लग्नाआधीचे डेटींग ....

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 November, 2017 - 16:14

बेफिकीर यांच्या लग्नविषयक धाग्यावर लग्नात होणार्‍या खर्चावर चर्चा चालू होती. चर्चेच्या ओघात लग्नाआधी एकमेकांना समजून घेणे कसे आवश्यक असते यावर गाडी वळली. तिथे मी लग्नाआधी दोघांनी काही काळ एकत्र घालवण्याची गरज असते असे विधान केले. एकादोघांनी चुकून त्याचा अर्थ लिव्ह ईन रिलेशनशिप असा काढला आणि मला लिव्ह ईनवर वेगळा धागा काढायला सुचवले. पण मला लिव्ह ईन अभिप्रेत नव्हते. तरी जे म्हणायचे होते ते त्या धाग्याशी संबंधित नसल्याने हा वेगळा धागा काढला.

तर ज्यांची लग्ने ठरवून होतात, म्हणजेच जे अरेंज्ड मॅरेज करतात ते एकमेकांना कसे जाणून घेतात हे त्यांचे तेच सांगू शकतील. मला अनुभव नाही. पण लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाहात आपल्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे आपण एकमेकांना फार छान समजतो असा बरेच जोड्यांचा गैरसमज असतो. तो तसाच कायम ठेवून, ईतर शहानिशा करायची गरज न भासता बिनधास्त लग्न केले जाते. आणि मग लग्नानंतर प्रॉब्लेम्स सुरू होतात.
प्रत्येक प्रेमी युगुलाला वाटत असते की आपले प्रेम अमरप्रेम आहे, जगात आपल्यासारखे दुसरे कोणाचे नसावे. पण प्रत्यक्षात बरीच प्रेमप्रकरणे बाह्य सौंदर्यावर भाळून सुरू होतात. म्हणजे एखाद्या मुलाला एखादी सुंदर मुलगी आवडते. तो तिच्या मागे लागतो. तिला पटवायला तो बरेच पापड भाजतो. शेवटी त्याने आपल्या प्राप्तीसाठी केलेली धडपड हेच त्याचे प्रेम आणि तेच कायम राहणार असे समजून ती त्याला होकार देते. अर्थात तो आपल्या योग्यतेचा आहे का हे देखील साईड बाय साईड बघितले जाते. पण तेवढेच बघितले जाते. त्याचे आपल्याशी कसे जुळते हे तर अफेअर सुरू झाल्यावरच समजते. त्यामुळे अश्या प्रेमप्रकरणात प्रेम हे दोन्हीकडून उत्पन्न झालेले असेल याची खात्री नसते. ते आधी एकाच्या मनात उमलते आणि दुसर्‍याने केवळ त्याच्या भावनांचा स्विकार केलेला असतो. त्यातही ज्याच्या मनात हे प्रेम उमलले आहे ते वर नमूद केल्याप्रमाणे निव्वळ बाह्य आकर्षणावरून असेल तर पुढे त्यांचे दैनंदिन व्यवहारात कसे जमते यावरच त्यांचे नाते कसे फुलते आणि किती टिकते हे ठरते.

बरेचदा जे नाते मैत्रीपासून सुरू होते त्या नात्यांचे पुढे प्रेमात रुपांतर झाल्यास ते टिकायची संभावना जास्त असते. कारण त्यात केमिस्ट्री बरेपैकी आधीच जुळलेली असते.
पण यातही एक गंमत असते, दोघांमधील मैत्रीचे नाते मैत्रीच्या नजरेतून ठिकठाक असते. पण तेच नाते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे झाल्यावर काही समीकरणे बदलतात. एकमेकांवर सांगितला जाणारा हक्क आणि एकमेकांकडून धरल्या जाणार्‍या अपेक्षा यात आधीपेक्षा फरक पडतो. ते एकाला जरी उमजले नाही, किंवा उमजले पण जमले नाही तर नाते फिस्कटते. आणि मग फिरून मैत्रीही शिल्लक राहत नाही.

ईथे माझेच उदाहरण देतो.
मी आणि माझी सध्याची पर्मनंट गर्लफ्रेंड. आम्ही दोघे आधी मित्रच होतो. हळूहळू तिच्या बाजूने मैत्रीच्या पलीकडे गेले. आणि तिने मला प्रपोज केले. तिला नकार द्यावा असे काहीही कारण नव्हते. मात्र मी त्या नात्यासाठी तयार नव्हतो. मी तिच्याकडे वेळ मागितला. त्यानंतर आम्ही जवळपास दोन महिने एकत्र फिरत होतो. जवळपास दर संध्याकाळी भेटणे व्हायचे. कधी गार्डनमध्ये तर कधी मॉल वा रेस्टॉरंटमध्ये. दर शनिवारची एखादी वन डे ट्रिप व्हायची. बीच, रिसॉर्ट, वॉटरपार्क, नॅशनल पार्क, एलिफंटा केव्हस ते माथेरान, लोणावळा, मुंबई नजीकची सारी ठिकाणे यानिमित्ताने फिरून झाली. पण हे फिरणे नुसते मित्र म्हणून नव्हते. तर आम्ही डेटींग करत होतो. या मधल्या काळात आपल्या लग्नात येऊ शकणार्‍या संभाव्य अडचणींवर देखील आम्ही चर्चा करायचो. तसेच संसार करताना काय मतभेद होऊ शकतील, कोणाला किती अ‍ॅडजस्टमेंट कराव्या लागतील याचीही एकमेकांना प्रामाणिक जाणीव करून द्यायचो. कारण क्षणिक भावनेच्या आहारी जात आम्हाला आयुष्यभराचा निर्णय घ्यायचा नव्हता. आधी लग्न करून तर बघूया, नाही जमले तर वेगळे होऊया असा उथळपणाही करायचा नव्हता. आणि मग पुढे दोनेक महिन्याने मलाही वाटले की येस्स, या नात्यातही आपण कम्फर्टेबल आहोत तेव्हा मी सुद्धा होकार दिला.

