माझ्या श्वानप्रेमाची शोकांतिका?

Submitted by सायली मोकाटे-जोग on 12 October, 2017 - 16:17

puppies_0.pngबालवयापासून थोडे मोठे व्हायला लागतो तसे आपले आजूबाजूच्या गोष्टींबद्दलचे कुतूहल वाढत असते. अशाच वयात आपली गट्टी जमते ती पक्षी-पाखरं आणि प्राण्यांशी. नकळत आपल्याला हा निसर्ग जवळचा वाटू लागतो. या निस्वार्थ सवंगड्यांबरोबर येणारी मजा औरच असते. माझ्या मनात लहानपणापासून या प्राणीविश्वाविषयी प्रेम निर्माण झाले. घरात एक कुत्रं पाळलेलं असल्यामुळे तर त्यात भरच पडली. त्याच्याशी रोज खेळण्यात मी दंग होई. ते गेल्यानंतर झालेलं दुःख माझ्या किशोरवयीन मनाला आभाळाएवढं वाटलं.

पाठीमागच्या अंगणात नाचणाऱ्या खारुताईशी मैत्री, नित्यनेमाने पावसाळ्यात येणारा भारद्वाज, रस्त्यावरचे उचलून आणलेले छोटेसे मांजरीचे पिल्लू – त्याच्या उपद्व्यापामुळे मोठ्यांची खाल्लेली बोलणी आठवली की आताही गंमत वाटते. नंतरच्या काळात मारुती चितमपल्ली, सुमेधा कामत यांच्या जंगलसफरी, निसर्ग, प्राणीविषयक लेखांच्या वाचनामुळे विचार समृद्ध झालेले. प्राण्यांमध्ये कुत्रा हा माझा अधिक आवडीचा प्राणी. असे प्राणी पाळतानासुद्धा त्यांच्या कोड-कौतुकाचे स्तोम घरात कधीच माजले नाही. आमच्या घरी पाळलेलं कुत्रं अंगणात बांधलेलं असायचं. ते घरात वा गादीत कधीच आलं नाही. अगदी डोळेही न उघडलेलं पिलू – त्याला बाटलीने दूध पाजण्यापासून पुढे खाणे-पिणे, फिरणे, कधी अंघोळ आणि त्याची स्वत्छ्ता, रुटीन इंजेक्शन्स हे सारे बिनबोभाट चालायचे. आम्ही त्याच्याबरोबर मनसोक्त खेळायचो, मस्ती करायचो पण घरात येताना हात-पाय स्वच्छ धुवूनच. त्या प्राण्यावरचं आमचं प्रेमही कमी झालं नाही की त्याच्यामुळे कुठली कामं खोळंबून राहिली. ‘कुत्रं हे शेवटी कुत्रं आहे, माणूस नाही’ या सरळधोपट तर्कसुसंगत विचारावर चाललेली भूतदया. पण माझ्या या कल्पनेला धक्का बसला तो परगावी एका ओळखीच्या कुटुंबात चार दिवस राहायची वेळ आली तेव्हा!

तर झालं असं… त्या परिचित कुटुंबाच्या घरी आम्ही पोहोचलो. दारात पाऊल टाकताच भों भोंss अशी दणक्यात सलामी मिळाली. फ्लॅटवजा घर असूनही घरात कुत्रा पाळलेला म्हटल्यावर मला मनातून खूप आनंद झालेला. चार दिवसात आता त्याच्याशी गट्टी जमवायची असा विचार. आम्ही आल्याची जोरदार खबर मिळालीच होती. घरच्या मंडळींनी आमचं स्वागत केलं. हातपाय धुवून आम्ही ताजेतवाने झालो. प्रवासाचा थकवा, जेवणं संपल्यावर यजमानांच्या कुत्र्याकडे लक्ष गेलं. हॉलमध्ये कोपऱ्यात एक मुद्दाम करवून घेतलेली छोटी जाडजूड गादी, वर मऊ कापड अंथरलेले आणि त्यावर अवाढव्य शरीरयष्टीचे श्वानमहोदय – ‘कोको‘ दिमाखात विराजमान! मला पाहताच जागचे उठून त्याने घर दणाणून सोडले. (माझं नशीब त्याला बांधलेलं होतं!) रंगावरून याचं नाव ‘कोको‘ ठेवलं असलं तरी त्याला ‘भोभो’ हे नाव अधिक शोभलं असतं असं त्यावेळी मला वाटलं आणि त्याच्याशी मैत्री करण्याचा विचार मला एका दिवसापुरता मागे घ्यावा लागला. त्या रात्री आम्ही एका खोलीत बंद होतो आणि ‘कोको‘ चा घरात मुक्तसंचार…!

