हम दिल दे चुके सनम

Submitted by mi_anu on 21 December, 2017 - 12:30

एक राजस्थान किंवा तत्सम वाळवंटी प्रदेश आहे.इथल्या बायका टिकल्या नक्षीकामाच्या गुजराती साड्या किंवा घागरे घालतात.मोठ्ठं दुमजली बंगला किंवा हवेली म्हणता येईल असं घर आहे.घराचा प्रमुख एक खूप म्हणजे खूपच फेमस गायक आहे.इंटरनेट चा जमाना नसताना पण त्याच्याकडे इटली मधून शिकायला विद्यार्थी येणं ही खूप म्हणजे खूपच कॉमन गोष्ट आहे.

या घरात विजेचे लाईट नसावे.सगळीकडे प्रकाशमान आणि भरपूर दिवे मेणबत्या आणि झुंबरे दिसतात.तसा यांच्या घराचा मूळ पोटापाण्याचा व्यवसाय हा रहस्यमय असला तरी घरात एक एनआरआय आहे, त्याने थोडीफार जमापुंजी आणलीच असेल.गायक महाराजही बरंच कमावत असावे.बाकी वेळ घरातली माणसं अखंडपणे डायनिंग टेबल वर बसून 7 कोर्स मिल खातात किंवा गच्चीत/ओसरीत बसून गाणी गातात आणि नाचतात.

घरातल्या वस्तूंसाठी एक मोठी सप्लाय चेन आहे.पण ती आपल्याला चित्रपटात दाखवली जात नाही.पडद्याना टिकल्या शिवून देणारा शिंपी, संध्याकाळी पूर्ण हवेली ची झुंबरं मेणबत्त्या आणि तेल टाकून तयार ठेवणारा नोकर, हवेली मधला कुकिंग आणि क्लिनिंग स्टाफ,सलमान खान च्या स्टे साठी इंडियन वॉर्डरोब पुरवणारा शिंपी,नाजूक टिकल्या आणि अति भडक रंगाचे रंग जाणारे कपडे नीट वेगवेगळ्या वाहत्या पाण्यात धुवून देणारी लॉंड्री आणि ड्रायक्लीन करून देणारी सर्व्हिस.घरात एक भरपूर पुस्तकं वाली लायब्ररी पण आहे.पण ती बरीच अंधारी असल्याने तिथे कोणी पुस्तकं वाचताना दिसत नाही.लायब्ररी चा मूळ वापर कॉन्फलिक्ट हँडलिंग साठी होतो.

कहाणी नायक व नायिका अनुक्रमे अखिल इटालियन उडया प्रतियोगिता आणि अखिल वाळवंटीय हुतुतु सामन्यात प्रावीण्य मिळवलेले असल्याने प्रत्येक साधी गोष्ट उडया मारणे,उलट सुलट पडणे अश्या मार्गाने करतात.एकंदर प्रदेश अति दुर्गम असल्याने नायिकेला आकाश कंदील आणायला आणि नायकाला एअरपोर्ट वरून गुरूच्या घरी यायला चालत पूर्ण वाळवंट ओलांडावे लागणे अपरिहार्य असते.(भर वाळवंटात रेशमी/जॉर्जेट/शिफॉन चा टिकल्या काम केलेला घागरा किंवा दुकानातल्या शोकेस मध्ये दिसणारे बंदगला जोधपुर घालून चालणे,धावणे, उडया मारणे विचारात घेतल्यास सप्लाय चेन मध्ये 'पुरे परिवार का डिओडरंट सप्लायर' हा महत्वाचा घटकही लक्षात घ्यावा.)

