कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ !

Submitted by कुमार१ on 5 November, 2017 - 19:48

गेल्या अर्धशतकात आपण वाढत्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला आणि त्याबरोबर आपल्या आयुष्यातील ताणतणाव देखील वाढत गेले. एकीकडे आपला भौतिक विकास होत असतानाच आपले शरीर मात्र निरनिराळ्या आजारांची शिकार होत गेले. हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अ‍ॅटॅक ” हा होय. या विकाराचा आपल्या रक्तातील ‘कोलेस्टेरॉल’च्या वाढलेल्या प्रमाणाशी घनिष्ठ संबंध असतो हे आपण सगळे जाणतोच.

सध्या सुशिक्षित समाजात या ‘कोलेस्टेरॉल’ बद्दलचे सामान्यज्ञान खूप वाढलेले जाणवते. ‘तूप जास्ती खाउ नका’, ‘मांसाहार टाळलेला बरा’, ‘शून्य कोलेस्टेरॉल’वाले तेल कोणते’, ‘ट्रान्स फॅट म्हणजे काय’ अशा एक ना अनेक चर्चा वारंवार होत असतात आणि आपण एकमेकाला यासंबंधीचे भरपूर अनाहूत सल्ले देत असतो. त्यामुळे ‘कोलेस्टेरॉल’ हा एक लाडावलेला वलयांकित पदार्थ होऊन बसलाय! तर अशा या कोलेस्टेरॉलचा इतिहास, त्याच्या संशोधनातील प्रगती आणि हृदयविकाराशी असलेले त्याचे नाते या सगळ्याचा लेखाजोखा आपल्यासमोर सादर करीत आहे.

आपल्यातील बऱ्याच जणांना असे वाटते की कोलेस्टेरॉल हे गेल्या साठेक वर्षांत उपटलेले एक खूळ आहे. “आमच्या आजोबांच्या पिढीने हे असले काही ऐकले नव्हते बुवा. तेव्हा लोक कसे दणकून खात पीत होते”, अशी विधानेही आपल्या कानावरून वरचेवर जात असतात. परंतु कोलेस्टेरॉलचा शोध तसा फार जुना आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

इ.स. १७५८ मध्ये Francois P. de La Salle या फ्रेंच डॉक्टरने कोलेस्टेरॉलचा शोध लावला. तेव्हा ते पित्ताशयातून बाहेर काढलेल्या खड्यांचा (gallstones) अभ्यास करीत होते. त्यातून त्यांनी एक घट्ट मेद पदार्थ शोधून काढला. पुढे १८१५ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ Michel E. Chevreul यांनी तो घट्ट पदार्थ शुद्ध स्वरूपात प्राप्त केला आणि त्याला ‘कोलेस्टेरॉल’ हे नाव दिले. ‘कोलेस्टेरॉल’ हा ग्रीक शब्द असून chole = bile =पित्त आणि stereos = solid अशी त्याची व्युत्पत्ती आहे. मग या नव्या पदार्थावरील संशोधनाने वेग घेतला.

सर्व प्राण्यांच्या पेशींमध्ये तो असतो हे लक्षात आले. पुढे १८३८ मध्ये Louis Rene Lecanu यांनी संशोधनातील एक महत्वाचा टप्पा गाठला आणि असे दाखवून दिले की कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तातही आढळतो. तरीही कोलेस्टेरॉलची ओळख अजून ‘पित्तात आणि रक्तात आढळणारा एक घट्ट मेद’ एवढीच होती. त्याचे रासायनिक सूत्र वगैरे अद्याप माहित नव्हते.
१९०३ मध्ये Adolf Windaus या जर्मन शास्त्रज्ञाने खूप प्रयत्नांती कोलेस्टेरॉलचे रासायनिक सूत्र शोधून काढले. त्याबद्दल ते १९२८ च्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले. पुढे १९३० मध्ये Heinrich Wieland यांनी Windaus च्या संशोधनातील काही चुका दुरुस्त करून कोलेस्टेरॉलचे पक्के सूत्र जाहीर केले. कोलेस्टेरॉल हा ‘स्टीरॉइड’ गटातील एक मेद असल्याची नोंद झाली.
त्यानंतर आजपावेतो कोलेस्टेरॉल संबंधीचे संशोधन सतत चालू आहे. त्यातून त्याचे नवनवे पैलू समजून येत आहेत. आतापर्यंत १३ वैज्ञानिकांनी या पदार्थावरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिके प्राप्त केली आहेत. असे भाग्य शरीरातील एखाद्या घटकाच्या वाट्याला क्वचितच आले आहे.

