पाहुणचार

Submitted by वाट्टेल ते on 9 November, 2017 - 14:54

अतिथी ही कल्पना भारतीय संस्कृतीतून उगम पावली आहे असे म्हणतात. ज्याला तिथी नाही, जो कधीही दत्त म्हणून उभा राहतो तो अतिथी. बदलत्या जीवनशैलीत किरकोळ अपवाद, जसे अधेमध्ये माझ्याकडे अंडी मागायला येणारी माझी गोरी शेजारीण वगळता, अतिथी असे कोणी उरले नाहिये. माणूस जन्माला येण्याची तिथीसुद्धा आता बऱ्यापैकी निश्चित करता येते. आमच्या माहितीतील एका डॉक्टरिणीला हे वेळेचे तंत्र अचूक अवगत आहे. दिवस भरून टेकीस आलेल्या बाईला ती रात्री १२ च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये यायला सांगते. Epidural वगैरे सगळे सोपस्कार पार पडून बाईची प्रसूत होण्याची आणि या डॉक्टरिणीचा सकाळचा नाश्ता, आन्हिके वगैरे आटपून कामाला जाण्याची वेळ अचूक साधते. त्यामुळे डॉक्टरिणीचे वेळापत्रक अगदी ९ ते ५ ऑफिससारखे. वेळीअवेळी किंवा शनिवारी - रविवारी delivery करायला जाण्याची दगदग नाही. पेशंटना गैरसोय झाली तरी नऊ महिन्यांचे हे ओझे कधी एकदा उतरते असे त्यांना झाले असल्याने रात्री १२ वाजता हॉस्पिटलला जाणे, त्यानंतरचे सोपस्कार करता करता रात्रीच्या झोपेचे खोबरे होणे, delivery च्या आधीच थकणे वगैरे गोष्टींचे त्यांना काही वाटत नाही. एकेकाळी देवाच्या इच्छेच्या वगैरे अधीन असणारी गोष्ट अशा प्रकारे या डॉक्टरिणीच्या दिनक्रमाच्या अधीन झाली आहे. जन्म वगळता मृत्यू ही अजून एक गोष्ट त्यातल्या त्यात म्हणावी तर अतिथीसारखी, म्हणजे अगदीच अवेळी, न बोलावता येणारी. पण मरणारे तुम्ही स्वत: नसाल तर त्यात सुद्धा थोडे पुढे पाठी करता येते. झाले असे, आमच्या ओळखीतले एक आजोबा भारतात मागच्या क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलच्या मुहूर्तावर वारले. आजारी आणि वयस्कर असल्याने फारसे अनपेक्षित नव्हते, आजी स्वत: 'त्यांचे सोने झाले' म्हणाल्या आणि विकेट गेली काय हे बघायला गेल्या. मॅच भलत्या रंगात आलेली, आजोबासुद्धा क्रिकेटवेडे तेव्हा भारत जिंकतो का हरतो या प्रत्येक क्षणाचे ओझे असह्य होऊनच बहुदा वारले. शेवटच्या ७-८ overs रहिलेल्या. त्या क्षणी कुणालाही फोन करावा तरी अडचण. सर्वांना ताबडतोब कळवले तरी लोक मॅच संपण्याआधी निघण्याची शक्यता कमीच. अशावेळी सर्वांना रिक्षा वाहन मिळणेही अशक्यच. घरच्यांनी विचार केला, झालेली गोष्ट घडून गेली. तेव्हा मॅच पार पडेपर्यंत थांबलेले बरे. दुसरे काही करायला नाही म्हणून स्वत:ही मॅच बघत बसले. पुढे भारत जिंकल्याने जो तो आपल्या घरी जल्लोष करत असताना हे कळवून आनंदात विरजण टाकणे त्यांना औचित्याचे वाटले नाही आणि रात्र फार झालेली. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांस कळवले. सगळे जमले, सुरुवातीचा धक्का ओसरल्यावर आणि स्मशानातसुद्धा लोकांना कालची मॅच हा बोलायला चांगला विषय मिळाला. दहाव्याला गुपचूप थोडीशी champagne पिंडावर शिंपडली आणि कावळा पिंडाला शिवला. म्हातारा काहीतरी चांगले खाऊन आणि पिऊन स्वर्गात गेला याचे सर्वांना समाधानही वाटले. अशा प्रकारे अतिथी म्हणून आलेल्या यमाला सर्वांच्या सोयीच्या वेळेपर्यंत ताटकळावे लागले.

