. तसाच पॅडलजवळ असतो तो फ्रंट डिल्युलर - जो पुढचे गियर्स बदलण्यासाठी वापरला जातो. या दोन्हीचे शिफ्टर्स तुमच्या हँडलबारवर डाव्या आणि उजव्या बाजूला असतात.

पुढच्या बाजूला जास्तीत जास्त ३ आणि कमीत कमी १ गियर असतो तर मागच्या बाजूला कमीत कमी ३ ते ११ पर्यंत असतात. या सेगमेंटमध्ये ते प्रमाण सहसा पुढे ३ आणि मागे ७ असे २१ गियर्स, किंवा पुढे ३ आणि मागे ८ असे २४ गियर्स इतकेच असते.
टर्नीच्या पुढचा प्रकार म्हणजे अल्टुस. ही टर्नीची सुधारीत आवृत्ती आहे, म्हणजे अँड्राईड जिंजरब्रेडवरून हनीकोंबवर अपग्रेड झाल्यासारखे. इतके जुने उदाहरण देण्याचे कारण सध्याच्या नव्या युगात टर्नी किंवा अल्टूस हे मास प्रॉडक्ट सायकलींसाठीच वापरले जाणारे डिल्युलरस आहेत आणि ड्युरा एसच्या तुलनेत अगदीच प्राथमिक स्वरुपाचे म्हणून.

अर्थात म्हणून टर्नी किंवा अल्टूस वाईट ठरत नाहीत. ते त्यांच्या जागी उत्तमच आहेत आणि तुमचा वापर आणि बजेट यानुसार तोच एकमेव पर्याय आहे. सांगण्याचा उद्देश हाच की इतने पैसै मैं इतनाच आयेगा...
त्या पुढचा डिल्युलर येतो तो म्हणजे असेरा. जर बजेट असेल तर टर्नी किंवा अल्टस पेक्षा असेरा केव्हाही चांगला. याच्या रॅपीड फायर शिफ्टरमुळे गियर बदलणे जास्त स्मूद होते आणि याचे लाईफ देखील चांगले असते.
या किंमतीच्या सेगमेंटमध्ये तुमच्या सायकलीला हे तीनच डिल्युलर मिळू शकतात. यापेक्षा जर कुणी त्याच्या पुढचे व्हर्जन म्हणजे अलिव्हीयो देण्याचा दावा करत असेल तर कुछ तो गडबड है दया....कुठेतरी तडजोड केली आहे निश्चित.

४. शिफ्टर्स - हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. काही सायकलींमध्ये ग्रीप शिफ्टर्स असतात, म्हणजे पूर्वी स्कूटरचे गियर बदलायचो तसा हँडलबारची मुठ मागे पुढे वळवून गियर बदलण्याची पद्धत. दुसरे म्हणजे थंब शिफ्टर्स, यात अंगठ्याने आणि पुढच्या बोटांनी गियरचा खटका मागे पुढे दाबून बदलता येतो. माझे वैयक्तिक मत असे की ग्रीपपेक्षा थंब शिफ्टर्स जास्त चांगले कारण ते जास्त टिकतात आणि वापरायला जास्त सोपे असतात.

रोडबाईकचा शिफ्टर अजून वेगळा असतो, त्याबद्दल पुढच्या भागात लिहीन

५. वॉल्व - हा देखील एक लक्षात घेण्याचा प्रकार आहे. सायकलच्या टायरला दोन प्रकारचे वॉल्व असतात. एक म्हणजे साधा नेहमीचा श्रेडर (Schrader). जो बहुतांश सायकलींला, गाड्यांना बघायला मिळतो. दुसरा म्हणजे प्रेस्टा (Presta) हा प्रकार फक्त सायकलींमध्येच असतो.
दोन्ही प्रकारच्या व्हॉल्वचे आपापले फायदे तोटे आहेत. ते थोडक्यात सांगतो.

