योग- ध्यानासाठी सायकलिंग

Submitted by मार्गी on 27 September, 2017 - 06:55

नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं. आणि सायकलिंगमधली एक गोष्ट म्हणजे नेहमी आपल्याला वेगाची‌ सवय असते. पण सायकलिंगमध्ये वेग कमी होतो व "सजगता" वाढते. शिवाय श्वास घेण्याची क्षमता वाढते. आपोआप ध्यानाची पूर्वतयारी होते. शिवाय निसर्गरम्य प्रदेशात आपलं नेहमीचं रूटीन बाजूला ठेवून जाताना आपोआप एक गॅप निर्माण होते. निसर्ग आपल्याला शांत करतो, रिचार्ज करतो. त्यामुळे एक प्रकारचं डायनॅमिक मेडीटेशन होतं.

म्हणून सायकलिंग करताना त्यामध्ये योग- ध्यान हे घटक असतातच. योग म्हणजेच शारीरिक फिटनेस असल्याशिवाय आणि संथ गतीने दीर्घ अंतर जाण्यासाठी शांत मन असल्याशिवाय सायकलिंग करता येत नाही. त्या अर्थाने सायकलिंग हे योग- ध्यानाशी खूप समांतर आहे. अशा थीमसह एक सायकल मोहीम करणार आहे. योग- ध्यान किंवा भक्ती- शक्ती अशी ह्या मोहीमेची थीम असेल. ह्याची सुरुवात पुण्यातील निगडीच्या भक्ती- शक्ती चौकातून होईल. इथे शिवाजी महाराज व संत तुकाराम ह्यांची भेट झाली होती, म्हणून त्याला भक्ती- शक्ती चौक म्हणतात. योग- ध्यान किंवा भक्ती- शक्ती ह्या थीमनुसार पुण्यातून सायकलिंग सुरू करून पुढे मांढरदेवी, महाबळेश्वर, सातारा- अजिंक्यतारा व सज्जनगड अशी योगाची व ध्यानाला अनुकूल असलेली केंद्रे बघायची आहेत. आणि हा सगळा प्रदेश डोंगराचा- सह्याद्रीचा व निसर्गाच्या कुशीतला. योग- ध्यानासाठी अतिशय पोषक. जिथे निसर्ग ध्यानासाठी आपल्याला मदत करतो, असा परिसर.

प्रवासाची रूपरेषा

२८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये हे सायकलिंग होईल. दररोज एक मोठा घाट/ चढ असणार आहे.

दिवस १: चाकण- धायरी (भक्ती शक्ती चौकातून प्रवास)- ५१ किमी
दिवस २: धायरी- भोर (५५ किमी)
दिवस ३: भोर- मांढरदेवी- वाई- धोम धरण व वाई परिसर (५१ किमी)
दिवस ४: (रविवार): वाई- पाचगणी- महाबळेश्वर- वाई (६५ किमी)
दिवस ५: वाई- सातारा- सज्जनगड (५२ किमी)
दिवस ६: सज्जनगड- ठोसेघर- सातारा- अजिंक्यतारा (सुमारे ४० किमी)
दिवस ७: सातारा- कास पठार- सातारा (५२ किमी)

असं सध्याचं नियोजन आहे. खरं‌ तर सुरुवात २१ सप्टेंबरला करणार होतो, पण तेव्हाच मोठा पाऊस आला, त्यामुळे प्रवास एक आठवडा पोस्टपोन केला. आणि ते बरंच झालं. मधल्या टेस्ट राईडमध्ये आणखी काही गोष्टी‌ कळाल्या. शिवाय योग- ध्यान असलेले टी शर्टस बनवून घेता आले.