सुरुवातीला हे जरासे विषयांतर झाले पण सांगण्याचा मुद्दा असा की अतिथी हा प्रकार आताशा भारतातही कमीच उरलाय आणि अमेरिकत जवळ जवळ नाहीच. येणारे बहुतेकजण वार, वेळ कळवून येतात. अर्थात येण्याच्या वेळेला, डॉक्टरच्या अपॉइंटमेंट सारखाच फारसा अर्थ नसतो. संध्याकाळी येतो या वाक्यामध्ये ५ ते ९ पर्यंत कोणतीही वेळ अंतर्भूत असू शकते. दुपारी जेवायला येतो म्हणजे ११ ते ३ मध्ये कधीतरी येतो हे असते. निश्चित कोणत्या वेळी पाहुणे हजर होणार यात एक अनिश्चितता असल्याने या 'अवेळी' येणाऱ्या पाहुण्यांना अतिथी म्हणायला हरकत नसावी. अर्थात अतिथी स्वतः होऊन आला किंवा बोलावण्यावरून आला तरी त्या संदर्भात यजमानाने करण्याची एक आवश्यक गोष्ट म्हणजे पाहुणचार.
या ओढवून घेतलेलया पाहुणचाराची सुरुवात अशी होते की यजमान काहीही कारण नसताना असेच ७ ८ १० कुटुंबांना गोळा करून जेवायला बोलावतात. या वेळी कोणाकोणाला जेवायला बोलवायचे याचा निर्णय बहुदा पाहुण्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून करण्यात येतो. कॉम्पुटर मधील उत्साही मंडळी यासाठी random number generation नावाचे app वापरतात. त्यामुळे नेहमीच्या बैठकीतले पासून एकही कुटुंब ओळखीचे नाही अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाण्याची शक्यता निर्माण होते. काही नेहमीचे यशस्वी पार्टी कलाकार उर्फ पाहुणे हटकून सर्व ठिकाणी बारमाही केळ्यांप्रमाणे असतात. काही seasonal आंबे काही ठराविक ठिकाणीच सापडतात. या random selection मुळे क्वचित काही विळ्या आणि भोपळे एकत्र आढळतात. या सर्व धामधुमीत उन्हाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ करावेत का, बोंबील आणि श्रीखंड एकत्र चालेल का वगैरे प्रश्न गौण असतात. ४-५ स्टार्टर, २ कोशिम्बिरी, ४ भाज्या, लोणची ,पापड ते तोंडात विरघळणाऱ्या पोळ्या, भात आणि किमान २ गोडाचे पदार्थ वगैरे भरभक्कम जेवण आणि “काही केलं नाहीये किंवा अगदी साधं केलंय “ हे एक अत्युच्य दर्जाचे वैश्विक असत्य पाहुण्यावर फेकण्यास यजमान सिद्ध होत असतो. या पाहुणचाराच्या सिद्धतेसाठी अगदीच कारण नाही असेही म्हणायचे कारण नाही कारण याला पुढील कारणे असू शकतात:
१. आपण अनेक ठिकाणी पुख्खा झोडून आल्यावर रिटर्न केले नाही तर वाळीत पडण्याची शक्यता निर्माण होणे
२. स्वतः:ची मिरवायची आणि कौतुक करून घ्यायची हौस पुरवणे
३. वेळ घालवयाचे साधन
४. खूप दिवसात ( म्हणजे सुमारे २ ते ९०) भेटलो नाही
५. घर आवरायला निमित्त
६. खूप स्वंयपाक करण्याची हुक्की
७. पूजा, वाढदिवस, सण, केळवण वगैरे नैमित्तिक.
थोडक्यात कारणांची कमी नाही. एकदा सगळे ठरले की मेनू ठरवणे, सर्व तयारी करून ठेवणे वगैरे गोष्टी युद्धपातळीवर पार पडल्या जातात. परीक्षेत सोपे आणि आपल्याला चांगले येतात ते प्रश्न सर्वांत आधी सोडवले जातात त्याप्रमाणे मेनू मधले आपले हुकुमी एक्के यजमानीण बाई तयार ठेवते. सर्व पूर्वतयारीत नवरा नामक प्राणी बाहेरून पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षासारखा असतो म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. मेनू आणि quantity ठरवण्यात नवऱ्याचा सर्व पवित्रा, जेवण उरल्यास ते किती दिवस आपल्याला खावे लागणार आहे या एकाच सावध दिशेने चाललेला असतो. ”कोणत्या मुहूर्तावर हा घाट घातला” असे यजमान बाईच्या मनात येण्याचा आणि पहिल्या पाहुण्यांचे आगमन होण्याचा मुहूर्त साधारण एकच असतो.
