मंजुळ्यांची तुळसा

Submitted by प्रशांत तिवारी on 25 October, 2017 - 03:19

images.jpg
घराचं अंगण अगदी कुणाच्या खिजगीणतीतही नसलेला विषय...पण तरी यावर लिहावंसं वाटतंय...घराला अंगण असणारे किती भाग्यशाली असतात हे पुण्या मुंबईत फ्लॅट मध्ये राहणाऱ्याला विचारा? हा लेख लिहीत असताना कदाचित मी त्यांच्या दुखऱ्या भागावरील खपल्याही काढत असेल याबद्दल क्षमस्व!!! पर्यायाने माझ्याही...
अंगण म्हटलं की एक डोळ्यासमोर येणारी प्रतिकृती म्हणजे गोड अस तुळशी वृंदावन त्याच्या खाली खोबणीत पणती लावायला छोटीशी जागा, वृंदावणावर विठ्ठल रखुमाईच चित्र, आणि त्या तुळशीच्या कुंडीत मातीत रोज खोसलेल्या उदबत्त्यांचा खच, छोटीशी रांगोळी, कडेने तारेच कंपाउंड, कोपऱ्यात ठेवलेला पाणी तापवायचा बंब व मांडलेली चूल, कुठेतरी लाकडाची मोळी पडलेली, एखाद पेरुच छोटस झाड व दुसऱ्या बाजूला हमखास शेवगा, जरासं अडगळीच लोखंडी साहित्य उभी केलेली बाज (चार पायांचा दोऱ्याचा पलंग).अस म्हटलं जातं की अंगण पाहून घर व माणसे कशी आहेत हे कळतं. किंबहूना बहुतांश अर्थी ते खरं ही वाटत. घरातील कित्येकांच्या वेगवेगळ्या आठवणी येथे भरलेल्या असतात.
सकाळचं होते ती आंगण शेणाने सारवल्यापासून...दोन तीन शेणाचे थाप्पे त्या त्या भागात पसरवले जातात लहान मुलांचा ब्रश तर या अंगणात सुरू होत असतो तोच डोळे मिटलेल्या अवस्थेत आजच्या सारखा ना बेसिन ना आरसा, थुंकण्यासाठी कंपाउंड बाहेर पिचकारी मारली की झालं. आज्जी मात्र त्या बंबा वरच्या पाण्याकडे लक्ष ठेऊन असायची व सगळ्यांचे आंघोळीला नंबर लावून द्यायची गरज वाटेल तसे लाकडं घातली जायची. तर एका कोपऱ्यात उखळ म्हणून गोल खड्डा असायचा त्यात साऱ्या चटण्या, दिवसभराची वाटणं, बारीक कुटून घ्यायचं काम चाललेलं असायचं. काही जी दिवसभराची धावपळ आहे ती याच अंगणात उठून दिसायची जस रोज दिवाळी दसरा असावा. नंतर ऐक ऐक काम हातावेगळ करताना घरातल्या कर्त्या स्त्री कडून तुळशीची नित्यनेमाने पूजा व्हायची तो डोक्यावर घेतलेला पदर पदर, भाळी लागलेलं ठसठशीत कुंकू या सात्विकतेने ती स्वतःसाठी काही न मागता ही माऊली आपल्या घरासाठी मात्र देवाकडे भरभरून मागायची. जसा दिवस वर यायचा तस उन्ह वर येऊन अंगणातील वर्दळ कमी व्हायची दुपारच्या जेवणासाठी आत मध्ये भाजी लावली जायची व बाहेर भाकऱ्या थापल्या जायच्या. व आज्जीचा वेळ मात्र घराच्या सावलीला बाजावर बसून तिच्या सुनेला मागदर्शन करण्यात व भावकीतील उणीदुणी सांगण्यात जायचा तेवढीच सूनबाईलाही काम करता करता करमणूक...वेशीवर अंगण असणाऱ्यांना मात्र एक फायदा हा की येता जाता बायका काय चाललंय या निमित्ताने ५-१० मिनिट बसायच्या त्या निमित्ताने एकमेकांशी विचारांची देवाणघेवाणही व्हायची शिक्षण कमी असल तरी त्या बोलण्यातून संवेदनशीलता स्पष्ट दिसायची. घरातून निघताना सवाष्ण बाईला चुकून लावायचं राहून गेलेलं हळदीकुंकू अंगणात लावलं जायचं. घरातल्या छोट्या मुलींचे रांगोळीचे प्रॅक्टिस सेशन या अंगणातच पार पडायचे.
गावातील जत्रा हि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा स्वतंत्र विषय हि जत्रा जवळ आली की गावातली थोर मंडळी याच अंगणात फतकल मारून जत्रेच्या विषयीची खलबत व्हायची, एकमेकांच्या विचाराने याच सार प्लँनिंग व्हायचं. कुणी उभं राहून तर कुणी दोन पायावर आपलं धोतर सावरत बसायच. काहींचा शाब्दिक सहभाग नसला तरी हम्मम्म हम्मम म्हणून मूक सहभाग नक्कीच असायचा कारण या मिटिंगसाठी तंबाकुने भरलेला तोबरा फेकून देण्याइतपत दिलदारपणा त्या काळीही नसायचं. चला म्हणजे आजच्या आणि त्या काळातही काहीतरी साम्य दर्शवणारी गोष्ट होती तर.