श्रेडर - साधा, सोपा आणि रस्त्यावरच्या टायरवाल्याकडे हवा भरता येईल असा. त्याच्या वरची रबरी कॅप काढायची, हवा भरायची, कॅप लावली की निघालो.
पण श्रेडरमधून हवा रिलीज होण्याचे प्रमाणही जास्त आहे. काही दिवस सायकल चालवली नाही की टायर अगदी हवा गेलेल्या फुग्यासारखे होते. दैनंदिन वापर असला तरीही हवा भरण्याचे प्रमाण जास्त आहे.
प्रेस्टा - त्या तुलनेत प्रेस्टामुळे हवा जास्त काळ टिकून राहते पार दोन आठवड्यापर्यंतसुद्धा. रोजच्या रोज हवा भरण्याचीही गरज नसते. फक्त तोटा एकच त्याच्या बारीक आकारामुळे कोपर्यावरच्या हवावाल्याकडे तुम्हाला हवा भरता येत नाही आणि त्याचा एक विशिष्ट पंप घ्यावा लागतो.
अर्थात, आता त्यावरचाही उपाय निघाला आहे आणि ८०-९०रु ला एक अॅडाप्टर मिळतो, तो बसवला की प्रेस्टाचा श्रेडरसारखा हवा भरता येते. हवा भरल्यानंतर तो अॅडाप्टर काढून नीट ठेवला आणि हरवला नाही की झाले.

तर तात्पर्य, शक्य असेल तर प्रेस्टा व्हाल्वच घ्या. आणि हे आधिच ठरवावे लागते. आणि नंतर ट्युब त्याप्रमाणेच घ्याव्या लागतात. श्रेडरचे पंक्चर झाले आणि मित्राकडे प्रेस्टाची ट्युब आहे तर ती तुम्हाला टाकता येत नाही, श्रेडरला श्रेडरचीच आणि प्रेस्टाला प्रेस्टाचीच ट्युब लागते हे लक्षात घ्या.

6. ऑनलाईन का ऑफलाईन - होय आजकाल मोठ्या प्रमाणावर सायकली अमॅझॉन, फ्लिपकार्ट सारख्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. माझ्या ओळखीत अद्याप कुणी अशी सायकल मागवलेली नाही पण मार्केट किंमतीपेक्षा स्वस्त असल्याने मोह होऊ शकतो म्हणून एक सावधगिरीची सूचना.
ऑनलाईन येणारी सायकल ही पूर्ण डिसेंबल होऊन बॉक्स पॅक होऊन येईल. ती जोडण्यासाठी जवळचे सायकलचे दुकान गाठावे लागेल आणि माझ्या माहीतीनुसार सायकलचा ब्रँड, किंमत आणि प्रकार यानुसार ते १००० ते २,५०० पर्यंत किंमत आकारतात. सायकल पूर्ण फीट करून देण्याचे. आणि हे काम असे आहे की तुम्हाला त्याचे ज्ञान नसेल तर घरच्या घरी करू नका. एखादा स्क्रु लूज बसला आणि उतारावर वेगाने येताना निखळला तर ते प्राणघातकही ठरू शकते.
त्यामुळे Leave it to Experts

7. अॅक्सेसरीज - अजून एक म्हणजे या सेगमेंटमध्ये अॅक्सेसरीज फुकट मिळतात. म्हणजे, साईड स्टॅंड, बॉटल होल्डर, घंटी, लॉक वगैरे. विश्वास ठेवा, या पुढच्या रेंजमध्ये काहीही मिळत नाही. सायकल म्हणजे फक्त सायकल, ना साईड स्टँड ना बॉटल होल्डर. सगळे वेगळे विकत घ्यावे लागते. त्यामुळे दुकानदाराशी घासाघिस करून त्यातल्या तर बऱ्या दर्जाचे अॅक्सेसरीज मिळतील असे पहा.