बेल वाजते आणि पाहुणे येऊ लागतात. काही यजमानांचे आल्या आल्या सुरु होते - पाणी आणू? juice आणू? चहा घेणार? अमका तमका पदार्थ घेणार? तोवर जेमतेम पाहुण्यांच्या चपला काढून झालेल्या असतात. प्रश्नांच्या सरबत्तीने पाहुणे गारद होता होता जवळच्या सोफ्यावर टेकतात. इतका वेळ प्रश्नांनी गारद करणाऱ्या यजमान बाई किचनमध्ये सटकतात. सर्व स्वैपाक तयार असतो, आवरूनही झालेले असते तरी किचनमध्ये काही न काही दुष्काळी कामे काढून तिथून त्या काही बाहेर पडत नाहीत. स्त्रियांचे वजन वाढण्याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांचा घरातला ७०% वेळ किचनमध्ये जातो, त्यातला ३०% वेळ फ्रीज उघडणे आणि बंद करण्यात जातो. प्रत्येक वेळी फ्रीज उघडल्यावर आतल्या वस्तूंची चव आहे तशीच आहे याची खात्री करण्यासाठी सर्व चाखून बघावे लागते, असे करता करता वजन वाढते. आलेल्या पाहुण्या स्त्रीला तिच्या किचनचा विरह व्याकूळ करत असल्याने ती यजमानांच्या किचनमध्ये घुसते. गेल्या वेळी आलो होतो त्यापेक्षा आता काय काय बदल आहेत याचा कानोसा घेणे चालू असते. सासूही बघणार नाही इतक्या तीक्ष्ण नजरेने ती ते kitchen आणि यजमान बाईला बघत असते. घरात कितीही जागा असली तरी दाटीवाटीने island च्या आसपासच सर्व गर्दी जमते.
एकेक करत सगळे पाहुणे जमतात. सर्व समानतेच्या काळात सौदी अरेबियामध्ये वगैरे आल्याचे वाटावे याप्रमाणे एका खोलीत पुरुष आणि दुसऱ्यात बायका हा भेद कटाक्षाने पाळला जातो. एकीकडे रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक, अर्थव्यवस्था, फुटबॉल, टॅक्स, इन्शुरन्स कंपन्यांची चलाखी, टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. दुसरीकडे साड्या, दागिने, खादाडी, सेल, कुपन, मुले, शाळा आणि स्थानिक hot topics. वर्षानुवर्षे यात काही फरक पडत नाही. सगळे जमले की यजमानीण starters या नावाने अगणित गोष्टी खायला आणतात. Starters या नावाने, जेवण आहे का किंवा हेच जेवण असावे असा संभ्रम निर्माण करणारे हे never ending पदार्थ असतात. बहुतेक यजमान, पाहुण्यांसाठी बकासुराचा आहार हे प्रमाण धरतात. पदार्थ रुचकर करण्याबरोबरच तो पौष्टिक, कालानुरूप आणि योग्य त्याच प्रमाणात करणे हा सुगरण असण्याचा दाखला आता कालबाह्य झाला आहे. तसेच फ्रीजमधून काढलेले पदार्थ मायक्रोवेव्ह, अवन किंवा स्टोव्हवर गरम केले की ते ताजे होतात असे समजण्याची प्रथा रूढ झाली आहे. भारतात लोक जेवायला बोलावतात आणि सगळे बाहेरून आणतात यावरून त्यांना तुच्छ लेखले जाते. भारतातून काही काळाकरता आलेले लोक, इथे रोजच शिळासप्तमी साजरी होते म्हणून नाक मुरडतात. साधारण हाता -पायाच्या बोटांवर मोजता येतील त्यापेक्षा जास्त पदार्थ जेवणात असणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळे पदार्थ जरा जरा चाखून बघेपर्यंत जेवण संपते. एकवेळ गणपतीला मोदक नसले तरी चालतील पण पाहुणे आले की टोमॅटो कांद्याच्या चिखलात अगम्य मसाले, क्रीम, पनीर आणि असतील-नसतील त्या भाज्या असा एखादा पदार्थ असणे अनिवार्य आहे. पाहुणे ताटात जागा सापडेल तसे पदार्थ घेतात आणि शांतपणे जेवायला बसतात तितक्यात, कोशिंबीर वाढू? पनीर वाढू ? पोळी वाढू? ची सरबत्ती सुरु होते. घेतलेला पहिला घासच घशात अडकतो. असेच एके ठिकाणी जेवायला गेलो होतो. सर्व खाऊन झाल्याने ताट रिकामे होत आलेले यजमान बाईला बघवले नाही. तिचे सुरु झाले. मी काही घेत नाही म्हटल्यावर 'थोडी बटाट्याची भाजी तरी घे' असे म्हणत चपळाईने तिने भाजीचा डोंगर माझ्या ताटात रचला. वर आमच्याकडे बटाटा कुणी खात नाही हे ऐकवले. म्हणजे थोडे दिवस फ्रीजमध्ये काढून ट्रॅशची भर करण्याऐवजी माझ्या ताटात ढकलून आजच भाजीची विल्हेवाट तिने तिच्या पद्धतीने लाऊन टाकली. खाल्ल्या अन्नाला जागावे म्हणून मग मी दुष्काळातून आल्याप्रमाणे भासवत ती भाजी माझ्या पोटात ढकलली. बटाट्यात starch फार म्हणून हल्ली बटाट्याच्या भाजीची जागा, protein म्हणून खपवायला सोपे असणाऱ्या उसळीनी घेतली आहे. एकदा ५० माणसांची उसळ केली की २-३ वेळा उसळ, मग ४ -५ वेळा मिसळ, मग पीठ मिसळून मुलांना पराठे, pattice या प्रकारे ५-६ महिने ती पुरते. पदार्थ करताना असंख्य वेळा खाल्लेला असतो आणि पुढचा आठवडा त्याच जेवणावर काढण्याचा बेतही पक्का असतो त्यामुळे या जेवणाच्या वेळी यजमान बाईने जेवण्याची पद्धत साधारण नसते. जेवण झाल्यावर तोंडात पाणी घेण्याइतकीपण जागा शिल्लक नसल्याने चूळ भरण्याची सक्ती आणि सोयही पाहुण्यांना नसते.

