" देवयानी "

Submitted by सेन्साय on 1 November, 2017 - 13:16

.

.

नेहमीच्या सवयीप्रमाणे संध्याकाळी मी माझ्या आवडत्या ठिकाणी बसलो होतो. दूर दूर पसरलेली अस्फुट अनाकलनीय ती क्षितिज रेषा , जेथुन माझी देवयानी अलगद अवतरते अन् अल्लड प्रियतमेगत अनिवार ओढिने हळू हळू माझ्याच दिशेने येत ह्या उधाळणाऱ्या प्रेम सागराच्या लाटेवर स्वार होत हृदयाच्या किनाऱ्यावर दिमाखात विसावते ; तेच हे माझे आवडते स्थान.... रुपेरी पुळणीवर पसरलेले मीऱ्या बंदर. तुझी आतुरतेने वाट पहात बसण्याचे आणि अर्थातच तुझे हसतमुखानी स्वागत करण्याचे एकमेव ठिकाण !

आज मात्र हासणे विसरून माझं हृदय मोठमोठ्याने वाजत होतं... गाडी जास्त धावल्यावर इंजिन गरम होतं तसं तुझ्या बद्दलच्या विचारानी माझा मेंदूही गरम झाला होता. एखाद्या मोठ्या पेटीत माझा प्राण बंदिस्त ठेवला आहे अन तो मिळवण्यासाठी मी तडफडतो आहे असं वाटत होतं. त्या पेटीची चावी अर्थातच तुझ्याकडे होती किंबहुना तूच तर ती चावी होतीस ! मला सर्व गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय शांत बसणं अशक्य झालं होतं. अखेर काहीच न सुचल्याने मी परिस्थितीला शरण जायचं ठरवलं... !

तुझी एकवार झलक पाहता यावी म्हणून संपूर्ण शरीरच आज दृष्टी बनले होते. हां प्रतिक्षेचा काळ मात्र खुपच जीवघेणा बनत चालला होता. माझी तुझ्याप्रतीची ओढ़ मला कुठल्यातरी अज्ञात गुहेत ओढू पाहत आहे असं सारखं वाटू लागलं होते. अस्तित्व अन भासाच्या जगाच्या पलीकडेही एक जग असतं, ह्याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेत तटस्थ उभा होतो. अंतराळ, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे ईश्वराच्या नाभिशी जोडले जातात. मोक्ष पावलेला आत्मा शेवटी त्यालाच जाऊन मिळतो अन अतृप्त राहिलेला जीव मात्र पुन्हा-पुन्हा हेच चक्र फिरत राहतो. मी, माझा आत्मा, माझ्या अस्मिता असे सगळेजण नुकताच हा सर्व प्रवास करून आलो होतो.

उड़त उड़त कानी पडलेल्या संध्याकाळच्या खबरीनुसार तो पाताळयंत्री दुष्ट धटिंगण आज झंझावाता प्रमाणे तुझी वाट अडवून उभा असणार होता, तुला माझ्यापासून कायमचं तोडण्यासाठी जणु तो हट्टालाच पेटलेला होता. ...आणि अखेर त्याने डाव साधलाच ! तुला माझ्या पर्यन्त पोहोचु देण्यापेक्षा त्याने तुला प्रवासातूनच अलगद उचलले...सोबत असलेल्या सर्वांच्या डोळ्यादेखत त्याने तुला निर्लज्जपणे स्वतःच्या बाहुपाशात कवटाळले. कोणाला काही प्रतिकार करण्याच्याही स्थितीत न ठेवता तो आला तसाच सुसाट वेगाने तुझ्यासह गुप्त झाला....मला कायमसाठी एकटे करून !

वेधशाळेच्या अहवालानुसार आज फयान चक्रीवादळाचा तडाखा बसणार होता म्हणून सगळ्या बोटी भरभर परतीच्या प्रवासास लागल्या होत्या; पण त्या दुर्दैवी लाटेच्या तडाख्यामुळे माझी सगळ्यात लकी बोट " देवयानी " मात्र राहिली क्षितिजा पलीकडे .... कायमचीच !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबज्ञ, कथा आताच वाचली. एखाद्या पौराणिक कथेतील प्रसंग वाचल्याचा फिल आला. नायकाच्या मनस्थितीचे फारच सुंदर वर्णन केले आहे.

धन्यवाद सचिनजी
असे काही लिहायचा पहिलाच प्रयत्न केलाय, कितपत जमलय माहीती नाही Happy

धन्यवाद राहुल Happy

ही स्टोरी खरं तर इकडे रत्नागिरी मधील रियलस्टोरी आहे त्या प्रत्येक बोट मालकाची ज्यांनी इकडच्या वादळात आपली बोट गमावली.
ही बोट म्हणजे त्यांच्यासाठी नुसते उपजीवीकेचे साधन नसते ; तर ते त्यांचे खरोखरच एक पहिले प्रेम असते !

ही बोट त्यांची जीवा भावाची मैत्रीण, हमसफ़र सगळं काही असते. सकाळी दर्यावर गेलेल्या बोटी संध्याकाळी किनाऱ्याला परतात तेव्हा ही मंडळी अशीच प्राण डोळ्यात आणून तिची आतुरतेने वाट पहाताना मी प्रत्यक्ष अनुभवलय त्याचं हे थोडक्यात शब्दांकन मांडण्याचा प्रयास Happy

छान.

chan....

धन्यवाद सायुरी Happy
प्रोत्साहनासाठी आपले विशेष आभार नीलम Happy

छान!
एखाद्या पौराणिक कथेतील प्रसंग वाचल्याचा फिल आला. नायकाच्या मनस्थितीचे फारच सुंदर वर्णन केले आहे.>>>+११

धन्यवाद ऋन्मेSSष Happy

खरं पाहता तुमचे आणि श्री. बेफ़िकीरजी ह्यांचे लिखाण वाचून मी मायबोलीचा सभासद झालो. आपल्या आवडत्या माणसाचा ईथे प्रतिसाद पाहुन खरंच खुप छान वाटले. म्हणून पुन्हा एकदा मनापासून आभार Happy