काही निवडक ब्रँड

आता या सेगमेंटमधल्या काही ब्रँडवर नजर टाकू. यात सर्वात जास्त विकला जाणारा ब्रँड आहे तो म्हणजे मॉँट्रा.
TI Cycles of India Limited, Madras या भारतीय कंपनीची निर्मिती. हर्क्युलिस आणि बिएसए देखील यांचेच ब्रँड. आणि ट्रॅक अँड ट्रेल या आउटलेट मध्ये या सगळ्या सायकली बघायला मिळतात. आणि १० ते २० हजारच्या दरम्यान त्यातल्या त्यात विश्वासार्ह ब्रँड म्हणून हे तीन ब्रँड प्रसिद्ध आहेत.
याच रेंजमध्ये हिरो सायकल्सने अर्बन ट्रेल (Urban Trail) ही एक रेंज आणली आहे, जी स्टील मटेरियल असली तरी त्या मानाने जरा हलकी आहे. आणि १० ते २० हजारच्या दरम्यान काही चांगल्या सायकली आहेत ज्यांचा विचार करायला हरकत नाही.
फायरफॉक्स हा देखील एक भारतीय ब्रँड. गुरगावस्थित या ब्रँडला काही वर्षापूर्वी हिरो सायकल्सने विकत घेतले आहे आणि त्यांची एक वेगळी रेंज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अर्थात फायरफॉक्सचे हायब्रीड कमी आणि एमटीबी मध्ये जास्त पर्याय अाहेत.
schnell bikes - या बद्दल अनेकांना प्रश्न असतात. बहुसंख्य साध्या आउटलेटमध्ये मोठ्या प्रमाणात श्नेलच्या सायकली दिसतात. त्यावरचे चित्त्याचे आकर्षक ग्राफिक आणि जर्मन फ्लॅग यामुळे बऱ्याच लोकांचा ती परदेशी बनावटीची सायकल असल्याचा समज होतो. काहीवेळा सेल्समनदेखील बेधडक ती जर्मन मेड आहे असे सांगतात. पुण्यात फडके हौदाजवळ एका दुकानात मला हेच सांगण्यात आले होते त्यामुळे मी ती जवळपास घेतलीच होती पण मनात किडा चावला म्हणून घरी येऊन इंटरनेटवर धुंडाळले तर असे काहीही नाही.
ही एक पुण्यात मुख्यालय असलेली पूर्ण भारतीय कंपनी आहे cyclonicsindia असे या कंपनीचे नाव आहे. आणि एकूण सायकल कंपोनंट्स आणि बाकी किंमतीच्या मानाने देत असलेले फिचर्स लक्षात घेता त्यात चायनीज मालाचा वापर सढळ हाताने केल्याची शंका येते पण असे कुठेही स्पष्ट उल्लेख नाहीत. श्नेल ही भरोसेलायक सायकल नव्हे असा वापरकर्त्यांचा अनुभव आहे. लहान मुलांसाठी, सिंगल गियर मध्ये त्यातल्या त्यात श्नेल बरी आहे पण १० ते २० किंवा त्यापुढच्या रेंजमध्ये सायकल घेताना Schnell आणि त्या श्रेणीतले Dodge, Raven, Freemotion, Refugee, Kyots आणि Plug यासारखे ब्रँड टाळलेले उत्तम.

आता काही सायकली
URBAN TRAIL Q1 6 SPEED (2015) - ही एक अगदी बेसिक प्रकारची सायकल. गृहिणी, शाळेला जाणाऱ्या मुली, वयस्कर काकू या सगळ्यांना अगदी नीट वापरता येईल अशी सायकल. अलॉय फ्रेम म्हणले असले तरी फ्रंट सस्पेनशनमुळे जरा वजनी असल्याची शंका आहे. वजनाचा उल्लेख कुठे सापडला नाही तरी १६ ते १८ किलोच्या दरम्यान असाव असा माझा कयास आहे.

MONTRA DOWNTOWN - मॉन्ट्राची बेसिक श्रेणीतली सायकल. बजेट टाईट असेल तर ही घ्या अन्यथा थोडे वाढवून मॉन्ट्रा ट्रान्स घेणे उत्तम.
Downtown (2017) ₹ १३९५०
Trance (2017) ₹ १८३५०
Trance Pro (2017) ₹ १७६००
या तीन मॉन्ट्रा सायकलींमध्ये फरक आहे तो केवळ वजनाचा आणि फ्रंट टीथचा. जो चढ चढताना फक्त बघीतला जातो. डाऊनटाऊन जास्त जडशीळ आहे तर ट्रान्सला फ्रंट सस्पेन्शन आहे, आणि त्याची किंमतही जास्त आहे. त्यामुळे माझा सल्ला हाच ही ट्रान्स प्रो घ्यावी. आपला मायबोलीकर पवन याने नुकतीच घेतली आणि त्याचा अतिशय चांगला फीडबॅक आहे या सायकलबद्दल.
ट्रान्स प्रो चा सविस्तर रिव्हयू इथे वाचायला मिळेल.
https://www.choosemybicycle.com/en/woc/expert-reviews/montra-trance-pro-...