पाहुणे येताना बहुतेक वेळा काहीतरी भेटवस्तू आणतात. त्या निमित्ताने त्यांच्या गराजमधली अडचण जरा कमी होऊन आपल्या ठिकाणी वाढते. काही बिनडोक बायका ( अत्यंत दुर्मिळ असणारा प्रकार आहे हा ) मुळात ती वस्तू आपल्याला जिथून मिळाली त्यांच्याकडेच परत घेऊन जातात, फक्त नवीन पिशवीतून. पण बहुतेक सर्व बायका, ती गोष्ट आपल्याला कोणी दिली याची नोंद ठेवतात आणि इतकेच नाही तर ती दुसऱ्याला देताना, यजमान आणि आपण अशा दोघांना ओळखणाऱ्या घरातून ती भेट आपल्याकडे आली नाहीये याची खात्री झाल्यावरच ती पुढे सरकवतात. जाता जाता माहितीकरता म्हणून - पुण्यात अशा पुढे pass on करता येण्याजोग्या गोष्टींचेच एक दुकानसुद्धा आहे.

आता बहुतेक सर्व जीव जेवून तंडावलेले असतात पण शांत बसण्याची सोय नसते. कारण यजमानाने बेतलेल्या खेळांत, कार्यक्रमात भाग घेऊन खाल्ल्या मीठाला जागावेच लागते. त्यात, काही विमाने आल्यापासून पोटात इंधने भरत असतात ती उडण्यायोग्य होऊन भराऱ्या घेऊ लागलेली असतात. पार्टीत मुले असतील तर घराच्या त्या भागात एखादा भूकंप येऊन गेल्याच्या खुणा एव्हाना दिसू लागलेल्या असतात. प्रत्येकाच्या हातात आपापले स्मार्ट उपकरण जोवर काही विघन न येता चालू असते तोवर सर्व काही आलबेल असते. पार्टीच्या वेळी मुलांनी फार दंगामस्ती न करता, आपापल्या उपकरणाशी न खेळता एकमेकांशी खेळावे, तुम्हाला मध्ये मध्ये येऊन त्रास देऊ नये आणि शक्यतो आपले आपण लवकर झोपावे (आणि दुसऱ्या दिवशी सावकाश उठावे) अशी तुमची अशक्य कोटीतील अवास्तव अपेक्षा असेल तर….तर काही नाही आता त्याला फार फार उशीर झालाय. You know you have already missed that bus. आता फक्त मुले शिक्षण-नोकरीसाठी घराबाहेर पडण्याची वाट बघत बसणे तुमच्या हाती आहे.
मध्ये मध्ये सतत फोनवर फोटो काढणे, whatsapp वरचे आधीच माहित असलेले विनोद एकमेकांना सांगणे, काहीतरी conspiracy theory चा धुरळा उडवून देणे, रेसिपी, शाळा, लोकांची लफडी, अध्यात्म, शेअर्स, डिल्स, स्वतःच्या व्यस्त आयुष्याचे तुणतुणे, मुलांची भांडणे सोडवणे वगैरे आगा ना पिछा अशा पीचवर एकाच वेळी सर्वजण बॅटिंग करत राहतात.
पार्टी चालू राहते. यजमान विमानांना इंधन आणि इतरांना साखरेचा पुरवठा करीत राहतो. जरा सर्व शांत होत असते तर ते सुखासुखी बघता न येण्याऱ्या काही बायका यजमानिणीची दया येऊन अचानक किचन आवरायला उठतात. मग सर्वानाच नाईलाजाने उठावे लागते. सर्वांच्या एकत्रित वावरामुळे किचनमध्ये पुन्हा एकदा वादळ येते. पार्टीच्या आधीचे किचनमधले वादळ बाईने नवऱ्याला हाताशी घेऊन कसेबसे सावरलेले असते ते तिच्या हाताबाहेर जाते. यजमानीण बाईला भीक नको पण कुत्रा यावर या म्हणीचा पुरेपूर अनुभव येतो. आपल्या घरात भांडी धुण्याचे काम रोज नवऱ्याचेच असते असे बिनदिक्कत खोटे बोलण्याचा हाच तो क्षण. त्या निमित्ताने कधी नव्हे ते २ कौतुकाचे बोल या गृहकृत्यदक्ष नवऱ्याच्या कानी पडतात. या note वर पाहुणचार संपणे गरजेचे असते, नवऱ्याचा मूड चांगला आहे तोवर अजून बरीच कामे बाईला त्याच्याकरवी उरकून घ्यायची असतात.