अरेंज मॅरेजमध्ये सध्या काय सिस्टीम आहे याची नेमकी कल्पना नाही. पण पूर्वीच्या काळी जी लग्ने ठरवून व्हायची त्यात कांदेपोहे कार्यक्रमात मुलामुलींनी एकमेकांना बघणे एवढीच काय ती मुभा असायची. त्यामानाने हल्ली दोघे बाहेर एकांतात एकदोन भेटी घेऊ शकतात. मात्र त्या भेटी एकदोनच असतात, आणि मर्यादा राखून असतात. मला अनुभव नसले तरी मित्रांचे ऐकतो. जास्त भेटी होत नाहीत कारण मग अमुक तमुक मुलगी तमुक तमुक मुलाबरोबर फिरत होती हा शिक्का बसायची भिती असते. अश्याने पुढचे स्थळ यायचे नाही. परीणामी पुर्णपणे समजून उमजून न घेताच होकार वा नकार कळवला जातो.

डेटींग ही आजही आपल्याकडे एक फिल्मी संकल्पना समजली जाते. पण हे चित्र बदलायला हवे. अरेंज मॅरेज असो वा लव्हमॅरेज, डेटिंग व्हायला हवी. अन्यथा लव्ह मॅरेजमध्येही एकाने प्रपोज केल्यावर समोरचा बोलणार मला वेळ हवा आहे. पण त्या मागून घेतलेल्या वेळेत डेटींग न करता फक्त घरी जाऊन, मित्रमैत्रीणींशी चर्चा करून, किंवा आणखी कसली आकडेमोड करून निर्णय घेणार याला काही अर्थ नाही. शेवटी लाख गोष्टींची एक गोष्ट - लग्नखर्चाचे बजेट निम्मे करा. आणि तो खर्च या डेटींग प्रकरणावर करा. लग्न टिकायचे प्रमाण वाढेल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटी लाख गोष्टींची एक गोष्ट - लग्नखर्चाचे बजेट निम्मे करा आणि तो खर्च या डेटींग प्रकरणावर करा. लग्न टिकायचे प्रमाण वाढेल------+११११
एक कायम म्हटले जाते-- एक मुलगा व मुलगी कधीही एकमेकांचे चांगले मित्र राहू शकत नाही. कोणत्यातरी एकाबाजूने स्वतःहून किंवा मित्रमैत्रिणी चिडवतात म्हणून दुसर्याच्या प्रेमात पडतो/पाडला जातो. मित्र/मैत्रिण म्हणून जे निखळ नाते असते ते देखील मग अपेक्षाभंग झाल्यावर तुटते आणि मग फक्त कटू आठवणी तेवढ्या लक्षात रहातात.

योग्य मुद्दा मांडलाय रूनमेश.
लग्नाआधी डेटिंग आणि सेक्स.. दोन्ही महत्वाचे आहे... अर्थात डेट करत असाल तर प्रि मारीटल सेक्स असतेच म्हणा.
पुढील आयुष्य सुखकारक होण्यासाठी या गोष्टी नक्कीच जरुरी आहेत.

लग्नात येऊ शकणार्‍या संभाव्य अडचणींवर देखील आम्ही चर्चा करायचो. तसेच संसार करताना काय मतभेद होऊ शकतील, कोणाला किती अ‍ॅडजस्टमेंट कराव्या लागतील याचीही एकमेकांना प्रामाणिक जाणीव करून द्यायचो ----हे कसं काय जमलं? आणि तुम्हाला 100% खात्री आहे का तुम्ही प्रत्येक अडचणी चा आढावा घेतलात आणि gameplan तयार केलात.

राजसी, सोडा हो....
"डेटिंग मनाची एक अवस्था आहे , आम्हाला अडचणी आल्या कि आम्ही डेट वर जातो आणि अडचणी वर चर्चा करतो .." वगैरे फंडे ऐकून घ्यायची तयारी असेल तर पुढे विचारा Happy

BTW त्याचे आढावा घेणे अजून चालू असेल, लग्न कुठे झालाय त्यांच? Proud
* लग्न आधी कमीत कमी ६ महिने डेटिंग करावे याला माझे अनुमोदन. (अरेंज्ड marriage असले तरी)

* लग्न आधी कमीत कमी ६ महिने डेटिंग करावे याला माझे अनुमोदन. (अरेंज्ड marriage असले तरी), माझे देखिल याला अनुमोदन आहे. निदान भेटी वाढून हळू हळू स्वभाव कळू लागतात. एक मेकांना ओळखता येऊ लागते.
बाकी आमचे अ‍ॅरेंज मॅरेज असून हा अनुभव आम्ही घेतला आणि आता त्या आठवणी आठवल्या की खुप छान वाटते.