तर महाराजा, आपले इटालियन विद्यार्थी गुरु म्हाराजांच्या घरी पोचलेले आहेत.गुरुपत्नी आमच्या खानदानाशी कोणतेही दूरचे नाते बाळगून नसल्याने नवर्याची 'अहो, जरा इकडे या.कुठचा कोण पोरटा लगेच घरी कसा ठेवून घेता?इकडे आपली आगाव नंदू, तिच्या चार पाच बहिणी आणि मला आता नातं लक्षात नसलेल्या तरण्या ताठया तीन चार मुली आहेत राहायला.जरा म्हणजे जरा पाचपोच कसा बै नाही तुम्हाला?' अशी खोपच्यात घेऊन खरडपट्टी न काढता 'आलास, ये.पाहिजे तितका राहा.आमच्याकडे तसा पण खोखो आणि हाऊजी ला एक मेम्बर कमी पडतोय' या विशाल बाहूंनी त्याला घरात सामावून घेते.गुरु महाराज रेंट आणि फी बद्दल निर्वीकार पणे "50% अभी चाहिये, फर्स्ट सेशन के पहले.बाकी 50% पैसा 8 सेशन के बाद.पेटीएम नही चलेगा.क्रेडिट कार्ड पे 2% टॅक्स लगेंगा.ऑनलाइन ट्रांसफर,कार्ड चलेगा" वगैरे आमच्या कोपर्यावरच्या सी प्लस प्लस इंस्टीट्यूट च्या काउंसेलर सारखी मख्ख उत्तरं न देता "वेळ आल्यावर सांगेन" म्हणतात.इटालियन विद्यार्थि पण आमच्या सारखे "नाही नाही, आता अंदाजे एस्टिमेट पाहिजे.त्यानंतर मी ठरवतो" वगैरे दुरुत्तरे न करता ओके म्हणतो.

यापुढे एक अखंड आंधळी कोशिंबिर आहे.नंदू आणि इटालियन बंडू गाणी गाणे, खाणा खुणा, कोपरखळ्या, एकांतात भेटणे हे सर्व करत असूनही बुवा(बुवा कुक वाला बुवा नव्हे,हिन्दीतली आत्या!) सोडून कोणालाही त्यांच्यात काही असावे अशी शंका येत नाही. परत एकदा, ही मंडळी आमचे दुरचे नातेवाईक नसल्याने हे थोडे फार पटणेबल आहे.आमच्या कडे ना, बारीक लक्ष आणि शंकाच फार! आता समीर नंदूने दिलेला मधाचा चमचा 8 वेळा उडवून लावतो आणि 9 व्या वेळेला खातो या उत्कट सीन ला "शी, चिकट झाली असेल बैठक मधाने.पटपट ओल्या फडक्याने घासुन पुसली तर ठीक.नाहीतर लाल मुंग्या नक्की लागणार सकाळी" हा पीस ऑफ इन्फॉर्मेशन द्यायची गरज आहे का? त्या गोळ्यांची बरसात रामलीला पिक्चर च्या वेळी पण तेच. ती दीपिका प्रेमाने धुपाचे पात्र उलट सुलट फिरवून चांगला सिडक्टिव्ह नाच करतेय आणि आम्ही आपले श्वास रोखुन चुकुन एक ठिणगी किंवा धुपाची राख खाली पडून बेड शीट बाद होणार का हे विचार करत बसलोय !! हे नंदू आणि बंडू आमच्या कडे असते तर त्यांनी झुंबर पाडल्या पाडल्या आमच्या कडे किचन गॉसिप चे अड्डे पडले असते.

नन्दु आणि बंडू च्या प्रेमात भांडणेच फार.साहजिक आहे.बंडू हा आमच्या युरोपियन कष्टमरासारखा शब्द चाचपडणारा आणि नन्दु "मुद्द्यावर या लवकर, डोक्यावर हापटलायत काय, किती लाम्बड लावताय" वाली परखड.तर या भांडणा नंतर नंदू एक खुप वेगात धावाय पळायचा आणि बसफुगडी घालायचा नाच करते आणि वनराज भाऊ तिला पसंत करतात.इथे क्षणभर थांबुन आपण वनराज भौंच्या अति तीक्ष्ण तैल दृष्टि ला दाद देउया. तिचा नाच पाहिलेले बरेच लोक नंतर "सारखा डोळ्यासमोरुन एक मोठा आकाशी पटटा हालतोय" म्हणून डोळे चोळत होते असे ऐकणयात आले.वनराज भौंना हा आकाशी ऑब्जेक्ट धावणारा/नाचणारा मनुष्य प्राणी, सुंदर महिला आहे हे कळले म्हणजे डोळ्याचा शटर स्पीड केवढा असेल!!
PJZf_N.gif