लोक पांगतात, काही बायका नेहमीप्रमाणे “चालते पुढे सरते फिरते” मोड मध्ये असतात. हा उभा खो खो टाळण्यासाठी त्यांचे हुशार नवरे बायका गाडीत बसल्याशिवाय जागचे हलतसुद्धा नाहीत. काही नवरे सर्व ओझी गाडीत घालून शेवटच्या ओझ्याची वाट बघत असतात. शेवटी एकदाचे सर्व अतिथी तृप्त होऊन आपापल्या घरचा रस्ता धरतात. नंतर आयुष्यात या एकाच वेळी एकमेकांना अति प्रश्न ना करता नवरा बायको एकदिलाने काम करून घर पूर्वपदावर आणतात. ते करता करता पार्टीत चघळलेल्या गोष्टी व एकूण पाहुणचाराचा पंचनामा केला जातो. Light बंद करून झोपण्यापूवी यजमानीण पाहुणचाराची पोचपावती घेण्यासाठी एकवार Whatsapp वर सगळे फोटो बघते, thanks ची देवाण घेवाण होते आणि मगच पार्टीची खरीखुरी सांगता होते.
आठवडा नेहमीप्रमाणे चालू होतो, वीकेंडचा कानोसा घेतला जातो. यजमान, बाकीचे भिडू, जागा, कारणे, खाणे, पिणे ,चर्चेचे विषय, खेळ, activity पुन्हा एकदा ठरवले जाते - पाहुणचाराचा खेळ अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीचा भाग नसता तरी चालले असते- किंवा वेगळा लेख म्हणून चालेल.
बाकी,
नेहमीच्या बैठकीतले पासून एकही कुटुंब ओळखीचे नाही अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाण्याची शक्यता निर्माण होते.
घरात कितीही जागा असली तरी दाटीवाटीने island च्या आसपासच सर्व गर्दी जमते.
रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक, अर्थव्यवस्था, फुटबॉल, टॅक्स, इन्शुरन्स कंपन्यांची चलाखी, टेक्नॉलॉजी वगैरे
एकवेळ गणपतीला मोदक नसले तरी चालतील पण पाहुणे आले की टोमॅटो कांद्याच्या चिखलात अगम्य मसाले, क्रीम, पनीर
whatsapp वरचे आधीच माहित असलेले विनोद एकमेकांना सांगणे, काहीतरी conspiracy theory चा धुरळा उडवून देणे, रेसिपी, शाळा, लोकांची लफडी, अध्यात्म, शेअर्स, डिल्स, स्वतःच्या व्यस्त आयुष्याचे तुणतुणे, मुलांची भांडणे सोडवणे वगैरे आगा ना पिछा अशा पीचवर एकाच वेळी सर्वजण बॅटिंग करत राहतात.
जरा सर्व शांत होत असते तर ते सुखासुखी बघता न येण्याऱ्या काही बायका यजमानिणीची दया येऊन अचानक किचन आवरायला उठतात. मग सर्वानाच नाईलाजाने उठावे लागते.
>>>>> हे फारच रिलेट झालं Happy

Lol

काही पार्ट्या डोळ्यासमोर आल्या Proud

युनिव्हर्सिटी मध्ये असताना आमच्या कडे खरंच अतिथी असायचे जेवायला. कोणी ना कोणी बरोबर जेवायच्या वेळेस असायचेच. मी बिघडलो असेल बहुदा, मला आम्रूंच्या पार्ट्या आवडतात कधी कधी. खाऊन जायचे कारण तिथे खायला म्हणजे चिप्स डीप , गाजरं, सेलरी अशा गोष्टी असतात. मस्तपैकी खाण्याची कटकट नाही. गप्पा मारायच्या आणि आपल्याला निघायचे तेव्हा निघायचे. कोणी किचन मध्ये असायची गरजच नाही.