आता आपल्या शरीराच्या दृष्टीतून कोलेस्टेरॉलकडे बघूयात. हा पदार्थ आपल्याला फक्त प्राणिज पदार्थांच्या सेवनातून मिळतो तसेच आपल्या शरीरातही तो तयार होतो. या दोन्ही स्त्रोतांचा शरीरात प्रतिदिन समतोल साधला जातो. म्हणजे, जर आपल्या आहारात त्याचे प्रमाण कमी असेल तर शरीरात तो अधिक तयार केला जाईल आणि आहारात जास्त असेल तर शरीरात कमी प्रमाणात तयार होईल. कुठल्याही वनस्पतीमध्ये कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे ‘व्हेगन’ आहारशैलीत अन्नातून ते शरीराला मिळणार नाही.
भारतात आपण जी तेले स्वयंपाकासाठी वापरतो ती बहुतांश वनस्पतीपासून केलेली असतात जसे की, शेंगदाणे, करडी, सूर्यफूल, जवस, ओलिव्ह इ. त्यामुळे या सर्व तेलांच्या जाहिरातीत “ शून्य कोलेस्टेरॉल तेल” असे जे ठळकपणे दाखविलेले असते, ती खरे तर ग्राहकांची दिशाभूल आहे (म्हणजे ‘पिवळा पितांबर’ म्हटल्यासारखा तो प्रकार आहे). कारण कुठलाही वनस्पतीजन्य पदार्थ हा “शून्य कोलेस्टेरॉलयुक्तच” असतो. त्या तेलांची एकमेकाशी तुलनाच करायची झाली, तर त्यांमध्ये कशात एकूण उष्मांक आणि संपृक्त मेदाम्ले (saturated fatty acids) कमी/जास्त आहेत, यावरून केली पाहिजे.

सध्या विविध माध्यमांतून ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या विषयावरील माहितीचा सतत भडीमार आणि काथ्याकूट चालू असतो. त्यामुळे सामान्य माणसाचा कोलेस्टेरॉलकडे पाहण्याचा एक पूर्वग्रह झालेला आहे. जसे काही कोलेस्टेरॉलला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो आणि मग पूर्वग्रहदूषित नजरेने त्याच्याकडे पाहतो. त्यामुळे सामान्य माणसाला या कोलेस्टेरॉलच्या शरीरातील उपयुक्ततेची काही जाणीवच नसते. क्षणभर आपण ‘रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे परिणाम’ हा विषय बाजूला ठेवू आणि आपल्या पेशींमध्ये जे कोलेस्टेरॉल आहे ते किती उपयुक्त आहे ते पाहूयात.

आपल्या शरीरातील पेशींमध्ये कोलेस्टेरॉलपासून कितीतरी महत्वाची संयुगे तयार होतात. त्यापैकी तीन महत्वाची अशी:
१. त्वचेतील कोलेस्टेरॉलवर सूर्यकिरण पडले की त्यापासून ‘ड’ जीवनसत्व तयार होते.

२. कोलेस्टेरॉलपासून सगळी ‘स्टीरॉइड हॉर्मोन्स’ तयार होतात. या हॉर्मोन्सचे एक मोठे कुटुंबच आहे. त्यापैकी पुरुषातील testosterone आणि स्त्रीतील estrogen ही आपल्या अगदी परिचयाची. किंबहुना या दोघांमुळेच आपले पुरुषत्व वा स्त्रीत्व सिद्ध होते आणि आपण ते मिरवत असतो!

३. यकृतात त्याच्यापासून होणारी जी आम्ले (bile acids) आहेत ती अन्न्पचनात मोलाची मदत करतात.

आपल्या रक्तातही कोलेस्टेरॉल संचार करीत असते. त्यातील काही भाग हा रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर हळूहळू साठत असतो. त्या साठ्यांमध्ये कोलेस्टेरॉलबरोबरच इतरही काही मेद असतात. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित असते तेव्हा हे साठे अतिशय मंदगतीने वाढतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह हा विनाअडथळा व्यवस्थित चालू राहतो. पण जर का रक्तातील मेदपदार्थ हे प्रमाणाबाहेर वाढले तर मात्र ही साठण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात होते. यालाच atherosclerosis असे म्हणतात. या आजाराचा सर्वप्रथम शोध Rudolf Virchow यांनी १८५४मध्ये लावला. हा आजार जेव्हा करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये होतो तेव्हा त्या आकुंचित पावल्याने किंवा ‘ब्लॉक’ झाल्याने त्या रुग्णास ‘हृदयविकाराचा झटका’ येतो. अशा प्रकारच्या ‘झटक्यांची’ वैद्यकशास्त्रात प्रथम नोंद १९१०च्या सुमारास झालेली दिसते.