चित्रपटात बराच वेळ हसणे नाचणे गाणे झाल्याने हा पिक्चर एका प्रसिद्ध लग्नाच्या कॅसेट ची नक्कल आहे ऐसे म्हणू नये म्हणून यानंतर नंदू ची बहिण पळून येणे, परत पळून जाणे आणि नंदू बंडू एकमेकांसोबत पकडले जाणे असा एक दुःखी पॅच आहे.यात नंदू झोकयावर बसून लहान मुले 'इथे लागलं, इथे लागलं' सांगतात तशी स्वतःच्या अंगाला बोटं लावून सांगते.आई सहनशील असल्याने "मूर्ख कुठची.थोडक्यात सांग काय काय झालंय ते." म्हणून न खेकसता नंदू च्या आत्मयाला बंडू ने स्पर्श केलाय हे समजून घेते.या सीन ला आपण महाराष्ट्र राज्यातील एका शहरात बरेच वर्ष राहिला असाल तर आपल्या डोळ्या समोर ही काल्पनिक पाटी तरळील:

"आत्मानंद मसाज आणि हेल्थ स्पा"
"आमच्या इथे प्रशिक्षित इटालियन डॉक्टरांकडून मसाज करुन मिळेल"
नुसते होल बॉडी: 500 रु
होल बॉडी विथ आत्मा टच : 700 रु
नुसता आत्मा टच विथ हॅंड लेग मसाज: ३०० रु

पण नंदू च्या आईबाबां कडे इतका सहिष्णु दृष्टिकोण नसल्याने ते वनराज शी लग्न लावून देतात.इटालियन बंडू कडे नंदू ला न भेटण्या ची गुरु दक्षिणा मागितल्याने बंडू बरीच पत्रं लिहून माहेरी इटली ला निघुन जातो.इथे आपण बंडू असतो तर "काय हो, जर मी हे असं केलं नसतं तर गुरु दक्षिणा म्हणून किती मागितले असते?" असं विचारुन आकड़ा मनाशी धरुन "अरे वा इतके वाचले" असा सुप्त विचार केला असता.

वनराज भाऊंच्या नशिबी पहिल्या पासून अपेक्षा भंग आहे. पण यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर च्या सकाळी पहाटे ४ वाजता पूजा ठेवणार्‍या आणि घड्याळाचा अलार्म लावून ठेवणार्‍या फॅमिलीचे अपराध कमी दंडनीय ठरत नाहीत. नंदू ने इथे २ राँग नंबर लावल्याचे स्पष्ट होते.
१. डोळ्यात जो प्यार बंडू साठी दाखवायचा तो चुकून निंबूडा गाण्याच्या वेळी वनराज ला दाखवणे. (आमचं पण होतं कधीकधी असं. हपिस कँटीन मध्ये कॉफी घेणार्‍या दुसर्‍याच चेक्स शर्ट वाल्या पाठमोर्‍या भिडूला आपला नेहमीचा लंच ग्रुप मधला मुलगा समजून मागून 'यो ब्रो' वगैरे काहीतरी सलाम टाकणे.)
२. शेवटी इतके व्याप ताप करुन, पैशे लुटले जाऊन, टिसीला फसवावे लागून ज्या पंटर ला फायनली भेटायला मिळाले त्याला डोळ्यातून प्यार न दाखवणं.
या गोंधळावरुन 'आंखो मे प्यार' या आयटम ला एखादा युनिक बार कोड लावता येईल का हा मुद्दा विचाराधीन आहे. ज्याचा बारकोड असेल त्याच्याच रिडर ने स्कॅन होऊन ग्रोसरी मॉल मधल्या सारखे 'बीप' वाजेल.

आता बंडू ला शोधायला नंदू आणि वनराज इटली ला येऊन धडकतात.इटली हा एका दिवसात आगगाड्यानी फिरून सर्व गावांचा खातमा करता येईल ऐसा देश असल्याने पत्ता, शहर का नाम वगैरे काही बरोबर ठेवले नाही तरी चालते.फोटो नसला तरी चालतो.

तश्यात आणि नंदू बाईना गोळी लागते.
साधारण प्रेक्षकाच्या मनातला संवाद असा:
"गोळी कुठे लागली?"
"मानेला"
"मग प्लास्टर आणि पट्टी हाताला का?"
"कसला शंकाखोर आहेस रे!!!ती पडताना हात आधी खाली आपटून फ्रेक्चर झाला असेल"
"पण मग गोळी ची जखम प्लास्टर च्या आधी कशी बरी झाली?मानेला अजिबात पट्टी का नाही?"

