रुंबा

Submitted by विद्या भुतकर on 30 November, 2017 - 23:33

काल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता. आता सिग्नल ग्रीन झाल्यावर आपण गाडी दामटेपर्यंत अनेक निरीक्षणं करुन, गाडी किती वेगात सुरु करायची आणि कुठून काढायची, तिथून निघून पुढे जिथे जायचं आहे तिथे पोहोचायला किती वेळ लागेल इथंपर्यंत सर्व विचार एका सेकंदात होऊ शकतात.

आता हेच सर्व एका मशीनला करायचं असेल तर? प्रत्येक शक्यता पडताळून, आजूबाजूचं अंतर मोजून, बाजूच्या लोकांच्या वेगाचा अंदाज घेत एक सिग्नल पार करण्यासाठी एक मशीन बनवायचं झालं तर त्यात लाखो, करोडो शक्यता त्या मशीनला फीड कराव्या लागतील आणि त्यासर्वांतून त्याने योग्य ती सिलेक्ट करुन पुढे जावं लागेल. हे मशीन बनवण्यासाठी किती वेळ लागेल माहित नाही(गूगलला विचारावं लागेल त्यांच्या 'मॅनफ्री' कार बद्दल. तर एकूण काय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खायचं काम नाहीये.

आता गोल गोल फिरणारं चक्रासारखं जमिनीवरचा कचरा साफ करण्यासाठी असलेलं हे मशीन जे आमच्याकडे फायनली घेतलं त्याचंही असंच आहे. त्याला घरातल्या पसाऱ्याचा, वस्तूंचा आणि खुर्ची वगैरेचा अंदाज घेऊन साफ करायला एक तासभर लागतो, त्यातही मधेच तो आपली लाईन सोडून वाकडा चालत जाऊन दुसऱ्या खोलीत घुसतो आणि माझ्यातल्या थोड्याफार 'शिस्तप्रिय' व्यक्तीला त्याचा त्रास होतोच. एक रूम आधी कर ना ! सारखे माझे विचार गप गिळावे लागतात. आज माझी एक काळी मेटलची क्लिप गिळून अडकून बसल्यावर तक्रार केलीच. चार वेळा रीसेट करुनही का चालत नाही म्हटल्यावर ती चेक केलं तर क्लिप मिळाली. ती क्लिप मीच उचलायची तर मग हे मशीन कशाला ना? या असल्याचं कारणांनी आजवर तो घेतला नव्हता. असो.

शेवटी आणलाच आहे. आता तो आल्यापासून आमच्या घरात मी सोडून तीन वक्ती जरा जास्तच उत्साहात आहेत, कोण ते सांगायला नकोच. नवऱ्याने त्याचा लगेच फोनवर, वायफाय वर सेटअप केला तर मुलं स्वतःच तो उचलून उचलून त्यांना हव्या त्या ठिकाणी तो ठेवत आहेत. आपणच त्याच्या मागे फिरत कचरा उचलतो की नाही बघत आहेत. या सर्वात माझी चिडचिड एका गोष्टीवर होत आहे ती म्हणजे मुलांची त्या मशिनप्रती वागणूक. ते जणू आपल्या घरातील पाळीव प्राणीच आहे असं वागत आहेत. तेच कशाला काल मीही नवऱ्याला म्हणाले की,"त्याला आता तिकडच्या खोलीत नेऊन सोड'. आज मुलीने शाळेत सांगितलंही, आमच्याकडे नवीन 'पेट' आणलं आहे रुंबा नावाचं.