आपल्या रक्तात संचार करणारे कोलेस्टेरॉल हे काही मोठ्या रेणूंच्या माध्यमातून फिरत असते. त्यातील दोन मुख्य रेणू म्हणजे LDL & HDL. LDLमध्ये जे कोलेस्टेरॉल असते त्याला “वाईट” कोलेस्टेरॉल, तर HDLमधल्याला “चांगले” कोलेस्टेरॉल असे सामान्य भाषेत म्हणतात. आता हे ‘चांगले आणि वाईट’ हे शब्द शास्त्रीयदृष्ट्या तितकेसे योग्य नाहीत. LDL मधले कोलेस्टेरॉल जर नेहमी योग्य प्रमाणात राहिले तर तसे ते आपल्याला ‘वाईट’ ठरत नाही. केवळ ‘चांगले’ चा विरुद्ध शब्द म्हणून तो प्रचलित आहे. त्याचे प्रमाण वाढते राहिल्यासाच atherosclerosis चा धोका संभवतो. तेव्हा त्या दोन्ही शब्दांचा अर्थ ढोबळमानाने घ्यायचा आहे.

आता वळूयात “कोलेस्टेरॉल आणि करोनरी हृदयविकार” या बहुचर्चित आणि वादग्रस्त विषयाकडे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून हा विषय वैद्यकविश्वात सतत प्रकाशझोतात राहिला आहे. १९५३मध्ये Ancel Keys यांनी अनेक प्रयोगांती असे मत मांडले की आहारातील मेदाचे जास्त प्रमाण आणि करोनरी हृदयविकार यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यावर वैज्ञानिकांत बऱ्याच चर्चा झडल्या आणि त्यांचे मतभेदही चव्हाट्यावर आले. त्यांमध्ये John Yudkin या मधुमेहतज्ञांचे ठाम मत होते की आहारातील मेदापेक्षाही साखर हा अधिक घातक पदार्थ आहे. मग Keys आणि Yudkin यांच्यात बऱ्याचदा वैचारिक खडाजंगी झाली. त्यात अखेर Yudkin ना नमते घ्यावे लागले आणि Keys यांचे मत वैद्यकविश्वाने उचलून धरले.

१९५६मध्ये अमेरिकी हृदयविकार संघटनेने अधिकृतरीत्या जाहीर केले की आहारात बटर, अंडे आणि बीफ यांच्या अतिसेवनाने करोनरी हृदयविकाराचा धोका वाढतो. इथपासून ‘आहार आणि हृदयविकार’ या चर्चेला एक निर्णायक वळण लागले. किंबहुना, एक प्रकारे कोलेस्टेरॉलचे 'भूत' समाजाच्या मानगुटीवर बसले! त्यानंतर रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलला जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ करून ते कमी करण्यासाठी अनेक उपचारपद्धती विकसित झाल्या. स्वयंपाकात कोणते तेल वापरायचे याच्या जोरदार प्रचारमोहीमा चालू झाल्या. एक दोन दशके तर सूर्यफुलाचेच तेल कसे सर्वोत्तम आहे हे ठसवणाऱ्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला होता.

दुसऱ्या बाजूस वैज्ञानिकांचा एक गट हा सातत्याने फक्त कोलेस्टेरॉलला ‘लक्ष्य’ करण्याच्या विरोधात होता. त्यांच्या मते आहारातील साखर, रक्तातील अन्य एका मेदाचे (triglycerides) प्रमाण, जीवनशैली यासारखे इतर अनेक घटकही atherosclerosis होण्यास कारणीभूत होते. त्यामुळे निव्वळ कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय राबवणे ही त्या रुग्णांची दिशाभूल करणारे आहे, असे त्यांचे मत होते. १९७७मध्ये George Mann यांनी तर ‘आहार आणि करोनरी हृदयविकार’ हे गृहीतक म्हणजे वैद्यकाच्या इतिहासातील सर्वात मोठी बनवाबनवी (scam) असल्याचे मत नोंदवले होते.