@ च्रप्स हा धागा फक्त डेटिंग साठी ठेवू. प्रीमॅरीटल सेक्स साठी ऋ भाऊ नवीन धागा काढतील. Proud
BTW
ऋ + 786
एक वेळेवरचा टाका (शिवणाचा) पुढील ९ टाके वाचवतो. सो डेटिंग आवश्यकच.
मी लाभार्थी Proud

टाका (शिवणाचा ) असे मुद्दाम म्लीहायची गरज नव्हती,
येऊ घातलेल्या धाग्याशी संबंधित गोष्टी हल्ली "बिनटाक्याच्या "होतात Wink

अनुमोदन. नाही पटल्यास वेगळे होते. लग्न झालयवर पटले नाहीतर विभक्त होणे फारच कटकटीचे आहे. लग्न ही संकल्पना मो डीत काढली तरी चालेल. म्हण जे लगेच लिव्ह इन ला पाठिंबा आहे असे ठरवून झोडपू नका. मुलगे व मुलींनी शिक्षण संपवून नोक र्‍या धरून / धंदे उभारून मुक्त सिंगल जीवनाचा अनुभव घ्यावा. आपल्याला काय प्रकारची रिलेशन शिप हवी आहे. काय प्रकारची कमिटमेंट हवी आहे? का सिंगलच मजेत राहाय्चे आहे हा सखोल विचार करावा. प्रथम आय कॅण पे माय बिल्स ही कॅपे बिलिटी स्वतःत निर्माण करावी ती करतानाच हव्या त्या पार्टनरचा शोध घ्यावा व दोघांना हवे असल्यासच पुढे जाउन लग्नाची कमिटमेंट घ्यावी.

पालकांचे दडपण आहे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी लग्न हा डिसिजन अंडर फोर्स घेउ नये.

लग्नाआधी डेटिंग करावेच. दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यावर, साखरपुडा झाल्यावर ते लग्न होई पर्यंत झक्कास दिवस असतात. खरे तर तेवढेच दिवस झक्कास असतात. लग्न झाल्यावर मग भ्रमनिरस व्हायला सुरुवात होते . Wink

लग्नाआधी नवरा बायकोचा स्वभाव जाणून घेणे वगैरे नक्की कधी आणि कसे होते देवास ठाऊक. दिवसातून दोन चार तास फोनवर गोड गोड बोलायचं, कधीतरी एखादा तास दोन तास भेटायचं, पिक्चर बघायला जायचं यात सगळे चांगलेच वागतात.
एखादा दोन तास भेटायला झक्कास पैकी नटून थटून आलेली गर्लफ्रेंड आणि रोज कामाचा रगाडा उपसून दमलेली अवतार झालेली बायको, उठसुठ स्रीदाक्षिण्य दाखवणारा, फेमिनिझम वर आवेशाने बोलणारा आणि लग्नानंतर घरात एक काडीसुद्धा इकडची तिकडं न करणारा नवरा यात फरक असतो महाराजा.

इथं ज्यांनी ज्यांनी लग्नाआधी डेटिंग केलं तेव्हाची लाईफ पार्टनरची वागणूक आणि लग्नानंतर 5 ते 10 वर्षातली वागणूक यावर ऑब्जेक्टवली विचार केला तर माझा मुद्दा लक्षात येईल कदाचित.

मी तर बायकोला स्पष्ट सांगितलं होतं की मी जसा तुझ्याशी/तुझ्यासमोर आजन्म वागणार आहे तसाच लग्नापर्यंत वागेन, तुला जर वाटत असेल की पुढची 25 ते 30 वर्षे तू मला सहन करू शकतेस, तर लग्न करू या.

डेटिंग कराच, पण उगाच खुपकाही भव्यदिव्य अपेक्षा ठेऊन, एकमेकांचे स्वभाव कळतील, ह्यांव होईल आणि त्यांव होईल असलं काही विचार करत नका बसू. स्वभाव, विचार, माणूस, प्रगल्भता सगळे सब्जेक्टिव्ह असते आणि काळानुसार बदलत जाते.

खा प्या, हिंडा, मजा करा, हसा खिदळा, जमतील तेवढे पिक्चर बघा. वोह दिन फिर नहीं आते बगूआ .....

लग्नाआधी सेल्समनगिरी असते.. आपला माल खपला पाहिजे म्हणून.. फक्त गुण दाखवले जातात..दोष लपवण्याकडे कल असतो कारण आजकल सर्रास एंगेजमेंट मोडतात लोक.

मी तर बायकोला स्पष्ट सांगितलं होतं की मी जसा तुझ्याशी/तुझ्यासमोर आजन्म वागणार आहे तसाच लग्नापर्यंत वागेन, तुला जर वाटत असेल की पुढची 25 ते 30 वर्षे तू मला सहन करू शकतेस, तर लग्न करू या.
>>
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर डेटिंग करताना लोक उगाच गोडगोडुलं वागून दाखवतात, शायनिंग मारायला महागडी गिफ्ट वगैरे देत राहतात, त्यांना कळतच नाही की आपणच आपल्या पार्टनरच्या अपेक्षा चुकीच्या पद्धतीने वाढवत आहोत.

