कासव

Submitted by मुग्धमानसी on 7 October, 2017 - 02:29

तुम्हाला माहितेय नैराश्य म्हणजे काय असतं? म्हणजे ते हवं ते काम हवं तसं न झाल्याने येणारं तात्कालिक नैराश्य नाही बरंका.... तिन्ही त्रिकाळ वळवळत्या असंख्य गांडूळांसारखं तुमच्या अंतर्ममनात सतत हुळहुळत पसरत रांगत जाणारं नैराश्य. कण कण तुमच्या आत झिरपत तुम्हाला भुसभुशित करणारं नैराश्य. थोड्याश्या खतपाण्यानं स्वत:ची संख्या दुप्पट करणारी ही गांडूळं आपल्या आत सतत अगदी प्रत्येक क्षणी हसता रडता, उठता बसता, येता जाता, असता नसता तुमच्या अस्तित्वाचं अविभाज्य अंगं असल्यागत वळवळत राहिलेली अनुभवलीये कधी? अगदी सुखाच्या परमोच्च क्षणीदेखील ती तुम्हाला काहीच साजरं करू देत नाहीत. सगळ्यातलं व्यर्थत्व अगदी ठसठशीतपणे जाणवून देतात. लौकिकार्थाने तुमच्या आयुष्यात काहिही कमी नसते. चारचौघांसारखं सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं असतं. आणि तरिही तुमचं काहीतरी दुखत राहतं. सतत. काय दुखतंय हे बघावं वाटत नाही. दुखतंय असं कुणाला सांगावं वाटत नाही. कुणालाही भेटावं वाटत नाही. स्वतःशीही बोलावं वाटत नाही. आणि तरिही स्वत:शी स्वत:चं सतत अहोरात्र बोलणं थांबवताही येत नाही. तुम्ही करू शकता, थांबवू शकता, रोखू शकता, पार पाडू शकता असं जगात एकही काम उरत नाही. तुम्हाला अवलंबता यावा असा एकही मार्ग रहात नाही. तुम्ही स्वत:ला मोकळं सोडता. तरिही स्वत:त अडकलेले असता. गुंता कधीच सुटणार नाही अशी खात्री होऊन गेल्यावर तुम्ही थकून शांत होता. नि:शब्द होता. नैराश्याची भाषा समजणारं कधी कधी आयुष्यभर कुणी भेटत नाही.
लौकिकार्थाने तुमच्या आयुष्यात काहिही कमी नसते. चारचौघांसारखं सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं असतं. तरिही... त्याच चारचौघांत तुम्ही अगदी एकटे असता. एकटेपणाशी दाट ओळख होऊन जाते तुमची. पण मैत्री होत नाही. तुमच्या चामड्याच्या पलिकडे नांदणारे सगळे अनोळखी वाटतात. वेगळेच वाटतात. बहूतेकदा मूर्ख वाटतात. क्षूद्र वगैरे. आपण यांच्यातले नाही. मी इथली नाही. कोण आहेत हे सारे? का आहेत? मला यांच्याशी काहीही घेणं देणं ठेवायचं नाही. तरिही यांच्याशी गाठ पडल्यावाचून मला पर्याय नाही. मग मी शहाण्यासारखं वागायचा प्रयत्न करते. स्वत:ला नियम वगैरे घालते. बोलताना विचार करायचा... वागताना लक्ष ठेवायचं.... चालताना हरवून नाही जायचं... आणि हे सारं नीट अक्षात ठेवायचं. बोलायचं, सांगायचं असं काही महत्त्वाचं नसतंच. बोललं सांगितलं तरी कुणाला कळेल समजेल हे अशक्य वाटू लागतं. मग मी गप्प होते. मिटून घेते. कोषात जाते. प्रतिकार करत नाही. कुणालाही प्रश्न विचारत नाही. राग आला की संतापते, रडू आलं की रडते, ओरडावंसं वाटलं की ओरडते, खिदळावंसं वाटलं की खिदळते, बोचकारावंसं वाटलं की बोचकारते, कुरुवाळावंसं वाटलं की कुरुवाळते.... मी माझं सगळंच करते. पण माझं माझं माझ्यामाझ्या कोषाच्या आत. कुणालाही दिसत नाही. कुणालाही दिसू नये म्हणून अदृष्य होण्याची दुर्दम्य इच्छा मनामध्ये खोलवर घर करून बसते. माणसांचा उबग येतो. त्यांचं बोलणं, वागणं, असणं, वावरणं.. सार्यास सार्या ची किळस येते. आपल्याही माणूस असण्याची घृणा येते. मग मी दगडांशी, मातीशी, झाडांशी, भिंतींशी, बेडकांशी, किड्यांशी, सायकल, कार, चप्पल, कपाट या सार्याम सार्यां्शी बोलते. जे माणूस नाही ते सारं सारं बरं वाटतं. माझ्या माझ्या उबदार कवचातला माझा एकटेपणा मला सुरक्षित वाटतो. त्याचा आधारही वाटतो.