दुसऱ्या दिवशी सकाळपासून ‘कोको’ च्या दिनक्रमातील प्रत्येक घटनांनी मी थक्क होत होते. सकाळी ७ वाजता कोको मालकिणीबरोबर फिरायला निघे. फिरण्यासाठी खास वेगळा पट्टा. तो परिधान करून कोकोची स्वारी चार ढांगात खाली उतरली. फिरून आल्यावर कोकोची मालकाबरोबर मस्ती चाले ती ही ठरलेला वेळ. त्याच्या प्रत्येक गोष्टीचं काटेकोर वेळापत्रक होतं. “कोको, वॉटर…” अशा मालकिणीच्या सूचक मंजूळ आज्ञेवर हे महाशय पळत पळत पाण्याच्या जागी गेले. तिथे दोन फूट उंच भोकवल्या स्टूलात ठेवलेल्या चकचकीत भांड्यातले निर्जंतुक पाणी कोकोने प्राशन केले. त्यानंतर त्याची यथासांग न्याहारी… ताज्या भाकरी-पोळीच्या कुस्कऱ्यावर तीन अंडी आणि मग सुपारी म्हणून चघळायला एक खास हाडूक! हे सगळं होईतो आमची न्याहारीची वेळ टळून गेली होती… दुपारी वामकुक्षीनंतर कोकोचे ट्रेनिंग सुरु झालं. फेकलेला चेंडू आणून देणे, लपवलेली वस्तू शोधणे, दोन पायावर चालणे, “सीट, डाऊन, अप, रीलॅक्स” अशा आज्ञा पाळणे… वगैरे. कुत्र्यांना फक्त इंग्रजीच समजते किंवा शिकवायचे असते अशी माझ्या ज्ञानात नवीन भर पडली. मी तिथे जाताच तो पुन्हा भुंकायला लागला. मालकिणीने त्याला आवरून “फ्रेंड” अशी माझी ओळख करून दिली. मी ही हळूच त्याला हात लावून पाहिला. मी “फ्रेंड”च आहे अशी त्याची खात्री व्हावी म्हणून त्याची आवडती बिस्किटे त्याला दिली. पण बिस्किटे खाऊनही कोको विरोधक भूमिकेतच राहिला.

संध्याकाळी थोड्या धीटपणे मी कोकोच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण हा कोको असा काही पेटला की माझं धाबंच दणाणलं! “फ्रेंssड” अशी मालकिणीने माझी पुनर-ओळख करून दिली. परंतु कोकोवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. “कोकोने एकदा नीट वास घेतला की मग तो विसरत नाही फक्त आधी खात्री पटेपर्यंत तो भुंकतो” हे मालकांचं स्पष्टीकरण ऐकलं. कुत्र्याला वास घ्यायला इतका वेळ लागतो?… त्यातून नक्की कोणती खात्री याला पटायला हवी आणि ही गोष्ट कोकोने मालकांला कधी सांगितली? – तेवढं मात्र मला समजलं नाही. त्यानंतर मालकांनी मला कोकोचा सगळा इतिहास सांगितला. त्याला कोणाकडून, कसं, कधी आणलं वगैरे… तसेच दर आठवड्याने त्याला अंघोळ कशी घातली जाते; केस विंचरून गळणारे केस कसे काढले जातात; दर महिन्याला डॉक्टरकडे तपासणीला कार मधून कसे नेतात; त्याचा साबण, लोशन, कंगवा, जेवणाची भांडी, खेळणी सगळं कसं अप टू डेट आहे; त्याच्या ट्रेनरच्या सूचना; गावाला जायचं असलं की त्याचं महागडे पाळणाघर… आणि बरेच काही. शिवाय त्याचे घरी आणल्यापासूनचे फोटोही दाखवले… (कॉमेंट्रीसकट). अगदी लहान असताना कोको काय काय करायचा हे त्या मालकिणबाईंनी कौतुकाने सांगितले. बिछान्याची चादर, गादी, कार्पेट, चटई, पायपुसणी, वर्तमानपत्रे, मासिके यातले काहीही कुरतडणे; गॅलरीत कुंडीतल्या झाडांची वाट लावणे हा त्याचा आवडता खेळ होता म्हणे!… आणि याची शिक्षा म्हणून त्याला मारायचे नाही असे ट्रेनिंग मास्तरने सांगितलेले. कुरतडलेली वस्तू त्याच्या नाकासमोर धरायची आणि बाजूला तीनवेळा अलगद आपटायची की त्याला कळते म्हणे. पण पुढच्या वेळेस कुरतडण्यासाठी एखाद्या नवीन वस्तूचा नंबर लागायचाच. हे एकेक विलक्षण प्रकार ऐकून मला कोकोपेक्षा त्या मालक-मालकिणीचीच अधिक भीती वाटायला लागली. ‘माणसांसाठी कुत्रा आहे की कुत्र्यासाठी माणसं?’ – असा विचार क्षणभर येऊन गेला. पण श्वानप्रेमाखातर तो विचार मी मनातच ठेवला.