अतरंगी on 27 November, 2017 - 13:50> अगदी +१००
हेच लिहायचं होतं मलाही.
लग्नाआधी साताठ वर्ष प्रेम चालु होतं. म्हणजेच वी वर डेटिंग Happy
पण ते एक दोन तास भेटणं, वन डे पिकनिक ह्यात प्रेमानेच वागणार ना? का आतासारखी एकमेकांची उणीदुणी काढणार Wink
हा भांडणं व्हायची पण ती पण कसली क्ञूट असायची Lol आतासारखी सिरीयस नसायची.
त्याच्यासाठी व्यवस्थित तयार होउन जाणं, भेटीची उत्सुकता वैगेरे असतेच. कारण आपण तेव्हा तिन्ही त्रिकाळ चोवीस तास एकमेकांसोबत / एकमेकांसमोर नसतो. Happy

पण... ऑन सिरीयस नोट..लग्नाआधी एकमेकांना वेळ देणं खरंच गरजेचं आहे. अरेंज मॅरेज मधे लग्न जमण्याच्या आणि लग्नाच्या मधे निदान ६-७ महिन्यांचा काळ असावा.
दोघांनीही भेटुन गप्पा माराव्या. माणुस कसा आहे हे थोडम्फार तरी कळतंच. लहान लहान गोष्टींमधुन. वाट्टेल त्या विषयावर गप्पा माराव्यात. भविष्याच्या, प्लॅनिंगच्या, तुझे आईबाबा, माझे आईबाबा, इतर नातेवाईक, त्यांचे स्वभाव, एकमेकांच्या आवडी निवडी वैगेरे वैगेरे.

माझ्या एका पुणेरी मित्राला भेटायला मुंबईची मुलगी येणार होती. फोटो बघाबघी, फोनवर थोडेफार बोलणे आधी झाले होते.

तिने सांगितले की मी इतक्या वाजता पुण्यात पोचेन, अमुक अमुक ठिकाणी CCD आहे तिथे भेटू या का ?

हा सरळ म्हणाला की मला CCD परवडत नाही, त्याच्या जवळच अमुक नावाचे हॉटेल आहे तिथे भेटू या. भेटल्यावर त्याने सांगितले लग्न होई पर्यंत TTMM करू या. Proud

पाच वर्षे झाली, सुंदर संसार चालू आहे.

अरेंज मॅरेज असो वा लव्हमॅरेज, डेटिंग व्हायला हवी. >>> अरेंज मॅरेज असो वा लव्हमॅरेज जोपर्यंत एकत्र रहात नाही तोपर्यंत एव्हरीवन विल पुट देयर बेस्ट फूट फॉर्वर्ड. त्यामुळे डेटींग मध्ये स्वभाव वगैरे काही कळत असेल असे वाटत नाही. अतरंगींची पोस्ट पटली.

लग्नात येऊ शकणार्‍या संभाव्य अडचणींवर देखील आम्ही चर्चा करायचो. तसेच संसार करताना काय मतभेद होऊ शकतील, कोणाला किती अ‍ॅडजस्टमेंट कराव्या लागतील याचीही एकमेकांना प्रामाणिक जाणीव करून द्यायचो ----हे कसं काय जमलं?

>>>>>>>>

रात्री वेळ मिळताच सविस्तरपणे दोन्ही लिस्ट देतो.

पण हे जमवणे गरजेचे आहे याचीच बरेच जणांना कल्पना नसते. आपण आवडले आहोत न एकमेकांना, आपल्यातले अमुकतमुक गुण स्वभाव जुळले आहेत ना, आपण दोघेही समजूतदार आहोत ना, किंवा आपले प्रेम आहे ना एकमेकांवर, मग तेच आपल्याला तारून नेईल असा विचार करून लोकं पुढे जातात. आणि तेच पुढे अंगाशी येते..

आता सगळे चांगले अनुभवच सांगणार ना?
>>>>
असं काही नाही. ईथे याच मायबोलीवर मी माझ्या वाईट सवयींचा पाढा वाचला आहे. जे आयुष्य जसे जगलोय तसे मांडावे. गर्लफ्रेंड असतील सतरा पण कोणत्याही मुलीला लग्नाचे वचन देऊन फसवले नाही. कोणत्या मुलीच्या भावनांना दुखावले नाहीये. लग्नाचा निर्णय घेतानाही पुढे मागे माझ्यामुळे कोणती मुलगी दुखावली जाऊ नये किंवा तिला पुढेमागे माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होऊ नये म्हणून डेटींग करतानाच मी जसा आतून आहे ते देखील तिच्यापुढे उघड केले. कारण लग्न हे एक असे नाते आहे की तुमचा जोडीदार जर तुमच्यासोबत खुश नसेल तर ते नाते तुम्हालाही कधी सुख देणार नाही. त्यामुळे डेटिंग करताना नेहमी आपले चांगलेच गुण उधळा असे जे करतात ते समोरच्याला फसवत नसतात तर स्वत:चेच नुकसान करत असतात.