हिरो एच१ - वरती उल्लेख केलेल्या हिरोच्या नव्या श्रेणीतली सायकल. लुक आणि बाकी फिचर्स चांगले वाटत आहेत. अद्याप ही वापरण्यात आलेला थेट फिडबॅक माझ्याकडे नाही त्यामुळे ठामपणे सांगता येणार नाही. पण विचार करायला हरकत नाही.
https://herocycles.com/product/222/H1 - ₹ १७२००
अलॉय फ्रेम, पुढे टर्नी आणि मागेअल्टूस डिल्युलर, आकर्षक रंगसंगत, रॅपीड शिफ्टर यामुळे या बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. यांचाच पुढचे मॉडेल एच२ आहे, त्याला फक्त पुढे सस्पेश्न असल्याने किंमत थोडी वाढली आहे. ती १८,९०० पर्यंत येईल.

Firefox Rapide 21S - ही १७,६०० मध्ये अजून एक पर्याय. बाकी फिचर्स आणि कॉंपोनंट जवळ पास सारखेच आहेत. त्यामुळे जवळपास ज्या ब्रँडचे सर्व्हिस सेंटर असेल ती घेणे हा एक चांगला निर्णय ठरेल.

युनीरॉक्स ही एक कलकत्ता स्थित कंपनी आहे. त्यांचा दावा आहे की त्यांच्या सायकलींसाठी जर्मन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. बहुतांश सायकली या एमटीबी प्रकारात मोडत असल्यातरी मॅनहॅटन ही एक हायब्रीड मिळाली.
http://unirox-gr.com/product/manhattan-700c-matt-silver/

हर्क्युलीस रायडर अॅक्ट ११० - माझी वैयक्तिक पसंत. जर कुठे मिळत असेल तर डोळे झाकून घ्या हा सल्ला. मागच्या भागात कुणीतरी त्याबद्दल निगेटीव्ह फिडबॅक दिला होता पण माझा अनुभव खूप चांगला आहे या सायकलबददल. मी अनेक १००किमी च्या राईड, सिंहगड चढणे आदी सगळे या सायकलवर केले. एकदाही पंक्चर नाही, कसलाही त्रास नाही. केवळ मल्टी-डे एक्पिडिशनसाठी ती सुटेबल नसल्याने ती मला भावाला द्यावी लागली. त्यानेही ती दीड वर्षे ताबडली आणि मित्राला दिली. अद्याप ती बंगलोरमध्ये फिरत असावी अशी आशा आहे.
https://www.amazon.in/Hercules-Ryder-Act-110-Bicycle/dp/B00LHRWETU

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखमाला मस्त सुरु आहे!!

माझे एक observation आहे. साधारण ४ ते ५ वर्षांआधी बरेच चांगले groupsets बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये मिळत. हल्ली ३०-३५ हजारांच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या सायकलींना सुद्धा ALTUS वगैरे beginner लेव्हलचे groupsets असतात.

आता ह्या अनुषंगाने माझा प्रश्न.

>> केवळ मल्टी-डे एक्पिडिशनसाठी ती सुटेबल नसल्याने ती मला भावाला द्यावी लागली.
हे असे का असते ? कुठल्या निकषावर हे ठरते ? groupset हाच मुख्य भाग असतो की फ्रेम मटेरियल, फ्रेम geometry, इतर पार्टस ची क्वालिटी इत्यादी सुद्धा ?

माझे एक observation आहे. साधारण ४ ते ५ वर्षांआधी बरेच चांगले groupsets बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये मिळत. हल्ली ३०-३५ हजारांच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या सायकलींना सुद्धा ALTUS वगैरे beginner लेव्हलचे groupsets असतात.