नजीकच्या काळात रोबॉट, किंवा उत्तर देणारी मशिन्स, प्रोग्रॅम्स वाढलेत आणि ते वाढतच राहतील. हळूहळू त्यांची 'इंटरऍक्टिव्ह' असण्याची शक्ती वाढेल तसे लोकांशी बोलणं, वगैरे वाढत जाईल. आजवर काही बेसिक गोष्टी होत्या, उदा: पूर्वी अलार्म क्लॉक होतं, आता फोन किंवा मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं असतात. त्यांच्याशी बोलणारे लोक पाहिलेत मी. आमचा मायक्रोवेव्ह किंवा वॊशिंग मशीन एकदा काम झालं की दर मिनिटाला ओरडत राहतो, मीही वैतागून 'गप रे !' म्हणते. हे बघून माझी मुलगीही एकदा अशीच सकाळी ओरडली होती मायक्रोवेव्ह वाजला तेव्हा. पुढे एका मित्रांकडे गेलो तर तिथे 'ऍलेक्सा' होती.ती म्हणजे, अमेझॉनचं तुमच्याशी बोलणारं मशीन. 'ऍलेक्सा, किती वाजलेत?' म्हटलं की ते सांगणार. मुलांनां सुरुवातीला त्याचं कौतुक वाटलं पण नंतर त्यांनी, 'अलेक्सा' म्हणून खेकसून बोलायला सुरुवात केली. खूप चिडले होते मी ते पाहून.

पुढे अशाच काही ठिकाणी अनुभव आले जिथे मशीनवर खेकसून बोललं जाताना पाहिलं. त्यामुळे ते घरात नकोच असं वाटलं. एकदा मुलाने मला विचारलं होतं,'आई व्हाय डू यु हेट सीरी? ती तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे म्हणून का?" त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही. Happy कारण माझ्यापेक्षा हुशार लोक मला आवडत नाहीत हे त्याने कुठून जाणलं असेल याचा विचार मी करत होते. Happy असो. तर एकूणच आपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. हेच त्यांचं मी प्राण्यांच्या बाबतीतही पाहिलं आहे, बरीच मुलं पाळीव प्राणी हवाय म्हणतात पण घरी असल्यावर त्याला त्रासही देतात. किंवा ऑर्डर सोडल्यासारखे बोलतात,"डॉगी सिट!" वगैरे. हा उद्धटपणा वाढतच जातो कारण ते प्राणी उलटून उत्तर देत नाहीत. पुढे जाऊन सांगायचं तर घरात कामाला येणाऱ्या मावशी किंवा घरकामासाठी कायमस्वरुपी ज्यांच्याकडे लोक असतात त्यांची मुलं त्या लोकांशीही अशीच वागताना पाहिलीत. आम्हालाही मुलांना मावशींशी नीट बोलण्यासाठी रागवावे लागले आहे. आई-वडील घरातील एकाद्या मोठ्या व्यक्तीला मान देत नसतील तर मुलंही तशीच वागतात हेही पाहिलं आहे.

मुलं मोठी होईपर्यंत हे मशीन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली उपकरणं वाढतच जाणार आहे. लहान असताना, मोठ्यांशी आदराने वागायचं, उलट उत्तर द्यायचं नाही हे शिकवलं जायचं.आजच्या पिढीतल्या मुलांना या गोष्टी शिकवणं अजूनच अवघड जाणार आहे. व्यक्तीचा आदर, पाळीव प्राण्यांना योग्य वागणूक वगैरे तर शिकवावं लागेलच . शिवाय आता ही मशीन्सही. टेक्नॉलॉजि वापरु नये असं मी म्हणणार नाहीच, पण त्यातून मुलांवर होणारे संस्कार बदलत नाहीयेत ना हे नक्कीच पाहायला हवं. हे मीच नाही तर इथे अनेक लोकांचं निरीक्षण आहे. आपल्या घरात अशा गोष्टी आणतांना या सर्व गोष्टींची जाणीव आपण ठेवावी लागेल. मुलांच्या वागण्यात थोडाफार जरी फरक जाणवला तर योग्य तेंव्हा त्यांनाही त्या गोष्टींची जाणीव करुन दिली पाहिजे. असो. त्यासाठी मलाही आमच्या घरातल्या मायक्रोवेव्हवर ओरडणं बंद करायला लागेल. Happy आणि तुम्हालाही 'प्लिज होल्ड द लाईन' म्हणणाऱ्या ऑटोमेटेड आवाजाला "नाही करणारा जा" म्हणणं बंद करावं लागेल.

https://tenor.com/view/cruising-life-baby-slide-roomba-gif-10265490

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिले आहे. ए. आय. माझ्या अभ्यासाचा विषय आहे तरीही ह्या बाजूने कधी विचार केला नव्हता.

आपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. >>> अगदी अगदी झाले इथे तर

आपण दसर्‍याला /लक्ष्मीपूजनाला पुस्तके, आपल्या रोजच्या वापरातील वस्तु, दागिने, घरतील गॅजेट्स, गाड्या वगैरेंची पूजा करतो. ह्यातील कर्मकांड बाजूला ठेवले तर त्या वस्तुंप्रती आपला आदर आपण व्यक्त करित असतो. अर्थात एकदा पूजा करून वर्षभर त्यांचा अवमान करायचा नसतो हे ही आपल्या मुलांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यक आहे. आई-वडिल जे सांगतात ते मुले करत नाहीत तर आई-वडिल जे करतात ते मुले करतात. त्यामुळे आधी आपले आचरण कसे आहे हे तपासून घेतले पाहिजे.

अगदी लहान सहान गोष्टी मधून तूम्ही जे काही positive लिहता ते खुप आवडते.... म्हणून तूमचा एक ही लेख चुकवत नाहिच..... नेहमी नविन शिकायला मिळते .

रुंबा मस्त मशीन आहे. मी दर वीकांताला वापरते. माझे पेट रुम्बा चालू असले की सोफा वर बसून बघत बसते गोल गोल कुठे फिरते आहे ते.

तुम्ही विषयाचे मराठीकरण ठीक केलेले आहे पण मूळ कल्पना ज्या लेखातून उचलली आहे त्याला रेफरन्स देणे आवश्यक आहे. तुमचे अ‍ॅलेक्सा आणि त्यावर ओरडणे वाचल्यावर लगेचच या एन पी आर मधल्या आर्टीकल ची आठवण झाली.

https://www.npr.org/sections/health-shots/2017/10/30/559863326/alexa-are...

एखादी गोष्ट ऐकून किंवा वाचून ती आपल्या भाषेत लिहावी वाटणे यात काही चूक नाही, पण मूळ गोष्टीचा रेफरन्स देणे महत्त्वाचे आहे.

धनी तुमचं आर्टिकल वाचले, वाटत नाहीय की विद्याजी नि हे आर्टिकल वाचून लेख लिहिलाय.नक्की काय सेम वाटतंय तुम्हाला आर्टिकल मध्ये?

धन्यवाद धनि लिन्क्बद्दल. मी लिहित असलेल्या कुठल्याही लेखाबद्दल मला असं वाटलं नाही की ते माझं सन्शोधन आहे. तुम्ही दिलेली लिंक आणि तसेच कमीत कमी अजून १०-१२ लेख या विशयावर आले आहेत, असतील आणि येतील. काही मी वाचले आहेत पण हे त्यातले एक नाहीये. त्यामुळे मी ते या एकाच लेखावर आधारीत लिहिळं आहे हा निष्कर्ष चुकीचा आहे. त्यामुळे मी कुठलेही रेफरंस दिले नाहीय.
माझा मुद्दा हा आहे कि मुलं केवळ मशिनच नाही तर उलटुन न बोलणार्या प्राणि किंवा घरात येणार्या मावशिंशिही तसेच वागतात.त्यामुळे मी घरात पाळीव प्राणीही आणण्यास सहमत नाहीये. असो.
ही काही उदा देत आहे पण तीही मि नीट वाचली नाहीयेत.(वाचण्यापेक्षा लिहीते जास्त Wink )

माझ्या घरी रुंबा आल्याने त्यावर लिहिले आहे. त्यात कुनाचे लेख चोर्ण्याचा मुद्दा तर अजिबात नाहीये.

https://www.nytimes.com/2017/10/07/opinion/sunday/children-alexa-echo-ro...
https://www.washingtonpost.com/local/how-millions-of-kids-are-being-shap...