सॉरी पण वरच्या काही पोस्ट्स वाचून कदाचित लग्न हे स्थानक तुम्ही बायपास केलेत तरी चालेल असं वाटतंय. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड status बरं पडेल.

लग्न करणारच असाल तर अर्थातच शुभेच्छा!

राजसी, आपल्याला कबूल केल्याप्रमाणे लिस्ट देतो -

आमच्या लग्नात येऊ शकणार्‍या संभाव्य अडचणी -

१) आमचे लग्न झाल्यास ते आंतरजातीय, आंतरप्रांतीय, आंतरधर्मीय, आंतर आंतर आंतर असे बरेच काही ठरेल. त्या संदर्भाने चर्चा केली.

२) पत्रिकेवर आमचा दोघांचाही विश्वास नाही, पण घरचे जुळवून बघणार याची खात्री असल्याने आम्हीच आधी जुळवून पाहिली. त्यानुसार आमचा संसार नुसता हालअपेष्टांचा असून झाल्यास आमच्यापैकी एकाचा वा दोघांचाही मृत्युही होऊ शकतो असे स्पष्ट संकेत आहेत. तर घरच्यांच्या या अंधश्रद्धेविरुद्ध कसा लढा द्यायचा याची चर्चा केली.

३) आर्थिक परेस्थितीतील तफावत - मुलाची आर्थिक स्थिती मुलीपेक्षा कमी असेल तर जरा अवघड होते. माझी स्थिती वाईट नसली तरी तुलनेत डावी आहे. तर ती अडचण होऊ शकते का याचीही चर्चा केली.

संसार करताना काय मतभेद होऊ शकतील, कोणाला किती अ‍ॅडजस्टमेंट कराव्या लागतील -

१) लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचे की वेगळी चूल थाटायची - साधारण असे ठरले - सहाआठ महिने एकत्र राहून तिचे माझ्या आईवडीलांशी चांगले बंध जुळू द्यायचे. त्यानंतर दोनअडीच वर्षे वेगळे राहायचे. पहिले मूल झाल्यावर पुन्हा त्यासाठी आजीआजोबा हवेत म्हणून माझ्या आईवडीलांसोबत राहायचे. ते शाळेत जाऊ लागले की वेगळे राहायचे, पण तिच्या किंवा माझ्या आईवडीलांपासून हाकेच्या अंतरावर राहायचे.

२) फॅमिली प्लानिंग - अ) तीन वर्षे पहिली मूल होऊ द्यायचे नाही. ब) त्यानंतर अजून दोन तीन वर्षांनी दुसरे झाल्यावर दोनावरच थांबायचे. दोन्ही मुलगे झाले तरी मुलीसाठी तिसरा चान्स घ्यायचा नाही. तसेच पहिला मुलगा झाल्यावर घाबरून मुलगी दत्तक घ्यायला जायचे नाही. मूल आपलेच हवे. दत्तक मूल सांभाळायची मानसिकता आपल्या दोघांमध्ये नाहीये यावर शिक्कामोर्तब झाले. अन्यथा तिच्या डोक्यात हा पर्याय आलेला.

३) परदेशी वास्तव्य - ईंग्रजांच्या देशात तिचे बरेचसे नातेवाईक अगदी स्वातंत्र्यकाळापासून वास्तव्य करत आहेत. मी तिच्या आयुष्यात आलो नसतो तर तिचाही तिथेच जायचा आणि तिथेच सेटल व्हायचा प्लान होता. पण माझा मात्र भारतातच राहायचा प्लान असल्याने आमची यावर बरीच चर्चा घडली. फायनली माझे भारतातच राहण्याचे मत तिच्या परदेशी जाण्याच्या मतापेक्षा स्ट्रॉंग निघाल्याने तिने माझ्या मताचा आदर केला. आम्ही ईथेच राहणार आहोत.
मात्र मुलांवर कोणीही आपले मत लादणार नाही, त्यांना जिथे जायचे तिथे जाऊ द्यायचे हे ठरले. शिक्षणासाठी त्यांना परदेशी जावेसे वाटले तरी मी त्यात आडकाठी करणार नाही.

४) मुलांचे शिक्षणाचे माध्यम - मी मराठीत व्हावे यासाठी आग्रही होतो. त्यासाठी चांगल्या माध्यमाची मराठी शाळा जिथे असेल तिथेच घर घेऊया असाही माझा प्रस्ताव होता. मात्र ती स्वत: फादर फादर करणार्‍या ईंग्रजी माध्यमाची असल्याने आणि ईथे तिचे मत स्ट्रॉंग झाल्याने ईंग्लिश मिडीयमच ठरले.

५) करीअर - मुले झाल्यावर माझी नोकरी मी तशीच चालू ठेवणार. ती मुलांसाठी काही काळ नोकरी सोडणार. पण आजीआजोबांव्यतिरीक्त दुसर्‍या कोणाच्या हातात सोपवणार नाही. त्या काळात माझ्याच पगारावर घर चालणार. त्या काळाचा विचार करता लिविंग स्टॅन्डर्ड तसाच सेट करायचा. तसेच मुले मोठी झाल्यावर ती ज्या क्षेत्रात आहे तिथे स्वत:चा व्यवसाय चालू करणार. मी त्यात माझ्यापरीने सहाय्य करणार.