कार्टून फिल्म्स मध्ये एक महत्वाचा सिद्धांत आहे.कार्टून हवेत तरंगत असते.पण त्याने खाली पाहून त्याला खाली जमिन नाही कळल्याशिवाय ते पडत नाही.तसेच या चित्रपटाचा महत्वाचा सिद्धांत आहे. नंदू अगदी टुणटुणीत दिसते.चेहरा शांत(प्रेक्षकांना नंदू आवडत नसल्यास मख्ख म्हणू शकता) असतो.आणि कॅमेरा खाली जाऊन तिची जखम आपल्याला दिसली की मगच ती कपड्याच्या ढिगाच्या सर्वात खालचा कपडा ओढल्यावर ढीग कोसळतो तशी कोसळते.(आठवा इटलीत गोळी लागणे आणि भारतात नस कापून आत्महत्या आणि तळे खराब हे एका दगडात दोन पक्षी मारणे.)

तू इथे मी तिथे करत करत फायनली वनराज समीर आणि नंदू ची भेट होते.(एकन्दर एकमेकांचे फोन नंबर किंवा हॉटेल चे पत्ते लिहून घेण्याची सवय कोणीही अंगी लावून घेतलेली नाही.आधुनिक युगात या लोकांचे अवतार "माझे सिम कार्ड बदलले.मला सगळ्यांचा नंबर पाठवा" चे ईमेल दर सहा महिन्याने करणाऱ्या, तुमच्या लँडलाईन वर एस एम एस करणाऱ्या, वाईफ1 वाईफ2 वाईफ3 ने बायकोचे सर्व आजी माजी नंबर साठवणाऱ्यांच्या रूपाने पुनर्जन्म घेतात.)

नंदू आणि बंडू भेटतात आणि नंदू त्याला मंगळसूत्र दाखवते. आता नंदू ने प्रत्येक भांडणात "मला बघायला लोक येतील आणि मी लग्न करीन" अशी तम्बी दिलेली असताना बंडू ला इतका धक्का का बसावा हे प्रेक्षकाना कळत नाही.पण नंदू परत धावत पुलावर जाऊन वनराज ला दोन पैकी एक हात निवडायला सांगते.सुदैवाने वनराज चा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागून लग्न कायम राहते.(आता जनरल नवरा बायको ही गोष्ट पुढची किमान 5 वर्ष एकमेकांना बोलून दाखवून कडाकडा भांडतील.)
"तेव्हा पण लकी ड्रॉ काढायला लावून माझ्या बरोबर आलीस. दूसरी एखादी असती तर हॉल मध्ये वर गेलीच नसती.पण निखळ प्रेम नाहीच ना आमच्या नशिबि!!"
"उगीच ऐकवून दाखवू नकोस.तू मूर्खा सारखी त्या लोकांना लिफ्ट मागितल्याने हात मोडला माझा.मान पण मोडली."
"रडत बस नुसती.इतकं इटली ला फिरवून आणलं त्याचं काही नाहीच.तरी आई सांगत होती या मुलीचे नखरेच फार.नको करायला सोयरिक.बघायला गेलो होतो तेव्हा तरी धड सूधेपणाने चहा कांदेपोहे तरी करुन आणले होतेस का?"
"आणि तू मोठा गुणाचा पुतळा आहेस की नाही.मेल्या २ ओळी धड गाता नाही आल्या.सोपं गाणं घ्यायला काय झालं होतं? डायरेक्ट चिंगारीच.तू गाताना गाढव ओरडत होतं बाहेर.बाबा म्हणालेच या असुराच्या घरी तुझं कसं निभणार म्हणून."

वगैरे....वगैरे....अनेक वर्ष.