हे असं सारं झालंय तुमच्या बाबतीत? नाही? किंवा वेगळं विचारते.... हे वरचं सारं वाचून तुम्हाला असं वाटलं - "काही नाही हो... हिचं सुख दुखतंय! बाकी काही नाही!"?
हो. सुखच दुखतंय. या सुखाचं दुखणं सुद्धा वेदनादायी असतं हो.... .
___________

कासव असतं कासव! जे अनादी अनंत काळापासून इथंच तुमच्या आमच्या, प्राण्या पक्ष्यांच्या, झाडंवेलींच्या याच सृष्टीत, याच समाजात रहात असतं. श्वास घेण्याची आपली एकच हवा आपण याही जीवांसोबत वाटून घेतो. संथ संथ मंद चालीनं ते हजारोकरोडो वर्ष याच जमिनीवर कुठल्याही प्रतिकाराशिवाय, ताकदीशिवाय, वेगाशिवाय, आधाराशिवाय, समाजाशिवाय हे असंच रांगतं आहे. जिवंत आहे. त्याचा कोष हे एकच त्याचं आयुध. अस्त्र. घर. समाज. आधार! ही कासवं सॄष्टीच्या लक्षावधी युगांतल्या अगणित उलथापालथिंना दाद न देता अजून अस्तित्वात आहेत... कारण काय असेल?
कदाचित जिवंत राहण्याप्रती कमालिच्या नासक्तीनं यांना तगवून ठेवलं असेल.
एकाच समुद्रात राहून त्याच समुद्रातल्या इतर जिवांशी, स्वत:च्याही समाजाशी, स्वत:च्या पिल्लांशीही स्वत:चं काहीही गुंतवून न ठेवणारी ही कासवं अनादी काळापासून मुक्त आहेत. स्वतंत्र आहेत. तरिही सृष्टीच्या सगळ्या कारभारात स्वत:चा मूक सहभाग ही कासवेही नोंदवत असतात. त्यांची भूमिका निर्विकाराने आणि अनाहूत, अजाणतेपणे का होईना... चपखल पार पाडत असतात. जगण्यासाठी जो झगडा सगळ्यांनाच द्यावा लागतो तो त्यांनाही द्यावा लागतो. पोट भरण्यामागे धावावं, झगडावं लागतं. यांना शरिरधर्म असतात सगळ्याच जीवांप्रमाणे. व्यवहार असतात. जाणिवा-उणीवा असतात.
बांधिलकी नसेल... पण माया असतेच ना.... राठ कवचाच्या आत मऊसूत हुळहुळत्या नाजूक त्वचेला स्पर्ष हवा वाटत असेल ना....
सृष्टीचा अपर्यायी भाग आहेत ही कासवं. सृष्टी नामक समाजाने यांना स्वीकारलंय की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. यांनी मात्र या सॄष्टी नामक समाजाला चार हातांचं अंतर राखून स्वीकारलंय. तेही पर्याय नाही म्हणून. सृष्टीच्या नजरेत अदखलपात्र असणं ही सर्वात मोठी उपलब्धी आहे आहे कासवांची माझ्यामते! आणि त्यांच्या निर्विकार अस्तित्वाचं रहस्य सुद्धा!
_______________________