वाचण्यापेक्षा लिहीते जास्त >> फक्त आपले विषय कुठल्या आर्टीकल वरून सुचत असतील तर त्या आर्टीकल ना ( एक किंवा अनेक) क्रेडीट देणे हे गरजेचे असते. मी तुम्ही चोरी केलीये असे म्हणत नाही, पण मूळ आर्टीकल ना रेफरन्स / क्रेडीट देणे महत्त्वाचे आहे.

ये रुंबा रुंबा क्या है......? आय डोंट नो व्हॉट यू से..... हम बने तुम बने एक दुजे के लिये....... हे आठवलं!

एखादी गोष्ट ऐकून किंवा वाचून ती आपल्या भाषेत लिहावी वाटणे यात काही चूक नाही, पण मूळ गोष्टीचा रेफरन्स देणे महत्त्वाचे आहे.
>>
हा लेख हे काही नवे कोरे संशोधन मांडणारे व त्यावर आधारीत लेख नाही.
रुंबा हा काही एकच रोबोट नाही व तो बनवनारी कंपनी एकमेव नाही.
असे मशिनवर ओरडणा-या घटना, तुम्ही दिलेल्या npr.org मधल्या लेखाव्यतिरिक्त व त्याआधी हजार वेळा झाल्या असतील.
घरकाम करणारे असे हजारो रोबोट व त्या अनुषंगाने घटना असतील.

हे सर्व कोणा एकाचे मालकी हक्क नाही किंवा आय.पी. नाही.
त्या सर्व कोणाच्याही आयुष्यात कधिही कुठेही घडू शकणा-या ख-या घटना आहेत.
त्यांचा कॉपिराईट घेता येत नाही.

विद्याताई म्हणतायत की त्यांनी तो npr.org वाला लेख वाचलेला नाही. पण जरी समजा त्यांनी तो लेख वाचुन हा लेख लिहिला असता तरी,
लेखकाकडे अगदी असाच रोबोट आहे + त्यांच्या घरी तशाच घटना घडलेल्या आहेत;
असे असतान लेखकाने दुस-या कोणाल क्रेडीट का द्यावे? त्यातुन त्यांनी तो लेख वाचलेलाच नाही म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला.

एखादी कल्पना किंवा घटना कोणाचीही वयक्तीक मालकी नसते. तर लेखकाची ( कलाकारची) स्वतःची मांडणी ही त्यांची आय.पी. / पेटंट / कॉपिराईट असते.

त्यामुळे अशा गोष्टींसाठी क्रेडीट द्या म्हणने अतार्कीक आहे. अशा हजारो बातम्या / लेख आंतरजालावर येत असतात. कलाकारच्या आयुष्यात अगदी तसेच घडले म्हणुन प्रत्येक कलाकाराने अशा दुस-या लेखांना क्रेडीत देत फिरावे का? तेही दुस-यांचे मुळ कॉपिराईट नसताना?

फक्त आपले विषय कुठल्या आर्टीकल वरून सुचत असतील तर त्या आर्टीकल ना ( एक किंवा अनेक) क्रेडीट देणे हे गरजेचे असते.
>>
१०१% चुकीचे विधान.
असे तर मग तुम्ही आधी देवनागरी लिपी शोधणा-याला, मराठी भाषा शोधणा-यला व आंतरजालाचा शोध लावणा-याला व तुम्हाला आज एवढे हुशार बनवणा-या तुमच्या शिक्षकांना क्रेडीट द्यायला हवे - तेही तुमच्या प्रत्येक प्रतिसादात / लेखांत - प्रत्येक ठिकाणी.

कलाकारच नव्हे तर सामान्य माणुनही रोजच्या जीवनात अनेक वस्त, घटना व इतिहासातुन प्रेरणा घेतच असतो. हुशारीचा एक भाग, दुस-याला कशामुळे यश मिळाले तसेच आपणही करणे होय. आजवरच्या मानवजातीच्या हुशारीत, अशा "कॉपी" करण्याचाही मोठा वाटा आहे. त्याच्यावर कुणाचाही हक्क नसतो. त्यामुळे नुसते सुचले म्हणुन क्रेडीट वगैरे काहीही देऊ नये. मांडणी आणि व्यक्त होण्याची पद्धत महत्वाची, तीचा कॉपिराईट असतो.