पुढच्या दोन दिवसात अनेकदा मी कोकोला प्रेमाने हात फिरवून किंवा त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करून पाहिला. “फ्रेंssड, फ्रेंssड” अशी उजळणी झाली. घरात लहान मूल असेल तर जे कोड-कौतुक चालते त्याच्या वरताण कोकोचे किस्से ऐकले. पण कोकोच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. निघायच्या दिवशीही कोकोने माझे सारे प्रयत्न धुडकावून लावले आणि हजारवेळा “फ्रेंssड” सांगूनसुद्धा मला भुंकतच निरोप दिला. “आमचा कोको हुशार आहे. त्याला कोणाशी मैत्री करायची ते तो आधी वासावरून ओळखतो आणि मगच मैत्री करतो.” इत्यादी कौतुकमिश्रित उद्गार आम्हाला खाली सोडायला आलेल्या मालकांनी ऐकवले. (म्हणजे त्यांच्यामते मीच त्या धटिंगण कुत्र्याच्या मैत्रीस लायक नाही??…)… त्या अजब कुत्र्यासमोर व त्याच्या मालक-मालकिणीसमोर हात टेकले!

येतानाच्या प्रवासात मनात विचारांचे तरंग उठले. माणसाच्या जन्माला येऊनसुद्धा सहसा असे सुख मिळायचे नाही, असं नशीब काढलंय या बेट्या कोकोनं. आज इथे अमेरिकेत येऊन इथल्या कुत्र्यांची बडदास्त पाहते. या समृद्ध देशातली कुत्री एका शिस्तीत जगतात. पण काही वर्षांपूर्वी भारतात जेव्हा कोको रुपानं अतिशयोक्तीचं उदाहरण पाहिलं तेव्हा हसायला (की रडायला?) आलं. दोनवेळा जेवायला मोताद असणारी लाखो माणसे ज्या देशात आहेत; जबाबदाऱ्यांची ओझी चिमुकल्या खांद्यावर वागवत लाखो बालकामगार जिथे शिक्षणापासून वंचित आहेत; वैद्यकीय सुविधांपासून लाखो दीन-दुबळे प्रतिदिनी मृत्यूला जवळ करीत आहेत; अशा देशात एका कुत्र्यासाठी केलेला एवढा पैशाचा आणि कार्यशक्तीचा अपव्यय पाहून मन अस्वस्थ झालं हे मात्र खरं…

पुढच्यावेळी (देवकृपेने तशी वेळ आली नाही पण) जर या कुटुंबाकडे भेट द्यायची वेळ आली असती तर हा लाडला श्वानपुत्र शर्ट-पॅंट ह्या पेहेरावात कोकाकोला किंवा पेप्सी पीत आरामात कोचावर टीव्ही बघत बसलेला दिसला असता तर त्यात नवल ते काय? शिवाय ट्रेनरच्या सल्ल्यानुसार वधू परीक्षा सुरु असती किंवा कदाचित त्याचा वाढलेला कुटुंबकबिलाही बघायला मिळाला असता!… जोडीला जबाबदार झालेला कोको आता कमी भुंकतो म्हणून “गुड डॉग” पदवी देत मालकीण बाजूला उभी असतीच.