हो की... ’कासव’ या मोहन आगाशे निर्मित आणि सुमित्रा भावे-सुनील सुखठणकर दिग्दर्शित सिनेमाच्या निमित्तानंच लिहितेय मी. पण त्या सिनेमाविषयी मला काहीच बोलायचं नाही. त्याची कथा, पटकथा, कलाकार वगैरे सगळं सगळ्यांना कुठुनही कळण्यासारखं आहे. समजण्या आणि टिका किंवा स्तुती करण्यासाठीही फार काही अवघड नाही. त्याविषयी मी काही बोलावं असं नाही.
मला सांगायचीये ती या सिनेमाच्या निमित्तानं मला आलेली अनुभूती. माझी स्वत:ची अशी काही अमूल्य गुपितं जी या निमित्तानं मला सामोरी आली. अशी एक बाजू जी सांगायला, समजायला, स्वीकारायला कठीण आहे. पण आवश्यक आहे.
कलाकारांविषयी बोलायलाच हवे! अलोक राजवाडे आणि ईरावती हर्षे यांचा अभिनय अप्रतिम आणि साक्षात मोहन आगाशेंचा तर काही प्रश्नच नाही. किशोर कदम सुद्धा उत्तम आणि अगदी थोड्या भुमिकेत येऊन जाणार्‍या देविका दफ़्तरदारचा अमराठी लोकांच्या मराठी बोलण्यातला अस्सल टोनही छानच जमलाय आणि लक्षात राहतो.
हे सगळं खरं असलं तरी मला बोलायचंय ते वेगळ्याच दोन महत्त्वाच्या कलाकारांबद्दल. पहीला कलाकार म्हणजे ’समुद्र’ ज्याला अगदी चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत भरपूर आणि महत्त्वाची भुमिका दिली गेलीय! बहूतेक सगळ्या चित्रपटभर पार्श्वसंगिताला रोरावणारा समुद्र अक्षरश: गुंगी आणतो. अंतर्मुख करतो. समुद्र म्हणजे संमोहन. किनार्‍यावरल्यांसाठी. आणि समुद्र म्हणजे एक जग... विश्वही. समुद्रातल्यांसाठी.
दुसरा महत्त्वाचा कलाकार अर्थातच ’कासव’. जो नुस्ताच काही कशाचंतरी प्रतिक नाही! तो एक साक्षात अस्तित्व आहे! पाठिवरल्या जन्मजात कवचात बंदिस्त... तरिही मुक्त! कवचाबाहेरच्या सगळ्या आव्हानांना पुरून उरलेलं. विरक्त.
समुद्र नावाच्या पारंपारिक ग्रहावर वावर असलेल्या आणि समुद्री जीवांचा समाज स्वीकारलेल्या कासवाचा जन्म मात्र या सार्‍यापासून दूर किनार्‍यावरल्या वाळूत होतो. सगळ्याचा भाग असूनही सगळ्यापासून वेगळं आणि विरक्त असण्याची सुरुवात इथून होते त्याची. त्याची जीवनगाथा चित्रपटभर पेरलेली आहे. पडद्यावर नसतानाही त्याची भुमिका जाणवत रहाते. बर्फाच्या गोठलेल्या नदीखाली कणकण वाहणार्‍या नदीसारखी कासवाची गोष्ट चित्रपटभर पार्श्वभागी वाहत राहते. पडद्यावरच्या आणि पडद्यासमोरच्याही सगळ्या कलावंतांच्या असण्या, बोलण्या वागण्यातून कासवाची एक विचित्र अनाम व्यथा अनाकार ठसठसत राहते.
चित्रपटाच्या शेवटी अंडी फोडून बाहेर पडलेली समुद्राकडे धाव घेणारी छोटी छोटी पिल्लं दिसतात. आपलं वेगळेपण आपल्या कवचात साठवून ही पिल्लं समुद्र नावाच्या समाजाचा स्वीकार करतात. समुद्र त्यांना सामावून घेतो कारण ते त्याचं काम! आता समुद्राच्या विश्वातले सारे व्यवहार, सारी राजकारणं, सारे जीव आणि त्यांच्या सवयी हे पाहत बघत ती पिल्लं मोठी होतील. एकाच अवकाशात राहून जगतील वाढतील. पण कवचाचं घर असलेल्यांना त्यांच्या आजूबाजूच्या या गजबजाटाचा सोयिस्कर चेहरा स्वत:साठी स्वीकारणं मानवणार नाही. कधीच.
________________
अशी कासवं अनेक असतात. आपल्याच समाजात. आजूबाजूला. त्यांची कवचं दिसत नाहीत. त्यांना गोंजारायला गेलात किंवा भिववायलाही गेलात तर ते आक्रसून स्वत:च्या कोषात दडी मारतात. त्यांना विश्वासात घेऊन थोडंसं प्रेम दिलं तर तेही त्यांच्या कवचाबाहेरचं जग पाहतील. आणि जग पहायची त्यांची एक अद्भूत दृष्टी आहे जी ते तुम्हालाही देऊ शकतील.