(हा माझा अति आवडता पिक्चर आहे.माझी दर वीकेंड हा टीव्ही वर पाहू शकण्याची तयारी सूर्यवंशम किंवा इंद्रा द टायगर किंवा मुम्बई की किरण बेदी दर वीकेंड ला पहाणाऱ्या भक्तांपेक्षा तसूभरहि कमी नाही.हे परीक्षण विनोदी आहे ऐसा दावा नाही.हे परीक्षण आहे ऐसा दावा नाही.या निमित्ताने चित्रपट चिरफाडिस वर आणावा हा एकमेव हेतू.)
hum dil_1409219308.gif

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

>>> जनरल नवरा बायको ही गोष्ट पुढची किमान 5 वर्ष एकमेकांना बोलून दाखवून कडाकडा भांडतील
हे बहुधा पुढची पाच वर्षं 'मैं एक बात कहूँ?... कुछ नहीं' हा प्यासिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह खेळ खेळत बसतील. Proud

बंडू ह.पा. (हो, पा. स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं आहे.) आकाशातल्या कोमट काळजाच्या बापाशी ('तो' नव्हे, बंडूचे खरेखुरे आणि आता 'त्या'च्या घरी गेलेले तीर्थरूप) लाडीक रुसवेफुगवे करतो त्याचा उल्लेख राहिल्याबद्दल तुम्हाला आणखी एकदा हा सिनेमा बघायची शिक्षा फर्मावण्यात येत आहे. Proud

भारी लिहिले आहे Lol

सलमान शेवटी आकाशातल्या बाबाकडे बघून विचित्र आवाजात रडतो तेव्हा जाम हसायला येते Lol
पण हे सलमानच जमवू शकतो _/\_ Happy

नंदू नंदू तेव्हा ऐकायलाही मजा येत होती, आता वाचायला पण मजा आली... सारखा शक्ती कपूर आठवत राहतो.

विक्रम गोखलेच्या जागी अनुपम खेर घेऊन त्याचीही अधूनमधून कॉमेडी दाखवायला हवी होती. गोखले उगाच ऑड वाटत राहतात चित्रपटभर ..

Lol

Lol

भन्नाट लिहीले आहे! मजा आली.

मिसिंग सप्लाय चेन, लायब्ररीचा वापर, लॅण्डलाइन ला एसेमेस, ७ कोर्स मील हे सगळे टोटल धमाल Lol मस्त लिहीले आहे.

एक पदराचा फटका काय बसतो वनराज तडक उठून बायकोसह इटलीत. >>> सशल Lol

पुन्हा बघायला पाहिजे हा पिक्चर. १९९९ चा क्रिकेट वर्ल्ड कप आणि यातली गाणी हे डोक्यात कायमचे एकत्र बसलेले आहे. त्यावेळेस ऑखोंकी गुस्ताखियाँ कायम लागायचे.

नंदू एक खुप वेगात धावाय पळायचा आणि बसफुगडी घालायचा नाच करते>>
नंदू झोकयावर बसून लहान मुले 'इथे लागलं, इथे लागलं' सांगतात तशी स्वतःच्या अंगाला बोटं लावून सांगते >>> Lol
जनरल नवरा बायको ही गोष्ट पुढची किमान 5 वर्ष एकमेकांना बोलून दाखवून कडाकडा भांडतील >>>>सो ट्रु Happy
फा असेच २००३ चा कप, सचिन चे पाक विरुद्ध ९८ आणि मध्यंतरात "बाबूजी जरा धीरे चलो" हे बसले आहे माझ्या डोक्यात!! Happy

भारी लिहिलंय.. ते "सारखा डोळ्यासमोरुन एक मोठा आकाशी पटटा हालतोय" ला जोरदार हसले Lol

तरी तू बरेच छोटे छोटे सीन्स आणि सलमानचे सारखे आकाशीच्या बापाशी बोलणे, सगळे मोठे आणि महत्वाचे निर्णय एक मूठ पकड असं करून घेणे, इतक्या लोकांच्या स्वयंपाकापासून स्वच्छतेपर्यंत सगळी कामे त्या एकट्या नोकराने करणे, वनराजची आगाव बहीण आणि अति गोग्गोड आई, व्यवहारी वकील बापूस, सलमान ने अजय देवगणला पहिल्याच भेटीत काम ना धाम नेमके ते ढोली तारो गाणे म्हणून दाखवणे इत्यादी चिरफाड करायचे फा आणि मंडळींवर सोडले आहेत. (जरा घाईत लिहिलं का? पूर्ण कर चिरफाड. आम्ही वाचू.. तू भारी लिहितेस)

कॉलिंग पायस, फा, श्रमाता आणि मंडळी Happy

अजून एक राहिलं. आत्म्याला स्पर्श झालेला कळणार्‍या, कुठे बरोबर लबाडी गेली की सलमान शी चोरीछुपे प्रेम प्रकरण सुरू राहिल इत्यादी सर्व कळणार्‍या नंदू ला चुंबनात मुलं जन्माला घालायची ताकद नसते हे माहित नसणं. निरागसता! Lol

Biggrin भारी लिहिलं आहे. हा चित्रपट बघायला मला पण आवडतो. गाणी आवडतात, नाच आवडतात पण तरी तुम्ही लिहिलेलं वाचून 'अगदी अगदी' झालं.