धमाल लिहिलंय! पंचेस जबरी जमलेत. यात पुन्हा कोणाकडे न आवडलेलं जेवण मुकाटपणे जेवायला लागणं हा एक छळ असतो!

आता अजून एक पॉटलक नामक पाहुणचारच्या भावावर पण लिहा!

च्रप्स, पोटात इंधने भरणारी विमाने मिस केली का तुम्ही ? जोवर मुकाट बसून आपले काम करत असतात तोवर फारशी कोणाच्या डोळ्यांत येत नाहीत

मस्त जमलय! गणपती पासून, दिवाळीपर्यंतच्या आणी ख्रिसमस पासून बेबी शॉवर पर्यंत च्या सगळ्या पार्टीज कव्हर झाल्या आहेत ह्यात. Happy

छान लिहीले आहे. मी आता हे काही करत नाही. काही एंटर टेन करायचे असेल तर सरळ हॉटेलात नेउन जेउ घालते. स्विगी झोमॅटो मॅकडी डोमिनो मंड्ळी आहेतच. अ‍ॅप डाउनलोड करते. मुलांना जे हाय्टेक खाणे आव्डते पक्षी नुटेला वॉफल्स विथ व्हिप्ड क्रीम हे प्रकार आजिबात घरी करत नाही ऑर्डर करवते तुमचे लेखन वाचून आय अ‍ॅम टू ओल्ड फॉर दिस हे मस्त फीलिन्ग आले. परत हे परदेशातले लोक्स एकत्र आले की भारतीयच का खातात? इतके भारती य जेवण तर भारतातले लोक्स पण करत नाहीत. चार भाज्या, हे अन ते.

पहिला पॅरा सोडता बाकी पार्टीच्या गोष्टी फारच रीलेट झाल्या.
मस्त जमलंय... अगदी त्या पार्टीसारखंच. Happy

Lol मस्त लिहल आहे.
त्यांचा घरातला ७०% वेळ किचनमध्ये जातो, त्यातला ३०% वेळ फ्रीज उघडणे आणि बंद करण्यात जातो. >>>> Lol

धमाल लिहिलंय. Lol बर्याच गोष्टी रीलेट झाल्या.
पहिला मॅचच्या दिवशीच विकेट पडणार्या आजोबांचा पॅरा नसता तरी चालला असता.

>>>>>>पार्टीच्या वेळी मुलांनी फार दंगामस्ती न करता, आपापल्या उपकरणाशी न खेळता एकमेकांशी खेळावे, तुम्हाला मध्ये मध्ये येऊन त्रास देऊ नये आणि शक्यतो आपले आपण लवकर झोपावे (आणि दुसऱ्या दिवशी सावकाश उठावे) अशी तुमची अशक्य कोटीतील अवास्तव अपेक्षा असेल तर….तर काही नाही आता त्याला फार फार उशीर झालाय. <<<<<
मस्त झालाय लेख. बर्‍याच गोष्टी बहूदा सगळीकडे समानच घडतात.

अमा Happy टू ओल्ड फॉर धिस असे नव्हे पण इथे मॅक, डॉमिनोज वगैरे अगदीच उभ्या उभ्या वर्कर छाप गरीब लंच समजले जाते. अगदी "माणसांचा पेट्रोल पंप" छाप. कोणी पार्टी, ट्रीट वगैरे म्हणून मॅक्डीला नेले तर वेड्यातच काढतील लोक. Happy
जसे पोळी भाजी केन्द्र किती कन्विनियन्ट असले तरी तिकडे पार्टीला नाही जाणार कुणी, तसेच .

लेख आवडला. पहिला पॅरा खरंच अनावश्यक आहे. काढून टाकायला जमला तर बघा.
अमा, मॅक डीची क्रेझ भारतातच जास्त. आम्ही इथे मॅक डी, केएफसी, बर्गर किंग वगैरे जॉईंट्स मध्ये गेल्या दहा एक वर्षात तरी पाऊल ठेवलेलं नाही.