घरात काही लग्न, साखरपुडा, सुपारी फोडन, आनंदी कार्य असेल तर आंगण हेच मंगलकार्यालय असायचं चारी बाजूने चार बांबू उभारले की झाला मंडप व कंपाउंडबाहेर एक कढई व खालून रटरटनारा जाळ. कित्येक नववधू तर या अंगणाच्या साक्षीने आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पहात प्रवेश करतात व या जागेत घेतलेला उखाणा हा आयुष्यभरासाठी पाठ झालेला असतो. एकदा या अंगणात प्रवेश केला कि उभा जन्म हेच अंगण त्या स्त्री च्या प्रत्येक सुख दुखात साथ देणार ठरायच...अंगणातूनच सुनबाई!!! असा सासऱ्यांचा आलेला आवाज घरातील बायकांची त्रेधातिरपीट उडवण्यात पुरेसा असायचा व डोक्यावरून ढळलेला पदर सावरण्यात माता भगिनींची फजितीही व्हायची पण हि भीती नक्कीच नसायची तर त्या काळातील वातावरणाने झालेले संस्कार असायचे..
कित्येक बायकांचे उन्हाळे या अंगणाने पूर्ण केलेले आहेत. पापड्या, कुरडया, वडे, शेवया वर्षभराच बरचस काम या अंगणात बसून व्हायचं व वाळवनासाठी या सारखी "शेफ" जागाही दुसरी नसायची हा आता अधूनमधून बारकाली पोर चोरून ते पदार्थ न्यायची हा भाग वेगळा व बाजेवर बसलेली आज्जी जोरात ओरडायची "अय गाबड्या, यिवं का तुझ्या घरला?" व हे आजीचं भारीतल तार सप्तकातल रागांवन पाहून सुनेलाही पदर तोंडाला लावून हसायचा मोह आवरायचां नाही पण त्यातही वेगळीच मजा असायची व त्या पोरांच्या आयांना यावरून रागवायला एक आयत कोलीत आजीला मिळायचं पण ही भांडण म्हणजे दिवसभरापूरतीच असायची रात्री घरातल्या लहान मुलाकरवी वाटीत त्यांच्या घरी कालवन पाठवून गोड माघार घेतलेली असायची जणू काही बट्टी करण्यासाठी हे ऐकमेव कारणही असावं. णा त्यात कसला बडेजाव नी ना कसला अहंकार...
दिवाळीत तर या अंगणाला वेगळीच झळाळी यायची पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत अभ्यंग स्नान करण्यास लागलेली रांग कोण सर्वात अगोदर तयार होतय, हि लागलेली चढाओढ, फुला तोरनांनी दरवाजे नखशीकांत सजले जायचे त्या दिवसात त्याचं महत्व माहेरवाशिणी इतकच असायचं...माहेरी आलेली मुलगी म्हणजे साऱ्या लाडवा मधील नाजूक बर्फी असावी तसेच हे दरवाजे..त्या अवाढव्य घरात जाताना त्यावरून दारावरची नजरच हटायची नाही ..
तसच एकमेकांच्या अंगणातुनचं फराळाच्या रेसिपीज समजून घेतल्या जायच्या. बुंदीच्या पाकातील तार किती जाड, चकल्याच पीठ किती प्रमाणात मिक्स करायचं , एकमेकांचा सोऱ्या शेव बनवण्यासाठी वापरला जायचा, करंज्यासाठीचा लागणारा चमचा चिम्या - गोम्याकडून पाठवला जायचा... त्या तळायच्या वासाने अंगनात अगदी घमघमाट सुटायचा हे सांगायला नको !
लहान मुलांना दुपारी कुठूनतरी विशिष्ट प्रकारचा आवाज यायचा केसांवर मिठाई, फुगे, बर्फाचा गोळा, कुल्फी व त्या माणसाला बोलावण्यासाठी अंगणात उंच उड्या मारून टाचा उंच करून हाथ हलवून त्याच लक्ष वेधून त्याला बोलावलं जायचं व तो आल्यावर आजीकडे चार आण्यासाठी मस्का मारला जायचा व आजी मात्र हळूच सांगायची. त्या पैशात मात्र ती स्वतःसाठी काही नाही करायची जे काय असेल नातवंडे, मुली या सर्वांसाठीच. मुलांच्या कित्येक उन्हाळच्या सुट्ट्या अंगणात गल करून गोट्या खेळण्यात गेल्या. कोया, लिंगोरचा, विटी-दांडू या खेळांनी आंगण नेहमी भरलेलं असायचं.