भन्नाट चिरफाड Lol लायब्ररी आणि सप्लाय चेन विशेष जमले आहेत Happy

आई सहनशील असल्याने "मूर्ख कुठची.थोडक्यात सांग काय काय झालंय ते." म्हणून न खेकसता नंदू च्या आत्मयाला बंडू ने स्पर्श केलाय हे समजून घेते. >> अगदी अगदी !! इथे मैं प्रेम की दीवानी हूं ची आई हवी होती. आत्म्यालाच स्पर्श केला आहे ना? तो फिर प्रॉब्लेम क्या हैं? Proud

वनराजचा लकी ड्रॉ मध्ये नंबर >> Biggrin बरं यावर तो मख्खशिरोमणी इतकी रिस्ट्रेंड प्रतिक्रिया देतो की त्याला आनंद झाला आहे हे दाखवायला भन्साळीला लगेच फटाक्यांचे शॉट टाकावे लागले.

एक पदराचा फटका काय बसतो वनराज तडक उठून बायकोसह इटलीत. >> नंदू ला चुंबनात मुलं जन्माला घालायची ताकद नसते हे माहित नसणं. निरागसता! >> सशल Lol

हा एकदा सावकाश बघायला पाहिजे. जेवढं आठवतं त्यानुसार हा सिनेमा म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट आहे. सिनेमाच्या सुरुवातीला विक्रम गोखले एखाद्या इंजिनिअर प्रमाणे उच्च विभव (हायर पोटेन्शिअल) असलेल्या सलमान खानला आणून सर्किटमध्ये करंट निर्माण करतो. उच्च विभव असल्याने ऐश्वर्या रुपी इलेक्ट्रॉन्स नाचतच बसतात. आता या करंटचा निचरा झाला पाहिजे म्हणून अजय देवगणरुपी निम्न विभव (लोअर पोटेन्शिल) आणून विभवांतर (पोटेन्शिअल डिफरन्स) तयार केले जाते. करंट फ्लो होतो आणि सिनेमा संपतो.

माझ्यामते हा सिनेमा मैं प्रेम की दीवानी हूं चा अँटिथिसिस आहे. एकात शांत हिरोला पोरगी मिळते दुसर्‍यात एनर्जी ड्रिंक्सवर हाय असणार्‍या हिरोला. एकात आई सहनशील आहे दुसर्‍यात वडील. दोन्हींमध्ये कमी सहनशील पार्टी विदेशी पोराला बोलावून घेते पण जास्त सहनशील पार्टीचा त्यावर लवकर जीव जडतो. असे अनेक मुद्दे आहेत, सवड काढून लिहितो.

तिचा नाच पाहिलेले बरेच लोक नंतर "सारखा डोळ्यासमोरुन एक मोठा आकाशी पटटा हालतोय" म्हणून डोळे चोळत होते असे ऐकणयात आले.वनराज भौंना हा आकाशी ऑब्जेक्ट धावणारा/नाचणारा मनुष्य प्राणी, सुंदर महिला आहे हे कळले म्हणजे डोळ्याचा शटर स्पीड केवढा असेल!!<<<<<<
Lol Lol

धमाल आली वाचताना ☺️☺️ आवडीचा पिक्चर आहे हा पण चिरफाड वाचायला मजा आली,अजून काही सिन्सचे डिटेल्स आवडले असते,जसं की जेंव्हा वनराज आणि सल्लू भेटतात तो सीन ,पण मस्त गं अजून लिहीत रहा अशाच ठेवणीतल्या पिक्चराविषयी

बरेच थोडक्यात लिहीलेय.
बाकी चिरफाड इथल्या एक्स्पर्टांवर सोडलीय Happy
शिवाय पाठमोरे रडत असताना कोणीतरी हाक मारल्यावर वळलेल्या चेहर्‍यावर हसू वाले ३ सीन्स आणि विक्रम गोखलेंचे 'नंदिनी, जाआआआआआआआआआआआआआआव' पण राहीलेय! (भुभु मध्ये मांत्रिकाचा रोल त्यांना या जाआआआआआव सीनची क्लिप पाहूनच मिळाला असे काहीसे अंदाज वर्तवले जातायत.)