च्रप्स, ते वाचलं. त्यांनाही जर माहितेय की विषयांतर आहे तर लेखात असण्याची गरज काय? तसंही लेखाशी संबंध नाहीच.

मस्त लिहले आहे. सगळ्या गोष्टी आयुष्याशी छान रिलेट झाल्या. पहिला पॅरा थोडा फिल्मी वाटला पण त्या बाबतीत ले दोन सॉफ्ट किस्से.
लहानपणी शेजारील आजी वयाच्या ९८ व्या वर्षी गेली. त्याच वेळी टीव्ही वर भारत - न्युझीलंड ची मॅच खुप रंगात आली होती. अमरनाथ - शास्त्री नी अस्किंग रेट वाढवल्यावर कपिल देव - वेंसरकर चांगले खेळत होते. त्यावेळी चाळीतल्या दुसर्या शेजारच्या घरी जाउन दार- खिडक्या बंद करुन मॅच बघितली होती. त्या आजीचा पणतु मॅच बघायला होताच पण त्याच बरोबर नातु ही मध्ये मध्ये येउन स्कोर विचारुन जात होता.
इंदिरा गांधी गेल्या तेव्हा भारत - पाकिस्तान मॅच चालु होती . कधी न्हवे ते भारताने ४० ओव्हर मध्ये २१० रुन केले होते , वेंसरकर ९४ धावा काढुन क्रीस वर होता. त्यावेळी ती मॅच रद्द केलीच पण सिरीज पण रद्द करुन टीम ला भारतात परत बोल उन घेतले. त्यावेळी ती मॅच पुर्ण खेळली जावी असे वाटत होते कमीत कमी आजुन १ ओव्हर तरी. ( ही मॅच पाकीस्तान मधे असल्याने रेडियो वर ऐकत होतो. गांधी गेल्यावर पण मॅच अर्धा तास चालु होती पण भारतिय रेडियोवर कॉमेट्री न्हवती, मग पाकिस्तान रेडियो ट्युन करुन मॅच एकत होतो. शेजारच्या काकाना बराच ईटरेस्ट होता त्यामुळे मॅच चालु झाली की सगळे त्याचा घरी) )
८-१० जणाच्या पार्टीमध्ये जगात कुठेही जावा भारतिय बायकाचे विषय सहसा तेच (कपडे, दागिने, शाळा, मेड ) असतात. पुरषाचे मात्र स्थानिक राजकरण, अर्थकरण , खेळ यानुसार बदलत असतात.

मस्त लिहिले आहे. बर्‍याच गोष्टी रिलेट झाल्या.
सुरुवातीचा भाग नसता तरी चालले असते- >>> +१

परत हे परदेशातले लोक्स एकत्र आले की भारतीयच का खातात? >>> अमा तसेच आहे ते. यजमानांना आपले पाककौशल्य दाखवायची संधी असते अशा वेळी. एरवी आम्ही भाजी, पोळी, आमटी, भात, चटण्या, कोशिंबीरी असा चारी ठाव स्वयंपाक कधीही करत नाही. आहे की नाही मज्जा Lol
नाही म्हणायला पिझ्झा पार्टीज करतो आम्ही पुष्कळ वेळा. बाकी केएफसी, बर्गर किंग, मक्डी वगैरे तत्सम ठिकाणी अतिशय अनहेल्दी खावे अशी हुक्की आली तरच जातो.

>>परत हे परदेशातले लोक्स एकत्र आले की भारतीयच का खातात? इतके भारती य जेवण तर भारतातले लोक्स पण करत नाहीत. चार भाज्या, हे अन ते.<<

हा हा! ती एक फेज असते. सुरुवा-सुरुवातीला एफओबी स्टेटस असताना नेटवर्किंग करता असले प्रकार खुप व्हायचे. पण जस-जशी मुलं मोठी होत जातात, त्यांचं फ्रेंड्ससर्कल वेगळं होतं, तुमचं सर्कल सीमीत होत जातं, तस-तसे हे डिनरचे प्रोग्रॅम्स बोअरिंग होत जातात आणि शेवटी कमी होतात. डिनर पार्ट्यांना एकत्र येण्याऐवजी सोशल नेटवर्किंगची भुक "ती" आणि "तो" आपापल्या खास सर्कल्स्च्या अ‍ॅक्टिवटिज मध्ये भागवतात, असं निरिक्षण आहे. Happy

बर्‍याच ठिकणी अतिशयोक्तीचा सढळ वापर वाटला. Happy

पार्टीत मुले असतील तर घराच्या त्या भागात एखादा भूकंप येऊन गेल्याच्या खुणा एव्हाना दिसू लागलेल्या असतात. >>>> हे मात्र अगदी वास्तव! अर्थात अश्या भुकंपसदृष परिस्थितीसाठी पार्टीच असावे लागते असं काही नाही. आमच्या घरी असतेच. Wink

इथे माबोच्या कंपूच्या गेट टू गेदरात सगळे एकत्र गप्पा मारतात आणि एव्हडे पदार्थ पण नसतात. बाहेरचं कोणी आलं की मात्र सौदी सिनारीयो होतो. Happy

इमिग्रेशन स्टेटस आणि तत्सम हा गप्पांचा सगळ्यात बोरींग टॉपिक असतो !