बरोबर आहे. २०१२ का १३ मध्ये भारत सरकाने भारतीय बनावटीच्या सायकलींना मदत होण्याच्या दृष्टीने परदेशी बनावटीच्या सायकली आणि त्यांचे कॉम्पोनंटस् यावरची इपोर्ट ड्युटी १० वरून ३० टक्के केली. त्यामुळे अचानक या सायकलींच्या किंमती वाढल्या.

अर्थात ज्यांना घ्यायच्या होत्या त्यांनी परदेशीच सायकली घेतल्या, जास्त पैसे मोजून.

हे असे का असते ? कुठल्या निकषावर हे ठरते ? groupset हाच मुख्य भाग असतो की फ्रेम मटेरियल, फ्रेम geometry, इतर पार्टस ची क्वालिटी इत्यादी सुद्धा ?

खरे सांगायचे तर असे हार्ड अँड फास्ट असे काही नसते. मागच्या भागात लिहील्याप्रमाणे संतोष होलीने साध्या सायकलवर भारतभ्रमण केले आहे.

पण हो फ्रेम मटेरियल, फ्रेम geometry, इतर पार्टस ची क्वालिटी आणि ग्रुपसेट याने फरक पडतो. मी टप्प्याटप्पाने सायकली अपग्रेड करत आलो आहे त्यामुळे खात्रीने सांगू शकतो की तुमच्या सायकलीग क्षमतेमध्ये निश्चित फरक पडतो. आणि हे समजावून सांगण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि १०-२० किमी च्या राईडला सगळ्या सारख्याच वाटतात. पण आपल्या साध्या सायकलवरून केलेले १०० किमी आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या सायकलीवर केलेले १०० किमी यात मेहनत तुमचीच असली तरी कंफर्ट, पोश्चर, स्मूदनेस याने जो फायदा मिळतो तो त्या किंमतीएवढा वर्थ असतो.

मस्तच लेख, सर्वसाधारण व्यक्तीचे average बजेट हे १० ते २० हजार ह्या रेंज मधेच असते असे माझे ओब्सर्वशन आहे. ह्या लेखात नमूद केलेल्या सायकल मस्तच आहेत. नवीन सायकल घेताना दिलेल्या टिप्स उपयोगी आहेत जसे सायकल दुकानात सेल्स पर्सन च्या गोड शब्दात न अडकणे.

मी सध्या मायबोलीकर आनंदयात्री ह्याची हर्क्युलीस रायडर अॅक्ट ११०, सायकलिंग सुरुवात करायला हि बेस्ट सायकल आहे.

पुढील एखाद्या भागात गियर शिफ्टिंग पॅटर्न बद्दल माहिती वाचायला आवडले

धन्यवाद विराग.....

पुढच्या भागात अजून काही सायकली, मग अॅक्सेसरीजबद्दल थोडे असा प्लॅन आहे. गियर आणि शिफ्टरवर एक आख्खा भाग लिहावा असे डोक्यात आहे, बघु कसे काय जमतयं तसं.

धन्यवाद ऋष्या, आणि मार्गी....

तुमचेही इनपुट्स येऊ द्या. जेवढे जास्त इंटरअॅक्टिव्ह होईल तितके चांगले.

आमच्या इथल्या कोणत्यातरी नतदृष्टाने माझ्या सायकलच्या पुढच्या डिल्युलरची वाट लावलीये.. काढून घेऊन जायचाच विचार होता बहुतेक, पूर्ण काढता आले नाही म्हणूनच वाचले.. स्क्रूच काढून टाकला होता...

गिअर सेटींग कसे करावे ह्याची ऑनलाईन काही माहिती उपलब्ध आहे का? बारिक सारीक दुरुस्त्या स्वतःलाच करता यायला पाहिजे म्हणून विचारतोय.

हिम्स, विवेक मराठे ह्यांनी फेसबुकला "सहज सुंदर सायकल सफर" अशी पोस्ट टाकली आहे. त्यात सायकलच्या बारिक सारीक दुरुस्त्या स्वतःलाच कशा करता येतील आणि काय टूल्स लागतील हि उपयोगी माहिती दिली आहे.