(आम्ही) सो कॉल्ड एक्स्पर्ट्स यापेक्षा काय वेगळे लिहीणार? एक दोन पंचेस इकडेतिकडे. बेस्ट जमले आहे. मला जबरी आवडले Happy

भुभु मध्ये मांत्रिकाचा रोल त्यांना या जाआआआआआव सीनची क्लिप पाहूनच मिळाला असे काहीसे अंदाज वर्तवले जातायत>> ☺️☺️

मस्त लिहले आहे, प्रतिसाद पण भारी.
पायस असे जर प्रत्येक चित्रपटातुन ईलेक्टॉनिक ईंजिनियरिंग चे मुद्दे काढले तर मुलाना थेअरी लक्षात ठेवण्यास आणि परिक्षेत पास होण्यास खुप मदत होईल

अनु Proud Biggrin
तुझ्या वारंवारितेला (म्हणजे पिच्चर परत परत पाहण्याच्या) सलाम..
आखोंकी गुस्ताखिया गाणं आवडत मला अजुनही.. ऐकायला फक्त..

पायसा, जरा इस्कटून लिही बर लवकर..

ती दीपिका प्रेमाने धुपाचे पात्र उलट सुलट फिरवून चांगला सिडक्टिव्ह नाच करतेय आणि आम्ही आपले श्वास रोखुन चुकुन एक ठिणगी किंवा धुपाची राख खाली पडून बेड शीट बाद होणार का हे विचार करत बसलोय !!-- Happy हे वाचून अगदी अगदी झाले. मी सुद्धा त्या पूर्ण गाण्यात त्या धूप पात्राकडेच पहात होते ... आणि ती ते शेवटी पलंगावरच ठेवते...............हे पाहून तर " एक मिनिट, ... मग चालूदेत तुमचं" असं म्हणून ते तिथून उचलून ठेवावे की काय असा विचार केलेला मी!

भारी लिहिलंय अनु. मस्तच Lol
सप्लाय चेन, लायब्ररी वैगेरे भारी जमलंय.
आकाशी पट्टा Lol
<<<< खोपच्यात घेऊन खरडपट्टी न काढता 'आलास, ये.पाहिजे तितका राहा.आमच्याकडे तसा पण खोखो आणि हाऊजी ला एक मेम्बर कमी पडतोय' या विशाल बाहूंनी त्याला घरात सामावून घेते.>>>>>> Lol
अजुन चिरफाड करता येइल. वनराज्चं मुलगी बघायला आल्यावर चिंगारी कोई भडके गाणं, समीर हवा का झोका,
समीर आकाशात त्याच्या बाबाशी बोलतो, वै वै
तो इधर छुआ, इधर छुआ, उसने मेरी आत्माको छुवा है मा सीन खरंच पकाव आहे.
मला हा पिच्च्चर एकदा बघितल्यानंतर बघावासाच वाटला नाही कधी.

भारी लिहिलं आहे अनु _/\_

खुप वेगात धावाय पळायचा आणि बसफुगडी घालायचा नाच करते....आकाशी पट्टा >>> Rofl Rofl हे फार फार म्हणजे फारच आवडले आहे. ऐश्वर्याच्या नाचात मला नक्की काय आवडले नाही ह्याचा आत्ता उलगडा झाला. त्या निंबुडा नाचाचे लोक इतके कौतुक करायचे आणि मला काही तो नाच कधीच आवडला नाही. पण मला सांगता यायचे नाही की नक्की का नाही आवडत तो नाच मला. मला एनलायटन केल्याबद्दल धन्यवाद Lol

अनु लव्य्यु. Happy तुझा ब्लॉग बंद असतानाही जुन्या पोस्टी वाचून हसले आहे ते यामुळेच. Happy
भारी समिक्षा. Happy अजून येऊ देत.

Pages