६) घरकाम - मी जेवण कधीतरीच बनवणार. बाहेरून वरचेवर आणायला माझी हरकत नाही. धुणी-भांडी-केरकचरा या ईतर घरकामासाठी बाई ठेवली जाईल. ईतर छोटीमोठी कामे ५०-५० टक्क्याने वाटून घेतली जातील. पण त्यातही ज्याला जे जमेल ते त्याने स्वत:हून करावे. उदाहरणार्थ, भाज्या आणायच्या आहेत तर तिने स्वत: जाऊन चांगल्या त्या आणाव्यात. नवीन ट्यूबलाईट बसवायची आहे, प्लंबर, ईलेक्ट्रिशिअन, कारपेंटर वगैरेना बोलवायचे आहे तर अशी कामे मी पुढाकार घेऊन करणार.

७) माझे बालपण दक्षिण मुंबईच्या चाळीत गेल्याने मी जरा अतरंगी कॅरेक्टर आहे. ती मात्र फ्लॅट संस्कृतीत वाढलेली व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड कॅरेक्टर आहे. मी मला बदलणार नाही की माझे फ्रेंड सर्कल बदलणार नाही. तसेच ती तिला स्वत:ला बदलणार नाही. थोडक्यात कोणीही दुसर्‍याला आपल्या रंगात रंगवायचा प्रयत्न न करता एकमेकांची डिग्निटी नेहमी जपली जाईल हे बघायचे.

८) मी नास्तिक ती आस्तिक - एकमेकांच्या विचारांचा आदर करायचा - मी मांसाहारप्रिय, ती शाहाकारप्रिय - ईथेही तेच लागू - मुलांना मात्र आस्तिकच बनवायचे. तसेच शाकाहार मांसाहार दोघांची गोडी लागेल हे बघायचे

अजूनही बरेच मुद्दे आहेत. ढिगाने आहेत. जे क्षुल्लक वाटतील असेही आठवून आठवून टाकले आहेत. हे तरी मी बरेच ढोबळमानाने सांगितले आहे. पण सारे मुद्दे अगदी तपशीलवार जसे ठरले आहेत तसे एका कागदावर लिहून काढले आहेत. तसेच त्याखाली दोघांनी स्वाक्षरी करून, ते पेपर स्कॅन करून दोघांकडे त्याची एकेक कॉपी आहे.
याचा अर्थ असा नाही की उद्या आमचे यापैकी एका कारणावरून बिनसले तर लगेच ते पेपर्स घेऊन आम्ही वकील गाठणार. पण एक ते स्वत:चे स्वत्व असते ना, ते जपायला तरी आम्ही पलटी खाणार नाही अशी आशा आहे.
तसेच परिस्थितीनुसार वरील बाबींत फरक पडू शकतोच. तो तेव्हा तेव्हा दोघांना कसा मान्य होतो हे तेव्हाचे तेव्हा. शेवटी प्रेम तर आहेच. ते तेव्हा कामाला येईल Happy

अरे वा. मस्तच आहे तुमचे हे प्रीनप.

>> मी जेवण कधीतरीच बनवणार
ह्या कधीतरी ची व्याख्या नाही का काही? प्री-डिफान्ड असेल तर पुढेमागे पडताळून बघता येईल.

आजी-आजोबा म्हणजे नाना-नानी की दादा-दादी, फक्त सख्खे आजी आजोबा की मावस, चुलत वगैरे? एकूण सगळ्या बाबी पुरूषप्रधान नजरेने चर्चिल्या गेलेल्या दिसतात.

देव करो आणि असं काही न हवो पण ह्या आयडियल संसारातल्या गोष्टींपेक्षा दुसरंच काही भलतं नशीबी आलं तर त्याला कसं काय सामोरे जाणार तुम्ही ते नाही का लिहून ठेवलं?

>> मी जेवण कधीतरीच बनवणार
ह्या कधीतरी ची व्याख्या नाही का काही?
>>>
सशल, मला जे पदार्थ बनवता येतात, त्यांची लिस्ट तिला दिली आहे. त्यानुसारच आपसूक त्याची वारंवारता सेट होईल. ते मोजकेच पदार्थ ती नक्कीच वारंवार खाणार नाही. तसेच जे मला बनवता येते ते मला बनवायलाही आवडते. त्यामुळे माझ्या अंदाजापेक्षा जास्त वेळा तिने मला बनवायला लावले तरी तितकीशी हरकत नाही.
पण मला वाटते जर दोघांपैकी एकाच्या जेवण बनवणे हे काम आवडीचे असेल आणि ते करण्यात त्याला काही कमीपणाही वाटत नसेल तर काही प्रॉब्लेम येऊन नये. अर्थात, कोणी मैत्रीणीने कान भरले आणि मुद्दाम तिच्या डोक्यात हे घातले की अरे ही तर पुरुषप्रधान संस्कृती झाली. तूच का दहात आठ वेळा जेवण करणार, ५०-५० अशीच वाटणी झाली पाहिजे. किंवा ती मायबोलीवर आली, आणि एखादा धागा वाचला, मुलींनीच का म्हणून स्वयंपाक करायचा? आणि तिला हे अचानक पटू वगैरे लागले तर मात्र तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो.
पण सध्या तरी तसे नाहीये. म्हणजे समजा उद्या आम्हाला मूल झाले. सॉरी, आधी लग्न ना. तर समजा उद्या आमचे लग्न झाले आणि परवा आम्हाला मूल झाले. अश्यावेळी तिला स्वयंपाक चांगला येतो म्हणून ती स्वयंपाकघरात बिजी राहिली तर पोरांचे डायपर बदलणे, सू शी साफ करणे ही मला जमणारी कामे करण्यात मला कसलाही कमीपणा नाहीये. शेवटी महत्वाचे काय तर कामाचा लोड कोण्या एकावर पडू नये. तसेच एकूण एक कामात ५०-५० करण्यापेक्षा ओवर ऑल कामाच्या वाटणीत ज्याला जे चांगले जमते ते त्याने करणे उत्तम. यात जरा ५५-४५ झाले तरी चालेल. पण जर ७०-३० अशी वाटनी होऊ लागली तर ३० वाल्याने काही कामे शिकून जोडीदारावरचा लोड कमी करायचा ईतकेच.