अशा तऱ्हेने ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या वादग्रस्त विषयावरील काथ्याकूट आजही चालू आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधात विविध वैद्यकीय संघटना आग्रही मते मांडीत आहेत. १९८७पासून रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी ‘Statins’ नावाची औषधे बाजारात उपलब्ध असून त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कोलेस्टेरॉलप्रमाणेच तीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांचे समर्थक आणि विरोधक आपापली मते सतत हिरीरीने मांडत असतात (अगदी नोटबंदी या विषयासारखी!). किंबहुना चर्चेसाठी हा विषय माध्यमांत वारंवार उकरून काढला जातो.

करोनरी हृदयविकाराच्या कारणांच्या बाबतीत अशा प्रकारचे वाद होणे अगदी स्वाभाविक आहे. मुळात हा आजार कोणत्या एका कारणामुळे होत नसतो. अनुवंशिकता, वांशिकता, जीवनशैली, व्यसने, मधुमेह आणि रक्तातील विविध मेदांचे प्रमाण असे अनेकविध घटक तो होण्यास कारणीभूत ठरतात( multifactorial disease). त्यामुळे त्यापैकी एका घटकाचा नक्की ‘वाटा’ किती हे ठरवणे खरेच अवघड असते. जेव्हा आपण आहारातील मेदांचे विश्लेषण करतो, तेव्हा फक्त कोलेस्टेरॉलकडे न बघता एकूण संपृक्त मेदांच्या (saturated fats) प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि धूम्रपानापासून अलिप्तता हेही घटक आजार प्रतिबंधाच्या दृष्टीने तेवढेच महत्वाचे आहेत.

आता एवढे सगळे पुराण सांगितल्यावर वाचक मला एक प्रश्न नक्की विचारतील. तो असा, “मग काय, रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल हा काळजी करण्याचा विषय आहे की नाही?” मी याचे उत्तर एका सोप्या उदाहरणाने देतो. समजा, तुम्ही खूप लांब पल्य्याच्या आणि बऱ्याच दिवसांच्या प्रवासास निघाला आहात. या काळात तुम्ही अंगावरती अगदी नजरेत भरतील असे काही लाख रुपयांचे दागिने घातले आहेत. आता प्रवासादरम्यान हे दागिने हमखास चोरले जातील का? इथे हो किंवा नाही अशा दोन्ही शक्यता आहेत. पण, ते दागिने तुम्ही चोरांच्या नजरेत ठेऊन एक मोठी जोखीम नक्कीच पत्करली आहेत. त्याचप्रमाणे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही आयुष्याच्या प्रवासातील एक जोखीम नक्की आहे. पण, त्यामुळे ‘करोनरी हृदयविकार होईलच’ असे विधान मात्र करता येत नाही.

....तर असा हा भरपूर संशोधन झालेला, बहुचर्चित, बहुगुणी आणि वादग्रस्त कोलेस्टेरॉल! आरोग्यविज्ञान क्षेत्राशी संबंध नसलेल्या कोणाही सामान्य माणसाला त्याची मूलभूत माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. त्यावरील प्रतिसाद आणि शंकांचे स्वागत आहे.
******************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साद, थोडक्यात तुमचा प्रश्न आहे ही आरोग्याला सुयोग्य (ideal) खाद्यतेल कोणते?

जालावरचे बरेचसे संदर्भ हे पाश्चिमात्य जनतेच्या दृष्टीकोनातून दिलेले असतात. एका भारतीय पाठ्यपुस्तकातील संदर्भांनुसार सांगतो.
तेलांमध्ये जी fatty acids (FA) असतात ती ३ प्रकारची असतात:

१. Saturated FA (SFA) = सफा
२. MonoUnsaturated FA (MUFA) = मुफा
३. PolyUnsaturated FA (PUFA) = पुफा

आता भारतीयांना सुयोग्य अशा तेलात वरील तिन्ही घटक १:१:१ अशा समप्रमाणात असावेत.

बर मग, असे बाजारातले तेल कोणते? उत्तर : एकही नाही !

यावर तज्ञांचा सल्ला असा की २-३ प्रकारच्या तेलांचे मिश्रण वापरल्यास वरील तिन्ही घटक मिळतील.
आता हा ‘मिश्रण’ प्रकार प्रत्येकाला चवीच्या दृष्टीने आवडेलच असे नाही.