पुढे ‘कोको’ला सांभाळणे अशक्य झाल्यावर त्याची रवानगी कायमची पाळणाघरात झाली… वार्षिक रु. ७०,०००/-फी भरुन! पाळणाघरातच कोकोचं दु:खद निधन झाल्याचं आम्हाला कळले… त्या श्वानसम्राटाला आणि त्याचे लाडकोड करणाऱ्या त्या हौशी(?) श्वानप्रेमी कुटुंबाला माझ्या (श्वान)प्रेमपूर्वक शुभेच्छा!

~ सायली मोकाटे-जोग
#सायलीमोकाटेजोग
http://sayalimokatejog.wordpress.com/2017/10/11/shwanprem/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा लकी डॉग ! हा वाक्यप्रचार यामुळेच आला असावा...

पण कोकोला स्वातंत्र्य होते का? मालक चेंडू फेकणार आणि हा धावत जाऊन आणनार यात कसली मजा? मालकाचा गुलाम झाला... त्यापेक्षा ती रस्त्यावरची रात्र उजाडताच उगवणारी आणि येणार्‍या जाणार्‍या दुचाकीच्या मागे भुंकत जाणारी सो कॉलड भटकी कुत्री धमाल करतात..

काही जोडप्यांना अपत्यप्राप्ती होत नाही मग असे लोक पेटस मध्ये अपत्य शोधतात. लाड करतात.. त्याच्यात खुशी मिळते.. स्वतःच्या आनंदासाठी करतात, त्यात चुकीचं वाटत नाहीय काही. पर्सपेक्टिव्ह आहे, कोणाला अतिशयोक्ती वाटेल कोणाला नॉर्मल पेट टेकिंग केयर प्रोसेस.

सायली पटला लेख.
मला पण हे अतिश्वानप्रेम अजीब वाटतं.
काही जोडप्यांना अपत्यप्राप्ती होत नाही मग असे लोक पेटस मध्ये अपत्य शोधतात.>>>>> मला वाटतं त्यापेक्षा त्यांनी एखादं अनाथ मुल दत्तक घ्यावं.

मला कुत्र्याविषयी किंवा त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या मालकांविषयी मुळीच आकस नाही परंतु ज्या घरात कुत्रे किचनपासून बेडरूमपर्यंत विहार करतात त्या घरात जाताना मी हायजीन च्या कारणांसाठी कचरते. कितीही नाही म्हटलं तरी बऱ्याच श्वानांना एक प्रकारचा वास असतो आणि कोणतीही ब्रीड असली तरी त्यांचे केस गळतातच.

त्यामुळे "आमच्या घरी पाळलेलं कुत्रं अंगणात बांधलेलं असायचं. ते घरात वा गादीत कधीच आलं नाही. अगदी डोळेही न उघडलेलं पिलू – त्याला बाटलीने दूध पाजण्यापासून पुढे खाणे-पिणे, फिरणे, कधी अंघोळ आणि त्याची स्वत्छ्ता, रुटीन इंजेक्शन्स हे सारे बिनबोभाट चालायचे. आम्ही त्याच्याबरोबर मनसोक्त खेळायचो, मस्ती करायचो पण घरात येताना हात-पाय स्वच्छ धुवूनच." हे आवडलं.

लेख नाही आवड्ला.

घरात प्राणी पाळला की तो आपल्या कुटुंबाचाच एक भाग बनून रहायला हवा. जेवढे प्रेम आपण घरातील लहान मुलाला देतो तेवढेच प्रेम त्या प्राण्यालाही मिळायला हवे. अर्थात शिस्तसुद्धा लावायला हवी ह्यात काही वाद नाही. हे जमणार नसेल तर प्राणी पाळूच नये.