आजी-आजोबा म्हणजे नाना-नानी की दादा-दादी >>>>>>>>> कुठलेही चालतील. नातवंडासाठी दोन्ही सेमच असतात असे मला वाटते. आणि त्यांच्यासाठीही मुलाची मुले वा मुलीची मुले दोन्ही सेमच असतात.
तसेही वर लिहिलेय ना - तिच्या किंवा माझ्या आईवडीलांपासून हाकेच्या अंतरावर राहायचे.

आयडियल संसारातल्या गोष्टींपेक्षा दुसरंच काही भलतं नशीबी आलं तर >>>> हे भलतं काय तुम्हाला अपेक्षित असेल ते लिहा, काही भलत्यासलत्या गोष्टींचा विचार केला आहे, तुम्हाला अपेक्षित असलेली त्यात नसेल आणि आमच्याशी घडण्याची जरा जरी शक्यता असेल तर नक्कीच तिचाही विचार करून ठेवू. त्याबद्दलचे आमचे प्रामाणिक मत आताच आजमावून बघू.

माझं पोस्ट प्रचंड सार्कास्टिक होतं. हे विचार जरी आदर्शवादी असले आणि तुमच्या बाबतीत पूर्णपणे खरे असले तरी लग्नाआधी संसारात जे चढ-उतार येऊ शकतात त्याची सर्वतोपरी कल्पना येणं कठिण असतं. आपण माणसं आहोत, रोबॉट्स नाही.

माणसं बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते. सगळ्या गोष्टी प्री-प्लॅन करणं शक्य नाही. ढोबळ मानाने स्वभाव जुळला आणि संसारात पडून तो निभावण्याची तयारी असली की बास. वर कोणीतरी म्हंटलं आहे की लग्नाअधीचा काळ परत मिळत नसतो. तेव्हा तो काळ तसाच एन्जॉय करावा.

हे माझं प्रामाणिक मत आहे. अर्थात आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला अतिशय महत्वाच्या असणार्‍या गोष्टींबद्दल (ज्या लाईफ-ऑल्टरींग असू शकतील/ठरू शकतील) चर्चा नक्की करावी पण त्याचबरोबर त्यातला ह्युमन एलिमेन्ट विसरू नये. कुठलीच गोष्ट शाश्वत नसते. आणि थोडीफार स्पॉन्टेनिटी असावी आयुष्यात Happy

माझं पोस्ट प्रचंड सार्कास्टिक होतं.
>>>
काही हरकत नाही. चार तासाच्या आत संपादन करू शकता Happy

आपण माणसं आहोत, रोबॉट्स नाही.
>>>
माणसांच्या लहरीपणालाही मर्यादा असतात. त्या पलीकडे जाऊन तो सहसा वागत नाही. आपल्यासोबतची व्यक्ती अमुकतमुक प्रसंगात कशी कशी वागू शकते याचा अंदाज आपल्याला येतोच. एखाद्याचा स्वभाव काही काळाच्या सहवासाने ओळखता येतो. सवयी कालांतराने समजतात. मात्र अमुकतमुक स्पेसिफिक बाबींत विचार आणि मते कशी आहेत आणि ती किती ठाम आहेत हे चर्चेशिवाय नाही समजू शकत.

आज लिस्ट दिली कारण राजसी यांना प्रश्न पडले. पण उद्या याची गरज का यावर अजून लिहितो. तुर्तास शुभरात्री Happy

रूनमेश ... तुमच्या एका पॉईंट चे कौतुक आहे..
अ) तीन वर्षे पहिली मूल होऊ द्यायचे नाही. ब) त्यानंतर अजून दोन तीन वर्षांनी दुसरे झाल्यावर दोनावरच थांबायचे.

हे जे 2 वर्षानी दुसरे मुल चा जी थिंकिंग आहे.. अतिशय बरोबर ट्रॅक वर आहात...5 ते 6 वर्षानंतर दुसरे अपत्य हा प्रकार मोस्टली भारतातच आहे आणि त्यामुळे भावंडांचे लहानपण एकटे जात आहे. 6 वर्षांनी बहीण झाली तर तिला तो 6 वर्ष मोठा दादा हा फादर फिगर होऊन जातो. समवयस्क भांडवामधील खेळ, मौज मजा, गुद्दे गुद्दी ही अनुभव ज्यांना आहे त्यांनाच कळेल काय मिस होते ते.