बरेचसे रिलेट झाले.

भारतीय पदार्थ खाणे बहुदा कम्फर्ट झोन मुळे येत असावे.
कामानिमित्त मी काही दिवस तेल अव्हीव ला होतो. आयुष्यात पुन्हा एकदा इथे येणे होणार नाही हे माहित होते. शिवाय समुद्रकिनारी शेकडो प्रकारचे फलाफेल, वगैरे होते. पण कही सहकारी अगदी हुडकून भारतीय हॉटेलात जात व वातड तंदुरी चिकन व खोडरबर टाईप गुलाबजामून खात.

राज, अनुमोदन.
पार्टीचे वर्णन हुबेहूब जमले आहे. वयोमानाने आजकाल फक्त कुणा मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाचे केळवण, कुणाचे लग्न, मेंदी कार्यक्रम इ. ठिकाणी जाण्याची वेळ येते. अश्या वेळी प्रचंड गर्दी. मित्रांची मुले, मुली ज्यांना २० वर्षात पाहिले नसते ते तिथे येतात, ओळखू येत नाहीत. त्यांचे तर लक्षच नसते आपल्याकडे. कित्येकदा ज्याचे लग्न असते तो मुलगा किंवा मुलगी कोण याची पण खात्री नसते, आपल्या वयाच्या मित्रांनी बोलावल्यामुळे आपण जातो.
बहुधा स्टार्टर्स नि ड्रिंक्स उभे राहूनच.
बार पाशी वीस तीस मुले, मुली ड्रिंक घेऊन तिथेच उभी असतात. त्यामुळे आपण आपले पाणी प्यायचे. नाहीतर स्क्यूज मी, स्क्यूज मी करत घुसायचे. मग सगळे एकदम गप्प होऊन बघत बसतात - म्हातारा कशाला पितोय आता, किंवा च्यायला हा अजून स्कॉच पितो, पचेल का रे,
असे भाव चेहेर्‍यावर आणून. मग ओशाळे होत ड्रिंक घेऊन जायचे.
स्टार्टस च्या जागी तेच. अंकल, धिस इज नॉन व्हेज असे बरेचदा ऐकायला येते! अहो, मला इंग्रजी वाचता येते नि चिकन, लँब नॉन व्हेज असतात हे माहित आहे असे म्हणावेसे वाटते.
पण म्हणू नका - साधारण चाळीस वर्षाखालील मुला मुलींशी एकहि शब्द बोलू नये - तो वेगळाच विषय आहे.

आपले काम फक्त उभे राहून जो कोण मोठमोठ्याने नि ठासून थापा मारत असेल ते ऐकत रहायचे. किंवा १०० वेळी ऐकलेले जोक अर्धवट ऐकून उगीचच हसायचे. चुक्कूनहि आपण कुठला इन्श्युरन्स घेतला किंवा कुठली गाडी घेतली, किंवा कुठली औषधे घेतो हे सांगू नये - लग्गेच दहा तरी लोक कळवळा येऊन, आपले कसे चुकले, ते कसे करायला नको होते याबद्दल अकरा निरनिराळी मते सांगतील. स्वतः कदाचित सिविल इंजिनियर असतील. पण आपला कार्डीऑलॉजिस्ट खूप प्रसिद्ध असला तरी त्याच्या पेक्षा यांना जास्त माहित असते.

जेवण जर सेल्फ सर्व्ह असेल तर तोच प्रकार.

स्टार्टर्स काय होती, जेवायला काय होते हे पार्टीच्या वेळी कळत नाही. पार्टीनंतर दोन तीन दिवस बायको दिवसभर फोनवर मैत्रिणींशी बोलत असते. मग कळते कोण आले होते, कोण नव्हते, खायला काय पदार्थ होते, काय नव्हते, कुणाची तब्येत कशी आहे, कुणाची मुले कुठे आहेत वगैरे.

मायबोलीचे गटग हा अपवाद. ('गटग' लिहिताना पोटात ढवळत. पण काय करणार, मायबोलीवरील लोक एकमेकांना भेटायला जातच नाहीत, फक्त गटग करतात!)

Pages