भळाभळा वाहायचं भाग्य न लाभलेल्या अश्या अनेक जखमा असतात. ज्या युद्धभूमीवरच्या शौर्याचा दाखला म्हणून मिरवता येत नाहीत. दुर्देवाचे धडे म्हणून गिरवताही येत नाहीत. विचित्र अपघातांची किंवा दु:खद आठवणींची ज्यांना पार्श्वभूमी नसते. ज्यांचे व्रण नसतात. त्यांना चुचकारलं तर त्या आणखिनच ठसठसतात. दुर्लक्ष केलं तर चिघळतात.
या जखमा बर्‍या होत नाहीत. आणि आयुष्यभर अश्वत्थाम्यासारखं या जखमांसाठी तेल मागत फिरावं इतकंही त्राण आपल्यात या जखमा ठेवत नाहीत. या जखमा तिच्या विद्धाने स्वीकारलेल्या असतात. स्वीकारल्याशिवाय त्यांच्या पलिकडे जाताही येत नाहीच. नैराश्याचा डोंगर चढून परिसीमा गाठल्याशिवाय पलिकडचं अस्सल नितळ माणूसपण दिसत नाही.

कासव १०० वर्ष सहज जगतं म्हणे. नैराश्याचा एक एक क्षण एकेका युगासारखा वाटतो. अजून किती आयुष्य असेल खात्यावर हे थांग न लागणार्‍या अथांग समुद्रागत गूढ आहे. १ वर्ष १० वर्ष किंवा ६० वर्षं? ही सारी वर्षं अश्या संथ मंद चालीने घासत घसटत स्वत:चा कोष पेलत कशी सरतील?
एकदा कासवाशी बोलायला हवं.
_________________________

-मुग्धमानसी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भळाभळा वाहायचं भाग्य न लाभलेल्या अश्या अनेक जखमा असतात. ज्या युद्धभूमीवरच्या शौर्याचा दाखला म्हणून मिरवता येत नाहीत. दुर्देवाचे धडे म्हणून गिरवताही येत नाहीत. विचित्र अपघातांची किंवा दु:खद आठवणींची ज्यांना पार्श्वभूमी नसते. ज्यांचे व्रण नसतात. त्यांना चुचकारलं तर त्या आणखिनच ठसठसतात. दुर्लक्ष केलं तर चिघळतात.
या जखमा बर्या होत नाहीत. आणि आयुष्यभर अश्वत्थाम्यासारखं या जखमांसाठी तेल मागत फिरावं इतकाही त्राण आपल्यात या जखमा ठेवत नाहीत. या जखमा तिच्या विद्धाने स्वीकारलेल्या असतात. स्वीकारल्याशिवाय त्यांच्या पलिकडे जाताही येत नाहीच. नैराश्याचा डोंगर चढून परिसीमा गाठल्याशिवाय पलिकडचं अस्सल नितळ माणूसपण दिसत नाही.>>>>>>>>>> क्या बात है,,, जियो..जियो....

-----/\----
सुंदर लिहल आहे.नेहमीप्रमाणे.

चित्रपट अजुन पाहिला नाही.
पण तरीही लेख आवडला. चित्रपटाच्या आशयाचा अंदाज येतो. पहिला परिच्छेद खुप आवडला.

काय लिहिलंय हे!! अतिशय सुंदर. नैराश्याला इतकं सुपर्ब एक्स्प्लेन केलं नसेल कुणी.. अन तेही इतक्या सुंदर शब्दात!!

Manasi.... अफाट अफाट लिहीले आहेस ग....हे सर्व शब्दात व्यक्त करणे फार फार अवघड आहे... पण तू फार छान पेलले आहेस हे लिखाण....