हिवाळ्यात रात्री हे अंगण अजून मोठं व्हायचं थंडी जास्त असल्याने लहान मुलांना आजूबाजूच्या काट्या कुटक्या आणायला सांगत व जेवण झाल्यावर सर्व त्या भोवती कोंडाळ करून बसत. या शेकोटीत मग कुणी पापाड्या भाजून खायचं तर कुणाचं शेंगा फोडून दोन दोन दाणे तोंडात टाकायचं काम करायचं, दिवसभर झालेल्या गोष्टीचा आढावा या शेकोटी मध्ये घेतला जायचा तिथे आजी व नातवंडे टीम वेगळी असायची कारण त्यांना तिच्या मांडीवर डोकं ठेऊन पडताना, रात्रीच्या अंगनाणातून चांदण्या मोजताना वेळ ही पुरत नसत तर कधी मुलांच्या आग्रहाखातर आजीच्या तोंडून एखादी तिने अनुभवलेली भुताची गोष्ट ऐकताना जाम वाट लागायची मग थोडी भीती जावी म्हणवून तिच्या सुरकुतलेल्या हातावर हात देऊन आपण एकटे नाही आहोत ही जाणीव करून घेण्यात एक मायची उब त्या थंडीतही मोठी वाटायची व गोष्ट ऐकताना त्या अंगणात गोधडीत आजीच्या कुशीत कधी झोप लागायची कळायच ही नाही.
आज ही हे अंगण म्हणजे एखादा कल्पना-विलास वाटावा एवढ लोभस रूपड या अंगणाला लाभलंय...जणू काही चांदण्याच्या आकाश गर्दीत हा अंगणरुपी चंद्र मनाच्या कोपऱ्यात आजही तेवतोय अगदी तुळशीच्या दिव्यासारखा शांत आणि सभोवतालचा परिसर प्रकाशमय करणारा... सध्या स्थितीच जगणं हे पूर्ण असूनही कुठेतरी अपूर्ण आहे अस उगीचच वाटून जात.. बंद फ्लॅटच्या मागे ही सारी सुखासीनता नक्कीच लोप पावलीये. शेजारधर्म हा फक्त वाढदिवसाची आमंत्रण देण्यासाठीच पाळला जातो हीच काय ती छोटीशी दुखरी जखम...अधेमधे बंद दारंही सजीव न वाटता फक्त चित्र भासतात मग हाच जिव्हाळा शोधण्यासाठी आज ठिकठिकाणी आभासी छटा असलेले कृत्रिम रितीने बांधलेल्या फार्महाऊसची आपल्याला गरज पडते, हिवाळ्यात हुरडा पार्टी करून रोजच्या शहरी जीवनातून चार क्षणांचा विसावा मिळवला जातो आणि ते गरजेच हि आहे कारण हे "अंगण" प्रत्येकाच्या स्वप्नी उतरेल अस तर नाही ना ! प्रत्येक गोष्टीला ऑप्शन हा आहेच ...तो आधी नव्हता हीच बरी वाटणारी गोष्ठ..
बाल-गोपाळांचा चांदोबाबा व त्याला लपायला जागा देणार गाण्यातील निंबोणीच झाड या गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत त्या इवल्याश्या हाताने तूप-रोटी खायला तरसतय, चिरेबंदी वाड्याच रूप कल्पनातीत नसून वास्तव्याचच एक भान आहे हि उत्कटता विचारात येऊन या आठवनीही नेहमी समृद्ध व श्रीमंत व्हाव्यात हीच सदिच्छा... अस असूनही हे शब्दरूपी अंगण मनात अजूनही जिवंत आहे हेच आमच्या साऱ्यांच अहोभाग्य ...गांधीजींच्या "खेड्याकडे चला" या संदेशाच महत्व खऱ्या अर्थाने जाणवतंय..
तुळशी च्या लग्नाला असणार हवहवस ऐसपैस अंगण तुम्ही व मी नेहमीच मिस करतोय...!
"बोन्सायच्या काळातही तुळशीला अंगण होत"....!!!
-प्रशांत श. तिवारी

https://www.facebook.com/prashant.s.tiwari

https://www.youtube.com/channel/UCsvB3X7OV2p7PMjpTEtch3g

https://www.instagram.com/passion_of_music_7/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हो! अंगणातली मजा आठवली.
अंगणात गाद्या, वाकळी अंथरुन तारे पहाणे किंवा कंदिलाच्या उजेडात पत्ते खेळणे खूपच खास!

काय योगायोग आहे. मी सुधा दोन आठवड्या पूर्वी अंगणावर लेख लिहीला आहे. आणि बरेचसे मुद्दे आपले एकच झाले आहेत. मला तो आत्ता प्रकाशीत नाही करता येणार काही दिवसांनी करेन. कारण तो मी प्रकाशीत करण्यासाठी आधीच पाठवला आहे दुसरीकडे.

Mast!

सुंदर लेख, बालपणीचे आंगण आठवले, आम्ही भाड्याच्या घरात रहायचो ,वाडा होता पण मागच्या बाजूस मोठे सार्वजनिक आंगण ......मज्जा होती.

धन्यवाद!!पण तुमचाही लेख वाचायला नक्की आवडेल ...वाट पाहतोय...
आज लेख टाकला आहे. ऐसपैस अंगण.