वाह्यात चित्रपटांचे ऑकवर्ड अनुभव.

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 December, 2017 - 17:38

नियम क्रमांक १ - जेव्हा तुम्ही ३ मुलींबरोबर पिक्चरला जाता तेव्हा तिघींना एकत्र घेऊन कधी जाऊ नये.
नियम क्रमांक २ - जेव्हा तुम्ही तिघींबरोबर एकत्र जाता येव्हा त्यातील एक तुमची गर्लफ्रेंड तरी असू नये.
नियम क्रमांक ३ - जेव्हा नियम क्रमांक १ आणि २ पाळणे अवघड जाते तेव्हा निदान चित्रपटाची चॉईस तरी चुकवू नये.
नियम क्रमांक ४ - जर चित्रपट कसा निघेल हे आपल्या हातात नसेल तर निदान थिएटर तरी चांगले निवडावे.
नियम क्रमांक ५ - जेव्हा वरील चारही नियमांची तुम्ही काशी घालता तेव्हा मग निमूटपणे आपल्याच कर्माला दोष देत जे जे होईल ते ते भोगावे. मी हेच केले!

काही वर्षांपूर्वीची घटना आहे.
गर्लफ्रेंडने कॉलेजमध्ये दोन नव्या आणि छान मैत्रीणी जमवल्या. त्यांच्यावर शायनिंग मारायला आपला एक बॉयफ्रेंड आहे आणि तो किती भारी आहे हे दाखवायचा तिने एक प्लान बनवला. पण त्याचवेळी त्या मैत्रीणींनी एकटक आपल्या बॉयफ्रेंडकडे बघत राहू नये म्हणून सोबत चित्रपट बघायचाही प्लान बनवला. म्हणजे थोडा चित्रपट बघा, थोडा माझा बॉयफ्रेंड बघा. पण दुर्दैवाने मला पुर्ण चित्रपटभर त्या दोघींनाच काय माझ्या गर्लफ्रेंडच्या नजरेला नजर देऊनही बघता आले नाही. कारण चित्रपटाची निवड चुकली!

देल्ही बेल्ली!
हि माझी झालेली अवस्था नसून चित्रपटाचे नावच असे आचरट होते. यातील पहिल्या देल्हीचा अर्थ बहुतेक भारताची राजधानी दिल्ली असा असावा आणि दुसर्‍या बेल्लीचा अर्थ मला पुर्ण चित्रपटभर कळलाच नाही. आधी मला वाटले देल्हीबेल्ली म्हणजे खेळीमेळीत बघायचा चित्रपट असेल. त्यत माझ्यासोबत मुलीबिलीही होत्याच. एकंदरीत मज्जाच मजा होती.
पण ट्रेलरमध्ये पाहिलेले "भाग डिके बोसडिके" असे आचरट बडबडगीत एक वॉर्निंग अलार्म होते.
ईथे आस्वाद घेऊ शकता - https://www.youtube.com/watch?v=glA-FIzDbpI

किंवा मग हे लिरीक्स एंजॉय करू शकता.

डॅडी मुझसे बोला, तू गलती है मेरी
तुझपे जिंदगानी, गिल्टी है मेरी..
साबुन की शकल मे,
बेटा तू तो निकला केवल झाग....
झाऽऽग... झाऽऽऽऽग ... भाऽऽग !!
भाग भागडिके बोस डिके बोसडिके बोसडिके.. भाग डिके बोसडिके भाऽऽग

पण दुर्दैवाने मी या वॉर्निंग अलार्म कडे दुर्लक्ष केले. कारण आमीर खान त्यावर म्हणाला होता, "गाण्यावर जाऊ नका, चित्रपट लहान मुलांनी बघावा असाच बनवलाय." आता जगाच्या पाठीवर कुठे अशी वाह्यात पोरे नांदत असतील ज्यांच्यासाठी आमीरने हा चित्रपट बनवला याची कल्पना नाही.
तसेच तो आमीरचा भाचा इम्रान खान, त्याचा तो पैलाच पिक्चर. जाने तू या जाने ना. त्यातील त्याची रोमांटीक सुपरक्यूट भुमिका. हा पुढे जाऊन आपल्या इम्रान नावाला जागत हाश्मीगिरी करेल असे वाटले नव्हते. पण तो हाशमी परवडला. फक्त चार चुंबने काय घ्यायचा तेवढ्यासाठीच बिचारा बदनाम व्हायचा. (एक चुंबन, अनेक चुंबन? की चुंबने? व्याकरण कर्रेकट करा प्लीज) असो, तर या चित्रपटाची माझी निवड चुकली हेच खरे..