समवयस्क भांडवामधील खेळ, मौज मजा, गुद्दे गुद्दी ही अनुभव ज्यांना आहे त्यांनाच कळेल काय मिस होते ते. >> माझं नेमकं उलटं निरीक्षण आहे. वयातला फरक जास्त असेल तर भावंडांमधे प्रेम असत नाहीतर siblings rivalry आयुष्यभर राहते.

रुन्मेष, तुमची अग्रीमेंट वाचली छान आहे Happy मला शाळेतले निबंध आठवले मी पंतप्रधान झाले तर Happy

पैश्याचा पण उल्लेख करून ठेवा - जसे की तुम्ही तिच्या पगाराला हात लावणार नाही आणि लग्नानंतर क्स महिन्यांनी तुमच्या पगाराच्या खात्यात तिचे नाव ऍड करुन डेबिट कार्ड द्याल. घरखर्च कोणी चालवायचा. दोघांच्या आई वडिलांची पण अग्रीमेंट वर सही घेऊन ठेवा Happy , मुलं प्रकरणात ते backbone दिसतात. तिला येणाऱ्या पदार्थांची यादी तुमच्या आईला नेऊन द्या. तुमच्या पगाराची पेस्लिप आणि स्थावर / जंगम चे विवरण तिच्या वडिलांना देऊन ठेवा.

सद्या इतकेच Happy

जसे की तुम्ही तिच्या पगाराला हात लावणार नाही
>>>
राजसी हे असे का?
हि काय नवीनच स्त्री-पुरुष समानता रुजतेय हल्ली मला समजेनासे झालेय.

अवांतर - मला शाळेतले निबंध आठवले मी पंतप्रधान झाले तर.... मी अश्या टाईप्सचे निबंध खूप भारी लिहायचो. बाई सर्व वर्गासमोर माझा निबंध मला वाचून दाखवायला लावायचे Happy

अ‍ॅमी, भावंडामधील वाद दोन वर्षांचा फरक असो वा सहा वर्षांचा, मोठे झाल्यावर व्हायचे ते होतातच.
पण दोन वर्षांच्या फरकाला लहानपणी एकत्र खेळायची मजा असते. अन्यथा लहान वयात सहा वर्षांमधील अंतर फार होते. सध्या तर जग ईतक्या वेगात बदलतेय की जनरेशन गॅपच सहा वर्षे झालीय Happy

सारे मुद्दे अगदी तपशीलवार जसे ठरले आहेत तसे एका कागदावर लिहून काढले आहेत. तसेच त्याखाली दोघांनी स्वाक्षरी करून, ते पेपर स्कॅन करून दोघांकडे त्याची एकेक कॉपी आहे.>>>>>

लग्नाच्या आधीचा डेटिंगचा रोमँटिक सुवर्णकाळ हे असले कॉन्ट्रॅक्ट करताना बनवतात तसले पेपर बनवण्यात वाया घालवायचा ???? देवा या पामरांना माफ कर!!!

वर कोणीतरी म्हंटलं आहे की लग्नाअधीचा काळ परत मिळत नसतो. तेव्हा तो काळ तसाच एन्जॉय करावा.>>>> मीच तो, मीच तो

माणसं बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते. सगळ्या गोष्टी प्री-प्लॅन करणं शक्य नाही. ढोबळ मानाने स्वभाव जुळला आणि संसारात पडून तो निभावण्याची तयारी असली की बास.>>>>

हेच म्हणतो.
संसारात फक्त महत्वाचे तारतम्य आणि सामंजस्य. तेच नसेल तर बाकी काही करा काही फायदा नाही.

सुंदर, सुशील, सद्गुणी उपवर मुलं/मुली तयार करायची फॅक्टरी कुठे असते का ? जसे आपल्यात चार गुण आणि चार दोष असणार तसेच ते लाईफ पार्टनर मध्ये पण असणार. कायकू इतना सोचनेका ??? जे गुण आहेत त्याचे चारचौघात कौतुक करा, दोष असतील ते एकांतात बोलून त्याचा त्रास एकमेकांना कमी कसा करता येईल असं बघा. बास झालं. मज्जानू लाईफ....

साधी सुधी मिडलक्लास माणसं आपण. एक लोन काढून घर घ्यायचं, पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं, एवढेच काय ते इतिकर्तव्य. काय असे मोठे प्रॉब्लेम येणार आहेत आयुष्यात ? आणि आले तर येऊ देत की बघून घेऊ. फिकर नॉट. त्यासाठी इतकं प्लॅनिंग करत टेन्शन घेऊन समोरच्या व्यक्तीला जोखत, जज करत कशाला फिरायचं ?

शेल्डन आणी एमी आणी लिओनार्ड ची आठवण आली!!
रिलेशन्शिप अ‍ॅग्रीमेंट.
अर्थात जोक्स अपार्ट, महत्वाच्या मुद्द्यांवर एकमेकांची मते इन्टर अ‍ॅक्शन मधून माहिती नक्की असावी.
आपण कुठे कोम्प्रो करणार्/कुठे अजिबात करणार नाही आणि सेम विथ समोरचा हे क्लियर असावे.

Pages