आता सायकलिंग नव्याने चालू करून चार वर्षं झाली. पूर्वी अनेक शतकं केली आहेत; दिवसामध्ये सहज म्हणता येतील असे १३० किमीही केले आहेत. ह्या अनुभवातून अनेक गोष्टी समजत गेल्या. शिवाय असंख्य सायकलिस्ट- एंड्युरन्स एक्स्पर्टस ह्यांच्याकडूनही खूप शिकायला मिळालं. अनेकदा सायकल थांबवूनही दर वेळेस चालवण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून खूप काही कळत गेलं. त्यामुळे आत्ताच्या मोहीमेमध्ये दिवसाला फक्त ५०- ६० किमी असा छोटा टप्पा करणार आहे. शिवाय सोबत लॅपटॉप घेऊन लॉजवर थांबून कामही करायचं आहे. कोणतीही सुट्टी न घेता रेग्युलर रूटीनमध्येच हा प्रवास बसवायचा आहे. आणि शिवाय मोठे टप्पे गाठण्यापेक्षा छोट्या टप्प्यातला प्रवास अधिक एंजॉय करायचा आहे व ते ते ठिकाण जास्त निवांतपणे बघायचं आहे. त्यामुळे दिवसाला ५०- ६० किमी हा तसा छोटाच टप्पा आहे. अर्थात वाटेतले घाट, मोठे चढ बघता तोही फारसा सोपा जाणार नाहीच. तरी पण सकाळी ६ ला सुरू करून ११- १२ पर्यंत मुक्कामाच्या जागी पोहचेन, असा अंदाज आहे. बघूया कसं होतं.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमला चोकर्स म्हणतात; कारण ते सगळी तयारी करून शेवटच्या प्रसंगी हरतात. माझ्या पूर्वीच्या दोन मोहीमाही अशाच अर्धवट झाल्या होत्या. त्यामुळे ह्या वेळी तरी शेवटपर्यंत नीट सायकलिंग करता यावं, असा प्रयत्न आहे. सायकलिंगपेक्षा किंवा फिटनेसपेक्षाही मानसिक कणखरपणा जास्त महत्त्वाचा आहे. ते खरं आव्हान आहे. त्या दृष्टीने आजवरच्या अनुभवांमधून आणि माझ्याच पूर्वीच्या जास्त सहज जमलेल्या राईडसमधून बरंच काही शिकायला मिळतं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे सोलो सायकलिंग करताना काही गोष्टींचा फरक पडतो. ग्रूपने जाताना इतरांना बघून नकळत जाण्याचा विश्वास निर्माण होतो. ग्रूपमध्ये अनेक गोष्टी सोप्या असतात. ग्रूपमध्ये शिकणंही सोपं असतं. किंबहुना असं म्हणतात की ग्रूपमध्ये ध्यान करणं हेही सोपं जातं, एकट्याने ध्यान करण्यापेक्षा. कारण ग्रूपचा एक प्रवाह बनतो व तो प्रत्येकाला त्या दिशेला जायला मदत करतो. पण स्वतंत्रपणे एकट्याने शिकणं किंवा सायकल चालवणं हेही थोडं अवघड असतं. सोलो जाताना स्वत:च्याच मनातल्या शंकाकुशंका मोठ्या होतात. त्या दूर ठेवणं हे एका अर्थाने चॅलेंज आहे. शरीर थकेल, मनही थकेल, पण तेव्हा आपण शरीर व मनालाही थोडे बाजूला ठेवू शकतो का, हा प्रश्न आहे.

ध्यानाच्या संदर्भात एक गोष्ट आठवते. ध्यान ह्या शब्दावरून बौद्ध धर्मातला जो संप्रदाय निर्माण झाला- झेन, त्या संदर्भातला एक किस्सा आहे. एकदा एक शिष्या झेन गुरूकडे साधना करत होती. सुरुवातीला तिने गुरूंना सांगितलं, माझ्या मनात खूप अशांती आहे, खूप तणाव आहे. त्यावर गुरू म्हणाले, 'TAKE NO NOTICE!' नंतर साधना करता करता तिला एका वेळी जाणवलं की तिचे विचार खूप शांत होत आहेत. तिने ते गुरूंना सांगितलं. गुरू म्हणाले, 'TAKE NO NOTICE!' नंतर तिला जाणवलं की, तिचे विचार काही काळ शून्य होत आहेत. निर्विचार स्थिती तिला मिळते आहे. तिने ते गुरूंना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, 'TAKE NO NOTICE!' नंतर कालांतराने तिला बोधी प्राप्ती झाली. परम ज्ञान मिळालं. तेव्हाही ती गुरूंकडे गेली. त्यांना सांगितलं. त्यावरही ते तेच म्हणाले, 'TAKE NO NOTICE!'

ह्याच फॉर्म्युलाचा वापर सायकलिंगमध्ये करणार आहे. 'TAKE NO NOTICE' किंवा 'बरं, मग?' किंवा 'So what?' असा प्रश्न स्वत:ला विचारायचा. म्हणजे आपल्या विचारांमध्ये एक ब्रेक येतो, एक गॅप येते. जिथे कुठे विचार खोळंबले असतील, तिथून ते क्षणिक तरी हलके होतात. ऑक्टोबर हीटचा त्रास होतोय- "बरं, मग?” सकाळी सकाळी पंक्चर झालं- "बरं मग?” किंवा घाट चांगल्या वेगात चढता आला, तरीसुद्धा "सो व्हॉट?” ह्या पद्धतीने क्रिकेटच्या भाषेत फक्त समोर खेळल्या जाणा-या चेंडूवर सजगता ठेवून ही सायकल मोहीम करायची आहे. देखते हैं आगे आगे होता है क्या! जे होईल, त्याचं रोज धावतं वर्णन किंवा सायकल चालवतं वर्णन इथे देईनच.

माझे पूर्वीच्या सायकलिंगचे अनुभव व इतर लेखन: www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

परवा राहिलेला अजिंक्यतारा आज चढलो. छोटाच पण तीव्र घाट होता. जमेल ना असं वाटलं पण जमला. आणि नंतर बसवर सायकल टाकून पुण्यात आलो.

Pages