तर आता किस्स्यावर वळूया. एके दिवशी गर्लफ्रेंड लाडात येऊन म्हणाली, चंदा आणि तानियाला तुला भेटायचे आहे. सोबत एखादा छानसा पिक्चर प्लान करूयात का?
चंदा आणि मंदा नाव ऐकले असते तर मी कधीच या फंदात पडलो नसतो. पण तानिया !! नाव ऐकूनच माझ्या डोळ्यात बदाम बदाम बदाम आले आणि मंदासारखा फटक्यात होकार देऊन बसलो. पुढे तिकीटे बूक करण्यापासून गाडीभाडे, पॉपकॉर्न आणि कोल्ड्रींक्स हे सारे खर्च सारे मीच करणार हे ऐकून नको त्या धंद्याला लागलो असे झाले. त्यातच आदल्या दिवशी गर्लफ्रेंडने मोबाईलमध्ये तानियाचा फोटो दाखवला. आणि तिला पाहून "नाव तानियाबाई आणि हाती बर्फाचा गोळा" असे झाले. "तानियाच अशी तर चंदा नि कशी" म्हणून मी विभागातील सस्त्यातील सस्ती सिंग्ल स्क्रीन थिएटरची तिकीटे काढली. पण चित्रपटाच्या दिवशी धक्काच बसला. चंदा तर एकदम बंदा रुपाया निघाली. बोले तो एकदम शॉल्लिड! कसं वाटले असेल तिला, या रुनम्याने आपल्याला कसल्या थिएटरमध्ये आणले. पण ईतर सर्व थिएटरमध्ये या चित्रपटाचे सारे शो हाऊसफुल्ल आहेत, एकदम भारी चित्रपट आहे, आपल्याला हाच बघायचा होता म्हणून मी ईथली तिकीटे काढली असे बोलून मी वेळ मारून नेली. पण थोड्यावेळाने हिच थाप माझा काळ बनून येणार होती याची मला कल्पना नव्हती. कसं वाटले असेल चंदाला., या रुनम्याला कसले वाह्यात चित्रपट भारी वाटतात..

तर चित्रपटाची स्टोरी आता फार काही आठवत नाही. पण टॉयलेटमधील पाणी संपलेय म्हणून संत्रा ज्यूसने काम उरकणे. हिरे द डायमंड असलेली थैली मलमूत्राच्या टेस्ट सॅंपलशी बदलणे. आणि नंतर व्हिलनची माणसे हिरे कसे बदलले म्हणून तो मालमसाला चेक करत असताना त्यावर क्लोजअपमध्ये कॅमेरा मारत आपल्यालाही नको नको ते दाखवणे. आणि काय बोलू, काही काही कंबरेखालच्या दृश्यांबद्दल तर न बोललेलेच बरे.

एकंदरीत आजूबाजुची टवाळ झोपड पट्टी छाप पोरे खिदळत होती आणि मी तीन पोरींना सांभाळत गपगुमान बसलो होतो. समोर पिक्चर बघवत नव्हता आणि आजूबाजूला त्या तिघींना बघू शकत नव्हतो. निम्मे थिएटर भरले होते, पण दूरदूरपर्यंत एकही स्त्री देह नजरेस पडत नव्हता. मीच काय ते मुर्खासारखे तीन जणींना घेऊन आलो होतो. नाही म्हणायला दोन कोपर्‍यात दोन जोडपी बसली होती. पण ती पिक्चर बघायला नाही तर दाखवायला आली होती. पडद्यावर एखादे वल्गर दृश्य येताच किंवा एखादा नॉनवेज जोक घडताच माझी गर्लफ्रेंड मला जोरात कोपर ढोसत होती. ते फटके खात खात मी मोजतही होतो. तेवढाच विरंगुळा. अश्याने वेळ लवकर जातो असे म्हणतात.
चोवीस खाल्ले आणि मध्यांतर झाले. लाईट लागली आणि तोंड लपवून पळालो. पॉपकॉर्न घेऊन आलो. ते खाऊन झाले. पण तिघींच्या चेहर्‍यावरचा राग काही आटला नव्हता. मी पुन्हा जीव मुठीत घेऊन बसलो. सेकंड हाल्फमध्ये वल्गरता वाढली होती की गर्लफ्रेंडचा संताप याची कल्पना नाही, पण चोवीसचा आकडा थेट अठ्ठ्याऐंशीला येऊन थांबला आणि पिक्चर संपला. पुन्हा लाईट लागले. आम्ही चौघेही एकमेकांपासून तोंड फिरवत बाहेर आलो. आणि तसेच चार दिशांना निघून गेलो.