त्याऐवजी असे करता येईल :
दिवसातील तिन्ही वेळेचा स्वयंपाक करताना तीन ( किंवा निदान २) वेगळी तेले वापरायची.
मी असे करतो: एका महिन्यात शेंगदाणा + सूर्यफूल ,
तर पुढच्या महिन्यात शेंगदाणा + जवस /करडी .

लेख खूप छान आहे.
५-६ प्रकारची तेले पाहून गांगरुन जातो. ---- हो . कोणते वापरावे , अधेमधे तेल बदलावे का म्हणजे सरकी 1 महिना ,सूर्यफूल 1 महिना असे करावे म्हणजे चांगले आरोग्यासाठी त्याबद्दल ही आपण लिहाल का?

यावर तज्ञांचा सल्ला असा की २-३ प्रकारच्या तेलांचे मिश्रण वापरल्यास वरील तिन्ही घटक मिळतील. >>>>> माझी मम्मी हेच करते

सफोला गोल्ड. फॉर्च्युन सनफ्लॉवर अन अजुन कसलेतरी राईस तेल का काय असते ते.
चवीत काही फरक नाही वाटतं.

ते आरोग्यासाठी चांगले की वाईट माहित नाही

कुमार१, आपल्या तेलाबद्दलच्या सल्ल्यासाठी धन्यवाद.
विषय सोपा करुन सांगायची तुमची हातोटी छान आहे. त्यामुळे माझ्यासारख्या १० वी नन्तर सायन्सशी सम्बन्ध न आलेल्या माणसालाही हा विषय नीट कळला. आता तेल घेताना त्यात काय बघावे ते समजले आहे.
मागे मी तुमचा इन्सुलिन वरचा लेख माझ्या गावी असलेल्या म्हातार्‍या काकांना वाचायला दिला होता. ते डायबेटिक आहेत. त्यांनाही तो खूप आवडला होता.
पुन्हा एकदा आभार.

चर्चेत सहभागी सर्वांचे आभार.
आपणा सर्वांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कायम नियंत्रणात राहो, अशी सदिछा व्यक्त करतो !
Bw

शंतनू, आभार .
वाचकांना लेख उपयुक्त वाटला याचे समाधान आहे.

तेल म्हणजे १००% फॅट. स्वयंपाकात तेलाचा वापर हा तेल तापवून / उकळुन होतो.
उकळलेल्या तेलाचा नियमित वापर आरोग्यास उचित नाही : The thermal oxidation of the cooking oils promotes the generation of free radicals and may play an important contributory role in the pathogenesis of hypertension in rats.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3226610/

मुळात तेलाला विशेष चव अशी नसते. खास करुन हृदयरोगींना म्हनुन Zero Oil Cooking हा कन्सेप्ट एक हृदय विकार तज्ज्ञ प्रमोट करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=bOTqmeymKgI&t=5s

तर इतरही बरेच लोक ज्यांना हृदयरोग नाही ते ही अवलंबताहेत. आम्ही पण घरी zero oil cooking करतो. एकदा नॅक कळली की चवीत फरकही जाणवत नाही, हा बिना तेलाचा स्वयंपाक होता हे लक्षातही येत नाही.
गुगलवर ’zero oil cooking” सर्च करुन बघा, बर्‍याच रिसिपी सापडतील, तरला दलाल सकट.

मानव, चांगली माहिती. तुमचा प्रयोग रोचक आहे. २०१८ चा संकल्प म्हणून मनात धरावा का ? ☺

पण वाचकहो, आता एक अनाहूत सल्ला देतोच. जे लोक जिभेवर ताबा ठेवून सगळे प्रमाणात खातात, नियमित व्यायाम करतात, ज्यांच्या कडे तशी अनुवांशिकता नाही, त्या सर्वांनी........…....
मस्त खा, प्या आणि मजेत राहा !
जाऊद्यात ते तज्ञ आणि त्यांचे सल्ले बिल्ले ....
काय म्हणता? ☺

वरिल दुसरी लिंक चुकीची आली होती ती बरोबर केली आहे.

डॉ. कुमार करा संकल्प Happy अथवा झीरो ऑइल कुकींग एक्स्प्लोअर करुन बघा. (वर बरोबर केलेली लिंक बघा). या नादात मी पूर्ण स्वयंपाकही शिकलो १०-१२ दिवसांत.

कुमार सर,
एक शंका आहे. कोलेस्टेरॉल संदर्भात जेव्हा खाद्य तेलांची माहिती वाचनात येते तेव्हा ओमेगा 3 वगैरे असा उल्लेख येतो.
हा ओमेगा प्रकार काय आहे ?