माझा रुंबा अजून आला नाहीये. वाट बघतेय कधी येईल ह्याची.
तू म्हणतेस तसा विचार केला नव्हता की आपण गॅजेट्सवर खेकसून बोलतो ते उलट उत्तर देत नाहीत म्हणून. पण पटलं ते. आमच्याकडे अ‍ॅलेक्सा अगदी दोनेक आठवडेच टिकली असेल. आता तिला बासनात गुंडाळून ठेवली आहे.

धनि, मला नाही वाटत तिने ह्या त्या साईटला लगेच क्रेडीट द्यायला हवं. तिने लेख शेवटी स्वतःचे विचार घालूनच लिहिला आहे. लेखाच्या शेवटी गॅजेट्सवर ओरडण्याबद्दल जे लिहिलंय त्याबद्दल कदाचित म्हणू शकली असती की एका लेखात असं वाचल्यामुळे असं लिहायचं डोक्यात आलं वगैरे...

लेखाच्या शेवटी गॅजेट्सवर ओरडण्याबद्दल जे लिहिलंय त्याबद्दल कदाचित म्हणू शकली असती की एका लेखात असं वाचल्यामुळे असं लिहायचं डोक्यात आलं वगैरे...>>>> शेवटचे ( आणि महत्त्वाचे ) तीन पॅराग्राफ हेच मी लिहीले आहे. की ही मूळ कल्पना त्यांची नाही.

छान लिहिले आहे.
अभि_नव यांचे म्हणणे पटले. अनुमोदन.

लेखाच्या शेवटी गॅजेट्सवर ओरडण्याबद्दल जे लिहिलंय याबद्दल कदाचित म्हणू शकली असती की एका लेखात असं वाचल्यामुळे असं लिहायचं डोक्यात आलं वगैरे.>>>> मीही कधी कधी GPS ला बोलते कि 'हो गं बाई, गाडी वळविते ', 'हो हो ठिकाण आलं'. आता हे बोलणे माझे मलाच सुचलेले. पण जगात अजुनही असे लोक आहेत आणि त्यांनी असे बोललेले आहे. त्यामुळे कोणी, 'तू अगदी त्यांच्या सारखे बोलतेस तर त्यांनाच क्रेडिट दे' असे बोलून कसे चालेल? असा अट्टाहास का?

इथेसुद्धा एक ऋंबा आहे तो सुद्धा असाच वेडावाकडा धावत सुटलेला असतो. पण तो साफसफाई करण्याऐवजी जिकडेतिकडे धाग्यांची गुंतवळ करत असतो असं म्हणतात Wink

पाय, इथला ऋंबा नको अजिबात. आमच्या रुंब्याला आम्ही अ‍ॅपच्या तालावर हवं तेव्हा ऑन ऑफ करतो. इथला आउट ऑफ कंट्रोल आहे. Wink

घरी एक लाईट वेट आणि एक जड वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लिनर आहे.रुंब्याच्या किमती भारतात जरा जास्त वाटल्या.शिवाय आमच्या घरच्या कचऱ्या व्हरायटी ने रुमबा 2 आठवड्यात मान टाकेल आणि फिरता देह ठेवेल अशी भीती आहे.
(झाडूने मारताना झुरळाला सॉरी मी पण म्हणते.ते शक्यतो एका फटक्यात मरावं अशी व्यवस्था करते. झुरळ न मारता पकडून बाहेर सोडणे ही हिंमत या देहात नाही.तशी पेस्ट कंट्रोल मुळे जास्त वेळ येत नाही.)

ऋंबा Proud __/\__

अवांतर - असे जोक वाचनात आले की मला विपू करत जावा रे ..

In India you can buy Made in India. We have MILAGROW - Made in India. It is OK cost is around 24 to 30 K.