पुढे विशेष सांगण्यासारखे काही घडले नाही. पण दुसर्‍या दिवशी भर उन्हात मला रुमाल डोक्यावर ठेवून गार्डनच्या सात फेर्‍या माराव्या लागल्या. त्या मारताना उगाचच कानात भाग डिके बोसडिके बोस डिके भागडिके वाजतेय असा भास होत होता.
आजही ती आठवण काढून माझी गर्लफ्रेंड मला झापत असते. त्या चंदानंदा आणि तानिया सोनिया तर मला आयुष्यात पुन्हा कधी दिसल्या नाहीत.
कदाचित सम अनादर टाईम मलासुद्धा तो चित्रपट आवडला असता. कारण पुरेसा वाह्यातपणा माझयही अंगी ठासून भरला आहे. पण ती वेळ चुकली.
अश्याच चुकलेल्या वेळांना समर्पित हा धागा...
- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया Proud

घरी जाऊन धपाटे खाल्लेस का मग Lol

धुळ्यात रहात होतो तेव्हाची गोष्ट: आम्ही १२वीत असतांना आमच्या मॅथ्सच्या क्लासच्या मॅडमने वर्ष संपायला आले तसे आम्हाला काही मुलींना घेऊन सिनेमाला जायचं ठरवलं. कुठल्या, तर म्हणे टारझनला जाऊ . प्राण्यांचे मुव्ही आवडतात म्हणे मला. हेमंत बिर्जे आणि किमी काटकर बाईंचा टारझन. >>>> मॅथ्सच्या मॅडमने सूड उगवला असावा वर्षभराचा तुमच्यावर. Lol

ऑलमोस्ट खाणार होते धपाटे पण मी आईला "मला काय माहीत हे सगळं असणारेय, मी पाहिला असता तर कशाला नेलं असतं तुम्हाला" असं म्हणून सॉरीम्हणलं मग तिने माफ केलं मला.
पण त्या पिक्चरचं नाव आणि गाणी आमच्या घरात अनेक वर्ष कोणी काढली/वाजवली नव्हती हे चांगलं लक्षात आहे मला Proud

भोळ्या भाबड्या सरांना वाह्यात चित्रपटाला घेऊन जाणार्‍या गर्लफ्रेंडचा आणि तिच्या मैत्रिणींचा निषेध. त्या बालमनावर काय काय आघात झाले असतील. शिवाय सरांचे धोरण कडक ! अगं अगं म्हशी प्रॉडक्शनने वाह्यातपणाचा निषेध केलेला आहे. त्यांच्यावर असा प्रसंग ?
काय जमाना आला. मुलींपासून बांड तरूणांना जपायला हवे. सातच्या आत घरात हेच धोरण बरे आहे मुलांच्या बाबतीत. मुलींसोबत तर अजिबात चित्रपटाला पाठवू नये. (आईवडीलांसाठी नाही, बायकोसाठी आहेत या सूचना ).

शांत माणूस,
या साइटवर संस्कारक्षम वयातील मुले मुली येतात,
तेव्हा "सरांचे धोरण कडक" वगैरे वाह्यात शब्दरचना प्रतिसादातून वगळावीत ही विनंती Proud
अन्यथा त्यावर एक लेख पाडण्यात येईल

शाळेत असताना एक मित्र जाँबाज बघून आला व नंतर आमच्याशी बोलताना शिक्षकांना पण सांगितले एकदम भारी चित्रपट आहे. नंतर त्या शिक्षकांनी त्या मुलाशी बोलणेच टाकले होते.

असेच काही वर्षापुर्वी नाशिकला शुद्द देसी रोमान्स हा चित्रपट पहायला गेलो होतो. हल्लीचा चित्रपट असल्याने त्यात काय असणार याचा अंदाज होता. त्यामुळे बरोबर आमच्याच वयाचे नातेवाईक होते. पण आमच्या पुढच्या लाईनीमध्ये एक माणूस बायको, बहीण, आई अश्यांना घेऊन आला होता. बरोबर त्याची मुले पण होती. या चित्रपटात ३-४ वेळा चुंबन द्रुश्ये आहेत. ती सुरू झाली रे झाली की त्या माणसाची आई त्याला कुठल्या वसाड्या चित्रपटाला आणलेस रे वगैरे वगैरे बोलायला सुरूवात करायची. आम्ही व आजुबाजूच्यांनी ते फार enjoy केले. प्रत्येक वेळी तसा सिन सुरू झाला रे की त्या माणसाला खच्चून शिव्या त्याची आई घालत होती. मुळ चित्रपटापेक्षा हेच जास्त entertaining होते.

Pages