@साद,
तेलांमध्ये जी असंपृक्त मेदाम्ले असतात त्याची तांत्रिक नावे देण्याची ओमेगा ही एक पद्धत आहे.
या मेदामलांची ओमेगा- ३, ६, ७ & ९ अशी 'कुटुंबे' असतात.

ओमेगा- ३ ही आम्ले सोयाबीन, सरकी, मका व जवसाच्या तेलांमध्ये असतात. ही तेले हृदयविकार, rheumatoid संधिवात आणि अल्झायमर आजारांच्या रुग्णांसाठी उपयुक्त असतात

@ कारवी,
चांगला, वादग्रस्त उत्तर असलेला आणि एका वाक्यात उत्तर न देता येण्याजोगा प्रश्न!

१. होमोसिस्टीन आणि हृदयविकार याचा परस्परांशी कसा संबंध असतो यावर १९३० पासून संशोधन चालू आहे.
२. होमोसिस्टीनला या संबंधात risk factor म्हणून मान्यता आहे पण, तो हृदयविकाराचे “कारण” ( cause) आहे असे ठामपणे म्हणता येत नाही.

३. तो पेशींमध्ये ‘free radicals’ चे प्रमाण वाढवतो >>> atherosclerosis >> करोनरी हृदयविकार
४. तो रक्तवाहिन्यानची लवचिकता कमी करतो.

५. धूम्रपान, उच्च-रक्तदाब, वाढीव कोलेस्टेरॉल या सर्वांनी मिळून शरीरात जी ‘आग’ पेटवली असेल त्यात होमोसिस्टीन तेल ओततो !!
६. ब- १२ जीवनसत्व आणि व्यायाम हे घटक होमोसिस्टीनची पातळी कमी करतात.

सारांश :
लेखातील खालील वाक्य बघा :
“ रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही आयुष्याच्या प्रवासातील एक जोखीम नक्की आहे. पण, त्यामुळे ‘करोनरी हृदयविकार होईलच’ असे विधान मात्र करता येत नाही.”
आता त्यात ‘कोलेस्टेरॉल’ च्या जागी ‘होमोसिस्टीन’ शब्द घातला की झाले !

धन्यवाद, कुमार१. Happy
समजलं, सगळे घटक एकाच वेळी नको त्या प्रमाणात असतील तर धोका वाढतो;
पण हे व्यक्तीसापेक्षही, गणितासारखे प्रत्येकाचे १+२+३ = ६ च न होता काहीही असू शकेल.
घाटातल्या 'धोक्याचे वळण' सूचनांसारखे. प्रत्येक वळणाला, प्रत्येक गाडीला अपघात होईलच असे नाही पण पाटीची दखल घेऊन प्रत्येकाने, प्रत्येक वळणावर सावध रहाणे मात्र गरजेचे.

माझा प्रतिसाद कुठे गेला?
मी विचारले होते घरचे साजूक तूप चालते का?
कुमार१ म्हणाले होते हो
प्रतिसाद कसा शोधावा

michto, या पानावरचा माझा पहिला प्र बघा.
त्यात तेलांची माहिती आहे. तुपात Saturated FA (SFA) = सफा असते. तेही प्रमाणात लागतेच

कुमार, तुमच्या लेखातून कोलेस्टेरॉल चांगले समजले आहे. पण वरती होमोसिस्टीन बद्दल नव्यानेच चर्चा झाली आहे.
तर होमोसिस्टीन हे नक्की काय आहे ?

@ साद ,
आपल्या पेशींमध्ये ‘मेथीओनिन’ हे एक अमिनो आम्ल असते. त्याचा अपचय (catabolism) होताना ‘होमोसिस्टीन ‘ तयार होते.

पुन्हा टप्प्याटप्प्याने होमोसिस्टीन चे मेथीओनिनमध्ये रुपांतर होत असते आणि या कामी ‘ब-१२’ जीवनसत्व महत्वाची भूमिका बजावते.

त्यामुळे प्रमाणाबाहेर होमोसिस्टीन रक्तात साठणे हे चयापचयात काहीतरी बिघाड झाल्याचे लक्षण असते.
त्याचा रक्तवाहिन्यांवरील परिणाम वर स्पष्ट केलेला आहे.

डॉक, होमोसिस्टीनच्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.
संशोधन कितीही झाले तरी १००% रोगनिदान करणे अवघडच असते असे दिसते.
पुलेशु

Pages