पुढच्या भागात अजून काही सायकली, मग अॅक्सेसरीजबद्दल थोडे असा प्लॅन आहे. गियर आणि शिफ्टरवर एक आख्खा भाग लिहावा असे डोक्यात आहे, बघु कसे काय जमतयं तसं. >> अॅक्सेसरीज, गियर आणि शिफ्टरसह टूल्स बद्दल सुद्धा माहिती दे

गिअर सेटींग कसे करावे ह्याची ऑनलाईन काही माहिती उपलब्ध आहे का? बारिक सारीक दुरुस्त्या स्वतःलाच करता यायला पाहिजे म्हणून विचारतोय.

बारीक सारिक दुरुस्त्या ठीक आहे, पण गियरशी छेडछाड करू नको. चेन, डिल्युलर, कॅसेट हे सगळे थोडे डेलीकेट काम आहे आणि ते एक्पर्टवर सोपव. थोडे खर्चिक पडेल पण वाट लागण्यापेक्षा कधीही परवडले.

अॅक्सेसरीज, गियर आणि शिफ्टरसह टूल्स बद्दल सुद्धा माहिती दे
होय प्रयत्न करतो

मुलासाठी सायकल घ्यायची आहे येत्या आठवड्यात. सध्या बिटवीन ची ७ गियरची (फक्त मागचे गियर्स आहेत) वापरतोय. ३ वर्ष झाली, ही सायकल आता उंचीला कमी होतेय.

आमच्या सोसायटीत दर २० मिटरला स्पीडब्रेकर असल्यामुळे सस्पेंशन वाली सायकल घ्यायची आहे. सध्याच्या सायकलला सस्पेंशन नाहीये पण त्याच्या मित्राची चालवल्यावर चांगलाच फरक जाणवला.

बजेट २०च्या आसपास. वाटल्यास अजूनही वाढवू शकतो.

फायरफॉक्स रोडरनर प्रो आणि बिटवीन रिव्हरसाईड ५०० या दोन ठीक वाटताहेत. कोणी अनुभवी सल्ला दिला तर हवाय. इतरही कुठली चांगली मॉडेल्स असतील तर सांगा

@व्यत्यय
Montra ची मॉडेल्स बघितलीत का?

मोंत्रा ट्रान्स पण लिस्ट मध्ये आहे.
बाणेर मध्ये सुरेंद्र सायकल्स मध्ये गेलेलो, त्याने Schnell Holt सुचवली. चांगली वाटली ती पण MTB असल्याने जड आहे.
बाकी माझ्या गरजा पूर्ण करणाऱ्या कुठल्याही सायकली नव्हत्या त्याच्याकडे.
उद्या काळेवाडी नाक्याजवळ बोडके सायकल मध्ये जाईन. वाकड जवळ इतर कुठली दुकाने असल्यास कळवा.

धन्यवाद आदू
आज मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सायकल बाहेर काढलीच नाही, घरीच ट्रेनर वर 20 मिनिट पेडल मारले

धन्यवाद तेजो

मला एक 15 हजारांपर्यंत हायब्रीड सायकल घ्यायची आहे. सकाळी दीड दोन तास रायडिंग करणार आहे. सध्यातरी मोठ्या राईड्स डोक्यात नाहीत पण नन्तर विचार करू शकतो. एखादी चांगली सायकल सुचवा.

@बोकलत WaltX Trak 3 चांगली सायकल आहे. 13 किलो म्हणजे वजन तुलनेने कमी आहे. ही सायकल मोठ्या राईड करताही वापरता येईल.

किमतीच्या मानाने फीचर्स ओके आहेत
पण हा ब्रँड माहिती नाही
चायनीज आहे का ते पाहिलं पण त्यांच्या वेबसाईटवर असे काही आढळले नाही.
त्याची आफ्टर सेल्स सर्व्हिस बद्दल पण चेक करा

मागवली काल cmb वरून. 15500 ला पडली + 800 हँडलिंग चार्जेस. फ्लिपकार्टवर स्वस्त आहे पण आऊट ऑफ स्टॉक दाखवतंय.

Pages