दोनवेळा जेवायला मोताद असणारी लाखो माणसे ज्या देशात आहेत; जबाबदाऱ्यांची ओझी चिमुकल्या खांद्यावर वागवत लाखो बालकामगार जिथे शिक्षणापासून वंचित आहेत; वैद्यकीय सुविधांपासून लाखो दीन-दुबळे प्रतिदिनी मृत्यूला जवळ करीत आहेत; अशा देशात एका कुत्र्यासाठी केलेला एवढा पैशाचा आणि कार्यशक्तीचा अपव्यय पाहून मन अस्वस्थ झालं हे मात्र खरं >>> सॉरी पण तुमचे विचार अजिबात पटले नाहीत. एका प्राण्याचे प्रेमाने पालन करणे तुम्हाला पैशाचा आणि कार्यशक्तीचा अपव्यय वाटतो ह्यावर काय बोलणार.

या लेखावर जितकी खडाजंगी होईल असे मला वाचल्या वाचल्या वाटलेले तितकी आतापर्यंत झाली नाही Happy
कारण यातील जो विचार आहे तो आणि त्याची विरुद्ध बाजू दोन्ही त्या त्या दृष्टीकोणातून पटण्यासारख्या आहेत किंवा खटकण्यासारख्याही आहेत.

सुमुक्ता -
माझे आजोबा गेले तेव्हा आमच्या घरातल्या पाळलेल्या कुत्र्यालाही कळले तो जेवला नाही ३ दिवस. शेवटी बाबांनी त्याला माया करून खायला लावले कारण आमच्या कुटुंबाचा तो सदस्य होता पण म्हणून आम्ही रोज त्याला गादीत घेऊन झोपत नव्हतो.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीच योग्य नसतो. पाळीव प्राण्याला प्रेम देणे म्हणजे त्याच्या गरजा सोडून अवाजवी काहीतरी करत राहाणे असा थोडाच होतो? वार्षिक ७०००० रु मध्ये एखाद्या अनाथ मुलाचे शिक्षण होऊ शकते. कोणाचे जीवन बदलू शकते. एखाद्या रोग्याचा उपचार होऊ शकतो.

अहो तसा तर मेकअप आणि कपड्यांच्या खर्चा मध्ये २ मुलांची शिक्षण होतील, नेमका कुत्रांच्या खर्चावर का तुमचा डोळा?

खरं सान्गायचं तर शेवटचा जजमेंटल पॅरा सोडता लेख मजेशीर आहे!!आवडला.
बाकी कुत्र्याला बेड मध्ये येऊ देणे न देणे, महागाच्या चड्ड्या शिवणे हा ज्याचा त्याचा आणि त्या कुत्र्याबद्दलच्या प्रेमाचा प्रश्न.
जोवर मला किंवा सोसायटीतल्या कोणाला ते कुत्रं चावत नाही तोवर बाकी कशाबद्दलही वाईट वाटणार नाही.

लेख मजेशीर आहे. ह्या कॅटेगरीतील लोक बघितले आहेत . शेवटच्या पॅराबद्दल प्रत्येकाची मतं वेगळी असतील .

मला कुत्र्याविषयी किंवा त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या मालकांविषयी मुळीच आकस नाही परंतु ज्या घरात कुत्रे किचनपासून बेडरूमपर्यंत विहार करतात त्या घरात जाताना मी हायजीन च्या कारणांसाठी कचरते. कितीही नाही म्हटलं तरी बऱ्याच श्वानांना एक प्रकारचा वास असतो आणि कोणतीही ब्रीड असली तरी त्यांचे केस गळतातच. + १०००

दोनवेळा जेवायला मोताद असणारी लाखो माणसे ज्या देशात आहेत; जबाबदाऱ्यांची ओझी चिमुकल्या खांद्यावर वागवत लाखो बालकामगार जिथे शिक्षणापासून वंचित आहेत; वैद्यकीय सुविधांपासून लाखो दीन-दुबळे प्रतिदिनी मृत्यूला जवळ करीत आहेत; अशा देशात एका कुत्र्यासाठी केलेला एवढा पैशाचा आणि कार्यशक्तीचा अपव्यय पाहून मन अस्वस्थ झालं हे मात्र खरं…>>> हे नाही आवडलं.

pratidnya , शालिनी_वादघाले - खर्च कोणी कशावर करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तसंच एखाद्या गोष्टीवरचे मतही ज्याचे त्याचेच असते नं. सगळ्यांना ते पटलंच पाहिजे असा आग्रह नाही!
mi_anu, कऊ, जाई, जागू - प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
आशुचँप - तुमचं म्हणणं लक्षात नाही आलं